चर्चा -ज्ञानसाधनेचे मार्ग

आ. सु. च्या ऑगस्ट १९९५ च्या अंकात दोन विचारप्रवर्तक लेख ज्ञानसाधनेबद्दल आले आहेत. (१) ‘ज्ञानासाठी बुद्धीला पर्याय आहे काय?’ हा श्री. श्री. गो. काशीकर यांचा व (२) अंतर्ज्ञानाचा पाया भक्कम नाही’ हा डॉ. पु. वि. खांडेकर यांचा. विवेकवादासाठी ही चर्चा व हा विषय यांना फार महत्त्व आहे.
ज्ञानसाधनेसाठी वैज्ञानिक रीत अतिा सर्वमान्य झाली आहेच. म्हणून या चर्चेत सहभागी व्हावे असा विचार मनांत आला. या क्षेत्रांतील दोन उदाहरणे फार महत्त्वाची आहेत असे मला वाटते व त्यांकडे मी विवेकवाद्यांचे लक्ष्य ओढू इच्छितो.
(१) प्रथम रामानुजम सुप्रसिद्ध भारतीय गणितज्ञ (pure mathematician) यांचे उदाहरण. रामानुजम् अगदी खालच्या जागेवर मद्रास येथे नोकरीत असताना त्यांनी मांडलेले गणितातील सिद्धांत व प्रमेये (Theorems and Propositions) केंब्रिज विद्यापीठातील प्रा. हार्डी यांनी पाहिली. गणित या क्षेत्रांतील प्रा. हार्डी यांचे स्थान फार वरच्या दर्जाचे होते. ते आश्चर्यचकित झाले. त्यांनी या तरुण मुलाला सर्व प्रकारची मदत देऊन, केंब्रिज विद्यापीठांत शिष्यवृत्ती मिळवून दिली. महत्त्वाची गोष्ट ही की रामानुजम् यांची प्रमेये व सिद्धांत ही त्यांना कशी सुचत हे त्यांचे त्यांना सांगता येत नसे. कारण पायरी – पायरीने (step by step) विचार करून यांचे ज्ञान होत नसे. म्हणजे हे सिद्धांत स्वतः रामानुजम् सिद्ध करू शकत नसत. सिद्धांत त्यांचे, पण त्यांचे proof प्रा. हार्डीसारख्या इतर गणितज्ञांना द्यावे लागे. प्रा. खांडेकरांच्या लेखातील भाषेत सांगायचे झाल्यास हे अंतर्ज्ञान किंवा अंतःस्फूर्ती, (Intuition किंवा Revelation) या दोन्ही क्षेत्रांत असू शकते. प्रा. हार्डीसारख्या श्रेष्ठ गणितज्ञालाच या सिद्धांतांचे महत्त्व कळू शकले व रामानुजम्सारख्या तरुण मुलाला मान्यता मिळू शकली.
‘तुला हे सिद्धांत कसे सुचले?’ असे रामानुजम्ला विचारले असता त्याच्याच शब्दांत, ‘मला माहीत नाही, ईश्वर स्वप्नांच्या माध्यमांतून मला हे ज्ञान देतो (God sends me these, through the medium of dreams) हे त्याचे उत्तर. विवेकवाद्यांना हे पटणे कठीण आहे. तरुण रामानुजम् चा ईश्वरावर पूर्ण विश्वास होता हे वेगळे सांगायला नकोच. पण रामानुजम्चे गणित या क्षेत्रांतील कार्य फार वरच्या दर्जाचे आहे, हे आता सर्वमान्य आहे.
(२)दुसरे उदाहरण Kekule या रसायनशास्त्रज्ञाचे. त्याने Organic Chemistry मधील Atomatic Compounds चा पाया म्हणजे Benzene Molecule हा वर्तुळाकार (Ring Structure) आहे हा शोध लावला.: C6H6हा Benzene Molecule चा रासायनिक Formula. हा शोध लागेपर्यंत कार्बनचे अणु एका सरळ रेषेत असून, प्रत्येक कार्बन अणूला दोन हायड्रोजनचे अणु जोडलेले असे Aliphatic Series चे Structure माहीत होते. पण त्यावरून Aromatic Compounds चे गुणधर्म समजू शकत नसत. Kekule ने वर्तुळाकार Benzene चा शोध लावल्यावर हे गुणधर्म (Atomatic Series) कळू शकले.
पण या चर्चेच्या संबंधात मुख्य मुद्दा हा की, Benzene चे वर्तुळाकार structure तुला कसे सुचले हे विचारले असता त्याने दिलेले उत्तर. यांत पुनः स्वप्नावस्थेचा संबंध येतो. त्याने उत्तर दिले की या प्रश्नावर खूप विचार करून थकलेल्या अवस्थेत मला एक स्वप्न पडले. स्वप्नांत सर्प(snakes) इकडून तिकडे धावत होते. एकदम एका सर्पाने आपलीच शेपटी आपल्या तोंडात धरली व तो वर्तुळाकार बनला. मी खाडकन जागा झालो व मनांत विचार आला की कार्बनचे अणु हे एकमेकास जोडले असता असाच वर्तुळाकार घेऊ शकतील. . ते सरळ रेषेतच असले पाहिजेत असा आतांपर्यंत रुजलेला समज सोडून दिला पाहिजे.
कट्टर विवेकवादी स्वप्नावस्थेत कठीण प्रश्नांची उत्तरे सांपडू शकतील याची थट्टा करतील याची मला जाणीव आहे. पण आपण अशा प्रश्नांच्या बाबतीत open – minded असले पाहिजे असे माझे स्वतःचे मत आहे. मानसशास्त्रज्ञसुद्धा कदाचित् या बाबतीत स्वप्नावस्था उपयुक्त असू शकेल असे मान्य करणे शक्य आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा, ज्यावर प्रा. खांडेकरांनी विशेष जोर दिला आहे. तो लक्ष्यात ठेवलाच पाहिजे. तो म्हणजे असे अनुभव कोणत्याही व्यक्तीला येतील असे नाही. ज्याने कोणत्याही प्रश्नावर कसून सारखा विचार केलाआहे, अनेक वेगवेगळी उत्तरे तपासून पाहिली आहेत (alternatives) अशाच संशोधक वृत्तीच्या व्यक्तींबद्दल हा intuitive ज्ञानमार्ग खरा असू शकेल.
प्रा. खांडेकरांच्या लेखांतीलअॅनी बेझंट व लेडबीटर(Theosophists) यांच्याबद्दल व १८ या अंकाचे त्यांनी मांडलेले (structure of matter) महत्त्व यांबद्दल मी काही म्हणू शकत नाही. कारण याबद्दल सुस्पष्ट अशी माहिती नाही. G. Krishna Murty यांच्या चरित्रात या बद्दल बरीच माहिती होती अशी एक आठवण मनात आहे.
विवेकवाद्यांनी ज्ञानसाधनेचे मार्ग याविषयी गंभीर विचार करावा अशी आशा व्यक्त करतो.
एक गोष्ट लक्ष्यात ठेवणे आवश्यक आहे. रामानुजमूसारखे वैज्ञानिक – ज्यांना आपले ज्ञान थेट ईश्वराकडून संदेशासारखे येते असे वाटे, अशी त्यांची खात्री होती – अगदी विरळाच असणार. कदाचित् असे दुसरे उदाहरण विज्ञानाच्या क्षेत्रांत नसेलही. रामानुजमुच्या बाबतीत याला महत्त्व यांसाठी की त्यांचे गणितांतील सिद्धांत व प्रमेये यांची proofs त्यांच्याजवळ नव्हतीच. ती दुसर्‍या प्रा. हार्डीसारख्या गणितज्ञांना द्यावी लागत. तेव्हा रामानुजम्चे ज्ञान नेहमीच्या वैज्ञानिक रीतीच्या चौकटीत बसणारे नव्हते हे मान्य करावे लागते. म्हणून एक exception to the general rule – असे अपवादात्मक स्वरूप रामानुजम् यांच्या बाबतीत होते

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.