चर्चा

श्री. संपादक,
आजचा सुधारक यांस,
डॉ. र. वि. पंडित ह्यांच्या सप्टेंबर ९५ च्या पत्राला हे प्रत्युत्तर.
डॉ. पंडित लिहितात की त्यांच्या मूळ लेखात (मे ९५) भारतीयांच्या लैंगिकतेचा उल्लेख नव्हता.
त्यांची मे ९५ च्या लेखातली पुढील विधाने मला भारतीयांच्या लैंगिकतेबद्दलची वाटली.“थायलंड वगळता सर्व आशिया व चीन यामध्ये लैंगिक स्वातंत्र्य बरेच मर्यादित आहे.”“लैंगिक सुख हवे तेवढे हव्या त्या प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे असा विचारप्रवाह अमेरिकेत निर्माण झाला आहे. भारतात आज जरी अशा प्रवृत्तीकडे तिरस्काराने व तुच्छतेने पाहिले जात असले तरी…”
थोडक्यात डॉ. पंडितांचे म्हणणे भारतात अमेरिकेसारखा स्वैराचार सध्या नाही.
माझे म्हणणे भारतात व आशियात लैंगिक स्वातंत्र्यावर मर्यादा स्त्रियांवर आहेत. पुरुषांवर नाहीत.
भारतीयांच्या लैंगिकतेबद्दल सर्वेक्षण मला उपलब्ध नाही. माझ्या बघण्यातल्या भारतीय पुरुषांच्या विचारसरणीवरून माझे तसे मत झाले होते. भारतात वणव्यासारख्या पसरणाच्या एड्सच्या साथीने माझ्या मताला पुष्टी मिळाली.
डॉ. पंडित म्हणतात, (प्यारा ६, सप्टें. ९५) “एड्स वेश्यावृत्तीमुळे पसरतो आहे. वेश्यावृत्तीला लैंगिक स्वच्छंदता म्हणणे बरोबर नाही. तो स्वैराचार तर नाहीच नाही”.
डॉ. पंडितांची लैंगिक स्वैराचाराची व्याख्या तरी काय आहे? स्वैराचार व स्वच्छंदतेत फरक काय? त्यांच्या पत्रात (सप्टें. ९५) ते असेही म्हणतात- “विवाहपूर्व वे, विवाहबाह्य लैंगिकता हा स्वच्छंदीपणा आहे असे भारतीयांना वाटते.” डॉ. पंडिताच्या मते वेश्यांकडे जाणे हे विवाहपूर्व किंवा विवाहबाह्य संबंध नाहीत का? ह्या परस्परविरोधी विधानांचा मेळ कसा घालायचा?
माझ्या मते भारतीयांच्या वेश्यागमनाला वेश्यावृत्ती असे नाव देणे ही “भारतीयांच्यात लैंगिक स्वैराचार आहे” ह्या सत्याला सामोरे जाण्याची टाळाटाळ आहे.
थायलंडच्या वेश्यागृहांत सेक्स टूरला जाणारे जपानी व्यावसायिकसुद्धा अभिमानाने “जपानमध्ये लैंगिक स्वैराचार नसतो म्हणून सांगत असतात.
माझ्या पत्रात (ऑगस्ट ९५) गुलामगिरीच्या उल्लेखाचा संबंध गोच्या व काळ्यांच्या लैंगिक मूल्यांशीच होता. गुलाम स्त्रियांचे मालक त्यांना भोगदासी म्हणून वापरीत असत. अमेरिकेतील बहुतेक ब्लॅक लोकांत गोव्यांचे रक्त आहे. ह्याला कारण गोत्यांनी त्यांच्या पूर्वज स्त्रियांवर केलेले बलात्कार हे डॉ. पंडितांना माहीतच असेल. डॉ. पंडितांनी त्यांच्या लेखात (मे ९५) ब्लॅक लोकांचा “काही पिढ्यांपूर्वी झाडीत राहणार्या व वनचरांना शोभेशी नैतिकमूल्ये असणार्या(‘ असा उल्लेख केला आहे. म्हणून विचारते, “त्या काळच्या गोव्यांची, लैंगिक मूल्ये कुठल्या दर्जाची होती? गुलाम स्त्रियांशी ठेवलेले लैंगिक संबंध हा स्वैराचार नव्हे का?” ( ब्लॅक लोकांची आफ्रिकेतली (नैतिक) लैंगिक मूल्ये त्यांच्या समाजाला मान्य होती.)
डॉ. पंडितांनी ज्या खेळात काळ्या लोकांची संख्या जास्त असते त्यांना बुद्धी कमी लागते असा हिशोब मांडलेला दिसतो. मला तर खेळ व संगीताच्या काळ्यागोत्यांच्या संख्येच्या फरकात डॉलर्सचे आकडे दिसत आहेत. सिंफॉनिक, चेंबर म्युझिक व कंट्री म्युझिकला ताल नसतो का? गोच्या लोकांना ताल काळ्या लोकांसारखा जमत नाही असे डॉ. पंडितांना म्हणायचे आहे का?
डॉ. पंडित म्हणतात, “आफ्रिकन अमेरिकन्सना गुलाम केल्यामुळे त्यांच्यात हटवादी वृत्ती निर्माण झाली. कित्येक पिढ्यांनंतरही ती टिकून आहे. त्यांना परत आठवण करून देते, त्यांना सिव्हिल राईटस् १९६७ मध्ये मिळाले. तोपर्यंत त्यांना equal opportunity नव्हती. म्हणजे त्यांना कायद्याचे रक्षण मिळून फक्त दीड पिढी उलटली आहे. तो कायदा आपल्या हुंडाप्रतिबंधक कायद्यायेवढाच परिणामकारक आहे.“ह्या कायद्याचा फायदा करून घेण्याची ब्लॅक्सची पात्रताच नाही” असे डॉ. पंडित म्हणतात. (असे विधान करायला इथले व्हाईट सुप्रीमिस्ट सुद्धा कचरतील.) तसे असेल तर काळ्या समाजासाठी म्हणून कायदेशीर म्हणून राखून ठेवलेल्या नोकर्याइ, कॉलेजमधल्या जागा (अफर्मेटिव्ह अॅक्शन) बंद करण्यासाठी इथला काही गोरा समाज का धडपडतो आहे? येवढेच लिहिते की जगातील गरीब समाजामागे लागणाच्या सर्व पीडा अमेरिकन ब्लॅक्सच्या मागेही लागलेल्या आहेत.
डॉ. पंडितांना ब्लॅक्सचा अनुभव आहे. ब्लॅक्सना पोलिसांकडून मिळणारी वागणूक, त्यांच्या शाळा, ठिकठिकाणी कमी प्रतीची कामे करणारी ब्लॅक माणसे डॉ. पंडितांना दिसली का? डिटेक्टिव फरमन यांच्या टेप त्यांनी ऐकल्या का?
डॉ. पंडित म्हणतात, “काळ्या लोकांच्या लैंगिकतेचे योग्य प्रतिबिंब (अमेरिकन्) या सर्वेक्षणात दिसत नाही हे मी मान्य केले.” ते बरोबर नाही. मी जे लिहिले आहे ते डॉ. पंडितांनी वाचून पाहावे. ह्या प्रश्नाचे उत्तर सर्वेक्षण घेणारेच कदाचित देऊ शकतील.
टोनी मॉरिसनच्या कादंबर्यां्मधे “प्रच्छन्न लैंगिकता’ आहे म्हणून ते अभिजात का नाही? आपल्या काही लेण्यांतही प्रच्छन्न लैंगिकता आहे. म्हणून त्यातली कला नीच दर्जाची मानायची काय? ।
डॉ. पंडित अमेरिकेत काळ्या लोकांची संख्या ३५ ते ४० टक्के आहे असे म्हणतात. ते चुकीचे आहे. ह्या पत्रासोबत मी अमेरिकेची १९९० साली घेतलेली लोकसंख्या व वर्गवारी पाठवली आहे. संपादकांनी ती वाचून पाहावी. अमेरिकेत ब्लॅक्सची संख्या फक्त १२ टक्केआहे. (ही माहिती मी सेन्सस् ब्यूरोकडून मिळवली.)
मी विशिष्ट ठिकाणी राहते म्हणून मला काळ्या गेटोजमधील जीवनाची जाणीव असण्याची शक्यता कमी, असे डॉ. पंडित म्हणतात. हे विधान फार अजब आहे.शिवाजीच्या काळात, रायगडाच्या आसपास आपण कुणीच राहात नाही, तेव्हा आपल्याला त्या काळच्या जीवनाची जाणीव असण्याची शक्यता कमी” असेही हे तर्कट वापरून म्हणता येईल.
65 Oxford Road, Newton MA 92159, U. S.A. ललिता गंडभीर
———————————————-

प्रा. ह. चं. घोंगे यांनी “हिन्दुत्व-अन्वेषण” या लेखाचा पूर्वार्ध आजच्या सुधारकाच्या ऑक्टोबर १९९५ च्या अंकात प्रसिद्ध केला आहे. हल्लीच्या हिन्दुत्ववादाच्या वाढत्या कोलाहलात आणि भारतीय समाजात हिन्दु सण, उत्सव यांना आलेल्या उधाणात हा विषय अतिशय महत्त्वाचा व प्रासंगिक आहे. त्यावर बुद्धिनिष्ठपणे विचारमंथन होणे अगत्याचे आहे. लेखाचा उत्तरार्ध प्रसिद्ध झाल्यावर अहमहमिकेने चर्चा अपेक्षित आहेच. श्री. बाबुरावजी वैद्य, प्रा. काशीकर, प्रा. के. रा. जोशी यांचेसारखे दिग्गज या विषयावर सुधारकात लिहितीलच, नव्हे त्यांनी लिहावे अशी त्यांना सविनय विनंती आहे.
लेखाच्या पूर्वार्धातच प्रा. घोंगे यांनी उपस्थित केलेले मुद्दे सर्वस्वी सार्थ असून आम्हाला मान्य आहेत. हिन्दुधर्माची व्याख्या कधीही व कोठेही सर्वमान्य झालेली नाही. हिन्दु कोणास म्हणावे याबद्दलही स्पष्ट निर्देश नाही. हिन्दु धर्माचा सर्वंकष मान्यताप्राप्त ग्रंथ नाही. ही वस्तुस्थिती व हिन्दु या शब्दाचा इतिहास लक्षात घेतल्यास हिन्दुधर्म व हिन्दुत्व या कल्पना आधारहीन व पोकळ ठरतात.
डॉ. राधाकृष्णन यांना राजकीय सोईसाठी भारतीय दर्शनाचा व हिन्दुधर्माचा प्रवक्ता म्हणण्याचा प्रघात आहे. परंतु हे विद्वान गृहस्थ संपूर्णपणे गोंधळलेले (confused) होते हे साक्षेपी वाचकांच्या ध्यानात आल्यावाचून राहात नाही.
श्री. शिवाजी महाराजांनी परकीय लोकांकडून स्थानिक लोकांना होणार्या( आत्यंतिक उपद्रवामुळे स्वराज्य स्थापन केले. परंतु ते हिन्दूंचेच राज्य असे त्यांना अभिप्रेत असल्याचा पुरावा नाही. भारतीय संतपरंपरा, अर्थात् नाथ संप्रदाय व चैतन्य महाप्रभू तसेच ज्ञानेश्वरादी मराठी संत हे सूफी परंपराच चालवीत होते हे स्पष्ट आहे. भारतीयांच्या पूर्वीच्या यज्ञ, तपस्या या पारंपारिक आराधना-पद्धतीत मूर्तिपूजा व भजनकीर्तन हे भक्तिमार्ग सर्वथा १० व्या – ११ व्या शतकानंतर सूफी पंथातील भक्तिमार्गाचे अनुकरण म्हणून स्वीकारले गेले.
हिन्दुधर्म म्हणजे काय? व हिन्दु कोणास म्हणावे या BBC ने विचारलेल्या प्रश्नांना लंडनमधील एका मान्यवर स्वामीजींनी (आता नाव स्मरत नाही) उत्तर दिले होते. स्वामींच्या व्याख्येप्रमाणे जो पुनर्जन्म, दशावतार व मोक्ष मानतो व मोक्षप्राप्तीसाठी ज्या व्यक्तीचा यज्ञ, तपस्या, पूजन व भजन या मार्गावर विश्वास आहे त्यास हिन्दु म्हणावे.ईश्वराचे व आत्म्याचे अस्तित्व स्वीकारणे याही दोन अटी त्यांनी सांगितल्या होत्या. पण हे. दोन मुद्दे हिन्दूंखेरीज इतर धर्मासही मान्य आहेत.
या स्वामीजींच्या व्याख्येनुसार आज हिन्दु समजले जाणारे असंख्य भारतीय अहिन्दु ठरतील. प्रस्तुत लेखक तर निश्चितच ठरेल. कारण या व्याख्येतील कोणत्याही मुद्द्यावर त्याचा काडीमात्र विश्वास नाही!
१४६, पावनभूमी सोमलवाडा, नागपूर – २५ र. वि. पंडित

———————————————————————————————————
आजचा सुधारक च्या मे ९५ च्या अंकातील डॉ. र. वि. पंडितांचा ‘अमेरिकेतील लोकांची लैंगिकता’ हा लेख वाचून सुचलेले काही विचार व मुद्दे.
आजच्या जागतिक संस्कृतीचे प्रतीक (logo) ठरवायचे झाल्यास मी ते + अधिक (more) असे सुचवीन. प्रत्येक गोष्ट, अधिकार, सत्ता, पैसा, लैंगिक सुख, भौतिक गोष्टींचे उपभोग सुख (consumerism) जास्तीत जास्त मिळवणे हे जास्तीत जास्त लोकांच्या जीवनाचे ध्येय असते. जागतिक पुढारलेला देश अमेरिका या बाबतीत अग्रेसर आहे. लैंगिकतेच्या बाबतीत पाच मनोवृत्तींचे चिन्ह (logo) सुचवायचे झाल्यास मी हे १ ० सुचवीन. संगमोत्सुक स्त्री व पुरुष. त्यांतही + (more) हेच ध्येय असल्याने social organisation of sexuality मध्ये केवळ sex as an act वरच भर दिला गेला आहे. Sexuality as a concept यावर नाही. त्याचप्रमाणे ‘Socialorganisation of sex’ हे शीर्षक वाचून असे वाटले होते की sexual act मध्ये भाग घेणाच्या व्यक्तीच्या परस्परसंबंधाविषयी, त्याच्या सामाजिक परिणामांविषयी, त्या व्यक्तीच्या मानसिकतेविषयी व्यापक चर्चा असेल. परंतु ‘व्यक्ती दुर्लक्षित झाल्या आहेत. मानसशास्त्रीय, सामाजिक, आर्थिक मुद्देही विचारात घेतले गेले नाहीत.
काही बाबींवर अधिक विचार झाला असता व प्रकाश टाकला असता तर लेख परिपूर्ण झाला असता असे वाटते. त्या अशा : व्यक्तिनिष्ठ
१. प्रथम संभोगक्रिया घडली तेव्हा दोन व्यक्तींमधील संबंध नातेसंबंध काय होते? काका, मामा, बहीण, भाऊ, सख्खे, चुलत सावत्र आई/बाप इत्यादी.
२. स्त्री व पुरुष यांच्या वयातील अंतर वयाने मोठा पुरुष होता की स्त्री?
३. Interracial sex वर्णभेद किती वेळा होता? काळे/गोरे, इतरवर्णीय/गोरे. स्त्री व पुरुषांचे प्रमाण.
४. अधिकाराने व सामाजिक दर्जाने स्त्री वा पुरुष यांत वरचढ कोण होते?
५. माहितीतील व्यक्ती वा पूर्णपणे अनोळखी व्यक्ती.
६. पुढाकार स्त्रीचा की पुरुषाचा?
७. आर्थिक पातळीवर दोघांतील फरक.
८. पैशांची देवाणघेवाण झाली अथवा नाही? झाली असल्यास कुणी कुणाला दिले?
जागेविषयी/कुठे?
१) त्याचे वा तिचे घर?
२) मोटर कार?
३) होटेल, मोटेल किंवा व्यवसायाची जागा (workplace)
४) मित्राचे/मैत्रिणीचे घर वा खोली.
५) चार भिंतींच्या बाहेर उघड्यावर, जसे समुद्रकिनारी वा रानावनांत.
इतर काही मुद्दे
(१) दोघांनी वा एकाने मद्यसेवन केले होते अथवा नाही?
(२)ही घटना मित्राला व मैत्रिणीला सांगितली अथवा नाही? जर सांगितली असेल तर ती एक conquest किंवा जिंकण्याची वा पराक्रमाची घटना होती अशा भावनेने सांगितली गेली का?
(३)दोघांचा वैवाहिक दर्जा (marital status) काय होता? कुणी एक वा दोघे engaged वा going steady होते का? ठराविक काळात एकाच व्यक्तीशी संबंध होते कीअनेक?
(४)प्रथम भेट ते sex पर्यंत मध्ये किती काळ गेला?
(५)घटनेनंतरच्या दोघांच्या भावनिक प्रतिक्रिया अपराधीपणा, लाज, शरम, पश्चाताप यापैकी? किंवा जास्त जवळीक निर्माण झाली?
(६)ह्या घटनेची परिणती लग्नात किंवा घटस्फोटात स्त्रीच्या व पुरुषाच्या बाबतीत किती वेळा झाली?
(७) group sex सामूहिक संभोग.
(८) blue films, artificial sex organs, Violence in sex इत्यादींचा वापर.
Time मधील लेखावर केलेली आजच्या सुधारकातील आतापर्यंतची टीकाटिप्पणी देशाभिमान, वांशिक दुरभिमान व वैयक्तिक टीका यांच्या सापळ्यात अडकली आहे व मूळ पुस्तक/लेखाच्या गुणदोषांकडे दुर्लक्ष झाले आहे असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच.
आर-१०, युगधर्म कॉम्प्लेक्स डॉ. रत्नाकर थेरगावकर
सेंट्रल बझार रोड, रामदास पेठ, नागपूर – १० फोन नं. ५४ १४ २०

संपादक
आजचा सुधारक
नोव्हें. १९९५ च्या आपल्या मासिकाच्या अंकांत प्रा. अकोलकर यांचे पत्र प्रसिद्ध झाले आहे. आमच्या पुनर्जन्मासंबंधीच्या लेखासंबंधांत प्रश्न करणारे ते पत्र आहे. प्रा. अकोलकरांच्या प्रतिक्रियेची अपेक्षा नव्हती. कारण गूढरम्य अशा विषयासंबंधी त्यांच्या श्रद्धा बळकट आहेत. आमच्या लेखाने त्या किंचितही डळमळीत होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आम्ही या गूढरम्य विश्वातून बाहेर पडलो, आमची या विषयातील अभिरुची संपली आहे. एकेकाळी नागपुरातील वृत्तपत्रातून गाजलेले हे शारदा-उत्तरा प्रकरण त्याकाळी आमच्या कुतूहलाचा विषय नव्हता. आजही नाही. आमचा प्रतिवाद प्रा. कुळकर्णीच्या लेखासंबंधी होता. हा संपूर्ण विषय गूढवाद्यांचे एक थोतांड होते अशी आमची पूर्वीपासून आजपर्यंत खात्री आहे. म्हणून प्रा. अकोलकरांसारखी धावपळ करण्याची आम्हाला गरज वाटली नाही. उत्तरा-शारदा प्रकरणात काय घडू शकते याविषयी तर्क करण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. पण आमचा लेख अंतिम सत्य आहे असा आमचा दावा नाही. प्रश्न आहे तो प्रा. अकोलकरांनी आमच्यावर भयगंडाचा आरोप केला आहे त्यासंबंधी. हे विधान अन्यायकारक आहे. आम्ही भीतीपोटी कंसकवच धारण केलेले नाही. कोणतेही लेखन हे संशोधनाच्या दृष्टीने व्यक्तिनिरपेक्ष असावे हा आमचा प्रामाणिक हेतु. या लेखाची कथा नायिका उत्तरा हुद्दार हीच आहे. पण ज्यावेळी उत्तरा हुद्दार शारदेच्या पुनर्जन्मात असे त्यावेळी ती उत्तरा नसे. आणि उत्तरा हुद्दार असे त्यावेळी शारदा नसे. असे हे साधे तर्कशास्त्र आहे. याच आधारावर, उत्तरा हुद्दारला त्या शारदेच्या कचाट्यातून असहाय अवस्थेतून कंसातील अवतरणाने कायमचाच उद्धार केला. त्याला आपण कंसोद्धार’ म्हणू शकतो. पुनर्जन्म, संचार, या घटना बालकांच्या लुटुपुटीच्या कहाणीतील वेताळ, किंवा आटपाट नगरीतील राजकन्या यांच्या सारख्याच आहेत. त्या वास्तव नाहीत हे सांगणारा ज्ञानी बालकांच्या दृष्टीने महामूर्ख असतो. बालकांच्या संगतीत हे मूर्खपण पदरी घेणे आपल्या अस्मितेला मुळीच बाधक नसते. प्रा. अकोलकरांचे हे स्वप्नरंजनी विषय अज्ञ आणि अशिक्षितांच्या अज्ञानमूलक अंधश्रद्धा सुरक्षित ठेवण्यास अतिशय उपयोगाचे आहेत हे नाकारता येणार नाही. या विषयावर तज्ज्ञांचे लेख प्रसिद्ध होत आहेतच. आम्ही मात्र ही चर्चा एकतर्फी थांबवीत आहोत. व्यक्ति म्हणून प्रा. अकोलकरांविषयी आदराची भावना व्यक्त करून पत्र संपवितो.
गुजरवाड्यामागे,महाल, नागपूर है. चं. घोंगे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.