मनुष्याची उत्क्रान्ती आणि आधुनिक समाज

प्रत्येक व्यक्तीमध्ये जगणे, तगणे, प्रजोत्पादन करणे, वगैरेंसाठी आवश्यक असे गुण कमी जास्त प्रमाणात असतात. या गुणांच्या संचाला एकत्रितपणे “परिस्थित्यनुरूपता”म्हणतात. कोणता गुणसंच अनुरूप, हे परिस्थितीमुळे ठरते. प्रत्येक परिस्थितीत जास्त अनुरूपता असलेल्या व्यक्तींची प्रजा भावी पिढ्यामध्ये जास्त प्रमाणात टिकते, आणि याउलट कमी अनुरूप व्यक्तींचे वंश रोडावत जातात.
आपल्या शरीररचनांसाठी हे तत्त्व लावणे जवळपास सर्वमान्य आहे. उदाहरणार्थ, सूर्याकडून पृथ्वीवर येणार्या आणि जमिनीपर्यंत पोचणार्याउ किरणांना पाहू शकणारे डोळे आपल्या “इतिहासामुळे घडले. सागर तळाशी राहणार्याा माशांना आणि इतर जीवांना या किरणांशी कर्तव्य नसते, त्यामुळे त्यांचे डोळे हे किरण पाहत नाहीत. त्याऐवजी त्यांना पाण्यातील दाब, खारटपणा वगैरे परिस्थिती जोखणारी इंद्रिये असतात.
हेच तत्त्व माणसांच्या मनोव्यापारांना लावून “उत्क्रांतिवादी मानसशास्त्र” अशी एक नवी ज्ञानशाखा घडवली जात आहे. या प्रयत्नात सध्याच्या तंत्रज्ञानाधिष्ठित जीवनपद्धतीतले बरेचसे घटक मनोविकारांना कसा जन्म देतात याची माहिती मिळते आहे. या माहितीचे पर्यवसान शेवटी एक “विजोडतेचे तत्त्वं’ (mismatch theory) घडून मानसिक आजारांवर प्रकाश टाकील, असे दिसते आहे.
हे अभ्यास मुख्यत्वे अमेरिकेत होत आहेत, आणि त्या समाजाला ज्यांची काळजी वाटते, असे दोन मुख्य मनोविकार आहेत. यात हिंसक होणे, आणि उदासीनता या दोन स्थितींवरच खास रोख आहे. ही साधी उदासीनता नाही, तर “डिप्रेशन” depression या नावाने ओळखाला जाणारा आजार आहे.
हा महत्त्वाचा आजार आहे. आज तरुणअमेरिकनांमध्ये घडणाच्या मृत्यूंच्या कारणांची आकडेवारी दाखवते की तीन मोठे “मारेकरी” आहेत – मोटर अपघात, खून आणि आत्महत्या. याच क्रमाने त्यांची मारकताही आहे. अनेक उद्योगप्रधान देशांमध्ये उदासीनतेचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण दर दहा वर्षांत दुप्पट होत आहे. खुद्द अमेरिकेमधे पंधरा टक्के लोकांमध्ये उदासीनता आजाराच्या पातळीला पोचते. हिलाच परात्मभावाची, (एलियनेशनची alienation), “हे जग माझे नव्हे” या भावाची जोड मिळाली, तर रोगी व्यक्ती हत्येला प्रवृत्त होते. आणि हे उद्योगप्रधान देशांमध्ये सहजपणे घडते आहे.
उत्क्रांतिवादी मानसशास्त्रज्ञांना प्राचीन काळचे समाज अभ्यासता येत नाहीत. त्यांचा भर असतो तांत्रिकदृष्ट्या अप्रगत आणि तंत्रज्ञानाशी संपर्कही न आलेल्या “शुद्ध” आदिवासी समाजांवर. आणि अशा समाजांमध्ये उदासीनता आणि परात्मभावाचे प्रमाण खूपच कमी, अगदी नगण्य असे असते.
अमेरिकेत “अॅमिश” (Amish) पंथ आहे. हे लोक मोटारी, वीज व दारू यांना स्पर्श करीत नाहीत. शेती करणे आणि फक्त “बायबल” वाचून त्यातील तत्त्वांप्रमाणे जगणे, ही या पंथाची मुख्य धारणा आहे. यांच्यात सामान्य अमेरिकन समाजाच्या जेमतेम एक-पंचमांश प्रमाणातच उदासीनतेचे रुग्ण आढळतात.
माणूस चिंता करतो, तेव्हा त्याच्या शरीरात कॉर्टिसॉल (Cortisol) नांवाचे एक द्रव्य तयार होते. जितका माणूस जास्त चिंताग्रस्त, तितके कॉर्टिसॉल जास्त. न्यू गिनीतील कालुली (Kaluli) या आदिवासी जमातीत कोणाच्याच शरीरात हे द्रव्य सापडत नाही.
आदिवासी समाज, जे या नव्या शास्त्राची मुख्य निरीक्षण-शाळा (observatory) आहे, त्यांचे आयुष्य फार सुखाचे असते असे नाही. आपले पूर्वज असेच जगत, व त्यांचे आयुष्यही फार सुखाचे नसे. वन्य श्वापदांची भीती कायमचीच. “आंतर- टोळीय” सत्तास्पर्धा आणि मारामाच्याही नेहेमीच्याच. उपासमारी, रोगराई यांचाही त्रास थोड्या थोड्या कालांतराने मागे लागणार. अशा आयुष्याकडे जाण्याची आज कोणालाही इच्छा होणार नाही.
या आयुष्यात स्पर्धा असेच – ती आजही असतेच. आपले सामाजिक स्थान टिकवावे, वाढवावे, ह्याची इच्छा हे स्पर्धेचे मूळ. पण अशी स्पर्धा लाठ्या-गोट्यांनी खेळली जात नाही. या स्पर्धेची मुख्य साधने म्हणजे “तोंडपाटिलकी” आणि सामाजिक “राजकारण’. यासाठी लागतात ते गुण म्हणजे सहकार्य, मित्र जोडणे, स्नेह कमावणे, उपकाराची जाण ठेवणे, विश्वास टाकणे. एकत्रितपणे “परस्पर स्वार्थत्याग’ reciprocal altruism) म्हणता येईल या गुणसंचाला. यासोबत अपत्यप्रेमही आवश्यक, कारण अखेर मुलेच तर वंश पुढे चालवणार!
एकूण चित्र दिसते ते ना रूसोच्या “उमद्या रानवटाचे,” ना हॉब्जच्या “दुष्ट पाशवी आणि तोकड्या आयुष्याचे. मार्दव, सहकार, सौजन्य या भावनाच तगताना, जगताना, वाढताना उपयोगी ठरतात.
या चित्राची “ऋण” बाजूही आहे. अविश्वास, शंकेखोरपणा, वाईट अर्थाने उपकारांचे ओझे वाटणे, चिंता, खिन्नता, मुलांवरील प्रेमाचे कधीकधी तीव्र अपेक्षाभंगात रूपांतर होणे – हेही गुण तगण्या-जगण्याला मदतच करतात. चिंता व्यर्थ अशा दुःसाहसापासून परावृत्त करते. शंका-अविश्वासातून प्रत्येक परिस्थितीवर पर्यायी तोडगे। काढायची शिकवण मिळते. पराभवाचे दुःख आणि त्यातून येणारी खिन्नता (झकत!) आत्मपरीक्षण करायला लावते. एकूणच एका मर्यादेत चिंताग्रस्त होणे, कष्टी होणे, हे तसे उपयुक्तच असते.
मग ते विकाराच्या पातळीला केव्हा पोचते? परात्मभाव, एकटेपणा, समाजापासून तुटल्याचा भाव, या गोष्टी साध्या उदासीनतेला विकृतीपर्यंत नेऊन पोचवितात. शिकार करणे, कंदमुळे- फळे गोळा करणे, यांवर आधारित समाजात एकटेपणा येऊ शकत नाही. असे समाज अखेर मित्रांसहकार्यांोच्या दाट विणीने विणलेल्या कापडासारखे असतात. कुटुंबीय” असणे, “टोळीचा, समाजाचा सदस्य” असणे, हे टाळून टळत नाही. लग्नेच कशाला, काडीमोडही व्यक्तींचे फक्त कुटुंबगट बदलतात. कोणीही इतर समाजापासून तुटत नाही. कुरबुरी, भांडणे, हेवेदावे, मत्सर, स्पर्धा, सारे असते. पण या बाबींबाबत कुढत बसून विकार उत्पन्न होण्याइतके एकटेपणच नसते.
यात खाजगीपणाचा (privacy) बळी जातो. खाजगी, एकट्याचे, “गुपित’ असे फारसे टिकत नाही. याचे सुपरिणाम पाहा.
फिलिप वॉकर याने ख्रिस्तपूर्व ४००० सालापासून आजपर्यंतच्या काळातील, तंत्रज्ञानपूर्व समाजांमधील पाच हजार मुलांच्या हाडांचे सांगाडे तपासले- वयोगट एक ते चार वर्षे. त्याला एकाही सांगाड्यात अमानुष मारझोडीचे (child abuse) पुरावे दिसले नाहीत. वॉकरच्या मते सध्याच्या अमेरिकेत पाच टक्के तरी सांगाडे असे पुरावे दाखवतील.
“जाहीर”आयुष्यक्रमात हे घडू शकत नाही. एखादा बाप, एखादी आई पोरांना जास्त झोडपू लागताचा काका, मामा, आत्या, मावशी असे कोणीतरी नातलग वा शेजारी वा मित्र मध्ये पडून अनर्थ टाळतीलच.
(भारतातल्या “अविभक्त कुटुंबामध्ये हेच गुण होते. आज भारतातही “चौकोनी” कुटुंबे वाढत जाऊन एकत्र कुटुंबे कमी होत आहेत. एकत्र कुटुंबांच्या वर्णनात “त्रासाच्या काळात गढीसारखे संरक्षण देणारे, आणि इतर वेळी कारागृहासारखे बंधनकारक असे येते. बहुतेक आज संरक्षणापेक्षा स्वातंत्र्याची ओढ जास्त असावी! पण हे बदलणे अशक्य नाही.)
सुटेपणा, सामाजिकता कमी होणे, यामागे शहरीकरण नाही. चाळींमध्ये किंवा “वेटाळ” मध्ये तुटकपणा नसे वं नसतो. खरा गुन्हेगार, जो अमेरिकेत जास्त प्रकर्षाने जाणवतो, तो आहे “उपनगरीकरण” (suburbanization).
शहराच्या गजबजाटापासून दूर, मोकळ्या हवेत रहायसाठी जायचे. नवर्या ने दिवसभर कामानिमित्त शहरात जायचे. बायकोने लहान मुले सांभाळत घरी बसायचे, किंवा आया वा “बेबी-सिटर” वर मुले सोपवून कामाला जायचे. सायंकाळी एकाने वा दोघांनीही परतल्यावर घरकामे, मुलांचे “रिपोर्ट’ घेणे, थकवा घालवणे या सार्याीत , सामाजिक बंधने घडवाय-टिकवायला वेळच उरत नाही.
गंमत म्हणजे बाईने मूल दुसर्या’वर सोडून कामाला जाणे हे घरीच बसून एकटीने मूल सांभाळण्यापेक्षा जास्त “नैसर्गिक आहे. (खरे तर अनैसर्गिक असे काहीच नसते. अमुक वागणे तमुक वागण्यापेक्षा प्राचीन समाजांमध्ये जास्त किंवा कमी दिसत असे, असेच म्हणायला हवे). शिकारीत अन्न गोळा करणार्यााला समाजांमध्ये स्त्रीने शिकारीतही भाग घेणे नेहमीच घडते व घडत असे. (काही अंदाजांप्रमाणे तर अशा समाजांमधे अन्न गोळा करण्याचा मुख्य भार स्त्रियांवर असतो. मोठ्या जनावरांची शिकार आणि हिंस्र जनावरांपासून रक्षण हीच फक्त पुरुषाची जबाबदारी असते.)
एकटेपणामुळे “बोअर” झालेले किरकिरे मूल, आणि त्यामुळे कावलेली एकटी आई, हे चित्र माणसांच्या इतिहासात दिसतच नसे. ते घडले उपनगरीकरणामुळे.
आणि अमेरिकेत उपनगरीकरण होऊ लागले १९५० च्या दशकात, मोटर- कारच्या सार्वत्रिक वापराच्या वेळेपासून. मोटर, टेलिफोन, फ्रिज, “मॅगी नुडल्ज” सारखे शिजविणेनाममात्र असलेले अन्न – ही तंत्रज्ञाने खास उपनगरांसाठी घडलेली आहेत. त्यांचा वापर सामाजिक बंधने तोडतो. आपल्या “गृह – दुर्गात बसूनच सारे जीवनावश्यक कारभार करणे यांच्यामुळेच शक्य होते. येथे “नेहेमी ६.३५ च्या लोकलमध्ये भेटणे” नाही. प्रत्यक्ष भेटीतल्याचकाट्या नाहीत. “काकूकडून बुदलीभर दूध आण”नाही. आणि या तंत्रज्ञानाचा कळस दिसतो तो दूरचित्रवाणीत. बत्तीस वा त्याहून जास्त चनेल्स” प्रत्येकाला त्याची त्याची रुची पुरवू देतात. एकाला ग्रामोफोनचे हँडल मारायला लावून इतरांनी चिरक्या तबकड्या ऐकण्यात असे होत नसे. (पण स्वतः हँडल मारलेले आईस्क्रीम “दिनशा” पेक्षा चांगले लागत असे!). पूर्वी तुलना, स्पर्धा, मत्सर, हे सारे शेजार्यां ना “प्रमाण मानून होत असे. आज दूरचित्रमालिकांमधील झळाळीपुढे शेजारीच काय, नातलगही पाणचट वाटू लागले आहेत.
वास्तुशास्त्रज्ञ, नगररचनाशास्त्रज्ञ हे सारे जग अमेरिकेत जाणीवपूर्वक नव्यानेजुना, बांधलेला समाज” घडवायचा प्रयत्न करत आहेत. ई-मेल, इंटरनेट, ही दूरचित्र – संगणक तंत्रज्ञाने माणसांमाणसांच्या भेटीगाठीं” सुलभ करत आहेत. पण या साच्या दगडविटांच्या व चिप्स-तारांच्या रचनाही समाजाची हरवलेली वीण पुन्हा उभी करू शकत नाहीत. कारण?
कारण मुळात “मुक्त बाजारपेठ” व भांडवली अर्थव्यवस्था ह्या बाबी जुन्या घडणीच्या समाजाला मारक आहेत! ही अर्थव्यवस्था अपरिहार्यपणे माणसांना वेगवेगळ्या उत्पादक पेशांच्या कप्प्यांमध्ये वाटून टाकते. एका कप्प्याचा दुसर्यासशी संबंध (जरूरीपेक्षा) जास्त प्रमाणात येऊ देणे “अकार्यक्षम ठरते. आर्थिक कार्यक्षमतेची ही व्याख्या, किंवा उत्पादन व्यवस्थेकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन माणसामाणसांमधील संबंधाची दखलच घेत नाही. ( हे वर्णन भांडवली अर्थव्यवस्थेला धर्म मानणार्यां अमेरिकेतील “अस्सल’ समजल्या जाणार्याथ टाइम” साप्ताहिकातील आहे, हे लक्षात ठेवावे. ज्या“टाइम’मधील लेखाचे हे स्वैर रूपांतर आहे, त्या लेखात ज्या प्राचीन, प्राथमिक शिकारी समाजव्यवस्थेचे गुणगान आहे, तिला अप्रगत साम्यवाद” किंवा primitive communism म्हणतात!)
आश्चर्य म्हणजे उदासीनता व संलग्न असा हिंसाचार वाढत असताना, माणसे एकमेकांपासून तुटत असताना, परात्मभाव वाढत असतानाही अमेरिकेतील एक-तृतीयांश लोक स्वतःला स्पष्टपणे “सुखी” समजतात. आणि सुखी माणसांचे हे प्रमाण अनेक दशके फारसे बदललेले नाही. यावर एक मत असे आहे, की माणसांना नेहमीच त्यांच्या सध्याच्या स्थितीत थोडीशीच सुधारणा हवी असते. जराशा प्रयत्नाने ही सुधारणा कमावता येईल, असेच सर्वांना, सर्वकाळ वाटत असते. याचमुळे जरा चिंता, जरा खिन्नता, येवढ्यावरच बहुतेकांचे भागते.
उपनगरीकरणासारख्या थेट “विजोड” सामाजिक रचनांची गोष्ट जरा वेगळी आहे. स्त्रीमुक्तीची आज टिपेच्या सुरात चाललेली चर्चा साधारणपणे १९६० च्या दशकात बहरूलागली. त्या आधीचे दशक उपनगरे वाढण्याचे होते हे लक्षणीय आहे. चुल – मूल यांना बांधल्या गेलेल्या एकेकट्या स्त्रियांच्या प्रश्नांमधून याला गती मिळाली. स्त्रियांनी मुलांना इतरांवर किंवा त्यांच्यावरच सोडून कामावर जाण्याने प्रश्नातील काही भाग स्त्रियांपुरता तरी सुटला, हे लक्षात घेण्यासारखे आहे. (नाहीतर हा “टाइम”मधला लेख पु. ल. देशपांड्यांसारख्या nostalgiaवर जगणार्याआ व्यक्तीचा वाटेल!)
एकूणच ज्या समाजव्यवस्थेत वीसेक लक्ष वर्षे (सुमारे एक लक्ष पिढ्या) काढत माणसांची मने उत्क्रांत झाली, तिचा व सध्याच्या समाजव्यवस्थेचा सुसंवाद व विसंवाद कुठे आणि कसा त्रास देतो, त्यावर कशी उपाययोजना लागू पडेल वगैरेंचा विचार होणे आवश्यक वाटते.
[वरील लेख २८-८-९५ च्या “टाइम” मधील मुख्य- लीड- स्टोरीवर आधारित आहे. कंसातील टिप्पणी मात्र मूळ लेखातील नाही.]

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.