शारदेचा पुनर्जन्म

माझे परम मित्र प्रा. कुळकर्णी यांचा पुनर्जन्मासंबंधी शोध घेणारा एक प्रश्नांकित लेख वाचला. (आजचा सुधारक, ऑगस्ट १९९५) प्रा. व. वि. अकोलकरांनी कधी काळी पुनर्जन्मासंबंधी त्यांना अनुकूल असे जे चूक निष्कर्ष काढलेत त्या लेखाचे वाचन करून त्यांनी प्रश्नचिन्ह दिलेले आहे. त्यांच्या अश्रद्ध अशा भूमिकेला या लेखाने हादरा बसला. एखाद्या मृत व्यक्तीचा आत्मा दुसर्यां देहाचा आश्रय घेऊ शकतो हे प्रा. कुळकर्णीना मान्य झाले असावे. अन्यथा त्यांनी प्रा. अकोलकरांशी प्रतिवाद केला असता.
शारदा नावाच्या बंगाली युवतीचा आत्मा बंगालमधून शेकडो मैल अंतर कापून शंभर वर्षानंतर, बंगाल नागपूर दरम्यान असणारी लक्षावधी शरीरे नाकारून फक्त उत्तरा नावाच्या नागपुरातील एका युवतीच्या देहाचा आश्रय घेऊनच अवतीर्ण झालेला असतो अशी ही नाट्यमय घटना, प्रा. व. वि. अकोलकरांच्या प्रयोगाचा विषय ठरली. आणि पॅरासायकॉलॉजीसारख्या गूढरम्य विद्याशाखेत रममाण होऊन स्वतः स्वतःचे निष्कर्ष काढून आणि परलोक विद्याविशारदाच्या कंपूत स्वतःचे स्थान पक्के करून टाकण्यासाठी थातुरमातुर संशोधन कुळकर्णीच्या हाती दिले. पॅरा-सायकॉलॉजीतील सारे प्रयोगी आणि त्यापासून निघणारे निष्कर्ष काढणारे मानसशास्त्रज्ञ हेच मुळात मानसशास्त्रीय प्रयोगासाठी वस्तु विषय होऊ शकतात. संभाजी महाराजांची उत्तम भूमिका वठविणार्या् नटाच्या माध्यमातून संभाजीमहाराजांचा पुनर्जन्म झाला आहे हा शोध जसा हास्यास्पद ठरेल तसेच प्रा. अकोलकरांच्या निष्कर्षाविषयी म्हणता येते.
शारदेचा पुनर्जन्म ऊत्तरेच्या माध्यमातून झाला हे सत्य सांगण्यासाठी प्रा. कुळकर्णीनी आपल्या लेखातून प्रा. किणी, मा योगशक्ती, मनोहरराव हरकरे आणि जनार्दनस्वामी यांच्या साक्षींची नोंद गेतली आहे. शारदेच्या स्वरूपात प्रगट होणार्या उत्तरेच्या अनुभूतीचे उन्मेष या सर्व बुवांनी कुंडलिनीजागृतीचा आविष्कार म्हणून गौरविले आहेत. कुंडलिनीजागृतीसंबंधीचे काही प्रश्न आहेत. ती जागृत झाली हे समाजायचे कसे? ती जागृत झाली हे सांगणारा साधक सांगतो यावर विश्वास का ठेवायचा?’आप्तवाक्य प्रमाण समजूनच या साधकांच्या विधानांचा आदर करायचा? कुंडलिनीजागृतीमध्ये देहान्तर्गत होणारी खळबळ समजायची कशी? आणि ज्याची कुंडलिनी जागृत होते त्याचा प्रतिचार कसा असतो? आतापर्यंत प्रस्तुत लेखकाचे या विषयावरील जे वाचन आणि अशा व्यक्तींशी जो परिचय झाला आहे (योगिराज हरकरे माझे शेजारी होते) त्यावरून असे दिसले की कुंडलिनीजागृतीनंतर साधक अर्थहीन असे गूढ बोलतो, किंवा तो अध्यात्मातील आत्मा, ब्रम्ह यावरची रूपके मांडून दाखवितो. बहुधा तो ज्ञानेश्वरीच्या ओव्यांव्यतिरिक्त काहीच सांगत नसतो.
संगीतशास्त्राची सामान्य जाण असणार्या योगिराजांनी कुंडलिनी जागृत करून भरतकालीन मार्गी संगीत कसे प्रस्तुत केले जाई याची रूपरेखा आपल्या संगीतशास्त्रपारंगत चिरंजीवाला स्पष्ट करून सांगितली नाही, आणि प्रा. किणी ह्यांनी हीच शक्ती जागृत करून शुक्रनीती ग्रंथ कोणी कोणत्या काळात लिहिला गेला याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही. स्वतःच्या विषयातील फारशी दुर्गम नसणारी क्षेत्रे या महाभागांनी जिथे प्रकाशात आणलेली नाहीत तिथे इतरांच्या बाबतीत कुंडालिनीजागृती यांना हमखास उपयोगी ठरली आहे. विज्ञाननिष्ठेची वस्त्रे पांघरून बुवाबाजीच्या मार्गावरून जाणारे हे सारे कापडी. उत्तरेच्या पुनर्जन्माची समस्या ते स्वतःच्या मताने प्रज्ञेने सोडविणार आणि आग्रहाने वाचकांच्या माथी मारणार. प्रा. व. वि. अकोलकर हे देखील या व्यक्तींच्याच गोतावळ्यातील एक मानसशास्त्रज्ञ.
उत्तराआणि शारदा यांच्या जीवनाचे परस्पर गुंतलेले पदर उकलण्यापूर्वी योगीश्वर ज्ञानदेव महाराज कुंडलिनी या विषयावर जे प्रतिमासंपन्न काव्यमय ओवीबद्ध वर्णन देतात त्याचे आणि कुंडलिनीजागृतीची विद्या संपादन केलेले उपरिनिर्दिष्ट साधक यांचे कुठे नाते जुळते का? हे तपासून बघावे लागेल.
‘आइके देह होय सोनियाचे। परि लाघव ये वायूचें।
मग समुद्रा पैलीकडील देखें। मनोगत वोळखे मुंगीयेचे।
चाले तरी उदकी पाऊल न लागे! (अध्याय ६, ओ. २६८ – २७०).
या ओव्यांत कुंडलिनीजागृतीनंतर प्राप्त होणारी उपलब्धी सांगितली आहे. विशेष म्हणजे ज्ञानदेव स्वतः या ऊपलब्धीं संबंधी ऐकून आहेत. प्रत्यक्ष अनुभूती आहे असे ते कुठेही म्हणत नाही. ज्ञानदेवांनी सांगितलेल्या उपलब्धीपैकी एकही, या महान साधकांच्या जीवनात तर नाही. पण यांच्या देहावर यापैकी सोनियाचीच काय, ताम्राचीही आभा नसते. कुंडलिनी जागृती दुसरे तिसरे कांही नसून वायूच्या ऊर्ध्वगतीमुळे जाणवणारी अवस्था असते (असावी).
उत्तरेला शारदेच्या संचारात जे मानसिक विभ्रम होत तशी अनेक उदाहरणे प्रस्तुत लेखकाच्या परिचयाची असून त्यापैकी काही व्यक्ती त्याच्या आप्तांपैकी आहेत. (१) मध्यप्रदेशात माहेर असणारी एक सुस्वरूप शालीन, सात्त्विक वृत्तीची सौभाग्यवती, उन्मादाच्या प्रभावाखाली अर्वाच्य हिन्दी अपशब्द बोलत असे. आई वडील आणि पती ह्यांना ओळखत नसे. उन्माद उतरल्यानंतर ती पूर्ववत होत असे. जोबनीखापा इथे तिच्यावर वेडाचे उपचार केल्यानंतर ती पूर्ण सुधारली. प्रा. अकोलकरांनी यासंबंधी ‘समंधाची बाधा’ असा मांत्रिकासारखा निर्णय देण्यासाठी तो उन्माद केव्हा, किती वेळ, ह्याची तारीखवार नोंद ठेवून ‘अमेरिकन जर्नलमध्ये एक दीर्घ लेख लिहून प्रा. कुळकर्णीच्या हाती दिला असता आणि भूत प्रेतपिशाच समंध व्यक्तीच्या देहाचा ताबा घेत असतीलही या विचाराने त्यांना पुन्हा हादरा बसला असता. (२) अगदी जवळच्या आप्ताचे उदाहरण तर फारच सार्थ आहे. आपल्या पतीच्या विधुर झालेल्या ज्येष्ठ भावाशी, त्याची दिवंगत पत्नी म्हणून, संचार झालेल्या अवस्थेत वर्षभर तगमगणारी तरुणी सौ. दुर्गा या वर्षभराच्या काळात सौ. दुर्गा, स्व. लीलेसारखीच बोलत असे. वैशभूषा करीत असे. आणि ती लीला आहे अशा अविर्भावात माझ्या विधुर आप्ताशी अंगलट करीत असे. अकोलकरांच्या मते हे लीलेच्या पुनर्जन्माचे उदाहरण ठरते. कारण तिच्या एकूण वर्तनात बाधा झाल्याचे लक्षण कधीच दिसले नाही. प्रस्तुत लेखकाची या बाबतीतली उपपत्ती शेवटी खरी ठरली. सौ. दुर्गच्या ‘लीलामयी’ होण्यास जी कारणे होती ती अशीः सौ. दुर्गेची कामेच्छा अतृप्त होती. तिला-पुत्रप्राप्तीची ओढ होती. तिची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. स्व. लीलेचा पती अत्यंत देखणा पौरुषयुक्त होता. विशेष म्हणजे त्याच्या जवळ बंगला आणि संपत्ती होती. आपल्या मुलीच्या विवाहासाठी फारशी आर्थिक मदत प्राप्त होऊ शकत नाही आणि लीलेची तीन मुले या बाबतीत सतर्क आहेत हे ज्यावेळी दुर्गेला पूर्णपणे कळले त्यावेळी तिचे नाटक थांबले. प्रा. अकोलकरांना दुर्गेचे हे नाटक पुनजन्र्माचा सिद्धान्त म्हणून अमेरिकन पॅरा-सायकॉलॉजीच्या जर्नलमध्ये लेख प्रसिद्ध करण्यास अतिशय उपयोगी आहे.
(३)प्रस्तुत लेखक काही वर्षांपूर्वी गुरुचरित्राची पारायणे निष्ठेने आणि पूर्णतः तांत्रिक उपचारासहित करीत होता. (प्रस्तुत लेखक ईश्वरावर विश्वास ठेवणारा आहे.) त्यावेळी त्या पारायणाच्या काळात चित्तवृत्ती सद्गदित असायच्या. पोथी वाचताना अकारण अश्रू यायचे. बोलताना ओवीबद्धता असायची. अभंगासारखी काव्ये स्फुरायची. माझ्या साधक मित्रांनी माझी ही अवस्था कुंडलिनीजागृतीची आहे हे ठासून वर्तविले. पण माझ्या चित्तवृत्तीचे अन्वेषण करता मला असे. सांगावेसे वाटते की तांत्रिक उपचारांमुळे मी वेगळ्या बहिष्कृत वातावरणात असे. पोथीतील चरित्रनायकाच्या कर्तृत्वाचा प्रभाव माझ्या उपबोधावस्थेत कायम असे. मी इतरांपासून वेगळा आहे ही अस्मिता मला जाणीवपूर्वक प्रगट करावीशी वाटे. संतांच्या अनेक ओघ्या आणि अभंग प्रस्तुत लेखकाला पाठ आहेत. कविताआजचा सुधारक/सप्टेंबर १९९५/१९७रचण्याची कला अवगत आहे. होणारा भावपूर्ण संचार आत्मसूचनांद्वारा होत असे. ती कुंडलिनी जागृतीची प्रक्रिया नसून सुंदर वठविलेला एकपात्री भावपूर्ण नाट्यप्रयोग होता.आता मी सांगतो ते खरे की साधकांचे निष्कर्ष खरे?
डॉ. व्हाईन ह्यांचे संशोधन, लेडबीटरला त्याच्या मृत मुलाची आलेली पत्रे, पॉल ब्रेटन ह्यांचे इजिप्तमध्ये आलेले भुतावळीचे अनुभव या सार्याल गूढवादी लेखनाचा तटस्थपणे विचार केला तर प्रश्न निर्माण होतो की ही माणसे सत्य सांगतात हे समजायचे कसे? वा आप्तवाक्यप्रामाण्यावरच अवलंबून असायचे? हे गूढवादी लेखक धूर्त कोल्ह्याप्रमाणे आहेत. स्वतःच्या अभ्यासिकेत बसून कोणाही प्रतिभासंपन्न व्यक्तीला कोणार्कच्या मंदिरात आलेले पूर्णिमेच्या रात्रीचे अनुभव कादंबरीसारखे रंगविता येतील. नाथमाधवाची ‘वीरधवल कांदबरी ह्या धूर्त गूढवाद्यांच्या लेखनापेक्षा वेगळी नाही.
हे सगळे सांगितल्यानंतर उत्तरा आणि शारदा यांच्या सहसंबधाची उपपत्ती सांगणे भाग आहे. प्रा. कुळकर्णी किंवा प्रा. व. वि. अकोलकर ह्यांच्यापेक्षा उत्तरा ही मला अधिक जवळची अशी माझी विद्यार्थिनी होती. ती अतिशय स्पष्टवक्ती, प्रतिभासंपन्न, बुद्धिमान
आणि आकर्षक होती.
उत्तराचे वडील कै. बाळाजी आरंभी हिन्दुमहासभेचे सक्रिय कार्यकर्ते होते. पुढे ते कम्युनिस्ट झाले. कोणत्यातरी अपराधामुळे त्यांना भूमिगत व्हावे लागले, आणि अशा . काळात त्यांनी बंगालमध्ये आश्रय घेतला असावा. त्यांच्या संवादातून शारदेची उत्तरेला ओळख झाली असावी. शारदेच्या परिवाराचा इतिहासही, किंवा शारदेच्या नात्यातील एखाद्या व्यक्तीचे चित्र उत्तरेच्या वाचनात आले असावे. शारदा ही बंगाली कथेतील नायिका असू शकते. ह्या वाङ्मयीन शारदेने उत्तरेच्या उपबोधावस्थेत आपले बिर्हााड थाटले आणि ती उत्तरेच्या असहाय भावुक अस्वस्थ अवस्थेत प्रगट होऊ लागली. प्रस्तुत लेखकाची विद्यार्थिनी असता उत्तरेला बंगाली येत नसे. पुढे तिने बंगाली भाषा, बंगाली संस्कृती, आचार-विचार ह्यावर कौतुकास्पद प्रभुत्व मिळविले. उत्तरेची हीच एकमेव प्रसंशनीय उपलब्धी आहे. उपबोधावस्थेत असणारी शारदा नावाची नायिका कधी जाणीवपूर्वक, कधी उपनेणिवेद्वारा उत्तरा प्रगट करीत असे. उत्तरा आकर्षक असूनही तिचा विवाह होऊ शकला नाही. तारुण्यसुलभ अशी प्रेमात पडण्याची सुप्त भावना जीवनसाथ्याच्या शोधार्थ आतुरलेली. विवाहाचे वय उलटून गेलेले, पण परिणयाची प्रत्यक्षात परिणती होत नाही. जो उत्तरावर जीव टाकतो तो तिला नकोसा असतो आणि उत्तरा ज्याचेकडे आकर्षित होते तो तिच्या विषयी उदासीन, अशा भावुक अवस्थेत दुबळे झालेले मन प्रगट होण्यासाठी एखाद्या स्वतःला आवडलेल्या, किंवा स्वतःच्या कल्पनेने निर्माण केलेल्या व्यक्तिमत्त्वाचे माध्यम स्वीकारते. उत्तरा जाणीवपूर्वक शंभर वर्षापूर्वीच्या बंगाली संस्कृतीत वावरत होती. आरंभीचे नाटक पुढे जीवनात इतके भिनते की नाटक जीवनाचा भाग बनते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे
शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे. ते बोलतात, वागतात, रमतात शिवकालातच. मित्रांना हाक मारताना मावळे सरदारांच्या नावानेच. प्रा. अकोलकरांनी बाबासाहेब पुरंदच्यांना प्रयोगशाळेत नेऊन ते छत्रपतीचे अवतार आहेत यासंबंधी एखादा लेख अवश्य प्रसिद्ध करावा आणि कुळकर्णीच्या हाती द्यावा.
उत्तरे विषयी माझा आक्षेप नाही. कारण शारदेच्या अविर्भावात तिच्या जीवनाचे काही क्षण निश्चितपणे तिला सुखद होत असावेत. माझा आक्षेप आहे कुंडलिनीजागृतीचे तत्त्वज्ञान सांगणाच्या, योगाचा बडिवार माजविणार्याय, बाधा सांगणाच्या पुनर्जन्माची कथा रचणार्याा धूर्त साधकांविषयी आणि मानसशास्त्रज्ञांविषयी. ह्या साधकांनी उत्तरेचे अतोनात नुकसान केले आहे. अन्यथा तिला बंगाली भाषेत सुंदर कादंबरी निर्माण करता आली असती. डॉ. आर. के. सिन्हा आणि प्रा. पी. पॉल ह्यांनी दिलेली माहिती खरी आहे हे तरी कशावरून? प्रस्तुत लेखक इतिहासाचा प्राध्यापक असूनही शंभर वर्षांपूर्वी होऊन गेलेले, इंग्रजी रेसिडेंटला गणित व संस्कृत शिकविणारे कृष्णशास्त्री घोंगे त्याचे कोण हे निश्चितपणे कळून येत नाही. तेव्हा ज्यांच्या परिवाराशी काहीच नाते नाही त्या परिवाराचा शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास शोधून काढणे कितपत शक्य आहे.? या संपूर्ण प्रकरणात महत्त्वाचा नायक सतीनाथ चट्टोपाध्याय आहेत. त्यांच्या आत्मवृत्तातून प्रगट झालेले हे सारे नाटकी अविष्कार असावेत. नाथ संप्रदाय आणि त्या अनुरोधाने नाथ संप्रदायाचा (प्रा. कुळकर्णी अथवा प्रा. अकोलकर) लेखकांनी दिलेला इतिहास पूर्णाशाने निरर्थकच आहे. शारदा अथवा उत्तरा यांच्या जीवनाशी त्याचा कोणताच संबंध नाही. एवढे मात्र खरे की ८४ नाथ सिद्धांचे साहित्य बंगाली भाषेत विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. ज्ञानेश्वरी नवनाथचरित्र, एकनाथी भागवत हे ग्रंथ प्रस्तुत लेखकाच्या वाचनात सदैव असतात म्हणून त्याचा नवनाथांशी, एकनाथांशी, ज्ञानेश्वराशी कसा काय संबंध लावायचा? बहिणाबाईप्रमाणे मी देखील माझी वंशावळ किंवा माझे पूर्वजन्म एकनाथापर्यंत सांगेन; पण ते सत्य म्हणून का स्वीकारायाचे? (प्रा. कुळकर्णीच्या लेखाला उत्तर देताना उत्तरा नावाची ही व्यक्ती अभिप्रेत नसून ती प्रायोगिक वस्तुविषय आहे. लौकिकातील उत्तरा हुद्दारशी या संपूर्ण लेखाचा दूरान्वयाने संबंध लावू नये).
पुनर्जन्मावर ज्यांचा विश्वास आहे असे गीताप्रणीत तत्त्वज्ञान सांगणारे जे प्राचीन ग्रंथ आहेत त्यांची पुनर्जन्मासंबंधी मते लक्षात घेणे आवश्यक आहे. मृत्यूनंतर संस्कारित आत्मा (चैतन्य) तात्काळ योग्य अशा देहाचे माध्यम शोधून त्यात प्रविष्ट होतो. ब्राह्मणी श्रद्धेनुसार तो दहादिवस हिंडत असतो अशा श्रद्धेनेच बारा दिवसपर्यंत अंत्येष्टी संस्कार केले जातात. या मताला न्याय देऊनही शारदेचा आत्मा शंभर वर्षे उत्तरेच्या शोधार्थ भटकत होता असे ज्यावेळी आपण गृहीत धरतो त्यावेळी नवव्या दिवशीच्या काकपिंड स्पर्शविधीला अर्थ उरत नसतो. ब्राह्मणांच्या परिवारात हे प्रेतसंस्कार कटाक्षाने केले जातात. ह्या प्रेत संस्कारातआत्म्याला पूर्ण मुक्ती मिळावी असेच अभिप्रेत असते. विनोदानेच बोलायचे झाल्यास असा प्रश्न विचारता येतो आपल्या द्वाराशी भटकून आलेले कुत्र्याचे पिल्लू आणि त्याची धन्याशी इमानदारी, घरी वावरणाच्या मांजरी, घराच्या शेजारी सतत रवंथ करणार्याय गाई या आपल्या आप्तांचे विभिन्न देहधारी पुनर्जन्मच आहेत की काय? कै. दिवाकरांची याच विषयावरील ‘मांजरीची’ नाट्यछटा वाचनीय असून कारुण्यपूर्ण आहे. ज्या तरुणीचे श्राद्ध चालू असते तीच मांजरीच्या पुनर्जन्मात असते. खिरीला तोंड लावते, तिला रट्टा बसतो. त्यावेळी ती आपली व्याकुळ कैफियत पिलांसमोर मांडते. प्रा. व. वि. अकोलकरांनी असाही एखादा विषय हाताळून बघावा.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.