धर्म, सुधारणा आणि विवेक

हे धर्मसुधारणेचे युग आहे. अनेक शतके स्थाणुवत् अपरिवर्तमान राहिलेल्या हिंदुधर्मामध्ये गेल्या शतकापासून तो आजपर्यंत अनेक सुधारणांचा पुरस्कार करण्यात आला आहे. रानडे, टिळक, गांधी, कर्मवीर शिंदे इत्यादि धर्मसुधारकांनी आपापल्या परींनी ग्रंथनिविष्ट हिंदू धार्मिक परंपरेचे नवीन अर्थ लावले आहेत. सावरकर, गोळवलकर गुरुजी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक प्रमुख नवनवीन बदल सुचवीत आहेत. काही बाबतींत तर हिंदुधर्म टाकून वेगळ्या धर्मात एक नवा पंथ स्थापण्यापर्यंत सुधारणेने मजल मारली आहे. या सर्व विविध धर्ममंथनांसंबंधी विचार करू लागल्यावर एक गोष्ट मनात उभी राहते ती ही की धर्मसुधारणा या संकल्पनेत काही तरी विपरीत अभिप्रेत नाही काय ही शंका. ‘धर्मसुधारणा’या शब्दात व्याघात नाही काय? धर्मसुधारणा ही कल्पना पश्चिमेत पंधराव्या शतकाइतकी जुनी आहे. त्यामुळे आपणही ती कल्पना उचलून धरतो आहोत असे वाटते. पण तिच्या अर्थात शिरून आपण पुरेसा विचार केला आहे काय? मला मात्र धर्मसुधारणा ही कल्पनाच वंध्यापुत्र या कल्पनेसारखी दोन परस्परविरुद्ध कल्पनांच्या संयोगाने बनलेली संकल्पना वाटते.
कारण धर्मस्थापना हे सामान्य मनुष्यप्राण्याचे काम नव्हे. ते एकतर ईश्वराने स्वतः केलेले असते, किंवा त्याच्या प्रेषिताने. एखादा धर्म सत्य आहे काय? तो आचरणीय आहे काय? किंवा तो स्वीकरणीय आहे काय? इत्यादि प्रश्न धर्माचे जे कर्तृत्व असते ते पाहिले म्हणजे वस्तुतः उद्भवूच नयेत असे आहेत. जे खुद्द ईश्वराने किंवा त्याच्या अधिकृत प्रेषिताने सांगितलेले असेल ते सत्य आणि इष्ट याहून अन्य कसे असू शकेल याची कल्पनाही करता येत नाही. म्हणून धर्मात सांगितलेल्या गोष्टींचा त्यातील विचार आणि आचार यांचा – स्वीकार बिनतक्रार, विनाविचार करावा हे योग्य आहे. त्यातील गोष्टींची शहानिशा करणे अनुचित आहे. त्या असत्य किंवा अनिष्ट असू शकत नाहीत. त्यांचा स्वीकार बिनतक्रार अनन्य श्रद्धेने करणे याखेरीज अन्य सर्व गोष्टी गैर आहेत. त्यांत पाप आहे. त्या निषिद्धआहेत.
म्हणून धर्मात काही व्यंगे किवा उणीवा आहेत आणि त्यात सुधारणा करून त्या दूर केल्या पाहिजेत असे जेव्हा माणसे म्हणतात तेव्हा आपला विचार सर्वथा चूक असला पाहिजे, आणि तो बाळगण्यात आपल्या हातून घोर पाप घडते आहे याचे त्यांना विस्मरण होते असे म्हणावे लागते. हे सुधारक स्वतःच्या प्रमादशील बुद्धीवर विसंबून खुशाल ईश्वरीयोजनेत चुका काढू पाहतात हे खरोखर आश्चर्यजनक आहे. धर्माने उपदिष्ट एखादा आचार आपल्याला निरुपयोगी किंवा अहितकारकही वाटत असेल. पण ते मानवी बुद्धीचे कोतेपण आहे हे लक्षात घेणे जरूर आहे. धर्माचे ईश्वरदत्त स्वरूप ज्यांना मान्य आहे त्या लोकांच्या हे कसे लक्षात येत नाही की धर्मात उणीव किंवा न्यून असू शकत नाही, आणि हे मानवी बुद्धीला कळत नसेल तर तिने ते श्रद्धेने स्वीकारले पाहिजे?
उलट जर आपण असे मानायचे ठरविले की आपल्या बुद्धीला जे जाणवते ते बरोबरच आहे, आणि तिला चुकीच्या जाणवणाच्या गोष्टी दूर करणे आपले कर्तव्य आहे हा आपल्या बुद्धीचा निर्णय विश्वसनीय आहे, तर स्वाभाविकच पुढील प्रश्न उद्भवतोः जर धर्मातील अमुक गोष्टी अनिष्ट आहेत किंवा अमुक अहितकारक आहेत असे सांगणाच्या आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवायचा तर त्या बुद्धीला सबंध धर्माचे परीक्षण करण्याचा अधिकार आहे हे मान्य करावे लागेल. बुद्धीचा अधिकार धर्माच्या काही तपशिलांच्या बाबतीत मान्य केला तर तो सबंध धर्माच्या बाबतींतही मान्य करावा लागेल. मग आपल्या बुद्धीवर विसंबून तिच्या साह्याने आपल्या समग्र जीवनाची पद्धतच ठरवायला काय हरकत आहे? एका बाजूला धर्माचा दैवी उगम मान्य करायचा, पण दुसर्याध बाजूला त्यात दोषही दाखवायचे हे विसंगत नव्हे काय? त्यापेक्षा श्रद्धेचा संपूर्ण त्याग करून संपूर्ण जीवनाची घडी नव्याने बसविण्याचा प्रयत्न करणे अधिक सुसंगत, प्रामाणिक आणि श्रेयस्करही होणार नाही काय? धार्मिकांना धर्मसुधारणा करण्याचा अधिकार नाही हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही.
पण आपल्या बुद्धीवर विसंबून राहायचे ठरवून धर्माची परीक्षा केली तर आपल्याला काय दिसते? प्रथमग्रासातच आपल्याला असे आढळते की धर्म श्रद्धेवर आधारलेला आहे. हे धार्मिक स्वतःच कबूल करतात एवढेच नव्हे तर त्यांचा तसा आग्रहही असतो. कारण श्रद्धेशिवाय धार्मिकांचे क्षणभरही चालू शकत नाही.
श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे भक्तियुक्त दृढविश्वास, अढळ विश्वास. पण एवढेच नाही. त्या विश्वासाचे समर्थन करता येत नाही. ज्याला कसलेही प्रमाण नाही अशा गोष्टीवरील तो विश्वास असतो. पुष्कळ लोक श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत भेद करतात. पण त्यात काही भेद नाही. दोन्ही पुराव्याच्या, प्रमाणाच्या बाबतीत सारख्याच निराधार असतात. पूर्ण निराधार असा अढळ विश्वास हे श्रद्धेचे स्वरूप आहे.
आता ज्या गोष्टीचे यत्किचितही प्रमाण सापडत नाही अशा गोष्टीवर दृढ विश्वास ठेवणे कितपत समंजस आहे? एखादे आपल्याला अपरिचित विधान कोणी केले तर आपण प्रथम करतो ती गोष्ट म्हणजे त्याला ‘कशावरून?’ असा प्रश्न विचारणे. ही गोष्ट अतिशय स्वाभाविक आहे, एवढेच नव्हे तर ती अतिशय योग्यही आहे; कारण ज्याच्या सत्यत्वाचे प्रमाण नाही त्यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे असे बुद्धीचे सांगणे आहे.
पण हे जर खरे असेल तर धर्मावरील आपली श्रद्धा पूर्ण असमर्थनीय ठरते. कारण धर्म म्हटला की त्याचा आधार कुठल्यातरी गूढ गोष्टीवरील विश्वास. यात प्रमुख गोष्ट ईश्वरनावाची एक व्यक्ती किंवा शक्ती. एखादा धर्म ईश्वर न मानणारा असू शकेल. पण ईश्वरावरील विश्वासाच्या खालोखाल परलोकावर विश्वास आणि इहलोकीचे व्यवहार त्याला अनुकूल होतील असे वागणे ही गोष्ट येते. इहलोकाविषयी अनादर ही गोष्ट सर्वच धर्मात आढळून येते. मरणोत्तर अस्तित्व आपल्याला आहे असे प्रत्येक धर्मात मानले जाते. मानवांचे आत्मे अमर आहेत असा सर्व धर्माचा दृढविश्वास आहे. त्यात हिंदू धर्म जन्ममृत्यूंची अखंड परंपरा मानतो. इस्लाम व ख्रिस्ती धर्म पुनर्जन्म मानीत नाहीत, पण त्याही धर्मात मृत्यूबरोबर आपले अस्तित्व संपले असे मानीत नाहीत. मृत्यूनंतर आपली जी काय गत होणार असेल तिची विवंचना कायम आपल्या मागे लावून घेणे, आणि तिला अनुकूल अशी कर्मे करणे यावर मुख्य भर असतो. मानवाचे इहलोकीचे अस्तित्व अत्यल्प आणि तेही मरणोत्तर अनंत अस्तित्वाचे साधन असे असल्यामुळे ऐहिक जीवनाकडे साध्य म्हणून पाहणे चूक मानले जाते. जन्मांची अखंड परंपरा मानणाच्या हिंदूधर्मातही पृथ्वीवरील आपले अस्तित्व हे साध्य नव्हे, आपले साध्य जन्ममृत्यूच्या फेर्याधतून सुटका असे मानतात.
या सर्व गोष्टींवरील श्रद्धेचे कसलेही समर्थन करता येत नाही. उदा. ईश्वराचे अस्तित्व मानायला कसलेही पटेल असे प्रमाण नाही. गेली दोन-अडीच हजार वर्षे ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याचे प्रयत्न मोठमोठ्या विचारवंतांनी केले. पण त्यांचे सर्व युक्तिवाद फोल ठरले आहेत. सर्वात स्वाभाविक मानला जाणारा युक्तिवाद म्हणजे या सबंध जगाचे कारण ईश्वर होय हा. प्रत्येक गोष्टीला कारण असते, म्हणून जगालाही कारण असले पाहिजे. ते कारण म्हणजे ईश्वर. पण जर प्रत्येक गोष्टीला कारण असते हा नियम असेल तर ईश्वराचेही कारण असले पाहिजे. तो आदिकारण आहे असे मानणे कारणाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. शिवाय जर प्रत्येक गोष्टीला कारण असते या नियमाला ईश्वराचा अपवाद असेल, तर सबंधजगाचाच अपवाद का शक्य असू नये असे विचारता येते.
श्रद्धेला काही विलक्षण अधिकार असतात असे श्रद्धावादी म्हणतात. ते अधिकार अंतिम आहेत असे ते मानतात. पण खरोखर श्रद्धेला काही अधिकार आहेत असे म्हणणे कठीण आहे. श्रद्धा हे प्रमाण नव्हे, ती बोलून चालून प्रमाणबाह्य वस्तू आहे. त्यामुळे ‘माझी अशी श्रद्धा आहे असे कोणी म्हटले की त्याच्याशी त्या विषयावर बोलणेच बुंटते. श्रद्धा अनेक आहेत, पण त्यांच्यात तारतम्य करण्याचा उपाय नाही, कारण प्रत्येक श्रद्धा युक्तिवादातून मुक्त आहे. पण श्रद्धा युक्तिवादातून मुक्त आहे याचा अर्थ ती विवेकबाह्य गोष्ट आहे. कोणीही उठावे आणि कुठलेही मुलखावेगळे मत व्यक्त करून ‘माझी अशी श्रद्धा आहे असे म्हणून प्रतिपक्षीयाला गप्प बसवावे आणि निर्धास्त व्हावे ही स्थिती अतिशय भयावह आहे. कारण . श्रद्धा इथून तिथून सारखीच युक्तिवादबाह्य आहे. तिचे प्रमाण विचारायला अवकाश नाही. . अशा स्थितीत श्रद्धांत तारतम्याला जागा नाही. एखाद्या मूर्ख माणसाची श्रद्धा आणि एखाद्या विद्वानाची श्रद्धा यांची किंमत सारखीच!
काही लोक म्हणतील की श्रद्धांतील श्रेष्ठ-कनिष्ठ परिणामांनी ठरविता येईल. जीश्रद्धा उपयुक्त असेल ती बरोबर, नसेल ती चूक. पण बरोबर म्हणजे इथे सत्य नव्हे, चूक म्हणजे असत्य नव्हे. म्हणजे श्रद्धा सत्यासत्यात्मक द्वंद्वांतून मुक्त असते.
ह्या विचारासंबंधाने एवढेच म्हणता येईल की तो विचार व्यक्त करणारे त्याचे परिणाम ओळखत नाहीत. इथे असे गृहीत धरलेआहे की एखादे विधान खरे आहे की नाही ही गोष्ट महत्त्वाची नाही. महत्त्वाचे आहे ते उपयुक्त आहे की नाही हे. म्हणजे मताच्या सत्यासत्यतेचा त्याच्या उपयुक्तता-अनुपयुक्ततेशी काही संबंध नाही. पण हे चूक आहे हे सहज दाखविता येणारे आहे. एखादे असत्य मत अपवादात्मक परिस्थितीत उपयुक्त असू शकेल, पण सामान्यपणे यशस्वी कर्म करता येण्याचे पूर्वगृहीत ते सत्य विधानावर आधारलेले असणे हे आहे. एखादे अन्न पोषक आहे हे सत्य असेल तरच ते खाणे उपयुक्त होईल. ते सत्य आहे की नाही याचा शोध न घेता त्याचे सेवन करणे अनर्थावह होण्याचा संभव आहे. खरे म्हणजे आपली कर्मे सफल व्हायची असतील तर ती सत्य माहितीवर आधारलेली असावी लागतात हे स्पष्ट आहे. असत्य माहितीवर आधारलेली कमें सामान्यपणे फसतात हे प्रसिद्ध आहे. त्यामुळे एखादे विधान सत्य आहे की नाही याचा शोध न घेता त्यानुसार वागणे एखाद्या वेळी उपयुक्त ठरले तरी तो अपघात असणार. त्यामुळे सत्य आणि उपयुक्तता यांची नैसर्गिकपणे घातलेली सांगड भग्न करून त्यांची फारकत करणे हे हितावह होणार नाही हे निश्चित.
आणखी एक आक्षेप असा संभवतो की ज्यावर विश्वास ठेवायचा ते मत सत्य असले पाहिजे हे खरे असेल; पण काही मते मुळी विधानांच्या स्वरूपाचीच नसतात, आणि म्हणून ती सत्यही नसतात आणि असत्यही नसतात. हे म्हणणे खरे आहे हे मान्य केले पाहिजे. उदा.‘मी सत्य बोलले पाहिजे’ हे वाक्य खरेही नाही आणि खोटेही नाही. ते एक विध्यर्थी वाक्य आहे, आणि सत्य-असत्य ही विशेषणे त्याला लागू पडत नाहीत. सत्य किंवा असत्य असण्याकरिता वाक्य निवेदनार्थी (assertive) असावे लागते. उदा. ‘उभा राहा’ ही आज्ञा खरीही नाही आणि खोटीही नाही.‘तो उभा आहे’ हे वाक्य खरे तरी असेल किंवा खोटे तरी असेल. पण आज्ञा खरी आहे असे म्हणणे निरर्थक आहे. कोणी यावर असे म्हणू शकेल की ‘उभा राहा’ ही आज्ञा प्रामाणिकपणे दिली असेल तर ती खरी म्हणता येईल, आणि कपटाने दिली असेल तर ती खोटी म्हणता येईल. पण इथे आपल्या विचारात गोंधळ झाला आहे असे म्हणावे लागते. मनापासून आज्ञा देणे आणि छद्मीपणाने देणे असा भेद विधानांच्या बाबतीतही आपण करू शकतो, ‘अमुक मनुष्य घरी नाही असे मी प्रामाणिकपणे सांगत असेन, कारण मी त्याला बाहेर जाताना पाहिले होते. पण कदाचित् मला नकळत तो मागील दाराने घरात आला असेल. असे झाले असेल तर माझे विधान प्रामाणिक असूनही ते खोटे होईल. तेव्हा बोलणान्याचा प्रमाणिकपणा किंवा कपट वेगळे आणि विधानाचा खरेखोटेपणा वेगळा. त्याचप्रमाणे आज्ञा देण्याच्या प्रामाणिकपणामुळे आज्ञा खरी होत नाही, की छद्मीपणामुळे ती खोटी होत नाही. ती स्वतः खरी किंवा खोटी असूच शकत नाही.
तेव्हा अशा एखाद्या उपदेशात्मक वाक्याचा मी स्वीकार केला तर तो सत्य किंवाअंसत्य नसू शकल्याने तो मी सत्यासत्याचा शोध घेतल्यावाचून केला असा आक्षेप घेता येणार नाही हे खरे आहे. पण उपदेशपर वाक्याचा स्वीकार म्हणजे श्रद्धा नव्हे. श्रद्धा म्हणजे केवळ निवेदनात्मक वाक्यावरील विश्वास. उपदेशात्मक किंवा विध्यर्थी वाक्याच्या स्वीकाराला श्रद्धा न म्हणता ‘निष्ठा म्हणावे असे मी सुचवितो. उदा. ‘अहिंसा परमो धर्मः किंवा ‘न हि सत्यात् परोधर्मः’ ही निवेदनार्थी दिसणारी वाक्ये वस्तुतः विध्यर्थी, नैतिक वाक्ये आहेत. जीवनाची नियामक तत्त्वे अशाच स्वरूपाची असतात. आपण त्यांचा स्वीकार करतो आणि त्यानुसार वागण्याची प्रतिज्ञा करतो. ही स्वतःला बांधून घेण्याची कृती सत्य वाक्य स्वीकारण्याच्या कृतीहून वेगळी आहे. माझा आक्षेप श्रद्धेला म्हणजे ज्याच्या सत्यतेचे प्रमाण नाही अशा निवेदक वाक्यांच्या स्वीकाराला आहे. तो निष्ठांना म्हणजे विधानांहून अन्य अशा जीवनाच्या नियामक तत्त्वांना नाही.
पण निष्ठा सत्य-असत्य, असू शकत नाहीत म्हणून वाटेल त्या निष्ठेचा स्वीकार करणे सारखेच असे समजणे चुकीचे होईल. कारण निष्ठांच्या स्वीकार्यतेची परीक्षा करावी लागेल. निष्ठा सत्य किंवा असत्य नसल्या तरी त्या कमी अधिक सुखदायक किंवा दुःखदायक असू शकतील, आणि निष्ठांचे ते अंग लक्षात घेऊन जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख निर्माण करणाच्या कोणत्या आहेत आणि कोणत्या नाहीत हे ठरवावे लागेल. ज्या निष्ठा अधिक लोकांना अधिक सुख देणार्या असतील त्या स्वीकरणीय म्हणाव्या लागतील.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.