आगरकरांचा जातिविचार भास्कर

आगरकरांनी आपल्या लिखाणातून कौटुंबिक सुधारणांवर अधिक भर दिला असला तरी काही राजकीय-सामाजिक-आर्थिक प्रश्नही हाताळले आहेत. एवढेच नव्हे तर ब्राह्मणी परंपरेतील अन्य सुधारकांपेक्षा अधिक साक्षेपाने त्यांनी त्यांचा ऊहापोह केला आहे. हिंदु समाजातील जातिभेद, उच्चनीचता, अस्पृश्यता यावर आगरकरांनी टीका केली आहे. जातिभेदांची उपयोगिता संपली असून ते सामाजिक प्रगतीच्या आड येत असल्यामुळे क्रमशः ते नष्ट व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. जन्माधिष्ठित जातिव्यवस्था व्यक्तिविकासाला कशी मारक ठरते हे त्यांनी आवर्जून सांगितले आहे. त्यांच्या मते, जन्मतः सारखेच हक्क व योग्यता घेऊनआलेल्या व्यक्तींचे ते हक्क व योग्यता पुढे त्याच्या जातिधर्मावर नव्हे तर कमीअधिक बुद्धिविकासावर व उद्यमशीलतेवर अवलंबून असावी. जन्म कोणत्या जातीत होतो यासारख्या पूर्णतया यादृच्छिक घटनेवरून माणसाचे भवितव्य निर्धारित होणे त्यांना नामंजूर होते. जातिसंस्थेची उपपत्ती, आधार, विस्तार, स्वरूप अशा सर्व गोष्टींची सूक्ष्म तपासणी करून जातिव्यवस्था क्षीण कशी करता येईल याची उपाययोजना विचारपूर्वक शोधावी असे त्यांना वाटते.
जातिसंस्थेची उपपत्ती :
आगरकरांनी जातिव्यवस्थेची समाजशास्त्रीय उपपत्ती दिली असून त्यांच्या मते या समाजघटनेची नीट कल्पना नव्हती अशा “भोळ्या ब्राह्मणवर्गाने स्वीकारलेली, तसेच “अविचारी” अब्राह्मणी परंपरेने मांडलेली अशा जातिसंस्थेच्या दोन्ही उपपत्ती आगरकरांनी नाकारल्या आहेत.
आगरकर जातिसंस्थेच्या निर्मितीसाठी समाजातील श्रमविभागणी कारणीभूत आहेअसे मानतात. प्राथमिक अवस्थेतील समाजांत श्रमविभागणी फारशी अस्तित्वात नसल्याने तेथे घटकवर्ग फार किंवा फारसे स्पष्ट नसतात. पण समाज जसजसा परिणत होत जातो तसतशी त्या वर्गाची संख्या वाढत जाते आणि प्रत्येक वर्गात जन्माला येणारे लोक आपापल्या वर्गाला साहजिकपणे धरून राहतात. त्यातच राहणे त्यांना सुखावह व बर्या च अंशी हितावह असते. समाजविकास होतो तसतसे जातिभेदांसारखे एकमेकांपासून अलग राहणारे अनेक वर्ग उत्पन्न होतात. एकेका वर्गातील लोकांना आपापला धंदा फार श्रम न पडता येतो. बालपणापासून सरावाचे झालेले आचार त्यांना चांगले वाटू लागतात. जन्मजात लाभलेली मानसिक व शारीरिक घडण आणि पुढे त्यावर बाह्य गोष्टींचे झालेले परिणाम ह्यामुळे ज्याला त्याला आपली जात, धंदा व आचार चांगला वाटतो. परजातीत जाण्याची वा परधंदा करण्याची इच्छा बहुधा कोणालाच होत नाही. जातीजातीत माणसाची येजा “होऊ देण्यात त्यांचे थोडेबहुत नुकसान असते, निदान अज्ञानामुळे का होईना, पण आपले नुकसान आहे असे त्यास वाटत असते. यामुळे जातीचे बंध फार दृढ होत जातात. आतल्यास बाहेर जाता येत नाही किंवा जाण्याची इच्छा नसते. बाहेरच्यास आत येता येत नाही किंवा येण्याची इच्छा असत नाही. आपल्या देशात जातीचे जे प्रचंड बंड माजले आहे… त्याचे हे इंगित आहे (२.२६६) १८ असे आगरकरांनी म्हटले आहे. समाजघटनेच्या प्रक्रियेसंबंधी अनभिज्ञअसणार्यांतनी किंवा अविचारी व दुराग्रही मंडळींनी ही शास्त्रपूत उपपत्ती नाकारून अनुक्रमे । ब्रह्म्याच्या अवयवांपासून वर्ण निघाले किंवा ब्राह्मणाच्या स्वार्थी कारस्थानांतून वर्णव्यवस्था निर्माण झाली असे भ्रममूलक सिद्धान्त जरी मांडले तरी इतरांनी त्यास फसू नये व उक्त उपपत्तीच स्वीकारावी असा इशारा त्यांनी पुढे दिला आहे.
आगरकरांच्या मते निरभिमानबुद्धीने विचार करणाच्या कोणालाही असे आढळेल की जातिव्यवस्था ही काही आपल्याच समाजाचे वैशिष्ट्य नाही. “प्रत्येक समाजाच्या विशिष्ट स्थितीत आमच्या देशातील वर्णव्यवस्थेसारखा किंवा जातिभेदासारखा लोकविभाग अस्तित्वात आल्याशिवाय रहात नाही” (२.२६७). जेत्यांनी जितांना गुलाम करणे, त्यांना विशिष्ट धंदे करायला भाग पाडणे या कारणाने किंवा शुद्ध श्रमविभागातून सहजपणे जे व्यवसायभिन्नत्व येते त्यामुळे जातिभेद उत्पन्न होत असल्यामुळे जुन्या-नव्या सुधारलेल्या समाजांतही या ना त्या स्वरूपात जातिभेद आढळतोच. कारणपरत्वे कोठे तो अतिक्षीण असतो तर अन्यत्र पराकाष्ठेचा सक्तीचा असतो. आमच्यावर टीका करणाच्या पाश्चात्त्यांच्या देशांतही क्राफ्ट गिल्डच्या स्वरूपात “आमच्यातील जातींसारखेच व्यावर्तक वर्ग” अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आणून आगरकर जन्मसिद्ध धंद्यांवर इंग्लंडातील प्रत्येक प्रमुख धंद्यातील जुन्या लोकांचा केवढा आग्रह होता हे दाखवतात. ते पुढे म्हणतात की, जुन्या रोमन व ग्रीक समाजातील वर्गतंट्यांच्या हकीकती ज्यांनी ऐकल्या असतील त्यांच्या हे लक्षात आले असेल की आपल्या देशातील जातिभेदासारखा एका प्रकारचा जातिभेद त्या लोकांत होता इतकेच नाही, तर आमच्या जातिभेदाहून विशेष खडतर होता. यावरूनआगरकरांनी.निष्कर्ष असा काढला होता की “सुधारणेच्या पंथास लागलेल्या प्रत्येक लोकांत कालेकरून कशा ना कशातरी प्रकारचा जातिभेद उद्भवल्याशिवाय रहात नाही. विशेषतः ‘भटजात’ ज्या लोकांत अस्तित्वात आलेली नाही, असे कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्रातआढळणार नाही” (२.२६८).
* लेखात सर्वत्र कंसातील संदर्भ-आकडे म. गं. नातू / दि. य. देशपांडे संपादित आगरकरवाड्मयाच्या अनुक्रमे खंड व पृष्ठक्रमांक यांचे निदर्शक आहेत.
त्यामुळे येथील कोण्या कपटी कावेबाजाला जातिबद्ध समाजाची कल्पना सुचली व त्याने ती आदेश देऊन अमलात आणली असे कधीच घडत नसते. भौतिक समाजपरिवर्तनाच्या क्रमात सामाजिक संस्था अस्तित्वात येत असतात, आणि कोणत्याही समाजातील वरिष्ठ वर्ग त्यांना स्वहितार्थ राबवून घेत असतो. तो त्यांचे शक्य त्या प्रकारांनी समर्थन करतो. त्यांना दैवी-ईश्वरी ठरवून चिरंतनत्व आणि स्वीकार्यता मिळवून देण्याचा खटाटोप करतो. जगात सर्वत्र हे घडले असल्याचे आगरकर निदर्शनास आणून देतात. विराटपुरुषाच्या अवयवांतून चातुवर्याची निर्मिती, किंवा “चातुवर्यं मया सृष्टम् ” यासारखी साक्षात् भगवानवाणी ही त्याच प्रकारची उदाहरणे असल्याचे ते सांगतात.
जातिभेदाचे दुष्परिणाम :
आगरकर त्याच परिच्छेदात असा खुलासा लगेच करतात की “यावरून कोणी असे समजू नये की आमच्या देशातील वर्णव्यवस्था उर्फ जातिभेद निर्दोष आहे, किंवा त्यात । फेरफार करण्याची किंवा योग्य वेळी तो अजीबात नाहीसा करण्याची गरज नाही.” जातिभेदाचे अपायकारक परिणाम पाहता तो उत्तरोत्तर क्षीण व्हावा असेच त्यांचे मत होते. हिंदू समाजात जातिपसारा अफाट वाढल्यामुळे या देशाचे किती अतोनात नुकसान झालेआहे याकडे आगरकरांनी वारंवार लक्ष वेधले आहे. “सुधारकांनी स्वतःची वेगळी जात करावी” असे सांगणारांचा “अविचारी, संधिसाधू, भेकड, मूर्ख अशा विशेषणांनी पाणउतारा करून आधीच जातीच्या अनेकपणापासून येथे रोज भोगाव्या लागत असलेल्या दुष्परिणामांची आठवण आगरकर करून देतात.” जातींमुळे आपला देशाभिमान किती संकुचित झाला आहे, जातीमुळे ज्ञान, कला, शास्त्रे वगैरे जेथल्या तेथे कशी कोंडल्यासारखी झाली आहेत, जातीमुळे धर्मविचारात व आचारात किती मतभेद उत्पन्न होऊन तो परस्परवैरास, छळास व मत्सरास कसा कारण झाला आहे, जातींमुळे अन्नव्यवहार, विवाह वगैरेंच्या संबंधाने किती गैरसोय झाली आहे, जातीमुळे देशातल्या देशात प्रवास करणे किती कठीण झालेआहे, जातींमुळे परद्वीपस्थ व परधर्मीय लोकांपासअलग रहावे लागत असल्यामुळे केवढे नुकसान होत आहे, जातींमुळे आमची भूतदया, आमचे बंधुप्रेम, आमची उदारता, धर्मबुद्धी, आमची परोपकाररती आमचे विचार यांचे क्षेत्र किती मर्यादित झाले आहे” (१. ११०१११) याची कल्पनाही जात करण्याचा सल्ला देणार्यांवना नसावी याचे आगरकरांना आश्चर्य वाटते. कदाचित पूर्वीच्या काळी काही विशेष कारणांमुळे इतक्या जाती अस्तित्वात येणे अपरिहार्य झालेही असेल; “पण येथून पुढे जो या देशात नवीन जात काढण्याचा प्रयत्न करील तो त्याचा हितचिंतक न समजता दुष्ट शत्रूच समजला पाहिजे” (कित्ता), अशा निःसंदिग्ध शब्दांत जातिसमर्थकांचा निषेध आगरकरांनी केला आहे. त्यांचे असे ठाम मत होते की या देशातील लोकांना ज्या विपत्ती भोगाव्या लागत आहेत बहुतेक त्या सर्वांचीच मुळेजातिभेदातच रुतून बसलेली आहेत. धार्मिक किंवा राजकीय विचारप्रणाली, व्यावसायिक किंवा आर्थिक हितसंबंध या कारणांनी समाजात निरनिराळे पक्ष किंवा पंथ निर्माण होणे स्वाभाविक असते, तसे जातिभेदाबद्दल म्हणता येणार नाही हे ते स्पष्ट करतात. शिक्षण-प्रसार, विचारमंथन यांतून येत्या दहापाच वर्षांत साध्य होणारच असलेल्या सुधारणांसाठी सुधारकांची वेगळी जात करण्यात काहीच हशील नाही, उलट त्यामुळे हानीच होईल. एवढेच नव्हे तर “जात करणे म्हणजे आपले व आपल्या पुढील पिढ्यांचे जाणूनबुजून नुकसान करणे व आधीच एकाचे तोंड पूर्वेस तर दुसन्यांचे पश्चिमेस असे करून टाकणाच्या दुष्ट जातिभेदाचे बंड निरर्थक वाढवण्याच्या पापाचे भागीदार होणे” (१. ३७६) ठरेल असे आगरकर बजावतात.
आगरकर व्यक्तिवादाचे समर्थक होते. व्यक्ती हे त्यांच्यामते स्वतंत्र मूल्य होते. व्यक्तीसाठी समाज असतो, समाजासाठी व्यक्ती नव्हे हे लक्षात ठेवूनच व्यष्टिसमष्टि संतुलनाचा विचार झाला पाहिजे; समाजात एक जिवंत व स्वयंपूर्ण एकक म्हणून व्यक्तीला तिच्या योग्यतेनुरूप पुरुषार्थ गाजवण्याची संधी मिळालीच पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. जन्मासारख्या सर्वस्वी यादृच्छिक घटनेने व्यक्तीचे समाजातील स्थान निर्धारित करणारी जातिव्यवस्था आगरकरांच्या मते व्यक्तिवादाच्या निकषावरही असमर्थनीय ठरते. । विशेषतः अस्पृश्य ठरवल्या गेलेल्या जातींतील व्यक्तींसाठी तर जातिव्यवस्था ही आगरकरांच्या मते सर्वाधिक जाचक ठरते. अस्पृश्यतेच्या प्रथेतील क्रौर्य, अन्याय, मूर्खपणा, आणि विचारशून्यता आगरकरांनी भेदकपणे स्पष्ट केली आहे. समाजाची घाण उपसून आरोग्य सांभाळणार्या, वर्गाना त्यांचा आहार-आचार गलिच्छ ठरवून समाजाने दूर ठेवावे हा त्यांना अत्यंत निंद्य व अन्याय्य प्रकार वाटतो. आम्ही या वर्गांना दूर ठेवल्याने ते ख्रिस्ती धर्मप्रचारकांच्या जाळ्यात अडकतील आणि तसे होणे हे आपल्या धर्मावर व देशावर येऊ घातलेले मोठेच गंडांतर ठरेल असा इशाराही आगरकरांनी दिला होता.
अस्पृश्य ठरवलेल्यांशी आमची वर्तणूक अशी अन्यायाची असताना इंग्रज राज्यकत्र्यांनी आमच्याशी समतेने, सौजन्याने व न्यायाने वागावे अशी अपेक्षा आम्ही धरावी यातील विसंगती आगरकरांनी अचूकपणे टिपली आहे. या दुटप्पीपणामुळेच आमच्या मागण्या कोणी गंभीरपणे घेणार नाहीत हे स्पष्ट करताना ते लिहितात, “महाराची सावली पडली असताही विटाळ मानणारे लोक कितीही लांब जिभा करून ‘आमचा रंग काळा असला व तुमचा रंग गोरा असला म्हणून काय झाले? रंगावर काही मनुष्याची पात्रापात्रता ठरत नाही वगैरे प्रतिपादू लागले, तथापि त्यांच्या शब्दांस जोर येण्याचा संभव नाही, व त्याचा परिणामही होणे नाही” (१.३८३). आपल्या म्हणण्याला जोर यावा व इतरांनी ते ऐकावे असे वाटत असेल तर ब्रह्म्याच्या मुखातून ब्राह्मण …. वगैरे पक्षपाती शास्त्र सोडून आपण “आपल्या मांडीला मांडी भिडवून शाळांतून बसण्यास महारास मोकळीक दिली पाहिजे” (कित्ता) असे आगरकर ठणकावतात.
अन्नपाण्यात स्पृष्टास्पृष्टता व पापपुण्य या संकल्पना हिंदुस्थानाखेरीज जगातकोठेही आढळत नसल्याचे सांगून अमक्याच्या हातचे खाल्ले तर पुण्य आणि तमक्याच्या हातचे खाल्ले म्हणून पाप या पापपुण्याच्या कल्पना त्यांनी अतिसंकुचित ठरवल्या होत्या. स्पर्शास्पर्शाचे स्तोम माजवणार्यांपचे धर्माशी काहीच सोयरसुतक नसते. स्वतःच्या करमणुकीसाठी ते सामान्य लोकांना नाचवतात (२.१२९), शुद्धाशुद्धतेचे वृथा अवडंबर माजवतात. अस्पृश्यतेची प्रथा हे धर्मश्रद्धा तामसी व पाषाणहृदयी कशी बनते याचे ज्वलंत उदाहरण आगरकरांना वाटते. मृत जनावराच्या कातड्यापासून बनवलेल्या जोड्यांचा स्पर्श चालतो पण ते तयार करणार्या. चांभाराचा मात्र चालत नाही; दुराचारी-गुन्हेगारांच्या स्पर्शाने व्यवहाराने दोष घडत नाही, पण केवळ जन्माने अस्पृष्ट ठरलेल्यांच्या स्पर्शानेव्यवहाराने मात्र तो ठरतो; दुर्व्यसनी व मठ्ठ ब्राह्मण सदाचारी व स्वच्छ अस्पृश्यापेक्षा जवळचा ठरतो- यासर्व प्रकारांतील समाजविघातक दांभिकपणावर आणि अविचारावर आगरकरांनी हल्ला केला आहे. श्रमविभागणीच्या सिद्धान्ताचा आधार घेऊन अस्पृश्यतेचे समर्थन करणे ही त्यांना एक मायावी मखलाशी वाटते, कारण त्यांच्या मते कामांची अदलाबदल होण्यास या श्रमविभागणीत कोठेही वाव नसतो. गिरिकंदरात एकाकी राहूनही जी शुद्धता टिकवणे अशक्य तिचा दुराग्रह समाजात इतरांसोबत राहून धरणे तर त्यांना हास्यास्पदच वाटते.
१८९३ च्या फेब्रुवारी महिन्यात आगरकरांनी सुधारकाद्वारे अस्पृश्यतानिवारणाच्या दृष्टीने एक महत्त्वाची कामगिरी केली होती. सार्वजनिक हौदावर शूद्रांना पाणी भरता यावे असा आग्रह “म्युनिसिपालिटीचा हौद व ब्राह्मण्यावर गदा” या मार्मिक स्फुटातून त्यांनी धरला होता. या स्फुटातील मार्मिक विनोद लक्षात घेऊन त्यानुसार वागण्याची उदारता त्या काळच्या पुणेरी भूदेवांत नसल्यामुळे त्यांचे पित्त खवळले आणि त्यांनी आगरकरांवर शिव्यांचा भडिमार केला अशी नोंद आगरकरांच्या एका चरित्रकाराने केली आहे. (आळतेकर, ४२०). शूद्रांनी सार्वजनिक हौदावर पाणी भरण्यास जे ब्राह्मण विरोध करतात आणि अस्पृश्यतेच्या अनर्थरूढीचे पालन हे ज्यांना आपले धर्मकर्तव्य वाटते त्यांना तर आगरकरांनी धारेवर धरले आहेच, पण म्युनिसिपालिटीने त्यांच्या या “धर्मरक्षणाच्या भानगडीत पडू नये असे ते म्हणतात, कारण त्यात उदात्तता व तारतम्य या दोहोंचाही पत्ता नाही असे त्यांचे मत होते.
आमच्या अतिकर्मठ वर्तनापायी आमचा अतिशूद्र वर्ग तर आमच्यापासून दुरावला असून आमच्याबद्दल त्यांच्या मनात परकेपणाची भावना बळावली आहे. आता शूद्रवर्गाचीही आम्ही तीच वाट लावणार की काय अशी भीती आगरकर व्यक्त करतात (२.४४९). या संदर्भात ब्राह्मणांनी काळाची पावले ओळखून आपल्या वर्तनात अपेक्षित बदल केले पाहिजेत यावर आगरकरांचा भर होता. जन्मनिष्ठ श्रेष्ठत्व आता इतिहासाजमा झाले आहे. बुद्धीचा व कर्तृत्वाचा ब्राह्मणांचा मक्ता अज्ञानापोटी शूद्रांनी पिढ्यानुपिढ्या मान्य केला असला तरी आता शूद्रातिशूद्रही शिक्षणाने शहाणे झाल्यामुळे यापुढे ते तो पत्करणार नाहीत. एवढेच नाही तर ब्राह्मणश्रेष्ठत्व त्यांच्यावर लादण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यास ते प्रतिकार केल्यावाचून राहणार नाहीत असा विश्वासही आगरकर व्यक्त करतात. शुद्रांचा असंतोष ब्राह्मणांनी समजूनघ्यावा, शूद्रांच्या स्पर्शात पाप दडले आहे ही कोती समजूत सोडून द्यावी, शिवाशिवीच्या व सोवळ्याओवळ्याच्या कल्पना उंबरठ्याच्या बाहेर आणू नयेत, असा सल्ला त्यांनी ब्राह्मणांना दिला आहे. त्यांच्या सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पना किती तर्कदुष्ट, अंतर्विरोधी व भ्रममूलक आहेत आणि व्यवहारात त्या आचरताना किती नाना प्रकारच्या हास्यास्पद व तत्त्वशून्य तडजोडी ब्राह्मणांनी केल्या आहेत याची परखड चिकित्सा आगरकरांनी केली आहे (१.५९-६५). “सोवळेओवळे व तद्विषयक मूढ कल्पना यांचे साम्राज्य होते तेव्हा त्यांनी वाटेल तसा जुलूम केला . ब्राह्मणास श्रेष्ठ पद दिले व शूद्रास नीच ठरविले, त्यांच्या ज्ञानाचा । लोप केला व घोकंपट्टीस उत्तेजन दिले, धर्मविचाराची व मनाची फारकत करून टाकली व त्याचे रहस्य शरीराच्या बाह्य कवायतीत आणून सोडले. आता यापुढे ही अविचाराची बेबंद पातशाही चालावयाची नाही”, जन्माधिष्ठित श्रेष्ठत्व या कल्पनेची जागा बुद्धीने वरचढ असेल तो श्रेष्ठ’ ही कल्पना घेणारच आहे. ही वाटचाल आता कोणीच थांबवू शकणार नाही. ब्राह्मणांनी या नव्या परिस्थितीशी जुळवून घ्यायलाच हवे.
जातिभेदनिराकरण :
जातिभेदाची तीव्रता क्रमशः ओसरत जाऊन अखेर तो संपुष्टात यावा अशीच आगरकरांची धारणा असल्यामुळे जातिभेद वाढवण्याचा प्रत्येक प्रयत्न त्यांना निषेधार्ह वाटतो. धर्माभिमानी हिंदू जेव्हा स्वतःचीच वेगळी जात करायला निघाले तेव्हा त्यावर आगरकरांची प्रतिक्रिया अशी होती की, “सध्याचा काळ जातींचे बंड कमी करण्यास जसा अनुकूल आहे तसा तो त्यांची वृद्धी करण्यास नाही हे आजमितीस कोणास समजावून सांगितले पाहिजे असे नाही. ह्या उप्पर अजूनही वेड घेऊन पेडगावास जाण्याचा जर आमच्या धर्मरक्षकांचा हेका असेल तर त्यांनी तसे खुशाल करावे, आम्ही त्यांच्या मार्गात आडवे येऊ इच्छीत नाही” (२.१२७).
स्वतः आगरकर मात्र आपल्या जातिभेद-निराकरणाच्या मागणीवर निःसंदिग्धपणे ठाम होते. सामाजिक संबंधांत खुलेपणा येऊन समाज एकरस व्हावा, समतेवर व संमतितत्त्वावर सर्वच सामाजिक संबंधांची उभारणी व्हावी, केवळ भूतदया म्हणून नव्हे तर समाजातील बरोबरीचे घटक म्हणून अस्पृश्यांचे हक्क प्रतिष्ठित व्हावेत, केवळ आध्यात्मिक संदर्भातच नव्हे तर लौकिक व्यवहारांतील भेदभाव आणि पंक्तिप्रपंच समूळ नष्ट व्हावा, ‘महारांची स्थिती सुधारून त्यांची व वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांची एक पंगत व्हावी असे आदर्श चिंतन आगरकरांनी केलेले आढळते. ते म्हणतात : विचार, उपभोग व काबाडकष्ट यांची एकमेकांपासून फारकत करून त्यावर आधारित जी तटबंदी समाजात निर्माण झाली आहे ती कायमची नसून “हळूहळू प्रत्येक व्यक्तीस विचार, उपभोग आणि काम ही समप्रमाणाने करावी लागून सार्यां च्या सुखानुभवाची इयत्ता सारखी होत जाणार आहे व जो जो ती तशी होत जाईल तो तो खरी उन्नती होऊ लागली असे म्हणता येऊ शकेल” (१.४७). अशा उन्नत प्रगत समाजात वर्णभेदाची जागा वर्गभेद घेतील. ते कायमस्वरूपी असणार नाहीत. समता-स्वातंत्र्य व व्यक्तिस्वातंत्र्य यावर आधारित समाजात तर ते नाममात्रच शिल्लक उरतील असे त्यांनी गृहीत धरले होते.
सामाजिक व्यवहाराचे क्षेत्र संकुचित करणारी धर्मकल्पना आगरकरांना मुळातच हिणकस वाटत असल्यामुळे तिच्या संस्कारांचा प्रभाव कोणत्याही प्रकारे कमी होत जाणे त्यांना स्वागतार्ह वाटते. त्यामुळेच वर्णसंकर, खुले अन्नोदकविवाहादि व्यवहार, धर्मग्रंथांच्या अभ्यासाची सर्वजातीयांना मोकळीक इत्यादी त्या संस्कारांना छेद देणाया घडामोडींचे ते समर्थन करतात. ही सारी त्यांना धर्मग्लानीची नव्हेत तर धर्मोत्कर्षाचीच लक्षणे वाटतात. सोवळ्याओवळ्याला धर्म मानून पदार्थापदार्थात, प्राण्याप्राण्यांत आणि माणसामाणसांत तफावत करणे यात विवेकाचा व विचारांचा लवलेशही नसल्यामुळे ते त्यावर टीकास्त्र सोडतात.
पण त्याचबरोबर जातिभेदनिर्मूलनाची समस्या किती जटिल आणि चिवट आहे याचीही आगरकरांना कल्पना असल्यामुळे तिच्या सोडवणुकीच्या सोप्या व भावनिक मार्गाची शिफारस करण्यापेक्षा व्यवहार्य व दीर्घसूत्री पण वस्तुनिष्ठ उपाय ते सुचवतात. “कालगतीने जातिभेदकल्पनावृक्षाचा आज येथे इतका काही विलक्षण विस्तार होऊन गेला आहे, व त्याची मुळे इतकी काही खोल गेली आहेत की, त्यांचे समूळ छेदन करणे एका सुधारकासच काय परंतु सुधारकसहस्रांच्या कंपनीसही भारी व जोखमीचे वाटेल तर त्यात नवल नाही” (२. ४४५), अशी हतबलताही ते एका ठिकाणी व्यक्त करतात. पण त्याच वेळी ते असाही निर्धार नोंदवतात की सुधारकांनी धीर सोडून चालणार नाही. “सर्व मानव हक्क व योग्यता या संदर्भात जन्मतः समान असतात, आणि ते हक्क व योग्यता पुढे टिकून राहणे केवळ त्यांच्या बुद्धीवर व उद्यमावरच अवलंबून असायला हवे” या तत्त्वाची रुजुवात त्यांनी आत्मविश्वासपूर्वक करीत राहिले पाहिजे. त्यांच्या मार्गात येणारी जातिभेदकल्पनावृक्षाची एकेक फांदी छाटीत राहिले पाहिजे. “सदसद्विचारकुठारापुढे या अज्ञानमूलक जातिभेदकल्पनावृक्षाच्या अखंड जाळ्याचा”टिकाव लागणे अशक्य आहे.
पण त्यासाठी जातिभेदनिराकरणाचे कार्य करणारांनी काही पथ्ये पाळणे आगरकरांना नितांत आवश्यक वाटते. जातिसंस्थेची उत्पत्ती आणि आज जातिव्यवस्थेतून उद्भवलेले गुंतागुतीचे प्रश्न ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. समाजरचना आणि सामाजिक स्थित्यंतरे यांच्या अज्ञानातून सामाजिक संस्थांचा गौरव वा निषेध करताना स्वतःला रुचतील अशा अनैतिहासिक उपपत्ती मांडण्याचा मोह त्यांनी टाळला पाहिजे (गं. बा. सरदार, १३१). “जातिभेदाच्या विचाराने आपले माथे फिरू न देता त्याने समाजाच्या आद्यस्थितीत कोणता कार्यभाग उरकला हे ध्यानात आणून, व आता तो कोणत्या कारणांमुळे अहितकारक होत आहे याची चिकित्सा करून ती कारणे दूर करण्यासाठी सामोपचाराचे उपाय योजणे यातच शहाणपण आहे” (२.२६८) असे आगरकरांनी या संदर्भात लिहिले आहे. त्यांच्या मते एकमेकांचे दुराग्रहाने दोषान्वेषण करण्यात किंवा एकमेकांचा द्वेष करण्यात शक्तिपात करण्याऐवजी जातिभेदनिराकरणाचे मार्ग विचारपूर्वक व अभ्यासपूर्वक शोधणे अधिक श्रेयस्कर ठरेल असे ते म्हणतात. आपल्या देशात हा विलक्षण जातिभेद कोणत्या कारणांनी निर्माण झाला? तो टाळता आला असता काय?त्यातून आमचेकिती हित किंवा अहित झाले? इतर देशात असा काही प्रकार आहे काय?असल्यास त्याची उत्पत्ती, विकास, विलय कसा व का झाला याचा सखोल परामर्श करूनच आपल्याला त्यांच्या मते हा शोध पूर्ण करता येईल. ब्राह्मण-ब्राह्मणेतरांची एकमेकात उभयपक्षी देवघेव होऊ लागल्यास सर्वत्र एकोपा व बंधुभाव निर्माण होईल असा त्यांना विश्वास वाटतो. “ज्ञान संपादून ब्राह्मणेतर वर्णांनी त्यांस संपादनीय वाटत असतील ते ब्राह्मणांचे हक्क संपादावे, व ब्राह्मणांनी तसे करण्यास त्यांस मदत करावी, तसेच आजमितीस ब्राह्मण लोकांस जे धंदे त्याज्य वाटत आहेत ते त्यांनी करावयास लागावे आणि तसे करण्यात त्यांस ब्राह्मणेतर जातींनी साहाय्य करावे” (२.२६७) असेही आगरकरांनी सुचवले आहे.
जातिभेदांची आपल्याला कितीही चीड आली तरी आपण एकांगी, विपर्यस्त व टोकाची भूमिका घेऊन जातिसंस्थेचे कधी काळी या समाजाला झालेले लाभ नाकारू नयेत असे आगरकरांचे मत होते. आगस्ट कोस्ट या समाजशास्त्रज्ञाचा हवाला देऊन जातिभेदाचे काही लाभ त्यांनी नमूद केले आहेत. एक असा की जातिभेदामुळे प्रस्थापित आचार यथास्थितपणे चालून समाजास एकप्रकारचे स्थैर्य येते. जो तो क्रमागत अथवा अन्वयागत आलेला मार्ग आनंदाने आचरतो, फायद्यासाठी एक वर्ग दुसर्याो वर्गाची प्रतिस्पर्धा करत नाही, वर्गागावर वर्गाचा दाब असतो, समयविशेषी चांगली किंवा वाईट गोष्ट करण्यास जूट लौकर होते, कष्टार्जित कलेचे उत्तम रीतीने संगोपन होते. सारांश परंपरागत दोषांचे किंवा गुणांचे संरक्षण होऊन समाजसंनिधानात बिघाड न होऊ देण्यास जातीसारखे दुसरे साधन नाही. प्रत्येक व्यक्ती आपापल्या जागी खिळली जाऊन आपापले कार्य जातिव्यवस्थेत नीटपणी बजाविते, “यामुळे जाती ह्या सामाजिक संनिधानाचे स्थितितत्त्व होत असे म्हणण्यास हरकत नाही” (कित्ता), असे आगरकर म्हणतात. जातिभेद-निराकरण करू पाहणारांनी या लाभांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे त्यांचे मत होते. सोवळ्यातसुद्धा ज्या प्रमाणात स्वच्छता, टापटीप व नेटकेपणा यांचा भाग आहे तेवढ्यापुरते ते विवेकाला पटणारे व म्हणून त्यांना रक्षणीय वाटते. ते म्हणतात, “ज्या सोवळ्याचा स्वच्छतेशी संबंध आहे ते सोवळे रक्षणीय आहे. तसेच जे ओवळे म्हणजे अमंगळता ते त्याज्य आहे” (१.५८).
आगरकरांनी केलेला जातिसंस्थेचा व जातिभेदाचा विचार सारांशरूपाने पाहिल्यानंतर आता त्या विचाराची बलस्थाने व जमेच्या बाजू कोणत्या होत्या आणि त्यावर कोणत्या मर्यादा पडल्या होत्या हे पाहणे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात या विषयांसंबंधी झालेल्या एकूण चिंतनात आगरकरांचे स्थान कोठे आहे याचा विचार करणे अप्रस्तुत ठरणार नाही. आगरकरांनी त्यांच्या अन्य लेखनाप्रमाणेच जातिविषयक चिंतनातही सूक्ष्म निरीक्षण, तर्कशुद्ध युक्तिवाद, मुद्देसूद कोटिक्रम आणि शांतसंयत वादपद्धतीचा अवलंब केला आहे. शोषित जातींविषयीची आस्था आणि सहानुभूती आणि उच्चवर्णीयांच्या दांभिकतेची चीड यांचाही पुरेपूर आढळ त्यांच्या प्रतिपादनातून झाला आहे. जातीजातींतील द्वेष-दुराग्रहाने प्रश्न सुटण्याऐवजी गुंतागुंतीचे होणे आणि राष्ट्रसमाजातील फटी रुंदावत जाणे अटळ ठरेल हा रास्त इशारा आगरकरांनी केला होता. ब्राह्मण-ब्राह्मणेतरवादाने महाराष्ट्राचे राजकारण पुढे जे दूषित झाले त्याची जणू पूर्वसूचनाच आगरकरांनी दिली होती.
कौटुंबिक तसेच व्यक्तिविषयक सुधारणांना आगरकरांच्या लेखनात जेवढे प्राधान्य प्राप्त झाले आहे तेवढे जातिविचारासारख्या व्यापक प्रश्नांना आणि तज्जन्य भीषण आव्हानांना लाभलेले नाही ही तक्रार तशी रास्तच म्हणावी लागते. विवाहविषयक समस्या, स्त्रीपुरुषसमता, स्त्रियांचे शिक्षण, व्यक्तिस्वातंत्र्य, आहार-पोषणापासून पोषाख-गंधलेपनापर्यंतच्या कित्येक लहानसहान बाबींचा ऊहापोह आगरकरांनी केला. पण जोतीराव फुल्यांनी जातिभेदासंबंधी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मात्र त्यांनी एकूण बगलच दिलेली दिसते. सामाजिक सुधारणेची चळवळ उथळ व प्रभावशून्य राहण्याची जी कारणमीमांसा फुल्यांनी केली तिचीही दखल आगरकरांनी घेतलेली आढळत नाही. ब्राह्मणेतरवर्ग, पूर्वास्पृश्य, अन्यधर्मीय, विशेषतः या तिन्ही वर्गाच्या स्त्रिया यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नांची गंभीर दखल सुधारकांनी घेतली नाही अशी रास्त तक्रार जोतीरावांनी केली होती. संभाव्य ब्राह्मण-ब्राह्मणेतरवादाचा बागुलबोवा उभा करून या प्रश्नांची वासलात लावावी इतके किरकोळ ते खचितच नव्हते. कदाचित टिळक आणि त्यांचे अन्य सुधारणाविरोधक सहकारी यांना सतत समोर ठेवूनच आगरकरांनी सुधारणेचा विचार मांडल्यामुळे या शोषितवर्गाशी आस्थेवाईक संवाद आगरकरांना करता आला नाही असे म्हणणे क्रमप्राप्त ठरते. सुधारणाविरोधकांशी वाद- प्रतिवाद करण्यातच त्यांचा बराच शक्तिपात झाल्यामुळे व्यापक प्रश्नाची उपेक्षा आणि बृहत्तर समाजापुढील दाहक जीवनानुभवांकडे दुर्लक्ष त्यांच्या हातून घडले असावे असाही निष्कर्ष काढण्यास जागा सापडते. आगरकरांना समाजव्यवस्थेतील सामाजिक अन्यायांची जाणीव नव्हती असे नाही. ती निश्चितच होती एवढेच नव्हे तर त्याबद्दल त्यांना चीडही होती. त्याचप्रमाणे सर्व सामाजिक संबंध समतेच्या तत्त्वावर अधिष्ठित असावेत अशी भावनाही त्यांच्या ठायी प्रबळ होती. “तरी देखील फुले यांच्या भूमिकेचे मर्म त्यांना पूर्णपणे उमगले होते असे दिसत नाही.” आपले बुद्धिसर्वस्व व नैतिक बळ एकवटून उच्चवर्णीयांची न्यायबुद्धी जागृत करण्यासाठीच त्यांची सारी खटपट होती” (सरदार, १८७).
जातिव्यवस्थेसंबंधीच्या फुले आणि आगरकर यांच्या भूमिका पराकोटीच्या भिन्न होत्या असेच म्हणावे लागते. त्यांचे त्या समस्येचे आकलन भिन्न होते, एवढेच नाही तर त्यांच्या दृष्टीने या समस्या हाताळण्याच्या अग्रक्रमांतही महदंतर होते. समस्येच्या निदानात भिन्नपणा असल्यामुळे त्यांनी सुचवलेल्या उपाययोजनाही अगदीच वेगळ्या स्वरूपाच्या होत्या. आगरकरांच्या लेखनात जातिभेदाच्या प्रश्नाचा प्राथम्यक्रम खूपच नंतरचा दिसतो, तर जोतीरावांच्या लेखनात तो प्रश्न पहिल्या स्थानावर आहे. जातिव्यवस्थेची त्या दोघांना लावलेली उपपत्ती निरनिराळी आहे. उच्चवर्णीयांनी आपल्या स्वार्थाखातर वर्णजातिव्यवस्था निर्माण करून टिकवली असे जोतीराव सांगतात. तर आगरकर श्रमविभागणी हे जात्युत्पत्तीचे मूळ कारण म्हणून पुढे ठेवतात. जातिभेद हे कायम उच्चवर्णीयांना लाभदायक आणि इतरेजनांना क्लेशकारीच ठरले असे जोतीरावांचे निरीक्षण आहे तर आगरकर एकूणच सर्व समाजव्यवस्थेला जातिभेद कधीकाळी उपयुक्त ठरल्याचे सांगतात. तळागाळातल्या सर्व शोषितांनी संघर्ष उभारून संपूर्ण जातिव्यवस्था निकालात काढणे हा एकमेव जातिभेद
‘निराकरणाचा मार्ग जोतीरावांना दिसतो तर आगरकर समन्वय-सामोपचारावर भर देतात.’ परिस्थितिपरिवर्तनापेक्षा विचारपरिवर्तनावर त्यांचा अधिक भर आढळतो. समाजातील वरिष्ठवर्णीयांना एकदा का सुधारणेची तत्त्वे पटली की मग आपोआप समताधिष्ठित समाजाच्या दिशेने त्यांची पावले पडू लागतील असे त्यांना वाटते. माणसाच्या नैसर्गिक सत्प्रवृत्तीवर विश्वास ठेवून आगरकर ब्राह्मण-ब्राह्मणेतर यांच्यातील देव-घेवीचे चित्र रेखाटतात. सुधारणेच्या मूलतत्त्वांचे अज्ञान हेच त्यांना सर्व दुरवस्थांचे मूळ वाटते. तेवढे
दूर झाल्यावर सारेच बदलेल असे ते गृहीत धरतात.
या उलट जोतीरावांचे म्हणणे असे होते की जातिव्यवस्था जातिभेदाच्या पायावरचे उभी असल्यामुळे जाती कायम ठेवून जातिभेद मिटवणे अशक्य आहे. जातिभेद हे या देशातील सर्व अनर्थाचे मूळ आहे, त्यामुळे त्याचे निराकरण झाल्याखेरीज दुसरे कोणतेच अनर्थ दूर होऊ शकत नाहीत. रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसायबंदी, विद्याबंदी- या सर्व उठतील अशा प्रकारचे जालीम उपाय शोधून जातिव्यवस्थेचे निर्मूलन केले पाहिजे अशी मांडणी जोतीरावांनी केली होती. प्रस्थापित धर्म, कायदा, सरकार, नीतिनिर्बध हे सारेच वरिष्ठांच्या लाभाचे असल्याने त्यांच्या विरोधात स्वतःच संघटित लढा पुकारल्याखेरीज शूद्रातिशूद्रांच्या गुलामगिरीचा अंत होणे शक्य नाही असा त्यांचा होरा होता. वर्णव्यवस्था व जातिव्यवस्था ह्या मूलतः शूद्रातिशूद्रांचे शोषण करणार्याा यंत्रणा असून त्यांचा सपशेल बीमोड झल्याखेरीज निकोप समाजाची उभारणी होऊ शकत नाही याविषयी त्यांना शंका नव्हती.
आगरकरांनी फुल्यांच्या प्रतिपादनाचा गंभीरपणे विचार केला नव्हता. उलट “रेव्हरण्ड जोतीरावासारख्यांनी दुराग्रहामुळे किंवा अविचारामुळे हिंदुस्थानातील वर्णव्यवस्था अप्पलपोट्या ब्राह्मणांनी केली आहे, असे प्रतिपादिल्यास अशांच्या तोंडाला हात लावण्याची सोय नाही असे म्हणून स्वस्थ बसले पाहिजे’ अशा शब्दांत त्यांनी ते प्रतिपादन उडवून तरी लावले होते किंवा वर्णाची ‘पुरुषसूक्ती’ उपपत्ती व जोतीरावप्रणीत स्पष्टीकरण दोहोंना एकाच मापाने मोजून “असले वेडगळपणाचे किंवा दुराग्रहाचे बरळणेआपल्याला मान्य नसल्याचे त्यांनी सुनावले आहे (२.२६६-७). पण त्यातही पहिल्या उपपत्तीवर विश्वास ठेवणाच्या भोळ्या ब्राह्मणांना “फारसा दोष देता येणार नाही’ असे क्षमाशील उद्गार त्यांनी काढले होते!!
अर्थात् याचा अर्थ आगरकरांचा जातिविचार त्यांच्या समकालीन ब्राह्मणी सुधारकांसारखाच होता असे म्हणता येणार नाही. हिंदु समाजातील फाटाफुटीचे निराकरण करून त्यास एकसंध करणे जातिभेदांचे उच्चाटन करून साध्य होईल असे आगरकर म्हणत असले तरी त्यांना पुनरुज्जीवनवादी या अर्थाने हिंदुसंघटनवादी ठरवता येणार नाही. जातिव्यवस्थेचे काही लाभ त्यांनी नोंदवले तरी ते स्थितिवादी जातिसमर्थक खचितच नव्हते. जातिव्यवस्था ईश्वरनिर्मित आहे हे त्यांना मुळीच मान्य नव्हते, कधीकाळी उपयुक्त असलेले जातिभेद आज अप्रस्तुत झाल्यामुळे जन्मसिद्ध उच्चनीचतेला त्यांचा स्पष्ट नकार होता आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वत्रयीवर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे जातीजातीतील व्यक्तींमध्ये पक्षपात होणे त्यांना मंजूर नव्हते. त्यामुळेच सनातन्यांच्या रोषालाही त्यांना वारंवार बळी पडावे लागले होते. त्यांनी केलेल्या जातिभेदमीमांसेचा प्रतिवाद करण्याची ताकद नसल्यामुळे आगरकरांना त्यांनी धर्मद्रोही ठरवल्याचीही उदाहरणे अनेक आहेत (आळतेकर, ४३०). इत्यर्थ असा की आगरकरांची जातिमीमांसा जोतीरावांच्या अब्राह्मणी परंपरेपेक्षा वेगळी असली तरी ती सनातन्यांच्या ब्राह्मणी मीमांसेशी जुळणारीही नव्हती. जांभेकर, लोकहितवादी, रानडेप्रभृती उदारमतवादी सुधारकांच्या जातिविचारांशी मात्र तिचे बरेच साधर्म्य होते.
सामाजिक सुधारणाकार्यात ब्राह्मणांनी पुढाकार घ्यावा, स्वतः सुधारावे व इतरांना सुधारावे, जात्यभिमान सोडावा, जन्माधिष्ठित वर्चस्व मिरवू नये, कोणालाही तुच्छ लेखू नये, आपल्या दोष-दुर्गुणांना सोडचिठ्ठी द्यावी असा हितोपदेश अन्य समकालीन सुधारकांप्रमाणे आगरकरांनीही केला आहे. काही आर्थिक प्रश्नांचा ऊहापोह त्यांनी केला असला तरी जातिव्यवस्थेच्या आर्थिक पायाकडे एकूण त्यांचेही दुर्लक्षच झाल्यामुळे तिचे शोषणपर स्वरूप त्यांच्या लेखनात कोठेच व्यक्त झालेले दिसत नाही. जातिव्यवस्था मुळात चांगली होती. ती जन्माधिष्ठित झाली हे तिचे विकृत स्वरूप असून या विकृतीला सुधारणांच्या द्वारे घालवणे शक्य आहे, कोणत्याही समाजात पंथ व पक्ष स्वाभाविकपणे पडतच असतात. त्यांत उच्चनीचता, अस्पृश्यता, जातिद्वेष यांसारख्या अपप्रवृत्तींना मात्रआवर घालायलाच पाहिजे- ही अन्य सुधारकांचीच भूमिका आगरकरांनाही मान्य होती.
राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत जहाल नेतृत्वाचा वरचष्मा होऊन “आधी कोण?” या प्रश्नाला “राजकीय” हे निःसंदिग्ध उत्तर दिले गेले तेव्हा हा “सामाजिक सुधारणाप्रवाह सार्वजनिक जीवनातून राजापूरच्या गंगेप्रमाणे जणू अदृश्यच झाला. राष्ट्रभावनेला तडे पाडतो म्हणून जातिविचार जणू निषिद्धच ठरला. ब्रिटिश राज्यसत्तेच्या सहयोगाने येथे आलेल्या उदारमतवादाच्या चौकटीत उद्भवलेल्या सुधारणावादाची अशी पीछेहाट एकापरीने अपरिहार्यच होती (सुमंत, सात). जातिभेदनिराकरणामागील या सुधारकांच्या प्रेरणाच अशा आत्मकेंद्री होत्या की राष्ट्रवादी अभिनिवेशापुढे त्या आपोआपच निष्प्रभ ठरल्या. उच्चवर्णीय समाजश्रेष्ठींच्या पारंपारिक स्थानांना नव्या अर्थव्यवस्थेमुळे धक्का बसल्यामुळे तो वर्ग स्वाभाविकच ब्रिटिशविरोधी होता. नवशिक्षित मध्यमवर्गीयांच्या हितसंबंधांना सुरक्षित करून घेणे हे त्यांचे मुख्य प्रयोजन होते. त्यामुळे सखोल जातिमीमांसा करून जातिसंस्थाअंताची भूमिका त्यांच्याकडून घेतली जाणे शक्यच नव्हते. राष्ट्रवादाचे आत्मगौरवी तत्त्वज्ञान त्यांच्या सोयीचे असल्यामुळे त्यांच्याखातर जातिव्यवस्थेतील शोषणपरतेकडे दुर्लक्ष करून, उलटपक्षी व्यापक हिंदुत्वविचाराच्या आवरणाआड जातिबद्ध समाजरचनेचे वास्तव लपवण्याकडेच त्यांचा कल होता. जातिभेदनिराकरणाची त्यांनी मागणी केलीच तरी ती समतातत्त्वाधारे करण्याऐवजी राष्ट्रीय एकात्मतेची गरज व पूर्वअट एवढ्याच हेतूने केली. परंपरेने ज्यांना त्यांचे रास्त हक्क व प्रतिष्ठा नाकारली ते अब्राहमणी समाजधुरीण समूळ जातिनिर्मूलनाची जी क्रांतिकारी मागणी घेऊन उभे राहिले तिचा पुरस्कार करणे या ब्राह्मणी सुधारकांना शक्यच नव्हते.
आगरकरांच्या जातिविचारावरही कळत नकळत अशा काही मर्यादा निश्चितच पडलेल्या दिसून येतात. राष्ट्रवादाच्या लाटेने त्यांचा सुधारणावाद मागे पडला याचे मूळहीया मर्यादांमध्येच सापडू शकते.
संदर्भ ग्रंथ :
१. म. गं. नातू – दि. य. देशपांडे (संपादित), आगरकर वाड्मय, खंड-१ आणि २, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृत मंडळ, मुंबई, जानेवारी १९८४ जानेवारी १९८५
२. गं. बा. सरदार, आगरकरांचा सामाजिक तत्त्वविचार, व्हीनस प्रकाशन, पुणे- १९७५
३. मा. दा. आळतेकर, गोपाळ गणेश आगरकर, भारत गौरव ग्रंथमाला, मुंबई- १९३०
४. यशवंत सुमंत – दत्तात्रय पुंडे (संपादित), महाराष्ट्रातील जातिसंस्थाविषयक विचार, प्रतिमा प्रकाशन, पुणे- १९८८

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.