‘स्त्रीमुक्ती चे सुस्पष्ट चित्र हवे!

‘चतुरंग पुरवणीतील मीना देवल यांचा ‘स्त्रीमुक्ती : मिथक आणि वास्तव हा लेख वाचनात आला. ‘स्त्रीमुक्तीसंबंधी कार्य करणार्या’ अनेक संघटना सध्या सक्रिय आहेत. या संकल्पनेवरील लेख, भाषणे, परिसंवाद आदींतून उलटसुलट विचार मांडले जात आहेत. देवल यांच्या लेखात कार्यकर्त्यांना स्त्रीमुक्तीची चळवळ समाजापर्यंत पोहोचवता आली नाही, तसेच स्त्रीवादी भूमिका समाज तसेच स्त्रिया स्वीकारावयास तयार नाहीत, ही खंत दिसून येते. लिंगभेदविरहित समाजव्यवस्था अस्तित्वात आली तरच हे दुष्टचक्र संपेल, असे आशावादी चित्र त्यांनी रेखाटले आहे.
तेव्हा त्याच दृष्टीने हे विचार मांडत आहे. स्त्रीला एक उपभोगाची वस्तू समजले जाऊ नये किंवा तसा तिचा वापर होऊ नये, कोणत्याही क्षेत्रात तिच्या गुणवत्तेवर तिला प्रवेश असावा, स्त्री म्हणून मज्जाव, आडकाठी असू नये, तिला अमानवी वागणूक मिळू नये, समान हक्क, मतस्वातंत्र्य असावे याबद्दल दुमत असायचे काहीच कारण नाही. फक्त ही स्थिती आणण्याकरिता स्त्री-पुरुष, कुटुंब व समाजात काय काय परिवर्तन व्हायला हवे व ही स्थिती गाठण्याचा यशस्वी मार्ग कोणता, हाच खरा महत्त्वाचा मुद्दा आहे.
लिंगभेदविरहित समाजरचनेचा विचार करताना हा भेद केवळ शरीरापर्यंतच सीमित आहे की शारीरिक फरकाबरोबर मानसिक, भावनिक आणि वैचारिकतेशीही त्याचा काही संबंध आहे, याचा पुनर्विचार व्हायला हवा. मूल जन्माला घालण्यापूर्वी स्त्रीच्या घडणीत निसर्गतः काही बदल होतात का? जन्मणाच्या मुलाबद्दल तिच्यात उपजत वात्सल्यमाया, अपत्यप्रेम हे भाव असतात का? गर्भातील नऊ महिने व मूल जन्मल्यावरची २-३ वर्षे आई व मुलात निव्र्याज प्रेम, ओढ असते का? ही प्रक्रिया नैसर्गिक असून स्त्री – पुरुषांच्या मानसिक घडणीतच मूलतः फरक आहे, असे सिद्ध झाले तरी निसर्गाशी झगडा करण्यात शक्ती व वेळ घालवण्यापेक्षा पूरक संस्कारांनी त्यांना घडविणे योग्य होईल. स्वभावानुरूप कार्यक्षेत्र-निवडीचा अधिकार व स्वातंत्र्य सर्वांनाच आहे. अपवादात्मक, अनैसर्गिक परिस्थिती सोडली तर हे वात्सल्य, हे मातृत्व स्वीकारण्यात स्त्रीला आनंद आहे का? मातृत्वाच्या अभावातून ती दुःखी होते का? याचे संशोधन व्हायला हवे. पाच किंवा दहा टक्के ‘करिअरिस्ट स्त्रियांकरिता ऐंशी टक्के स्त्रियांची फरपट कशाला? दहा टक्के निश्चित मत नसणाच्या स्त्रिया आपण सोडून देऊ. कामात, करीअर’मध्ये मन गुंतले असताना घराचा वा मुलांचा पाश तिच्या मनाची अस्वस्थता वाढवतो, तिची ओढाताण होते. हा काय केवळ संस्कारांचाच परिणाम आहे? नैसर्गिक घडणीचा, वृत्तीचा त्यात काही संबंध नसतो?
संस्कारांद्वारा आपण जो व्यक्तीचा विकास करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या भावना ‘फुलवतो, पोषक बनवतो त्यात निसर्गाशी भांडण्यापेक्षा जुळवून घेण्याकडे आपला कल असतो. तसे पोषक वातावरण, शिक्षण, परिस्थिती आपण निर्माण करतो की ज्यामुळे सुसंवाद साधला जावा! स्त्रीच्या निसर्गदत्त भूमिकेला पूरक असाच तिचा विकास साधला जातो. निदान साधला जायला हवा. पुराणकाळापासून आतापर्यंत आपण इतिहासात डोकावून पाहिले तरी हेच असणे अपेक्षित आहे.
१. लोकसत्ता दैनिक
रशियात स्त्रीने मुलाला जन्म दिल्यानंतर थोड्यात काळात तिची व मुलाची फारकत केली जात असे व सरकारच मुलाच्या पालनपोषणाची, शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत असे. परिणामतः तिथे कुटुंब ही संकल्पना मोडीत निघाली. या सर्वांचा झालेला दुष्परिणाम निस्तरण्यासाठी स्त्रीच्या भूमिकेबद्दल तिथे पुनर्विचार करावा लागला.
सध्या अमेरिकेत योनिशुचितेचे, मानसिक, शारीरिक, शीलरक्षणाचे, व संस्कारांचे जोखड तरुण पिढीवर नाही. दोघांनाही पूर्ण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तिथे कौटुंबिक, सामाजिक व व्यक्तिगत पातळीवर काय स्थिती आहे? सुखी समाधानी व निर्भय समाजनिर्मिती तिथे झाली आहे का? तिथे लहान मुलांची, भावी पिढीची काय अवस्था आहे? वासना-तृप्तीचे वय संपल्यावर व्यक्तिगत व सामाजिकदृष्ट्या आरोग्य व मानसिक स्थिती काय आहे?
तिथे अत्याचारातून, पुरुषी वासनेच्या विळख्यातून, अतिरेकातून, मारहाणीतून स्त्री स्वतःला सुरक्षित ठेवू शकते आहे का? वाचवू शकते आहे का? या विषयावरील वैश्विक सभा-संमेलनांतून स्त्रीचे काय चित्र समोर येते आहे? जे चित्र समोर येत आहे ते फारच भयावह आहे.
या सर्व वर्णनातून इथल्या स्त्रीच्या परिस्थितीचे समर्थन मला करावयाचे नाही किंवा हे असेच चालणार, अशी मनाची समजूत घालून स्वस्थ बसण्याचा सल्लाही द्यायचा नाही.
परंतु लिंगभेदविरहित समाजरचनेत प्रत्यक्षात सामाजिक, व्यक्तिगत किंवा कौटुंबिक स्थिती काय असेल याचे सुस्पष्ट चित्र स्त्रीमुक्तिवाद्यांनी किंवा स्वतःला ‘स्त्रीवादी म्हणवून घेणारांनी दिले पाहिजे. त्यावेळी कुटुंब ही कल्पना असेल किंवा नाही? असली तरी कोणत्या स्वरूपात?
काही वेगळे, विशेष करून दाखवण्याची ऊर्मी असणार्या?, मानसिक धैर्य, हिंमत व या वाटचालीला आवश्यक चिकाटी व आत्मविश्वास असणार्या स्त्रियांचे प्रमाण आज किती आहे? (हे प्रमाण वाढू शकेल, हे गृहीत धरूनही!) या स्त्रियांना घराबाहेर पडल्यावर अपमान, हीनत्व, हांजी हांजी सहन करून, अत्याचार (सर्व प्रकारचे) होऊ नयेत म्हणून कमी संघर्ष करावा लागतो का? चारित्र्यसंपन्न वागण्यानेच माणसे मानाचे जिणे जगू शकतात. चारित्र्यहीन व्यक्तीला खर्यात अर्थी कधीच मान नसतो.
मनुष्यमात्रांत संस्काराने, वातावरणनिर्मितीने, निसर्गदत्त स्वभावाशी सख्य करूनआपण अपेक्षित निर्मिती करू शकतो. परिस्थिती बदलू शकतो. हा सामाजिक बदल ही क्रांती नसून उत्क्रांती आहे. समाजात काही कुप्रथा, चालीरीती, रूढी, कल्पना या शिरत असतातच. त्यांचा वेळेवर निचरा झाला नाही तर अपायकारक रूढी ठाण मांडून बसतात. शरीरात जसे अनेक रोग शिरतात व वेळीच उपाय न केल्यास माणसाला बेजार करून मृत्यूच्या दारात नेऊन ठेवतात तसेच व्यक्ती, कुटुंब व समाजात शिरलेले अनेक कुविचार, कुरीती या त्यांच्याशी झगडून प्रयत्नपूर्वक, दूरदृष्टी ठेवून घालवायच्या असतात.
परस्परांना समजून घेऊन, दुसर्याकच्या सुखाकरिता स्वतः त्याग करून सुखाने नांदणारे- मग ते कुटुंब २५ जणांचे असो की ५ – ६ जणांचे असो-शेजार्याापाजार्यां ना सामावून घेणारे, सुखाने नांदणारे कुटुंब ही आपल्या समाजाने गाठलेली एक आदर्श अवस्था आहे. कालमानाप्रमाणे त्याला पूरक किंवा नवीन कल्पनांची त्यात भर घालावी लागेल. कोणतेही काम श्रेष्ठ वा कनिष्ठ नाही, स्त्री-पुरुष असा वागणुकीत भेद नाही, ज्या व्यक्तीचा जसा मगदूर असेल त्याप्रमाणे कुठल्याही क्षेत्रात उच्च स्थान गाठण्याचे स्वातंत्र्य मिळेल, सर्वजण सुखदुःख समान अनुभवतील हेच कुटुंब-संस्थेकडून अपेक्षित आहे. कुटुंब हे समाजव्यवस्थेला पूरकच असायला हवे. समाजाची घडी नासवणारे व्यक्तिस्वातंत्र्य असू नये. दुसर्याकचा गळा दाबून, त्याला नष्ट करून सुखाच्या, महत्त्वाकांक्षेच्या पायर्यां कुणी चढायला लागला तर त्याला शिक्षा करण्याचे सामर्थ्य हवे. आणि असा व्यक्तीचा, कुटुंबाचा वा समाजाचा वचक असू शकतो, हे कुणीही मान्य करील.
स्त्रीला मुक्त, सुखी, निर्भय व स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार मिळवून देणे हे प्रत्येकाचे जसे कर्तव्य आहे तसेच स्त्रीनेसुद्धा भीक न मागता स्वतःच आचरणाने, कृतीने व प्रयत्नाने ते मिळवणे आवश्यक आहे. पण हे सर्व करीत असताना कायदा, समाज-मानस, वातावरण बदलावे लागेल. कुटुंबसंस्था, विवाहसंस्था अशासारख्या उपयुक्त संस्था मोडीत काढून हे साध्य होणार नाही. आवश्यक तो बदल, फेरफार त्यात करावा लागेल. कालमानानुसार फरक आपण करू शकतो व आजवर करीतही आलेलो आहोत.
समाजात आपल्याला काय परिवर्तन करायचे आहे, काय घडवायचे आहे याची सुस्पष्ट कल्पना स्त्रीला असावयास हवी. त्याकरिता अनैसर्गिक मार्गाचा अवलंब न करता मनुष्यस्वभावाला, प्रवृत्तौला, विकाराला वळण लावून उदात्तीकरण करूनच हे साधेल. सर्वच बाबतीत प्रवाहाविरुद्ध धावण्यापेक्षा प्रवाहाला बदलणे, वेगळे वळण देणे, आवश्यक तेथे फेरफार करणे जरूरीचे आहे. कालावधीचा विचार न करता परिणांमाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.