बंडखोर पंडिता (भाग ४)

आगरकरांनीही अखेर पाठिंबा काढून घेतला ही गोष्ट रमाबाईंना लागली असणार. ज्या समाजात मोठमोठ्या धुरंधर नेत्यांबरोबर त्यांची उठबस होती, ज्योतिबा फुल्यांसारख्या बहुजनसमाजातल्या सुधारक कार्यकत्र्यापासून तो केरूनाना छत्र्यांसारख्या ज्योतिर्विद पंडितापर्यंत सर्वांच्या कौतुकादराचा विषय त्या झालेल्या होत्या, त्या समाजापासून त्या तुटत जाऊन एखाद्या मठस्थ जोगिणीचे जिणे त्यांच्या वाट्याला आले. तेही त्यांनी शांतपणे पत्करले.
यानंतर १८९६ सालची गोष्ट. आता शारदासदनात ख्रिस्ती झालेल्या १५ मुली उरल्या होत्या. त्यांच्या पालक अर्थातच रमाबाई होत्या. या १५ धर्मकन्यकांना घेऊन एका प्रार्थनाशिबिरासाठी त्या लोणावळ्याला गेलेल्या होत्या. तिथे त्यांनी अत्यंत मनोभावे देवापाशी प्रार्थना चालविली की, ‘देवा! येत्या वर्षभरात या पंधरांची पंधरापट कर!’ आणि देवाने अकल्पितपणे ती पुरी केली असे त्यांना दिसून आले. १८९७ मध्ये मध्यप्रदेशात भीषण दुष्काळ पडला. तशी रमाबाईंना पवित्र आत्म्याकडून प्रेरणा आली. हा दुष्काळ देवाने धाडला आहे. जा त्यांना हात दे! त्यांनी तातडीने जबलपूर गाठले. रिलीफ कॅम्पांना भेटी दिल्या. घासभर अन्नासाठी येणार्याद-जाणाच्याकडे आशाळभूत नजरा लावून बसलेले ते दुर्दैवी जीव वाचवण्यासाठी कोणाबरोबर कुठेही यायला तयार होते. रमाबाईंनी ६०० जणींना आपल्यासोबत आणले. हाताशी पैसा नसताना अज्ञात स्थळाहून मदत आली. पुण्याला येताच ३०० बायकामुलांना त्यांनी ठेवून घेऊन केडगावला पाठविले. अध्र्यांची सोय दुसरीकडे लावली. पुण्याला प्लेगचा कहर होता. म्हणून केडगावी रवानगी करावी लागली.
देवाने आपले मागणे पुरवले असे रमाबाईंना वाटले तरी, डॉ. भांडारकरांना मात्र यात निर्दयता दिसली.
केडगाव पुण्यापासून ३५ मैलांवर सोलापूर मार्गावर एक लहानसे स्टेशन आहे. स्टेशनपासून जवळ, स्वस्तात मिळते म्हणून घेऊन ठेवलेली बरड १०० एकर जमीन नुसतीच पडली होती. तिची त्यांना यावेळी आठवण आली. तेथे तात्पुरत्या तंबू-राहुट्या उभारून ३०० दुष्काळपीडितांची सोय त्यांनी लावली. हळूहळू याच वसाहतीचे मुक्तिमिशन झाले. पुढील वर्षी अमेरिकन मदतीची मुदत संपणार होती म्हणून १८९८ मध्येच रमाबाईंनी अमेरिकेचा दुसरा दौरा केला. तेथील दात्यांना त्यांना झाडाझडती द्यायची होती. त्या म्हणाल्या, ‘तुम्ही दिलेल्या ९५ हजार डॉलर्सपैकी ५० हजार इमारतींच्या रूपात आणि १० हजार शेती -फळबागांच्या रूपाने सुरक्षित आहेत. याशिवाय कित्येक निराधार स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहाण्याचे शिक्षण देण्यात आले आहे. हे इतिवृत्त अमेरिकन साह्यकत्र्यांना सुखविणारे होते. त्यांनी आता नवी व्यवस्था केली. जुने रमाबाई असोसिएशन बरखास्त करून नवे अमेरिकन रमाबाई असोसिएशन स्थापण्यात आले. शारदासदन इतःपर पूर्णपणे रमाबाईंच्या मनाप्रमाणे एक ख्रिस्तीधर्मसंस्था म्हणून चालावे असे ठरले. ही कामगिरी
आटोपून मायदेशी परतल्यावर रमाबाईंनी २४ सप्टेंबर १८९८ रोजी केडगावी मुक्तिमिशनचे उद्घाटन केले.
इ.स. १९०० मध्ये पुन्हा गुजरातेत दुष्काळ आला. एव्हाना रमाबाईंचे नाव ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड अशा दूरदेशीच्या ख्रिस्ती धर्मबांधवांपर्यंत पोचले होते. आता त्यांची हाक जाताच मदतीचा ओघ सुरू झाला. दुष्काळातील पहिला अनुभव पाठीशी होताच. अनुभवाने तयार झालेल्या कार्यकर्त्याही होत्या. या दुष्काळात रमाबाईंनी गुजरातेतून १३०० च्या वर बायकामुले शरणार्थी म्हणून आणली. केडगावचे मुक्तिमिशन निर्वासितांची एक वसाहत बनली आणि थोड्यात दिवसांत रमाबाईंच्या नेतृत्वगुणांनी ही वसाहत स्वयंपूर्ण
आदर्श महिलाश्रम या स्वरूपात विख्यात झाली.
माळरानावर डोळ्याला पाणी दिसणार नाही हा ग्रामस्थांचा आजवरचा अनुभव होता. तो रमाबाईंनी खोटा ठरवला. त्यांनी एकामागोमाग एक १२ विहिरी खणल्या. सर्वांना पाणी लागले. एका अज्ञात विदेशी धर्मभगिनीच्या देणगीतून विजेचा जनरेटर आला. पाणी सर्वदूर खेळवण्यात आले. असाध्य ते सर्व साध्य होत होते. मात्र हे आपल्या प्रयासांनी नाही तर प्रार्थनेच्या बळाने अशी रमाबाईंची खात्री झाली. मूळचा प्रार्थनेच्या शक्तीवरचा विश्वास दृढावला.
मिशनमध्ये रमाबाईंनी नाना उद्योग आणले. छापखाना घातला. मुक्ति-प्रेअर बेल ही पत्रिका सुरू केली. छापखान्याची सर्व कामे मुलीच करीत. हातमाग सुरू केले. शेती, भाजीपाला पिकवू लागल्या. बुरूडकाम, विणकाम, धोबीकाम असे नाना उद्योग निघाले. घाणीवर तेल काढणे, टोप्या-बटणे करणे, लेसेस-नाड्या विणणे, दोच्या वळणे, कल्हई करणे, भांड्यावर नांवे घालणे, एक ना दोन अशी दैनंदिन उपयोगाची जी जी कामे ती सर्व त्यांनी सुरू केली. सरकारी खात्यात मोठ्या प्रमाणावर लागणाच्या वस्तूंची मागणी आगाऊ नोंदवून त्या पुरविण्यासाठी उत्पादन मोठ्या शिस्तीत सुरू झाले. या सर्व उपक्रमांसाठी त्यांनी बाहेरून उत्तम पगार देऊन तरबेज माणसे बोलावली आणि आपल्याकडच्या हुशार मुलींनी त्यांच्या हाताखाली तयार करवून घेतल्यावर त्यांना रजा दिली. स्वयंपूर्णता अशी येत गेली.
‘पुरुषांशिवाय आपण सन्मानाने जगू शकतो असा आत्मविश्वास आला की, पुरुषांचे वर्चस्व आपोआप कमी होते असे रमाबाईंचे मत होते’.
आपल्या मिशनमधल्या मुलींना त्यांनी त्याचे प्रत्यंतर आणून दिले. रंजल्यागांजल्यांना जवळ करून त्यांना घराची ऊब दिली. त्यांच्यासाठी एक एक सदन उभे राहिले. वाकडे पाऊल पडलेल्या स्त्रियांशी हिंदुधर्म कोणताच दयेचा व्यवहार करत नाही. अशा पतितांसाठी कृपासदन केले. वृद्ध-अपंगांसाठी प्रीतिसदन, अनाथ लहानग्यांसाठी सदानंदसदन, आंधळ्यांसाठी बार्तमीसदन उभारले गले. त्यांची कन्या मनोरमा हिने अंधांसाठी शिक्षिकेचा अभ्यासक्रम शिकून घेतलेला होता. तिच्या नेतृत्वाखाली ब्रेललिपीद्वारे अंधांचे शिक्षण, स्वावलंबन सुरू झाले.
आपण देवाचे काम करीत आहोत या विचाराने रमाबाईंना शक्ती दिली. त्यामुळे ‘जीवन जगावेसे वाटते असा हुरूप त्यांच्या ठिकाणी बळावला. निराशेने त्यांना कधी ग्रासले नाही. संघर्षाचे प्रसंग आले. कौटुंबिक आले. मिशनच्या अंगीकृत कार्यात आले. त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते सोडवले. त्यातले दोन सांगण्यासारखे आहेत.
एक असा. मनोरमेचे शिक्षण-संगोपन सगळे तिला आपल्या देशभगिनींच्या सेवेसाठी तयार करायचे या दृष्टीने त्यांनी केले होते. पण तिला स्वतःला काय वाटते याची दखल त्यांना कधी घ्यावी वाटली असे दिसत नाही. मनोरमेने आपल्या आईची धर्ममाता सिस्टर जिराल्डीन यांना एका पत्रात लिहिले होते की, ….’Besides what is the good of a missionary who is unwilling to be a Missionary?’मनोरमा यावेळी १६ वर्षांची होती. चारचौघींसारखे आपणही लग्न करावे, संसार करावा असे तिला कधी वाटलेच नाही असेही नाही. किंबहुना तसे वाटल्याबद्दलच्या तर्काला श्यासुंदर आढाव दुजोरा देतात. विशीतल्या मनोरमेचे एका तरुणाशी संघटन वाढले होते. तिच्या जुन्या शिक्षिका मिस् सॅम्युअल यांचा हा भाऊ होता. त्याने तिला मागणी पण घातली होती. उभयतांची वाढतचाललेली जवळीक रमाबाईंच्या कानावर गेली असणार. त्यांनी मिस् सॅम्युअलना शाळेतून काढून टाकले. मनोरमेला पुण्याला जाण्याची बंदी केली आणि फक्त एका दिवसाची मुदत देऊन तिला फंड गोळा करण्याच्या नावाखाली एक वर्षासाठी आस्ट्रेलियाला रवाना केले. सॅम्युअल ज्यू होते, आणि ज्यूंशी लग्न करणे रमाबाईंना पसंत नव्हते. त्यामुळे केवळ पुण्याला जाण्याची बंदी घालणे त्यांना पुरेसे वाटले नाही.
१. लेटर्स अँड कॉरस्पॉडन्स, पृ. ४०९, २२ नोव्हें. १८९७ चे पत्र
दुसरी घटना आहे बायबलच्या मराठी अनुवादाची.
बायबल सोसायटीने पवित्र शास्त्र बायबलचा मराठी अनुवाद केलेला होता. रमाबाईंना तो पसंत नव्हता. त्यातला त्यांना खुपणारा मोठा दोष हा होता की ते भाषांतराचे भाषांतर होते. मूळ बायबल – जुना करार हिब्रूत आणि नवा करार ग्रीक भाषेत आहे. त्यांनी थेट मुळातून मराठीत भाषांतर करायचे ठरवले. त्यासाठी हिब्रू आणि ग्रीक भाषा त्यांनी आत्मसात् केल्या. स्वतः हिब्रू व्याकरण रचले, आणि मुळावरून आपले भाषांतर सिद्ध केले. संस्कृत शास्त्रग्रंथात टीका असतात तशी एकाखाली एक अशी चार इंग्रजी प्रातिनिधिक भाषांतरे देऊन नंतर त्यांनी आपले मराठी भाषांतर दिले. हे काम १८ वर्षे चालले होते. मृत्यूच्या आदल्या रात्री शेवटचे पूफ पाहून मगच त्यांनी अखेरचा श्वास सोडला.
आपले भाषांतर अस्सल मराठी वळणाचे आणि प्रासादिक व्हावे यासाठी बांईंनी रे. टिळकांची मदत मागितली. टिळकांना मुद्दाम केडगावी ठेवून घेतले. परंतु त्यांचे टिळकांशी जमले नाही. अनुवाद मूळाबरहुकूम व्हावा या पराकोटीच्या आग्रहापायी त्यांनी, ‘पुत्र’, ‘पश्मेश्वर’, ‘पश्चाताप’, ‘उत्पन्न’ असे संस्कृत शब्दही वर्ण्य ठरविले. कारण असे की या शब्दांचे मूळ व्युत्पत्ती -संदर्भानुसार होणारे अर्थ आपल्याला अमान्य आहेत. उदा. ‘पुत्र’ याचा अर्थ ‘पुम्’ नावाच्या नरकापासून तारतो तो, असा आहे. तो शब्द उच्चारला की हे सर्व मिथ्य डोळ्यापुढे उभे राहते. ते नको तर तो शब्दही नको. तुमच्यासारखे संस्कृत सामान्य वाचकाला कुठे येते हा रे. टिळकांचा सवाल आणि म्हणून तो शब्द राहू द्या’ हा आग्रह हे दोन्ही बाईंना मानवले नाहीत. शेवटी टिळक काम सोडून गेले.
रमाबाईंनी स्वतीने हे कार्य तडीस नेले. परिणामी बाईंचे बायबलओबडधोबड, दुर्बोध आणि बोजड मराठीत उतरले. मुळाबरहुकूम ते असेलही; पण ते कोणाला वाचवेल का आणि त्याला नीट कळेल का हे प्रश्न बाईंना पडले तरी नसावेत किंवा महत्त्वाचे तरी वाटले नसावेत.
रमाबांईच्या आयुष्यातले हे केडगावपर्व सर्वात मोठे, २२ वर्षांचे आहे. प्रिय कन्या मनोरमा हिच्या पाठोपाठ दहा महिन्यांत बाईंनी आपला देह ठेवला. (मनोरमा ४ जुलै १९२१, रमाबाई ५ एप्रिल १९२२).
धर्मातराने हिंदूंपासून त्या आधीच दुरावल्या होत्या. स्वतंत्र जीवनशैलीमुळे ख्रिश्चन पंथीयांनाही त्या आपल्या वाटल्या नाहीत. द्वारकानाथ गोविंद वैद्य लिहितात, ‘ख्रिस्ताची’ त्यांनी ४० वर्षे सेवा केली. आपल्याला मिळणाच्या आर्थिक मदतीतला वाटा त्या इतर चर्चना देऊन टाकत असत. असे असताना त्यांच्या मृत्यूनंतर मुंबईत ज्या दोन शोकसभा झाल्या त्यात मोठमोठी ख्रिस्ती मंडळी आम्हास दिसली नाहीत. हिंदुस्थानात ख्रिस्ताचा धर्म जिवंतरूपाने दिसत नाही येथे चर्चानिटी आहे.
२. तत्रैव – पृ. ३३८ – ३९
‘रमाबाई ख्रिस्ती झाल्या नसत्या तर’?हा कळीचा प्रश्न आहे. आगरकरांनी तो विचारला तेव्हा त्या उत्तरल्या, ‘मग शारदासदनच अस्तित्वात आले नसते.’ आगरकरांना वाटले, फार मोठ्या महाराष्ट्रीय समाजाला त्यांच्या कार्याचा लाभ मिळाला असता. पूर्वी स्त्रीधर्मनीतीच्या दिवसांत रमाबाईंना मोठी मान्यता होती. तशी शारदासदनाच्या काळीही मिळाली असती. समाजाच्या मतपरिवर्तनाला मोठी चालना मिळाली असती. इ.इ. हे खरे आहे. तसे होते तर आज फुले, कर्वे यांच्या बरोबरीने रमाबाईंचे नाव निघाले असते, हेही खरे. पण रमाबाईंच्या मनात प्राधान्य दुसर्यार गोष्टींना होते.
रमाबाई समाजकार्य करण्यासाठी ख्रिस्ती झाल्या नव्हत्याच. मग त्या कशासाठी ख्रिस्ती झाल्या?
उत्तर आहे- मुक्तीसाठी! स्वतःच्या तारणासाठी! बरे. त्यांनी मुलींच्या धर्मातराला तरी उत्तेजन का द्यावे? हेही उत्तर सोपे आहे. रमाबाईंनी जो धर्म कवटाळला त्याची शिकवणच अशी होती की, ‘माझा संदेश पसरव.’ शारदासदनातल्या मुलींना सद्धर्माबद्दल चौकशी करायला उद्युक्त करायचे, शुभवर्तमान सांगायचे हा त्यांचा निश्चय भारतात पाऊल ठेवण्यापूर्वीच झालेला होता. असे असता धार्मिक बाबतींत अलिप्तपणा त्यांच्या दृष्टीने आत्मवंचना ठरली असती. सदनातील मुली ‘खरा धर्म व मुक्ती यांविषयी चौकशी करू लागतील असाच दिनक्रम त्यांनी ठेवला होता. त्यांनी हे आपल्या साक्षीत निःसंदिग्धपणे सांगितले आहे की, ‘ख्रिस्ती माणसाच्या आयुष्यात ख्रिस्ताच्या प्रेमाविषयी व त्याने पातक्यांच्या उद्धारासाठी केलेल्या आत्मत्यागाविषयी इतरांना सांगण्यात जो आनंद असतो तो दुसर्यात कशातही नसतो.’ *धर्मातराचा बखेडा सुरू झाला तेव्हा (सदनातील) मुलींना जसे आपला धर्म पालन करण्याचे स्वातंत्र्य आहे तसे मलाही आहे, असा रमाबाईंचा युक्तिवाद होता. त्यातला आशय किती गहिरा आणि उभयपक्षांचे सामर्थ्य किती विषम होते हे कोणाच्याही चटकन लक्षात येईल.
‘देवाने आपल्याला सर्व काळचे जीवन दिले आहे, आणि ते जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे, ज्याला तो पुत्र आहे त्याला जीवन आहे. ज्याला तो पुत्र नाही त्याला जीवन नाही’, हे बायबलवचन त्यांचे श्रद्धास्थान होते. आणखी पहा. ‘उलटपक्षी, जर दुसर्याेमरणासाठी (अख्रिस्ती?) तुम्ही दोषी ठरला तर जगातील संपत्ती व मोठेपण काय कामाचे?कारण या दुसर्या, मरणाने सर्वकाळ अग्नीच्या सरोवरात अनिर्वाच्य असे क्लेश भोगत राहावे लागणार आणि यातून सुटका मुळीच होणार नाही.’ ६ ‘तारणाचा खरा आनंद…. शिवाय त्याना कधीही मिळणार नाही’ आणि ‘असले “महान तारण” देव मोबदल्यावाचून देत आहे. हिंदू धर्माप्रमाणे स्त्रीला स्त्री या नात्याने मोक्ष मिळणे शक्य नाही मात्र खिस्ती धर्माच्या रूपाने’ पुरुष व स्त्रियांना सारखेच हक्क देणारा धर्म मला सापडला.
३. द्वा. गो. वैद्य : पंडिता रमाबाई- नवयुग, पृ. २५९ – एप्रिल मे जोड अंक,
४. A Testimony – पृ. १५-१६, देवदत्त नारायण टिळककृत रमाबाई चरित्रात, पृ. ३२४ वरील अवतरण.
५. माझी साक्ष : पंडिता रमाबाई (द्वि. आवृत्ती १९७०) पृ. ३६

हे सर्व वाचल्यावर मनात विचार येतो की रमाबाईंचा समाजसेवेचा प्रयत्न खरा होता की मानभावी? पण ही शंकाचा नको. हिंदू विधवांच्या परवशतेबद्दल त्यांना वाटणारी कणव मनापासूनची होती. निराधार, हीन-दीन, पतित-पोळलेल्या स्त्रियांबद्दल त्यांचा जिव्हाळा खराखुरा होता. सामाजिक पिळवणुकीत बळी झालेल्या स्त्रीजातीबद्दल त्यांना वाटणारा उमाळा पोटातून आलेला होता. दीन-दुःखितांची सेवा हा ख़िस्ताकडे जाण्याचा त्यांचा मार्ग होता. ह्या मार्गे ख्रिस्तप्राप्ती आणि ख्रिस्ताद्वारे मुक्ति असे त्यांचे जीवितध्येय होते. पुण्याहून केडगावकडे झालेले संक्रमण पाहात असता हे सूत्र लक्षात ठेवले पाहिजे.
आणि रमाबाईंना समाजसुधारक का समजायचे?
अशासाठी की व्यक्तिस्वातंत्र्य आणि समता या सामाजिक सुधारणेच्या तत्त्वांचा साक्षात्कार त्यांना फार आधी झाला आणि ताबडतोब त्यांनी त्या तत्त्वांचा अंगीकार केला. जे पटले त्याचा कायावाचामनाने त्यांनी पुरस्कार आणि प्रचार केला. अगदी जन्मभर. वयाची वीस वर्षे होई तो रमाबाई पायी भारतभ्रमण करत होत्या. पावलागणिक स्त्रियांची केविलवाणी स्थिती त्या पाहात होत्या. ख्रिस्ती धर्म पुरुष व स्त्रियांना सारखेच हक्क देणारा धर्म आहे हेही त्यांना त्याचे आकर्षण का वाटले याचे एक कारण आहे. समानतेच्या जोडीला व्यक्तिस्वातंत्र्याची अनुपम सुखे अमेरिकन स्त्रिया कशा उपभोगीत होत्या हेही त्यांनी स्वतः पाहिले होते. याउलट आपल्या समाजात लोकमताच्या बागुलबोव्याच्या भीतीपायी व्यक्तिस्वातंत्र्याचा फार संकोच झाला आहे. तो आजमितीलाही आपल्या डोळ्यांना सलतो, तर तेव्हा किती सर्वहरा होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. सामाजिक बंधनांनी पुरुषांपेक्षा स्त्रीजातीचा जास्तीत जास्त बळी घेतलेला होता.
समाजसत्ता विरुद्ध व्यक्तिस्वातंत्र्य, पुरुषवर्चस्व विरुद्ध स्त्री-अस्मिता यांच्या झगड्यात रमाबाईंची बाजू निश्चित सुधारकी होती.
स्त्रीपुरुषसमानताच नव्हे तर व्यापक अर्थीही समता आणि व्यक्तिस्वातंत्र्य या मूल्यांसाठी झुंज देणार्याा त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. हे कार्य त्यांनी वाणीने. लेखणीने जितके केले तितकेच किंबहुना त्यापेक्षा जास्त कृतीने केले. धोंडो केशव कर्यांनी आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेतली, त्यांची निधी जमवण्याची पद्धती उचलली ही गोष्ट मुक्त कंठाने मान्य केली आहे. विवाहित स्त्रीच्या स्वातंत्र्यासाठी प्रिव्ही कौंन्सिलपर्यंत
झगडलेल्या डॉ. रखमाबाईंनी तर आर्य महिला समाजात सचिव म्हणून रमाबाईंबरोबर काम केले होते. श्रीमती रमाबाईसाहेब रानड्यांनी तर उघड पंडिताबाईंचे अनुकरण करून सेवासदन ही संस्था काढली होती. एवढे सगळे कबूल करूनही विवेकवादी सुधारकाला त्यांच्या कार्यात जो उणेपणा दिसतो तो त्यांच्या आत्यंतिक धर्मनिष्ठेमुळे आलेला आहे असे म्हणावे लागते.
६. तत्रैव पृ. ४० ७. तत्रैव पृ. ३९-४० ८. तत्रैव पृ. १७
मनोरमा वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी वारली. मिरजेच्या वानलेस इस्पितळात तिच्यावर उपचार सुरू होते. रमाबाई तेथे जाऊन एकदा तिला भेटून आल्या खर्याा, पण रमाबाईंना हा प्रकार मुळातच पसंत नव्हता. तिचे दवाखान्यात जाणे, औषधोपचार करून घेणे, इत्यादी. त्यांचा ‘फेथ हीलिंगवर (Faith-healing) विश्वास होता. प्रार्थनेवर अविचल श्रद्धा होती. त्यामुळे हे कृत्य देवावर अविश्वास दाखविणारे होते. म्हणून मृत्यूनंतर तिच्या दफनविधीलासुद्धा त्या गेल्या नाहीत.
निर्णयस्वातंत्र्य हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग असतो. कडव्या धर्मनिष्ठेपायी हे रमाबाईंना कळले नाही किंवा निदान वळले नाही. आईच्या धर्मभ्रान्तीची झळ मनोरमेला यापूर्वी अनेकदा लागलेली दिसते. १८९७ मध्ये ती इंग्लंडमध्ये शिकत होती. सोळा वर्षांच्या या मुलीला डोळेदुखीचा त्रास सुरू झाला. तिने डॉक्टरकडे जाण्याबद्दल आईला विचारणा केली. त्यावर रमाबाईंनी नकार कळवला. मनोरमा आपल्या आईच्या धर्ममातेला लिहिते की, “आईची खात्री झाली आहे की मी प्रार्थनेवर पूर्ण भरवसा ठेवला नाही तर माझे डोळे कायमचे .जातील. म्हणून मिस्टर डायरना पत्र लिहून तिने मला चष्मी वापरण्यापासून परावृत्त करायला त्यांना सांगितले आहे. चष्मा घेतला तर ते अधार्मिक कृत्य होईल, त्याने आईला प्राणांतिक दुःख होईल, आणि नीट दिसले नाही तर अभ्यास करता येणार नाही अशा धर्मसंकटात सापडलेल्या मातृभक्त मुलीशी आईचे वागणे तितक्याच अंधश्रद्धांशिवाय इतरांना अनाकलीय आहे.
याच रमाबाई बारा वर्षांत किती बदलल्या? १२ मे १८८५ च्या प्रिन्सिपल मिस्। बील यांना लिहिलेल्या एका पत्रात त्या म्हणतात, ‘मी नुकतीच हिंदुधर्माच्या जोखडातून मुक्त झाले आहे. आता परत दुसर्याण धर्माच्या जोखडाखाली स्वतःला बांधून घेण्याची माझी इच्छा नाही….. लोक जेव्हा मला न विचारता माझ्याबद्दल निर्णय घेतात तेव्हा मी ते माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्रमण समजते आणि मी ते कुणालाही करू देणार नाही.’ याच पत्रात त्या म्हणतात, ‘मी बिशप वा धर्मगुरूंच्या तोंडातून बाहेर पडणाच्या प्रत्येक शब्दाला बांधलेली आहे असे नाही. १° त्यावेळी रमाबाईंचे मत होते, ‘तर्क ही देवानेच दिलेली भेट आहे, मग ती का वापरू नये? उलट न वापरणेच गुन्हा आहे. अगदी श्रद्धेच्या बाबतसुद्धा आपण बुद्धी, तर्क वापरणे सोडून देणे म्हणजे खालच्या पातळीवरील जनावरापेक्षा आपण वेगळे उरणारचनाहीं. ११
९. मृणालिनी जोगळेकरकृत रमाबाई चरित्र, पृ. १७२ १०. तत्रैव – पृ. ३८ ११. तत्रैव.
‘आपण ईश्वरी कार्य करीत आहोत त्यामुळे जगावेसे वाटते’ हा रमाबाईंचा युक्तिवाद आत्मवंचक आहे. एखादा हिटलरही तसे म्हणून अधिक निघृण अत्याचार करू शकतो. जिहाद लढणारे जिवावर उदार होत असतात. आपण करतो ते ईश्वरी कार्य आहे, ही श्रींची इच्छा आहे या विचाराने मनुष्याला शक्ती मिळते हे खरे आहे. पण या शक्तीला सत्प्रेरणेची जोड पाहिजे. नाहीतर ती अधिकच विघातक ठरू शकते असा आजवरचा इतिहास आहे.आणि ‘सत्प्रेरणा’ हे विवेकाचेच दुसरे नाव आहे.
प्रार्थनेच्या शक्तीवर आणि ईश्वरी प्रेरणेवर चालणारे गांधीजी हे अलीकडले उदाहरण. त्यांनी देशासाठी, लोकहितासाठी आयुष्य वेचले. पण साधे कार्यकारण संबंधाचे प्राकृतिक तत्त्व सोडून त्यांना प्रत्येक घटनेमागे ईश्वराचा हात दिसतो. ज्या धरणीकंपाने धन आणि प्राण यांची प्रचंड हानी झाली तो देवाने आम्हा हिंदूंना अद्दल घडविण्यासाठीअस्पृश्यता पाळतो म्हणून – घडविला अशी मीमांसा ते खुशाल करतात. रमाबाईही आपल्या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या ईश्वराने आपल्या कळपातल्या कोकरांची संख्या १५ ची पंधरापट व्हावी यासाठी दुष्काळ धाडला असे बिनधास्तपणे मानतात. श्रद्धा माणसाला किती निर्दय करू शकते! सुमारे दोन हजार जीव वाचवून त्यांचा प्रतिपाळ करणाच्या त्यांना माणसात आणून मानाने जगायला शिकवणार्यास रमाबाईंच्या मिशनमध्ये कोणी ख्रिस्ती तरुणीने एखाद्या अख्रिस्त्याशी लग्न करते म्हटले असते तर एवढ्या करुणाकर रमाबाईनी तिला ‘कर’ म्हटले असते का?
एक सारखे वाटत राहाते. देवआपले मागणे पुरवतो ह्याचा इतका पडताळा घेतलेल्या रमाबाईंनी, देशातल्या सगळ्या दुःखितांची पीडा हरण कर अशी प्रार्थना का नाही केली? किंबहुना अखिल जगतातील वैषम्य आणि नैर्घण्य यांचा नायनाट कर असे मागणे का नाही मागितले? देव त्याच्या पुत्राला मानणार्यां चीच पर्वा करतो असे मानले तरी ख्रिस्ती जगात काय दुःखे कमी आहेत? ‘विश्व स्वधर्मसूर्यो पाहो, जो जे वाञ्छील तोते लाहो प्राणिजात!’ अशी प्रार्थना करणार्याेचे ईश्वर ऐकत नाही हे तर आजवर गेली ८०० वर्षे दिसतेच आहे!
स्त्रिया आपल्या कर्तृत्वासाठी थोड्या कठोर व व्यक्तिवादी झाल्या नाहीत तर त्यांचे कर्तृत्व….. दुय्यम राहील. कर्तृत्वाची किंमत केवळ स्वतःच्या सुखाने चुकवता येत नाही, इतरांची सुखे पण थोडीफार त्या होमात अर्पावी लागतात. हे उद्गार आहेत एका प्रसिद्ध स्त्रीवादी लेखकाचे. त्यांनी रमाबाईंच्या भूमिकेचे समर्थन होऊ शकेल का?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.