श्री मधुकर देशपांडे यांच्या पत्राला (मार्च ९६) उत्तर

माझा बडगा फक्त भारतीय व आशियातील पुरुषांवर पडतो व पाश्चात्त्य पुरुष अतिशय उदारमतवादी असतात अशी कुणाची समजूत झाली तर त्यांची मी माफी मागते. स्त्रियांचे स्थान सर्व जगात दुय्यमच आहे. दुय्यमतेच्या पातळीत कमीअधिकपणा आहे एवढेच.
माझ्या मते अमेरिकेत अविवाहित स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य आहे. विवाहपूर्व संबंधांमुळे स्त्रियांची लग्ने अडत नाहीत. बलात्कारित स्त्रियांवर अमेरिकेत कोर्टात अन्यायच होतो.
डोमेस्टिक व्हायोलन्स’मुळे, नवर्याकने, बॉय फ्रेंडने वा घटस्फोटित नवयाने केलेल्या मारहाणीमुळे बॉस्टनच्या परिसरात दर आठवड्याला एक स्त्री मृत्युमुखी पडते.
ज्या समाजात स्त्रिया अधिक प्रमाणात मुक्त आहेत तिथे पुरुष वेश्या असतात. अमेरिकेत अशा वेश्यांची जाहिरात “एस्कॉर्ट सर्व्हिसेस’ या नावाखाली होते. इतर देशांतही श्रीमंत बायकांसाठी वेश्याव्यवसाय करणारे पुरुष असतात असे मी ऐकले आहे.
माझे लिखाण स्त्रीमुक्तीच्या दृष्टिकोनातून नाही. मी मानवमुक्तीच्या दृष्टीने लिहिते. पुरुषप्रधान समाजामुळे स्त्रियांसारखे पुरुषांवरही अन्याय व अत्याचार होतात. गुन्हेगार, तुरुंगातले कैदी, रणांगणात मरणारे सैनिक, हृदयविकार, व्यसने, कर्करोग इत्यादींनी मरणारे अल्पायुषी पुरुष, बायकी म्हणून हिणवले जाणारे मुलगे हे पुरुषप्रधान समाजाचे बळी आहेतं. पुरुषप्रधानतेचीआपण किंमत मोजत आहोत हे बहुतेक पुरुषांना माहीतही नाही. अमेरिकेत हल्ली ही जाणीव निर्माण होऊ लागली आहे. निदान त्या धर्तीचे लेख माझ्या वाचनात आले आहेत.
स्त्रीपुरुषांपैकी कुणाची कामवासना अधिक आहे हे ठरवणे जोपर्यंत स्त्रियांची खरी लैंगिक मुक्ती होत नाही तोपर्यंत अशक्य आहे. स्त्रियांत व पुरुषांत व्यक्तिशः फरकही असतीलच. हा मुद्दा गौण आहे हे मला मान्य आहे.
श्री देशपांडे यांच्या शेवटच्या तीन प्याच्यांशी मी सहमत आहे.
श्री दिवाकर मोहोनींच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेत आईपासून सुटी मुले बिरादरीची होतात असे म्हणण्यापेक्षा ती मुले व्यक्तिप्रधान समाजात टक्केटोणपे व गटांगळ्या खात जगायला शिकतात असे म्हणणे योग्य होईल. अमेरिकेत बिरादरी (व्हॉलंटियर ऑर्गनायझेशनस् व सरकार) मुले, आया, वृद्ध व अपंग यांना सांभाळते. पण अठरावरची मुले, मुली स्वतंत्रच असतात. आईवडिलांच्या घराचे दार त्यांना तात्पुरते गरजेसाठी उघडे (बहुतेक) असते.
श्री. दिवाकर मोहोनींच्या भावी कुटुंबाबद्दलच्या कल्पना साधारण अमेरिकेतील कॉम्यून्ससारख्या आहेत. अशा प्रकारच्या मिश्र कुटुंबाच्या यशाबद्दल मला शंका आहेत. अमेरिकेत कॉम्यूनमध्ये राहणार्याे कुटुंबांशी माझी ओळख होती. ह्या कुटुंबांत मुलांची जबाबदारी सार्वजनिक, पर्यायाने कुणाचीच नाही असे होण्याचा संभव असतो, व झालेली मी पाहिली आहे.
तसेच या कुटुंबातले स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य खरे नसेल, म्हणजे त्यांना लैंगिक संबंधास नाही’ म्हणण्याची मोकळीक नसेल, तर त्यांना इच्छेविरुद्ध इतर पुरुषांशी संबंध ठेवण्याससंमती द्यावी लागते.
एकत्र कुटुंब, विभक्तकुटुंब, कॉम्यून्स या सर्वांचा अनुभव थोड्याफार प्रमाणात मला आहे. मी असे म्हणेन की आईवडील नसले किंवा असून त्यांनी मुलांची उपेक्षा केली तर ती मुले पोरकीच होतात. एकट्या स्त्रिया, मुलाचं यशस्वीरीत्या संगोपन करून शकतात, पण मुलग्यांना वडिलांची किंवा नातेवाईक पुरुषांची ‘रोल मॉडेल’ म्हणून जरूरी असते. नाहीतर मुलगे बेशिस्त होतात.
अमेरिकेतली घटस्फोटित कुटुंबेही श्री दिवाकर मोहनींच्या कल्पनेप्रमाणे काही प्रमाणात आहेत. सावत्र आई सख्खा बाप, सावत्र बहीण भाऊ, सख्खी बहीण भाऊ, सावत्र आजी आजोबा इ. इ. अशा कुटुंबातही मुलांचे बहुतेक हालच होतात. अशा कुटुंबातील अनेक मुलामुलींना बघून व त्यांच्याशी बोलून मी असा तर्क केला आहे.
आईवडिलांचे एक मुख्य विभक्त कुटुंब व जवळपास आजी आजोबा, काका मामा इत्यादि नातेवाईक, अशी धारणा मुलांच्या संगोपनास सर्वांत चांगली असे मला वाटते.
कुटुंबाची घडण कशी असावी ह्या प्रश्नाला एकच उत्तर नाही, हे पण खरे. माणसे समजूतदार असल्यास कुठल्याही प्रकारचे कुटुंब यशस्वी होऊ शकते.
मी लिहिलेला भारतात स्त्रीमुक्ती असती तरचा परिच्छेद स्वप्नरंजन आहे (असे श्री देशपांडे म्हणतात) हे मला मान्य आहे. मुद्दा सिद्ध करण्यासाठी मी ते स्वप्नरंजन केले.
(05, (Or/ord Rotil, Nfon, MA(02159 Newton, MA02159U.S.A.
मला एक नवीन प्रकारची बुद्धी दिसली, तो दिवस
१० फेब्रुवारी १९९६ ला दुपारी ४.४५ ला मी “डीप ब्लू’ या संगणकाशी खेळत असताना मला पहिल्यांदा कृत्रिम बुद्धिमता (artificial intelligence) ओझरती दिसली. त्या संगणकाने एक प्यादे सहज मारता येईल अशा घरात आणून ठेवले. मी जर पांढरे मोहरे घेऊन खेळत असतो, तर मीही असा त्याग केला असता, कारण त्याने काळ्या प्याद्यांची फळी भंगून पट जरा मोकळा झाला असता. एक चमत्कारी आणि खूपच “मानवी” खेळी होती ती.मला ते प्यादे मरू दिल्यावर परत शत्रूचे प्यादे “वसूल करणारी खेळ्यांची साख़ळी सुचत नव्हती, पण माझे मन मला सांगत होते, की काळ्या प्याद्यांचा व्यूह भेदून आणि काळ्या राजाला उघडे पाडून, मी प्यादे तर पुढे कधीतरी वसूल केलेच असते, पण एकूण डावही माझ्याकडे झुकला असता. पण संगणक असली खेळी खेळेल, असे मला वाटले नव्हते. रचनेतले बदल दूरदृष्टीने पाहणे, प्याद्यांच्या व्यूहांमध्ये बरेवाईट ठरवणे, वगैरे संगणकांना जमत नाही.
माणसे मात्र असे नेहमीच करतात. संगणक मात्र खेळ्यांच्या अनेक शक्यता तपासत बसतात. अगदी ‘डीप ब्लू’ सारखा सेकंदाला दहा कोटी शक्यता तपासणारा संगणकही फार खोली गाठू शकत नाही, कारण बुद्धिबळात अशा शक्यता जवळपास अगणित असतात. प्रत्येक खेळीसाठी नेमून दिलेला वेळ संपत आला, की संगणक आपण तपासलेल्या शक्यतांपैकी सर्वांत चांगली कोणती हे जोखतात.आणि “चांगली’ म्हणजे संगणकाच्या दृष्टीने पटावर जास्त मोहरी–प्यादी टिकवणारी! फारच जडवादी असतात ते! त्यांना खरेच खेळ समजला तर ते वेगळे वागतील, पण त्यांना खेळ समजत नाही.
या साऱ्यामुळे ते प्यादे मरू घालण्याने मी स्तंभित झालो. मी खुपदा संगणकांशी खेळलो आहे, पण असे कधी पाहिले नव्हते. मला जाणवले–वास आला म्हणा-की पटापलिकडे एक वेगळ्याच प्रकारची बुद्धी कार्यरत होती! मी जमले तसे खेळलो, पण ‘तो” सुंदर, निर्दोष तर्हे ने खेळला आणि सहज जिंकला.
नंतर मला कळले की पुढे सहा खेळ्यानंतर ते प्यादे पुन्हा जिंकता येईल ही शक्यता “डीप ब्लु’ च्या अफाट गणिती शक्तीला सापडली होती. संगणकाला आपण प्यादे ‘त्यागतो’ आहोत असे वाटलेच नव्हते. आता जर मी खेळतो तसलीच खेळी “तो” पूर्णपणे वेगळ्याच कारणांनी खेळतो, तर ती खेळी “बुद्धिमान’ मानायची काय? एखाद्या खेळीचे बुद्धिमान असणे हे ती खेळी कोण (किंवा काय?) करतो यावर अवलंबून ठरवायचे का?
या प्रश्नाचे तात्त्विक उत्तर शोधायला मला वेळ नव्हता, पण काय झाले आहे, ते कळल्यावर मी पुन्हा आश्वस्त झालो. खरे तर उरलेल्या फेर्यां मध्ये मी संगणकांच्या “पारंपारिक मर्यादा वापरूनच खेळलो. उदाहरणार्थ, एकदा मी सुरुवातीच्या खेळ्यांचा क्रम जरासा बदलला. आता संगणकात ‘‘भरलेल्या सुरुवातीच्या खेळ्यांशी तो माझा क्रम ताडून पाहू शकत नव्हता, आणि म्हणून त्याला अनेकानेक शक्यता तपासत बसावे लागले, आणि योग्य व्यूहरचना सापडलीच नाही! माणूस असता तर म्हणाला असता, “काय करतोस, गैरी?”आणि क्रमातला बदल निरर्थक मानून पुढे गेला असता.
पुढच्या पाच फेर्यां’मध्ये मी त्याला ठोस ध्येयाकडे जाऊच दिले नाही. जर संगणक जास्त मोहरी जिंकू शकला नाही, किंवा राजावर हल्ला करू शकला नाही, किंवा इतर त्याला शिकवलेल्या प्राथमिक महत्त्वाच्या गोष्टी करू शकला नाही, तर तो गोंधळतो. मग तो दिशाहीन खेळायला लागतो आणि हरतो. शेवटी मला मोठाच फायदा होता की मला त्याच्या प्राथमिकता माहीत होत्या, आणि त्याप्रमाणे मी शैली बदलू शकत होतो. त्याला मात्र माझ्या प्राथमिकता माहीत नव्हत्या. म्हणून जरी मला बुद्धिमत्तेची झळक दिसली, तरी ती विचित्र, अकार्यक्षम, लवचिकता नसलेली बुद्धिमत्ता आहे आणि म्हणून मला वाटते, की आणखी काही दिवसमाझे’ आहेत!
[बुद्धिबळात अनेक वर्षे जगज्जेता असलेल्या गॅरी कॅस्परॉव्हचा हा लेख. जाड ठशातली वाक्ये, हा या लेखाचा गाभा. बुद्धिमत्ता म्हणजे काय, हा प्रश्न आजच्या सुधारकाच्या पुढे चर्चेसाठी ठेवीतआहोत.]
अनुवाद- नंदा खरे

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.