संपादकीय

देशापुढील ज्वलंत प्रश्नांचा सर्वांगीण विचार व्हावा या हेतूने त्यावर तज्ञ लेखकांचे परिसंवाद घडवून आणून ते विशेषांकातून प्रसिद्ध करण्याचा आमचा विचार जाहीर केल्याला एक वर्ष लोटून गेले. परंतु एकही तसा विशेषांक बाहेर पडला नाही याबद्दल आम्ही दिलगीर आहोत हे प्रथम सांगितले पाहिजे. मध्यन्तरी डॉ. भा. ल. भोळे ह्यांच्या संपादकत्वाखाली त्यांच्या सौजन्याने आगरकर विशेषांक आम्ही प्रकाशित करू शकलो, पण पूर्वी घोषित केलेल्या विषयांवरच्या विशेषांकाच्या प्रकाशनास फार उशीर झाला आहे ही गोष्ट निर्विवाद आहे. पण या मधल्या काळात आम्ही निष्क्रिय राहिलेलो नाही हेही सांगावेसे वाटते. त्याचे दृश्य फल म्हणजे प्रस्तुत विशेषांक होय. त्याचे संपादन करण्याची विनंती आम्ही डॉ. सत्यरंजन साठे यांना केली, आणि त्यांनी ती कसलेही आढेवेढे न घेता मान्य केली ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आपल्या व्यावसायिकांपैकी काही तज्ञांचे लेख त्यांनी लिहवून घेतले आणि त्यातून हा अंक सिद्ध झाला आहे. हा सर्व उद्योग डॉ. साठे यांनी केवळ आपल्या स्वभावजन्य सौजन्याने आणि विषयाच्या तसेच आमच्या प्रेमाखातर केला ही आमच्या दृष्टीने अपूर्व अशी गोष्ट आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे कायमचे त्रदृणी राहू. त्याचबरोबर या अंकातील अन्य लेखकांनीही लेखनसाह्य केले याबद्दल त्यांचेही आम्ही ऋणी आहोत.
सेक्युलरिझम म्हणजे काय या प्रश्नाविषयी आपल्या देशात फार गैरसमज प्रसृत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सेक्युलरिझम या शब्दाला ‘सर्वधर्मसमभाव’ हा पर्याय वापरण्यामुळे मूळ कल्पना अगदी पातळ होते, किंबहुना ती जवळ जवळ नाहीशी होते. या गोष्टीमुळे सेक्युलरिझमवर चर्चा व्हावी अशी आमची तीव्र इच्छा होती. तशात सर्वोच्च न्यायालयाचा श्री. मनोहर जोशी वि. नितीन भाऊराव पाटील या खटल्याचा निकाल जाहीर झाला, आणि त्या चर्चेची गरज अधिकच भासू लागली. हिंदुत्व ही हिंदू धर्माहून वेगळी कल्पना आहे आणि ती सेक्युलरिझमशी सुसंगत आहे असे न्यायमूर्तीचे म्हणणे आहे. त्यामुळे हिंदुत्व म्हणजे काय आणि ते धर्मनिरपेक्ष कसे असू शकते असा प्रश्न निर्माण झाला. त्याच्यावरही या लेखातून प्रकाश पडेल अशी खात्री आहे. पुढेमागे हिंदुत्व’ या विषयाची चर्चा करावी लागेल हे निश्चित.
एक बातमी
ह्या अंकातील परिसंवादाबरोबर दुसर्याप एका विशेषांकाची तयारी पूर्ण होत आली आहे. तो विषय म्हणजे समान नागरी कायदा. त्या अंकाचे संपादन डॉ. जया सागडे (पुणे) या करणारआहेत. तो अंक तीन महिन्यांनी प्रसिद्ध होईल असे आश्वासन आम्ही याप्रसंगी देतो.
हा विशेषांक जुलै-ऑगस्ट या दोन महिन्यांचा असल्यामुळे पुढचा अंक सप्टेंबरमध्ये प्रकाशित होईल.