अन्तर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही

टॉप क्वार्कचा शोध लागल्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या ९ एप्रिल ९५च्या अंकात आणि त्याच्या आधारे प्रा. काशीकरांचा लेख आजच्या सुधारकच्या प्रस्तुत अंकात प्रसिद्ध झाला आहे. अॅनी बेझंट आणि लेडबीटर यांनी भौतिक आणि रसायनशास्त्रातील विशेषेकरून अणुसंरचनेविषयी काही संकल्पना अंतर्दृष्टीने प्राप्त करून पूर्वीच प्रतिपादन केल्या होत्या. यावरून अंतर्दृष्टीने ज्ञान मिळू शकते असे मत ध्वनित करण्यात येत आहे. परंतु हा समज नवा नाही. विश्लेषण, संश्लेषण, विवेक, तर्क आणि प्रत्यक्ष पुरावा याभक्कम पायावर आधारलेल्या विज्ञानाने दिलेली आव्हाने पारंपारिक धर्मकल्पनांना पेलताआली नाहीत. याची प्रतिक्रिया म्हणून विज्ञान धोकादायी आहे अशी कल्पना गेल्या शतकात : रूढ झाली. बर्गसाँ हा तत्त्ववेत्ता अंतर्ज्ञान किंवा अंतःस्फूर्तीने मिळालेले ज्ञान श्रेष्ठतर आणिखरे अशा भूमिकेचा पुरस्कर्ता होता.
दोन प्रकार :
बुद्धीचा आधार नसलेल्या ज्ञानमार्गाचे दोन प्रकार संभवतात. (१) साक्षात्कार अथवा अंतर्दृष्टी (revelation) (२) अंतःस्फूर्ती (intuition). जेव्हा एखाद्या घटनेचा किंवा प्रयोगातील निरीक्षणाचा सुसंगत अर्थ लावायचा असतो तेव्हा शास्त्रज्ञ अनेक पर्यायांचा विचार करतो. त्यांपैकी ज्याच्या साह्याने जास्तीत जास्त समर्पक अर्थ लागू शकतो त्या पर्यायाचे साधार प्रतिपादन करण्यात येते. उदा. पल्सार तान्यापासून स्पंदनस्वरूपी प्रारण (radiation) कसे मिळते, याच्या स्पष्टीकरणासाठी सहा पर्यायांचा विचार करण्यात आला. साधारणपणे असफल पर्यायांचा उल्लेख करण्यात येत नाही. म्हणून घटनेची कारणमीमांसा शास्त्रज्ञाला अचानकपणे सुचली असे सामान्य मनुष्याला वाटते. काही प्रसंगी संशोधन-समस्येविषयी चिंतन करीत असताना योग्य गृहीतक (hypothesis) पहिल्याच विचारामधून मिळते. याला अंतःस्फूर्ती (intuition) म्हणता येईल. या गृहीतकावर आधारलेली कारणमीमांसा यथार्थ आहे हे पटविण्याचे उत्तरदायित्व त्या व्यक्तीचे असते.
साक्षात्कार अथवा अंतर्दृष्टी
प्रा. काशीकरांनी उद्धृत केलेले उदाहरण वर दिलेल्या अंतःस्फूर्ती या प्रकारात मोडत नाही. अॅनी बेझंट आणि लेडबीटर हे वैज्ञानिक नव्हते. ते थिऑसॉफिस्ट होते. त्यांना गूढवादी (mystic) म्हणता येईल. त्यांनी अवलंबिलेल्या ज्ञानप्राप्तीच्या मार्गाला साक्षात्कार (revelation) म्हणता येईल. ज्ञानाच्या राज्यशास्त्र, अर्थशास्त्रापासून जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणितापर्यंत अनेक शाखा आणि त्यांच्या उपशाखा आहेत. या सर्वांचे ज्ञान साक्षात्कार पद्धतीने होऊ शकते काय?उदा. आर्य बाहेरून भारतात आले. तत्पूर्वी येथे असलेली अनार्य संस्कृती ही आर्यसंस्कृतीएवढीच प्रगत होती हेही ज्ञान मिळाल्याचा उल्लेख थिआसॉफीय वाङ्मयात आढळतो. हे ज्ञान बहुधा प्रा. काशीकर यांना मान्य होणार नाही. पुन्हा दुसर्यात कोणत्याही साक्षात्कारी अथवा दिव्यदृष्टी प्राप्त झालेल्या व्यक्तीने बेझंटलेडबीटरप्रणीत माहितीला दुजोरा दिल्याचे वाचनात नाही. शिवाय कोणाला साक्षात्काराने प्राप्त झालेले ज्ञान खरे आहे हे कोणी आणि कसे ठरवायचे?जोनाथन स्विफ्टने १७२७ साली मंगळाला दोन उपग्रह आहेत असे सांगितले. पुढे ते खरे ठरले. तेव्हा स्विफ्टलाही अंतर्ज्ञानी म्हणावे काय?काही तथ्ये
संरचनेच्या दृष्टीने सर्वात साधा आणि सोपा अणू म्हणजे हायड्रोजन. त्याच्या. केंद्रात एक प्रोटॉन असतो आणि त्याभोवती इलेक्ट्रॉन फिरत असतो. या संकल्पनेद्वारे अनेक घटनांचा उलगडा होतो. क्वार्क सिद्धान्तानुसार प्रोट्रॉन हा तीन क्वार्क कणांचा बनला आहे. क्वार्कचे गुणधर्म शास्त्रज्ञांनी प्रसिद्ध केले आहेत. हायड्रोजन अणू १८ कणांचा बनला आहे असे मानले तर हे कण उपक्वार्कीय मानणे भाग आहे. इतरही सर्व मूलद्रव्ये १८ च्या पटीत असलेल्या कणांची बनली आहेत असे बेझंट-लेडबीटर यांचे म्हणणे आहे. Occult Chemistryमधून श्री जिनराजदास यांनी उद्धृत केलेले आकडे पाहिल्यास अनेक अणूंच्या UPA संख्यांना १८ ने निःशेष भाग जात नाही (उदा. युरेनियम ४२६७). तसेच बेझंटलेडबीटर यांनी दिलेले अणुभार वैज्ञानिक पद्धतीने निश्चित केलेल्या अणुभाराशी दुसर्या दशांश स्थानापर्यंत जुळतात हा दावा देखील चुकीचा आहे.
सर्व अणू हे हायड्रोजन अणूच्या आधारे बनलेले आहेत ही कल्पना प्राउट नावाच्या ब्रिटिश शास्त्रज्ञाने १८१५ मध्ये पुढे मांडली परंतु त्याकाळी उपलब्ध असलेल्या अणुविषयक माहितीचे सार्थ स्पष्टीकरण होऊ न शकल्याने ही कल्पना शास्त्रज्ञांना मान्य झाली नाही. याच संकल्पनेचे १८९५ मध्ये पुनश्च प्रतिपादन केल्याचे श्रेय बेझंट-लेडबीटर यांना देता येईल. तथापि प्रश्न असा की हायड्रोजन अणू १८ कणांचा आहे असे का मानावे? या संकल्पनेद्वारे पूर्वी न समजलेल्या कोणत्या निरीक्षणांचा अर्थ लागतो?किंवा कोणत्या नव्या घटनांचे भाकीत करता येते?या कणांचे गुणधर्म काय आहेत? अशा प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत दिली जात नाहीत तोपर्यंत वरील विचार म्हणजे केवळ कल्पनेच्या भराच्या ठरतात. एवंच ज्या विधानांच्या आधारावर निर्विचारी ज्ञानप्राप्तीच्या मार्गाच्या शक्यतेविषयी सूचित करण्यात येत आहे तो पाया ठिसूळ आहे हे उघड होईल.
अंतर्ज्ञानाची सत्यासत्यता
अंतर्दृष्टी (clairvoyance) या घटनेविषयी पाश्चात्त्य देशांत कित्येक वर्षांपासून संशोधन चालू आहे. संशोधनावरून हे स्पष्ट होते की केवळ एका घटनेवरून निष्कर्ष काढणे बरोबर नाही. अंतर्ज्ञानी व्यक्तींना आलेल्या अनुभवाचे वर्णन वाचले तर हा स्वसंमोहनासारखा प्रकार असावा असे दिसते. त्या काळामध्ये चालू असलेल्या मनोव्यापारात अनेक कल्पना सुचू शकतात. त्यामधील काही खच्या तर काही चुकीच्या असू शकतात.
अंतर्ज्ञान पद्धती खरी आहे की नाही हे ठरविण्यासाठी Occult Chemistry आणि कोवेन यांची दोन्ही पुस्तके मुळातून वाचली पाहिजेत. त्यांमधील केवळ आधुनिक विज्ञानाशी साम्य असलेल्याच विधानांचा विचार करणे योग्य नाही. त्यांतील किती विधाने जुळतात आणि किती जुळत नाहीत याचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. केवळ वैज्ञानिक ज्ञानाशी साधर्म्य आणि सादृश्य असलेली उदाहरणे घेऊन त्यावरून निष्कर्ष काढणे धाष्ट्र्याचे आहे. मला Occult Chennistryहे पुस्तक मिळू शकले नाही; ते आता उपलब्ध नाही. परंतु बेझंट-लेडबीटर यांच्या संशोधनाविषयी त्यांच्या शिष्योत्तमांनी केलेले विवेचन वाचण्यात आले.
विज्ञानामध्ये आजदेखील अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. उदा. फर्माचा (Fermat) . सिद्धान्त, ह्याची पूर्णपणे सिद्धता देण्याचे सर्व प्रयत्न असफल झालेले आहेत. अंतर्ज्ञानाला कोणत्याही ज्ञानशाखेचे वावडे नसावे. तेव्हा अंतर्ज्ञानी व्यक्तींना त्यांची संपूर्ण सिद्धता दिल्यास अनेक संशोधकाचे श्रम वाचतील.
तर्कसंगती न देता कल्पनारंजनातून मिळालेले ज्ञान हे सत्यदर्शी असण्याची ग्वाही देता येत नाही. त्यामधील विधानांची सत्यासत्यता तपासून पाहण्यासाठी (हा विवेकवादी दृष्टिकोण होय) इंद्रियगोचर ज्ञानाकडे वळावे लागते. त्यामुळे विश्लेषण, तर्क, पुरावा अशा विचारप्रणालीचा अवलंब करून मिळविलेले ज्ञान हे जास्त भक्कम पायावर उभे असते. ते पिढ्या-पिढ्यांद्वारे संक्रांत होत असते.
मूळ ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे सर्व शंकाकुशंकांचे निराकरण करणे शक्य झाले नाही. तथापि या विवेचनाद्वारे विवेकवाद्यांची भूमिका समजावी ही अपेक्षा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.