कारणाची संकल्पना आणि परमात्म्याचे अस्तित्व

याच अंकात अन्यत्र डॉ. के. रा. जोशी यांचा ‘विवेकवाद्यांचे ईश्वरविषयक आक्षेप हा लेख प्रसिद्ध झाला आहे. काही महिन्यांपूर्वी आजचा सुधारक मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मी आस्तिक का आहे ह्या प्रा. मे. पुं. रेगे यांच्या आणि मी आस्तिक का नाही’ या माझ्या लेखांतील युक्तिवादांना ‘पाश्चात्त्य असे नाव देऊन त्याबद्दल ते पटणारे नाहीत’ असे मत त्यांनी दिले आहे. पाश्चात्त्यांच्या ईश्वरकारणतावादात त्याची मांडणी बरोबर असल्याचे जाणवत नाही आणि त्याचे खंडनही न पटणारे आहे असे ते म्हणतात. ‘वस्तुतः। ईश्वरविरोधी अर्वाचीन विवेकवाद्यांच्या प्रस्तुत आक्षेपापेक्षाही अत्यंत तर्ककठोर आणि शास्त्रीय आक्षेप चार्वाक, बौद्ध, जैन, सांख्य, मीमांसक यांनी प्राचीन काळी उपस्थित केले होते. त्या सर्वांचे तर्काश्रित खंडन इ. स. च्या दहाव्या शतकात उदयनाचार्यांनी आपल्या न्यायकुसुमाञ्जलि या अपूर्व ग्रंथातून केले आहे आणि ईश्वरवाद्यांची बाजू युक्तियुक्त मांडून दाखविली आहे असे म्हणून त्यांनी ‘पण जिज्ञासूंना त्यासाठी उदयनाचार्य समजावा लागेल असा इशारा दिला आहे. या लेखात डॉ. के. रा. जोशी यांनी दिलेले युक्तिवाद उदयनाचार्याचे आहेत की नाही हे कळले नाही. पण त्यांना उत्तरे देण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
तत्पूर्वी ‘कारण या संकल्पनेचा थोडा इतिहास उपयुक्त ठरेल असे वाटते.
कारण ही संकल्पना भारतीय तसेच पाश्चात्य तत्त्वज्ञानांमध्ये प्राचीन काळापासून वापरली गेली असून तिची काहीशी वेगवेगळी विवेचने दिली गेली आहेत. पश्चिमेत अरिस्टॉटलने दिलेली चुतर्विध कारणांची उपपत्ती प्रसिद्ध आहे. भारतात दोन किंवा तीन प्रकारची कारणे भिन्न भिन्न दर्शनांत थोड्याफार फरकाने मानली आहेत. अर्वाचीन (modern) काळात ‘कारण’ या शब्दाला काहीसा वेगळा पण निश्चित अर्थ प्राप्त झाला
आहे.
एखादी वस्तू निर्माण होण्याकरिता चार प्रकारच्या अटी (कारणे) अवश्य आणि पर्याप्त असतात असे अरिस्टॉटलचे मत होते. ‘अवश्य’ अट म्हणजे जी पुरी झाल्याशिवायएखादी विशिष्ट वस्तू निर्माण होत नाही, आणि पर्याप्त (म्हणजे पुरेशी) अट म्हणजे जी घडल्यानंतर ती वस्तू निर्माण झाल्यावाचून राहत नाही. त्या चार अटीः (१) ज्या द्रव्याची (substance) एखादी वस्तू बनते ते द्रव्य तिचे material cause. भारतीय परिभाषेत त्याला ‘उपादान कारण म्हणतात. (२) Formal cause किंवा त्या वस्तूचे स्वरूप सांगणारे कारण. याला आपण ‘आकारिक कारण असे नाव देऊ. ‘Material cause’ आणि ‘formal cause’ ही नावे वस्तूंच्या matter आणि form या अरिस्टॉटलच्या उपपत्तींशी निगडित आहेत. Matter म्हणजे ज्या द्रव्याची एखादी वस्तू बनलेली असते ते द्रव्य. उदा. घर विटा आणि चुना यांचे बांधतात, म्हणून विटा आणि चुना हे घराची matter; आणि form म्हणजे ती वस्तू ज्या प्रकारची असेल, किंवा तिची रचना ज्या प्रकारची असेल ते. ‘आकार’ या शब्दाच्या सामान्य अर्थी एकाच आकाराची अनेक द्रव्ये आणि एकाच द्रव्याचे अनेक आकार असू शकतात, हे प्रसिद्ध आहे. परंतु अॅरिस्टॉटलने ‘आकार’ हा शब्द त्याच्या सामान्य अर्थाहून व्यापक अर्थाने वापरला आहे. सामान्य अर्थी आकार फक्त भौतिक वस्तुंना असु शकतो, पण अॅरिस्टॉटलच्या अर्थाने अभौतिक वस्तूंनाही आकार असू शकेल. उदा. दोन अनुमाने भिन्न विषयांविषयी असूनही त्यांचा आकार एकच असू शकेल, किंवा दोन कविता एकाच वृत्तात(आकारात) असू शकतील. (३) Efficient cause किंवा ज्याला आपण ‘शक्त कारण असे नाव देऊ शकतो. हे कारण म्हणजे द्रव्याला एक रूप सोडून दुसरे धारण करण्याची चालना देणारे. उदा. विटा आणि चुना रचून घर बांधणारा गवंडी. (४) शेवटी ती वस्तू ज्या प्रयोजनासाठी निर्माण झाली असेल किंवा केली गेली असेल ते प्रयोजन. त्याला अॅरिस्टॉटल ‘final cause’ असे नांव देतो. आपण त्याला ‘प्रयोजन कारण हे नाव देऊ. अॅरिस्टॉट्लने ही उपपत्ती घरासारख्या मुद्दाम हेतुपुरःसर बनविल्या जाणार्या‘ वस्तूंबद्दल मर्यादित न ठेवता सर्व वस्तूंसाठी वापरली आहे. मात्र त्याची उत्तम उदाहरणे आपण ज्या वस्तू मुद्दाम कोणत्या तरी प्रयोजनास्तव तयार करतो त्यांतच सापडतात. अॅरिस्टॉट्लने शक्त कारणामध्ये जसा सुबुद्ध मानव प्राण्याचा अंतर्भाव केला तसाच सृष्टीतील अमानवी शक्तींचाही केला. उदा. पेरलेले बी उगवते, आणि ज्या ओढीने ते एका विशिष्ट झाडाचे रूप प्राप्त करते त्या ओढीचा किंवा आकर्षणाचाही अंतर्भाव तो शक्त कारणात करतो.
याउलट भारतीय तत्त्वज्ञांची गोष्ट आहे. त्यांनी कारणांमध्ये कर्त्यांचा प्रामुख्याने अंतर्भाव केला आहे, आणि जिथे एखाद्या वस्तूचा कर्ता दिसत नाही (उदा. बीचे झाड होणे) तिथे परमेश्वराची योजना भारतीय तत्त्वज्ञ करतात. उदा. बीचे झाड होते यांत ते ईश्वराचे कर्तृत्व मानतात. त्यांनी कारण मुख्यतः द्विविध मानले आहेः (१) उपादन कारण आणि (२) निमित्त कारण. उपादान कारण म्हणजे ज्या द्रव्याची एखादी वस्तू बनली असेल ते द्रव्य, आणि निमित्त कारण म्हणजे चालना देणारे तत्त्व. नैयायिकांनी कारणाचे तीन प्रकार मानले आहेत – समवायि कारण, असमवायि कारण, आणि निमित्त कारण. समवायि कारणम्हणजे ज्याला अन्य दर्शनांत उपादान कारण म्हणतात ते. असमवायि कारण म्हणज जे कार्याशी समवाय संबंधाने जोडलेले नसते ते. उदा. तंतू हे पटाचे (कापडाचे) समवायिकारण, पण तंतुरूप हे पटरूपाचे असमवायिकारण. कारण तंतू आणि पट यांच समवायसंबंध आहे, पण तंतुरूप आणि पटरूप यांत नाही.
अर्वाचीन काळात विज्ञानात कारणाचे स्वरूप अॅरिस्टॉलच्या परिभाषेत मांडण्याचा प्रघात नाही. ते वेगळ्या स्वरूपात मांडले जाते. त्यात मुख्य भेद आहे तो हा की अर्वाचीन काळात कार्य ही एक घटना असते, वस्तू नसते, आणि कारणही घटनाच असते. घटना आणि वस्तू यांतील भेद असा सांगता येईल. घटना ही कोणत्यातरी क्षणी घडते, परंतु वस्तू सान्त (अल्प किंवा दीर्घ) कालावधीत टिकते. वस्तूच्या टिकण्याच्या काळात अनेक घटना घडतात. पहिली घटना म्हणजे ती निर्माण होण्याची. नंतर ती सान्त कालवधीपर्यंत टिकते. या कालावधीत घटनांची एक मालिका क्रमशः घडत जाते. शेवटी ती वस्तू नाश पावते. तीही एक घटनाच असते. कारणाचा नियम ‘प्रत्येक घटनेला कारण असते असा अलीकडे सांगितला जातो, ‘प्रत्येक वस्तूला कारण असते असा नाही. या दृष्टीने अलीकडील तत्त्वज्ञ/वैज्ञानिक घट या वस्तूच्या कारणाचा शोध घेत नाहीत. घटोत्पत्ती या घटनेचे कारण असते. घटनाश हीही एक घटनाच आहे. तिचेही कारण तिच्या पूर्वीच्या घटनांत असते. या अर्थी कर्ता किंवा निर्माता याला कारण म्हणत नाहीत. कर्ता ही एक वस्तू असणार, म्हणजे त्याचे अस्तित्वही एक घटनामालिका असणार. त्यांपैकी एखादी घटना अन्य घटनेचे कारण असेल.
या नवीन अर्थी कर्ता हे कारण नव्हे, त्याची क्रिया कारण असेल. पण प्रत्येक गोष्टीला कर्ता असेल असे नव्हे. हेतुपुरःसर केलेल्या कृत्रिम वस्तूंना कर्ता असतो, पण पर्वत, नदी इत्यादि पदार्थाचा कर्ता कोण या प्रश्नाला काय उत्तर देणार?
एवढ्या प्रस्तावनेनंतर आपण आता डॉ. के. रा. जोशी यांच्या युक्तिवादांकडे वळू शकतो. त्यांनी ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारा म्हणून पुढील युक्तिवाद दिला आहे आणि त्याला आधार उदयनाचार्यांचा दिला आहे. तो युक्तिवाद असा : ‘जे जे कार्य असते त्याला कर्ता असतो. उदा. घट, पट, इत्यादि. ही भूमी, हे पर्वत, ह्या नद्या, रानावनांत उगवणारे नवांकुर हीही कार्येच होत. तेव्हा त्यांचाही कर्ता असला पाहिजे. पण आपल्यासारखे जीवात्मे या बाबतीत कर्ते म्हणून संभवू शकत नाहीत. यास्तव या ठिकाणी कतृत्व ज्याचे तो परमात्मा ईश्वर होय.?
या युक्तिवादाला नास्तिकाचे काय उत्तर आहे?
प्रथम, ही भूमी, हे पर्वत, नद्या, नवांकुर ही कार्ये होत असे मानायचे कारण काय? त्याला प्रा. जोश्यांचे उत्तर आहे – नैयायिकांची व्याख्या. ती अशी आहे. कार्यं प्रागभावप्रतियोगि’, म्हणजे जे आधी नसते आणि नंतर उत्पन्न होते ते कार्य. ज्याचा प्रागभाव (प्राक = आधी + अभाव) असतो ते कार्य. या व्याख्येनुसार पर्वत, नद्या, नवांकुर ही सर्व कार्येहोत. अंकुर तर काल नव्हते आणि आज फुटले आहेत असे आढळतेच. पण नद्यांनाही आरंभ असतो असे म्हणता येते. पृथ्वीच्या पोटात आणि तिच्या पृष्ठभागावर अनेक स्थित्यंतरे होत असतात, आणि त्यांपैकी पर्वतांची उत्पत्ती हे एक आहे. तेव्हा नैयायिकांच्या व्याख्येनुसार ही सर्व कार्ये होत हे मान्य करावे लागेल.
दुसरे, कार्य म्हटले की कर्ता आलाच. कार्य म्हणजे जे करावयाचे किंवा केले जाते ते. एखादी गोष्ट करावयाची असेल तर ती करणारा असावाच लागेल. पण ही कार्य शब्दाची व्याख्या नैयायिकांच्या कार्याच्या व्याख्येहून वेगळी झाली. ज्याचा प्रागभाव असतो ते कार्य या व्याखेत जे करावयाचे आहे किंवा जे केले जाते ते कार्य असा उल्लेख नाही. त्यात फक्त जे नव्हते आणि उत्पन्न होते ते कार्य एवढेच म्हटले आहे. तेव्हा वरील अनुमानात ज्याचा ज्याचा प्रागभाव असतो ते ते कोणी तरी कर्ता उत्पन्न करतो असे गृहीत धरले आहे. आणि ते सिद्ध केले गेले नाही. पर्वत, नद्या, नवांकुर इत्यादि गोष्टींचा प्रागभाव असतो हे मान्य करूनही त्या करावयाच्या गोष्टी आहेत या अर्थाने त्या ‘कार्य आहेत हे दाखवायचे राहून गेले आहे. आणि ते दाखविल्याशिवाय या अनुमानाने परमात्म्याचे अस्तित्व सिद्ध होणारे नाही हे स्पष्ट आहे. ते दाखविणारा युक्तिवाद काय आहे?
प्रा. जोशांनी दिलेला एक युक्तिवाद असा आहे. ‘स्थित्यकुरादि कर्तृजन्यं, कार्यत्वात् घटवत्’,म्हणजे क्षिति, अंकुर इत्यादि कर्याद्वारा उत्पन्न होणार्या? गोष्टी आहेत, कारण ती घटाप्रमाणे कार्ये आहेत. पण हे अनुमान बरोबर नाही. कारण घट हो प्रागभावप्रतियोगी या अर्थाने जसा कार्य आहे तसाच कर्याद्वारा केला जाणारा या अर्थानेही कार्य आहे. पण एवढ्याने ज्याला ज्याला प्रागभाव असतो ते ते कर्तृत्वजन्य असते हे सिद्ध होत नाही. ते गृहीतच धरले जाते.
याप्रमाणे प्रा. जोशांनी दिलेली अनुमाने अनिर्णायक मानावी लागतील. जग हे स्वयंभू असू शकत नाही असा दावा प्रा. जोशी करतात. पण वैशेषिकांचे आकाश हे नित्य आहे हे मत ते मान्य करतात. पण आकाश नित्य आहे याचा अर्थ ते अनादि आणि अनंत आहे. आणि जर आकाश अनादि असू शकते तर संबंध जगच अनादि का असू शकत नाही हा प्रश्न उद्भवतो. या अर्थाने जग स्वयंभू आहे असे म्हणता येईल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.