दिवाळीतील आनंद (भाग २)

अनिल अवचटांची भेट हे दिवाळी अंकांचे एक आकर्षण असते. यावर्षी ‘मौजेत ते ‘तेंदूपानांच्या प्रश्नावर काय म्हणतात हे वाचायची उत्सुकता होती. त्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी त्यांच्या ज्या चकरा झाल्या त्यात एकदा ते आ. सुधारकच्या कार्यालयात येऊन गेले होते. अवचट संशोधक अधिक, कार्यकर्ते अधिक की लेखक अधिक असा प्रश्न पडतो. त्यांचे लिखाण वाचल्यावर विवेकशील मानवता हे जे मानवी जीवनाचे साध्य ते त्यांच्या शब्दाशब्दांतून दिसते.
बिडी उद्योगावर लाखो गरीब लोक पोट भरतात. चाळीस लाख नुसते विड्या वळणारे आहेत. विडीचे वेष्टण तेंदूपान असते. ते गोळा करणारे लाखो. शिवाय तंबाखू उत्पादक शेतकरी. पुन्हा तंबाखू कुटणाच्या स्त्रिया! इतके गरीब लोक या धंद्यावर जगतात. तेंदूपान स्वतः अमली पदार्थ नाही, पण तंबाखू! दरवर्षी हजारो लोक कॅन्सरने मरतात. कोट्यवधी रुपयांचा धूर केला जातो. पण या सगळ्यांतून काही घरातले दिवे पेटतात त्यावेळी काही विझलेले असतात. हेही एक निसर्गचक्रच का? कोण जाणे! हा एक तेंदूप्रश्नच.’ असा अवचटांच्या लेखाचा शेवट माणसाला अंतर्मुख करतो. वाचक खिन्न होतो. दिङ्मूढ होतो. | तेंदूपत्ते तोडायचा सीझन एप्रिल-मे मध्ये असतो. २५ मेपूर्वी, पहिली पावसाची सर येण्यापूर्वी तो संपवावा लागतो. त्याच्या दीडेक महिना आधी तेंदूच्या झाडांना, झुडुपांना पाने तरारून फुटावी यासाठी आधीची पानतोड करतात. तेव्हापासून पाने लादलेले टूक्स रवाना होऊ लागतात तोपर्यंतच नाही तर पुण्याच्या एअर-कंडिशन्ड ऑफिसात बसून बिडी किंग्ज सौद्याचे व्यवहार कसे करतात इथपर्यंत सगळ्या टप्प्यांचे हृदयंगम वर्णन अवचटांच्यालेखणीतून उतरते. त्यात नक्षलवाद्यांची सरकारच्या बरोबरीने होणारी रॉयल्टीची वसुली, फॉरेस्ट अधिकार्यां ची कुचंबणा, अॅक्शनमध्ये मारल्या गेलेल्या नक्षल कार्यकत्र्यांच्या वीरगतीच्या कहाण्या, स्मारके, पोस्टर्स, तर मेलेल्या पोलीस अधिकार्यां्ची उपेक्षाकारी सरकारी फायलीत नोंद अशी विषमस्थिती. एकाहत्तर सालानंतर आंध्रातून नक्षलवादी इकडे . येऊ लागले, पण एक्क्याऐंशीनंतर ते प्रभावी बनले. पूर्वी सत्तरपानांचा एक असे शंभर पुडे पाने तोडली तर दोन रुपये मजुरी मिळे. आता यावर्षी तो दर एकशेदहा रुपयांवर नक्षलवाद्यांमुळे आला आहे. अर्थात ते पार्टीसाठी पैसा गोळा करतात. अशा रीतीने सरकारला जेवढी रॉयल्टी मिळते तेवढीच ते मिळवतात. पूर्वी एकेका युनिटचा लिलाव होई. ज्याला ठेका मिळाला त्याने भरलेल्या रकमेवर कितीही पाने तोडावी. ठेकेदारांनी कवेत मावणार नाही अशी मोठाली झाडे पानांच्या लोभाने भुईसपाट केली. एका सीझनमध्ये त्या भागातली साठ हजार तेंदूची झाडे तुटली. यावर एका व्यवहारी कॉझव्हेंटरने मार्ग काढला. ठेकेदारी पद्धत ठेवली, पण आधीच्या काही वर्षाचे सरासरी उत्पन्न काढून तेवढीच पानतोड करण्याचे बंधन. त्या वनअधिकार्यालचे नाव काका चव्हाण. त्यांचा परिचय अवचटांनी करून दिलाआहे महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकात. लेखाचे नाव आहे ‘वनमग्न.’ सफारी सूटमधले, गोरे उंच घाया डोळ्यांचे, डेहराडूनच्या वन-संस्थेत शिकलेले आय्.एफ.एस्. अधिकारी काका चव्हाण. हे हाडाचे संशोधक. १९७७ साली चंद्रपूर जिल्ह्यातल्या आलापल्ली या अति दाट जंगलात बदलून आले. सागाचे बी जमवून रोप करीपर्यंत नाना प्रयोग त्यांनी केलेले, अवचटांच्या गोष्टीवेल्हाळ शैलीतूनच वाचायला पाहिजेत. मनुष्याचा पिंड ग्रामीण भागातला असला की तो कोणाजवळूनही शिकायची तयारी ठेवतो. सागाची रोपे नर्सरीतून दूरगावी नेऊन लावीपर्यंत पुष्कळ दिवस मध्ये जातात. रोपे कशी जास्त जगवावी या विवंचनेत काका औरंगाबाद स्टेशनवर खेडुतांच्या एका घोळक्यात विदर्भातून आणलेली संत्र्याची रोपे पाहतात. ती १५-१५ दिवस कशी जगतात याचे रहस्य त्या शेतकर्यांचनी काकांना सांगितले, ‘सोपं आहे, हळद, कापूर आणि हिंग पाण्यात कालवायचे आणि त्यात ही रोपं बुचकळूनकाढायची.’ काका त्याच पावली परत फिरले अन् आपल्या कामाला लागले.
लोकांना झाडे लावायला उद्युक्त करण्याचे त्यांनी नाना प्रयोग केले. त्याची एक गोष्ट वाचनीय आहे. एकच का सगळ्याच वाचनीय आहेत, पण या गोष्टीतल्या त्यांच्या शेतकरी बालमित्राला सव्वावर्षात एका एकरात तीस हज्जार रुपये उत्पन्न आले. रहस्य सुबाभळीची लागवड. तो ऊस सोडून सुबाभळीकडे कसा वळला त्याची गोष्ट.
सामाजिक वनीकरणाची कल्पना पुढे वाढवून जंगलाच्या हद्दीबाहेर लोकांच्या सहभागाने झाडे वाढवायची. हेतू हा की त्यांना इंधन फाटा मिळाला तर ते जंगलात कशाला येतील? थोडे फार कवितेचे अंग असलेल्या काकांनी घोषणा तयार केल्या होत्या,
सामाजिक वनीकरण, तयार करू सरपण।
सामाजिक वनीकरणाची आली दिंडी, वखर पाभरीची तयार करू दांडी।
धुळ्याचे त्यांचे मित्र वसंतराव ठाकरे यांनी तर ‘वृक्षनारायणाची पूजा’ या नावांची सत्यनारायणाच्या पूजेसारखी पोथी लिहिली. काकांनी ती प्रसिद्ध केली. पोथी वाचून झाल्यावर, प्रसाद म्हणून सुबाभळीचे बी वाटत. परंपरेच्या परिभाषेत सुधारणेची कहाणी सांगितली तर कशी पटते याचे हे उदाहरण. त्यांची स्वतंत्र कहाणी कालनिर्णय सांस्कृतिकमध्ये आली आहे. अवचटांनी गडचिरोली, भामरागड भागातली आणखी एक वनवासी कथा सांगितली तीही अशीच उद्बोधक आहे. तेंदूची पाने तोडण्याची आदिवासींची तन्हा आणि बाहेरून आणलेल्या मजुराची तन्हा यांत फरक आहे. तेंदूच्या वृक्षाच्या आसमंतात जी झुडुपे उगवतात त्यांना पानांचे फुटवे येतात. आदिवासी कधी कोवळं, अपुर्या वाढीचं पान तोडणार नाहीत. त्याला ते अधर्म समजतात. अवचट म्हणतात, ते जंगलाला निर्जीव समजत नाहीत. जंगल त्यांचे जीवन, त्यांत त्याचे देव, ही भावना. त्यांच्या पानांना ठेकेदार जास्त भाव देतात. काही लोक इतकेअडाणी की बाहेरचे लोक मीठ देऊन त्याच्या भारोभार चारोळी, डिंक घ्यायचे. नक्षलवाद्यांनी हे थांबवले असावे. हे त्यांचे शक्तिरहस्य. अवचटांच्या तिसर्यार लेखात त्यांच्यातल्या कलावंताचा आलेख आहे. ‘दीपावलीच्या’ दिवाळी-अंकाचे मुखपृष्ठ त्यांच्या काष्ठशिल्पावरून बनवले आहे. त्यांचा आतला, लाकडातील शिल्प’ हा लेख अरसिकालाही रसाळ वाटेल असा आहे. घर आधीच ठोकळ्यांनी भरलेले. त्यात यांनी आणखी एक आणला की मुली म्हणतात, ‘बाबा, तुझ्यासारखा खल्लास माणूस आम्ही जगात पाहिला नाही!’ खरंच या खल्लास माणसाचे लक्ष कुठे जाईल याचा नेम नाही. किती रंजल्यागांजल्यांच्या हकीकती यांनी सांगितल्या आहेत. मुक्याने ओझी वाहणारे आणि त्यांच्यासाठी धडपडणारे बाबा आढाव, भांड्याकुंड्यासारखे, गंजलेल्याचे, मनाचे झिजून चाललेल्या जिण्याचे दुखणे सुसह्य करणारे एस्. आर. हिरेमठ, आपंगिता नसलेल्या वनवासींना हृदयी धरणारे देवदूत अभय आणि राणी बंग–अशा किती किती कहाण्या संशोधकाच्या सत्यनिष्ठेने, समाजसेवकाच्या तळमळीने आणि कलावंताच्या हळुवारपणे अवचटांनी सांगितल्या आहेत. तर्ककठोर वैचारिक प्रबंधापेक्षाही हे लिखाण अधिक परिणामकारी झाले आहे. या लेखनाकडे महाराष्ट्र फौंडेशनचे लक्ष कोणी वाणीच्या उपासकाने वेधणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र फौंडेशनने गेल्या उन्हाळ्यात गौरविल्यापासून रंगनाथ पठारे हे नाव मनात रुजले होते. महाराष्ट्र टाइम्स वार्षिकमध्येच ‘मराठा जातीतील सरंजामी अवशेष हा त्यांचा लेख वाचायला मिळाला. दीपावलीत ‘चित्रमय चतकोर ही कथाही त्यांचीच. लेख समाजातल्या केविलवाण्या वास्तवावर बोट ठेवतो. मानापानाच्या रिवाजांचे समाजशास्त्रीय आणि ऐतिहासिक विश्लेषण करतो. कथा मनाच्या अथांग गुहेत चालू असलेल्या विकार-विकल्पांचा चित्रमय चतकोर दाखवते. यानंतर पठारेंचे मिळेल ते साहित्य वाचून काढावेसे वाटेल इतके प्रभावी हे लेखन आहे.
‘कार्यक्षमता आणि नैतिकता’ या विषयावर दीपावलीत परिसंवाद आहे. सहभागातमोठमोठी नावे आहेत. सदाशिवराव तिनईकर, चंद्रशेखर धर्माधिकारी (माजी न्या. मू.), अविनाश धर्माधिकारी, युतिसरकारच्या मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव इत्यादी. सारी आपापल्या क्षेत्रात कर्तबगारी दाखवणारी माणसे. कार्यक्षमता महत्त्वाची की नैतिकता हा प्रश्न आहे. तिनईकरांना ही फारकत अमान्य. वर्तनाची नीतिमत्ता केवळ बाह्य, दिखाऊ परिणामावरून ठरवताच येत नाही हा भारतीय नीतिविचार त्यांना पटलेला. मनुष्याचा इतर मनुष्यांशी व चराचर सृष्टीशी संबंध येतो तो मन, बुद्धी, अहंकार यांच्याद्वारे. त्यामुळे परिणामांपेक्षा उद्दिष्टांना ते महत्त्व देतात. कर्माचे कौशल्य प्रयत्नपूर्वक साध्य करण्यासाठी त्याग, निर्ममत्व वृत्ती यांवर कर्तृत्वाचे मोजमाप व्हावे असे ते म्हणतात. सत्ता, संपत्ती, जाहिरातबाजी याने कर्तबगारी ठरत नाही ही गोष्ट तिनईकर अनेक उदाहरणांनी दाखवतात. महाभारताने शान्तिपर्वात सर्वच भारतीयांना आणि दासबोधाने मराठी माणसाला कर्तृत्वाची स्पष्ट अन् प्रभावी शिकवण दिली असताना महाराष्ट्रासह या देशाची दुरवस्था व्हावी या घटनेत त्यांना लोकशाहीतून दंडुकेशाहीकडे वाटचाल होताना दिसते. ह्या निष्कर्षाला ते प्लेटोच्या रिपब्लिकमधील आदर्श राज्यविषयक संवादाचा आधार देतात. न्या. मू. धर्माधिकारी कार्यक्षमता आणि नैतिकता यांतील द्वंद्व, साध्य-साधनाच्या द्वंद्वात रूपांतरित करतात आणि साधनशुचितेचा पुरस्कार करतात. सार्वजनिक चारित्र्य आणि वैयक्तिक चारित्र्य असा भेद करून एकाची भलावण करताना दुसर्याककडे कानाडोळा करणे याला भोंदूपणा म्हणतात. अविनाश धर्माधिकारी आपल्याजवळ खूप सांगण्यासारखे आहे अशा आविर्भावात, नीरस भाष्य करतात. त्यांना अनेक द्वैते टाळता येण्याजोगी वाटतात. संघर्षात्मक आंदोलने करणे आणि विधायक कामाला जुंपून घेणे, हे द्वैत. पुस्तकी पांडित्य की प्रचारकी कार्य वगैरे. मात्र १९७३ मध्ये ‘दीवार’ चित्रपटाला थिएटरमध्ये मिळणारा प्रतिसाद आणि वीस वर्षांनी ९३ मधला प्रतिसाद पाहून नैतिकता आणि कार्यक्षमता यामधली दीवार समाजमनात उंच उंच होत चालली असे त्यांना वाटते. शेवटी एकदा, त्यांना काय म्हणायचे ते उमजू लागते. एक वेळ सुईच्या नेढ्यातून उंट जाऊ शकेल पण स्वर्गाच्या दारातून श्रीमंत जाऊ शकणार नाही हे बायबलवचन त्यांना जास्ती जास्ती पटू लागलेले ते सांगतात. दोन पाने पुढे गेले की नीतिमंत श्रीमंती त्यांना शक्यच नाही, तर आवश्यक वाटते. तशी उदाहरणे ते देतात. मग आपल्याला प्रश्न पडतो, असे श्रीमंत का नाही स्वर्गाच्या दारातून जाऊ शकणार? शेवटी मोठे, कंटाळवाणे विवेचन करून आल्याची आठवण येऊन ते म्हणतात, ‘मी जाणीवपूर्वक निवडलेलं- “विहित” काम उत्तम करीन, पण त्यात अहंभावानं गुंतणार नाही. पलायनवादी होणार नाही. याचं नाव जिंकण्यासाठी खेळणे. अर्थात् ही लढाई स्वार्थासाठी नसते. नैतिकता आणि कार्यक्षमता यांच्यात अद्वैत येते ते असे.
अक्षरचा दिवाळी अंक शिवसेनेच्या परिसंवादाला वाहिलेला उघड दिसतो. मुखपृष्ठावर व्याघ्रचर्म, रुद्राक्ष आणि खङ्ग यांचे, भगव्याच्या पाश्र्वभूमीवर चित्रण आहे.संपादक ‘महानगरकर्ते निखिल वागळे आहेत. परिसंवादाचा विषय आहे ‘ठाकरे नावाचे वादळ’. सुहास पळशीकर यांचा ‘निम-फॅसिस्ट मोहिनीविद्येचा प्रयोग’ हा अप्रतिम लेख आहे. शिवसेनेचा तसा एकखांबी तंबू, त्यात नव्वद साली निवडून आलेल्यांपैकी १५ शिवसैनिक काँग्रेसवासी झालेले अशा विषमस्थितीत संख्याबळ ५२ चे ७३ पर्यंत वाढवण्यात ती यशस्वी झाली. याचे अत्यंत शास्त्रीय विश्लेषण चटकदार भाषेत पळशीकर करतात. ‘मार्मिक’ या सेनेच्या साप्ताहिकाने विविध विपर्यस्त पूर्वग्रह वाचकांमध्ये रुजवून या यशाला हातभार लावला. ठाकरे हिंदुहृदयसम्राट झाल्यावर शिवाजीराजे आपसूक हिंदुराष्ट्राच्या हिताला जुंपले गेले, सेनेमुळेच आपल्याला कोणीतरी त्राता आहे अशी भावना मुंबईकरांमध्ये निर्माण करण्यात शिवसेनेला यश आले अशी मीमांसा ते करतात. सेनेचे हिंदुत्व मुंबईच्या लोकलगाडीसारखे-खास कुठेच न जाणारे-जिथून निघते तिथेच परत येणारे अशी त्यांची नाडीपरीक्षा.
राखीव जागांचे प्रस्थ फारच वाढलं, मुस्लिमांचे लाड चाललेत या जाणिवेतून ब्राह्मण, मराठे, हिंदू हा विचारव्यूह आपलासा करतात. विखुरलेल्या निष्प्रभ जातींना सत्तेत वाटा मिळण्याचे स्वप्न आणि हिंदुत्वाच्या भावनिकतेची चलती. परिणामी अनेक वाल्यांना ‘वाल्मिकी बनण्याला वाव मिळाला. गर्दी आणि वक्तृत्व ही सेनेची आयुधे. ठाकरे भावनोद्दीपक वक्ते, आवेगाचं राजकारण, त्यामुळे नेता वास्तवापेक्षा मोठा, जगावेगळा अशी प्रतिमा उभी केल्याशिवाय हवा तो परिणाम साधत नाही. एका सभेत ते म्हणतात, “कसे बळी पडता रे तुम्ही? मी हे जे करतो ते कुणासाठी?… मी तर संन्यासी. माझं काही जाणार नाही.” अशी भाषणबाजी! दहशतवाद चिवट असतो हा जगभरचा उपद्रवकारक अनुभव. ठाकरे म्हणणार, ‘मला आठ दिवस पंतप्रधान करा. पाहा चुटकीसरसा काश्मीरचा प्रश्न सोडवून दाखवतो!’ श्रोत्यांचं संवेदन बोथट झालेलं. त्यावर हा संमोहनाचा मायावी प्रयोग. सर्व प्रश्नांना ठोस उत्तरे. बेकारीला कारण दाक्षिणात्य. दहशतवादाला मुसलमान. अशी ठोस उत्तरे. याप्रमाणे भावनोद्रेकातून फॅसिझमकडे होणारी वाटचाल. पळशीकरांनी विलक्षण कौशल्याने, अभ्यासाने, आकडेवारीने सादर केली आहे. याच परिसंवादातले इतर लेखक आहेत श्री. स. ह. देशपांडे, उद्धव ठाकरे, भाऊ पाध्ये, भाऊ पाध्यांचे लेखन विस्कळीत, स्वैर आठवणीवजा. ‘बाळ ठाकरेमध्ये शोधूनही माणुसकी सापडणार नाही हा त्यांचा निष्कर्ष. ‘आठवले-ढसाळ इंटलेक्चुअल्स. त्यांच्या बरोबर युती करण्यात अर्थ नाही, त्यापेक्षा भाजपावाले बिनडोक बरे, असं ठाकरेंना वाटायचं.’ हे भाऊ पाध्येकृत विश्लेषण. ठाकर्यांाच्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वाचा विस्तृत रोचक आढावा आहे ‘क्रिस्त्रीममध्ये. संपादक ह. मो. मराठ्यांच्या शब्दांत आपला ‘मार्मिक’चा संपादक म्हणून उणापुरा वर्षाचा अनुभव ह. मों. नी सांगोपांग उभा केला आहे.
लिमये आणि नानाजी या जनतापक्षाच्या दोन जनकांची ओळख त्यांच्या दोनचाहत्यांनी करून दिली आहे. अमरेन्द्र धनेश्वरांनी ‘अक्षर’ मध्ये ‘योद्धा’ लिमये चितारले आहेत. डॉ. दत्तप्रसाद दाभोळकरांनी कालनिर्णय सांस्कृतिक मध्ये, “आनंदयात्री – नानाजी देशमुखांचा परिचय घडवला आहे. दोन्ही लेख मुळातून वाचण्यासारखे. इथे फक्त दुधाची तहान ताकावर भागवायचा प्रयत्न करतो. लिमये १९८२ साली सक्रिय राजकारणापासून दूर झाले, नानाजी थोडे आधीच. दोघांनी सत्तास्थाने नाकारली. निर्धाराने. बिगरवैचारिक राजकारणातून लिमयांचे मन उडाले. पुढील १२ वर्षांत त्यांनी उदंड लेखन केले. लिमयांना गोवा सत्याग्रहात जबर मार बसलेला. आयटिस जडला. स्वहस्ते लेखन क्लेशदायक होई. एक दिवस त्यांना अचानक शोध लागला. अतिपातळ कागदावर पेनने लिहिणे शक्य झाले. त्यामुळे परावलंबन संपले. ‘धर्म’ या विषयावर त्यांनी सखोल चिंतन केले आहे. जपानच्या दृष्टीने धर्म म्हणजे फक्त नीतिनियमांची संहिता होती. हिंदुधर्मात एक व्यापक पातळीवरची सहिष्णुता आहे हे नाकारण्यात अर्थ नाही हे ते कबूल करतात. लिमयांनी आत्मचरित्र लिहायला घेतले होते. पहिला खंड पुरा झाला होता. पुढे भरभरून लिहीत होते अन् अचानक मृत्यूने गाठले. नानाजींनी ऐंशी ओलांडली. अजून ताठ चालतात. दणकून काम करतात. दणकून जेवतात. त्यांनी ‘लोकशिक्षण अभियान’ सुरू केले. शंभर ग्रामसमूह निवडले. तेथे शंभर सामाजिक बांधिलकी मानणारी पदवीधर जोडपी पाठवायची. त्यांनी निदान ५ वर्षे तेथे काम करावे. त्यांची चरितार्थाची काळजी दीनदयाल शोध संस्थान करील. नानाजी ज्ञानप्रबोधिनीपासून अलिगढ मुस्लिम विद्यापीठापर्यंत सर्वत्र पत्रे पाठवताहेत. ते म्हणतात, ‘एक नक्की, हा कार्यक्रम पुरा होण्यापूर्वी मी मरणार नाही. मेलो तर भूत बनून तुम्हा कुणाच्या डोक्यावर बसून हे काम पुरे करून घेईन!’
या आधी मध्यप्रदेशात देशातल्या पहिल्या ग्रामीण विश्वविद्यालयाची स्थापना त्यांनी केली आहे. चित्रकूट विश्वविद्यालयात प्राथमिक शाळेपासून डॉक्टरेटपर्यंतचे शिक्षण एकाच ठिकाणी गुरुकुलपद्धतीने दिले जाते. आयुर्वेद, योग, कॉम्प्यूटर अशा शिक्षणाची सोय. वयाच्या पाचव्या वर्षापासून पंचेवीसापर्यंत राहता येते. पुढे खेड्यात जावे एवढी अपेक्षा.
त्याआधी नानाजींनी उत्तरप्रदेशात गोंडा जिल्ह्यात काम केले. मागासलेला जिल्हा. जयप्रकाशजींची ‘विचारयात्रा वाचून संपूर्ण क्रांतीच्या कल्पनेने पछाडलेल्या नानाजींनी गोंडा प्रकल्प तयार केला होता. लोकांच्या पुढाकाराने आणि सहयोगाने झालेले संपूर्ण परिवर्तन. त्यातून साधलेला विकास. नानाजींनी १९७७ साली केंद्रीय मंत्रिपद नाकारून सुरू केलेला हा प्रकल्प. डॉ. दाभोळकरांनी त्यावर प्रकाशवाटा’ हे पुस्तक लिहिले आहे. | ‘हिंदुत्वाचे अन्वेषण’ करणारे जे विद्वान ‘झोपडपट्टीपर्यंत जाताना हिंदुत्ववाद्यांच्या पायाला माती लागते म्हणून टोमणे मारतात त्यांनी अवश्य वाचावा असा हा लेख आहे.’ ‘तळागाळातल्या मानवाचे मानसिक आणि आर्थिक प्रश्न समजावून घेण्यासाठीच नव्हे तरसोडविण्यासाठी या हिंदुत्ववाद्यांचे पंचेवीस हजार प्रकल्प चालू आहेत हे त्यांना माहीत नाही हे उघड आहे. नानाजी देशमुख नावाचा हा माणूस संघ नावाच्या शाळेत घडलेला आहे. नऊ वर्षांचा होईपर्यंत मुळाक्षरेसुद्धा न येणारा, परभणी जिल्ह्यातला कडोळीच्या एका देशमुख कुटुंबातला हा मुलगा, १९७७ साली मोरारजीसारख्या पंतप्रधानाला, “मला न विचारता । मंत्रिमंडळात माझे नाव घालायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?’ असे खडसावतो. तो जयप्रकाशजींसारख्या सर्वोदयी नेत्याचाच नाही, तर प्रत्येक नारळ वाजवून घेणाच्या लोहिया-लिमयेसारख्यांना ‘खरा’ आणि ‘आपला’ कसा वाटतो? एक रुपयाचे चौसष्ट पैसे होत त्या काळात वेळोवेळी एक पैशाचे चणे किंवा पेरू खाऊन राहणार्या, अनेक कार्यकर्त्यांपैकी एक असलेला पुढे तुरुंगवासात रफी अहमद किडवाईंकडून जेवणाचा डबा येण्याइतका जवळचा मित्र कसा होतो ही अद्भुत जीवनगाथा मनाची कवाडे मुक्त ठेवून वाचणारांसाठी आहे.
जगात सगळीकडून आलेल्या सद्विचारांचे स्वागत आम्ही करतो हे (आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः ।) म्हणायला आपल्याला वैदिक ऋषीच व्हावे लागते असे नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.