न्यायाधीश आणि अंधश्रद्धा

सर्वोच्च न्यायालयाचे आपल्या घटनेत विशेष स्थान आहे. आजकाल ज्या घटना घडत आहेत त्यामुळे तर त्या न्यायालयाबद्दलचा नागरिकांचा आदर अनेकपटींनी वाढला आहे व अपेक्षाही वाढल्या आहेत.
अशा वेळी या न्यायालयाचे पद भूषविणारे एक न्यायाधीश के. रामस्वामी यांनी नुकत्याच दिलेल्या एका निकालातील विधाने आश्चर्यजनक आहेत.
भूमिसंपादनाचे हे प्रकरण शिरडीच्या साईबाबा संस्थानचे. या संस्थानाला शिरडीचे साईबाबा मंदिर व द्वारकामाई मंदिर यांना जोडणार्या. रस्त्याकरिता बाजीराव कोते यांची जमीन व घर पाहिजे होते. खाजगी वाटाघाटी यशस्वी न झाल्यामुळे शासनाकरवी सार्वजनिक उपयोगाकरिता मालमत्ता संपादन करण्याची कारवाई सुरू झाली. तिला जमीनमालक यांनी घेतलेली हरकत मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यावर झालेले अपील सर्वोच्च न्यायालयाने खारीज केले. ते महत्त्वाचे नाही.
यासंबंधी दिलेल्या निकालात न्या. रामस्वामी लिहितात, “भारताची भूमी अनेक वेगळ्या विचारांचे महान संत व योगी यांचेकरिता प्रसिद्ध आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील युमिदिवरम् गावचे मोठे व लहान बालयोगी बंधू. मोठ्याने आपली तपश्चर्या वयाचे १६ व्या वर्षी तर धाकट्याने ७ व्या वर्षीचसुरू केली. त्यांनी अन्नपाणी वर्ज केले व दोघेही वेगवेगळ्या आश्रमांत राहू लागले. आश्रमांना बाहेरून कुलपे लावली जात. त्यांच्या किल्ल्या जिल्हा मॅजिस्ट्रेट यांचेकडे असत. त्या बंधूंच्या इच्छेप्रमाणे महाशिवरात्रीचे दिवशी कोणताही पहारा नसताना मध्यरात्री १२ वाजता सळसळणारा आवाज होई. त्यावेळी कुलपे उघडली जात व मोठे योगी मुद्दाम तयार केलेल्या बाहेरच्या व्यासपीठावर जमलेल्या भक्तांना दर्शन देत. १० च मिनिटांत दारांना कुलपे बाहेरून लावली जात. व्यासपीठ ५०० यार्ड दूर असे. १० मिनिटानंतर योगी त्यांचेकरिता तयार केलेल्या व्यासपीठावर येत. व्यासपीठ बंद असे. ते उघडले जाई. त्यानंतर दिवसभर योगी दर्शन देत. मोठे योगी दुसरे दिवशी मध्यरात्री परत आश्रमात जात. दोघेही बंधू डोळे बंद करून बसत. वर्षभर आश्रम बंद असे. आश्रमाला दारे खिडक्या वा हवा जाण्याकरिता झरोका असा अजिबात नव्हता. पण दार उघडले की दुर्गंधी ऐवजी खोलीतून सुवास दरवळे. त्या दोघांचे तप अखंडपणे ४० वर्षे चालू होते . चमत्कार हा की शरीरशास्त्राचे नियम त्यांना लागू पडत नव्हते. एवढेच नव्हे तर अत्याधुनिक तंत्रज्ञान त्यांना अवगत होते. मोठे योगी यांनी तप आरंभिले त्या वेळी खेड्यांत वीज नव्हती. तरीही त्यांना विद्युत् तंत्रज्ञान माहीत होते. देशांतील नवीन घटनांची त्यांना माहिती असे. ते मौन पाळत असत, म्हणून खाणाखुणांनी लोकांना माहिती देत. ते नेहमी मांडी घालून बसत. असे असतानाही ५-१० मिनिटांतच व्यासपीठावर जाऊन बसलेले दिसत असत. आश्रमात स्वतःला कोंडून घेतलेले असताना व डोळे बंद असतांना आधुनिक तंत्रज्ञान त्यांना कसे माहीत होते हे सांगणे अशक्य आहे. या चमत्काराचे काहीच कारण देता येणे शक्य नाही. अन्नपाण्यावाचून ४० वर्षे ते कसे जगले याचे स्पष्टीकरण देता येत नाही. बाहेर येत ते नुकतेच स्नान केल्यासारखे स्वच्छ असत. खोलीमधून सुवास येत असे. धुळीचा कणही दिसत नसे. हिंदुस्थानात असे अनेक संत महात्मे व योगी होऊन गेले. फक्त उदाहरणादाखल या योगीबंधूंची माहिती दिली आहे.” । न्यायमूर्तीचा हा निकाल ‘बॉम्बे सिव्हिल जर्नल या कायदेविषयक मासिकाच्या नोव्हेंबर ९५ च्या पान ४५३ वर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातील परिच्छेद ९ वर वरील मजकूर सापडतो.
न्यायमूर्तीनी आपल्या विधानांना काय आधार आहे ते स्पष्ट केलेले नाही. बालयोगी बंधू केव्हा हयात होते, त्यांचे नंतर काय झाले ते काहीच समजत नाही. सर्वसाधारण विचार करणाच्या कोणाचाही अशा माहितीवर विश्वास बसणार नाही.
भ्रम, अंधश्रद्धा हा काही सामान्य जनांचा मक्ता नाही, हेच खरे. या देशाचा कायदा, त्याचा अर्थ या बाबतीत ज्याचा निर्णय अखेरचा समजला जातो त्या न्यायालयाच्या निकालात अशी माहिती यावी हे दुर्दैव!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.