यांत्रिक (कृत्रिम) बुद्धिमत्ता

बुद्धिमत्ता उपयुक्त की भावना या वादात अलीकडे भावनिक गुणवत्तेचे पारडे जड झाल्यासारखे दिसते आहे (आजचा सुधारक ६ : ३९९). केवळ बुद्धिमत्तेवर अवलंबून असलेली मानवाची बरीच कठीण कामे, आता यंत्राद्वारे पार पाडण्याच्या उद्देशाने अनेक वैज्ञानिक कठोर परिश्रम करीत आहेत. यांत्रिक अथवा कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence = AI) नैसर्गिक मानवी बुद्धिमत्तेच्या स्तरावर नेण्याचे प्रयत्न गेल्या चाळीस वर्षांपासून होत आहेत. अमेरिकेतील अनेक प्रमुख विद्यापीठांतून याविषयी संशोधनअध्यापन होत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हानियातील मूर स्कूल ऑफ इंजिनियरिंगमधील डॉ. अरविंद जोशी हे १९७० च्या दशकात या विषयाचे प्रमुख होते व मौखिक भाषेचे संगणकाच्या भाषेत तात्काळ रूपांतर करण्याचे प्रयोग ते करीत होते. गेल्या २०-२५ वर्षांत या क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती झाली आहे.
संगणकाच्या प्रथम निर्मितीपासून आजवर या तंत्राच्या सहा पिढ्या तरी होऊन गेल्या आहेत. आता बांधण्यात येणार्‍या संगणकांची कार्यक्षमता अफाट आहे, जवळपास मानवी मेंदूएवढी! अगदी अलीकडे बुद्धिबळाचा जागतिक विक्रमवीर गॅरी कास्परॉव्हने, IBM कंपनीने मुद्दाम तयार केलेल्या ‘डीप ब्लू’ नावाच्या संगणकासोबत बुद्धिबळाचा सामना जिंकला असला तरी पहिल्या काही चालीत संगणकाने कास्परॉव्हला जेरीस आणले होते! कास्परॉव्हच्या प्रत्येक चाली पाहून त्याच्या पुढील कित्येक चालींचा अतिशय वेगाने अंदाज घेऊन संगणक खेळत होता. परंतु शेवटी कास्परॉव्हच्या लक्षात आले की डीप ब्लू हा त्याच्या कार्यपाठामध्ये (program) मध्ये नसलेल्या काही फसव्या चालींकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, त्या चालींवर विचार करून आपला वेळ निष्कारण वाया घालवीत असे. संगणकाऐवजी एखादी व्यक्ति कास्परॉव्हशी खेळत असती तर तिला कास्परॉव्हची चलाखी चटकन उमगली असती! परंतु ‘डीप ब्लू’ ला ही जाणीव नसल्याने हे यंत्र सामना हरले.
बुद्धिबळ खेळणार्‍या ‘डीप ब्लू’ संगणकाप्रमाणेच, विचार करू शकणारे स्वतंत्र बुद्धीचे ७ व्या पिढीचे संगणक व त्यांना लागणारे कार्यपाठ (software) निर्माण करण्याच्या खटाटोपात कित्येक संशोधक गुंतले आहेत. केंब्रिज (बॉस्टन) येथील MIT मधील संशोधक रॉडनी ब्रुक्स यांनी ‘कॉग’ (COG) नावाचे यंत्र तयार केले आहे. या यंत्राचे अथवा संगणकाचे वैशिष्ट्य म्हणजे, लहान मूल जसे आसपासच्या वातावरणापासून नित्य नवे धडे शिकते त्याप्रमाणे या संगणकाचे कार्यपाठ सतत नवनवीन गोष्टी शिकून आत्मसात करते! याच संस्थेतील, ब्रुक्स यांच्या विद्यार्थिनी, डॉ. पॅट्रिशिया मीस यांनी संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये आनुवंशिकता आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. या प्रयोगात, संगणकाला विविध स्रोताकडून उपलब्ध करून देण्यात येणार्‍या माहितीपैकी उपभोक्त्याच्या (अर्थात संगणकाचा वापर करणार्‍याच्या) दृष्टीने अधिक महत्त्वाची व उपयुक्त माहिती निवडण्याची क्षमता आहे. अशी निवड करू शकणाच्या कार्यपाठाचा (software) इतर अधिक बलवान व कार्यक्षम कार्यपाठाशी संयोग करता येतो व या संयोगातून नवीन पिढीचे अधिक कार्यक्षम कार्यपाठ प्रसूत होतात! ज्या प्रमाणे निसर्गात लैंगिक प्रजननाद्वारे नव्या पिढीला पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी अधिक कार्यक्षम करता येते तसलाच हा प्रकारआहे!
युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधील डॉ. डग्लस लेनट यांनी ‘साइक’ (CYC) नावाचा अति प्रचंड कार्यपाठ तयार केला आहे. सामान्य माणसाच्या मेंदूमध्ये येणार्‍या लक्षावधी संवेदनांचा व त्यावरील घडामोडींचा या कार्यपाठामध्ये अन्तर्भाव आहे. “सफरचंद हे चविष्टव पौष्टिक फळ आहे’ हे अथवा ‘आता उकडते आहे, घामामुळे कपडे खराब होणार यासारख्या गोष्टी ‘साइक’ला सहज कळतात!
यासारखे बुद्धिमान संगणक व त्यांची कार्यक्षमता सातत्याने वाढत असून, मानवी मेंदूस शक्य असणारे सर्व व्यवहार संगणक करू लागतील अशी लक्षणे दिसत आहेत. पण खरेच का? असा प्रश्नही पुढे येत आहे.
मानवी मेंदूतील सर्व क्रिया-प्रक्रिया, असंख्य मज्जापेशी, मज्जातंतूंची वीण व त्यांतून धावणारे अति क्षीण विद्युतप्रवाह यामुळे घडतात आणि मेंदूची क्षमता अमर्याद असते ते तर निश्चितच. बुद्धीचे कार्यही मेंदूतील गुंतागुंतीच्या व्यवहारांवर अवलंबून असते. परंतु हीच बुद्धिमत्ता मानवाच्या व्यक्तिगत तसेच सामूहिक प्रगतीचा आधार आहे काय याविषयी संशय व्यक्त होऊ लागला आहे. बुद्धीवर नियंत्रण ठेवणाच्या भावनिकतेबद्दलही चर्चा चालू आहे. आनुवंशिक आधारावर व्यक्तीव्यक्तींच्या मेंदूतील भौतिक घटकांमध्ये भेद असून त्यामुळे भावनिक गुणवत्तेमध्ये फरक असतो याविषयी सुद्धा विस्तृत विवेचन होत आहे.
या पाश्र्वभूमीवर आता अधिकाधिक बुद्धिमान संगणक कार्यरत होऊ लागल्यामुळे, विचारवंतांना मानवी मन, आत्मज्ञान, आत्मबोध, जाणीव (consciousness) यांविषयी अधिक विचार करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. संगणक कितीही बुद्धिमान झाले तरी त्यांना माणसासारखे, मनाद्वारे होणारे आत्मज्ञान होणे शक्य नाही असे तत्त्वज्ञांचे मतआहे. परंतु आत्मज्ञान अथवा आत्मबोध म्हणजे नेमके काय, या विषयीही अधिक साक्षेपाने विचार करण्याची निकड या यांत्रिक बुद्धिमत्तेमुळे उत्पन्न झाली आहे. तत्त्वज्ञांमध्ये दोन तट पडलेले स्पष्ट दिसतात. फ्रेंच तत्त्वज्ञ रेने देकार्त यांचा ‘आत्मा’ नावाच्या शरीरापासून स्वतंत्र अशा वस्तूवर विश्वास होता. याच पक्षाचे परंतु अर्वाचीन तत्त्वज्ञ कॅलिफोर्निया विद्यापीठातील डेव्हिड कामर (David Chalmers) हे सुद्धा आत्मबोध ही एक कूट गोष्ट मानतात. या उलट ऑक्सफर्ड विद्यापीठाचे गिल्बर्ट राईल व त्यांचे शिष्योत्तम अमेरिकेतील टफ्ट विद्यापीठातील डॅनियल डेनेट यांना मात्र तसे मुळीच वाटत नाही. आत्मज्ञान ही कल्पनाच अवैज्ञानिक असून, पारंपारिक विचारसरणीचे पिल्लू आहे असे या पक्षाचे मत आहे. आत्मज्ञान, आत्मबोध, जाणीव, मन या सर्व अस्तित्वहीन गोष्टी असून मन म्हणजेच भौतिक मेंदू असे या पक्षाचे आग्रही प्रतिपादन आहे. डेनेट यांच्या १९९१ साली प्रसिद्ध झालेल्या ग्रंथाचे शीर्षकच मुळी “Consciousness Explained’ असे आहे. (या ग्रंथाच्या १ लक्ष प्रती खपल्या आहेत!) जसजशी यांत्रिक बुद्धिमत्ता विकसित होत जाईल तसतसे मानवी मन एक यंत्रच आहे हे अधिक चांगल्या प्रकारे सिद्ध होईल असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु यामतास नव्याने विरोधही होऊ लागला आहे. रटगर्स विद्यापीठातील तत्त्वज्ञ कॉलिन मॅकगिन यांना डेनेट हे आत्मज्ञानाचे अस्तित्व न मानून स्वत:ची व इतरांची वंचना करीत आहेत असे वाटते.
ब्रुक्स यांच्या ‘कॉग’ या यंत्राच्या पृष्ठभागावर त्वचेसारखे संवेदनशील आवरण घातले व त्या आवरणाचा तापलेल्या वस्तूशी सम्पर्क केला तर मानवी मेंदूप्रमाणेच “कॉग’ सुद्धा आपली त्वचा तापलेल्या वस्तूपासून दूर करील. याबाबतीत मानवी प्रतिक्रिया व संगणकाची प्रतिक्रिया अगदी सारखीच असेल असे डेनेट यांचे मत आहे. परंतु कामर यांच्या म्हणण्यानुसार माणसास चटका बसल्यावर पूर्वानुभवामुळे पीडा होते, तसे संगणकाला होणार नाही. त्यांच्या मते हाच मानवी मन व यांत्रिक बुद्धिमत्तेत फरक आहे. आनंद, दुःख, प्रेम, मत्सर वगैरे सारख्या भावना या विश्वात उत्पन्न झाल्या त्यामागे कोणता तरी उद्देश असला पाहिजे असे देकार्तप्रमाणेच इतर अध्यात्मवादी तत्त्वचिंतकही मानतात.
ज्या क्रिया प्रक्रियांमुळे मानवी मेंदू आपले काम करतो त्या सर्व क्रिया-प्रक्रिया यांत्रिक मेंदूही करू शकतो. अनुभवावर आधारित प्रशिक्षणही यांत्रिक मेंदूला देता येईल. असे असले तरी त्यामुळे मानवी मेंदूत मन, आत्मज्ञान, जाणीव नसते हे सिद्ध तर होत नाहीच, परंतु अधिक प्रकर्षाने जाणवते मात्र असे कामर यांच्या पक्षाला वाटते. मानवी शरीरात मन हे एक अतिरिक्त परिमाण असून आत्मज्ञान अथवा आत्मबोध ही भौतिक घटनेपेक्षा वरच्या अथवा सूक्ष्म स्तरावर घडणारी गोष्ट आहे असे कामर मानतो. त्यास तो “metaphysical’ असे न संबोधता “psycho-physical’ म्हणतो. हे आत्मज्ञान वा आत्मबोध (consciousness) हा विश्वातील पदार्थ, काळ, ऊर्जा व अंतरे (space) याचप्रमाणे एक शाश्वत घटक आहे
आणि हा घटक मानवी मेंदूसारख्या विशिष्ट भौतिक यंत्रणेशी संलग्न असतो. या दृष्टिकोनातून विचार केला तर ‘कॉग’ आदि यंत्रांना मन असू शकते. यांत्रिक (कृत्रिम) बुद्धिमत्तेमुळे कदाचित् नवीन प्रकारचे आत्मज्ञानही अस्तित्वात येण्याचा संभव आहे! म्हणजेच १९५० साली अॅलन टर्निग यांनी केलेल्या भाकितानुसार नवीन शतकात, आधुनिक विज्ञान नवीन प्रकारचे ‘आत्मे च निर्माण करणार की काय? ‘ईश्वराच्या’ (?) या विशेषाधिकारावरआधुनिक विज्ञान झडप तर घालीत नाही ना!
(संदर्भ :- Time, १९९६, १४७ : १४, ३६-४४)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.