मिथ्ये आणि वास्तव

(१) ज्ञानदेव – ‘म्हैशा मुखीं वेद बोलविले’
जगातील पुराणकथातील, संतचरित्रातील कथानायकांच्या जीवनात अलौकिक वाटणाच्या घटनांची रेलचेल असते. मानवी स्वरूपातील व्यक्ती अतिमानवी स्वरूपात प्रक्षेपित केल्या जातात. काही कथानायक निसर्गशक्तींच्या मानवीकरणातून (athropomorphism) जन्माला आले असतात. त्यांच्या जीवनातील अलौकिकत्व नैसर्गिक शक्तीचे कार्य म्हणून स्पष्ट करता येते. जसे ‘अग्नी हा देवांचा पुरोहित आहे असे ज्यावेळी सांगितले जाते त्यावेळी अग्नीतून निर्माण होणारा धूर यज्ञात अर्पण केलेल्या आहुतींना इष्ट देवतेकडे नेतो असा त्यातून बोध होतो. ऐतिहासिक व्यक्तीदेखील अतिमानवी स्वरूपाच्या अचाट कृत्यांच्या वलयात गुरफटून टाकल्या जातात. त्यांच्या चरित्रांतही मिथ्या भासणाच्या अनेक घटना गुंफल्या असतात. प्रवचनकार, कथाकार, व्यासपीठावरून अशा मिथ्या घटनांना चिरंजीवित्व देत असतात. ही मिथ्ये आहेत तशी स्वीकारायची? ज्यांचा प्रज्ञाचक्षु आंधळा असतो अशा भाष्यकारांना चरित्रनायकाच्या जीवनातील या मिथ्या घटना कायम ठेवायच्या असतात. या घटनांचा बुद्धिवादाने वास्तव अर्थ लावता येऊ शकतो वा नाही? याचा विचार करण्याची कर्मठांना, परंपरावाद्यांना गरज नसते. सामान्य जनांच्या मनात रुजविलेल्या अंधश्रद्धांच्या आधारावर त्यांची प्रतिष्ठा आणि विद्वत्ता आधारित असते. बुद्धिवाद्यांनी अशा घटनांचा एखादा वास्तव अर्थ सांगितला की सारे परंपरावादी अतिशय अस्वस्थ होतात. मिथ्यात्व स्वीकारणे आणि त्याचा प्रचार करणे ह्यांत त्यांचे स्वतःचे अज्ञान आणि समाजाची अंधश्रद्धा सुरक्षित असतात. मिथ्यत्त्वाच्या बुरुजाखाली कोणत्या वास्तव घटनेचा पाया आहे याचा शोध घेता येणे शक्य असते. पण अनेक चरित्रकारांनी हे शोध घेण्याचे प्रयत्न टाकून दिलेले असतात. अलौकिकत्व, गूढत्व मिथ्यात्वे यांच्या कचर्यारतून एखादी अर्थपूर्ण लौकिक अथवा ऐतिहासिक घटना शोधून काढणे शक्य असते. चरित्रे जशी मिथ्या घटनांनी भरली असतात तशीच काव्ये गूढत्वाने अनर्थकारी झाली असतात. मिथ्यात्व वास्तव झाकून ठेवते. गूढत्व अर्थावर झाकण घालते.
संत नामदेवांचा जन्म शिंपल्यातून झाला असे ‘संतविजयकार महीपती दोनशे वर्षापूर्वी सांगतात. आणि त्याकाळातील भाबड्या श्रोत्यांचा त्यावर विश्वास बसतो. नामदेवांच्या शिंपी जातीला महीपतीने शिंपल्याच्या गर्भात ठेवले. नामदेवांचा समकालीन चांगदेव चौदाशे वर्षे जगला असेही वर्णन आहे. चवदाशे वर्षे शरीर केले जतन। नाहींअज्ञानपपा गेलें माझें (संतनामदेवगाथा, क्र. ११४२) असे आत्मकथन चांगदेवांनी समाधी प्रकरणात दिलेले आहे. पांगारकरांच्या ज्ञानदेव चरित्रात (पान १२४) आणि सोनोपंत दांडेकरांच्या ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेतील चरित्रात (पान ७) चांगदेव चौदाशे वर्षे जगले असाच विचार मांडला आहे. पण या दोनही विद्वानांना हे कळले नाही की चौदश (चाळीस) या संख्यावाचक विशेषणाची “ब्रह्मोक्ति” (ब्रह्मातिशयानं या अर्थाने) चरित्रकारांनी किंवा संतकवींनी चौदाशे अशी सांगून त्याचा जन्म मौर्यकालखंडात नेऊन ठेवला आहे. ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेदपठणाचा जो कार्यक्रम करून दाखविला तो आजही प्रत्येकाला सत्य वाटणारी घटना आहे.
रेड्याच्या मुखातून वेदपठणाचा कार्यक्रम साधकाला कोणत्या सिद्धीने शक्य असतो ते तपासून पाहाणे आवश्यक होते. पण अशी डोळस भूमिका न घेता अगम्य अचाट असे काहीतरी सांगून श्रोत्यांना स्वप्नरंजनात ठेवण्यासाठी कीर्तने प्रवचने रंगलेली असतात. लौकिकात प्रत्ययाला येणारी नाती गोती, पारलौकिक अर्थाने भ्रमात्मक ठरवायची आणि लौकिकात अगदीच अशक्य वाटणारी वेदपठणाची घटना पारलौकिक अर्थाने वास्तव ठरते. अशा विसंगतीने भरलेल्या वैचारिक पीठावरच भ्रमात्मक जगात ऐतखाऊपणाने पोट भरणारे साधक सामान्यांचा बुद्धिभेद करीत आहेत. हेच धूर्त आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे पहारेदार
आहेत.
यौगिक सिद्धीच्या भूलभुलैयात आपण हजारो वर्षांपासून अडकलो आहोत. या सिद्धी म्हणजे योग्याला होणारे मानसिक विभ्रम असतात किंवा त्याची ती उन्मादावस्था असते असे सांगण्याचे धैर्य का होत नाही? सिद्धी प्राप्त झाल्याची जाणीव ही एक आत्मभ्रांत अवस्था असते आणि तिची परिणती ‘एपिलेप्सीसमान अवस्थेतील मृतप्राय अशा समाधी अवस्थेत होते हे एक कटू सत्य आहे. पतंजलीच्या विभूतिपाद सूत्रांत (सूत्र ४५) ‘अणिमा’आदि सिद्धींचा निर्देश आहे. (अणिमा, लघिमा अशा आठ सिद्धी सांगणारा संदर्भ पतंजलीच्या योगशास्त्रात आढळलेला नाही.) पण भागवतात मात्र ११ व्या स्कंधात अठरा सिद्धींची यादी दिलेली आहे. त्यापैकी कोणत्याच सिद्धीत हा वेदपठणाचा कार्यक्रमकरण्याचे सामर्थ्य नाही हे लक्षात घ्यावे लागते. मग रेड्याचे वेदपठण झाले कसे?
रेड्याच्या वेदपठणाच्या कार्यक्रमाविषयी पोटतिडकेने लिहिण्याची गरज एवढ्यासाठीच की मराठी साहित्याचे संशोधक हा कार्यक्रम ज्ञानदेवचरित्रात आवर्जून सांगतातच पण या अगम्य घटनेतील वास्तवता शोधण्याचा प्रयत्न करणार्या बुद्धिवाद्यांना भावुकतेने प्रश्न विचारतात. ‘चमत्काराची शक्यता वादातीत आहे’…. निर्णय देण्यापूर्वी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास आवश्यक आहे. संतांनी केल्या चमत्कारांची आणि अनुभविलेल्या गूढ संवेदनाची, साधकाच्या अतींद्रिय अनुभवाची वासलात त्या शास्त्राचा अभ्यास न करता पुढील पिढीतील बावळट भक्तांची बुद्धिभ्रष्टता अथवा लफंग्याचीजाहिरातबाजी अशा सारख्या अशिष्ट शब्दांनी लावावी काय?…..चमत्काराची शक्यता वादातीत आहे.’ (ज्ञानेश्वर चरित्र – रा. शं. वाळिंबे. पान. ३२-३४)
इ. स. १९६९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ज्ञानेश्वरीच्या आवृत्तीत कै सोनोपंतांनी हा रेड्याचा कार्यक्रम ठेवला आहेच. वारकर्यांधनी, कथा कीर्तनकारांनी, कर्मठ प्रवचनकारांनी हे चमत्कार सांगितले त्याविषयी आक्षेप घेण्याची गरज नाही. कारण मेंढरांप्रमाणे त्यांचा मार्ग पहिले मेंढरू थांबेतोपर्यंत कळपाने चालू असतो. पण प्राध्यापक तर स्वयंप्रज्ञ असावेत अशी अपेक्षा असते. आणि समजा हे चमत्कार एखाद्या जादूगाराप्रमाणे ज्ञानदेवादि संतांनी केले असतील तर ते कोणत्या सिद्धीच्या आधारे शक्य आहे हे तरी निदान सांगावयास पाहिजे. पण अशी सिद्धी आम्हाला पातंजल योगशास्त्र, भागवत किंवा तत्पूर्वीचा कौलज्ञान निर्णय या ग्रंथात आढळली नाही. नाही म्हणावयास ‘कौलज्ञान निर्णयात (संपादन डॉ. प्रबोधचंद्र बागची) आठव्या प्रकरणात पशुग्रहणमावेश (३४) परकायप्रवेशनम् (३४) अशा ज्या दोन महत्त्वाच्या सिद्धी दिलेल्या आहेत त्यावरून ज्ञानदेवांनी स्वतःच रेड्याच्या शरीरात प्रवेश करून वेदघोष केला असे फारतर म्हणता येईल पण या संपूर्ण प्रकरणाचे अध्यक्षस्थान ज्ञानदेवांकडेच असते आणि रेडा व ज्ञानदेव दोघेही चैतन्यमय पार्थिव शरीरात असतात म्हणून ही सिद्धी रेड्याच्या मंत्रजागरासाठी वापरली गेली असे म्हणता येत नाही. ‘योगयाग विधि येणें नोहे सिद्धि। वायाची उपाधि दंभ धर्म असे स्वतःच ज्ञानदेव हरिपाठातील अभंगातून सांगतात. मग हा चमत्कार लफंग्याची जाहिरातबाजी म्हणून त्याज्य ठरवायचा? की त्यातून ज्ञानदेवचरित्रावर जो महत्त्वाचा प्रकाश पडतो त्या दृष्टीने या चमत्कारामागे असणार्या् वास्तव घटनेचा शोध घ्यावयाचा? असा प्रयत्न मराठी साहित्याच्या आंधळ्या संशोधकांनी प्रमाणे उपलब्ध असताही केला नसतो.
रेड्याच्या वेदपठणाचा कार्यक्रम कसा घडून आला याविषयीचे वास्तव सूत्र शोधण्याच्या अगोदर या कार्यक्रमाची जाहिरात करणार्याय संतांची साक्ष काढणे आवश्यक आहे. एकनाथाच्या काळापर्यंत संतांना ज्ञानदेवांच्या चरित्रातील दोनच चमत्कार ज्ञात आहेत. ‘वेद म्हैशामुखीं बोलविले।’ ‘चालविली भिंती मृत्तिकेची । हे दोनच चमत्कार नामदेव सांगतात. जनाबाई ज्ञानदेवांचा एकही चमत्कार सांगत नाही.’रेडियाचे मुखें वदविली वेद श्रुति। गर्व हरविला चालविले भिंतीशी।’ असे दोन चमत्कार कान्होपात्रा सांगते. सेना महाराज (एकनाथोत्तर कालखंड) ज्ञानदेवांनी स्वर्गातून पितरांना बोलविले अशी महती सांगून
• भित्तिचलनाचा चमत्कार सांगतात. नामदेवाच्या काळातील महिशाचा हळूहळू रेडा होत गेला असे दिसते.’महिषा हा पशु नसून ते ज्ञानदेवांचे उपनाव (आडनाव) होते हे एकदा सिद्ध झाले की ज्ञानदेवांनीच वेदपठण करून पैठणच्या ब्राह्मणांना खाली पाहावयास लावले अशी वास्तव कथा बाहेर येते. एकनाथ रेड्याचे वेदपठण सांगतात.
कुळकर्णी हे ज्ञानदेवांचे आडनाव नसून वृत्ती होती. पण स्वतःला त्यांनी अनेक ठिकाणी महेशअसे परिचित करून दिलेले आहे आणि संतसाहित्याच्या अभ्यासकांनी महेश म्हणजे शंकर असा अर्थ लावून वास्तवाचे द्वार बंद करून ठेवले आहे. ज्ञानदेवी.आणि अभंग यांत शंकराविषयीचे उल्लेख नगण्य आहेत. ‘हरिहरि हा मंत्र शिवाचा’ असे हरिपाठाचे अभंगात सांगून त्यांनी शंकराला गौणत्व दिलेले आहे. ज्ञानदेवांचा विठ्ठल कृष्णाचे स्वरूप आहे हे त्यांच्या गौळणीतून अभंगातून अगदी स्पष्ट आहे. अमृतानुभावातील शिवशक्ति रूपके शंकर पार्वतीला उद्देशून नसून पुरुष प्रकृतीला उद्देशून आहेत. ज्या ज्या संदर्भात ज्ञानदेवांनी ‘महेशु असा निर्देश केला तो शंकरदैवता संबंधी नसून आत्मानुभूतीचे प्रदर्शनासाठी आहे हे अभ्यासकांनी लक्षात घ्यावे यासाठी हे संदर्भ दिलेले आहेत. ‘तेथे महेशान्वयसंभूतें। श्री निवृत्तीनाथ सुतें । केलें ज्ञानदेवें गीतें। देशिकारलेणें (ज्ञाने. १८-१८०५) ‘तेथ प्रवृत्तितरूच्या बुडी। दिसतो निवृत्ती फळचिया कोडी। जिये मार्गीचा कापडी। महेशु अजुनी। (ज्ञाने ०६-१५३) रूप पाहतां डोळसु । सुंदर पाहतां गोपवेशु । महिमा वर्णितां महेशु। जेणें मस्तकीं वंदिला। भक्ति देखोनि उभा केला। निवृत्तिदास म्हणे विठ्ठला। जन्मोजन्मीं न विसंबे।’ या अभंगाचा सरळ अर्थ असा आहे नेत्राला सुखद असे रूप बघून आणि तसाच सुंदर गोपवेश बघून महेशाने चरणावर मस्तक ठेवले आणि भक्तीचा जिव्हाळा बघून त्याला सन्मुख उभे केले. निवृत्तिदास (ज्ञानदेव) म्हणतात, विठ्ठला मी जन्मोजन्मी अंतरणार नाही. या अवतरणातून ज्ञानदेव स्वतःला महेशु म्हणवून घेत हे स्पष्ट होतेच. पण महालया, म्हणजेच म्हाळसा त्यांचे कुळदैवत असल्यामुळे या दैवतावरून देखील ते म्हाळसे, अथवा महिशे या उपनावाने प्रसिद्ध असावेत असाही तर्क करता येतो. दैवतावरून आडनावे कशी रूढ होत यासंबंधी नामदेवांचा अभंग आहे. ‘गणपती पूजिले ते दोंदे भले। शीतला पूजिली ते म्हैसे भले। मैराळ पूजिले ते वाघे भले। सूर्य पूजिले ते घोडे भले (शासकीय प्रत नामदेव गाथा अभंग २०१५). या अभंगातून दोंदे, म्हसे, वाघ, घोडे याआडनावामागे असणारी परंपरा लक्षात येते. नामदेव जिला शीतला म्हणतात ती विदर्भात माराई देवता म्हणून ‘मातामाय’ या नावाने पूजिली जाते. ही माराई‘महालया या देवतेच्या नवाचा अपभ्रंश आहे. म्हाळसा, महालया, महालयी, महाराई, (राई-पार्वती) माराई असा अपभ्रंश होत गेला आहे. शीतला म्हणजेच माराई
आणि या माराईचे म्हणजेच म्हाळसेचे पूजक म्हणून ज्ञानदेव महिशे, वा म्हसे होते. आणि ‘म्हैशामुखी वेद वदविले याचा अर्थ, ज्ञानदेवांनीच वेद म्हणून दाखविले. या अर्थाची कथा एका अभंगात आहे. संशोधकांनी तो अभंग दुर्लक्षित केला आहे.
प्रतिष्ठान क्षेत्र तेथ ‘ज्ञानियाचे गोत्र। म्हणती हा पवित्र पतित झाला।।
नोहे पुरा इती नोहे हा गृहस्थ । घातला यात वेगळा रे।
नव्हे हा गोताचा नोहे हा कुळाचा । कुळकर्म याचे पुसो नका।।
पढयंताचा मुळी पालाणीला म्हैशा। पखाला कैशा वाहताती।
पृष्ठीवरी मारिती ज्ञान्या चाल म्हणती। ऐकोनिया श्रुती दुखावला।
मग बोलावूनि म्हैशा म्हणे तूं ज्ञानिया कैचा। बोलका रुची वेदश्रुती।
तंव तो उपनिषदाचें सार। वेदाचें गह्वर कथित असे।
देखोनि चमत्कार म्हणती साक्षात्कार। ईश्वर हा तारक वशासी |
(प्र. न. जोशी संपादित ‘ज्ञानदेव अभंग गाथा, क्रमांक ७३१)
हा अभंग अगदी स्पष्ट आहे. या अभंगात विठ्ठलपंत आणि ज्ञानदेव यांच्या चरित्राची सरमिसळ आहे. विठ्ठलपंतांनाच या अभंगात ज्ञानदेव म्हटले आहे. आणि त्यालाच पखाली वाहणार्याह महिशाचे विशेषणाने हेटाळले आहे. ‘अरे महिशा तू ज्ञानी म्हणवतोस काय म्हणून पृष्ठभागावर लाथ मारली आहे. पुन्हा परत बोलावून ज्ञानियाचे गोत्रज म्हणाले, अरे महेशा तू कसला रे ज्ञानी? वेदश्रुती तरी तुला पाठ आहेत काय? तेव्हा त्याने उपनिषदाचे सार म्हणजेच बहुतेक शांकरवेदान्त सांगितला असावा. आणि पैठणच्या भिक्षुकांना या वेदान्तशास्त्राने प्रभावित केले असे दिसते. ‘म्हैशामुखीं वेद बोलविले या मिथ्या वाटणाच्या घटनेत ज्ञानदेवांवर झालेल्या अन्यायाचे वास्तव चित्रण सुरक्षित असून त्यांच्या जीवनातील एक अप्रिय आणि अवमानजनक घटना दडून आहे. ‘चालतील भिंती फुटतील पाय। ‘अग्नीचे पाठारी पीक होय’।असाही ज्ञानदेवांचा एक अभंग आहे. या ओळीच्या अनुरोधाने भिंत चालविण्याचाही प्रयोग ज्ञानदेवाच्या चरित्रात गुंफून टाकला गेला. भक्तांच्या सामर्थ्याची महती करणारे हे अतिशयोक्त विधान एका मिथ्याची कथावस्तु झाले. प्रा. वाळिंबे म्हणतात की ‘हे चमत्कार समजून घेण्यासाठी अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासाची आवश्यकता आहे. अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करणारे ज्ञानी असे चमत्कार योग्यांना शक्य नसतात म्हणून सावध करतात. योग्यांना प्राप्त सिद्धींद्वारे विपर्यय करता येत नाही. न च शक्तोऽपि पदार्थविपर्यासं करोति (पातंजल योगशास्त्र, संपादन भगीरथमित्र, हरिहरानंदाचे भाष्य, सूत्र ४५) योगसिद्धों को ये शक्तियां होने पर भी वे पदार्थों का विपर्यय नहीं करते हैं या नहीं कर सकते हैं। पदार्थ विपर्यास करने की शक्ति उनमें नहीं है। चंद्रमा की गति द्रुत करना इत्यादि पदार्थविपर्यय है। योगी गण ईश्वरी संकल्पसे मुक्त पदार्थ में यथोचित प्रयोग कर सकते हैं। (तत्रैव पान २८२). हरिहरानंदाचे हे स्पष्टीकरण वाचल्यानंतर या चमत्कारांना शतकानुशतके कवटाळून बसणाच्या कर्मठांनी, अभ्यासकांनी मिथ्यत्वात रंगून जाण्यापेक्षा वास्तवात धैर्याने उभे व्हावे आणि सामान्यांचा बुद्धिभेद करण्याचा धूर्तपणा करू नये.
(लेखातील विचाराचा काही अंश २० वर्षांपूर्वी नवभारत (वाई) मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखात प्रस्तुत लेखकाने मांडलेला आहे.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.