पुस्तक-परीक्षण- ‘ज्याचा त्याचा प्रश्न’

‘देव’ ही आजची ज्वलंत समस्या आहे हे जाणून त्या समस्येवर घणाघाती प्रहार करणारे, प्रेक्षकांना विचार करायला लावणारे ‘ज्याचा त्याचा प्रश्न हे नाटक रंगभूमीवर आले आहे. प्रेक्षकातील कुठल्या ना कुठल्या प्रवृत्तीच्या द्योतक असलेल्या चार प्रमुख व्यक्तिरेखा नाटकात आहेत. या व्यक्तिरेखांच्या मनातले विचार हे प्रेक्षकांपैकी कुणाचेही असू शकतात. त्यातील एक व्यक्तिरेखा म्हणजे जास्त कर्मकांडात रमून न जाता देव मानणारी निर्मला. अगोदर नीतिवादी व नियतिवादी असल्यामुळे हार पत्करणारा परंतु भौतिक यश प्राप्त झाल्यावर नीति-अनीतीचीही पर्वा न करणारा निर्मलेचा पती-सुभाष. कोवळ्या वयात समाजाकडून देवाबद्दल घडवल्या जाणार्याण संस्कारांत वाढणारा व घरातून नास्तिकतेच्या संस्कारांत वाढणारा मनू. या सर्वांविरुद्ध तर्ककठोर भूमिका घेऊन समाजाविरुद्ध लढा देण्यासाठी सज्ज असणारा भास्कर. अशा चार प्रमुख व्यक्तिरेखा नाटकात आहेत. प्रेक्षक स्वतःला या व्यक्तिरेखांत पाहून गुंततो व विचारमग्न होतो.
सुभाष व निर्मला हे देवावर श्रद्धा असणारे एक जोडपे आहे. निर्मला शिक्षिका आहे. तिला मूल नाही. आपल्या नशिबातच नाही या भूमिकेतून तिने ते स्वीकारले आहे. मूल न होण्याच्या दुःखाचा भार तिने परमेश्वरावर टाकला आहे. प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयाच्यावेळी ‘एक वेळ पंडिताला विचारून तरी घ्या’ असे ती नवर्यापला सांगत असते. ‘देवाच्या मनातअसेल तर चागलं होईल.”काही तरी असतंच, ‘सगळ्यांशी लढता येतं, नशीबाशी नाही लढतायेत’ असे भास्करला सांगणारी निर्मला ‘मनाचे खेळ आहेत असे भास्करने सांगितल्यावर ‘तरी त्यामुळेच बळ आलं’ असे म्हणते. आजारी पडल्यावर ‘देवाचंही करावं-औषधंही घ्यावीत असे सांगणारी निर्मला शेवटी नवीन फ्लॅटमध्ये जाताना सुभाषच्या बदलत्या भूमिकेपुढे हतबल होऊन देवाचे गाठोडे जुन्या घरातच ठेवून जाते.
सुभाष एका जाहिरात कंपनीत आहे. गोल्ड मेडॅलिस्ट आर्टिस्ट असूनही व त्याच्या बुद्धीचा वापर केला जात असूनही त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. कामात बढती मिळालेली नाही. त्याच्याबरोबरचे सुमार बुद्धीचे किंवा अडाणी लोकही गाड्या घेऊन फिरत आहेत ही त्याची व्यथा आहे. ‘भाग्य से पहले और समय से पहले किसी को कुछ नहीं मिलता’ अशी त्याची भूमिका आहे आपल्या अपयशाचा दोष तो देवाला, प्रारब्धाला देतो. ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे असे समजून, स्वतः काही निर्णय न घेता, आहे त्या परिस्थितीत, कुढत जीवन जगतो. शेजारी राहणार्याप भास्करच्या सल्ल्यानुसार दुसर्यात जाहिरात कंपनीत नोकरी पत्करल्यानंतर जेव्हा सर्व भौतिक सुखे त्याच्या पायाशी लोळण घेतात तेव्हा तो देवाचीही हेटाळणी करतो.
सुभाषच्या घराशेजारी राहणार्याव भास्करचा देवाबद्दल कडवा विरोध आहे. देवाचे अस्तित्व मान्य केल्यामुळेच अंधश्रद्धा, भोंदूगिरी, दैववाद फोफावलेला आहे व त्यामुळे या सर्व प्रवृत्तीविरुद्ध लढा उभारावयाचा आहे. अशा प्रकारच्या चळवळीतील तो एक सक्रिय कार्यकर्ता आहे. माणसाने सतत प्रश्न विचारायला शिकले पाहिजे. येथील प्रश्नांची उत्तरे । येथेच शोधायची आहेत. माणसांच्या चुका या माणसांकडूनच त्याच्या हलगर्जीपणामुळे होत असतात. त्या चुकांचे खापर नशिबावर, देवावर फोडून चालणार नाही. माणसाने वास्तवाला, सत्याला सामोरे जायला हवे. येथे घडणार्याो घटनांना माणूसच जबाबदार असतो. कोणी नियंता, अदृश्य शक्ती नसते, ही भास्करची ठाम भूमिका आहे. भोंदूगिरी करणार्याम गोसावड्यावर भरलेल्या खटल्यातून गोसावडा जेव्हा निर्दोष सुटतो तेव्हा भास्करला कायदाच बदलला पाहिजे याची तीव्र जाणीव होते. एक वेळ लोकांचा फॅमिली डॉक्टर नसतो, पण फॅमिली ज्योतिषी असतो. अशा लोकांच्या प्रवृत्तीबद्दल भास्करला संताप येतो. प्रयत्न करूनही यश येत नाही यात नशिबाचा भाग नाही तर निर्णय घेण्याची शक्ती, आत्मविश्वास हरवतो, अपयश येते तेव्हाच मनुष्य देवाची पळवाट शोधतो, असे भास्कर सुभाषला सुनावतो. एका प्रसंगी भास्कर निर्मलेला सांगतो की दुःख विसरायला नाही, तर पचवायला शिकले पाहिजे. देव आणि त्याचे असणे ही लोकांना लागलेली सवय आहे. देव मानणार्यां पेक्षा देव न मानणाच्यांचीच फार ससेहोलपट होत असते; – मानसिक आणि भावनिक – असे भास्करला वाटते. भास्करचा राग आहे शाळेतून शिकवल्या जाणार्या; पाठ्यपुस्तकांवर. ज्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत त्याच शिकवल्या जाव्यात असे भास्करचे म्हणणे आहे. देवाचे अस्तित्व सिद्ध झालेले नाही म्हणून शिक्षणातून देव हटवलापाहिजे. ‘जेथे जातों तेथें, तू माझा सांगती’ असे सांगणाच्या पाठ्यपुस्तकांची होळी करायला पाहिजे. शिक्षण खाते जाळायला हवे, असे भास्कर बजावतो. पालखीसाठी अर्धा-अर्धा तास ” रस्ता बंद. त्यासाठी शाळेला सुट्टी – याबद्दल भास्करला चीड आहे.
नास्तिकतेचे व आस्तिकतेचे असे दोन्ही संस्कार होणारया मनूची घुसमट होत आहे. भास्करकडून त्याच्यावर नास्तिकतेचे बीजारोपण होत आहे. घरात काम करणार्याक सगुणाच्या अंगात आल्यावर मनू तिच्या अंगावर खेकडा टाकतो. कारण भास्करने सांगितलेले असते की अंगात आलेल्या बाईच्या अंगावर खेकडा, विंचू टाकला तर तिच्या अंगातले पळून जाईल. याचा पडताळा मनूला घ्यावयाचा असतो. शाळेतून देव ही कल्पना असणार्याू धड्यांचा अभ्यास करू नकोस, तशा प्रश्नांची उत्तरे लिहू नकोस असे भास्कर मनूला सांगतो. भास्करच्या शिकवणुकीचा परिणाम मनूने मराठीत पेपर कोरा देण्यात होतो. तरी गुणवत्ता यादीत मनूचा नंबर येतो. त्यावेळी भास्करच्या तर्ककठोर भूमिकेला तडा जातो. तेव्हा या प्रश्नांचा भास्कर शोध घेतो. खोटे यश नको म्हणून मनूला बोडकडे फेरतपासणीसाठी अर्ज करायला लावतो. याला तो मनूवर करण्यात यावयाच्या संस्काराचा भाग मानतो. र. धों. कर्वे यांचे चरित्र असलेले पुस्तक प्रत्येक तरुण मुलाने वाचलेच पाहिजे म्हणून भास्कर ते मनूला एका प्रसंगी भेट देतो.
घरात कामाला असणारी सगुणा आणि तिचा नवरा गोंद्या हे निपुत्रिक जोडपे या मुख्य कथानकात येते. मूल हवे म्हणून दर शुक्रवारी सगुणाच्या अंगात येते. त्यामुळे मठात भक्तगणांची गर्दी जमते. गोंद्या त्या गर्दीचा आर्थिक लाभ करून घेतो. सगुणा पोटुशी राहिल्यावर अंगात आणण्याचे नाकारते. परंतु गोंद्या तिला ‘पोर पाडून परत अंगात येण्याचे चालू ठेव असे सांगतो. त्यास ती नकार देते. कारण तिला मूल हवे असते. देवाच्या नावावर लोकांना फसवून पैसे उकळण्यास तिचा विरोध आहे. शुक्रवारशिवाय मंगळवारीही अंगात आण आपण दुसरा मठ टाकू, (भास्करच्या म्हणण्याप्रमाणे पानटपरी टाकण्यासारखे) असे गोंद्या सगुणाला सांगतो. सगुणा त्यास विरोध करते.
प्रयत्नवाद विरुद्ध दैववाद, आस्तिकता विरुद्ध नास्तिकता, बुद्धिवाद किद्ध श्रद्धावाद अशा प्रश्नांच्या मुळांशी जाऊन भिडणारे हे नाटक आहे. नाटकाचा हेतू सुधारणावादी मतांनी प्रेक्षकांना विचारप्रवृत्त करणे हा आहे. ‘देव’ या संकल्पनेबाबत शंका घेता यावी एवढे काम हे नाटक करते. भास्करच्या निरुत्तरतेत व निर्मलेने मांडलेल्या बाजूमध्ये आस्तिकांचा विजय दडलेला आहे. तर भास्करच्या आग्रही प्रतिपादनात नास्तिकांचा विजय दडलेला आहे व आस्तिकांना विचार करायला लावले आहे. नाटकातील मनूच्या ‘अनाथाश्रमातून एवढी मुले असताना मलाच का निवडले?’, ‘मीच या सर्व परिस्थितीचा बळी का? या प्रश्नांना भास्कर निरुत्तर होताना दाखवला आहे. या प्रकारच्या प्रश्नांना शंतनुराव किर्लोस्करांनी एका मुलाखतीत असे उत्तर दिले आहे की एकाला ठेच लागते तर दुसर्यारला का लागत नाही? या प्रश्नाचे जे उत्तर आहे तेच वरील प्रश्नाचे उत्तर आहे.महाराष्ट्रातील अनेक संतांनी अप्रत्यक्षपणे देव या संकल्पनेवर हल्ला चढवला.चार्ककापासून, बुद्ध, महावीर ते आगरकर या सर्वांनी या संकल्पनेस नाकारले. उपनिषदातील काही दर्शनांनी देखील नास्तिकता मानली. महात्मा फुल्यांनी जरी ‘निर्मिक मानला तरी त्या अनुषंगाने येणार्यान कर्मकांडावर हल्ला चढवला. गाडगेबाबांनी तर, ‘देव कसा असेल, देव कसा दिसेल, देवाला कधी पाहू शकेन अशा कल्पना ज्यांच्या डोक्यात असतात ते भ्रमिष्ट असे सांगितले ‘देवाला पैसे टाकणे बंद करा. नवसाला जो देव पावतो तो देव नसून चोर आहे असे सांगितले. गणपती, सत्यनारायण यांवरही आपल्या कीर्तनांतून प्रहार केले. अशी सगळी प्रबोधनाची परंपरा असताना देखील बहुसंख्य लोकांच्या मनातून ‘देव’ ही संकल्पना का जात नाही?याचे कारण संस्कार! लहानपणापासून घरातूनच याची सुरुवात होते. आजूबाजूचा समाजही तसे वागत असतो. त्यात गल्लोगल्ली देवळांची भर. शिक्षण, पाठ्यपुस्तके यांच्यातूनही मुलांवर सतत देव या संकल्पनेचा मारा. समाजातील मान्यवर. तथाकथित विचारवंत, राजकारणी, कलाकार यांचे आचरण देव या कल्पनेशी सुसंगत. पुन्हा त्यांचे विचार वृत्तपत्रे, नियतकालिके यांतून झळकणार. घरात, सरकारी कार्यालयात,कारखान्यात महागडी वस्तू आणल्याबरोबर लोक त्याची पूजा केल्याशिवाय वापरात आणीत । नाहीत. देवळांच्या समोरील रांगा दिवसेंदिवस वाढत आहेत. देवळेही वाढत आहोत. काश्मीरमधील अमरनाथ येथील शिवलिंग, वैष्णोदेवी, तिरुपतीचा बालाजी, पंढरपूरचा विठ्ठल, शिर्डीचा साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, पुरीचा जगन्नाथ, मुंबईचा सिद्धिविनायक, पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती यांची प्रसिद्धी नाटकातील गोंद्याच्या मठाप्रमाणे हितसंबंधीयांनी वाढवलेली. दूरदर्शनवरून जगन्नाथाच्या रथाची मिरवणूक दिवसभर ‘Live’ दाखवली जाते. विठोबाची पूजा सरकार करते. असा सगळा चोहोबाजूंकडून आस्तिकतेचा मारा लोकांवर होत असतो. चौकट मोडू पाहणारे अशा विचारांचे नाटकवालेसुद्धा पडद्याला हार घालून किंवा नारळ फोडून नाटकाची सुरुवात करतात. त्यामुळे देव ही संकल्पना लोकांच्या मनामध्ये किती खोलवर रुजलेली आहे याची कल्पना येते. या प्रकारच्या विचारांच्या माध्यामुळे मनाला देव मानण्याची सवय लागते, वेगळा विचार करण्याची सवय राहात नाही. कुठे देव या संकल्पनेच्या विरुद्ध क्षीण – आवाज आला तरी आस्तिक मन तो विचार झटकून टाकते. प्रयत्नपूर्वक मनाला लागलेल्या सवयीला मोडणे ही तशी अवघड परंतु कष्टसाध्य गोष्ट आहे. सखोल चिंतन-मनन व चर्चा करून आत्मशोध घेईल तो बदलेल. अर्थात यामध्ये नास्तिक विचारांचे मित्र भेटले, पुस्तके वाचली, विचार कानावर पडले तर ही क्रिया लवकर व सुकर होईल. देव या संकल्पनेतून बाहेर पडायला मोठ्या प्रमाणात अशा विचारांची उधळण किंवा क्रांतीच होणे आवश्यक आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.