कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग ३)

आपल्या भारतीय नागरित समाजामध्ये कुटुंबाची किंवा कुटुंबप्रमुखाची मुख्य जबाबदारी त्रिविध आहे हे आपण जाणतो. ती म्हणजे (१) मुलांचे आणि नातवंडांचे शिक्षण करणे, (२) त्यांना नोकरी लावून देणे व (३) त्यांची शक्य तितक्या थाटामाटात लग्ने लावून देणे ही होय. बाकीच्या सगळ्या जबाबदार्या( ह्यांच्यापुढे गौण किंवा तुच्छ मानल्या जातात. त्या जबाबदार्यांसमुळे पर्यायाने त्यांसाठी बसविलेल्या आपल्या समाजाच्या घडीमुळे आपल्या शिक्षणक्षेत्रावर जे अनेक परिणाम होतात त्यांपैकी काही आपण आतापर्यंत पाहिले. तसेच ते मुलांना नोकरी लावून देण्याच्या आणि त्यांची लग्ने लावून देण्याच्या बाबतींतही अधिक सविस्तरपणे पाहता येतील, पण मला त्याची गरज वाटत नाही. कारण लग्नाच्या बाजारातील दुरवस्थेबद्दल (हुंडापांडा व त्यासाठी लग्नानंतरसुद्धा मुलींवर होणारे अत्याचार – बापाचीजबाबदारी लग्न लावून दिल्याने संपत नाही.) पुष्कळ चर्वितचर्वण होऊन चुकले आहे. आणि नोकरीच्या संबंधात समाजात काय परिस्थिती आहे हे आजचा सुधारकच्या वाचकांना वेगळे सांगण्याची गरज नाही. त्याविषयीचे माझ्या लेखांच्या वाचकांचे ज्ञान माझ्या ज्ञानापेक्षानिःसंशय जास्त असणार!
मला दुःख ह्या गोष्टीचे आहे की आमच्या संस्कारांमुळे आम्हीच निर्माण केलेल्या ह्या समस्यांपुढे आम्ही हतबल आहोत. इतके हताश आहोत की त्या समस्या सोडविण्यासाठी आमची सामूहिक कृती घडतच नाही. आम्ही आपल्यापुरतेच पाहत असल्यामुळे आपल्या येथील हुंड्याची समस्या आम्ही आमच्या मुलींना गर्भावस्थेत किंवा जन्मतःच मारून टाकून सोडवितो. राजस्थान, बिहार, गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली ह्या बहुतेक उत्तरभारतातच नव्हे तर हा प्रकार महाराष्ट्र व तामिळनाडूपर्यंत पसरला आहे. आमचे मुंबईचे मित्र रवीन्द्र रुक्मिणीबाई पंढरीनाथ ह्यांनी ह्या विषयांचा खोलवर अभ्यास केला आहे. त्याविषयीचे सारे आकडे त्यांना मुखोद्गत आहेत. आमच्या सर्वांच्या मनावरच्या खोल संस्कारांमुळे ही समस्या आम्हाला सोडविता येत नाही हे स्पष्ट आहे. आमची सामाजिक परिस्थिती बदलण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो तो एकशः करतो. म्हणजे एकमेकांना दोष देतो. रचनात्मक वा विधायक कृती कोणीच करीत नाही. आम्ही इतके एकेकट्यापुरते पाहतो की खेड्यापाड्यांतून रस्त्यावरून वाहणार्याच सांडपाण्याच्या आणि शहरांतून रस्त्यांच्या कडेला पडणाच्या कचर्यारच्या आम्ही घोर समस्या करून ठेवल्या आहेत. वस्ती अशिक्षितांची असो की सुशिक्षितांची, तेथल्या रस्त्यांवर साम्राज्य घाणीचेच आहे. त्याचप्रमाणे आपल्या शहरांतून झोपडपट्टीच्या समस्या आहेत त्यांचेही कारण आम्ही आपापल्यापुरते पाहतो, संपूर्ण समाजाच्या गरजांचा विचार करीत नाही हेच आहे. हा प्रकार पाश्चात्त्य देशांत दिसत नाही, किंवा कमी प्रमाणात दिसतो. कारण तेथे सगळ्यांच्या (म्हणजे जगातल्या सर्वांच्या नव्हे, पण त्यांच्या बिरादरीमधल्या लोकांच्या हिताचे काय ह्याचा विचार आपल्यापेक्षा थोड्या अधिक प्रमाणात होतो. प्रगत पाश्चात्त्य देशांमध्ये वंशभेद दिसतो खरा, पण आपल्याकडे मला केवळ जातिभेदच नव्हे तर कुटुंबभेद दिसतो.
आपल्या समाजापुढचा खरा प्रश्न शिक्षणाच्या समस्या सोडविणे, विवाहविषयक किंवा बेकारीच्या समस्या सोडविणे हा नाही तर सामूहिक हित सर्वांना कसे समजेल ते पाहणे हा आहे. सगळ्या शिक्षणशास्त्रज्ञांनी आपले मन आणि शक्ती तिकडे एकाग्र केली पाहिजे. आमच्या सर्वांच्या मनावरच्या संस्कारांमध्ये तसा फरक प्रयत्नपूर्वक घडवून आणला पाहिजे. ह्या समस्या व्यक्तिशः सोडविण्याच्या नाहीतच. आपले शेतकरी आपली पाणीपुरवठ्याची समस्या कशी सोडवितात? आपापली विहीर ते अधिक खोल खणतात. त्यामुळे त्यांची समस्या सुटत नाही. ती अधिक बिकट होत जाते हे ते जाणतात पण तरीसुद्धा मनाला लागलेल्या गतानुगतिकत्वाच्या सवयींमुळे समूहशः कोणतीही कामे स्वतः करीत नाहीत. अशा कामांसाठी सरकारवर अवलंबून राहतात. त्यावेळी सरकारही त्यांच्याचस्वभावाच्या लोकांचे बनलेले आहे ते विसरतात. त्यामुळे आपल्या गंभीरतम समस्यांवर थातुरमातुर उपाय होतात. समस्या चिरकालिक कश्या होतील तेच आपण पाहतो की काय अशी मला शंका येते. इतकेच नव्हे तर आमचा थोर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आमच्या साध्या रस्त्यावरच्या घाणीच्या समस्या सोडविण्यासाठी पुरेसा उपयोगी पडत नाही. उलट आम्ही त्यायोगे जास्त आत्मतुष्ट झालो आहोत की काय अशीही मला शंका येते.
प्रगत राष्ट्रांचे लष्करी व त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रातील वर्चस्व तेथले लोक अप्रगत राष्ट्रांतील लोकांपेक्षा सामूहिक हिताचा पाचदहा टक्यांनी अधिक विचार करतात एवढ्यामुळेच आहे असे माझे मत आहे.
आपल्या कुटुंबसंस्थेची आजची स्थिती, तीमुळे घडणारे आपले सर्वांचे स्वभाव आणि आपल्या सगळ्यांच्या स्वभावसाधम्र्याचा आपल्या सामाजिक परिस्थितीवर जो परिणाम झालेला आहे त्याचे मला होणारे दर्शन आपण आतापर्यन्त पाहिले. ह्यापुढे आपण उद्याचे कुटुंब आणि त्याद्वारे भविष्यातला समाज सहेतुक आणि प्रयत्नपूर्वक कसा निर्माण करावा लागेल ते पाहू. आपण मुद्दाम प्रयत्न केले नाहीत तर आपण आजच्या आपल्या समस्यांच्या शृंखलांतून बाहेर पडणार नाही. आम्हाला खरोखर आमच्या सध्याच्या सामाजिक स्थितीत क्रान्तिकारक बदल हवे असतील तर त्यासाठी आवश्यक ते मोलही आम्हाला द्यावे लागेल. जुन्या संस्कारांमधून बाहेर पडावे लागेल. कारण जुन्या समजुती उरापोटाशी धरून क्रान्ती घडत नसते.
आपल्या उद्याच्या समाजाने सर्व समाजबांधवांच्या हिताचा विचार करावयाचा असेल तर तो समाज आजच्याप्रमाणे अनेक जातींनी, अनेक कुटुंबांनी मिळून, एकत्र येऊन घडलेला समाज नसेल तर समग्र समाज अनेक आटोपशीर कुटुंबांमध्ये विभागलेला असेल.
समाजात जसे सगळ्या वयांचे स्त्रीपुरुष असतात तसे ते प्रत्येक कुटुंबात असतील. त्यामुळे अंदाजे पंचवीसतीस माणसे एका कुटुंबात राहतील. अशा कुटुंबात ते प्रत्यक्षात जरी कधी लहान असले तरी, कुटुंबभावना व्यापक असेल. स्वतःचे मूल आणि दुसर्यालचे मूल ह्यांमध्ये फरक नसेल. त्याचप्रमाणे आपली आई आणि दुसर्या ची आई ह्यांविषयी सारखाच प्रेमादर प्रत्येकाच्या मनात वसेल. (हा सारा आपल्या मनांवरच्या संस्कारांचा भाग आहे. आज हे घडत नाही कारण आपल्या मनांवरचे संस्कार त्यासाठी प्रतिकूल आहेत.) अशा कुटुंबांमधल्या स्त्रीपुरुषांची येजा कोठल्याही लांच्छनाशिवाय मोकळेपणी घडेल. स्त्रियांना वैधव्याचा त्याचप्रमाणे कोणत्याही अपत्याला अनौरसपणाचा डाग लागणार नाही. आज हे डाग आपल्या मनावरच्या ज्या संस्कारांमुळे लागतात आणि त्यांच्या आयुष्यात अत्यंत तीव्र दुःख निर्माण करतात ते संस्कार आपणाला आपल्या मनांवरून निग्रहाने हटवावे लागतील. काही व्यक्तींच्या ठिकाणची पूर्वीची अस्पृश्यता काय किंवा आजचा अनौरसपणा काय, दोनही आमच्या मनावरच्या संस्कारांचेच परिणाम होत. अस्पृश्यता घालविण्यात आम्ही जसे यशस्वी होत चाललो आहोत तसेच अनौरसपणा घालविण्यातही आम्हाला व्हावे लागेल.
उद्याच्या समाजाने सर्वांच्या हिताचा विचार करावा, आपपरभाव नष्ट करावी, किमानपक्षी तो कमी करावा असे वाटत असेल तर आपल्याला आपल्या विद्यमान कुटुंबाच्या कक्षा कोणत्यातरी पद्धतीने वाढविणे भाग आहे. माझ्या मते त्याचे दोन प्रकार संभवतात. (१) आजच्या पाश्चात्त्य पद्धतीप्रमाणे बिरादरी वाढवावयाची. ह्यामध्ये होटेल, होस्टेल एवढेच नव्हे तर वृद्धाश्रमादि संस्था वाढत्या राहतात. आणि समाजातील एकूणच स्नेहबन्ध त्यामध्ये क्षीण असतात. आणि (२) आपले कुटुंब मोठे करणे. आपल्या रक्ताच्या नात्यांच्या बाहेरच्या लोकांवर प्रत्यक्ष कुटुंबीयांसारखे, प्रेम करणे. त्यासाठी होटेल्स, होस्टेल्स्, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, स्त्रियांची निवारागृहे ही आपल्या आजवरच्या संस्कृतीशी विसंगत असलेली गृहे आम्हाला नष्ट करावी लागतील. ही दुसरी पद्धती आज आपणाला जास्त कठीण वाटत असली तरी तीच आपल्या मनोभूमीला अधिक अनुकूल आहे. आपल्या येथला साठसत्तर टक्के समाज अजून पाश्चात्त्य विचारसरणीच्या प्रभावाखाली आलेला नाही. म्हणूनआपल्याला थोडी जास्त आशा आहे.
सध्या कोणतीही एक पद्धत आपल्याकडे नसल्यामुळे दोन्ही पद्धतींमधले दोष आपल्या वाट्याला येत आहेत. जुने आपल्या सुशिक्षित समाजाने टाकून दिले आहे आणि नवी पाश्चात्त्य बिरादरी आपण स्वीकारलेली नाही. इतकेच नव्हे तर मला असेही वाटते की आपणाला पाश्चात्त्य समाजाच्या पुढे जावयाचे असेल तर आपण आपली कुटुंबभावना अगदी ‘वसुधैव कुटुंबकम्’ एवढी नाही तरी निदान त्यांच्या बिरादरीच्या वर्तुळापर्यंत नेऊन पोचविलीच पाहिजे.
आजच्या आणि उद्याच्या कुटुंबांत जो सर्वात मोठा फरक असेल किंबहुना जो फरक मुद्दाम घडवून आणावा लागेल तो असा की जेथे आजच्यासारखे तरुण स्त्रीपुरुषांचे जोडपे वेगळे निघून घर वसविणार नाही, किंवा एका घरातली एक मुलगी दुसर्याष घरात जाऊन त्या घराशी समरस होते तसे होणार नाही तर मुलींप्रमाणे मुलगेसुद्धा आपापल्या घरांतून बाहेर पडून वेगवेगळ्या विद्यमान कुटुंबांत प्रवेश करतील व त्या कुटुंबाशी समरस होतील. लक्षात घ्या की आपल्या कुटुंबातले मुलगे अठराव्या वर्षानंतर दुसन्या घराचे कायमचे सभासद होतील व दुसर्या् विविध कुटुंबातले मुलगे आपल्या कुटुंबाचे पुढेमागे सभासद होतील. मुलीसुद्धा आपले जनकगृह सोडून दुसर्या निरनिराळ्या मोठ्या कुटुंबांच्या सभासद होतील. त्यामुळे कोणत्याही एका व्यक्तीचा वंश चालणार नाही. कुटुंबांच्या रूपाने समाज निरंतर चालेल. आपला मुलगा आणि/अथवा भाऊ होईल आणि विवाहबंधन इतके शिथिल असेल की त्याला कोणा एकाचा जावई म्हणता येणार नाही. मुलीही अठरा वर्षानंतर ज्या कुटुंबात प्रवेश करतील तेथल्या स्त्रियांच्या त्या लेकीबहिणीच मानल्या जातील. त्या मुलीला कोणीही ही माझीच सून असे म्हणू शकणार नाही. जन्मापासून अठरा वर्षापर्यन्त मुलामुलींची काळजी त्यांच्यात्यांच्या जनकघरांत घेतली जाईल. पुढे ती ज्या घरांत प्रवेश करतील त्या घरांतलेज्येष्ठ लोक त्यांची काळजी घेतील व ती तेथल्या लहानमुलांची घेतील. त्यामुळे अशी रचना पुरुषप्रधान किंवा स्त्रीप्रधान राहणार नाही.
असे जर आपण घडवून आणू शकलो तर खाजगी मालकी आपोआप नष्ट होईल. त्यासाठी वेगळे कायदे करण्याची गरज राहणार नाही, कारण कोणत्याही संपत्तीचे हक्क वंशपरंपरा चालणार नाहीत, संपत्तीसंबंधीच्या सगळ्या कल्पनांमध्ये उलथापालथ होईल! आमच्या घरातले मूल अठरा वर्षांचे झाल्यानंतर ते सर्वार्थाने दुसर्यांधचे मूल होणार आणि दुसर्यांाच्या घरातले मूल अठरा वर्षानंतर आमच्या घरचे मूल होणार! सारे सर्वांचे किंवा सारे एकमेकांचे.
सध्या आपणाला आपल्या मनांना आवश्यक असणारी सुरक्षिततेची भावना एका व्यक्तीकडून प्राप्त करण्याची सवय लागलेली आहे. ती मोडून ती सुरक्षितता अनेकांकडून कशी मिळवावी ते शिकावे लागेल. माझ्या मते नवीन कुटुंबरचना आणण्याच्या मार्गातील सगळ्यांत मोठा अडथळा तो आहे. तो कसा दूर करावयाचा हे समजले की आपणाला घरामध्ये पुष्कळ लोकांशी कसे जुळवून घ्यावयाचे तेही समजू लागेल. त्याचप्रमाणे हेकेखोर मंडळींना वठणीवर कसे आणवयाचे तेही समजू लागेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.