हिंदू व हिंदुत्व

आजचा सुधारकच्या ऑक्टोबर व डिसेंबर ९५ च्या अंकात प्रा. ह. चं. घोंगे यांनी ‘हिदुत्व अन्वेषण’ या शीर्षकाने हिंदू व हिंदुत्व या विषयी अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या आहेत. त्यांतील काही बाबी प्रातिनिधिक समजून त्यांचा परामर्श घेतला जात आहे.
संस्कृत कोषातील हिंदू व हिंदुधर्म याविषयी उपलब्ध माहिती
आपट्यांचा प्रसिद्ध संस्कृत-इंग्रजी शब्दकोष जरी वाचण्याचे थोडे कष्ट घेतले तर हिंदु शब्दापुढे पुढील विपुल माहिती आढळते.
(१)हिंदु शब्दाचा उल्लेख कालिका पुराणात आढळतो. उद्धरण असे आहे:
कलिना बलिना नूनमधर्माकालिते कलौ।
यवनैर्घोरमाक्रान्ता हिन्दवो विन्ध्यमाविशन्।।
“बलशाली कलीने कलियुगात अधर्माचा हैदोस माजवला असताना यवनांच्या भयंकर आक्रमणाने त्रस्त हिंदू विंध्य पर्वताच्या प्रदेशात शिरले.” कालिकापुराण हे अष्टदाशउपपुराणांच्या यादीत असून ही पुराणसंपदा गुप्त काळीत (इ. स. चौथे-पाचवे शतक) सिद्ध होती हे पाश्चात्त्य संशोधकांनाही मान्य आहे.
(२) पुढे मेरुतंत्र ग्रंथ हा इ. स. आठव्या शतकाचा असल्याचे नमूद करून वचन उधृत केले ते असेः
हिन्दुधर्म प्रलोप्तारो जायन्ते चक्रवर्तिनः।
हीनं च दूषयत्येव हिन्दुरित्युच्यते प्रिये।।
“यापुढे हिंदुधर्माचा लोप घडवून आणणारे चक्रवर्ती जन्माला यावयाचे आहेत. अपात्र व्यक्तीला दोषीच समजतो (हीनं-दूषयति) म्हणून (हिंदुधर्माचा माणूस) हिंदू म्हणवला जातो.”
(३)त्यापुढे रामकोषातून दिलेले उद्धरण नमूद आहे.
हिन्दुर्दुष्टो न भवति नानार्यो न विदूषकः।
सद्धर्मपालको विद्वान् श्रौतधर्मपरायणः।।
“हिंदू हा दुष्ट, असच्चरित्र आणि विनाकारण दूषणे देणारा नसतो. तर तो सदाचारी, विद्वान आणि वैदिक कर्म करण्यास तत्पर असतो.”
(४)हेमन्त कविकोषात हिंदू म्हणजे नारायण प्रभृती देवतांचा भक्त – ‘हिन्दुनारायण देवतादि भक्तः’ असे वचन दिलेले आहे.
(५) अद्भुत रूप कोषात ‘हिन्दुर्हिन्दूश्च पुंसि द्वौ दुष्टानांच विघर्षणे’ (हिंदु आणि हिंदू हे दोन्ही शब्द पुंलिंगी (होत) व (दोन्ही) दुष्टांचे पारिपत्य करणारा या अर्थी आहेत.)
(V. S. Apte’s Sanskrit English Dictionary, Vol. III, Prasad Prakashan, Pune (P. 1759).
त्यापूर्वीच्या वाचस्पत्य कोष आणि शब्दकल्पद्रुम या सर्वमान्य संस्कृत शब्दकोषांतही वरीलप्रमाणे हिंदूविषयी माहिती उपलब्ध आहे.
इतर संदर्भ
एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स यामध्ये इ. स. पूर्व ४८६ च्याउत्कीर्ण शिलालेखात ‘हिंदुस्’ असा उल्लेख असल्याचे नमूद केले आहे.
“The name of Hindu appears in the form of Hindus in the inscription on the monument of the Darius Hystespes near Persepolis. (Encyclopaedia of Religion and Ethics, Vol. 6. Ed. James Hastings, 1913, Page 667)
अलेक्झांडरच्या चरित्रात ‘हिंदकुश’ (हिंदुकूट) असा उल्लेख येतो. अलेक्झांडरच्या पूर्वीचा ‘अवेस्ता’ हा पारसी धर्मग्रंथ. तो ऋग्वेदाच्या वैदिक भाषेचे सादृश्य जपणारा, संशोधकांच्या दृष्टीनेही प्राचीन समजला जातो. अवेस्ताच्या भाषेत संस्कृत शब्दातला ‘स्’ ‘ह’च्या रूपाने आढळतो, ‘सिन्धु’ या शब्दाचे तद्रवरूप ‘हिन्दु’. भविष्यपुराणाच्या प्रसिसर्ग पर्व, अध्याय ५ मध्ये ‘हप्त हिन्द’ चा स्पष्ट उल्लेख आढळतो. तसेच ‘सिन्धुस्थानमिदं ज्ञेयं राष्ट्रमार्यस्य चोत्तमम्’ असेही भविष्य पुराणात प्र. २ मध्ये म्हटलेले आहे.
सिन्धु-हिंदु-इंडस्
मुळात ‘सिन्धु पारशांच्या पद्धतीने ‘हिंदु’ अथवा ‘हिंद’ आणि पुढे ग्रीक भाषेत मूळ संस्कृत शब्दातील हचा लोप होत असल्यामुळे प्रचलित झाला तो इंदु अथवा इंदू. पुढे इंग्रज ‘द’ च्या ऐवजी ‘ड’ वापरत असल्यामुळे तो इंड, इंडो अथवा इंडिया अशा रूपात बदलला. मेगॅस्थेनीसने आपल्या इतिहासविषयक ग्रंथाला ‘इंडिका’ हे नाव दिल्याचे सर्वज्ञात आहे.
इसवी सनाच्या सातव्या शतकात हिंदुस्थानात आलेल्या चिनी प्रवासी व्हेन्त्सांग याने येथील रहिवाशासाठी ‘हिंदू’ असा शब्द वापरल्याचे दिसून येते.
हिंदीतील अतिप्राचीन समजल्या गेलेल्या चंदबरदाईचे वडील वेन यांनी लिहिलेल्या काव्यरचनांत व पृथ्वीराज रासो या प्रसिद्ध काव्यात (इ. स. बारावे शतक) हिंदू व हिंदुस्तान हे शब्द येतात. स्वदेश, स्वजन व स्वधर्म यासंबंधी विलक्षण तळमळ प्रकट करणाच्या समर्थ रामदास स्वामींच्या काव्यात हिंदू आणि हिंदुस्थान याची नोंद आहे. त्यांच्या ‘आनंदवनभुवनी’ या पालुपदाच्या काव्यातला ‘हिंदुस्थान बळावले’ हा उल्लेख तर अविस्मरणीय आहे.
‘हिंदुधर्म गाजे’ म्हणणारे गुरु गोविंदसिंह, ‘हिंदुवाण को अधार’ म्हणून श्री शिवरायांचे वर्णन करणारे कविभूषण, अशी असंख्य प्रमाणे हिंदु अथवा हिंदुधर्म या शब्दांच्या वापराविषयी आहेत. संस्कृतकाव्यातले एक पं. जगन्नाथाच्या नावावरचे उदाहरण तर हिंदू आणि यवन (मुसलमान) यांची वैशिष्ट्ये नमूद करणारे उल्लेखनीय आहे (इ. स. सतरावे शतक).
‘न संध्यां संधत्ते, नियमितनिमाजान्न कुरुते।
न वा मौजीबन्धः, कलयतिन वा सुन्नतविधिम्।
न रोजां जानीते, व्रतमपि हरेनैव कुरुते।
न काशी मक्का वा, हर हर न हिन्दुर्नयवनः।।
[संध्या करत नाही किंवा नियमाने नमाजही पढत नाही. धड मुंजही झाली नाही किंवा सुन्ताही झाला नाही. ना रोजाचे उपवास करतो किंवा एकादशीचे व्रत आचरतो. न काशीला (भजतो) वा मक्केला जातो. हाय! हाय!! असा ना राहिला धड हिंदू अथवा न राहिला धड मुसलमान.]
अर्थात् निधर्मवाद्यांच्या मताने अशी स्थिती आदर्श समजली जाईल! ही सर्व माहिती लक्षात घेतल्यावर ‘हिंदुत्व, हिंदुराष्ट्र, हिंदुधर्म हे गेली सत्तर वर्षे एका विशिष्ट वर्गापुरतेच मर्यादित आहे’ (पृ. २२२), ‘आपण हिंदुधर्मीय आहोत ही जाणीव पन्नास वर्षापूर्वी कोणालाच नव्हती’ (पृ. २२३), ‘हिंदू हा उच्चारदोषातून निर्माण झालेला शब्द असल्यामुळे कोणत्याच संस्कृत ग्रंथात हिंदू हे नाव नाही’ (पृ. २२५), ‘हिदू हा संस्कृत शब्द नसल्यामुळे कोणत्याच संस्कृत ग्रंथात त्याचा अर्थ दिलेला नसतो (पृ. २२६), कोणत्याच अभिलेखात हिंदु शब्द नाही, संस्कृत भाषेच्या शब्दकोषात या शब्दाचा अर्थ सांगितला नाही (पृ. २२३)’ यासारखी भरमसाट, निराधार व अनेकवार स्पष्टपणे परस्पर विरोधी असणारी विधाने करण्याचे साहस अपुर्यास माहितीमुळे होत असावे किंवा त्यामागे अन्य काही अज्ञात कारण असावे हे लक्षात येत नाही. या तथाकथित बुद्धिवादाची प्रकृती मात्र ताळ्यावर असल्याचे दिसत नाही.

अभिप्राय 1

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.