गूढवाद

विज्ञान आणि धर्मशास्त्र यांच्यातील युद्ध चमत्कारिक प्रकारचे राहिले आहे. अठराव्या शतकातील फ्रान्स आणि विसाव्या शतकातील रशिया हे देश सोडले तर सर्वकाळी आणि सर्व स्थळी बहुतेक वैज्ञानिकांनी आपापल्या काळातील सनातनी मतांची पुरस्कार केला होता. अत्यंत प्रसिद्ध वैज्ञानिकांपैकी काही त्या बहुतेकांपैकी होते. न्यूटन जरी एअरियन असला तरी अन्य सर्व बाबतींत त्याचा ख्रिस्ती धर्माला पाठिंबा होता. कूव्हिअर हा कॅथलिक सनातनीपणाचा नमुना होता. फॅरडे सँडिमनियन होता, परंतु त्या पंथातील चुका त्यालाही वैज्ञानिक युक्तिवादांनी सिद्ध होणार्याफ वाटत नव्हत्या, आणि धर्म आणि विज्ञान यांच्या संबंधाविषयीची त्याची मते कुणाही धर्मपीठीयाला वाखाणण्यासारखी वाटणारी होती. युद्ध चालले होते धर्मशास्त्र आणि विज्ञान यांच्यात, धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक यांच्यात नाही. जेव्हा वैज्ञानिक निषिद्ध मते स्वीकारीत तेव्हा ते धर्माशी संघर्ष टाळण्याची पराकाष्ठा करीत. कोपर्निकसने आपले पुस्तक पोपला अर्पण केले होते, गॅलिलिओने आपली मते मागे घेतली होती, देकार्तला जरी हॉलंडमध्ये राहणे अधिक सुरक्षित वाटले होते तरी धर्मपीठियांविरुद्ध न जाण्याचे त्याने फार प्रयत्न केले, आणि बुद्ध्या स्वीकारलेल्या मौनाने गॅलिलिओची मते स्वीकारल्याच्या दूषणातून तो वाचला. एकोणिसाव्या शतकात बहुतेक ब्रिटिश वैज्ञानिकांची समजूत अजूनही अशी होती की आपले विज्ञान आणि उदारमतवादी ख्रिस्त्यांना ख्रिस्ती धर्माचे जे भाग अवश्य वाटत त्यांत मूलभूत विरोध नव्हता, कारण महापुराची कथा किंवा अॅडम आणि ईव्ह हीही वाच्यार्थाने घ्यायची नाहीत असे मत झाले होते.
कोपर्निकसीय मताच्या यशापासूनच्या दीर्घ काळात परिस्थिती जशी राहिली तिच्याहून वर्तमान परिस्थिती फारशी भिन्न नाही. मध्ययुगात धर्मश्रद्धेचा अवश्य भाग समजले जाणारे दृढविश्वास एकामागून एक ख्रिस्ती लोकांना वैज्ञानिक शोधांमुळे सोडावे लागले. आणि या माघारीमुळे वैज्ञानिकांना ख्रिस्ती राहणे शक्य केले आहे. त्याला अपवादफक्त ज्या आघाडीवर सध्या युद्ध पोचले आहे त्याचा. गेल्या तीन शतकांत जसे जाहीर केले जात होते तसेच आजही जाहीर केले जाते की विज्ञान आणि धर्म यांचा समेट झाला आहे. वैज्ञानिक नम्रपणे मान्य करतात की विज्ञानाच्या कक्षेबाहेर असणारी अनेक क्षेत्रे आहेत,आणि उदार धर्मशास्त्री मान्य करू लागले आहेत की वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध गोष्टी आम्ही नाकारणार नाही. आता हे खरे आहे की शांतता भंग करणाच्या काही गोष्टी अजून आहेत. एक म्हणजे मूलतत्त्ववादी आणि कट्टर कॅथलिक धर्मशास्त्री, आणि दुसरे म्हणजे प्रबुद्ध धर्मपीठीय लोकांच्या माफक मागण्याही मान्य न करणारे बायोकेमिस्ट्री आणि मानसशास्त्र यांचे कट्टर विद्यार्थी. परंतु एकंदरीत पूर्वीच्या मानाने कलह सौम्य आहे. धर्मवेडेपणाचा वारसा सध्या कम्युनिझम आणि फॅसिझम या निष्ठांनी घेतला आहे. आणि कदाचित् अबोधाच्या खोल प्रदेशात कुठेतरी बिशप आणि प्राध्यापक यांना प्रस्थापित स्थिती कायम टिकविण्याची जबाबदारी आपली असल्याची जाणीव जागते आहे.

१. बर्ट्रांड रसेल यांचे १९३५ साली प्रसिद्ध झालेले Religion and Science हे पुस्तक त्या विषयावरील एक उत्कृष्ट पुस्तक असून ते वाचणे प्रत्येक बुद्धिवाद्याचे कर्तव्य आहे. धर्म माघार घेता घेता शेवटी गूढवादाचा (mysticism) आसरा घेतो, त्यामुळे गूढवादाची चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरते. ती या पुस्तकात सातव्या प्रकरणात आली आहे. आमच्या वाचकांना ती उद्बोधक वाटेल अशा अपेक्षेने त्या प्रकरणाचा अनुवाद येथे सादर करीत आहोत. – संपादक
२. आणि
३. पंथविशेष.

विज्ञान आणि धर्म यांचे संबंध सरकारला जसे दिसावेत असे वाटते त्याची कल्पना ‘विज्ञान आणि धर्म – एक परिसंवाद या बी. बी. सी. वरून १९३० च्या शिशिरात प्रसारित झालेल्या बारा भाषणांची संहिता देणार्याव पुस्तकावरून येऊ शकेल. धर्माला जाहीर विरोध करणाच्या लोकांचा अर्थात् त्यांत अंतर्भाव नाही, कारण (दुसरा कुठला युक्तिवाद द्यायचा नसेल तर) त्यांच्यामुळे श्रोत्यांपैकी अधिक सनातनी लोकांना त्रास झाला असता. आता हे खरे आहे की त्यात एक उत्तम प्रास्ताविक भाषण – प्रा. ज्यूलियन हक्स्ले यांचे – झाले, आणि त्यांत अंधुकसासुद्धा सनातनीपणाला पाठिंबा नव्हता; पण ज्याला उदार धर्मपीठीय लोक आज आक्षेपार्ह मानतील असेही काही नव्हते. ज्या वक्त्यांनी निश्चित मते मांडली आणि त्यांच्या समर्थनार्थ युक्तिवाद दिले त्यांनी ईश्वर आणि अमरत्व यांवर विश्वास ठेवण्याची इच्छा विफल असल्याच्या केविलवाण्या कबुलीपासून, तो ‘प्रकटीकृत (revealed) सत्ये विज्ञानाच्या सत्यापेक्षा अधिक निश्चित असून त्यांच्यात जेव्हा विरोध येतो तेव्हा ती टिकून राहणार असे धीट प्रतिपादन करणार्याज फादर ओहारापर्यंत अशा विविध भूमिका स्वीकारल्या, परंतु जरी तपशिलात फरक असले तरी एकंदरीत धर्म आणि विज्ञान यांचा संघर्ष संपला असल्याचे सामान्य मत व्यक्त झाले. हा परिणाम आयोजकांना सर्वस्वी इष्ट असाच होता. उदा. उशीरा बोललेले कॅनन स्ट्रीटर म्हणाले की ‘येथे झालेल्या भाषणांविषयी एक लक्षणीय गोष्ट ही होती की त्या सर्वांचा प्रवाह एकाच दिशेने होता… केवळ विज्ञान पुरेसे नाही ही कल्पना पुन्हा पुन्हा व्यक्त होत राहिली.’ हे ऐकमत्य विज्ञान आणि धर्म यांच्यात होते की बी. बी. सी. वर सत्ता असणार्याक अधिकार्याअत होते याविषयी वाद होऊ शकेल, परंतु अनेक भेद असूनही या परिसंवादातील वक्त्यांचे कॅनन स्ट्रीटर यांनी उल्लेखिलेल्या मुद्याबाबत एकमत होते हे मान्य केले पाहिजे.

उदाहरणार्थ सर जे. आर्थर टॉम्सन म्हणाले, ‘विज्ञान विज्ञान म्हणून केव्हाही “का” हा प्रश्न विचारीत नाही. म्हणजे ते कधीही या विविधांगी विश्वाच्या भूत, वर्तमान किंवाभविष्याच्या अर्थाचा, अभिप्रायाचा किंवा प्रयोजनाचा विचार करीत नाही.”. पुढे ते म्हणाले, “म्हणजे विज्ञानाचा दावा मूलभूत सत्य असण्याचा नाही. ते म्हणतात की ‘विज्ञानआपली रीत गूढ आणि चैतन्य यांना लावू शकत नाही. प्रा. जे. एस्. हॉल्डेन म्हणाले की ‘ईश्वराचा साक्षात्कार आपल्याला फक्त अंतरंगात, आपल्या सत्य, सदाचार, परोपकार आणि सौंदर्य या आदर्शात आणि इतरांशी मैत्रीचे व्यवहार यांतच होतो.’ डॉ. मॅलिनौस्की म्हणतात की धार्मिक आविष्कार हा असा अनुभव आहे की जो विज्ञानाच्या क्षेत्राच्या बाहेर आहे. या क्षणी मी धर्मशास्त्र्यांची मते उद्धृत करीत नाही, कारण त्यांची अशा मतांशी सहमती अपेक्षितच आहे.

पुढे जाण्यापूर्वी वरील मतांत काय प्रतिपादले आहे आणि ते खरे आहे की नाही याचा विचार करू या. जेव्हा कॅनन स्ट्रीटर म्हणतात की ‘विज्ञान पुरेसे नाही तेव्हा एका अर्थाने ते सर्वपरिचित सत्यच उच्चारीत आहेत. विज्ञानात कला, मैत्री अथवा जीवनातील अन्य मूल्यांचा अंतर्भाव होत नाही. पण त्यांना त्याहून अधिक म्हणावयाचे आहे. विज्ञान पुरेसे नाही याचा आणखी एक, आणि अधिक महत्त्वाचा अर्थही मला बरोबर वाटतो. विज्ञानाला मूल्यांविषयी काही सांगावयाचे नसते, आणि ते ‘द्वेषापेक्षा प्रेम श्रेयस्कर आहे किंवा ‘दुष्टपणापेक्षा दयाळूपणा चांगला’ यांसारखी विधाने सिद्ध करू शकत नाही. आपल्या इच्छा पूर्ण करावयाच्या साधनांसंबधी ते पुष्कळ सांगू शकते, परंतु एक इच्छा दुसरीहून वर्य (to be preferred) आहे हे ते सांगू शकत नाही. हा विषय मोठा आहे, आणि त्याविषयी मी नंतर एका प्रकरणात बोलेन.
परंतु मी ज्यांची अवतरणे वर दिली आहेत त्या वक्त्यांना याहून जास्त नक्कीच म्हणावयाचे आहे. आणि ते मला असत्य वाटते. ‘विज्ञान आपण मूलसत्य आहोत असा दावा करीत नाही’, याचा अभिप्राय असा आहे की सत्याप्रत जाण्याची एक नवैज्ञानिक अन्य रीत आहे.’प्रकट केल्या जाणार्या, धार्मिक गोष्टी विज्ञानाच्या कक्षेबाहेर आहेत’, हे ती नवैज्ञानिक रीत कोणती त्याविषयी सांगते. ती रीत म्हणजे धार्मिक प्रगटीभवनाची रीत. डीन इंग याहून अधिक स्पष्ट बोलले आहेत. याप्रमाणे धर्माची सिद्धी ही प्रायोगिक आहे. (ते गूढवाद्यांच्या साक्षीविषयी बोलत आहेत.) ती म्हणजे साधुत्व किंवा प्रेम, सत्य आणि सौंदर्य या ज्या तीन गुणांद्वारा (ज्यांना काही लोक निरपेक्ष किंवा नित्य मूल्ये म्हणतात) ईश्वराने स्वतःला प्रकट केले आहे त्यांचे अधिकाधिक ज्ञान होणे. आपण म्हणाल की जर एवढेच असेल तर विज्ञानाशी संघर्ष येण्याचे कारण नाही. एक वास्तवाविषयी व्यवहार करते, दुसरा मूल्याशी. दोन्हीही खरे आहेत हे मान्य केले तर ते दोन भिन्न पातळ्यांवर आहेत. पण हे पूर्णपणे खरे नाही. आपण विज्ञानाला नीतिशास्त्र, काव्य आणि अन्यही अनेक क्षेत्रांवर आक्रमण करताना पाहिले आहे. तसेच धर्मालाही आक्रमण केल्याशिवाय राहवत नाही.’ म्हणजे धर्माने केवळ काय असावे याविषयी न बोलता काय आहे याविषयीही बोलणे भाग आहे. हे डीन इंग यांनी स्पष्टपणे मान्य केलेले मत अव्यक्तपणे सर जे. ऑर्थर टॉम्सन आणि डॉ. मॅलिनौस्की यांच्याही वक्तव्यांत अभिप्रेत आहे.

असा एक ज्ञानाचा मार्ग आहे की जो धर्माला पोषक आहे, परंतु विज्ञानाला, लभ्य नाही, आणि त्याला ‘प्रकटीभवन’ असे यथार्थपणे म्हणता येईल, हे मत आपण मान्य करावे काय? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. कारण जे प्रकट झालेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात त्यांना आपल्याला ऐंद्रिय विषय ज्या ठामपणाने मान्य असतात त्याचे ठामपणाने प्रकट गोष्टीही मान्य असतात. आपण कधीही न पाहिलेल्या गोष्टी आपण पाहिल्या असे म्हणणार्याह मनुष्यावर आपण विश्वास ठेवतो. मग, ते विचारतात, आम्ही मात्र आम्हाला तितक्याच निःसंशय करणार्याश गोष्टी सांगतो, त्यांवर विश्वास का ठेवू नये?

ज्याने समाधिसुख अनुभवले आहे त्याला त्याविरुद्ध त्याला पटेल असा युक्तिवाद देणे कठीण आहे, पण अन्य लोकांनी त्यावर विश्वास ठेवावा काय याविषयी काही सांगता येण्यासारखे आहे. एक म्हणजे त्याने दिलेल्या साक्षीला सामान्य कसोट्या लावता येत नाहीत. जेव्हा एखादा वैज्ञानिक आपल्या प्रयोगाचे फलित सांगतो तेव्हा तो प्रयोग कसा केला हेही सांगतो. अन्य लोक तो करू शकतात, आणि जर त्याचा पडताळा आला नाही तर तो सत्य म्हणून गृहीत धरीत नाहीत. पण गूढवाद्याला ज्या परिस्थितीत गूढानुभव येतो त्या परिस्थितीत असूनही अन्य मनुष्यांना तो येत नाही. यावर असे म्हटले जाईल की आपण योग्य इंद्रिय वापरले पाहिजे. जो डोळे घट्ट मिटून ठेवील त्याला टेलिस्कोप निरुपयोगी आहे. गूढवादी साक्षीच्या विश्वसनीयतेबद्दल दीर्घ युक्तिवाद करता येईल. विज्ञानाने तटस्थ असले पाहिजे, कारण त्याचा युक्तिवाद वैज्ञानिक असल्यामुळे अनिश्चित प्रयोगासंबंधी जसा युक्तिवाद करतात तसा नेमका करावा लागेल. विज्ञान प्रत्यक्ष आणि अनुमान यांवर अवलंबून असते, एका माणसाने पाहिलेल्या गोष्टी कोणीही पाहू शकतो यावर विज्ञानाची विश्वासार्हता अवलंबून असते. गूढवादी स्वतः आपल्याला ज्ञान झाले आहे याविषयी पूर्ण निःशंक असेल, आणि त्याला वैज्ञानिक सिद्धीची गरज नसेल, पण ज्यांना त्याची साक्ष स्वीकारायची आहे ते आम्ही उत्तरध्रुवावर गेलो होतो असे म्हणणाच्या माणसाला ज्या प्रकारच्या कसोट्या लावतील त्याच प्रकारच्या कसोट्या त्याच्या साक्षीला लावतील. विज्ञानाला विज्ञान म्हणून त्याच्या निकालाविषयी अस्तिवाचक किंवा नास्तिवाचककोणतीही अपेक्षा असणार नाही.

गूढवाद्यांना अनुकूल असा प्रमुख युक्तिवाद म्हणजे त्यांची सर्वांची सहमती. डीन इंग म्हणतात ‘गूढवाद्यांच्या ऐकमत्याहून – मग ते प्राचीन असोत की अर्वाचीन, प्रॉटेस्टंट, कॅथलिक किंवा बौद्ध आणि मुसलमानही असोत, अधिक लक्षणीय गोष्ट मला माहीत नाही. (त्यातही ख्रिस्ती गूढवादी सर्वात जास्त विश्वासार्ह असतात)’. या युक्तिवादाचे बळ कमी लेखण्याची माझी इच्छा नाही, ते मी माझ्या गूढवाद आणि तर्कशास्त्र या पुस्तकात पूर्वीच मान्य केले आहे. गूढवाद्यांत आपले अनुभव शब्दांत व्यक्त करण्याच्या सामथ्र्यात पुष्कळ भेद असतो. पण त्यांच्यापैकी जे सर्वात यशस्वी झाले आहेत ते पुढील तीन गोष्टी मांडतात असे म्हणण्यात हरकत नाही. (१) सर्व भेद आणि विभाजन अवास्तव आहेत आणि सबंधविश्व हे एक अविभाज्य एकक (unit) आहे. (२) अशिव (evil) भ्रामक आहे, आणि तो भ्रम एक विभाग स्वयंपूर्ण मानल्यामुळे निर्माण होतो, आणि (३) काल अवास्तव (unreal) आहे, आणि वास्तवता (reality) नित्य (eternal) आहे, सार्वकालिक या अर्थाने नव्हे तर ती सर्वथा काळाबाहेर आहे या अर्थाने. सर्व गूढवादी ज्या मुद्द्यांच्या बाबतीत सहमत होतात ते फक्त एवढेच आहेत असा आग्रह मी धरीत नाही, परंतु जे तीन मुद्दे मी उल्लेखिले आहेत ते सबंध ऐकमत्याचे प्रतिनिधित्व करू शकतील. आता आपण अशी कल्पना करू या की आपण न्यायालयात ज्यूरी म्हणून हजर आहोत, आणि आपले काम या तीन गोष्टी प्रतिपादणायांची विश्वासार्हता निश्चित करायची हे आहे.

पहिली गोष्ट जी आपल्याला आढळते ती ही की जरी सर्व साक्षीदार एका मर्यादेपर्यंत सहमत असले तरी तिच्यापलीकडे मात्र जरी ते पूर्ण निःशंक असले तरी सर्वस्वी भिन्न मते देतात. कॅथलिक गूढवाद्यांना कुमारी मेरीचे दर्शन घडते, परंतु प्रॉटेस्टंटांना नाही, गॅब्रिएल हा देवदूत ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यापुढे थोर सत्ये उघड करील, पण बौद्धांपुढे नाही, टाओवादी किंवा गूढवादी सर्व शासन वाईट असते असे सांगतील, तर बहुतेक युरोपीयआणि मुसलमान गूढवादी तितक्याच ठामपणे प्रस्थापित अधिकारास शरण जाण्याला सांगतील. ज्या मुद्द्यांच्या बाबतीत त्यांचा मतभेद होतो, त्यांच्याविषयी प्रत्येक गट अन्य गटांना चुकीचे ठरवितो, त्यामुळे जर आपल्याला वादांत समाधान असेल तर आपण म्हणू शकतो की बहुतेक गूढवादी अन्य बहुतेकांना बहुतेक बाबतीत चुकीचे समजतात, पण मतैक्याचे मुद्दे मतभेदाच्या मुद्द्यांहून अधिक महत्त्वाचे मानून ते आपल्या जयाला अर्धवट म्हणू शकतील. निदान आपण असे गृहीत धरू की त्यांनी आपले मतभेद मिटविले आहेत आणि जगाचे एककत्व, आशियाचे भ्रामकत्व आणि काळाचे अवास्तवत्व या मुद्द्यांवर आपला बचाव करण्याचे ठरविले आहे. अशा स्थितीत निःपक्ष तिहाईत म्हणून आपण त्यांच्या सहमतीविषयी कोणती कसोटी लावू शकतो?

वैज्ञानिक वृत्तीचे म्हणून आपण स्वाभाविक प्रथम आपल्याला स्वतःला तो अनुभव प्राप्त करण्याचा काही उपाय आहे काय याचा शोध घेऊ. याला आपल्याला अनेक उत्तरे मिळतील. आपल्याला असे सांगितले जाईल की कदाचित् आपली वृत्ती पुरेशी ग्रहणशील नाही, आणि आपल्याजवळ अवश्य ती नम्रताही नाही, किंवा उपासतापास आणि योग यांची याबाबतीत गरज आहे, किंवा (जर आपला साक्षीदार भारतीय किंवा चिनी असेल तर) प्राणायामाची आवश्यकता आहे. मला वाटते की प्रमाणांचे वजन या शेवटच्या मताच्या बाजूला असेल. खरे म्हणजे शारीरिक स्वरूपाची योग नावाची एक निश्चित शारीर साधना आहे, आणि ती समाधि-अनुभवाला अवश्य म्हणून केली जाते आणि ज्यांनी ती केली आहे आहे त्या लोकांनी तिच्यात पुष्कळ विश्वास दाखविला आहे. प्राणायाम हे त्याचे सर्वात महत्त्वाचे अंग आहे, आणि आपल्या शोधात आपण अन्य सर्वांकडे दुर्लक्ष करू.

योगाने अंतर्दृष्टी येते याची परीक्षा करण्याकरिता आपण त्या मताचे सुलभीकरणकरू या. आपण काही काळ प्राणायाम केला तर आपल्याला काळ मिथ्या आहे असा अनुभव येईल असे आपण समजू या. आपण असेही समजू की आपण त्या उपायाचा अवलंब केल्यावर ते म्हणतात तसा अनुभव आपल्याला आला. पण त्यानंतर आपली नेहमीची श्वासोच्छ्वासपद्धति सुरू झाल्यानंतर या अवस्थेत आपल्याला मिळालेले दर्शन विश्वसनीय आहे काय अशी शंका आपल्याला आली तर आपण काय उत्तर देऊ?

प्रथमतः, काळ मिथ्या आहे म्हणजे काय? आपण जे म्हणतो आहोत ते खरोखरच अभिप्रेत असेल तर हे त्याच्या आधी झाले अशा प्रकारची विधाने ‘जबगडदशसारखी वृथा आहेत असे मानले पाहिजे. जर आपण याहून कमी समजलो, (उदा. असे समजलो की घटनांमध्ये असा एक संबंध आहे की ज्याच्यामुळे त्या आधी आणि नंतर या क्रमात आणल्या जातात. पण तो वेगळा संबंध आहे एवढेच) तर आपल्या विचारसरणीत कसलाही खरा बदल केला असे म्हणता येणार नाही. ते फक्त असे म्हटल्यासारखे होईल की ‘इलियड हे महाकाव्य होमरने लिहिले नाही, पण त्याच नावाच्या दुसर्यास मनुष्याने लिहिले आहे. घटनाच नाहीत असे आपण समजले पाहिजे. कालिक क्रमाच्या दिशाभूल करणार्याय देखाव्याच्या जागी फक्त एका विराट विश्वाचे एक सकल असले पाहिजे. घटनांच्या पौर्वापर्यासारखे काहीही वास्तवात नसले पाहिजे. आपण जन्मतो, वाढतो आणि शेवटी मृत्युमुखी पडतो असे म्हणणे, आपण प्रथम मरतो, नंतर लहान होतो आणि शेवटी आपला जन्म होतो असे म्हणण्याइतके असत्य असावे लागेल. जे आपल्याला एका व्यक्तीचे आयुष्य म्हणून भासते, तो खरोखर निष्काल आणि अविभाज्य अशा जगाच्या अस्तित्वाचा भ्रम होय. सुधारणे आणि बिघडणे, दुःखानंतर येणारे सुख, आणि सुखानंतर येणारे दुःख यांत काहीच भेद नसला पाहिजे. जर आपल्याला कोठे छातीत खंजीर खुपसलेले प्रेत दिसले तर तो मनुष्य जखमेने मेला आणि खंजीर तो मेल्यानंतर खुपसला यात काहीच फरक राहणार नाही. हे मत जर खरे असेल तर त्याने सर्व विज्ञानच नव्हे तर दूरदृष्टी, आशा, प्रयत्न यांचा अंत होईल. ते लौकिक शहाणपणाशी विसंगत होईल, आणि धर्माच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे म्हणजे ते नीतीच्या प्रयत्नाशीही विसंगत होईल.
बहुतेक गूढवादी अर्थातच हे निष्कर्ष सर्वांशाने मान्य करीत नाहीत, पण ज्यांच्यापासून हे निष्कर्ष अपरिहार्यपणे निष्पन्न होतात अशी मते ते स्वीकारतात. उदा. जो धर्म उत्क्रांति मानतो त्याचा डीन इंग निषेध करतात, कारण त्यात कालिक प्रक्रियेवर अतिशय भर आहे. ‘प्रगतीचा कायदा नाही, आणि सर्वव्यापी प्रगती नाही असे ते म्हणतात. पुन्हा ते म्हणतात, ‘प्रगती आपोआप आणि सर्वतोगामी आहे असा जो व्हिक्टोरियन विश्वास, त्याला प्रतिकूल गोष्ट ही आहे की जिचे निश्चित खंडन होऊ शकते अशी ती एकमेव उपपत्ती आहे.’ याविषयी मी डीनसाहेबांशी सहमत आहे, आणि त्याविषयी मी नंतर बोलणार आहे. अनेक कारणांनी मला त्यांच्याविषयी गाढ आदर आहे. परंतु त्यांच्या साधक विधानांपासून (premises) जे निष्कर्ष निघताना मला दिसतात ते सगळे निष्कर्ष ते काढीत नाहीत.

गूढानुभवाच्या उपपत्तीचे विडंबन न करणे महत्त्वाचे आहे, कारण तिच्यात मला शहाणपणाचे सार दिसते. काळ नाकारल्यामुळे निष्पन्न होणारे अतिरेकी निष्कर्ष ती कसे टाळते ते आपण पाहू.

गूढवादावर आधारलेल्या तत्त्वज्ञानाची दीर्घ परंपरा पार्मेनाइडीजपासून हेगेलपर्यंत आहे. पार्मेनाइडीज म्हणतो, जे आहे ते असृष्ट आणि अक्षय आहे, कारण ते पूर्ण, अचल आणि अनंत आहे. ते कधी नव्हते आणि कधी होणार नाही, कारण ते आता आहे, सबंध, एकदम, संतत आहे. त्याने अतिभौतिकीत सत् आणि भास यांचा भेद प्रविष्ट केला. त्यांना त्याने सत्याचा मार्ग आणि समजुतीचा मार्ग अशी नावे दिली आहेत. जो कोणी काळाचे अस्तित्व नाकारील त्याला असा काही तरी भेद करावा लागेल, कारण जग उघडच काळात दिसते. आणि हेही स्पष्ट आहे की जर दैनंदिन अनुभव पूर्णपणे भ्रांत नसेल, तर भासमान आणि त्याच्यामागे असणारे सत् यांत काही संबंध असला पाहिजे. परंतु या ठिकाणी सर्वात कठीण अडचणी उद्भवतात. सत् आणि भासमान यांतील संबंध जर फार जवळचा मानला तर भासमान जगातील सर्व अप्रिय गोष्टींची दुसरी प्रत सतामध्ये मानावी लागेल. आणि जर तो फार दूरचा केला तर आपल्याला भासमानावरून सताविषयी अनुमाने करता येणार नाही, आणि सत् हर्बर्ट स्पेन्सरप्रमाणे अज्ञेय मानावे लागेल. ख्रिस्ती लोकांपुढे तर विश्वदेवतावाद (pantheism) कसा टाळता येईल ही अडचण आहे. जर जग फक्त भासमानच असेल, तर ईश्वराने काही निर्माण केले नाही, आणि जगाची तुल्ययोगी (corresponding) सत्ता ईश्वराचा भाग होईल, पण जर जग काही प्रमाणात सत् आणि ईश्वर याहून वेगळे असेल, तर आपल्याला गूढवाद्यांचे सर्वांचे ऐकमत्य हे अवश्य मत टाकून द्यावे लागेल, आणि असे मानावे लागेल की जग जितपत सत् आहे तितपत त्यातील अशिवही सत् आहे. अशा अडचणींमुळे पक्का गूढवाद स्वीकारणे सनातनी ख्रिस्त्याला फार कठीण होते. बर्मिंगहॅमचे बिशप म्हणतात त्याप्रमाणे सर्व प्रकारचे विश्वदेवतावाद, मला वाटते, नाकारले पाहिजेत, कारण जर मनुष्य ईश्वराचा अंश असेल तर मनुष्यातील अशिव ईश्वरातही आहे असे होईल.

आतापर्यंत मी आपण ज्यूरी आहोत असे समजत होतो, गूढवाद्यांचे म्हणणे ऐकत होतो, आणि तो स्वीकारावा की नाकारावा हे ठरविण्याचा प्रयत्न करीत होतो. जेव्हा गूढवादी पेंद्रिय जगाला सत्ता नाही असे म्हणतात तेव्हा ‘सत्ता’ (reality) हा शब्द न्यायालयांतील परिभाषेच्या अर्थी ते वापरतात असे आपण समजलो, तर ते म्हणतात ते नाकारण्यास आपल्याला संकोच करण्याचे कारण राहणार नाही, कारण ते अन्य सर्व पुराव्यांच्या आणि त्यांच्या स्वतःच्या व्यवहारी क्षणींच्या पुराव्याच्याही किद्ध जातात असे दिसेल. म्हणून आपण दुसरा एखादा अर्थ शोधू. माझे मत असे आहे की जेव्हा गूढवादी सत् आणि भासमान यांत विरोध दाखवितात तेव्हा ‘सत्य’ (real) या शब्दाला तार्किक नव्हे, भावनिक अर्थ देतात; कोणत्या तरी अर्थी जे महत्त्वाचे आहे असा त्यांचा अर्थ असतो. जेव्हा ते म्हणतात की काळ असत् आहे तेव्हा त्यांना म्हणायचे असते की कुठल्यातरी अर्थी आणि केव्हातरी सबंध विश्वाचाविचार, निर्मात्याने हे जग निर्माण करण्याचे ठरविले तेव्हा त्याने केला असेल तसा,आपणही करावा. तसे कल्पिल्यास सर्व बदल, परिवर्तने एका पूर्ण सबंधात (whole) येतात. भूत, वर्तमान आणि भविष्य कोणत्यातरी अर्थी एकदम राहतात, आणि वर्तमानाला आपल्या दैनंदिन व्यवहारात असते तशी अग्रगण्य सत्ता राहणार नाही. जर हा अर्थ आपण स्वीकारला, तर गूढवाद एक भावना व्यक्त करतो, वास्तव नाही; तो काही प्रतिपादीत नाही, आणि म्हणून त्याचे खंडन किंवा मंडन करणे शक्य नाही. गूढवादी प्रतिपादने करीत असतात याचे कारण ते आपल्या भावनेचे वैज्ञानिक वास्तवतेहून वेगळे महत्त्व दाखवू शकत नाहीत. ते हे मत स्वीकारतील असे अर्थातच नाही, परंतु ज्याचा दावा काही प्रमाणात मान्य करणे वैज्ञानिक बुद्धीला त्याज्य वाटणार नाही असे ते एकमेव मत मला दिसते.

गूढवाद्यांची खात्री आणि त्यांचे आंशिक मतैक्य हे काही त्यांचे म्हणणे मान्य करण्याचे निर्णायक कारण नव्हे. वैज्ञानिकाला जेव्हा आपल्याला जे दिसले ते इतरांना दाखवायचे असते तेव्हा तो आपले सूक्ष्मदर्शक आणि दूरदर्शक यंत्र व्यवस्थित मांडतो, म्हणजे तो बाह्य जगात काही बदल करतो, पण निरीक्षकाकडून फक्त डोळ्याचीच अपेक्षा करतो. उलट गूढवादी प्राणायाम, उपवास इत्यादि उपायांनी निरीक्षकात बदल घडवून आणतो, आणि बाह्य अवलोकनाचा निष्ठेने त्याग करून निरीक्षकात काही बदल घडावा अशी अपेक्षा करतो. (काही अशा शिस्तीला आक्षेप घेतात. ते म्हणतात की गूढवादी अनुभव अशा कृत्रिम उपायांनी मिळू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टीने त्यांच्या या म्हणण्याचे परीक्षण करणे अधिकच कठीण होते. पण निदान उपवास आणि तापसी जीवन गूढानुभवाला मदत करतात याविषयी सामान्यपणे एकमत आहे.) आपणा सर्वांना माहीत आहे की अफू, गांजा आणि मद्य यांचे निरीक्षकावर काही परिणाम होतात. पण हे परिणाम आपण कौतुकास्पद मानीत नसल्यामुळे क्विाविषयीच्या उपपत्तीत त्यांचा उपयोग करीत नाही. त्यांच्या द्वारा सताचे काही अंश गवसत असतीलही, पण ते शहाणपणाचे साधन आपण मानीत नाही. दारूच्या नशेत साप पाहणारा दारुडा आपल्याला इतरांपेक्षा भिन्न सत्य प्रकट झाले आहे असे समजत नाही. काहीशी अशा प्रकारच्या समजुतीतून बॅकसच्या पूजेचा पंथ निघाला असला पाहिजे. आपल्या काळात विल्यम जेम्स यांनी म्हटल्याप्रमाणे लाफिंग गॅस (laughing gas)मुळे येणार्या. अवस्थेत काही सत्ये आपल्याला प्रकट झाली असे सांगणारे लोक आहेत. जो थोडे खातो आणि स्वर्ग अनुभवतो व जो जास्त खातो आणि साप पाहतो त्यात आपण वैज्ञानिक दृष्टीने भेद करू शकत नाही. ते दोघेही रुग्ण शारीरिक अवस्थेत असतात म्हणून त्यांना असाधारण (abnormal) गोष्टी दिसतात. साधारण (normal) आलोकनांचा उपयोग जगण्याच्या संघर्षात होतो, त्यामुळे त्यात वास्तवाशी काही संवाद असावा लागतो; परंतु असाधारण(abnormal) आलोकनात असा संवाद अपेक्षिण्याचे काही कारण नसते, आणि म्हणून त्यांचे प्रामाण्य साधारण (normal) आलोकनापेक्षा जास्त असू शकत नाही.

४. बॅकस (Bacchus) मद्याची ग्रीक देवता. याच्या उत्सवात मद्याचा उपयोग भरपूर केला जाई. ५. नाइट्स् आक्सॉइड. हे घेतल्याने आल्हादक अनुभव येतो.

गूढवादी भावना जर निराधार समजुतीपासून मुक्त झाली, आणि ती जर मनुष्याला सामान्य व्यवहारातून उठविण्याइतकी तीव्र नसेल, तर ती तत्त्वचिंतनात मिळते त्याच प्रकारचे, पण अधिक उत्कृष्ट स्वरूपाचे काहीतरी मूल्यवान देऊ शकेल. व्यापकता, शांतपणा आणि गाढता यांचे मूळ या भावनेत असू शकेल, कारण तिच्यात सर्व स्वार्थ लुप्त झालेला असतो, आणि मन विश्वाच्या विराट पसार्याकचा आदर्श (आरसा) बनते. ज्यांना हा अनुभव आलेला असतो, आणि जे त्याला विश्वाविषयीच्या प्रतिपादनांशी संबद्ध मानतात ते स्वाभाविकच त्यांना बिलगून राहतात. मला स्वतःला ती प्रतिपादने आवश्यक वाटत नाहीत, आणि ती खरी मानण्याचे कारणही दिसत नाही. सत्याप्रत जाण्याच्या वैज्ञानिक रीतीहून अन्य रीत मी मानू शकत नाही, पण ज्या अनुभवातून धर्म उद्भवला त्याचे मूल्य मी भावनांच्या क्षेत्रात नाकारीत नाही. असत्य समजुतींशी संबद्ध झाल्याने त्यांतून पुष्कळ शिवाबरोबर पुष्कळ अशिवही निर्माण झाले आहे; त्या संबंधातून सुटल्यामुळे शिव तेवढेच शिल्लक राहील अशी आशा करता येईल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.