वास्तवे आणि मूल्ये

निसर्ग किंवा इतिहास कोणीही आपण काय करावे हे शिकवू शकत नाही. नैसर्गिक किंवा ऐतिहासिक वास्तवे (facts) यांपैकी कोणीही आपले निर्णय घेऊ शकत नाही. आपण कोणती साध्ये स्वीकारणार आहोत हे ती सांगू शकत नाहीत. निसर्गात किंवा इतिहासात हेतू आणि अर्थ आपण घालतो. मनुष्ये समान नाहीत; परंतु समान हक्कांकरिता झगडायचे आपण ठरवू शकतो. राज्यासारख्या मानवी संस्था विवेकी नसतात; परंतु आपण त्यांना विवेकी करण्याकरिता लढा करण्याचे ठरवू शकतो. आपण आणि आपली साधारण भाषा सामान्यपणे विवेकी नसून भावनिक असते; पण आपण थोडे अधिक विवेकी होण्याचे ठरवू शकतो, आणि आपली भाषा आपले रोमांचवादी शिक्षणतज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ‘आत्माविष्काराकरिता नव्हे, तर विवेकी संज्ञापनाकरिता (communication) वापरण्याचे स्वतःला शिकवू शकतो.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.