बौद्धिक स्वातंत्र्याचे महत्त्व

ज्यांना बौद्धिक स्वातंत्र्य स्वतःकरता महत्त्वाचे वाटते असे लोक समाजात अल्पसंख्येत असतील, पण भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे लोक त्यांच्यामध्ये आहेत. आपण कोपर्निकस, गॅलिलिओ आणि डार्विन यांचे मानवाच्या इतिहासात महत्त्व पाहिले आहे, आणि अशी माणसे भविष्यात निर्माण होणार नाहीत असे मानायचे कारण नाही. जर त्यांना आपले काम करू देण्यापासून प्रतिबंध केला आणि त्याचे परिणाम होऊ दिले नाहीत, तर मानव जातीची प्रगति खुटेल, आणि जसे प्राचीन काळातील उज्ज्वल प्रज्ञेच्या युगानंतर तमोयुग आले तसे एक नवे तमोयुग येईल. नवे सत्य पुष्कळदा विशेषतः अधिकारी वर्गाला कटू असते; तरीसुद्धा क्रौर्य आणि कट्टरता यांच्या दीर्घ इतिहासात ते आपल्या बुद्धिमान, परंतु उनाड मनुष्य जातीचे सर्वात मोठे संपादन आहे.