आगरकरांचे समाजशास्त्र

महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकात सामाजिक परिस्थितीचा व समाजरचनेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्यास सुरुवात झाली. त्याबाबतचे आपले परखड विचार प्रथम लोकहितवादी यांनी मांडले आणि म. ज्योतीराव फुले यांनी ह्या विचारांना एक नवे वळण दिले. त्यांच्या मांडणीत जातिव्यवस्थेस विरोध आणि समतेच्या आधारावर नव्या विवेकनिष्ठ समाजाची स्थापना या गोष्टी महत्त्वाच्या होत्या. सुधारकार गोपाळ गणेश । आगरकर हे सामाजिक शास्त्रांचे गाढे अभ्यासक होते आणि समाजाच्या स्थितिगतीबाबतचे त्यांचे विचार आधुनिक आणि परंपराविरोधी होते. त्यांच्या सामाजिक शास्त्रविषयक विचारांवर स्पेन्सरच्या व मिल्लच्या विचारांचा प्रभाव पडला होता. म्हणून निसर्ग व मानवयांच्या विकासाची ते सातत्याने तुलना करताना दिसतात.
समाजशास्त्र हा तसा व्यापक विषय आहे. समाजाची रचना, समाज-सुधारणा, सामाजिक संस्था यांविषयी त्यांमध्ये ज्याप्रमाणे चर्चा केलेली असते त्याचप्रमाणे धर्म, स्त्री-स्वातंत्र्य, धार्मिक व्यवहार, आर्थिक व राजकीय व्यवस्थांचे सामाजिक परिणाम यांचाही त्यात समावेश होतो. मी या लेखात आगरकरांनी ज्या समाजशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांची चर्चा केली आहे त्यांचा परामर्श घेणार आहे.
आपल्या सुधारकातील लेखात आगरकरांनी आधुनिक बुद्धिवादी व विवेकवादी दृष्टिकोणातून तत्कालीन सामाजिक समस्यांची चर्चा केली आणि इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार असा आपला बाणा प्रकट केला. जातिभेद, स्त्री-सुधारणा आणि जुन्या अंधश्रद्धा यांच्यावर त्यांनी अत्यंत प्रखर अशी टीका केली.
आगरकरांच्या समाजशास्त्रात व्यक्तीला व व्यक्तिस्वातंत्र्याला अनन्यसाधारण असेमहत्त्व आहे. कारण कोणत्याही विचारांची व आचारांची इष्टानिष्टता ठरविण्यास ते, बुद्धि हे एकमेव प्रमाण मानीत. सत्यशोधनाच्या मार्गात बुद्धिनिष्ठेशिवाय इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब करू नये. माणसाला किती ज्ञान झाले यापेक्षा तो ज्ञानाच्या मार्गाने किती वाटचाल करीत आहे याचे त्यांस महत्त्व वाटते. सत्यशोधनाची सतत धडपड हेच मानवी जीवितातील शाश्वत मूल्य आहे हे त्यांच्या भूमिकेचे अधिष्ठान होते. जीवन म्हणजे ज्ञानाच्या साह्याने निसर्गावर मिळविलेला विजय नसून सत्यशोधनाच्या प्रेरणेमुळे सतत नवे शोधण्याची धडपड होय असे त्यांचे मत होते.
समाजव्यवस्था ईश्वराने निर्माण केलेली नसून ती इतिहासाच्या प्रवाहात निर्माण झालेली संस्था आहे. आगरकरांच्या मते माणसाच्या विकासाच्या मुख्यतः चार अवस्था आहेत. या चार अवस्था म्हणजे सुरुवातीची शिकार करून भक्ष्य मिळविण्याची अवस्था, नंतरची पशुपालनाची अवस्था आणि त्यानंतर कृषीवलाची अवस्था येते. आगरकरांच्या मते त्यानंतरची अवस्था व्यापाराची अवस्था आहे. जी कुटुंबे, समाज आणि राष्ट्रे या अवस्थेतून गेलेली असतात, ती बर्याचपैकी सुधारलेली असतात. पण हा सुधारणेचा आणि प्रगतीचा जो मार्ग असतो तो काट्याकुट्यांनी भरलेला असतो, कारण त्या काळात माणसा-माणसांत आणि समाजा-समाजांत प्रचंड संघर्ष चालू असतो. आगरकरांनी इतिहासातील अनेक उदाहरणे देऊन असे दाखवून दिले की आजचे जे बलाढ्य समाज आहेत ते एकेकाळी अनेक टोळ्यांत विभागलेले होते. त्यामुळे सुधारणेच्या या प्रक्रियेत क्रूता व अमानुषपणा असतो. जंगलात स्वतंत्रपणे फिरणार्या रानटी टोळ्यांचे इतर टोळ्यांशी संघर्ष होतात व त्यांतील बलवान टोळ्या आपले वर्चस्व प्रस्थापित करतात. नंतर त्यांना ते आपल्या इच्छेप्रमाणे वागावयास भाग पाडतात. अनेक रानटी टोळ्या अशा प्रकारे सक्ती करून एकत्र आणल्या जातात आणि त्यांतून स्थिर समाज निर्माण होतो. स्थिर समाज-निर्मितीसाठी श्रमविभाग आणि श्रमसंयोग ही समाजाची आद्य अंगे निर्माण झाली पाहिजेत. आज जे सुव्यवस्थित आणि बलाढ्य समाज दिसतात त्यांचा पूर्वेतिहास पाहिला की असे दिसून येते की ते एकेकाळी बलाढ्य व चतुर रानटी समाज होते. पण एका समाजाने त्यास जिंकून केलेल्या जीवनकलहामुळे त्यात काही काळानंतर एकात्मता निर्माण झाली. तरी पण अजूनही समाजात वन्यतेच्या घरी सुधारणा दिसून येते तर सुधारणेच्या घरी वन्यता दिसून येते.
आगरकरांच्या मते समाजाची रचना समजावून घ्यावयाची असेल तर जीवनकलहाची संकल्पना आपण समजावून घेतली पाहिजे. सचेतन सृष्टीच्या प्रसरणार्थ जीवनकलह अपरिहार्य आहे, कारण प्राणिमात्रात सतत एकमेकाशी संघर्ष सुरू असतो. हा कलह जर नसता तर “बिलेशयाला अद्वितीय खनिसामर्थ्य, पन्नगाला विषकंठत्व, शिखीला ग्रीवादीर्घत्व व पंचाननाला मृगेंद्रत्व प्राप्त झालेच नसते.” आगरकर लिहितात, प्रतिस्पर्धेमुळे एकाच जातीतील व्यक्ती उत्तरोत्तर चांगल्या होत जाऊन कालांतराने साच्या जातींची सुधारणा होते. इतकेच नव्हे तर जाती-जातींत उदरनिर्वाहार्थ जो रात्रंदिवस संघर्ष चालू आहे त्यामुळे त्यात गुंतलेल्या जीवांच्या मानसिक व शारीरिक शक्तीची परिणती होते. या स्पर्धेत जे क्षीण असतात ते नष्ट होतात. भक्ष्य व भक्षी यांच्यातील स्पर्धेमुळेप्राण्यांच्या सर्व इंद्रियांचा विकास होतो आणि त्याचे ज्ञानतंतू व मज्जातंतू सामर्थ्यवान होतात.
आगरकरांच्या मते स्वतःच्या संरक्षणार्थ आणि उदरनिर्वाहार्थ जे सामर्थ्य प्राणी पैदा करतो त्याचा वापर तो इतर कामांसाठीही करतो. तसे करण्यात आपले हित आहे हे लक्षात येताच अनेक चांगली कामे तो करू लागतो. प्राणी जे करतात तेच कमी जास्त प्रमाणात माणसेही करतात. आज पृथ्वीवर जी मोठमोठी राष्ट्रे दृष्टीस पडत आहेत त्यांची निर्मिती जीवन कलहाशिवाय झालेली नाही. दुसर्या वर चाल करण्यासाठी आणि दुसरे चाल करून आले असता आपले संरक्षण करण्यासाठी मनुष्याने समुदाय बनविले. या समुदायांत व जातींत त्याने श्रमसंयोगाने म्हणजे अनेक व्यक्तींनी समान हितासाठी एका विचाराने श्रम करण्यास सुरुवात केली. एका प्रकारच्या श्रमसंयोगातून साच्या प्रकारचे श्रमसंयोग निर्माण झाले. माणसाने जीवनकलहात अशा प्रकारे आपली सुधारणा घडवून आणली व समाजनिर्मिती झाली.
जीवनकलहात संघर्षाचे व लढ्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. पण अशा विपत्तिकारक गोष्टी सदासर्वकाळ घडत नाहीत. या अपरिहार्य अशा संग्रामामुळे जे गुण अस्तित्वात आले त्यांचा वापर समाजसंघटनासाठी व परस्पर सहकार्यासाठी करायचा असतो. म्हणून आगरकर लिहितात, “वन्यावस्थेतील मारामान्यांपासून उत्पन्न झालेल्या क्रौर्यादि समाजघातक गुणांचा लय होत जाऊन सदयतादि समाजहितोत्कर्षक गुणांचा विकास होत जाणे हाच मनुष्य जातीच्या प्रसरणाचा किंवा परिणतीचा नियम आहे.” आज समाजात अनेक जाती आहेत, निरनिराळे समाज निरनिराळ्या स्थितीत आहेत. त्यात सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे समाजस्थितीबाबत पक्के नियम बनवता येत नाहीत.
माणसाला जगण्यासाठी आणि अन्न, वस्त्र, निवारा इत्यादि सुविधा प्राप्त करून घेण्यासाठी समाज स्थापन करून राहणे गरजेचे असते, कारण समाज सोडून जो राहावयास तयार झाला त्याने मरावयास किंवा वन्य पशूच्या वृत्तीचे अवलंबन करण्यास तयार झाले पाहिजे. मनुष्याच्या सुखास श्रमसंयोगाची गरज असते आणि असा श्रमसंयोग समाज अस्तित्वात असल्याशिवाय होत नाही. श्रमसंयोगास सामाजिक संविधानाची (organisation) व संघटनेची गरज असते. समाजात उत्पादक, विभाजक आणि व्यवस्थापक असे विभाग असतात आणि ते आपापली कामे करून समाजाच्या अवयवांस लागणारी पोषक द्रव्ये पुरवितात. कुणबी वगैरे लोक उत्पादक कामे करतात, उदमी वगैरे विभाजक लोक ती सर्वत्र पोहोचवतात, आणि या सर्व व्यापाराचे व्यवस्थापन करण्याचे काम सरकारी अंमलदार करतात. समाजातील उत्पादक आणि विभाजक वर्गाचे व्यवहार पूर्ण स्वायत्त असतात. कारण त्यांची नजर स्वार्थावर असते. पण या स्वार्थपरायणतेपासून श्रमसंयोग तयार होतो आणि तो आपखुषीचा असतो. आज जे हजारो कारखाने चालू आहेत हे त्याचेच फळ आहे. आगरकरांच्या मते अशा प्रकारच्या संयुक्त क्रियेपासून संपूर्ण समाजाचे हित होत असते हे खरे; पण साच्या समाजाचे हित करावे अशी भावना अशा प्रकारच्या क्रिया करणार्यांेच्याअंतःकरणात जागृत नसते. त्यांची दृष्टी स्वार्थावर असते, पण स्वहित साधता साधता सान्यांचे हित होते.
स्वायत्त श्रमसंयोगापेक्षा वेगळा श्रमसंयोग म्हणजे परायत्त श्रमसंयोग. या श्रमसंयोगात मुख्य दृष्टी व्यक्तीचे स्वातंत्र्य मर्यादित करून समाजाच्या कल्याणाकडे पाहण्याची असते. त्यात व्यक्तीचे कल्याण दुय्यम असते. पण स्वायत्त आणि परायत्त श्रमसंयोग झाल्याशिवाय चांगल्या प्रकारची समाजघटना तयार होत नाही. समाजातील तंटे सोडवण्यासाठी सरकारची निर्मिती होते आणि सरकारच्या हुकुमांमुळे जनतेस कराव्या लागणार्या क्रिया या परायत्त क्रिया असतात. सरकारच्या अंमलामुळे रयतेच्या हक्कांचा संकोच होतो, पण सरकारशिवाय समाजाची परिस्थिती कप्टप्रद होते. या दोन्ही प्रकारचे श्रमसंयोग चांगल्या समाजात हातात हात घालून चालले पाहिजेत.
आगरकर सातत्याने मानवी शरीर आणि समाज यांची तुलना करतात. सामाजिक स्थिती व गती यांचेबद्दल विवेचन करताना ते लिहितात की समाजाच्या आद्यस्थितीत श्रमविभाग फारच संकुचित असतो आणि त्याचे घटकवर्ग थोडे असतात. पण तो जसजसा वाढत जातो तसतसा घटकवर्ग वाढू लागतो. त्यामुळे त्यात आपल्या देशातील जातिभेदासारखे एकमेकांपासून अलग राहाणारे अनेक वर्ग उत्पन्न होतात. अशा रीतीने अस्तित्वात आलेल्या वर्गातील लोकांना त्यातच राहणे सुखावह आणि हितावह वाटते. क्रमागत धंदा फारसे कष्ट न करता त्यास करता येतो. बाहेरच्या जातीतील लोकही त्यास आत येऊ देत नाहीत. त्यामुळे जातीचे बंध फार दृढ होतात. आतल्यांस बाहेर जाता येत नाही आणि बाहेरल्यांस आत जाता येत नाही.
भारतातील समाजव्यवस्थेमध्ये जातिव्यवस्था महत्त्वाची आहे. चार वर्ण हे परमेश्वराच्या चार अवयवांपासून झाले हे प्रतिपादन अर्थातच आगरकरांना मान्य नाही. त्यांच्या मते जातीदेखील श्रमविभागणीतून निर्माण झाल्या. त्या ज्याप्रमाणे ईवरनिर्मित नाहीत त्याचप्रमाणे त्या एका उच्च जातीच्या कपटकारस्थानातून निर्माण झालेल्या नाहीत. श्रमविभागाच्या व श्रमसंयोगाच्या प्रक्रियेत त्या निर्माण झाल्या. जोतीराव फुले यांच्या मीमांसेवर टीका करताना ते लिहितात. “रेव्हरंड ज्योतिबांसारखे लोक दुराग्रहामुळे व अविचारामुळे ब्राम्हणास त्याचा दोष देत आहेत. पण वर्णव्यवस्था ही व्रह्मदेवाच्या योजनेमुळे किंवा ब्राम्हणांच्या स्वहितसाधन-परायणतेमुळे झालेली नसून तिचा संबंध एका विशिष्ट अशा सामाजिक परिस्थितीशी जोडावा लागतो.” आगरकरांच्या मते समाजविकासाच्या प्रक्रियेत वर्णभेद व जातिभेद यांसारख्या संस्था प्रत्येक समाजात वेगवेगळ्या प्रकारे अस्तित्वात येतात, कारण त्यांची निर्मिती श्रमविभागणीतून होते. जातिसंस्थेमुळे स्पर्धा टळते. प्रत्येक व्यक्ती आपल्या जागी खिळली जाऊन काम करते. त्यामुळे जाती हे भारतीय समाजसंघटनेचे स्थितितत्त्व होते. पण बदलत्या काळात त्यात बदल होणे गरजेचे आहे. कारण जातिसंस्था निर्दोष नसून तिच्यामुळे आमचे मोठे नुकसान झाले आहे. जातिसंस्थेतील स्थित्यंतरास त्या व्यवस्थेचा फायदा घेऊन सत्ता बजावणारे लोक विरोध करतील. त्यामुळे जातिभेद क्षीण झाला पाहिजे. त्यासाठी ब्राह्मणेतरांनी ज्ञान संपादून ब्राह्मणांचे हक्क मिळविले पाहिजेत आणि ब्राह्मणांनीही त्यास मदत केली पाहिजे. जातिद्वेषाऐवजी एकोपा वाढणारी बंधुप्रीती वाढणे गरजेचे आहे. कारण सर्वांनी मिळून विचारपूर्वक मीमांसा करून जातिभेद नष्ट केला पाहिजे.
समाज हा नेहमी गतिमान असतो, कारण एकही सचेतन वस्तू स्थिर नाही. त्यात प्रत्येक क्षणास प्रत्येकी दृश्य व अदृश्य फेरफार होतात हे कळून येणे फार महत्त्वाचे आहे. सामाजिक स्थित्यंतरे जर निसर्गनियमांप्रमाणे अपरिहार्य असतील तर ती आपणांस कशी सुखकारक होतील हे पाहणे प्रत्येक विचारी माणसाचे कर्तव्य आहे. म्हणून आपण आपणास अनुकूल अशा स्थित्यंतरास साह्यभूत झाले पाहिजे.
आगरकरांच्या मते माणसाच्या सामाजिक व्यवहाराचे राज्यविषयक, धर्मविपयक आणि अवांतर असे तीन भाग पडतात. राज्याची उत्पत्ती माणसाच्या संरक्षणासाठी झाली, कारण राज्याची गरज हिंस्र पशूस पडत नाही. म्हणून कळप करून राहणे, एके ठिकाणी राहणे आणि समाज स्थापना करणे या सर्व जबाबदार्याय माणसासारख्या बलहीन प्राण्यांकडे आल्या. माणूस संगमनशील होण्याचे हेच एक कारण आहे. म्हणूनच तो शेवटपर्यंत राजाचा जुलूम सहन करतो. पण एकदा समाजातील तंटे बंद झाले की राजा वा त्याच्या अधिकार्यातपासून होणारी पीडा कशी दूर करायची याचा लोक प्रयत्न करतात. आगरकरांच्या मते मानवाच्या वेगवेगळ्या समूहांस कुटुंब, जाति, वंश व राष्ट्र अशा वेगवेगळ्या संज्ञा देण्यात आल्या आहेत. पण समाजावर राजाचे वर्चस्व वाढले आणि राजा हा ईश्वराचा अंश आहे असे म्हणावयास सुरुवात झाली की राजे क्रू आणि नीच बनतात आणि प्रजा भेकड बनते. त्याबाबत आगरकर लिहितात “जोपर्यंत जुलूम शस्त्रहीन आणि अनाथ प्रजेवर होतो तोपर्यंत तिची दाद कोठेही लागत नाही; पण तोच अन्याय जर राज्यातील मोठ्या कुळांवर होऊ लागला तर राज्यात दुफळ्या होतात व ही घराणी सरकारविरुद्ध जाऊन त्या राजाचा पाडाव होतो.”
राजकीय क्षेत्रात सुधारणा आणि विकास अभिप्रेत असतात. आगरकरांच्या मते राजसत्ता राजाकडून काही सरदारकुलांकडे संक्रमित होते; पण त्यातही नंतर बदल होतो आणि ती जनतेच्या हाती येते. युरोपात काही राष्ट्रांत लोकशाही परिस्थिती आहे. तेथे अनेकसत्तात्मक राज्य आहे. आशियाई देशात मात्र एकसत्ताक राजतंत्रच प्रबळ आहे. युरोपातील देशात अनेकसत्तात्मक लोकशाही असली तरी त्या लोकशाहीचा फायदा आशियातील वसाहतीत राहणार्याल लोकांना होत नाही. आज जरी एकसत्तात्मक राज्ये संख्येने जास्त असली तरी आगरकरांना अशी खात्री वाटत होती की कालांतराने युरोपात तर लोकशाही राजवट स्थापन होईलच, पण त्याचप्रमाणे ती आशिया, आफ्रिका, आस्ट्रेलिया आणि द. अमेरिका खंडांतही स्थापन होईल, कारण लोकशाहीची राजवट सौम्य आणि सुखावह असते. माणसाच्या आणि समाजाच्या सुधारणेचा विचार करीत असताना आगरकर असे मत प्रतिपादन करतात की समाजात लोकसत्ताक राज्य प्रस्थापित होणे ही खरी सुधारणा आहे. त्याचप्रमाणे माणसाने स्वप्रयत्नाने निसर्गावर प्रभुत्व मिळविणे आणि त्यानुसार आपल्या जीवनाची व्यवस्था लावणे गरजेचे आहे.
सुधारणेचा अर्थ समजावून सांगत असताना आगरकर असे मत व्यक्त करतातं की खच्या स्वतंत्र समाजात व्यक्ती-व्यक्तीतील परस्परसंबंध बलात्काराच्या आधारावर बनविले जात नाहीत तर ते संमतीच्या आधारावर उभे असतात. पूर्वीच्या काळात व्यक्ती आणि व्यक्ती, स्त्री आणि पुरुष यांच्यातील संबंध बलात्कारावर आधारलेले होते. पण आता संमतीच्या आधारावर काम करणे महत्त्वाचे आहे. येथे दोन स्वतंत्र व्यक्तींची संमती गृहीत धरली आहे, कारण प्रत्येकास संमती देण्याचे किंवा न देण्याचे स्वातंत्र्य असते. व्यक्ती व समाज यांत अन्योन्यसंबंध आहे. आपले सुख परस्परांतील चांगल्या संबंधावर आधारित आहे असे म्हटल्यानंतर व्यक्तीस आपल्या वर्तणुकीस दुसन्याच्या सुखासाठी मुरड घालावी लागते. येथे बलात्काराऐवजी स्त्रीपुरुषसंबंध संमतितत्त्वावर आधारलेले असले पाहिजेत. त्याचप्रमाणे समाजातील सर्व व्यवहार संमतितत्त्वावर आधारलेले असले पाहिजेत. आगरकरांच्या मते प्रख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ आगस्ट कोंप्ट याने फ्रेंच समाज नव्या तत्त्वावर उभा करण्याबाबत विचार मांडले, पण तो त्यात इतका वाहवत गेला की त्याने वर्णिलेली राज्यव्यवस्था तत्कालीन फ्रेंच राज्यपद्धतीपेक्षा जास्त सक्तीची आहे. जर्मनीतील अलीकडच्या सामाजिक तत्त्ववेत्यांची विचारपद्धती अशाच प्रकारची आहे. त्यांनी लोकांस पूर्ण स्वातंत्र्य देण्याच्या हेतूने ज्या राज्यपद्धतीचे विवरण केले आहे ती खरोखर अंमलात आणली तर व्यक्ति-स्वातंत्र्य कोठे दृष्टीस पडेल याविषयी शंकाच आहे.
माणसास स्वभावतः स्वातंत्र्य सुखावह वाटते आणि पारतंत्र्य दुःखावह असते. समाजात सर्वांच्या हितासाठी प्रत्येक जण आपल्या स्वातंत्र्याचा काही प्रमाणात संकोच करतो, पण हा संकोच करीत असताना त्याची दृष्टी सर्वांच्या कल्याणाची असते. आगरकर आत्यंतिक व्यक्तिवादाच्या विरोधी होते. स्वतः स्वार्थी असणारे काही लोक असे म्हणतात की मनुष्य अप्पलपोटा प्राणी आहे व स्वहितासारखी त्याला कोणतीही गोष्ट प्रिय नाही. कोणतीही गोष्ट करण्यात त्यांचा स्वहितसाधनेचा हेतू असतो. पण आगरकरांना हे मत मान्य नाही. त्यांच्या मते जुलुमी लोकच अशा तत्त्वज्ञानाचे प्रसारक आणि प्रतिपादक असतात. सगळेच सचेतन जग जर स्वार्थपरायण बनून काम करू लागले तर त्यामुळे सर्व जगाचा नाश होईल. म्हणून स्वातंत्र्याचा उपभोग घेणारा माणूस स्वार्थपरायण राहत नाही; तो इतरांच्या कल्याणासाठी प्रयत्न करतो.
सुधारणेचा अर्थ विशद करताना आगरकर असे मत व्यक्त करतात की खर्या स्वतंत्र समाजात व्यक्ती-व्यक्तीतील परस्परसंबंध सहकार्यावर तयार होतात. समाज हा काल्पनिक पुरुप आहे आणि समाजाचे हित म्हणजे या पुरुषाचे कल्याण नव्हे, तर त्याच्या अवयवांचे कल्याण होय. काही लोक असे म्हणतात की समाजाच्या कल्याणासाठी व्यक्तीच्या हिताकडे दुर्लक्ष झाले तरी हरकत नाही. पण आगरकरांच्या मते असे म्हणणे अयोग्य आहे, कारण व्यक्तीच्या हिताहून वेगळे असे समाजाचे हित नसते. जेव्हा काही लोक समाजहितार्थ उदासीनता आणि व्यक्तिहितार्थ कळकळ दाखवितात त्यावेळी त्यांच्या विचारांचा भावार्थ व्यक्तीचे कल्याण म्हणजे समाजातील काही मुख्य लोकांचे कल्याण असा असतो. या प्रकारेज्या समाजाचे वर्तन होते त्यात एका पक्षाकडे पैसा आणि इतरांकडे दारिद्रय आणि दास्य यांची वाटणी झालेली असते. समाजाच्या विकासाच्या कामात जे शारीरिक व बौद्धिक बळयांच्या दृष्टीने श्रेष्ठ असतील त्यांच्याकडे सत्ता आणि संपत्ती जाते. पण हा ओघ बंद करून सर्वास सारखे, निदान होईल तितके सारखे, सुख मिळणे म्हणजे सुधारणा होत जाणे होय. ज्या देशात असे चित्र नाही त्या देशात खरी सुधारणा झालेली नाही असे म्हणणे भाग आहे.
आगरकरांच्या मते विचार करणे, सुखदुःखांचा उपभोग घेणे व क्रिया करणे या माणसाच्या तीन महत्त्वाच्या कृती आहेत. सुख मिळविण्यासाठी सर्वजण धडपडत असतात आणि ते योग्यही आहे; पण ते सुख समाजास धोकादायक असता कामा नये. म्हणून ज्याला सुखोपभोग घ्यायचा आहे त्याने सुखांची निवड करताना ती आपणांस व इतरांस शेवटपर्यंत सुखमय होईल हे पाहावे. उत्पादनातील कामाच्या फरकामुळे समाजात विषमता निर्माण होते. पण ही विपमता नियंत्रित केली पाहिजे, नाही तर त्या देशात घनघोर राज्यक्रांती होण्याच्या संभव असतो. कारण फार दिवस अन्यायात काढावयास सहसा लोक तयार नसतात. सतत अन्याय आणि कष्ट साहणे म्हणजे जीवितत्तत्व कमी करून घेणे होय. पण माणसातील हे तीन वर्ग कायमचे नाहीत. याबाबत आगरकर लिहितात, “हळूहळू प्रत्येक व्यक्तीस विचार, उपयोग व कामे ही समप्रमाणात करावी लागून सार्यां च्या सुखाची इयत्ता सारखी होत जाणार आहे. जो जो तसे होईल तो तो खरी उन्नती झाली असे म्हणता येईल. त्यांच्या मते सर्व लोकांच्या परिस्थितीत एकसारखेपणा प्रस्थापित करता येणे शक्य नसले तरी समाजातील विविध वर्गातील अंतर कमी झाले पाहिजे. जीवितकलहात जर आपणास आपल्या समाजाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आपण कर्तव्यबुद्धी जागृत ठेवून रात्रंदिवस निरपेक्ष बुद्धीने झटले पाहिजे. आपल्या समाजात मूलभूत अशा सुधारणा घडवून आणल्या पाहिजेत.
आगरकरांच्या मते इतर प्राण्यांपेक्षा मनुष्याची स्थिती वेगळी असते. कारण आपल्या चरितार्थासाठी निरंतर उद्योग करण्याची बुद्धी वे सामर्थ्य त्याच्याजवळ असते. मनुष्याची आहारवस्तू कष्टसाध्य असते आणि त्याची उपभोगेच्छा अनिवार असते. अनेक उपभोगांची वांछा करावी असा त्याचा सामान्य स्वभाव आहे. त्यामुळे त्यास जास्त उद्योग करावा लागतो. वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान संपादन करून व्यक्ती सुख प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करते.
आगरकर स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या मते समाज सुव्यवस्थित चालण्यास जेवढे पारतंत्र्य लागते तेवढे ठेवून माणसास पूर्ण स्वातंत्र्य दिले पाहिजे. स्वातंत्र्य आणि सुधारणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, कारण समाजघटकांत मंदत्व प्राप्त झाले की समाज मंदावतात. त्यांच्या रचनांत काठिण्य निर्माण होते आणि ते बदलास विरोध करू लागतात. समाजात नियत व नियामक असे दोन भाग असतात. नियामक भाग म्हणजे सरकारी यंत्रणा जर जास्त प्रबळ बनली तर नियत भाग म्हणजे लोक क्षीण होतात. ते आपले काम सरकारवर टाकून देतात. ज्या देशात सरकारच्या अधिकार्यांषची संख्या आणि खाती यात वाढ होते त्या देशातील प्रजा अधिकाधिक दुर्बल आणि परतंत्र बनते.
सरकारी अधिकार्यांतचा निर्वाह प्रजेने दिलेल्या करामुळे होतो. त्यामुळे प्रजेविरुद्ध सर्व सरकारी खाती एक असतात! समाजाच्या व्यवस्थापनासाठी सरकारची नियामक व्यवस्था आवश्यक असली तरी ती फाजील होता कामा नये. सरकारी नोकरांनी समाजासआपल्या पायावर उभे राहण्यास मदत करावी ,पण त्यास पंगू करू नये.
आगरकरांच्या मते सामाजिक आचरणाचे दोन प्रकार असतात. पहिले म्हणजे ज्या आचरणाचा इतरांशी संबंध आहे असे आचरण व दुसरे म्हणजे ज्याचा दुसर्याहशी संबंध नाही असे आचरण. माणसाला त्याच्या खाजगी जीवनात कसे वागायचे, कोणते कपडे घालावयाचे इ. चे संपूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. याउलट सामाजिक बाबतीत करार पाळणे, खरे बोलणे, परोपकार करणे, कायदे पाळणे याबाबतचे वर्तन रूढ राजकीय व सामाजिक नियमांना अनुसरून झाले पाहिजे. आगरकरांच्या लिखाणावर येथे जॉन स्टुअर्ट मिलच्या विचारांची दाट छाप पडलेली दिसून येते. ते असे सांगतात की लोकांच्या कल्याणासाठी जो हेतू मनात धरला असेल त्यासाठी सत्यानिष्ठ माणसाने निर्धाराने काम करणे गरजेचे आहे.
आगरकर समाजसुधारणेचे मोठे पुरस्कर्ते होते. आपल्या प्राचीन संस्कृतीत सर्वच गोप्टी चांगल्या आहेत असे त्यांचे मत नव्हते. उलट अशा पूर्वगौरववाद्यांवर त्यांनी अतिशय कठोर अशी टीका केली. लोकांना राग आला तरी हरकत नाही, पण सत्य तेच वालणार असा त्यांच्या वाणा होता. समाजसुधारणा करण्यासाठीच त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र काढले. ते लिहितात, “सध्या भारतीय आर्यशाखेवर दारुण प्रसंग गुदरला आहे. त्याचा जरठ वृक्ष अगदी आतून शुष्क होतो आहे. त्याला नवीनावस्था आणण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे त्याची खूप खच्ची करून त्यास अर्वाचीन कल्पनांचे खूप पाणी द्यावयाचे. असे केले तरच त्यांचे पूर्वस्वरूप पूर्ण नष्ट न होता त्यांपासून नूतन वृक्ष अस्तित्वात येईल.” आगरकरांना भारताची ‘शिलावस्था’ नष्ट करून समाजास गतिमान करावयाचे होते. पण हे करीत असताना मूळ भारतीय आर्यत्व न सोडता या पाश्चिमात्य नवीन कल्पनांचा व शिक्षणाचा आपण स्वीकार केला पाहिजे असे त्यांचे मत होते. समाजाचे कुशल राहून त्यास अधिकाधिक उन्नतावस्था येण्यास जेवढी बंधने अपरिहार्य आहेत तेवढी कायम ठेवून बाकी गोप्टी व्यक्तिमात्रास (स्त्री व पुरुप यांस) जितक्या स्वातंत्र्याचा उपभोग घ्यावयाचा आहे तितका घेऊ देणे हे अर्वाचीन सुधारणेचे मुख्य तत्त्व आहे.
आगरकर जातिभेदाच्या आणि अपृश्यतेच्या विरोधात होते. ज्यामुळे भारताला आपले स्वातंत्र्य गमवावे लागले त्या सर्व कुधारणांचा नाश केल्याशिवाय नवे स्वातंत्र्य मिळूनही त्याचा उपयोग होणार नाही असे त्यांचे मत होते. सुधारणा करीत असताना त्या विचारपूर्वक आणि धाडसाने केल्या पाहिजेत. ज्या वहिष्कारामुळे लोकांशी मुळीच संबंध तुटणार आहे व वहिष्कृतांची वेगळी जात होणार आहे तो टाळावा असे आगरकरांचे मत होते. लोकांपासून अजिबात तुटून पडल्याने सुधारणा होत नाही, म्हणून त्यांच्यात राहून । निर्धाराने व विचारपूर्वक सुधारणेचे काम केले पाहिजे. खरी सुधारणा कशात आहे हे काळजीने ठरविले पाहिजे. हिंदु धर्मात बरीच व्यंगे आहेत म्हणून इतर धर्माचा स्वीकार करणे योग्य नाही, कारण हजारो पिढ्यांनी मोठ्या कष्टाने जपलेल्या परंपरा व सुधारणा यांना आपण मुकू म्हणून सुधारणा या लोकांत राहूनच केल्या पाहिजेत. अज्ञानी देशबांधवांच्या निंदेस न भिता त्यांच्याशी कधी भांडून, कधी युक्तिवाद करून, कधी लाडी-गोडी लावून अथवा सामर्थ्य असल्यास कधी त्यांस दटावून त्यांची सुधारणा करणे त्यातच खरी देशप्रीती, खरी बंधुता, खरा देशाभिमान व खरा पुरुषार्थ आहे. याच्या उलट जे वागतात ते सुधारणा करीत नाहीत तर शृंखलांतर करतात. सुधारणेच्या कामात लोकजागृतीबरोबर आपण कायद्याचा वापर केला पाहिजे असे आगरकरांचे मत होते. आगरकरांच्या समाजशास्त्रात कुटुंबपुनर्रचनेचा कार्यक्रम महत्त्वाचा मानला गेला. संयुक्त कुटुंबपद्धतीमुळे स्त्रीदास्य अधिक बळकट होते म्हणून आगरकर विभक्त कुटुंब पद्धतीचे पुरस्कर्ते होते. स्त्रीस्वातंत्र्याचा प्रश्न त्यांनी त्या काळात मोठ्या हिरिरीने मांडलाआणि पुनर्विवाहबंदी, सती, केशवपन, घटस्फोट, स्वयंवर, स्त्रियांशी वागतानाचे क्रौर्य व अधमपणा, संमतिवयाचा प्रश्न या बाबतीत सनातन्यांवर आणि त्यांचे अनुरंजन करणाच्या लोकांवर त्यांनी कठोर टीका केली. अडाणी, मागास आणि अन्यायी लोकमतास विरोध करून जे पुरुप समाजाला सुधारणेच्या रस्त्यास लावतात तेच खरे लोकाग्रणी होत असे त्यांचे मत होते. स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांना सर्वच व्यवहारात भाग घेऊ दिला पाहिजे. स्त्री-पुरुष-संबंध समानतेच्या आधारावर उभे राहिले पाहिजेत आणि स्त्रीसुधारणेशिवाय सामाजिक प्रगती शक्य नाही असे त्यांचे मत होते. आगरकरांनी धर्माबाबतही पुष्कळ लिखाण केले आणि धर्माच्या उपपत्तीची वास्तववादी कारणमीमांसा केली. मराठी भाषेत प्रथमच एवढ्या खुलेपणाने धर्माचे स्वरूप आणि उत्पत्ती याबाबत आगरकरांनी चर्चा केली आणि चर्चेला भारतीय तत्त्वज्ञानाच्या बाहेर जाऊन एक व्यापक असा समाजशास्त्रीय दृष्टिकोण दिला. त्यांच्यामते जों जो लोकांना कार्यकारणभावाचे योग्य ज्ञान होईल तों तों सर्व व्यर्थ आचार कमी होतील. लोकांची वागणूक पराकाष्ठेची साधी आणि नैतिक होईल. सत्यपरायणता, न्यायरती, परोपकृती आणि शहाणपणा इत्यादि सद्गुणांची वृद्धी होऊन लोक जास्त सुखी होतील. धर्माच्या विकासाचा ऐतिहासिक आधार घेऊन ते असे मत व्यक्त करतात की देव आकाशातून आलेले नाहीत. आम्हीच त्यांना कल्पनेने निर्माण केले. पण पुढे शुद्ध कल्पनेने निर्माण झालेल्या वस्तूंची असत्यता प्रत्ययास येते व काही काळ एका परमात्म्याची कल्पना उदयास येते.“पण पुढे वेदांतविचाराच्या कुंडात पेटलेल्या अग्नीत हे द्वैतही खाक होऊन जाते आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ हा अनिर्वचनीय विचार मागे राहतो”. व्यक्तीच्या व राष्ट्राच्या धर्मविचाराचा हा कळस आहे. येथपर्यंत ज्याची मजल गेली त्याला सर्व धर्म तुच्छ आहेत.”
आगरकर धार्मिक आणि सामाजिक सुधारणांचे पुरस्कर्ते होते आणि समाजजीवन एकात्म असते म्हणून सर्व सुधारणा परस्परावलंबी असतात असे त्यांचे मत होते. सर्व सुधारणांचा उद्देश विवेकावर आणि बुद्धिनिष्ठेवर आधारलेला समाज निर्माण करणे हा होता. स्त्रियांची दास्यस्थिती नाहीशी करणे, हिंदू धर्माचे संशोधन करून त्यास निर्विकल्प रूप देणे आणि जातिभेदाचे निर्मूलन करून ज्याला त्याला स्वतःच्या शारीरिक आणि सामथ्र्यानुरूप स्वहित व परहित-साधन करू देणे या सुधारणा त्यांना अभिप्रेत होत्या. त्या करताना लोकांकडून छळ आणि त्रास होईल; पण याबद्दल त्यांचा तिरस्कार न करता मनुष्यतेचे ऐहिक सुखवर्धन या सार्वत्रिक भावी धर्माची ज्यांनी दीक्षा घेतली असेल त्यांनी कोणास न भिता आपल्या मनास जे शुद्ध, प्रशस्त व कल्याणप्रद वाटत असेल ते दुसन्यास सांगावे व त्याप्रमाणे वागावे असे आगरकरांचे सांगणे होते.
सामाजिक आणि राजकीय सुधारणा ही सातत्याने चालणारी प्रक्रिया’ असून आगरकर असे मत व्यक्त करतात की सुधारणेस कधीही पूर्णविराम नसतो. सुधारकाची सुधारणाबुभुक्षा कायमच राहते, कारण खच्या सुधारकाला सुधारणेचा वीट येण्याचा संभव नाही. सध्याचे जग अपूर्ण आहे आणि बहुधा त्यास पूर्णत्व येणार नाही. सध्या तातडीच्या असणार्यास सुधारणा झाल्यावर जातिभेद मोडणे, धर्मसुधारणा करणे, मद्यपान बंद करणे आणि सर्वांना सार्वजनिक शिक्षण देणे या सुधारणा करणे गरजेचे आहे. सर्व प्रौढ स्त्रीपुरुषांस लिहिता वाचता आले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीस आपल्या चरितार्थासाठी एखादा तरी धंदा आला पाहिजे. पुढे ते लिहितात, “सहजगत्या उदरपोपण करता येऊन दिवसाचा काही वेळ आत्मचिंतनाकडे, आवडीच्या शास्त्राच्या अभ्यासाकडे, मनास रुचेल ती करमणूक करण्याकडे किंवा विश्रांतीकडे लावता आला पाहिजे. या सर्व गोष्टी घडून येण्यास किती शतके लागतील हे सांगता येत नाही. भारतातील लोकांनी पूर्व आणि पश्चिमेकडील आचारविचारांचा नीरक्षीरविवेकाने विचार करून स्वतःची अशी नवी सुधारणा निर्माण करावी व अभूतपूर्व अशा आधिभौतिक आणि आध्यात्मिक सुखाचे धनी व्हावे असे
आगरकरांचे सर्वांना सांगणे होते.
येथवर आपण आगरकरांच्या समाजशास्त्रीय विचारांचा थोडक्यात परिचय करून घेतला. त्यांच्या विचारांवर स्पेन्सर आणि मिल यांच्या तत्त्वज्ञानाचा खोल परिणाम झाला होता. पण भारतीय संदर्भात आपल्या समाजशास्त्राची मांडणी करीत असताना त्यांनी भारतातील संदर्भ कधीच डोळ्यांआड होऊ दिला नाही. त्यांच्या पुढचा मुख्य प्रश्न नव्या परिमापेबरोबर भारतीय समाजशास्त्र सिद्ध करण्याचा होता आणि त्यांनी तसा प्रयत्न बर्यायच यशस्वीरीत्या केला असे म्हणावयास हरकत नाही. त्यांच्या समकालीन विचारवंतांपेक्षा आगरकरांचे वेगळेपण त्यांच्या शास्त्रीय दृष्टिकोणात होते. समाजाची उत्पत्ती, स्थिती आणि गती यांचा त्यांनी शास्त्रीय दृष्टिकोणातून अर्थ लावला आणि सर्व प्रक्रियांचा अभ्यास ऐतिहासिक संदर्भात केला. त्यासाठी त्यांनी इतिहासातील वेगवेगळ्या घटनांची उदाहरणे दिली आणि जगाच्या इतिहासातील उदाहरणे देत त्यांनी आपल्या मतांची मांडणी केली. हा ऐतिहासिक दृष्टिकोण काही बाबतीत म. जोतीराव फुले यांचा अपवाद वगळता इतर विचारवंतांनी स्वीकारलेला नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा दृष्टिकोण पूर्णतः ऐहिक होता आणि ते स्वतः अज्ञेयवादी असल्यामुळे ईश्वरीय हस्तक्षेपास त्यांनी सोडचिठ्ठी दिलेली होती. शिकार, गोपालन, कृषी आणि व्यापार या चार मानवी विकासाच्या अवस्था असूनआजचे युग हे व्यापाराचे युग आहे हे त्यांनी व्यवस्थितपणे दाखवून दिले.
माणसा-माणसांतील भेद आणि वर्ग यांची उत्पत्ती देवाने केली नाही किंवा ती कोण्या एका गटाच्या स्वार्थी कारस्थानातून झालेली नसून त्याची निर्मिती श्रमविभागातून आणि श्रमसंयोग यातून झाली असे त्यांचे मत होते. पण या प्रकियेत ज्या उच्च वर्गाचा व जातींचा फायदा झाला त्यांनी ही व्यवस्था कायम ठेवण्याचा प्रयत्न केला हेही आगरकरांनी मान्य केले. श्रमविभागातून निर्माण झालेली विषमता जास्त जाचक ठरली तर अशा समाजात घनघोर राज्यक्रांती झाल्याशिवाय राहणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
आगरकरांच्या समाजविचारात जीवनकलहाचे तत्त्व प्रधान होते. त्यांच्या मते या जीवनकलहातून माणसाचा विकास झालेला आहे. पण कलहाबरोबरच समाजनिर्मितीसाठी परस्परसहकार्यही आवश्यक असल्याचे ते मानतात. निसर्गनियम आणि मानवी जीवनातील नैतिक नियम यांच्यातील भेदांचा विचार करीत असताना आगरकरांच्या लिखाणातील अंतर्विरोध स्पष्ट दिसतात; कारण एकदा निसर्गनियमावर व जीवनकलहावर अधिष्ठित समाजविचार आपण मान्य केला की आपण निसर्गबद्ध नियतिवादी बनतो आणि निसर्गास क्रूरता मान्य आहे म्हणून प्रत्यक्ष मानवी जीवनातही ती अपरिहार्य आहे असे आपणास म्हणावे लागते. पण आगरकर नैतिक नियमांचे पुरस्कर्ते होते. त्यांना सर्वांना सुखी करणारा, प्रत्येकाला काम धंदा मिळवून देणारा, प्रयत्न करून आत्मप्रतीती साधणार्यां सत्यपरायण व्यक्तींचा आदर्श समाज स्थापन करायचा होता. या दोन्ही भूमिकांमधील अंतर्विरोध अगदी स्पष्ट आहे. आगरकरांनी शेवटी नैतिकतेच्या बाजूने आपला विचार मांडलेला दिसतो. म्हणूनच आगस्त कोम्टेच्या समाजविचारांवर त्यांनी स्वातंत्र्याचा संकोच करणारा विचार म्हणून टीका केली.
आगरकर पाश्चात्त्य सुधारणेचे पुरस्कर्ते असले तरी भारताने पूर्णतः युरोपाचे प्रतिबिंब बनावे असे त्यांचे मत नव्हते. भारताच्या संस्कृतीबद्दल त्यांना अभिमान होता आणि भारत जगापुढे एक नवा आदर्श निर्माण करू शकेल असे त्यांचे मत होते. त्यांचा समाजसुधारणाविषयीचा विचार जास्त परिपक्व होता आणि लोकांत राहून त्यांच्याशी वाद घालीत, त्यांच्यात जागृती करीत आपण सुधारणा करावी असे त्यांचे सांगणे होते.
आगरकरांची सुधारणेची किंवा आजच्या भाषेत बोलावयाचे तर विकासाची कल्पना खूप व्यापक होती. राजकीय सुधारणेची परिणती सौम्य आणि सुखावह अशा लोकशाही राजवटीत व्हावी असे ते सांगत. त्याचप्रमाणे आर्थिक विकासात विषमतानिर्मूलन आणि सर्वांस रोजगार मिळणे या गोष्टी त्यांना अग्रक्रमाच्या वाटत. सुधारणा ही न संपणारी प्रक्रिया असून प्रत्येक व्यक्तीस जास्तीत जास्त सुख मिळावे अशी त्यांची भूमिका होती. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असतानाच व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे केवळ स्वहितपरायणता असे त्यांचे मत नव्हते. व्यक्तिस्वातंत्र्याला त्यांनी व्यापक समाजहिताचा संदर्भ दिला आणि माणसाने जागृत राहून स्वप्रयत्नाने दास्यमुक्ती करून घ्यावी असे विचार मांडले.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.