खरंच, पुनर्जन्म आहे? (पूर्वार्ध)

ऑगस्ट १९९५ च्या आजच्या सुधारक मधील हा लेख वाचून आश्चर्यच वाटले. अशा प्रकारचा लेख आजचा सुधारकमध्ये अपेक्षित नव्हता. पुनर्जन्मावरील लेख छापायला माझा आक्षेप नाही. परंतु भारावून जाऊन लिहिलेल्या लेखाऐवजी अधिक विवेचक लेख शोभून दिसला असता. केवळ एक केस-रिपोर्ट वाचून श्री. प्र. के. कुलकर्णीचा अश्रद्धपणा हादरून गेला याचा खेद वाटला. प्रा. अकोलकरांचा मूळ शोधनिबंध वाचून निर्माण झालेली आपली वैचारिक अस्वस्थता श्री. प्र. ब. कुलकर्णी यांनी मोकळेपणाने मांडली आहे. ‘खरं, पुनर्जन्म आहे?’हा लेख वाचल्यावर (बहुधा मी श्री. प्र. ब. कुलकर्णीपेक्षा कमी अश्रद्ध असूनही) माझी प्रतिक्रिया मात्र वेगळी झाली. शारदा केसकडे वेगळ्या दृष्टीने बघणे शक्य व जरूर आहे. तसेच केसबाबत दिलेल्या पुराव्यांची व युक्तिवादांची कठोर चिकित्साही करणे आवश्यक आहे. यासाठी मूळ लेख (प्रा. व. वि. अकोलकरांचा) मिळविण्यासाठी श्री. कुलकर्णी व प्रा. अकोलकर यांना कार्ड टाकली. प्रा. अकोलकरांनी कार्ड मिळताच तात्काळ आपला मूळ शोधनिबंध, त्या संदर्भात त्यांच्याकडे असलेल्या काही प्रतिक्रिया व इतर माहिती देणारे सविस्तर पत्र स्वखर्चाने पाठवून दिले. याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.त्यांनीच दिलेली सामुग्री वापरून त्यांच्याच शोधनिबंधावर टीका करणे भावनिकदृष्ट्या क्लेशकारक पण बौद्धिक दृष्ट्या अपरिहार्य वाटते. श्री. प्र. ब. कुलकर्णी यांनीही प्रा. अकोलकरांच्या शोधनिबंधाची त्यांच्याकडची प्रत स्वखर्चाने पाठवून दिली. ती मला जरा उशीरा मिळाली. तरीही त्यात त्यांनी केलेल्या खुणांचा मला ही प्रतिक्रिया लिहिताना उपयोग झाला.
प्रा. अकोलकरांचा मूळ शोधनिबंध खूपच विस्तृत आहे. त्यातील सर्वच मुद्द्यांना उत्तर देणे शक्य असले तरी विस्तारभयास्तव मी तसे केलेले नाही. प्र. ब. कुलकर्णीच्या लेखात आलेल्या माहितीपैकी काही कळीचे मुद्दे मी उत्तर देण्यासाठी निवडले आहेत. शारदा केसबाबत इतरही काही (स्टीव्हन्सन आणि पसरिचा) संशोधकांनी स्वतंत्रपणे संशोधन करून आपली मते वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध केली आहेत. डॉ. श्रीमती पसरिचा यांचे Claims of Reincarnation हे पुस्तक माझ्याकडे आहे. इतर संदर्भ अजून मिळाले नाहीत. डॉ. परिचा व डॉ. स्टीव्हन्सन हे पुनर्जन्माबाबत ख्यातनाम संशोधक आहेत. ते दोघेही प्रा. अकोलकरांप्रमाणेच पुनर्जन्म ही काही केसेसमध्ये जवळजवळ सिद्ध झालेली शक्यता मानतात. डॉ. स्टीव्हन्सन आणि डॉ. पसरिचा यांनी प्रथम संयुक्तपणे आणि नंतर डॉ. पसरिचा यांनी एकट्याने प्रा. अकोलकरांप्रमाणेच कित्येक वर्षे शारदा केसचा अभ्यास केलेला आहे. वर उल्लेख केलेल्या पुस्तकात शारदा केसची माहिती देण्यात आलेली आहे (पाने २५३ ते २५६).
प्रा. अकोलकर आणि डॉ. स्टीव्हन्सन व डॉ. पसरिचा यांनी अत्यंत कष्टपूर्वक आणि प्रामाणिकपणे शारदा केसचा अभ्यास केलेला आहे असे गृहीत धरून मी सर्व विवेचन केलेले आहे. शारदा केसबाबत ही दोन स्वतंत्र संशोधने कितपत जुळतात हेही पाहिले पाहिजे. श्री. प्र. ब. कुळकर्णीचा लेख वाचण्यापूर्वी शारदा केसबाबत मी काहीही ऐकलेले नव्हते. या केसच्या संबंधित कोणत्याही माणसाला मी भेटलेलो नाही. त्यामुळे सर्व विवेचनात मी माझ्यापुढे असलेला लेखी पुरावा तेवढा विचारात घेतला आहे.
प्रथम आपण शारदा केसबाबत प्रा. अकोलकरांनी दिलेली माहिती आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष तपासू. आजचा सुधारकच्या वाचकासमोर फक्त प्र. ब. कुलकर्णी यांचा लेख आहे. त्यामुळे त्या लेखाच्या बाहेर जाण्याचे मी टाळणार आहे. त्यांच्या लेखातील कोणत्याही विधानावर टिप्पणी करताना ते विधान प्रा. अकोलकरांच्या मूळ शोधनिबंधाशी जुळते आहे ना याची खात्री मी करून घेतली आहे. प्र. ब. कुळकर्णीच्या लेखात नसलेल्या, पण प्रा. अकोलकरांच्या शोधनिबंधात असलेल्या, गोष्टींचा जेथे जेथे उल्लेख केला आहे तेथे प्रा. अकोलकरांचा उल्लेख केलेला आहे.
चार महत्त्वाच्या मुद्द्यांबाबतचे पुरावे आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष तपासू.
उत्तरा या व्यक्तीमध्ये, वयाच्या ३२ वर्षांनंतर, कधी कधी शारदा या वेगळ्या व्यक्तिमत्त्वाचे (व्यक्तीचे नव्हे) सर्जन होत असे हे मान्य करता येते. शारदेचे हे व्यक्तिमत्त्वसाधारणपणे १९ व्या शतकातील बंगाली ब्राह्मण स्त्रीप्रमाणे असे. या काळात ती बंगाली बोले, बंगाली चालीरीती तिच्या वागण्यात आढळून येत आणि उत्तरेविषयी तिला काहीही माहिती नसे हेही मान्य करता येते. परंतु शारदेच्या व्यक्तिमत्त्वात तिला उत्तरेची जाण असल्याची काही लक्षणे दिसून आली हे प्रा. अकोलकरांनी मांडले आहे (पान २३५). या सर्व गोष्टींबाबत अनेक मुद्दे प्रा. अकोलकरांनी दिले आहेत. त्यातील अनेक कोणीच तपासलेले नाहीत.
शारदेचे बंगाली बोलणे व लिहिणे
(१) (शारदेचे) ‘… बंगाली बोलणे शुद्ध आणि संस्कृतप्रचुर असे असा उल्लेख प्र. ब. कुलकर्णीच्या लेखात आहे (पान १४१). प्रा. अकोलकरांच्या शोधनिबंधात (पान २११) ही माहिती दिल्यानंतर एकच वाक्य सोडून ‘तिची बोलीभाषा (dialect) नंतर बरद्वान (वर्द्धमान) बोलीभाषा म्हणून ओळखण्यात आली असे वाक्य येते. या दोनही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत? ती दोन प्रकारे बंगाली बोले असाही उल्लेख नाही, तर तिने बोललेल्या बंगाली भाषेची ही दोन वर्णने एकापाठोपाठ येतात. (म्हणजे एखादा मराठी माणूस एकाच प्रकारची मराठी बोलतो आणि त्याच्या मराठीला ‘व्याकरणदृष्ट्या शुद्ध व संस्कृतप्रचुर मराठी’ आणि ‘वर्हातडी मराठी अशी दोनही वर्णने लागू होतात या फोल युक्तिवादासारखे हे होते. एकतर त्याची मराठी शुद्ध, संस्कृतप्रचुर असेल किंवा ती वर्हा डी असेल.) बरे बंगालीची बरद्वानी बोली हीच संस्कृतप्रचुर आहे आणि तीच बंगालमध्ये शुद्ध (grammatically flawless) मानली जाते अशी माहितीही प्रा. अकोलकर देत नाहीत.
शारदा बोलत असलेली बंगाली सुमारे १५० वर्षांपूर्वीची आहे आणि ती विशिष्ट बोलीभाषा आहे असे ठरविले कोणी? प्रा. अकोलकरांनी त्यासाठी अनेक बंगाली माणसांचे साहाय्य घेतले. कारण त्यांना स्वतःला बंगाली येत नाही. या बंगाली माणसांत काही प्राध्यापक, लेखकही होते. परंतु त्यांच्यापैकी एकही जण १५० वर्षांपूर्वीची बरद्वानी बोलीभाषा जाणणारा होता असा प्रा. अकोलकरांचाच दावा नाही. शारदेचे बंगाली बोलणे टेप करणे आणि नंतर ते १५० वर्षांपूर्वीची बंगाली बरद्वानी बोलीभाषा माहिती असणान्याला दाखविणे हा मार्ग का अवलंबविण्यात आला नाही असा प्रश्न पडतो. (१९७६ साली पुण्यात दोन दिवस उत्तरेच्या अंगात शारदेचा संचार झाला होता तेव्हा बोलणे टेप करणे शक्य होते.)
आपल्या शोधनिबंधात प्रा. अकोलकरांनी Some Remarks Regarding Sharada’s Bengali (पान नं. २३९) या शीर्षकाखाली शारदेच्या बंगालीबाबत डॉ. भट्टाचार्य आणि प्रो. रॉय यांची मते दिलेली आहेत. डॉ. भट्टाचार्यांच्या मते, ‘She spoke in typical Burdwan dialect. The syntax and inflections were colloquial as distinguished from scholarly. म्हणजे प्रा. अकोलकरांच्या साक्षीदाराच्या मतेच शारदेचे बोलणे शुद्ध व संस्कृतप्रचुर नव्हते. यानंतर याच पानावर काही परिच्छेदांनंतर पुढील वाक्य येते : ‘Asregards Sharada’s pronunciation Dr.R. Bhattacharya pointed out that it was reminiscent of Burdwan accent, but was notexactly like it.’ अशा प्रकारे शारदेच्या बरद्वानी बंगालीबद्दल डॉ. भट्टाचार्यांनी उलटसुलट मते प्रदर्शित केलेली आहेत. तर प्रो. रॉय यांच्या मताप्रमाणे ‘Her pronunciation of Bengali has the impress of Marathi, which may be due to her lifelong habit of speaking Marathi.’ म्हणजे डॉ. भट्टाचार्य आणि प्रो. रॉय हे प्रा. अकोलकरांचे साक्षीदारच शारदेचे बोलणे बरद्वानी बोलीभाषेतच होते असे ठामपणे म्हणत नाहीत. पण दुर्दैवाने प्रा. अकोलकर मात्र ‘Her own dialect was later identified as Burdwan dialect. असे ठाम विधान करतात (पान २११), आणि श्री. प्र. ब. कुलकर्णी मूळ शोधनिबंध अनेकवेळा वाचूनही त्यावर विश्वास ठेवतात.
(२)आपल्या मोठ्या बहिणीला तिने बंगाली व्याकरण शिकवायचा प्रयत्न केला.‘कानडेमामा आणि श्रीमती कोठारे’ यांच्या बोलण्यातले व्याकरणदोष तिने दाखविले अशीशारदेची माहिती दिली गेलेली आहे (कुलकर्णी, पान १४४). नेमके काय व्याकरण शिकविले आणि कोणते दोष दाखविले याचा उल्लेख मूळ शोधनिबंधातही नाही. शास्त्रीय संशोधनात हे नीट स्पष्ट करणे आवश्यक आहे. प्रा. अकोलकर यांच्या लेखात शारदेच्या बंगाली लिखाणातील चुकांबद्दल स्पष्टीकरण देण्यात आले आहे (पान २३९). Sharada, who had learned from her uncle how to read and write Bengali, may not have progressed beyond the elementary level of writing, or Uttara, who had taken elementary instruction in Bengali script for only a few days, may not have acquired an adequate skill.’ जी व्यक्ती लिखाणाबाबत प्राथमिक दर्जाचेच शिकली आहे, ती व्यक्ती दुसर्‍याला व्याकरण कसे शिकवू शकेल या प्रश्नाचे उत्तर मूळ लेखात कोठेही मिळत नाही.
मग शारदा जे बंगाली बोले ते कोठून आले असावे. याबाबत प्रा. अकोलकरांनी तपास घेतला आहे पण त्यात अधिक नेमकेपणा असणे आवश्यक होते.
(१)उत्तरेच्या अहमदाबाद येथील मामांना बंगाली येत असे. तिच्या मामेबहिणीला -रांचीच्या सोनलला, बंगाली येत असे (कुलकर्णी पान १४२). उत्तरा शारदा-अवस्थेत जाऊ लागण्यापूर्वी या नातेवाईकांशी तिचा किती संपर्क आला होता, त्यांचे बंगाली बोलणे तिने ऐकले होते का, त्यांच्याशी उत्तरा कधी बंगाली बोलली होती का याची चौकशी प्रा. अकोलकरांनी केलेली नाही.
(२)शाळेच्या अकराव्या वर्गात (मूळ लेखात matriculation year असा उल्लेख) आपल्या एका वर्गमित्रासमवेत (F) तिने श्री. शं. गो. चट्टे या महाराष्ट्रीय अभ्यासकांकडे बंगालीचे प्राथमिक धडे घेतले होते. एखादे बाळबोध बंगाली पुस्तक वाचण्याइतपत त्यांची प्रगती झाली होती (कुलकर्णी, पान १४२). उत्तरा नेमकी किती बंगाली शिकली होती हो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. श्री. चट्टे यांच्याशी प्रा. अकोलकरांनी संपर्क साधल्यांचा वा तसा प्रयत्न केल्याचा उल्लेख शोधनिबंधात नाही. त्यामुळे उत्तरेला श्री चट्टे यांनी कितीबंगाली शिकविले, ते मराठीतून शिकवायचे का बंगालीतून, ते तिला बंगालीत बोलायला लावायचे का, बंगाली धार्मिक गीते त्यांनी शिकविली होती का ही शारदा केसच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती मिळत नाही.
(३)उत्तरेच्या थोरल्या भावाकडे (प्रभाकर) ती वयाच्या १४ व्या वर्षानंतर २ वर्षे शिक्षणासाठी राहिली होती. हा काळ तिच्या मॅट्रिक्युलेशनचाच आहे. या थोरल्या भावाने उत्तरा बंगाली शिकली होती असे सांगितले (अकोलकर, पान २१५). ही माहिती दिल्यानंतर लगेच ‘He did not saywhether she hadlearned to speak Bengali.’ असे वाक्य येते. प्रा. अकोलकरांनी याबाबत प्रभाकरकडे नंतर सविस्तर विचारणा का केली नाही? मूळ शोधनिबंधात (पान. २१२) ‘Uttara’s father reaffirmed that Uttara did not know Bengali other than as Sharada’ असा निर्देश आहे. वडील व भाऊ यांच्या विधानांमध्ये एवढा परस्पर विरोध कसा आहे याचाही तपास करण्यात आला नाही.
(४) उत्तरेकडून प्रा. अकोलकरांना ती बंगाली शिकल्याची माहिती मिळालेली नाही. याबाबत प्रा. अकोलकरांच्या शोधनिबंधात पान २१५ घर एक तळटीप देण्यात आली आहे. ती पुढीलप्रमाणे ‘F, on an occasion whenlmet him in Poona in October 1976, said: “I did recently ask her (Uttara) how she could deny she had learned Bengali when in fact we had learned if together, but she dismissed my question, saying: ‘Is that to be called learning Bengali’?” Perhaps Uttara thought that the elementary instruction she had received from Mr. Chatte was too meagre to have any relevance to the fact that Sharada spoke in Bengali.’ म्हणजे उत्तरेने आपणहून संशोधकांच्या दोनही गटांना (अकोलकरआणि स्टीव्हन्सन व पसरिचा), दोघांनीही वर्षानुवर्षे या केसचा तपास केला असूनही मी निदान थोडे बंगाली शिकले होते याची माहिती दिली नाही. कारण ती तिला महत्त्वाची वाटली नाही! याबाबत निदान प्रा. अकोलकरांनी नेटाने, स्वतंत्रपणे काही माहिती मिळवलीआणि ती संशोधकाला साजेशा प्रामाणिकपणाने आपल्या लेखात मांडली. स्टीव्हन्सन आणि पसरिचा यांना तर उत्तरेच्या बंगाली शिकण्याची काहीच माहिती मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी ही केस Xenoglossy (या जन्मात न शिकलेली भाषा बोलता येणे) ची आहे आणि शारदेचे बंगाली बोलणे हे paranormal knowledge चे उदाहरण आहे असे वेगवेगळ्या जर्नल्स आणि पुस्तकांतून प्रसिद्ध केले! (पसरिचा, पान २५५).
या सर्व पाश्र्वभूमीवर उत्तरेला खालील प्रश्न विचारले जाणे आवश्यक होते : तू नेमकी किती बंगाली शिकलीस? कोणाकोणाकडे शिकलीस? किती बंगाली लोकांशी तुझा परिचय होता? तुझ्या बंगाली शिकण्याबद्दल वेगवेगळी माणसे वेगवेगळी माहिती कशी काय देतात? परंतु असे प्रश्न प्रा. अकोलकरांनी उपस्थित केले नाहीत. | अशा प्रकारे उत्तरा नेमकी किती बंगाली शिकली होती याची पूर्ण माहिती (खुद्दउत्तरेकडून आणि इतरांकडूनही) संशोधक मिळवू शकले नाहीत. ती नेमके कशाप्रकारचे बंगाली बोले याचे बंगाली भाषेच्या अभ्यासकांकडून (केवळ बंगाली येणार्‍या लोकांकडून तपास करणे पुरेसे नाही.) मत घेण्यात आले नाही. प्रा. अकोलकरांनी दिलेल्या बंगाली माणसांच्या दाखल्यांवरून ‘ती शुद्ध, संस्कृतप्रचुर आणि त्याचवेळी बरद्वानी बोलीत बोले हा दावा सिद्ध होत नाही. उत्तरेनेही ती बंगाली शिकलेली होती याची माहिती कोणत्याही संशोधकाला दिलेली नाही. या सर्व गोष्टी लक्षात घेता उत्तरेला बंगाली (निदान पुरेसे) येत नव्हते आणि शारदा जे बंगाली बोले ते तिच्या पूर्वजन्मातले असे मानता येत नाही. याबाबत प्रा. अकोलकरही (पान २१५) ‘Though it appears that Uttara did not take formal lessons in Bengali, the possibility of incidental learning on Uttara’s part in a city with a good sprinking of Bengalis cannot be entirely ruled out’ हे मान्य करतात.
शारदेचे बंगाली स्त्रीसारखे वागणे
याबाबत अनेक उदाहरणे देण्यात आलेली आहेत. उत्तरेने बंकिमचंद्र चटर्जी, शरच्चंद्र, रवींद्रनाथ टागोर यांच्या कादंबर्‍यांची मराठी भाषांतरे आवडीने वाचली होती. त्यामुळे १९ व्या शतकातील बंगाली स्त्रीजीवनाची तिला नक्कीच चांगली कल्पना होती. उत्तरा हायस्कूलमध्ये असताना तिने नाचात आणि नाटकांत भाग घेतल्याची माहिती प्रा. अकोलकरांच्या लेखात आहे (पान २१४). यावेळी तिने बंगाली नाच, बंगाली भूमिका केली होती का हे तिला विचारण्यात आलेले नाही. नागपूरमध्ये बरेच बंगाली असल्याने जसे तिचे बंगाली भाषेचे incidental learning होऊ शकते, त्याचप्रमाणे आणि त्यापेक्षा अधिक सुलभतेने तिला बंगाली चालीरीती माहिती होऊ शकतात. या आक्षेपांवरून शारदेचे गेल्या शतकातील बंगाली स्त्रीप्रमाणे वागणे यासाठी पुनर्जन्म (वा यासारखेच paranormal) कारणच मानले पाहिजे असे नाही हे स्पष्ट होते.
(अपूर्ण)
सहयोग हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटलजवळ सातारा- ४१५००
[श्री. प्रवीण खांडवे, (गिरिस्थान कॉलनी, चिखलदरा, ४४४ ८०७) यांनीसुद्धा या विषयावर एक लेख पाठविला आहे, डॉ. दाभोलकर आणि श्री. खांडवे यांचे मुद्दे पुष्कळसे समान असल्यामुळे एकच लेख प्रकाशित करीत आहोत.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.