दिवाळीतला आनंद (भाग १)

माझी जॉर्ज गिसिंगशी ओळख झाली त्याला पुष्कळ वर्षे लोटली. नतर तो कुठेच भेटला नाही. इंटरच्या ‘हायरोड्स आफ इंग्लिश प्रोज मध्ये ‘माय बुक्स च्या रूपने झालेली पहिली अन् शेवटची भेट. पण काही ओळखी जन्मभर लक्षात राहतात तशी ही राहिली. एखाद्या आईने ‘माय चिल्ड्रेन या विषयावर जितक्या ममतेने बोलावे तितक्या जिव्हाळ्याने त्याने ‘माय बुक्स ची ‘कवतुकें सांगितली होती. माणूस अर्धबेकार-फटिचर पण ऐट अशी की पुस्तक वाचायचे ते विकत घेऊनच. धंदा लेखनाचा. नियमित उत्पन्न नाही. आहे ते अपुरे अशा स्थितीत पठ्ठा मैलोगणती अंतर पायी तुडवायचा. बसभाडे वाचवायचा. लागोपाठ दिवसन् दिवस सकाळच्या न्याहारीला चाट. तेवढीच बचत. एकदा जुन्या पुस्तकांच्या दुकानात पाहिलेल्या गिबनच्या ‘डिक्लाइन अँड फॉल साठी सुरू झालेली त्याची तगमग अशा रीतीने पुरी झाली. मग काय विचारता? सोनेरी किनारीच्या त्या खंडाच्या बाइंडिंगवर लहानमुले मोरपंखावर हात फिरवतात तसा हात फिरवून तो मोहरतो, एकेक पाने कुरवाळत तो वाचनाचा आनंद लुटतो. अगदी मिटक्या मारत कित्येक आठवडे झालेल्या उपासमारीचे उट्टे तो असे काढतो.
गिसिंग होणे सोपे नाही, पण माझा प्रयत्न असतो. दिवाळी आली की मनाच्या कोपर्यायत कुठेतरी दडलेली त्याची आठवण जागी होते. वर्तमानपत्रांत दिवाळी अंकांचे परिचय येतात. अर्थात मी अंक विकत घेऊनच वाचायचे ठरवतो. स्टॉलवर त्यांची गर्दी होते. आताशा मराठीत चारेकशे दिवाळी अंक निघतात म्हणे. मी आप्तवचनावर विसंबून निवड करतो. सहसा फसगत होत नाही. आणखी एक लगाम मनाला घालतो. एकातले निदान तीन लेखक वाचल्याशिवाय दुसरे मासिक आणायचे नाही. करता करता संख्या अर्ध्या डझनावर जाते. मग हात आखडतो. यंदा क्रिस्त्रीम, म. टा., मौज, अक्षर, दीपावली आणि कालनिर्णय (सांस्कृतिक पर्यंत मजल गेली. सर्वात आधी हाती आली ‘साधना! सुनीतीच्या सौजन्याने, त्याचे एक संपादक इंग्लिशचे नामांकित प्राध्यापक, पैशाचे सोंग आणता आणता ‘नाईन केम टु नोज’ म्हणायची पाळी आली असे म्हणतात. ते असो, पण अंक भारदस्त काढला. किमतीचा बहुधा उच्चांक, रु. ५० मात्र.
आता दिवाळीचा आपला आनंद वाटायचे ठरवले तर प्रश्न पडला, कसे सांगावे? नावनिशी देऊन त्यात काय वाचाल?’ अशी जंत्री देणे फारच बाळबोध वाटले. मग मार्ग दिसला. अशी कसोटी लावू या का की, एक कथा/लेख वाचला तरी संबंध अंकाची किंमत वसूल झाली असे वाटले पाहिजे! या कसोटीला उतरण्यासारखे कोणते अंक आहेत ते आधी सांगावे, मग आवडते लेखक, आवडते विषय घ्यावेत. यात फायदा असा की ही निवड वाचलेल्या तीनातीलच असेल. म्हणून ती कथा/लेख त्यातला सर्वोत्कृष्ट आहे असा आपला दावा नसतो. शिवाय वाचलेले तीनही लेख या कसोटीला उतरू शकतात. ‘साधना’ चेच उदाहरण घ्या ना?’धर्म-अधर्म ही सुनील गंगोपाध्याय यांची कथा. मूळ बंगाली. श्री. बा. जोशींनी ती अनुवादली. पतित वेश्या ब्राह्मण कुलोसन्न, धर्माच्या आड राहणारा तिचा तस्कर बाप- प्राचीन मूर्ती परदेशी पाठवण्याचा चोरटा धंदा करणारा, त्याला पुरा पकडीत घेतलेला पोलिस अधिकारी. पण त्याची केवढी घालमेल! सभोवतीच्या धार्मिक हिंदू श्रद्धा, मुस्लिम असूनही त्याच्या पापभीरू मनाला त्यांची टोचणी. आपापल्या परिस्थितीचा फायदा घेऊन एकमेकांवर कुरघोडी करायची त्यांची धडपड गंगोपाध्यायांनी सगळे किती बहारीने, सहजपणे चितारले आहे!
साधनेतलीच, असा एक एक अनुभव ही माझी कसोटी सहज पार करणारा आहे. सय्यदभाई मुस्लिम सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते. रशीदा एक पदवीधर हुशार विवाहित तरुणी. मुस्लिम स्त्रियांसाठी काम करणारी अशीही संस्था असू शकते यावर सहजी विश्वास न बसलेली. पण काम पटले तेव्हा धडाडीची कार्यकर्ती बनली. तिची कहाणी करुण अधिक की दारुण अधिक याचा प्रश्न पडावा. दुसरी शादी करून दे, म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेला नवरा अहमद अगदीच अनावर झाला तेव्हाचा अनुभव. जावयाला समजावायला तिचे अब्बाजान आलेले. पाचवेळा नमाज पढणारा म्हणून कपाळावरचे घट्टे अभिमानानेमिरवणारा, त्याला पहिल्याच सलामीत, ‘तुम्ही पाच शाद्या करून २५ बच्चे पैदा केले अन् मला कोणत्या तोंडाने शहाणपण सांगता? असे म्हणून जावई निरुत्तर करतो. लागोपाठ खुद्द त्याचा बाप येतो. तोही नमाजी. त्याला समजावू पाहतो तेव्हा अहमद त्याला जबाब देतो की मी असे काय जगा वेगळे करत आहे? तुम्ही नाही का चारदा निकाह लावला अन पोरे किती जन्माला घातली याचा तुम्हालाच पत्ता नाही! मला काय अक्कल शिकवता? दोघांचे बाप अन् रशीदा यांची पर्वा न करता अहमद दुसरी शादी ठोकतो. बिच्चारी रशीदा कोलमडून जाते. वेड्यांच्या इस्पितळात येणार्यात जाणार्यां्ना विचारत सुटते, पं. नेहरूंनी हिंदूंना दुसरी शादी करायला मना केले. त्यांचीच लडकी इंदिरा, स्त्री असून तिला आमची कीव कशी येत नाही? वेडातून शेवटपर्यंत ती बाहेर येऊ शकत नाहीच. मयतीच्या खर्चासाठी सय्यदभाई ५०० रु. काढून देतात तेव्हा जनाजा उठतो.
भीमराव गस्ती, विठ्ठल बन्ने, वसुधा धागमवार, हुसेन जमादार सगळ्यांचेच अनुभव झोप उडवणारे आहेत. अर्थात् खरोखरी झोपलेल्यांची.
‘किस्त्रीम’ मध्ये मे. पुं. रेग्यांमधला ‘विचारवंत दिनकर गांगलांनी टिपला आहे. तत्त्वज्ञ, विचारवंत असे नुसते शब्द ऐकले तरी सामान्य माणूस बिचकतो. तसे होणार नाही याची काळजी घेऊन गांगलांनी रेग्यांचा परिचय घडवला आहे. गणिताला, ‘स्वाभाविक आवडावा असा मनोरंजक विषय समजणारे रेगे स्वतः मात्र समजायला सोपे नाहीत. गांगलांचे यश या दृष्टीने वाखाणण्याजोगे आहे. भारतीय ज्ञानपरंपरेविषयी रेग्यांच्या वाढत चाललेल्या विश्वासाबद्दल गांगल लिहितात. रेगे कीर्ती कॉलेजमध्ये होते, प्राचार्य होते त्या काळात पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि संस्कृतीचे भाष्यकार अशी त्यांची प्रतिमा होती. ते भारतीय ज्ञानपरंपरेचे पाईक कधी आणि कसे झाले ह्याचे कुतूहल अतृप्तच राहते, गांगलांचा लेख वाचूनही.
पं. नारायणशास्त्री मराठे यांनी वाईला प्राज्ञ पाठशाळा काढली ती १९१६ साली. पुढे संन्यास घेऊन १९२५ साली त्यांनी धर्मकोशाचे काम सुरू केले. ते श्रेष्ठ मीमांसक, धर्म काळानुरूप बदलतो हा त्यांचा विश्वास. अस्पृश्यता निवारण, आंतरजातीय विवाह, संस्कृत-अभ्यासाचे ब्राह्मणेतरांना मुक्तद्वार या सुधारणा धर्माला मान्य आहेत अशी त्यांची धारणा होती. ज्याला आपण हिंदूधर्म म्हणतो तो काळानुरूप बदलत आला आहे हे ते धर्मकोशात दाखवतात. त्यांच्या नंतर त्यांचे शिष्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी हे कार्य चालविले. त्यांच्या मागे रेगे हे काम करीत आहेत. गेली ७० वर्षे हे काम चालू आहे. आतापर्यंत २० खंड निघाले. आणखी तेवढेच निघतील असे रेगे म्हणतात.
रेगे म्हणतात, ‘गांधीजींपासून शिकलेला मी हिंदू आहे. भारतीय म्हणजेच हिंदू’ या अर्थाने.
‘इतकी माणसं हाल अपेष्टांचं दयनीय जीवन जगत असताना आपण सुखस्वास्थ्याचं जीवन जगतो, याची रेग्यांना खंत आहे.’ ते हे नैतिक आव्हान समजतात. ‘असा भेदभावकरीत जगणं ही आपली हिंस्र तत्त्वज्ञान-वृत्ती’ समजणाच्या रेयांचं अंतरंग गांगलांनी उकलून दाखविले ही त्यांची मोठीच कामगिरी समजली पाहिजे.
रेगे पुरोगामी अन् प्रतिगामी हे भेदच पुन्हा तपासायला सांगतात. वर्तमान पुरोगामी अन् प्रतिगामी संकल्पनांमध्ये गांधी बसत नाहीत. त्यांची आध्यात्मिक आणि धार्मिक बैठकच तशी आहे. या दोन संकल्पनांमध्ये निसर्ग, मानवी ज्ञान व मानवी प्रकृती या संबंधीचे एक तत्त्वज्ञान-आधुनिक काळातील सर्वात प्रभावी तत्त्वज्ञान समावले आहे. म्हणून ते भेद-पुरोगामी-प्रतिगामी, हे पुनःपुन्हा तपासून पाहायला रेगे सांगतात. हा त्यांचा सल्ला सहजासहजी दृष्टिआड करणे आपल्या हिताचे होणार नाही.
आधुनिक माणसांचे जगणे फार शोकात्म आहे असे रेग्यांना वाटते. मानवी श्रद्धेचे दर्शनात रूपांतर होत नाही तोवर माणसाला जीवनाची अपूर्णता जाणवत राहील. त्याला हव्या असलेल्या श्रद्धा परंपरेत आढळतील म्हणून त्यांना नवे महत्त्व आले आहे. रोजच्या जीवनात आपल्याला दिसते ते श्रद्धेचे ओंगळ रूप. गांगल म्हणतात, रेग्यांना श्रद्धेचे सतत उन्नयन अभिप्रेत असावे. रेगे धर्म मानवी जीवनातली फार मोठी गोष्ट आहे असे मानतात. दृश्य जगताच्या पलीकडच्या तत्त्वाचा अविष्कार या जीवनात झाला आहे असा प्रतिसाद धर्माचा असतो. त्यातून जगण्याची रीत निर्माण होते. माणूस अमरत्व शोधत असतो. त्याला, ‘लुप्त झालेले परत उद्भवेल त्यामुळे आजचे कर्तव्य तू श्रद्धेने कर’ हा जीवनमंत्र वाटतो. याच सूत्रावर वेगवेगळी तत्त्वज्ञानेआधारलेली असतात. या श्रद्धेच्या प्रकाशात आपले जीवन-चैतन्य सापडते. असे रेगे समजतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मातर हा आंतरिक स्वायत्तता टिकवण्याचा प्रयत्न होता असे रेग्यांचे मत आहे, कारण ते मनाने आधीच बौद्ध झाले होते असे त्यांचे निरीक्षण आहे.
रेग्यांशी गांगल आणखी बोलू इच्छितात. कारण आपल्या प्रतिभेने आणि बुद्धिचातुर्याने ते आपल्या ‘मन’ गुटीच बसले आहेत असे त्यांना वाटते. गांगलांची मनोकामना पूर्ण होवो आणि आम्हास रेगे आणखी कळोत ही शुभेच्छा. गांगलांनी किस्त्रीमच्या अंकाचे मोल कितीतरी पटींनी वाढवले आहे.
ह. मो. मराठ्यांनी किस्त्रीम कमालीचा वाचनीय केला आहे. त्यांच्याच प्रयत्नातून साकार झालेली आणखी एक मुलाखत, प्रसिद्ध अभिनेत्री ‘वनमाला’ बाईंची, तुम्हाला चांगलीच अंतर्मुख करते. एका दृष्टीने ती सय्यदभाईंनी सांगितलेल्या रशीदाची आठवण करून देते. एका भोळ्या भाबड्या, पदवीधर कुलीन-मराठमोळ्या विवाहित युवतीला प्रसिद्धीच्या कैफात गुंगवून अत्रे १२-१४ वर्षे लुबाडत राहातात. खोट्या सह्या करून तिची मालमत्ता आपल्या नावे करून घेतात. लग्नाचे आमिष दाखवून शेवटी काम झाल्यावर कागदासारखी चुरगाळून फेकून देतात. पूर्वाश्रमीची ही सुशील पोवार आज ऐंशी वर्षांची वृद्धा, आपल्या आध्यात्मिक वृत्तीच्या वडिलांच्या आशीर्वादाच्या आधारावर पितृगृही कृष्णभक्तीत, पूजा अर्चा करून मन रमवते. मुलाखतीच्या अंती वनमाला बाई शेर ऐकवतात,
शिकवे नहीं किसीसे, मगर हाँ मलाल है,
कुछ अगली पिछली बातोंका, बेशक खयाल है।
मौज मधील एका विस्मृत वाङ्मयसेवकाचे स्मरण हा सरोजिनी वैद्यांचा लेख प्रा. वासुदेव बळवंत पटवर्धन या. आगरकरांच्या समकालीन उत्तराधिकाच्यावर आहे.आगरकरांच्या मृत्यूनंतर काही काळ त्यांनी सुधारक चालवला. कोणत्याही ध्येयवेड्या माणसाची असते तशी ही शोकांतिका आहे. विद्येसाठी ते अकरावर्षे नागपूरला राहिले. त्या काळात फक्त एकदा घरी गेले होते. परतले तेव्हा त्यांच्या बायकोने त्यांना ओळखलेही नाही. घरातल्या झोपाळ्यावर येऊन बसले तेव्हा कोणीतरी आले आहे हे सांगायला ती सासच्याकडे गेली. आगरकरांनी सुधारकातून ‘तरुण सुशिक्षितास केलेली विज्ञापना त्यांच्या हृदयाला जाऊन भिडलेली होती. नागपूरच्या वास्तव्यातच आपण बी. ए. झाल्यावर शिक्षक व्हायचे हा पटवर्धनांनी निश्चय केला होता.
आपल्या धारदार लिखाणाने पटवर्धनांनी दोन आपत्ती ओढवून घेतल्या होत्या. क्रांतिकारक चाफेकर बंधूंच्या आत्मनिवेदनातून हे उघड झाले की, त्या धर्माभिमान्यांना ‘सुधारक पत्रकर्त्यांना धडा शिकवायचा होता. आगरकर एडिटर होते तेव्हा त्यांचे विचार कृतिरूपाने बाहेर पडण्यास असमर्थ होते. पण पुढे पटवर्धनांना एका अंधाच्या जागी गाठून (थोरल्या?) चाफेकरांनी पुढे होऊन लोखंडाचा प्रहार केला. त्या हल्ल्यात त्यांनी दोन दात गमावले. दुसरा प्रहार खुद्द सरकारकडून झाला. प्लेग नियंत्रणाच्या नावाखाली गोरे सोल्जर आणि अधिकारी जो धुडधूस घालू लागले त्याचा त्यांनी जो आपल्या लेखणीद्वारे तीव्र निषेध चालविला होता त्यामुळे सरकार फर्गसन कॉलेजला जाब विचारणार अशी पाळी येऊन ठेपली. तेव्हा संस्थेच्या हितासाठी पटवर्धनांना एक वर्ष सक्तीच्या रजेवर पाठवून प्रकरण संपवण्यात आले.
इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून पटवर्धनांनी फार मोठी पुण्याई संपादन केलेली होती. श्री. म. माटे, कवी अनिल, माधवराव पटवर्धन (मा. ज्यूलियन), आचार्य अत्रे, पु. य. देशपांडेआणि त्यांच्या पत्नी विमलाबाई या त्यांच्या विद्याथ्र्यांनी त्यांच्या ध्येयवादाचा, त्यांच्या व्यासंगाचा, कवी म्हणून त्यांच्या योग्यतेचा आणि समीक्षक म्हणून अलौकिक सूक्ष्मदृष्टीचा एकमुखाने गौरव केला आहे. पु. य. म्हणाले, माझ्या सगळ्या जगण्यातच ते माझ्यामध्ये होते. आजही आहेत. ‘कव्हेचे पाणी’ या आपल्या आत्मवृत्तात अत्रे सांगतात, प्रा. पटवर्धनांचा एकुलता एक मुलगा मोरेश्वर अकस्मात मरण पावला. ज्या सकाळी मोरू गेला त्या दिवशी पहिला तास पटवर्धनांचाच होता. आज तास होणे शक्य नाही या खात्रीने विद्याथ्र्याचे घोळके वर्गासमोर मोरूच्या निधनाशी चर्चा करत उभे होते. वेळ झाली तशी पटवर्धनांची मूर्ती वर्गात हजर. कार्लाइलच्या हीरोवर्शिप पुस्तकातला पाठ सुरू होता. पहिलेच वाक्य-When Mohamad lost his only son…. असे होते. ते वाचून पटवर्धनांनी आवंढा गिळला. क्षण दोन क्षण आवाज फुटला नाही. तिसर्याा क्षणी ते क्षीण स्वरात पुढचे वाक्य शांतपणे वाचूलागले.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.