धर्मसुधारणा – एक वदतोव्याघात : प्रा. स. ह. देशपांडे यांना उत्तर

आजचा सुधारक, जानेवारी ९६ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘धर्म, सुधारणा आणि विवेक या माझ्या लेखावर प्रा. स. ह. देशपांडे यांनी मार्चच्या अंकात बरेच सविस्तर विवेचन करणारा लेख लिहिला आहे. माझ्या लेखाची दखल घेतल्याबद्दल मी प्रा. देशपांड्यांचा ऋणी आहे, आणि स्वतःबरोबरच अन्य सर्व वाचकांचीही माझी प्रतिक्रिया जाणून घेण्याची इच्छा असणार असे मधाचे बोट त्यांनी लावले असल्याने त्यांना उत्तर देणे भाग आहे हे ओळखून मी पुढील मजकूर लिहीत आहे.
लेखारंभीच धर्मसुधारणा हा शब्द मला वदतोव्याघात वाटतो या माझ्या विधानाविषयी प्रा. देशपांडे म्हणतात की धर्मसुधारणा ही प्रत्यक्ष अस्तित्वात असणारी गोष्टआहे, त्यामुळे तिच्यात व्याघात आहे असे म्हणणे बरोबर नाही.
त्याला माझे उत्तर असे आहे की व्याघात जगात किंवा निसर्गात नसतो, व्याघात मनुष्यांच्या कल्पनेत, विचारात, बोलण्यात असतो आणि तो बहुधा त्यांच्या लक्षात आलेला नसतो. तो लक्षात आल्याबरोबर किंवा आणून दिल्याबरोबर, आपला विचार असत्य आहे हे मनुष्याला स्पष्ट दिसते, आणि बहुतेक वेळा तो आपला विचार मागे घेतो, किंवा त्याला मुरड घालतो, आणि व्याघातातून आपला बचाव करतो. बहुतेक वेळा असे मी म्हणतो कारण क्वचित् मनुष्य एखाद्या कल्पनेने इतका भारलेला असतो की त्याला आपल्या बोलण्यात व्याधात आहे याची पर्वा वाटत नाही.
धर्मसुधारकांचे असेच असावे असे मला वाटते. कारण धर्माचा प्रमुख आधार तो ईश्वरदत्त आहे ही श्रद्धा. धर्मग्रंथात चूक किंवा अनिष्ट असेल, त्यात काही न्यून, असत्य किंवा असाधु असेल अशी शक्यताच नाकारली जाते. धर्मग्रंथांचा उगम प्रत्यक्ष परमेश्वरापासूनच झालेला असल्याचे त्यांत ठामपणे सांगितले असल्यामुळे त्यात दोप किंवा अपूर्णता असू शकेल या कल्पनेला थाराच राहात नाही. याच्या उलट एखाद्या गोष्टीत सुधारणा करणे म्हणजे तिची वर्तमान स्थिती असत्य, असाधु किंवा अहितकर असल्याची खात्री पटलेली असणे, आणि ती स्थिती दूर करण्याकरिता बद्धपरिकर होणे. यातील व्याघात स्पष्ट आहे. पण त्याची जाणीव धर्मसुधारकांना असत नाही किंवा ती कुणी करून दिली तरी त्यांना तिची मातब्बरी वाटत नाही.
सुधारकांना मात्र (धर्मसुधारकांना नव्हे) आपल्या विचारांतील न्यूनांची, विसंगतींची जाणीव असते. म्हणून ते त्यांतील धर्म या अंशाचा त्याग करतात आणि सुधारणेच्या कामाला लागतात. धर्मसुधारकांना सुसंगत, व्याघातरहित विचाराचे महत्त्व फारसे वाटत नसल्यामुळे ते धार्मिक आचारांच्या किरकोळ डागडुजींच्या उद्योगात मग्न होतात. उदा. जन्मजात विषमता, पारतंत्र्य, अन्याय इत्यादि गोष्टी जर धर्मात असतील तर तो परमेश्वराने निर्माण केला असणे अशक्य आहे असे सिद्ध होते असे ठरवून सुधारक श्रद्धा टाकून आपल्या बुद्धीवर विसंबायचे ठरवितात. बुद्धी क्वचित् प्रमादशील असली तरी ते सत्य-असत्य, इष्ट-अनिष्ट यांच्यात भेद करण्याचे एकमेव विश्वसनीय हत्यार आहे, त्याहून अधिक समर्थ आयुध मनुष्याजवळ नाही या विश्वासाने वागायचे ते ठरवितात. परमेश्वराचे अस्तित्व केवळ श्रद्धेने स्वीकारावे लागते आणि त्याने हे जग निर्मिले, धर्मग्रंथही दिले, हे सर्व त्या श्रद्धेचाच भाग आहेत. श्रद्धा कुठल्या थरापर्यंत जाऊ शकते हे पाहायचे असल्यास धार्मिकांचे युक्तिवाद आठवावेत. उदा. सर्वस्वाची होळी झाल्यावरही ते परमेश्वराने आपल्या भल्याकरिताच केले आहे असे ‘खरे’ धार्मिक समजतात. त्याबद्दल नाखुषी दाखविणे पाप
आहे असे ते म्हणतात. मोठमोठ्या तत्त्वज्ञांचीही बुद्धी गहाण पडल्याची उदाहरणे आहेत. उदा. लाइब्नित्स या जगप्रसिद्ध तत्त्वज्ञाचे म्हणणे असे होते की आपले हे विद्यमान जग शक्य असलेल्या सर्व जगांपैकी सर्वात चांगले जग आहे. त्याहून अधिक चांगले जग अशक्य आहे, कारण जर ते शक्य असते तर ते अधिक चांगले जग ईश्वराने निर्माण केले असते. आपल्या जगातील रोगराई, अपमृत्यू, महापूर, अज्ञान, अन्याय या सर्व गोष्टी विद्यमान जग सर्वोत्कृष्ट व्हावे या हेतूनेच निर्माण केल्या असाव्यात असे त्यांचे प्रतिपादन आहे.
या सर्व कारणास्तव ‘धर्मसुधारणा’ या शब्दात वदतोव्याघात आहे हे म्हणणे निर्विवाद आहे असे मी म्हणतो. एका बाजूला धर्मसंस्थापक ईश्वर असल्यामुळे त्यात दोष असू शकत नाहीत, अशी श्रद्धा बाळगायची, आणि दुसर्याल बाजूला त्याच्या कृतीतील काही भाग त्याज्य ठरवून तो सुधारायचा प्रयत्नही करायचा यात विसंगती उघड आहे. नुसती बौद्धिक विसंगती नव्हे, तर प्रतारणा आहे, परमेश्वराशी द्रोह आहे.
स. ह. देशपांडे पुढे म्हणतात: ‘धर्मात विवेकप्रणीत सत्यांना किंवा निष्ठांना स्थान नसतेच असे नाही. थोडक्यात धर्माचे स्वरूप विवेकाशी सुसंगत असू शकते. किंबहुना त्या त्या परिस्थितीत तरी सुसंगत असल्याशिवाय गत्यंतर नसते.’
हे तर्कशास्त्र चमत्कारिक दिसते. धर्मात काही गोष्टी विवेकसंमत असतील तर केवळ तेवढ्यामुळेच धर्म विवेकाशी सुसंगत झाला असे म्हणणे हास्यास्पद आहे. तो विवेकाशी सुसंगत आहे असे म्हणण्याकरिता त्यात एकही गोष्ट विवेकविरोधी नाही असे असावे लागेल, आणि तशी वस्तुस्थिती नाही हे प्रसिद्ध आहे. वास्तवाकडे पूर्ण पाठ फिरवून जगणे अशक्य आहे. निसर्गनियमांच्या विरुद्ध आचरण कदापि यशस्वी होऊ शकत नाही.त्यामुळे सामान्यपणे वास्तवाच्या सरळ विरुद्ध अशा गोष्टी धर्मात फारशा सांगितलेल्या नसतात. परंतु एवढ्यामुळेच धर्म आणि विवेक एकत्र राहू शकतात असे म्हणणे भाबडेपणाचे किंवा मुद्दाम दिशाभूल करणारे आहे. धार्मिक विधाने बहुधा परलोकासंबंधाने असतात,आणि त्यामुळे त्यांचा वास्तवाशी विरोध येण्याचा सामान्यपणे संभव नसतो. त्याचबरोबर परलोकविषयक विधाने अपरीक्ष्य (unverifiable) असतात. ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’ असे जे म्हणतात त्याचा भावार्थ हाच आहे की स्वर्गासंबंधीच्या विधानांचा पडताळा पाहता येत नाही. स्वर्गात गेलेला मनुष्य स्वर्गाविषयी माहिती देण्याकरिता परत येऊ शकत नाही. अशा सर्वथा अपरीक्ष्य गोष्टींवर श्रद्धा ठेवावी असा धर्माचा आग्रह ही पूर्ण विवेकविरोधी गोष्ट आहे हे प्रा. देशपांडेही मान्य करतील.
पारंपारिक पद्धतीने धर्मसुधारणा करणे म्हणजे धर्माचा श्रद्धा हा आधार कायम ठेवून त्यात बदल करण्याचा प्रयत्न करणे.‘धर्म आणि विवेक एकत्र राहू शकतात असे एकदा लक्षात घेतले म्हणजे बदलत्या परिस्थितीत धर्माच्या अंगानेही सुधारणा होऊ शकते’ असे प्रा. देशपांडे म्हणतात. आणि ते करण्याचे अनेक उपाय ते सांगतात. पण मी वर म्हटल्याप्रमाणे त्यांचे गृहीततत्त्वच (धर्म आणि विवेक एकत्र राहू शकतात हे) चुकीचे आहे. धर्माची चौकट कायम ठेवून त्यात सुधारणा करण्याला अवकाश अल्प असणार हे स्वाभाविक आहे. धर्मग्रंथातील एखादे वचन दुर्बोध असेल किंवा त्याच्या अर्थासंबंधी वाद असेल तर फक्त अशा वचनांसंबंधी धर्मसुधारक बुद्धि वापरणार. तसे करतानाही आपल्या अर्थाला अनुकूल अशी वचने शोधून त्यांच्या आधारे आपल्या मताचे ते मंडन करणार. एक प्रसिद्ध उदाहरण घ्यायचे तर संमतिवयाच्या बिलाच्या वेळी मुलीचे वय वाढविण्याकरिता सनातनी सुधारक स्मृतिग्रंथात अनुकूल वचने शोधीत होते; पण आगरकरांचे म्हणणे होते की जरी एखाद्या अपवादात्मक बाबतीत अनुकूल वचन मिळाले, तरी ते नेहमीच मिळेल हे अशक्य आहे. म्हणून त्याचा शोध घेण्याचा आग्रह टाकून द्या. मूळ चौकट न मोडता करावयाचे उपाय अतिशय जुजबी, किरकोळ डागडुजीच्या स्वरूपाचेच असणार. त्यामुळे प्रा. देशपांड्यांनी सुचविलेल्या उपायांनी सुधारणा फारशी झालेली नाही हे सांगायला नकोच. त्या प्रकारची सुधारणा केली जात नाही असे मी म्हणत नाही पण तिला मर्यादा फार आहेत, आणि जी शक्य आहे ती फार किरकोळ स्वरूपाची आहे. अशी सुधारणा करणे म्हणजे गळ्यात लोढणे घातलेल्या गुराप्रमाणे तिची प्रगती अडखळत, ठेचकाळत होणार हे निश्चित.
प्रा. देशपांडे श्रद्धा ही अतिशय चिवट गोष्ट आहे या बाबीचाही उल्लेख करतात, आणि ज्यांना समाजाला घेऊन पुढे जायचे आहे त्यांना सर्वसामान्य माणसाच्या या प्रवृत्तीपुढे शरण जावे लागते असे म्हणतात. ही बचाव नेहमीचाच आहे. पण त्याने धार्मिक श्रद्धा अहितकर आहे हे खोटे ठरत नाही. लोक म्हणतात : ‘तुम्ही म्हणता ते खरे आहे हो, पण ते सामान्य, अज्ञ, अडाणी बहुसंख्य लोकांना समजत नाही. म्हणून आपण लोकांच्या चालीनेचालले पाहिजे, त्यांच्या बोलीने बोलले पाहिजे.’ पण हे विषय बदलणे झाले. कारण त्यात, विवेकवाद्यांचे म्हणणे सयुक्तिक आहे हे मान्य केलेले असते; फक्त ते सामान्य लोकांच्या आकलनाच्या पलीकडे आहे असा हा युक्तिवाद असतो. परंतु माझा प्रश्न प्रामुख्याने सत्य काय आहे हा आहे, त्याचा स्वीकार किती प्रमाणात होईल हा नाही. या विषयावर वाद घालण्याचा माझ्यावर अनेकदा प्रसंग येतो. वाद घालणारे सामान्य लोक अशिक्षित असल्याच्या मागे दडण्याचा प्रयत्न करतात. मी त्यांना म्हणतो, ‘तुम्ही बाकीच्यांची गोष्ट सोडा. तुम्हाला मी म्हणतो ते पटते की नाही ते सांगा. माझे म्हणणे सर्वांना पटेल असा माझा दावा नाही. कारण त्याकरिता निर्विकार मनाने विचार समजून घेण्याची ताकद पाहिजे. ती बहुतेक लोकांत (शिक्षितांतही) नसते हे मला मान्यच आहे. पण तुमच्याजवळ ती आहे. तेव्हा तुम्ही आपल्यापुरती मला मान्यता द्यायला काय हरकत आहे? विवेकाचे महत्त्व पटलेले लोक थोडे आहेत हे खरे आहे, पण म्हणून त्यांनी इतरांना ते पटवून देण्याचे प्रयत्न करू नयेत असे थोडेच आहे. शिवाय ‘यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः’ या न्यायाने सुशिक्षितांनी, लोकाग्रणींनी विवेकवादाचा स्वीकार करून त्यानुसार आचार बदलले तर सामान्य लोकांत त्याचा इष्ट बदल झाल्याशिवाय राहणार नाही. पण लोकभयाने ज्ञानीही जर वास्तुशांत आणि सत्यनारायण करीत राहिले तर वास्तुशांत आणि सत्यनारायण व्यर्थ आहेत हे लोकांस कळणार कसे आणि पटणार कसे?’
सुधारणा करण्यातील पहिली गोष्ट म्हणजे धर्माची हकालपट्टी; आपल्या जीवनातून धार्मिक आचार काढून टाकणे. धार्मिक आचार म्हणजे ईश्वर, परलोक, मृत्यूत्तर अस्तित्व, आणि मुख्य म्हणजे धर्म कोणा परमेश्वराने किंवा त्याच्या प्रेषिताने निर्माण केला ह्या कल्पनेचा त्याग. याप्रमाणे जर ज्ञानी विवेकी लोक वागू लागले तर त्यांच्या उदाहरणांचा युक्तिवादांपेक्षाही जास्त उपयोग होऊ शकेल असे निभ्रांतपणे म्हणता येईल.
या ठिकाणी आक्षेपक रशियातील निधर्मीपणाचा प्रयोग फसला याचे उदाहरण देऊन असे प्रतिपादतात की धर्म ही मानवी मनाची स्वाभाविक गरज आहे, आणि ती काही काळ दडपली गेली तरी तिचे उच्चाटन अशक्य आहे. त्यासंबंधात खरी गोष्ट अशी आहे की रशियन प्रयोग मुळात सदोष होता. तो विवेकवादी नव्हता, आणि त्यात जबरदस्ती, भय, यासारख्या उपायांचा सर्रास उपयोग केला गेला. कम्युनिस्ट लोक विवेकवादी नव्हते; ते एका नव्या धर्माचे प्रवर्तक आणि अनुयायी होते. कम्युनिझमचे तत्त्वज्ञान स्वीकार्य आहे हे पटविण्याचे प्रयत्न फारसे झाले नाहीत; त्याचा प्रसार बळानेच करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे त्यांचा प्रयोग फसला याने विवेकवाद खंडित होतो हे म्हणणे बरोबर नाही. शांततेच्या विवेकी मार्गानी विवेकवादाचा प्रसार रशियात झाला नाही, आणि म्हणून तो फसला.
बुद्ध्या धार्मिक शिक्षणापासून दूर ठेवलेल्या मुलांमध्ये ती प्रौढ झाल्यानंतर धार्मिक भावना जवळपास नसते असे जे थोडे प्रयोग केले गेले आहेत त्यात दिसून आले आहे. परंतु
असे निकोप शिक्षण अपवादात्मक मुलांच्याच फक्त वाट्याला येते. बाकी सर्व ९९% मुलांना हात जोडता यायला लागल्या क्षणापासून आपण देवबाप्पाला नमस्कार करायला शिकवितो, आणि बोलायला लागल्याबरोबर ‘दिव्या दिव्या दीपत्कार’ म्हणायचे शिक्षण देतो. घरातील एकूण सर्वच वातावरण धर्माने सूक्ष्मपणे भारलेले असते. त्यात लहानाची मोठी झालेल्या मुलांच्या मनात श्रद्धा इतक्या खोल जाऊन बसते की तिला ‘द्वितीय स्वभावाचे’ (second nature) स्वरूप येते, आणि तिला तेथून हुसकून काढणे जवळपास अशक्य होऊन जाते. जर मुलांना धार्मिक प्रभावापासून अलिप्त ठेवले तर सामान्यपणे त्यांच्यात श्रद्धा आपोआप उत्पन्न होईल असे दिसत नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.