कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग १)

परिपूर्ण स्त्रीमुक्तीच्या संकल्पनेला जो विरोध होत आहे त्याचे मुख्य कारण, माझ्या समजुतीप्रमाणे, त्याचा परिणाम कुटुंबविघटनामध्ये होईल अशी भीती आम्हाला वाटते; हे आहे. म्हणून जी आमची कुटुंबे आम्ही प्राणपणाने जपत आहोत त्यांचे खरे स्वरूप कसे आहे ते पाहू. त्यासाठी आपणाला कुटुंबाची शास्त्रशुद्ध व्याख्या करण्याची गरज नाही. पण साधारणपणे असे म्हणता येईल की कुटुंबामध्ये एका घरात राहणारे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, एकमेकांशी ज्यांना आपले नाते सांगता येते असे कमीअधिक वयाचे स्त्रीपुरुष असतात. त्यांचे नाते रक्ताचे असतेच असे नाही, व त्यांचे एकमेकांशी संबंध पैशांवर अवलंबून नसतात. परंतु ही कुटुंबाची कल्पना सगळीकडे सारखी नाही. तिच्यामध्ये स्थानपरत्वे पुष्कळ फरक पडतो.
पाश्चात्त्य देशांमधले कुटुंब पहिल्याने पाहू. ते कुटुंब पुष्कळ पिढ्यांपासून लहान राहत आले आहे. ते पतिपत्नी व त्यांची त्यांच्यावर अवलंबून असलेली लहान वयाची मुले इतक्यांचे मानले जाते. उलट ते आमच्या येथे बर्या्चशा भागामध्ये अजून संयुक्त कुटुंबाच्या धर्तीवरचे मानले जाते. चुलत भावंडे, चुलतचुलत भावंडे, आते, मामे, मावस भावंडे, साळे, मेहुणे, साडू, जावा (थोरली, धाकटी, जेठानी, देवरानी), नणंदा, भावजया अशा सगळ्या नात्यांचा निर्देश करण्यासाठी आपणाकडे एका शब्दाची विभिन्न नावे आहेत. तशी इंग्लिशमध्ये नाहीत. माझ्या समजुतीप्रमाणे कोणत्याच युरोपीय भाषेत ती नसावीत. त्यामुळे जी एक गोष्ट आपल्या लक्षात येते ती अशी की त्यांच्या कुटुंबाची वीणच आपल्या येथल्या कुटुंबापेक्षा वेगळी आहे. त्यांचे कुटुंब आपल्या मानाने फार सैल आहे. भावंडांचे एकमेकांशी असलेले भावबंधच नव्हेत तर आईबापांचे आणि मुलांचे भावबंधसुद्धा अगदी क्षीण असतात. मुलींचे मुलांच्या मानाने दृढतर असतात. आईचे व मुलीचे थेटपर्यन्त थोडेफार टिकलेले दिसतात. मुले पंधरासोळाव्या वर्षी घराबाहेर पडतात. पुढे शिक्षण घ्यावयाचे असेल तर अंशकालीन कामे करून शिक्षण चालू ठेवतात, नाहीतर नोकरीधंद्याला लागतात. क्वचितप्रसंगी त्या वयामध्येच लग्ने करून नवीन घर वसवितात. पुढे क्षुल्लक कारणासाठी घटस्फोट घेऊन नवे संसार मांडतात.
ह्या सार्या चा अर्थ असा की मुले एकदा आईपासून सुटी झाली की ती पूर्ण समाजाची होतात. पुढे त्यांची काळजी त्यांचे आईबाप घेत नाहीत तर community (बिरादरी) घेते. Community साठी चांगल्या अर्थवाही मराठी शब्दाच्या अभावी तूर्त बिरादरी हा शब्द वापरण्याचे योजले आहे. त्याचा स्थूल अर्थ परस्परांविषयी भ्रातृभाव असलेला मानवसमूह असा मी करतो. पाश्चात्त्य देशांमध्ये बिरादरी सुट्या व्यक्तींचीच बनलेली आहे. कुटुंबांचीनाही. त्यामुळे कुटुंब मोडले तरी बिरादरी मोडत नाही. उलट ती सुट्या व्यक्तींची पूर्वीइतकीच काळजी घेताना दिसते.
तेथली समाजरचना पाहिली तर तेथे व्यक्ती, बिरादरी व राष्ट्र अशी एकापेक्षा एक मोठी होत गेलेली वर्तुळे दिसतात. आपल्याकडे तीच वर्तुळे व्यक्ती, कुटुंब व जात अशीआढळतात.
माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. जगू शकत नाही. जगण्यासाठी माणसाला एकमेकांची सारखी मदत लागते. ही मदत लोक एकमेकांना कधी पैशाच्या मोबदल्यात देतात तर कधी कुटुंबीय म्हणून प्रेमाने, आपुलकीच्या भावनेने देतात. आपल्याकडे कुटुंबीयांनी ती मदत एकमेकांना पैशांच्या मोबदल्याशिवाय द्यावी अशी अपेक्षा आहे.
आपल्याकडच्या संयुक्त कुटुंबाने कुटुंबामधल्या सगळ्या जबाबदार्याव पेलाव्या, सगळ्यांच्या अडचणी सोडवाव्या अशी मूळ परंपरा आहे. आता संयुक्त कुटुंबे मोडली, ती अगदी लहान झाली तरी त्याच अपेक्षा लहान कुटुंबांकडून म्हणजे मुख्यतः स्त्रियांकडून राखल्या जातात. त्या चुकीच्या आहेत. संयुक्त कुटुंबांची काही वैशिष्ट्ये चाळींमध्ये शिल्लक होती. ती फ्लॅट – संस्कृतीमध्ये पूर्ण नष्ट झाली. पैशांचे महत्त्व झपाट्याने वाढत चालले आहे व त्याचबरोबर व्यक्तींचा एकाकीपणा व स्त्रियांच्या जबाबदार्यात ह्यांत विलक्षण वाढ झाली आहे. ही सारी समाजाच्या हासाची लक्षणे आहेत. हे पाश्चात्त्यांचे अनुकरण नाही, किंवा औद्योगिकीकरणामुळे अपरिहार्यपणे निर्माण झालेली ही परिस्थिती नाही. विवेकशून्यतेमुळे आपल्या समाजाला लागत असलेले ते चुकीचे वळण आहे. मी लहान विभक्त कुटुंबांच्या पक्षाचा नाही. पण ह्या मुक्ष्यांचा विस्तार मागाहून करू.
आपल्याकडे एकमेकांविषयीच्या जबाबदार्यांुच्या संबंधांत कुटुंबाची वीण अतिशय घट्ट असल्यामुळे मुले ही जन्मभर त्यांच्या आईबापांचीच राहतात. त्यांची जबाबदारी बिरादरीची कधीच होत नाही. मुलाचा आणि आईचा संबंध कधीच क्षीण होत नसल्यामुळे घरामध्ये येणार्याध नववधूला सासू मनाने सामावून घेतच नाही. बाह्यतः तिने सुनेचे स्वागत केले असले तरी आतून ती सतत–जन्मभर-सुनेचा प्रतिरोध किंवा प्रतिकार करीत असते. घरातले तिचे स्थान आपल्यापेक्षा कमजोर कसे राहील हे ती नेहमी पाहत असते.
त्याचप्रमाणे आपल्याकडचे एक कुटुंब हा बाहेरून जरी एकजिनसी गट दिसत असला तरी वास्तवात तो तसा नसण्याचीच शक्यता अधिक असते. आपल्याकडे सासूसुनांचे, नणंदा भावजयाचे, जावाजावांचे संबंध कुटुंबांच्या एकजिनसीपणाला सतत छेद देत असतात. पुष्कळदा भावाभावांचे संबंधही नाममात्रच असतात. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबसंस्थेचे कितीही गोडवे गात असलो तरी आपल्याकडे पुष्कळदा कुटुंबात एकतर्फी नातीच अधिक असतात. परस्परांना बांधून ठेवणारे भावबंध क्वचित. आई मुलाला व बायको नवर्यासलामनाने चिकटून राहण्याचा प्रयत्न करते आणि पुरुष घरामधल्या स्त्रियांना असुरक्षित वाटेल असे नेहमी तुटक वागत असतात.
तरुणपणी नवरा दुसर्या बाईच्या आहारी जाईल व उतरत्या वयात मुलगा सुनेच्या आहारी जाईल व असे घडल्यास आपले काय होईल, आपल्याला कोठेच आसरा राहणार नाही ह्या भयातून आपल्या मध्यमवर्गीय स्त्रिया कधीच बाहेर पडत नाहीत. (साप म्हणू नये धाकला आणि नवरा म्हणू नये आपला (!)) त्यांचे सारे आयुष्य आपले हे भय बाहेर दिसून पडू नये म्हणून केलेल्या दुटप्पीपणाने ग्रासून टाकलेले असते. आयुष्यभर त्या मुखवटे धारण करून वावरतात. घरात शान्तता नांदवावयाची असेल तर त्यांना दुसरा इलाजच नसतो. (स्त्रीमुक्ती म्हणजे ह्या मुखवट्यांचा त्याग!)
आपली पूर्ण कुटुंबसंस्था ह्या ढोंगीपणाने खाऊन टाकली आहे. परिणामी प्रत्येक स्त्री ही आपली कुटुंबामधली बैठक भक्कम करण्यासाठी सतत लहानसहान कारस्थाने करीत असते. त्यांयोगे साहजिकच घरातल्या इतर माणसांवर अन्याय होत असतात. कुटुंबामधले वातावरण बाह्यतः शान्त असले तरी आतून बहुधा नासलेले असते. कुटुंबातील सर्वच सभासदांच्या, अर्थात् त्यांमध्ये पतिपत्नीही आले, हेच घडत असते. काही कुटुंबे ह्या परिस्थितीला सन्मान्य अपवाद असतील, पण ते अपवादच आहेत हे आपण पक्के समजले पाहिजे. आणि हे सारे आमच्या मनांवरच्या आजवरच्या संस्कारांमुळे घडते हेही आपणाला उमजले पाहिजे.
मुख्यतः स्त्रियांना इतके भयभीत किंवा असुरक्षित वाटण्याचे कारण असे की त्यांना कोणत्याही कारणामुळे घराबाहेर पडावे लागले तर खरोखरच त्या सर्वार्थाने उघड्या पडतात. (मनांची असुरक्षितता हा आमच्या नैतिक वर्तनाचा मूलाधार आहे. आमच्या सद्वर्तनाचा इमला मनाच्या असुरक्षिततेच्या पायावर रचलेला आहे!) आमची संस्कृती आज कोल्ह्यालांडग्यांचीच आहे. स्त्रियांना घरात कोल्ह्यांशी व बाहेर लांडग्यांशी मुकाबला करावयाचा आहे अशीच त्यांना शिकवण मिळालेली असते. त्याचप्रमाणे लहानपणी मुलाचे लाड केले तरच म्हातारपणी तो आपणाला विचारील असाही स्त्रियांचा दृढ समज होऊन बसला आहे. तोंडाने जरी आम्ही आमच्या संस्कृतीच्या वसुधैव कुटुंबकत्वाची शेखी मिरवीत असलो तरी आम्ही आपापल्या घरांतच मुलामुलींमध्ये भेदभाव करीत असतो. एकत्र कुटुंबामध्ये आपल्या मुलाला जाऊ जेवावयाला नीट वाढते की नाही हे पाहण्यासाठी मुलाची आई मधूनच फेरी मारून जाते. समाजात तर राहोच, पण एका कुटुंबातही समता क्वचितच असते. त्यामुळे कोणालाच सुरक्षित वाटत नाही. मनात भिनलेली असुरक्षितता समाजस्वास्थ्यासाठी सुद्धा हानिकारक असते.
असुरक्षिततेचा परिणाम फार दूरगामी होत असतो. सगळा समाज स्वार्थी व आपल्यापुरते पाहणारा होतो. एकमेकांचा न्याय्य वाटा कोणीच कोणाला देत नाही. परस्परांविषयीच्या मत्सराचे प्रमाण आपणाकडे फार जास्त आहे. आपल्या बुद्धिमानवैज्ञानिकांचे तेज परदेशांतच फाकते. आपल्या देशात आमच्या संस्कृतीमुळे त्यासाठी अत्यन्त प्रतिकूल परिस्थिती आपण निर्माण करून ठेवली आहे. आर्थिक त्याचप्रमाणे लैंगिक असुरक्षिततेमुळे समाज असूयाग्रस्त व भ्रष्टाचारी होतो. प्रत्येकाला दुसर्या्ला ओरबाडल्याशिवाय सुख मिळू शकत नाही असे वाटते. त्याच्या मनालाच तशी सवय होते. विवेक राहत नाही. क्वचित् ज्यांना सुरक्षितता मिळते ते उन्मत्त होतात, इतरांना हीन लेखतात व तेही वातावरण कलुषित करतात.
असुरक्षिततेचे मनुष्यस्वभावावर व त्यामुळे कुटुंबसंस्थेवर आणि एकूण समाजस्वास्थ्यावर होणारे काही दुष्परिणाम आपण पाहिले. आता कुटुंबाची आणखी एक बाजू पाहू.
आपल्याकडे भारतात लग्ने ठरतात कशी? मुख्यतः देणे घेणे व पत्रिका यांवर. मुलामुलींचे स्वभाव एकमेकांशी जुळतात काय हे जेथे बालविवाह होतात तेथे पाहणे अशक्यच असते. कुळ पाहायचे आणि लग्न ठरवावयाचे! हा प्रकार भारतातल्या ८० कोटींपैकी निम्म्या लोकांच्या वाटणीला आला असेल.
कधी दहा पंधरा मिनिटांच्या जुजबी प्रश्नोत्तरांच्या भरवशावर लग्ने ठरतात. तेवढ्या परिचयाच्या भांडवलावर जन्मभर एकमेकांशी बांधून राहणारे स्त्रीपुरुष (पतिपत्नी) मनाने एकमेकांविषयी अगदी कोरडे असण्याची शक्यता असते. (पदरी पडले आणि पवित्र झालें!) मनात अत्यन्त कटुता बाळगून एकमेकांविषयीची फक्त समाजमान्य कर्तव्ये कशीबशी पार पाडणारी जोडपी संख्येने फार थोडी नाहीत. इतक्या विषम परिस्थितीत जोडपी राहतात ती केवळ लोकापवादाच्या भयानेच राहतात हे काही खोटे नाही. किंवा मुलांचे नुकसान होईल म्हणून स्त्रिया मन मारून कश्याबश्या एका घरात राहतात. तारुण्याचा भर ओसरला की . बहुतेक पतिपत्नींचे उर्वरित आयुष्य बहुधा अशान्त सहजीवनाचेच असते. कधीकधी ते शान्ततामय सहजीवनही असू शकते, पण ते शान्त असो की अशान्त, त्यामध्ये बहुधा स्त्रियांचीच कुचंबणा फार असते. ज्या मुलांमध्ये वर्तनाच्या समस्या आहेत ती मुले बहुशः अशा अशान्त, निष्प्रेम व असुरक्षित कुटुंबांतून आलेली असतात हे आता पद्धतशीर अध्ययनातून सिद्ध झालेले आहे. आपली मुले बिघडू नयेत ह्यासाठी आणि ह्या बुभुक्षित, निघृण आणि क्रूर जगामधली त्यातल्यात्यात सुरक्षित जागा म्हणून आपल्या घराकडे स्त्रिया पाहतात व अगदी नाइलाजाने तेथे आपले आयुष्य कंठतात.
लक्षात घ्या की मी जी ही सरधोपट विधाने करीत आहे ती फक्त महाराष्ट्रीय मध्यमवर्गापुरती नाहीत. माझ्या नजरेसमोर संपूर्ण भारतवर्षातल्या नरनारी आणण्याचा माझा यत्न आहे आणि ह्या परिस्थितीला सन्मान्य अपवाद आहेत ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु आम्ही जसजसे तथाकथित ‘सुसंस्कृतपणाकडे वाटचाल करीत आहोत तसतशी कुटुंबांमधली परिस्थिती बिघडतच चालली आहे. आमचा बुभुक्षितपणा, ढोंग व स्त्रियांची कुचंबणा सुसंस्कृतपणाबरोबर भूमितिश्रेणीने वाढताना आढळत आहे. बाहेरून आज शान्त दिसत असला तरी आतमधून धुमसणाच्या ज्वालामुखीवर आपण बसलो आहोत, जरा कोठे फट मिळाली की आतला लाव्हा भळभळा वाहू लागेल असा विचार मनात आल्यावाचून राहतनाही.
जितकी ‘सुसंस्कृतता जास्त तितके खरे बोलणे कमी व मुखवटे बेमालूम! मला जी स्त्रियांची मुक्ती हवी आहे ती असुरक्षिततेपासून आणि मुखवटे धारण करण्यापासून. घरामध्ये शान्तता नांदावी म्हणून जर पतिपत्नींना एकमेकांशी खोटे बोलावे लागत असेल तर हे कसले वैवाहिक सामंजस्य? ह्याच कुटुंबरचनेचा आम्ही उदोउदो चालविला आहे काय?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.