पत्र

चि. मो. पडित
श्री संपादक, आजचा सुधारकयांस,
गेले वर्षभर माझ्या मनात जी अस्वस्थता आहे ती थोडक्यात पुढे मांडत आहे. मूल्यांचा मुद्दा उपस्थित करायचा नाही ही दक्षता यावच्छक्य घेतली आहे. “विधींचे”समर्थन/खंडन नीतिमूल्यांकडे नेत असल्यामुळे फक्त मला जशी वस्तुस्थिती आकलन होत आहे तसे वर्णन करत आहे. यात अभिनिवेश नाही, फक्त माझी बिकट अवस्था predicament आहे. आजच्या सुधारकचे विचारवंत वाचक यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करतील अशी अपेक्षा.
आधार विधानः-जातपात, वर्ग, लिंग, भाषा, उपासना असले कुठलेही भेदाभेद समष्टीच्या व्यवहारात न करणारा, सर्वांना समान संधी देणारा समाज आणि त्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपाची इहवादी राज्यव्यवस्था उभी करण्यासाठी आपण सार्वत्रिक प्रौढमतदानाची पद्धत स्वीकारली आहे. या प्रक्रियेतून कुठचेही सरकार निवडून आले तरी समाजाला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागेल त्या अशा
१. रस्ते साफसूफ करणे, त्यांचे धगधगत्या उन्हातही डांबरीकरण करणे, मेलेली ढोरे उचलणे, कचरा उचलणे, शेतांवर राबणे, बोटींवर, खाणीत, पोलाद कारखान्यांत धोक्याची कामे करणे इ. वाईट कामे टाळता तर येत नाहीत; मग ती करायची कोणी?
जपानमध्ये सहा-सात हजार यंत्रमानवांतर्फे ही कामे काही प्रमाणात केली जातात. गांधीजींनी सर्व कामाची प्रतिष्ठा समान समजून ही कामे सर्वांनी करावी असा तोडगा सुचवला. हिंदू समाजाने कायमची ही कामे “शूद्रांवर टाकली. युद्धानंतर जर्मनीत ही कामे बाहेरून आलेल्या तुर्की, ग्रीक, इटालियन लोकांवर टाकली गेली. पण समान संधी देणारा कायमस्वरूपी सन्मानकारक तोडगा काही निघालेला नाही.
२. वारसदारीमुळे संपत्तीचे व संस्कृतीचे देखील आपसूखच ध्रुवीकरण होत असते. मी बांधलेले घर, व्यवसाय विनासायास मुलाकडे जात असतो. शिवाय सुसंस्कृत, सुविद्य घरांतील मुलांना शिक्षणाचा फायदा होतोच. अशा तर्हे ने जन्मजातच असमानता येते. बरे घर, शेती, व्यवसाय मृत्यूनंतर नाहीसा करून टाका असे म्हणता येत नाही. यावर उपाय? यांतून निर्माण होणारी सामाजिक-आर्थिक असमानता खूपच व्यापक असते.
३. काहीही काम न करता उत्पन्न घेत राहाणे (rentals) असा दोष वरील (२) मधून उत्पन्न होतो. जागेचे भाडे, तयार फळबागांचे उत्पन्न, कारखाना-भागभांडवलातून मिळणारे उत्पन्न, निवृत्तीनंतर मिळणारे वर्षानुवर्षे दरवर्षी वाढत जाणारे निवृत्तिवेतन (१० वर्षानंतर हे थांबवावे) हा सर्व बोजा समाजावर पडतो.
४. दोन अडीच एकरांवर शेती करणारा आणि /अथवा कोरडवाहू शेतकरी याची शेती इतकी आतबट्ट्याची असते, की त्याची मुले या शेतांवर राहायला तयार होत नाहीत. किंबहुना १० एकर बागायतदार शेतकर्याीची शेतकीशिक्षण घेतलेली मुलेही हा व्यवसाय पुढे चालवू इच्छीत नाहीत. त्यांना बँकेतील नोकरी हवी असते. कारण शेतावर शनिवाररविवारसुद्धा, कॅज्युअल लीव्ह, अर्ल्ड लीव्ह, लाभांश काहीही नसतो, अनिश्चितता मात्र भरपूर असते. कूळकायदा, कमाल जमीन धारणा कायदा इ. मुळे ही शेती बिगरशेतकरी विकत घेऊ शकत नाही. यांतून हजारो एकर पडीक जमिनी आज महाराष्ट्रात दृष्टोत्पत्तीस पडतात. कोठल्याही समाजाला – आपल्यासारख्या भरगच्च लोकसंख्या असलेल्यासमाजाला तर विशेषकरूनर्हे् परवडेल का?
५. बरेच दिवस माझी अशी प्रामाणिक समजूत होती की ‘पैसा’ हा श्रम (शारीरिक अथवा बौद्धिक) साठवून ठेवण्याचे, अथवा श्रममूल्य इकडून तिकडे सहज नेता येण्यासारखे आर्थिक व्यवहाराचे साधन आहे. परंतु आज व्यवहारात प्रत्यक्ष सरकारने छापलेला पैसा, लोकांना कागदोपत्री दिलेली उधारी (credit money), सट्टेबाजांनी केवळ बोलीवर निर्माण केलेला पैसा, डॉलर, सोने, चांदी यांचे ठरणारे भाव हे सर्व पाहता श्रम व श्रममूल्याशी यांचा काही संबंध दिसत नाही. आधुनिक आर्थिक व्यवहाराला, उलाढालींसाठी हे सर्व आवश्यक धरले जाते. अशावेळी एका क्षणात संगणकाद्वारे करोडो डॉलर्स जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत हलवणारा आणि इमाने इतबारे श्रमणारा यांचा मेळ कसा घालावायचा?आज कितीतरी तरुण अभियंते, डॉक्टर्स इ. उत्पादक उद्योजकता सोडून अशा मूलतः सट्टेबाजीस्वरूपाच्या व्यवसायांकडे वळताना दिसतात. संपूर्णतः अनुसादक उद्योजकतेवर समाज चालेल?।
६. आधुनिक तंत्रज्ञानाचा व ऊर्जेच्या स्वरूपाचा विचार करता मानवाची उत्पादनशक्ती इतकी वाढली आहे की जर हे उत्पादन सर्वांनी सारखे वाटून घेतले तर सर्वच जण आठवड्याचे चार दिवस व रोजचे चारच तास काम करतील तरी पुरे होईल. (जर्मनीत आज साडेचार दिवसांचाच कामाचा आठवडा होऊ पाहात आहे). मग रिकामा वेळ जो राहील त्याचे काय करायचे?त्याचे आपण काही खास शिक्षण देत आहोत कीदूरदर्शनवरील सेक्स आणि चंगळवाद हा तो मोकळ्या वेळेचा अर्थ असेल?जोडीला Gossip Magazines, शब्दकोडी, लॉटरीही आहेतच. आज जर अमेरिकेसारख्या अत्यानुधिक विकसित समाजावा विचार केला तर सेवा व्यवसायात जवळ जवळ पंचाऐंशी टक्के आर्थिक घडामोडी व व्यवहार होतात, शेती व कारखानदारीसारख्या उत्पादक क्षेत्रांत फक्त १२-१५ टक्केच रोजगारी असते.
या सर्व समस्यांची जाण असलेली दीर्घ मुदतीची शिक्षणव्यवस्था किंवा काही अन्य समाजमानसिक (ethos), संस्थाकीय (institutional) तयारी आपण करीत असल्याचे दिसत नाही. शिवशाही असो, रामराज्य असो, कुराण अथवा बायबलचे राज्य असो, समस्या याच राहतात. चार आठ विचारवंतांशी याबाबत बोलण्याचा प्रयत्न केला. प्रतिक्रिया मूक संमतीची, वेड्यांत काढण्याची, हसण्यावारी नेण्याची किंवा असा कधी विचारच न केल्याची आढळली. हा विचार आजच्या सुधारकच्या व्यासपीठावर चर्चेसाठी मांडावा ही विनंती

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.