समाजसुधारणा, पुनर्घटना आणि डॉ. केतकर

अमेरिकेस गेल्यानंतर आपण काय करावे याचे मनापुढे कोणतेच कल्पनाचित्र नव्हते’ असे म्हणणारे केतकर, तेथील विद्यार्जन आटोपताच,
जाई देशी, कार्यलागे स्वजनांच्या कल्याणा
असे कृतनिश्चय होऊन परतले होते. अमेरिका आणि इंग्लंडमधील वास्तव्यातज्ञानकोशाचा उपयोग त्यांनी पाहिला होता. तयार ज्ञान तत्काळ हाताशी असणे याचा फायदा इंग्रजी सुशिक्षितांस सहज मिळत होता. तसा ज्ञानकोश मराठीच असावा असे त्यांना वाटू लागले. एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका वरील अमेरिकन समाजाचे काही आक्षेप त्यांना पटले होते; त्यामुळे ज्ञानकोशात सर्व ज्ञानाचा संग्रह व्हायचा असला तरी तो संग्रह ज्ञानकोश ज्या समाजासाठी असेल त्याच्या गरजांप्रमाणे ठेवला पाहिजे असे त्यांनी ठरविले. ज्ञानकोश करण्याचा हेतू सांगताना ते म्हणतात, ‘हिंदू समाजाचे व विशेषतः महाराष्ट्रीय समाजाचे हितसंबंध ओळखून तद्विषयक माहिती वाचकांपुढे ठेवणे हेही ज्ञानकोशाचे ध्येय आहे. सामान्यजनता आणि आपल्या देशासंबंधाने संशोधन करणारा वर्ग यांच्या ज्ञानात जे आज जमीन अस्मानाचे अंतर आहे ते काढून टाकण्यासाठी आणि राजकीय स्वातंत्र्याइतकेच महत्त्वाचे जे ‘महाराष्ट्राचे बौद्धिक स्वातंत्र्य (ते) स्थापन करण्यासाठी त्यांनी या कार्याला हात घातला.
विज्ञान सारख्या उपयोजित ज्ञानापेक्षा शुद्धज्ञानाची साधना अधिक कठीण असते. तिचे फल दिसावयास मोठा कालावधी लोटावा लागतो. त्यामुळे समाज अशा कामासाठी सहजासहजी पैसा खर्च करण्यास राजी नसतो. म्हणून केतकरांनी ऑगस्ट १९९५ मध्ये ज्ञानकोश मंडळाची योजना नागपूर येथे डॉ. मुंजे, डॉ. ना. भा. खरे, डॉ. चोळकर, उद्यमचे श्री. पाध्ये अशा कत्र्या आणि साधन-संपन्न मंडळीसमोर मांडली. कारखानदार उद्योगपती काढतात तशी सामुदायिक मर्यादित मंडळी’ (पब्लिक लिमिटेड कंपनी) स्थापून भांडवल उभारणी करायचे ठरवले. केतकरांनी हे कार्य नागपुरात सुरू केले त्याला कारण त्यांच्या स्वाभावाला साजेसे जितके आहे तितकेच त्यांच्या कार्यनिष्ठेला आहे. केतकरांना नागपूरवर्हासडप्रांत आपली जन्मभूमी म्हणून फार प्रिय होता. त्यांना पुण्याचे प्रेम नव्हते, महाराष्ट्राचे होते, त्यातून ह्या पूर्व महाराष्ट्राचे! शिवाय पुण्या-मुंबईची मंडळी संस्था काढतात त्यासाठी इकडून वर्गणी नेतात, तर आपणच हिंदुस्थानात नाव गाजेल असे काम इथे का करू नये असाही विचार होता. ज्ञानकोशाचे काम पुण्याला न करता नागपुरात त्यांनी का सुरू केले याचे आणखी जे एक कारण होते त्यातून त्यांची कार्यनिष्ठा दिसते. पुण्यात टिळक हे असे व्यक्तिमत्त्व होते की त्यांच्या वाचून एवढे अवघड काम सिध्दीस जाणार नाही म्हणून त्यांना त्यात घ्यावे लागणार. बरे त्यांना घेतले तर मवाळपक्ष बिथरणार. डॉ. भांडरकर आणि फर्गसनमधील विद्वान पंडितांची मदत तर त्यांना लागणार होती. त्यांच्या फटकळपणामुळे ही मंडळी आधीच दुखावलेली होती. ‘स्वार्थत्यागाची मीमांसा’या आपल्या लेखात निरुपयोगी स्वार्थत्यागाचे म्हणून त्यांनी फर्गसगच्या प्राध्यापकांचे उदाहरण दिले होते. त्यांचे म्हणणे की शिक्षणासारखे जे काम सरकारी संस्था करतात तेच करायला स्वार्थत्याग करणे व्यर्थ आहे. एवढे असूनही वासुदेवराव पटवर्धनांसाख्या प्राध्यापकांनी त्यांच्याबद्दल गैरसमज होऊ दिले नाहीत. डॉ. धर्मानन्द कोसांबी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बौद्ध पंडित आणि पालीभाषेचे विद्वान. ते केतकरांच्या बुद्धविषयक लिखाणाने चिडलेले होते. गौतमबुद्धाने वेदवाचलेले नव्हते आणि त्याला संस्कृतचेही ज्ञान नव्हते अशी विधाने त्यांनी केली होती. त्यावरून बरीच वादावादी झाली आणि कोसांबीना औचित्याचे भान नसल्यामुळे आपण एकतर्फी हा वाद थांबवत आहोत असा शेरा त्यांनी मारला होता. ज्ञानकोशासाठी पालीवाङ्मयावर लिहावे म्हणून विनंती करण्यासाठी कोसांबींकडे ते गेले तेव्हा त्यांनीआठवण दिली की, मला तर औचित्याचे भान नसते असे तुम्ही म्हणता, मग आता माझे लिखाण कसे मागता? यावर केतकरांनी दिलेले उत्तर वात्रटपणाचे वाटले तरी मार्मिक
आहे. ते म्हणाले, मी तुम्हाला पालीवाङ्मयावर लिखाण मागत आहे, ते आपण पालीभाषेचे पंडित आहात म्हणून. औचित्यावर लिहायची वेळ येईल तेव्हा मी दुसरा लेखक पाहीन. यातला गमतीचा भाग सोडला तरी कार्यलोभी केतकर आपल्या मनात भरतात. डॉ. भांडारकरही त्यांच्या सारस्वत जातीवरील बोचच्या लिखाणामुळे रुष्ट होते. केतकरांनी त्यांची समजूत काढली तेव्हा मात्र ज्ञानकोशातील लिखाण तपासून देण्याचे त्यांनी कबूल केले. खुद्द टिळकांनी हे काम शेवटास कसे जाईल याबद्दल शंका व्यक्त केली. तसे स्वभावगत फटकळपणाने ते म्हणाले की, हे कार्य करू की नको याचा सल्ला मी मागत नाही. तुम्ही काय मदत देता ते बोला! टिळकांनी लेखन-साहाय्य देण्याचे कबूल केले आणि एक मौलिक हितोपदेश केला की सर्व लिखाण तज्ज्ञांकडून तपासून घ्या. एक भांडारकर सोडले तर सर्वाचे- त्यात आपणही आलो, राजवाडेही आले-लिखाण तपासून घ्या.
या प्रमाणे सर्व तयारीनिशी केतकरांनी ३१ मार्च १९१७ रोजी नागपूर येथे गुढीपाडव्याच्या दिवशी कोशकार्याची औपचारिक मुहूर्तमेढ रोवली. वॉकररोडवरील एका कोपर्या्त दाते यांच्या घरात कार्यालय थाटले. पुढे आधीच्या काही प्रवर्तकांनी गृहकलह सुरू केला. त्यांतल्या पाध्ये, ठेगडी आणि भवाळकर या गटाला यशस्वी काटशह देऊन केतकरांनी ज्ञानकोशाचे कार्य पुण्याला हलविले ते जून १९१९ मध्ये. तोपर्यंत ज्ञानकोशात यावयाच्या नोंदींपैकी तीनचतुर्थांश नोंदींची कच्ची टिपणे तयार झाली होती.
ज्ञानकारण करताना अर्थकारण विसरू नये हे तत्त्व त्यांनी अमेरिकेत आत्मसात् केले होते. तरी ज्ञानकोशाच्या खटपटीला ऑगस्ट १९१५ मध्ये प्रारंभ झाल्यापासून पहिले सहा महिने त्यांनी एक पैसाही घेतला नाही. पुढे चौदा महिने ते फक्त दरमहा ५० रुपये घेत. एखाद्या कारकुनाच्या पगारात ते ज्ञानकोशाच्या व्यवस्थापकाचे आणि संपादकाचे दुहेरी काम करीत होते. पुढे १९२७ साली अनंत अडचणींना तोंड देत देत ज्ञानकोशाचे सर्व २३ खंड बाहेर पडल्यावर त्यांनी या सर्व खटपटींचा वृत्तांत ‘माझे बारा वर्षांचे काम उर्फज्ञानकोश मंडळाचा इतिहास या बेंगरूळ नाव असलेल्या पुस्तकात कथन केला आहे.
केतकरांच्या ज्ञानकोशनिर्मितीच्या अचाट करणीला नाकारणे शक्यच नाही. पण त्याच्यात अमुकच नाही, तमुकाला फार जागा दिली आहे असे करंटेपणाचे आक्षेप काही आत्मनेपदी पुरोगाम्यांकडून येत असतात, केतकर सुधारकच नाहीत असलेच तर छोट्या छोट्या सुधारणांपलीकडे त्यांची मजल गेली नाही. आगरकरांच्या विषयींच्या नोंदीत त्यांनी त्यांच्या समाजसुधारणेविषयींच्या तात्त्विक भूमिकेबद्दल कसलाही उल्लेख केलेला नाही. फुल्यांच्याबद्दल स्वतंत्र टिपण शरीरखंडात नाही, इत्यादि आक्षेप घेतले जातात. शिवाय त्यांनी सुधारकांना कधी स्वमुखाने तरी कधी आपल्या कादंबर्याइतील पात्रमुखाने आपल्या रांगड्याशैलीत यथेच्छा दूषणे दिली आहेत. त्यामुळे केतकरांना सामाजिक परिवर्तन हवे होते की नाही आणि हवे असले तर कितपत, असे प्रश्न पडतात. पूर्वग्रहरहित दृष्टीने पाहिल्यास उत्तरे मिळतात ती अशी की केतकर परिवर्तनवादी, प्रगतिवादी होते, नुसती । सुधारणाच नाही तर सामाजिक पुनर्घटना त्यांना हवी होती.
१. पाहा – केतकर लेखसंग्रह – साहित्य अकादमी, नवी दिल्ली, संपाः य. दि. फडके
ज्ञानकोशाचा कार्यारंभ होण्यापूर्वी १९१५ च्या सुमारास त्यांनी समाजशास्त्र आणि धर्म यांचा परस्पर संबंध हा लेख लिहिला त्यात त्यांनी अशी खंत व्यक्तविली आहे की, ज्या लोकांस आपल्या समाजाचे व्यक्तिंचितही ज्ञान नाही असेच लोक आपला समाज सुधारू पाहातात. त्यांच्यामते ज्याला समाजसुधारणा करावयाची आहे त्याच्या ठिकाणी तीन प्रकारची पात्रता असली पाहिजे ती अशी.
(१)त्याना आपल्या देशाच्या आणि समाजाच्या अर्वाचीन स्थितीचे ज्ञान पाहिजे. यात निरनिराळ्या जातींचे आचार, विचार, मनोधर्म, अभिरुच महत्त्वाकांक्षा इत्यादि येतात.
(२)(हिंदू) समाजाच्या पूर्वेतिहासाचे ज्ञान – म्हणजे आजच्या सामाजिक स्थितीची कारणे. जी सामाजिक बंधने उत्पन्न झाली आहेत जे सामाजिक विरोध आहेतआणि समाजाचे जे निरनिराळे तुकडे दिसत आहेत, त्यांची कारणे काय आहेत यांचे ज्ञान.
(३)देशाच्या बौद्धिक इतिहासाचे ज्ञान (History of Ideas). म्हणजे आज जी लोकांची मते आहेत त्यांचा पूर्वेतिहास काय याचे ज्ञान. समाजशास्त्रात या गोष्टींचा विचार होतो. म्हणून सुधारकाला समाजशास्त्राचे ज्ञान अवश्य आहे. धर्मशास्त्राचे ज्ञान अवश्य आहे.
धर्मशास्त्र समाजाचे उत्तम शासन व्हावे यासाठी निर्माण झाले आहे. ज्या गोष्टी मनुष्यास कर्तव्य आहेत, आदरणीय व योग्य आहेत त्या संबंधीचे ज्ञान म्हणजे धर्मशास्त्र असे सांगून त्याचे महत्त्व ते पटवून देतात. केतकर परिणामवादी धर्मशास्त्र मानतात. म्हणजे असे की मनुष्यास काय करणे योग्य आहे ते परिणामांवरून निश्चित होते असे ते मानतात. उदा. धर्मशास्त्रकारांचा दारूविषयीचा निषेध घ्या. हा दारूप्राशनाच्या परिणामांचे ज्ञान असल्यामुळेच संभवतो.
पत्नीस घरी कसे वागवावे या संबंधीचा धर्मशास्त्राचा उपदेश उत्कृष्ट गृहसौख्यासंबंधाने धर्मशास्त्राचे जे ज्ञान होते त्यावर अवलंबित असतो. श्राद्धादि विधी पारलौकिक गती पितरांस कशी प्राप्त होते या ज्ञानावर निर्भर आहेत. धर्मज्ञान असे अनेक प्रकारच्या ज्ञानावर अवलंबून असते. एवंच ज्या विषयी धर्मशास्त्राचा उपदेश असेल त्याविषयाच्या ज्ञानाच्या शुद्धतेवरून धर्मशास्त्राच्या उपदेशाची शुद्धता ठरते. अर्थात धर्मशास्त्राची समजूत चूक ठरली तर उपदेश चूक ठरतो. परलोकासारख्या अदृश्य गोष्टींबद्दलचे ज्ञान एक अनुमानच असणार आणि कालच्या अनुमानात आणि आजच्याअनुमानात जर फरक झाला तर त्याचा परिणाम धर्मशास्त्रावर होणार.
याप्रमाणे समाजपरिवर्तनाची मीमांसा करून केतकर म्हणतात, महाराष्ट्रातील प्रमुख सुधारकांत कोणी इतिहासकार नाही, समाजशास्त्री नाही व धर्मशास्त्रनेताही नाही . रानडे व चंदावरकर हे सुधारकांचे अग्रणी दोघेही कायदेपंडित. कायद्याचा धर्मशास्त्राशी निकट संबंध. पण या दोघांसही पाश्चात्य कायदेशास्त्र अवगत होते असे दिसत नाही. तत्कालीन सुधारकांबद्दल त्याच्या नाराजीचे कारण हे असे आहे.
समाजपरिवर्तनाची अशी शास्त्रीय दृष्टी बाळगणारे केतकर आगरकर-फुले यांना जेवढे महत्त्व देतात तेवढे आपल्याला कमी वाटते. आता समाजसुधारकाच्या अंगी ज्या पात्रता पाहिजेत असे ते म्हणतात, त्या आपण एकतर नाकाराव्या किंवा न नाकारल्या तर मग केतकरांना दूषणे देऊ नयेत. य. दि. फडके यातले काहीच करत नाहीत. केतकरांनी ज्ञानकोशात वेदांना अवास्तव महत्त्व दिले. अघळपघळ जागा दिली असाही आक्षेप य. दि. फडके केतकर लेख संग्रहाच्या प्रस्तावनेत घेतात.
केतकरांना समाज म्हणजे हिंदुसमाज सुधारायचा होता. हिंदुमनावर वेदांचे केवढे ओझे असते हे ते जाणून होते. भारतीय ज्ञानकोशाची शेकडा ३५ पृष्ठे भारतीय संस्कृतीच्या स्पष्टीकरणासाठी दिली आहेत आणि केवळ शेकडा १५ पृष्ठे बाह्य संस्कृतीच्या उद्बोधनासाठी दिली आहेत…. परक्या देशांची आपणास केवळ स्थूल माहिती हवी असते, तथापि आपल्या देशाची आपणास सूक्ष्म माहिती पाहिजे. ही महाराष्ट्रीय जनतेची बौद्धिक गरज आहे असे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे. ‘एन्सायक्लोपिडिया’ ब्रिटानिकावरील अमेरिकनांचे आक्षेप त्यांना पटलेले होते. ते दोष टाळण्याचा त्यांनी सहेतुक प्रयत्न केला । आहे. त्यांनी ज्ञानकोशात जो वेदार्थ केला तो सनातनी दृष्टिकोणातून नाही. अभ्यासाची आपली ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्टी त्यांनी इतकी ताणली की त्यांचे साहायक शास्त्री सोडून जातात की काय अशी स्थिती उत्पन्न झाली. वेदकतें ऋषि-मुनी त्रिकाळदर्शी होते असे न समजता त्यांच्याविषयी वाजवी आदर बाळगून त्यांच्या चुका दाखविण्यास अनमान करू नये अशी त्यांची भूमिका होती. खरेतर ‘मनुस्मृति प्रमाणे ‘श्रीधरस्मृति’ रचायची त्यांना खुमखुमी होती. वेदविद्येवरील ज्ञानकोशाचा दुसरा भाग प्रसिद्ध झाल्यावर पुण्याला वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ऋषींना ‘हल्लीचे (सदाशिवपेठी) नारायणशास्त्री आणि वेदांना ‘(भूर्जपत्रांची) जुडगी म्हटले होते. त्यामुळे ज्ञानकोशातील त्यांचे सहकारी श्रौताचार्य बापटशास्त्री यांचा रुसवा काढता काढता त्यांच्या नाकी नऊ आले होते. केतकरांनी वेदांच्या विवेचनाला इतके महत्त्व दिले याचे कारण इतकेच की हिंदुसमाजाच्या अभ्यासकाला वेदवाङ्मयाचा ऐतिहासिक संदर्भ, वेदांचा सामाजिक प्रभाव, आणि वेदांना असलेलीधार्मिक मान्यता दृष्टीआड करून चालणार नाही याची त्यांना खात्री होती. केतकर केवळ ऐहिक जीवनमूल्ये मानणारे होते. ईश्वर किंवा पुनर्जन्म, स्वर्ग, नरक, जीवात्मा, मोक्ष इत्यादि कोणत्याही पारमार्थिक गोष्टींवर त्यांचा विश्वास नव्हता. दुःख पापमूल आहे असे त्यांना वाटत नव्हते. सुख पुण्यमूलक आहे याविषयी त्यांची खात्री नव्हती. केतकरचरित्राचे एक संशोधक द. न. गोखले लिहितात, ‘आगरकरांसारखी माणसे नास्तिक नव्हती, ती अज्ञेयवादी होती. पण काही निरपेक्ष नैतिक नियम ती मानीत होती व त्या अर्थाने ती “धार्मिक” होती. पण केतकर कोणतेच नैतिक नियम निरपेक्ष मानीत नसत; त्यामुळे त्या दृष्टीनेही ते अधार्मिक होते. .. सर्व नीतिनियम विशिष्ट सामाजिक परिस्थितीत विशिष्ट आयुष्यक्रम सुखावह करण्यासाठी उत्पन्न झालेले आहेत अशा मताचे ते होते.
केतकरांचे असे म्हणणे असे की सामाजिक सुधारणा करण्यासाठी ‘ईश्वरासंबंधाने व त्याच्या इच्छेसंबंधाने वेडगळ अगर शहाणपणाचे सिद्धान्त ठोकून देणारे व … अतींद्रिय स्थितीबद्दलच्या कल्पनांवर एखादा संपदाय उभा करणारे लोक प्रार्थनासमाज, ब्राह्मोसमाज इ. संस्थांचे उत्पादक सामाजिक सुधारणांचे खरोखर मित्र नसून शत्रु आहेत.६ याचे कारण या लोकांनी अतींद्रिय विषयांवरच चळवळ करून पारलौकिक गोष्टींकडे लक्ष लावण्याचा प्रयत्न केला असा त्यांचा आरोप होता. पारलौकिक विचार काही अंशी सामाजिकच आहे. कारण परलोकासंबंधीच्या कल्पना लोकांस काही अशी इष्ट तहेचे आचरण ठेवण्यास प्रवृत्त करतात. हे कबूल केले तरी पारमार्थिक कल्याणाचे स्तोम माजविणारे त्यांच्या दृष्टीने मूढ होते. ‘थिऑसफी नावाचे जे थोतांड एक हुशार इंग्रज वृद्धा आपल्या देशात माजवीत आहे त्याच्या योगाने सध्या देशात मूढपणा वाढत आहे अशी सणसणीत टीका त्यांनी अतींद्रियवाद्यांवर केली आहे. ऐहिक ध्येयाने वागणारा मनुष्य म्हणजे केवळ पोटभरू … अगर इंद्रियांचे कोड पुरवून घेणारा नव्हे असा उद्घोष करून धर्मशास्त्राच्या बदलांसंबंधी ते म्हणतात ‘ धर्मशास्त्रात फेरबदल होण्यास दोन गोष्टी कारणीभूत होतात. त्या म्हणजे (१) ज्ञानात झालेला बदल आणि (२) ऐहिक व पारलौकिक ध्येयांच्या परस्परप्रमाणात झालेला फेरबदल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.