खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ७)

उद्याचे जग आजच्यापेक्षा जास्त न्यायपूर्ण आणि त्यामुळे अधिक सुखी असावे असे विधान मी केले तर माझ्याशी कोणी विवाद करणार नाही. पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांवर आज अधिक बन्धने आहेत. आणि त्यांची स्वायत्तता आज कमी आहे हे माझे विधानही बहुधा विरोधाशिवाय स्वीकारले जाईल. इतकेच नाही तर पूर्वीच्या मानाने ती बंधने आता कमी होत चालली असून स्त्रीची शारीरिक आणि आर्थिक शक्ती वाढावी ह्यासाठी समाजामध्ये ज्यूडोकराटेचे वर्ग कसे सुरू केले गेले आहेत आणि तिला नोकर्यांवमध्ये कसे सामावून घेतले जात आहे, अनुकंपेच्या आधारावर विधवांना आज नोकर्याक कश्या मिळत आहेत ते मला सविस्तरपणे समजावून दिले जाईल. पण माझा प्रश्नच वेगळा आहे. तो स्त्रियांचे स्वशरीरसंरक्षणासाठी शौर्यवर्धनवर्ग चालवून आणि/अथवा त्यांना मोठ्या प्रमाणावर नोकर्यात देऊन सुटावयाचा नाही. आम्हाला लोकांच्या मनांमध्ये बदल घडवून आणण्याची गरज आहे.
स्त्रियांच्या स्वायतत्तेचा विषय हा केवळ शारीरिक आणि आर्थिक पातळीवरचा विषयच नाही. हा त्यांच्याविषयीच्या मानाचा आणि आदराचा विषय आहे. सर्व पुरुषांना जोवर ज्यूडोकराटे शिकण्याची बंदी नाही तोवर स्त्रियांनी त्यामध्ये प्रावीण्य मिळवून उपयोग नाही. कारण ती कला शिकलेल्या स्त्रीची गाठ समजा तशाच शिकलेल्या अधिक सशक्त पुरुषाशी पडली तर तिला आपले स्वतःचे रक्षण करता येईल अशी ग्वाही देता येत नाही. म्हणून सर्व पुरुषांना अशी युद्धकला शिकण्यापासून दूर ठेवता येत नसेल आणि स्त्रियांनाच । ह्या कलेचा लाभ व्हावा असे वाटत असेल तर निदान ज्यांच्या मनांत बलात्कार करण्याची ऊर्मी किंवा खुमखुमी असेल त्यांना तरी अश्या युद्धकलांपासून वंचित ठेवलेच पाहिजे. परंतु हा उपायसुद्धा आपल्या आटोक्यात आहे असे मला वाटत नाही.
बरे, आर्थिक शक्तीबद्दल म्हणावे, तर आपल्या समाजामधल्या (मध्यमवर्गातल्या नव्हे तर एकूण) बहुसंख्य स्त्रिया पहिल्यापासूनच मिळवत्या आहेत. तेंदूपत्ता किंवा मोह गोळा करणाच्या, शेतांत निंदणखुरपण करणार्याा, विड्या वळणाच्या, गवंड्यांच्या हाताखाली कामे करणार्यां, घराघरांतून धुणीभांडी करणार्याा, आठवडी बाजारात भाजीसारख्या वस्तू विकणार्‍या, ह्या साच्यांची संख्या फार मोठी आहे. अश्या बर्याआच घरांतले पुरुष बायकोच्या जिवावर आयते बसून खाणारे आहेत. आपली व्यसने भागविण्यासाठी बायकोला भयंकर मारहाण करणारे आहेत. ते आपल्या बायकांना जळवांसारखे चिकटले आहेत. पुष्कळ मिळवत्या स्त्रियांना अशा पुरुषांपासून ताबडतोब सुटका हवी आहे, पण ती त्यांना मिळत नाही. म्हणजे काय तर स्त्रियांची स्वायत्तता हा त्यांच्या शारीरिक किंवा आर्थिक शक्तीचा विषय नाही, त्यांच्या निर्णयशक्तीचा आदर करण्याचा विषय आहे. प्रश्न साकल्याने आणि नीट समजून न घेता चुकीच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांमुळे पूर्ण समाजाचे प्रश्न सुटत नसतात, उलट त्यांचा गुंता वाढतो. कारण वरील दोनही उपायांमुळे स्त्रीपुरुषांमधला परस्परांविषयी अनादर आणि अविश्वास वाढीस लागतो. आणि आपल्याला तर स्त्रीपुरुषांमध्ये परस्परसांमजस्य वाढलेला समाज निर्माण करावयाचा आहे.
स्त्रियांचे आर्थिक प्रश्न सोडवावयाचे असतील तर त्यांना अधिकाधिक नोकर्याआ देऊन ते सुटणार नाहीत. (किंबहुना त्यामुळे कुटुंबे मोडण्याची, त्यांच्या बदल्या-बढत्यांमुळे त्यांच्या कौटुंबिक समस्या अधिकच वाढण्याची शक्यता आहे. तसेच मुलांकडे आईबापांचे व आईबापांकडे मुलांचे दुर्लक्ष होणार आहे.) तर काय करावे लागेल, त्यांच्यावर वर्चस्व गाजविणार्यात पुरुषांचे हक्क आम्हाला, केवळ पुरुषांना नव्हे तर आम्हा सर्व स्त्रीपुरुषांना,आमच्या मनांतून काढून टाकावे लागतील.
सर्व स्त्रियांनी पूर्ण वेळाच्या नोकर्याआ करू नये असे मला वाटू लागले आहे त्याचे कारण त्या ती ती कामे करण्याला अक्षम आहेत हे नव्हे, तर त्यामुळे कुटुंबाची घडी बिघडते हे आहे. सर्व सक्षम स्त्री-पुरुषांना समाजोपयोगी कामे करावीच लागणार; ती त्यांनी केलीच पाहिजेत. पण कौटुंबिक किंवा सामाजिक स्वास्थ्य कायमचे नष्ट करून समाजोपयोगी कामे होत नसतात. एकीकडचे प्रश्न सोडविताना दुसरीकडे मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. स्त्रियांच्या वाढत्या नोकर्यां मुळे मुले जास्त प्रमाणात गर्दसारख्या व्यसनांच्या अधीन होत आहेत, अभ्यास न करता परीक्षा पास करू पाहणार्यांतचे प्रमाण वाढते आहे असे जर उद्या सिद्ध झाले, तर महिलांच्या नोकर्याम समाजाला काय भाव पडल्या?(अध्ययन न करताच त्याचे लाभ मिळविणे हा संपूर्ण समाजाच्या चारित्र्याचा प्रश्न असल्यामुळे गर्दसेवनाइतकाच गंभीर आहे.) म्हणून, मिळवता कोणीही असो, त्याच कुटुंबातल्या दुसर्याव, समाजोपयोगी कार्य करणार्याम, शरीराने सक्षम स्त्रिया आणि शरीराने अक्षम (बालके व वृद्ध) अशा सर्व व्यक्तींचा त्या मिळकतीमधला हिस्सा त्यांचा अधिकार म्हणून मान्य केला गेला पाहिजे. मुलांना घडवून उद्याचे चांगले नागरिक निर्माण करणे आणि वृद्धांची सेवा करणे हे समाजोपयोगी कार्य नाही असे कोण म्हणेल?कचेन्यादफ्तरांमध्ये व कारखान्यांमध्ये कमी माणसे नेमून समाजामधले उत्पादन वाढते ठेवावयाचे असेल तर यन्त्रांचा वापर वाढवून स्त्रियांना मोकळे ठेवले पाहिजे.
मिळवत्या किंवा कमावत्या स्त्रियांचे त्यांच्या नवर्यांतना, त्याचप्रमाणे माहेरच्या मंडळींचे शोषण करणे सासरच्यांना, कशामुळे शक्य होते? ते स्त्रियांच्या अनन्यगतिकत्वामुळे शक्य होते. आणि त्यांना अनन्यगतिकत्व येते ते योनिशुचितेच्या प्रचलित कल्पनांमुळे येते. प्रचलित नीति’कल्पनांमुळे बाईच्या मागचे नवर्यापचे शुक्लकाष्ठ सुटतच नाही. स्त्रीची नवच्याबरोबर नांदण्याची अजिबात इच्छा नसली तरी तिची त्याच्यापासून सुटका नाही. घटस्फोटाचा तिला कागदोपत्री अधिकार मिळाला असला तरी प्रत्यक्षात तोप्राप्त करून घेण्यासाठी तिला वर्षानुवर्षे रखडावे लागते. आपल्या घराच्या बाहेर ती एक रात्रसुद्धा राहू शकत नाही. लग्नाच्या आधी किंवा नंतर ती कोणा दुसर्याआ पुरुषाबरोबर – प्रवासाला जाऊ शकत नाही.
कोणाच्या निष्ठेविषयी सतत संशय घेणे हे त्यावर दुय्यम दर्जाचे नागरिकत्व लादण्याचे आणि त्याला वाकविण्याचे एक उत्कृष्ट साधन आहे. आपल्या देशात ते जसे परधर्मीयांच्या बाबतीत वापरले जाते तसेच स्त्रियांच्याही बाबतीत, निष्ठा सिद्ध करावयाला लावणे म्हणजे सीतेला अग्निदिव्य करावयाला लावणे. त्यातून ती सहीसलामत बाहेर पडली तरी तिला लोकापवादाची भीती घालून टाकून देणे; निदान आपल्याला टाकून देतील ह्या भयाने सतत ग्रस्त ठेवणे. ह्यामध्ये स्त्रियांवर किती घोर अन्याय होतो ह्याची भारतीय पुरुषांना कल्पना येऊ शकत नाही. त्यांनी आपली त्या बाबतीतली संवेदनाच नष्ट केली आहे. त्यांची मने निढवली आहेत. आणि स्त्रियांनाही ह्या अन्यायाची इतकी सवय झाली आहे, तो इतका अंगवळणी पडला आहे, की तो अन्यायच त्यांना भूषणास्पद वाटतो काय, त्यातच त्यांना सुरक्षित वाटते की काय, असा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. पतिनिष्ठेचे माहात्म्य जोवर आमच्या मनांत जागते आहे तोवर स्त्रियांची भयग्रस्ततेमधून सुटका नाही. कारण ज्याच्याविषयी आम्ही संशय घेणार त्याने कितीही डोकेफोड केली तरी आमचा संशय कायम. काहीही केले तरी संशय फिटतच नाही. निष्ठा सिद्ध करणे ही अशक्यप्राय गोष्ट असते. इतक्या मोठ्या समाजात आपल्या पतीशी एकनिष्ठ नसलेल्या कोणी ना कोणी स्त्रिया असणार. त्यांचेच उदाहरण पुन्हापुन्हा देऊन ‘स्त्रीजात तेवढी नमकहराम’ असे पुरुष म्हणणार आणि समस्त स्त्रियांमधली असुरक्षिततेची भावना वाढवून त्यांना गलितधैर्य करण्यात ते आपले पौरुष सिद्ध करणार!
स्त्रीमुक्तीऐवजी फक्त स्त्रीशक्ती वाढवून तिचे प्रश्न सुटणार नाहीत, स्त्रियांच्या निर्णयशक्तीचा आदर (अर्थात ह्यामध्ये त्यांचे यौन आचरणही आले) केल्यासच त्यांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होईल असे मला का वाटते त्याचे हेही एक कारण आहे.
आजच्या स्थितीमध्ये ज्या स्त्रियांना घराबाहेर एकदेखील रात्र घालविण्याची सोय नाही त्यांनाच सासुरवास भोगावा लागतो. मुलगी एकदा लग्न होऊन सासरी गेली की माहेरच्यांचा तिच्यावरचा व तिचा माहेरावरचा हक्क संपला असा समज पुष्कळ ठिकाणी अद्याप आहे. (हे सारे मनावरचे संस्कार आहेत. ह्या नियमांना, किंवा तसे पाहिल्यास बहुतेक सान्या ‘नीति’* नियमांना दुसरा कशाचाही तर्कशुद्ध आधार नाही. तसे नसते तर विभिन्न देशकालांत निरनिराळे ‘नीति नियम राहिलेच नसते.) त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिच्याशी कोणत्याही परिस्थितीत जुळवून घ्यावयाचे नाही (जातीतला फरक, हुंडा, मानपान अशी कोणतीही कारणे त्यासाठी पुरतात.) असे ठरविले तर तिच्या दुःखाला पारावार नसतो. जिला बाहेर आश्रय आहे तीच अन्यायी सासराला धुडकावून लावू शकते. नणंदा,जावा, सासू, दीर, नवरा, सासरा हे सारे ती अगतिक असल्यामुळेच तिला अनन्वित जाच करू शकतात असे मला वाटते. इतकेच नाही तर ज्यांना सासरच नसल्यामुळे माहेरचा आश्रय घ्यावा लागतो, त्यांना त्यांच्या भावजयाही छळू शकतात. हा मानवी दुष्टावा आहे व तो पुष्कळसा ragging सारखा परंपरेने चालत आला आहे. त्यात मानापमानाचा, धनलोभाचा व मत्सराचा भाग पुष्कळ आहे. हा विषय स्त्रियांच्या इतक्या निकट परिचयाचा आहे की मी त्याबद्दल अधिक काही लिहिण्याची मुळीच गरज नाही. पण स्त्रियांना भोगाव्या लागणाच्या छळाचा संबंध त्यांनी त्यांच्या प्रारब्धाशी, भोक्तव्याशी, दैवाशी किंवा नियतीशी जोडून ठेवला असल्यामुळे त्या त्यांचा छळ ‘माझं मेलीचं नशीबच फुटकं’ असे म्हणत निमूटपणे सोसत राहतात. (तो कर्मसिद्धान्त आमच्या बोकांडी बसलेला आहे ना!) त्यांना छळ सोसावा लागतो, त्याचा प्रतिकार करता येत नाही ह्याचे कारण त्यांचे दुर्दैव किंवा त्यांचे बदनशीब हे नसून योनिशुचितेबद्दलचे समाजामधले सध्याचे चुकीचे दृढसमज आहेत हे त्यांना समजतच नाही. आणि त्यामुळे अशा स्त्रिया दैवाला वश करण्याचा निरर्थक प्रयत्न करीत अत्यन्त दुःखात आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करतात. त्यांच्या परिहार्य दुःखाकडे दुर्लक्ष करणार्याे आणि परमेश्वरावरील श्रद्धेमुळे चुकीचा कार्यकारणसंबंध लावणाच्या मख्ख, जड, मूढ, आणि पाषाणहृदयी समाजाचा मीही एक घटक होऊन राहिलो आहे। ह्याबद्दल मला नेहमीच अतिशय विषाद वाटत आलेला आहे. आजही माझे हे लेखन अरणरुदनच ठरेल की काय अशी भीती माझ्या मनात कायमच आहे.
* येथे ‘नीती’ हा शब्द फक्त स्त्रीपुरुषसंबंधविषयक ‘नीती’बद्दल वापरला आहे
एकपतिपत्नीकत्व हा पतिपत्नींचा एकमेकांवरचा विशेषाधिकार (privilege) तर योनिशुचिता हा सर्व पुरुषांचा सर्व स्त्रियांवरचा स्वत्वाधिकार किंवा एकाधिकार (monopoly) आहे. त्यांचा आम्ही आमच्या पूर्ण बळानिशी प्रतिकार केला पाहिजे, कारण हे अधिकार स्वामित्व देणारे अधिकार आहेत व स्वामीसेवकसंबंध हा समतेला मारक आहे.
आपल्या मनांमधला योनिशुचितेचा आग्रह नाहीसा झाल्याबरोबर सगळ्या नात्यांचे पूर्वीचे संदर्भ बदलतील. कोणी प्रत्यक्ष (Real) पतिपत्नी असले तरी त्याबरोबरच बाकी सगळे पुढेमागे संभाव्य (potential) पतिपत्नी होतील. त्यामुळे सासूचा सुनेवरचा किंवा नवयाचा बायकोवरचा एकाधिकार संपुष्टात येईल, कोणत्याही व्यक्तीला ह्या घरातून त्या घरात जाणे सहज शक्य होईल. तिची गतिशीलता (mobility) वाढेल आणि कुटुंबघटकांच्या एकमेकांशी असलेल्या संबंधांची रचना कडक किंवा अनम्य (rigid) न राहता लवचीक, नम्य (flexible) अशी होईल अशी माझी समजूत आहे. निदान मला ती लवचीक व्हावयाला पाहिजे आहे.
त्याचप्रमाणे सर्व स्त्रियांचा हा स्वायत्ततेचा हक्क मान्य केल्याबरोबर ती त्यांच्या शहाणपणाची, सुबुद्धपणाची पावती दिल्यासारखे होते. स्त्रीपुरुषांनी एकमेकांच्या, कोणत्याही क्षेत्रातल्या, मुख्य म्हणजे आजवर जे निषिद्ध होते त्या क्षेत्रातल्या, निर्णयाला बिनतक्रार मान्यता दिल्याचा तो पुरावा ठरतो. त्यामुळे स्त्रियांच्या समाजिक दर्जामध्येकेवढा मोठा फरक पडतो! बरे, समाजाचे हे वर्तन यदृच्छेने होणार नसून, बयावाइटाची चर्चा करून व जाणून-बुजून घेतलेला हा निर्णय आहे असे त्याचे स्वरूप आता होणार असल्याकारणाने स्त्रीचे आर्थिक बाबतीतील किंवा दैनंदिन व्यवहारातील दुय्यम स्थान त्याबरोबर आपोआप नष्ट होईल असे मला वाटते.
डॉ. के. रा. जोशी ह्यांचे पत्र, किंवा आणखीही इतर कोणाचे पत्र हे प्रातिनिधिक स्वरूपाचे आहे असे मीही मानून चाललो आहे. त्यांचा ह्या लेखांमधील उल्लेख हा कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा नसून तो त्यांच्या पत्रांतील विधानांच्या संदर्भापुरताच मी केला आहे. आमचे व्यक्तिगत भांडण काहीच नाही हे माझ्या लेखनावरून स्पष्ट होईल अशी मला आशा वाटते.
समाजात पुरुष जास्त व स्त्रिया कमी हे जर वास्तव असेल तर आज अनेक स्त्रियांचे विवाह जमत नाहीत, वये वाढत आहेत व अनेकांना अविवाहित राहावे लागत आहे ह्याचे कारण काय असे डॉ. जोशी विचारतात. त्याचे कारण त्यांच्या डोळ्यांसमोर जो मोजको समाज आहे त्यातील विवाहेच्छु स्त्रीपुरुषांच्या एकमेकांकडून अपेक्षा वाढत आहेत; त्यांना मुरड घालण्याचे तो समाज शिकलेला नाही. ह्याच समाजाचे वर्तन जैविकीपेक्षा संस्कारांनी अधिक प्रभावित आहे. पण डॉ. जोशींनी त्याचबरोबर दुसरेही वास्तव पाहावे अशी त्यांना नम्र विनन्ती आहे. ज्या तरुण मुलींना काही कारणामुळे अनाथालयांचा आश्रय घ्यावा लागतो त्यांपैकी कोणालाही जास्त दिवस अविवाहित राहावे लागत नाही. त्यांना मागणी घालणारे तरुण तेथे नेहमी येत असतात. स्त्रियांची संख्या जर खरोखरच जास्त असती तर ज्यांचा पाय घसरला (!) आहे, ज्यांच्या आईबापांना हुंडा देण्याची ऐपत नाही, अथवा त्यांचा अजिबात पत्ताच नाही, म्हणजे ज्यांच्या ठिकाणी कुलशीलाचे मोठेच वैगुण्य आहे अशांची लग्ने कधी झालीच नसती. पण तसे घडत नाही, कारण अशा मुलींना आपण होऊन मागणी घालणार्यान पुरुषांच्या अपेक्षा कमी असतात, तरी बाहेर त्यांना मुली मिळत नाहीत एवढेच आहे असे माझे त्याविषयीचे निदान आहे.
स्त्रीपुरुषांच्या विषमप्रमाणावर उपाय म्हणून डॉ. जोशी ह्यांनी भारतीय आश्रमव्यवस्था पुन्हा दृढमूल करावयाला सांगितली आहे. भारतीय आश्रमव्यवस्था म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास ह्या आश्रमांचे पालन. ह्या चतुर्विध आश्रमांनी फक्त त्रैवर्णिक अधिशासित होत. आपल्या समाजामधील संख्येने सर्वांत मोठा जो ‘शूद्रवर्ण । तो गृहस्थाश्रमाव्यतिरिक्त इतर आश्रमांचा अधिकारी नव्हता आणि सांप्रतच्या कलियुगात तर दोनच वर्ण असतात असे माझ्या वाचनात आहे. डॉ. जोशी ह्यांनी त्यांच्या वाक्यामध्ये पुन्हा हा शब्द वापरला असल्यामुळे माझा गोंधळ झाला आहे. पुन्हा ह्या शब्दाचा अर्थ पूर्वीसारखा असा करावयाचा काय?शूद्रांना पूर्वीसारखेच बाहेर ठेवावयाचे आहे काय?पण जाऊ द्या,हा तांत्रिक भाग आपण सोडून देऊ. पूर्वी ही व्यवस्था जर दृढमूल असेल तर ती शिथिल का झाली त्याची कारणे शोधून काढून ती मात्र दूर करावी लागतील. मला वाटते की ही व्यवस्था पूर्वी कधीच दृढ नसावी. ती प्लेटोच्या आदर्श जगताप्रमाणे ऋषिमुनींच्या कल्पनेत नांदत असावी. त्यातल्या संस्कारांचे कर्मकांड तेवढे ह्या भूतलावर वसत असावे. पण ह्या पैलूच्या जास्त अध्ययनाची गरज आहे; त्यामुळे ते सारे असो.
हे ब्रह्मचर्यपालनाचे उपाय साक्षात् ब्रह्मप्राप्तीचे प्रलोभन दाखवूनसुद्धा आजवर मोठ्या प्रमाणात सफल झालेले नाहीत. कारण ते जैविकीच्या, सहजप्रेरणांच्या पूर्ण विरुद्ध वर्तन करावयाला लावणारे आहेत. त्यांच्यामुळे आजवर समाजामधले ढोंगच वाढीला लागले आहे हे वास्तव दुर्लक्षिण्यासारखे नाही. कामप्रेरणेचे उदात्तीकरण हा उपाय फार थोड्यांना साधण्यासारखा आहे. लादलेल्या ब्रह्मचर्यव्रतपालनामुळे काहींच्या शरीरांच्या गोपनीय अवयवांचे विकार कदाचित टळत असतील पण मनोविकार बळावून संपूर्ण समाजाचे स्वास्थ्य नष्ट होण्याचा धोका कायमच राहतो हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. आणि त्याचबरोबर ब्रह्मचर्यपालनाविषयी एकट्या डॉ. जोशींचेच नाही तर सर्वजनमतसुद्धा पडताळून पाहावे लागेल.
आता श्री. श्याम कुळकर्णी ह्यांनी उपस्थित केलेले मुद्दे घेऊ. त्यांनी स्त्रियांना स्वायत्तता देणे म्हणजे आंधळ्याला बघण्याचे किंवा बहिन्याला ऐकण्याचे स्वातन्त्र्य देणे होय असे म्हटले आहे. त्या संदर्भात त्यांनी टी. बी. खिलारे आणि ललिता गंडभीर ह्यांची पत्रे वाचावी अशी त्यांना विनन्ती आहे. आणि ज्या डॉ. प्रभुंचा ते हवाला देतात त्यांनी आजचा सुधारक मध्ये लेख लिहिण्याचे आधी कबूल करून नंतर नाकारले (एप्रिल ९२) हे लक्षात घ्यावे ही विनन्ती आहे. हे लेखक डॉक्टर, ज्या समाजासाठी लिहितात त्याला सहसा दुखवत नाहीत. प्रचल्ति नीतिकल्पनांविरुद्ध आपली मते मांडण्याचे काम फार फार जपून करावे लागते. त्या भानगडीत लोक सहसा पडत नाहीत. त्यांना वादविवाद नको असतात असा माझा समज आहे.
कुटुंबसंस्थेवर अशा स्वायत्ततेचे कोणते परिणाम होऊ शकतील ते आपण पुढच्या लेखांमधून पाहणार आहोत. मी कुटुंबसंस्था खरोखरच उद्ध्वस्त करावयाला निघालो आहे काय ते समजण्यासाठी एकदोन अंक थांबावे लागेल. स्त्रीला नको असलेले स्वातन्त्र्य मी देऊ केले त्याला आता एक वर्ष झाले. ह्या एक वर्षांत मला एकही निषेधपत्र स्त्रियांकडून
आलेले नाही त्याअर्थी त्यांना माझ्या कल्पना आचरणात आणण्यालायक नसल्या तरी विचार करण्यालायक वाटत असाव्या. मला सध्या तेवढे पुरे आहे.
बाकीच्या त्यांच्या मुद्द्यांविषयी पुढच्या वेळी….

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.