आमचा धर्म

आमचा धर्म इतरांहून श्रेष्ठ आमचा धर्म इतरांच्या धर्माहून श्रेष्ठ आहे, व त्यांचे रहस्य स्पष्टपणे कोणास कधींही कळावयाचे नाही असे म्हणणे म्हणजे कित्येक अशक्य गोष्टी कबूल करण्यासारखे आहे.
सर्व दृश्य विश्वाचे आदिकारण; काल आणि स्थल यांनी मर्यादित होत नाही म्हणून ज्याला अनादि आणि अनंत असे म्हणतात; आपली प्रचंड सूर्यमालासुद्धा ज्याच्या अचिंत्य सामर्थ्याचे अत्यंत सूक्ष्म निदर्शन आहे असे म्हटले तरी चालेल – अशा सर्वव्यापी परब्रह्माने मत्स्य-कूर्म-वराह-नारसिंहादि दशावताराच्या फेर्‍यात सांपडून युगेंच्या युगें भ्रमण करतां करतां एकदां आमच्या कल्याणासाठी गोकुळांतील एका गवळणीच्या पोटीं यावें; शुद्ध शैशवावस्थेत पूतनेसारख्या प्रचंड राक्षसिणीचे, स्तनपानाच्या मिषानें, चैतन्यशोषण करावे, चालता बोलतां येऊ लागलें नाहीं तों लोकांच्या दुभत्यावर दरोडे घालण्यास आरंभ करून आपल्या सहकार्यांस यथेच्छ गोरस चारावे, आणि त्यांसह रानांत गुरे घेऊन जाऊन तेथे पोरकटपणास शोभणारे असे खेळ खेळावे; पुढे तारुण्याचा प्रादुर्भाव झाला नाहीं तों कामवासना प्रज्वलित होऊन कधीं मुरलीच्या मधुर स्वराने वृंदावनांतील तरुणांगनांना वेड्या करून आपापल्या घरांतून काढून आणाव्या आणि त्यांबरोबर रासादि क्रीडा कराव्या, किंवा यमुनेत त्या स्नानास उतरल्या असतांना त्यांचीं वसने कळंबाच्या झाडावर पळवून नेऊन तेथून त्यांशीं बीभत्स विनोद करावा; नंतर सोळा सहस्र गोपींचें पतित्व पत्करून फक्त दोघींसच पट्टराणीत्व द्यावे, पण त्यांतल्या त्यांतही पक्षपात केल्याशिवाय राहूं नये; पराक्रमाचे दिवस आले असतां स्वतः शस्र हातीं न धरतां दुसर्‍याचे सारथ्य स्वीकारून प्रसंगविशेष सल्लामसलत मात्र द्यावी; व घरच्या घरी यादवी माजून राहून कुलक्षय होण्याचा प्रसंग आला असतांही, ब्रह्मज्ञानाचा उपदेश देण्याच्या मिषाने युद्ध करण्यास उत्तेजन द्यावे – हे सारे शक्य, संभवनीय, व विश्वसनीय आहे असे मानिले पाहिजे.