अंतर्ज्ञान : एक अहवाल

काही व्यक्तींना दिव्यदृष्टी प्राप्त झालेली असते, तिच्या योगाने त्यांना अतींद्रिय मार्गाने ज्ञान मिळू शकते अशी अनेक लोकांची पक्की धारणा असते. या समजुतीत कितीतथ्य आहे याबद्दल एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. (त्याचा गोषवारा ११ डिसेंबर १९९५ च्या टाइम या नियतकालिकात आला आहे). या विषयामध्ये संशोधन करून त्याविषयी शहानिशा करण्यासाठी अमेरिकेमध्ये एक प्रकल्प राबविला. अमेरिकेजवळ द्रव्याची विपुलता आहे तेव्हा या संशोधनासाठी द्रव्याचा अपुरेपणा त्यांना जाणवत नाही. अतींद्रिय सामर्थ्याद्वारे दूरच्या घटनांविषयी ज्ञान होऊ शकते याचा छडा लावण्यासाठी १९७२ ते १९७७ या काळामध्ये ७.५ लक्ष डॉलर्स खर्च झाले. त्याखेरीज गेल्या १० वर्षांत २ कोटी डॉलर्स खर्च केले आहेत. या मंथनातून काय निष्पन्न झाले?
काही उदाहरणे
१९८१ साली डोझिअर नावाच्या अमेरिकन सेनानीचे अपहरण करण्यात आले होते. त्याच्या ठावठिकाण्याबद्दल एका अंतर्ज्ञानी व्यक्तीने असे सांगितले की त्या सेनानीला तांबडे छत असलेल्या दगडी घरात डांबून ठेवले आहे. इटलीमध्ये अशी अनेक घरे आहेत. एका व्यक्तीने डोझिअर हा पदुआ येथे आहे हे बरोबर सांगितले होते असा दावा आहे. दुसर्याा अंतर्रष्ट्याने रशियाच्या पाणबुड्यांच्या कारखान्याच्या ठिकाणाबद्दल दिलेली माहिती खरी निघाली. ही जागा अमेरिकेच्या हेरगिरी करणार्याय उपग्रहाच्या नजरेस आली नव्हती. १९९३ मध्ये अंतर्दृष्टीचा दावा असलेल्या व्यक्तीने उत्तर कोरियाच्या सीमेजवळच्या असैनिकी प्रदेशाजवळ खोदण्यात आलेली वीस भुयारे बरोबर दर्शविली.
याउलट १९८१ मध्ये अंतर्ज्ञान असणार्याप व्यक्तीला लाओसमध्ये युद्धबंदी कोठे आहेत असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्या व्यक्तीने नकाशावर एका ठिकाणी बोट ठेवले. उपग्रहाने घेतलेल्या चित्रात त्या जागी युद्धबंद्यांची छावणी असावी असे दिसत होते. प्रत्यक्ष त्या जागी गेल्यानंतर त्याच्या आसमंतात एकही युद्धबंदी आढळला नाही. १९८६ मध्ये लिबियावर हल्ला करण्यापूर्वी युद्धविभागाने कर्नल गद्दाफी निश्चितपणे कोठे आहे याबद्दल सल्लागार अंतर्ज्ञान्याकडे विचारणा केली असता त्याच्याकडून नक्की माहिती मिळाली नाही. त्याचप्रमाणे एक ओर शत्रुपक्षाचेही काम करून त्यांच्याकडून देखील द्रव्य मिळवीत होता. हे द्रव्य त्याने कोठे ठेवलेले आहे हे देखील त्यांना सांगता आले नाही. अशी उलटसुलट माहिती गोळा होत गेल्याने शेवटी ही सर्व आधारसामग्री (data) सांख्यिकीशास्त्रज्ञांना देण्यात आली. या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळले की बरयाच प्रसंगी दिलेली माहिती अप्रस्तुत आणि चुकीची होती. अनेक वेळा ती माहिती अनिश्चित स्वरूपाची व गुळमुळीत होती. केवळ २५ टक्क्यातील माहिती बरोबर होती. पण कोणी आणि केव्हा सांगितलेली माहिती खरी असेल हे सांगता येत नव्हते.
२५ टक्क्यातील माहिती तरी बरोबर का असावी? याची कारणमीमांसा देण्यात आली आहे. एक तर अशा व्यक्तींच्या संपर्कात असणान्या मध्यस्थांकडून त्यांना अभावितपणे सूचना मिळत असावी, कधी कधी मध्यस्थ मंडळी अंतर्ज्ञानी (!) व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीला पदरचा मीठमसाला लावून सांगत असतील. आणखी एक बाब म्हणजे अशा व्यक्तीपूर्वी संरक्षण दलासाठी गुप्त माहिती मिळविण्याचे काम करीत असत तेव्हा पूर्वीच्या घटना आणि त्यांची ठिकाणे याविषयीची काही माहिती त्यांच्या अबोध मनांत (subconscious mind) दडलेली असणे शक्य आहे.
अशा प्रकारे कठोर परीक्षणाच्या कसोटीवर अंतर्दृष्टी फोल असल्याचे आढळून आल्यामुळे अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च या संस्थेने या विषयीचे प्रकल्प बंद करावेत अशी शिफारस केली आहे. त्या अनुसार हे प्रकल्प बंद होणार आहेत, तरीपण तिथल्या काही लोकांचा अंतर्दृष्टी, अंतर्ज्ञान या घटनांवर पक्का विश्वास आहे!