कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग २)

आतापर्यंत (मागच्या अंकामध्ये) मी माझी काही निरीक्षणे नोंदवली, तशीच आणखी काही पुढे मांडतो.
आपल्या भारतीय कुटुंबामध्ये कुटुंबीयाविषयीच्या सर्व जबाबदाच्या फक्त त्या कुटुंबाच्या सदस्यांनीच पेलावयाच्या आहेत असे आपल्याला वळण असल्यामुळे मुलामुलींचे शिक्षण करणे, त्यांना नोकर्याय मिळवून देणे, त्यांची लग्ने लावून देणे अशा जबाबदारीच्या कामांमध्ये कुटुंबाबाहेरचे लोक एकमेकांना मदत करीत नसतात. उलट ते एकमेकांच्या मार्गात अडथळे निर्माण करीत असतात. कारण आम्ही आपापले प्रश्न आपणच सोडवावयाचे अशी । सगळ्यांना शिकवण दिलेली असते. दुसर्याह शब्दांत ज्या शिकवणीतून आपली कुटुंबे घडतात ती शिकवण आपण फक्त आपल्यापुरते पाहावे अशी आहे; सगळ्यांनी मिळून आपले प्रश्न सोडवावे अशी नाही. त्यांमुळे परिणाम असा होतो की आपल्या समाजामध्ये पूर्ण समाजाची गरज काय व ती कशी पुरवायची ह्याचा विचार कोठल्याही पातळीवर होत नाही.
सगळ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावयाला हवे असा विचार आमच्या सर्वांच्या मनांत वागत नसल्यामुळे, तो आमच्या मनांत उपबोधाच्या किंवा उपचेतनेच्या पातळीपर्यंत (subconscious level पर्यंत) पोचलेला नसल्यामुळे, उलट आम्ही सगळ्यांना (म्हणजे आमची स्वतःची मुले सोडून इतरांना) चांगले शिक्षण मिळणार नाही (थोडक्यात ते द्यावयाचे नाही) असे धरून चालत असल्यामुळे आम्ही मुळात गरजेपेक्षा शाळाच कमी काढतो. नवीन शाळा सुरू करतांना खूप अडथळे आणतो. त्यासाठी पाळावयाच्या अटी/नियम अतिशय कठीण करून ठेवतो. ज्यांचा स्वार्थ अत्यन्त प्रबळ आहे असेच लोक ते अडथळे ओलांडू शकतात. ते नंतर त्यांनी उघडलेल्या शाळांचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात. आम्ही समाजाची घडीच अशी बसवितो की सगळ्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळू शकत नाही. ( हे सारे आमच्या उपबोधाच्या पातळीवर होत असल्यामुळे आम्हाला नकळतहोत असते.) ज्या त्यांतल्या त्यात बच्या शाळा आहेत त्यांना पालकांचे शोषण करणे त्यामुळे शक्य होते. अश्या शाळांमध्ये मुलांना प्रवेश देवविण्यासाठी पालकांना रांगा लावाव्या लागतात, नव्हे, मोठमोठ्या देणग्या द्याव्या लागतात. बहुतेक सर्व प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक फक्त पगार खातात. शिकवतच नाहीत. त्यामुळे कमी लायकीच्या विद्याथ्र्यांना वर ढकलावे लागते.
आपल्या येथील कुटुंबरचना ही काही आकाशातून पडलेली नाही. कुटुंबरचनेचा आपल्या सगळ्यांच्या मनोवृत्तीशी संबंध असतो. मनोवृत्ती कुटुंबात घडते व मनोवृत्तीमुळे कुटुंबरचना घडते. कोठलीही सामाजिक स्थिती व तेथली कुटुंबरचना ह्या परस्परांवर अवलंबून आहेत. एक बदलली की दुसरी बदलते. त्यांचा संबंध अविच्छेद्य आहे असे मी मानतो.
फक्त आपल्याच मुलाला चांगले शिक्षण द्यावयाचे, दुसर्या.च्या मुलाला ते द्यावयाचे नाही हा विचार आपल्याकडच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा आहे; फार जुना आहे. आपल्याकडे लोहारकाम, सुतारकाम, सोनारकाम, विणकाम, वैद्यकी निदान दोनतीन हजार वर्षांपासून होत आहे. ही कारागिरी, हे कौशल्य, कधीही त्या त्या कुटुंबांच्या बाहेर गेल्याचे दिसत नाही. कधी कधी मुलगा बापाचे कौशल्य आत्मसात् करू शकत नसेल तर ते बापाबरोबर नष्ट झाले असेल. पण ते दुसर्या च्या लायक मुलापर्यंत पोचल्याचे आढळत नाही. पूर्ण समाज म्हणून आपण ह्या गोष्टीकडे पाहिलेच नाही. विणकामामध्ये पुष्कळ जास्त लोकांच्या मदतीची गरज असल्यामुळे तेथे ते कुटुंबाबाहेर पसरले. एकेका गावाचे नाव झाले. नागपुरी, बनारसी कोइमतुरी, ढाका, मुर्शिदाबादी, इरकली असे वाण तयार झाले. पण तेथेही ती कौशल्ये जातीच्या बाहेरच्या लायक लोकांपर्यंत पोचल्याचे दिसत नाही. परंतु विणकाम हा बाकीच्या व्यवसायांना अपवाद दिसतो खरा.
लोहारकामाचे कौशल्य इतके बंदिस्त राहिले की लोहारांची दोनचार कुटुंबेसुद्धा एकत्र येऊन एखादे काम करीत आहेत असे दृश्य दिसले नाही. मोठमोठ्या तरफा, यांत्रिक घण व त्यांच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर लोहारकाम भारतात इंग्रज येण्यापूर्वी कधी घडलेच नाही की काय असा मला प्रश्न पडतो. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रान्तीनंतर किती कुटुंबांची पूर्वीची आडनावे बदलून ती Smith (मिस्त्री) झाली हा अभ्यास करण्याजोगा विषय आहे. पूर्वी निराळे काम करणाच्या कुटुंबातील मुलांना तेथल्या लोहारांनी त्या व्यवसायात ओढले असल्याशिवाय Smiths ची प्रजा अशी वाढू शकली नसावी. चालू पिढीत Smiths ची संख्या पुन्हा घटली आहे. पण वाफेची मोठमोठी एंजिने, रेल्वेसाठी लागणारे रूळ हे बनविणे अशी लोहारांच्या एकेकट्या कुटुंबाला कधीच शक्य नसलेली कामे आपल्याकडे घडू शकली नाहीत, इतकेच नव्हे तर अनेक कुटुंबातले लोक एकत्र येऊन लोहारीची कामे पार पाडण्याची परंपरा नसल्यामुळे अशी मोठाली कामे आपल्याकडच्या लोकांच्या नजरेच्या टप्प्यातसुद्धा कधी आली नाहीत असे माझे निरीक्षण आहे. ते चुकीचे ठरल्यास मला आनंद होईल. असो.
पेशवेकालीन महाराष्ट्र ह्या पुस्तकात त्याचे लेखक श्री. वा. कृ. भावे तत्कालीन शिक्षणपद्धतीविषयी काय लिहितात ते पाहण्यासारखे आहेः ‘त्या काळी प्रजेच्या शिक्षणाची गणना सरकारच्या कर्तव्यांत होत नव्हती. ज्याने त्याने आपल्या मुलांच्या शिक्षणाची तजवीजआपल्या इच्छेप्रमाणे व शक्तीप्रमाणे करावी अशी स्थिती असल्यामुळे सर्वांना लागू पडणारी शिक्षणपद्धती तेव्हा नव्हती. मला असे सांगावयाचे आहे की आपली मनोरचना बदलेली नाही. ती ह्याबाबतीत अद्याप पेशवेकालीनचआहे. आपण मनाने त्याच काळात आहोत. जरी सरकारने आता लाजेकाजेस्तव ते कर्तव्य आपले म्हटले आहे, तरी वास्तवात ते तसे फक्त कागदोपत्री आहे. प्रत्यक्षात सरकार आपल्याच स्वभावाच्या लोकांचे असल्यामुळे व आपण सारे मूलतः दांभिक असल्यामुळे आपले बहुतेक सारे शिक्षण हे खोटे शिक्षण आहे. परदेशातसुद्धा ही स्थिती वाईटच आहे तरीपण ती आपल्याइतकी वाईट नाही. थोडा तरतमभाव आहे. त्यामुळे तेथे शाळाप्रवेशासाठी देणग्या द्याव्या लागत नाहीत. (शाळेत प्रवेशासाठी देणगी म्हणजे हुंड्याचाच एक प्रकार आहे. एखाद्या प्रतिष्ठित कुटुंबात आपल्या मुलीला प्रवेश देवविण्यासाठी पैसे मोजणे आणि एखाद्या शाळेत मुलाला प्रवेश देवविण्यासाठी पैसे मोजणे ह्यात कसलाच फरक नाही.) खाजगीकरणाच्या(privatization) नावाखाली तर आता त्याला सरकारमान्यता मिळाली आहे. एक प्रकारे काही विषयांतल्या उच्चशिक्षणाच्या जबाबदारीतून सरकारने आपले हात झटकले आहेत. आणि आपण जणू काही आता तुमचे तुम्ही पाहा. किंवा प्रत्येकाने आपापल्यापुरते पाहावे हा मूळस्वभावच पुन्हा प्रकट केला आहे.
परदेशात शाळेतल्या प्रवेशासाठी देणग्या द्याव्या लागत नाहीत त्याचप्रमाणे परीक्षेत नकला करण्याचे प्रमाण व कागदी प्रमाणपत्रांचे महत्त्वही तेथे आपल्यापेक्षा कमी आहे. शिक्षणातल्या ढोंगाच्या बाबतीत आपला हात जगात कोणी धरीलकी नाही असा विचार स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्याची जी झपाट्याने घसरण झाली आहे ती पाहून माझ्या मनात येतो. मुलांना मिळणाच्या प्रमाणपत्रांचा आणि त्यांच्या लायकीचा कोठे संबंधच राहिला नाही. प्रवेशापासून निकालपत्रकामध्ये नाव पाहिजे त्या श्रेणीत छापून येईपर्यंत बापाचा पैसा नालायक मुलांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असतो. एकीकडे पोराला चांगले गुण मिळवून देणे ही बापाची जबाबदारी. दुसरीकडे द्रव्येण सर्वे वशाः ही परिस्थिती.
कुटुंबरचनेचा आणि सामाजिक परिस्थितीचा संबंध इतका घनिष्ठ आहे हे मुळी आम्ही मान्यच करीत नाही. मला दोन्हीकडे एकाच मनोवृत्तीचे प्रतिबिंब दिसते. आणि एक बदलले की दुसरे बदलणार ह्याची खात्री वाटते.
मुलांना शिकविणे ही जबाबदारी आईबापांची किंवा अलिकडे शिक्षकांची मानली गेल्यामुळे ती मुलांची स्वतःची राहत नाही, मुलांनी स्वतःहून शिकणे असे तिचे स्वरूप आज नाही. त्यामुळे बहुतेक मुलांच्या मागे लागून त्यांच्याकडून अभ्यास करवून घ्यावा लागतो हा एक दोष ह्या पद्धतीत शिरतो, तसाच कमी बुद्धिमत्तेच्या पण प्रामाणिक मुलांवर फार ताण पडतो. आईबापांच्या अपेक्षा पूर्ण करणे त्यांना फार जड जाते. ते त्यांना शक्य झाले नाही तरत्यांना आत्महत्या करावीशी वाटते इतकी आत्मग्लानी आणि निराशा येते, हा दुसरा दोष तिच्यात येतो.
मुलांच्या शिक्षणाच्या खालोखाल आईबापांच्या महत्त्वाच्या जबाबदार्याह मुलांना नोकरी मिळवून देणे आणि त्यांची थाटामाटात लग्ने लावून देणे ह्या मानल्या जातात. युरोपीय संस्कृतीमध्ये ह्या तीनही जबाबदाच्या पूर्ण बिरादरीच्या आहेत. तिकडे मुलांच्या पंधरा सोळाव्या वर्षापर्यंत अनिवार्य शिक्षण जबाबदारी सरकारची म्हणजे पर्यायाने समाजाची. मुलांचे आईबाप हे त्या बिरादरीचे केवळ एक अंग. तेथे आईबापांवर तुम्ही आपल्या मुलांच्या शालेय शिक्षणाकडे लक्ष दिले नाही असा बोल कोणी ठेवीत असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे मार्कासाठी इतकी हाणामारी, जीवघेणी स्पर्धा, बापांनी लक्षावधि रुपये खर्चुन मुलांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देणे, व मार्कासाठी शिक्षकांचे खिसे भरणे हा प्रकार तिकडून ऐकू येत नाही. ह्याची कारणे माझ्या मते तेथल्या कुटुंबरचनेमधे आहेत. ती कशी ते मी वर सांगण्याचा यत्न केला आहे. मुले पंधरासोळा वर्षांची झाली की सगळी मुले-आपली तसेच दुसर्या ची–सारखीच हे ते कारण आहे असा माझा समज आहे.
बिरादरीच्या भावनेच्या अभावामुळे आपल्याकडे nepotism चे अर्थात् भाईभतीजावादाचे, त्याचप्रमाणे घराणेशाहीचे प्रमाण जास्त आहे, नालायक लोकांची चलती अधिक आहे. ह्या सार्याम दुष्प्रवृत्तींचा एकेका घराण्याशी संबंध नाही. ही आपली सगळ्यांची मनोवृत्ती आहे. ती आपल्या कुटुंबात घडत आहे. त्यांना खतपाणी घालण्याचे (म्हणजे बिर रीपेक्षा कुटुंब श्रेष्ठ मानण्याचे) काम आमच्या कुटुंबांतून होत आहे. समग्र समाजाच्या हिताचा विचार करण्याचे बाळकडू आम्हाला मिळालेले नाही.
आणखी काही उदाहरणे देतो. राजकीय पक्षाचा वरदहस्त लाभल्याशिवाय शाळा उघडताच येत नाहीत. नवीन लघूद्योग सुरू करावयासाठी जी कागदपत्रे तयार करावी लागतात ती करताना जीव मेटाकुटीला येतो. एकेक वर्ष हेलपाटे घालावे लागतात. कोणतेही न्याय्य काम करवून घ्यावयाचे असेल तर ओळखपाळख काढावी लागते. साधे सार्वजनिक दवाखान्यात जावयाचे असेल तरी तेथल्या डॉक्टरच्या ओळखीच्या माणसाला सोबत न्यावे लागते. कारण प्रत्येक ठिकाणी प्रतिकार होत असतो. कुटुंबाबाहेरच्या लोकांचे काम करताना प्रत्येकाच्या मनात प्रतिरोध (resistance) असतो. त्या तटबंदीला खिंडार ओळखीने किंवा पैशाने पडते. पण हा विषय सर्वांच्या परिचयाचा आहे. गंमत म्हणजे हे सर्वआपल्याला नकळत होत असते. त्यामुळे आम्ही कामे करतो ती पैशांसाठी करतो, एकमेकांसाठी करीत नाही हे आम्ही कबूल करीत नाही. शिवाय आमच्या घरातच आम्हाला ढोंग शिकविले गेलेआहे.
हे सारे बदलावयाचे असेल तर आम्हाला कुटुंबाची रचना बदलावी लागले. ती कुटुंबे आजच्या एवढी बंदिस्त नकोत. भिन्नभिन्न कुटुंबांमध्ये मोकळेपणी येजा झाली पाहिजे. कुटुंबांची कवाडे उघडी पाहिजेत. सगळ्यांच्या हिताची जाणीव आपल्या कृतीत दिसली पाहिजे. सगळ्यांना बरोबरीने वागविले गेले पाहिजे.ज्यांच्या कुटुंबामध्ये असा बंदिस्तपणा नाही त्या आदिवासींमध्ये समूहहिताची जाणीव आपल्यापेक्षा लवकर निर्माण होऊ शकते. पण आपण त्यांना आपल्या संस्कृतीच्या अभिमानापायी रानटी समजतो, हे आपलेच दुर्दैव म्हणावयाचे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.