मानवी मनोव्यापार

जीवसृष्टीत मानवजात सर्वाधिक बुद्धिमान असून त्यामुळे मानवाने पृथ्वीतलावर अतिशय प्रगत अशी संस्कृती निर्माण केली आहे, आणि केवळ पृथ्वीच्या पाठीवरीलच नव्हे तर अनंत अपार विश्वातील सर्व शक्तींवर नियंत्रण ठेवण्याची मानवाची धडपड सातत्याने चालूच आहे. मानवाला हे यश लाभले आहे ते सर्वस्वी त्याच्या बुद्धिमत्तेमुळे, त्याच्या मानसिक कर्तृत्वामुळे.

माणसाचे मन हृदयात असते या ॲरिस्टॉटलच्या कल्पनेप्रमाणेच मनाचे अधिप्ठान डोक्यात आहे यावर प्लेटोचा ठाम विश्वास होता. सतराव्या शतकातील फ्रेंच तत्त्वज्ञ डेस्क। यास माणसाचे मन डोक्यात असते हे पटले होते; परंतु हे मन कोणत्याही भौतिक अवयवाशी संबंधित नसून, मन ही एक अमूर्त शक्ती आहे असे त्याचे मत होते. परंतु गेल्या सुमारे १०० वर्षांत मेंदूचा व मानवी मनोव्यापाराचा प्रचंड अभ्यास झाल्यामुळे आता मानवाचे सर्व मनोव्यापार अर्थात आत्मज्ञान अथवा आत्मजागृती (consciousness), आकलनशक्ती, स्मरणशक्ती, विचारशक्ती, भावना हे सर्व मेंदू व मेंदूशी संलग्न असणार्‍या) मज्जासंस्थेवरच आधारित आहेत याबद्दल किमानपक्षी वैज्ञानिकांचे तरी एकमत आहे.

मानवाच्या मनोविकारांविषयीचे ज्ञानही गेल्या शतकापासून हळूहळू विकसित होत गेले. सिग्मंड फ्रॉइडचे मनोविश्लेषणाचे तंत्रही गेल्या शतकाच्या अखेरी उदयास आले. त्याचबरोबर माणसाचे विविध मानसिक व्यापार मेंदूच्या कोणत्या भागात घडतात अथवा कोणत्या भागाशी संबंधित असतात याविषयीचा अभ्यासही गेल्या शेपन्नास वर्षांतीलच आहे. पृष्ठवंशीय जीवांमध्ये प्रारंभी मेंदू व मज्जासंस्था खूपच अविकसित होती. उदाहरणार्थ बेडकामधील मेंदू. जैविक उत्क्रांतीमुळे मेंदू अधिकाधिक फुलत गेला, मोठा होत गेला, तसतसे मेंदूतील मज्जापेशींची संख्या व मज्जातंतूचे जाळे अधिक गुंतागुंतीचे होत गेले. मेंदूमध्ये नवे भाग विकास पावले व मज्जापेशींचे असंख्य गट (nuclei) तयार झाले. असे गट विवक्षित कार्याशी निगडित झाले. अविकसित प्राण्यांच्या मेंदूसारख्या मानवाच्या मेंदूतील भागांना प्राचीन मेंदू (old brain) व अत्युत्क्रांत जीवातील नव्याने फुललेल्या भागांना नवीन मेंदू (neo-cortex) अशा संज्ञा मिळाल्या. प्राचीन मेंदूत आधारभूत (basic) मनोव्यापार होतात व नव्या मेंदूत अधिक प्रगल्भ मनोव्यापार होतात हेही सर्वमान्य झाले. हे ज्ञान उंदीर, मांजर व माकड या प्राण्यावर प्रयोग करून मिळाले. मानवी मेंदूतील मज्जापेशींचा अभ्यास गेल्या शतकातील जर्मनीच्या गोल्गी व स्पेनमधील रामॉन कयाल यांनी मेंदूच्या पातळ कापांना चांदी, सोने, ऑस्मियम इत्यादी जडधातूंच्या क्षारांनी रंगवण्याच्या तंत्राचा विकास केल्यामुळे झाला. मानवी मेंदूत सुमारे चार-पाचशे कोटी मज्जापेशी असून त्यांपैकी अल्पसंख्येतच पेशी उपयोगात येतात हेही वैज्ञानिकांच्या ध्यानात आले. मज्जापेशी ही। अविभाजनीय पेशी असून, एका मज्जापेशीपासून विभाजनाद्वारे नव्या पेशी उत्पन्न होत नाहीत व या पेशी थोडाही दाब सहन करू शकत नाहीत, तसेच प्राणवायूशिवाय काही मिनिटेचे जिवंत राहतात. मृत अथवा घायाळ मज्जापेशी पुनर्जीवित (repair) होऊ शकत नाहीत हेही पूर्वीच समजले होते.

गेल्या ५-१० वर्षांत इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व प्रगतीमुळे मेंदूचा व मेंदूत घडणार्या५ घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी “मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI)” व “पॉइस्ट्रॉन इमिशन टोमोग्राफी (PET)” ही नवीन तंत्रे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे एखाद्या जिवंत व्यक्तीच्या मेंदूत काय घडामोडी आणि कोठे घडतात हे तपासणे शक्य झाले आहे. या नव्या तंत्रामुळे आता संवेदनांचे आकलन, विचार, भावना, स्मृती हे मनोव्यवहार मानवी मेंदूच्या नेमक्या कोणत्या भागात घडतात हे समजू लागले आहे. अध्यात्माला आधारभूत अशी आत्मा नावाची कोणतीही वस्तू मानवी शरीरात नाही हे सिद्ध करण्यास आता आधुनिक विज्ञान सज्ज झाले आहे!

आतापर्यंत झालेल्या संशोधनावरून बुद्धी, स्मरणशक्ती आणि भावना (emotions) या तीन गोष्टींवर माणसाचा विवेक (rational thought) अवलंबून असतो आणि या गोष्टी मेंदूतील हिप्पोकॅम्पस व ॲमण्डेला या भागांतील मज्जापेशी व मज्जातंतूच्या कार्याशी । निगडित आहेत. शब्द, भाषा व त्यामुळे निर्माण होणारे मानसिक चित्र हेसुद्धा मेंदूच्या विशिष्ट भागांवर अवलंबून असते हे आयोवा विद्यापीठातील डॉ. ॲन्टोनियो व डॉ. हॅन्ना : डैमासियो या पतिपत्नींनी दाखवून दिले आहे. आत्मज्ञान अथवा आत्मजागृती (consciousness) हा मनोधर्म मात्र मेंदूतील कोणत्याही विशिष्ट भागाशी संबंधित असल्याचा पुरावा आजतागायत कोणाही वैज्ञानिकास मिळालेला नाही. साक इन्स्टिट्यूटचे डॉ. फ्रान्सिस क्रिक (DNA fame) आणि कॅलटेक इन्स्टिट्यूटचे डॉ. ख्रिस्ट कॉख यांनी मात्र आत्मज्ञान अथवा आत्मजागृती मेंदूच्या विविध भागांत एकाच वेळी उत्पन्न होणार्या. विद्युल्लहरींच्या समन्वयामुळे होते असे वाटते. परंतु हा सिद्धान्त “रानात भरकटलेला” आहे हेही या वैज्ञानिकांनी कबूल केले आहे. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या डॉ. रुडाल्फो लिनास यांना मात्र या सिद्धान्तात बरेच तथ्य वाटते. व्यक्तींना बाह्य वातावरणातून मिळणाच्या प्रकाश, ध्वनी आदी संवेदनांमुळे मेंदूतील विविध भागांत विद्युल्लहरी उत्पन्न होतात व त्यामुळे व्यक्तीला वातावरणातील त्याच्या स्थानाचे, अस्तित्वाचे ज्ञान होते. हीच आत्मजागृती होय असे डॉ. लिनास म्हणतात. मेंदूच काम करणार नाही तर व्यक्तीला आत्मज्ञान अथवा आत्मजागृती होणार नाही हाच सर्वपरिचित सिद्धान्त मॅग्नेटोएनसेफेलोग्राफीच्या नव्या बाटलीत भरून त्यांनी सादर केला आहे!
या सगळ्या संशोधनाचे उपफलित म्हणजे स्त्रिया व पुरुष यांच्यामनोव्यापाराविषयी उपलब्ध झालेले ज्ञान. स्त्रियांचा स्वभाव पुरुषांपेक्षा वेगळा असतो व स्त्रियांच्या बुद्धीचे कार्यक्षेत्रही पुरुषांपेक्षा थोडे कमी असते असे पुरुष पूर्वापार म्हणत आलेआहेत. स्त्रियांचा स्वभाव पुरुषांहून अधिक भावनाप्रधान असतो व त्या अधिक ‘बोलभांड (better communicators) असतात हे खरे आहे. स्त्रियांच्या मेंदूचे सरासरी वजन पुरुषांच्या मेंदूच्या सरासरी वजनाहून कमी असले तरी स्त्रियांच्या मेंदूतील मज्जापेशींची संख्या पुरुषाहून सामान्यपणे ११% अधिक असते असे कॅनडातील मॅकमास्टर विद्यापीठातील डॉ. सान्ड्रा विटेलसन यांनी दाखवून दिले आहे! या जास्तीच्या पेशी स्त्रियांच्या मेंदूच्या कानशिलाजवळील भागात (Broca’s area) एकवटलेल्या असतात. त्यामुळे स्त्रियांच्या मेंदूचा हा भाग पुरुषांच्यापेक्षा थोडा मोठा असतो. मेंदूचा हा भाग शब्दांच्याआणि स्वरांच्या आकलनाशी निगडित असतो. प्रत्येक मेंदूचे डावा गोलार्ध आणि उजवा गोलार्ध असे दोन भाग पडतात आणि या गोलार्धांना जोडणारा मज्जातंतूचा सेतु असतो त्यास कॉर्पस् कैलोसम् असे म्हणतात. स्त्रियांच्या मेंदूत हा कॉर्पस् कॅलोसम् नामक सेतु पुरुषापेक्षा अधिक जाड असून त्यात अधिक मज्जारज्जु असल्याचेही डॉ. सॉन्ड्रा विटेलसन् यांना आढळले. शब्दांचे आकलन, स्वरांचे ध्वनी व त्यास प्रतिसाद देण्यासाठी या Broca’s area चा वापर होतो हे तर खरेच, परंतु पुरुष या कामासाठी आपल्या मेंदूच्या फक्त डाव्या गोलार्धातील भागाचा उपयोग करतात याउलट स्त्रिया शब्द भाषा, स्वर यासंबंधी मनोव्यवहार करताना डाव्या गोलार्धासोबत उजव्या गोलार्धातील Broca’sarea चा उपयोग करतात असे येल विद्यापीठातील डॉ. सॅली व बेनेट शाविट्झ या संशोधक जोडप्याने मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग तंत्राचा वापर करून दाखवून दिले आहे! यामुळे स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक चांगल्या बोलक्या (communicator) असतात असा त्यांचा विचार आहे. याउलट पुरुषांना अवकाशात वस्तूंच्या मांडणीचे (orientation in space) आकलन स्त्रियांपेक्षा अधिक चांगले होते व गणित व विज्ञानातील अमूर्त (abstract) कल्पनांची पुरुषांना अधिक चांगली समज असते असेही निदर्शनाला आले आहे.

पेनसिल्व्हानिया विद्यापीठातील डॉ. रुबेन गर यांना स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मेंदूतील “लिबिक सिस्टिम’च्या कार्यप्रणालीत फरक दिसून आला आहे. मेंदूच्या या भागातील मज्जापेशी भावनांना वाट फोडण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असतात. पुरुष आपल्या भावनांचे प्रदर्शन काहीतरी निश्चित स्वरूपाच्या शारीरिक कृतीद्वारा करतो. त्यामानाने स्त्रियांच्या भावनांचा उद्रेक माफक प्रमाणात आणि बराचसा सांकेतिक स्वरूपाचा असतो. हा फरक समजून सांगताना डॉ. गर यांनी सायन्स” या प्रसिद्ध अमेरिकन साप्ताहिकात एक उदाहरण दिले आहे. कुत्रा चिडला म्हणजे अंगावर झेप घालून कडकडून चावा घेतो,” ही झाली पुरुषी मेंदूची प्रतिक्रिया. परंतु “कुत्रा कितीही चिडला तरी तो नुसता गुरगुरतो आणि दांत दाखवितों” ही झाली स्त्रियांच्या मेंदूची प्रतिक्रिया!

एकूण या आधुनिक वैज्ञानिक संशोधनामुळे मानवाच्या मनोव्यापाराचा गुंतासोडविण्याच्या अथवा समजण्याच्या दिशेने बरीच मजल मारली गेली आहे. स्त्री-पुरुष समानता ही काळ्या दगडांवरील रेघ मानणार्या मंडळींना मात्र हे संशोधन काहीसे अस्वस्थ करील की काय असेही वाटते! परंतु या क्षेत्रातील सर्व संशोधकांचे एका निष्कर्षावर मात्र एकमत आहे, तो म्हणजे हे सर्व ज्ञान अगदीच कोवळे आहे. त्याचे सामाजिक अन्वयार्थ लावण्याची कोणी घाई करू नये!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.