आगरकर : एक आगळे चरित्र (भाग १)

‘टिळक, आगरकर, गोखले वगैरे मंडळींविषयी आतापर्यंत खूप लिहिले गेले आहे … मात्र हे लेखन कळत नकळत एकतर्फी, पूर्वग्रहदूषित होते … ज्या शिस्तीने व काटेकोरपणे व्हावयास हवे होते तसे ते झालेले दिसत नाही,” अशी डॉ. य. दि. फडके यांची तक्रार कधीपासून वाचनात आहे. अर्वाचीन महाराष्ट्राचे इतिहासकार आणि सामाजिक परिवर्तनाचे भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक विद्वन्मान्य आहे, इतकेच नाही तर राजमान्य देखील आहे. आपल्या सत्यसंशोधनाचे फलित शिस्त आणि काटेकोरपणा पाळून त्यांनी वारंवार वाचकापुढे ठेवले आहे. त्यांची शोधः बाळ-गोपाळांचा (१९७७)आणि व्यक्ती आणि विचार (१९७९) ही प्रस्तुत चरित्रविषयाशी संबंधित पुस्तके याच भूमिकेची निदर्शक आहेत. येणार, येणार’ म्हणून गाजत असलेल्या त्यांच्या आगरकरचरित्राविषयी वाचकांच्या उत्कंठा जशा वाढल्या होत्या तशा अपेक्षाही उंचावल्या होत्या त्या यामुळेच.
मौज प्रकाशन गृहाने मार्च ९६ मध्ये प्रकाशित केलेल्या आगरकर या पुस्तकात आपला आगळेपणा राखण्याचा आणि दाखविण्याचा प्रयत्न फडक्यांनी केला आहे, तो असा: असा :
‘कुलवृत्तान्त, जन्म, बालपण, शिक्षण, विवाह अशा सर्वपरिचित सरधोपट पद्धतीने आगरकरांचे चरित्र लिहायचे नाही, मात्र ‘वाचकाला आपण एखादी ललितकृती वाचीत आहोत असा भास अधून मधून व्हावा… हे चरित्र कोणीतरी आपल्याला सांगत आहे असे वाचकाला वाटावे, अशा निवेदनशैलीचा अवलंब मी जाणूनबुजून केला आहे (सोळा).२ हेतू हा की, ‘चरित्र नुसते विश्वसनीय नव्हे तर वाचनीयही व्हावे’ (तत्रैव).
१. य. दि. फडके, शोध : बाळगोपाळांचा, श्रीविद्या १९७७, प्रास्ताविक.
गेली तेवीस वर्षे फडके या चरित्राची सामग्री जुळवीत आहेत. अप्रकाशित मूळ साधने स्वतः धुंडाळून अभ्यासत आहेत, घटनांची शहानिशा करून त्या संगतवार मांडत आहेत. त्यांचे हे परिश्रम पुस्तकाच्या पानोपानी दिसतात. जुळवलेल्या माहितीचे स्वरूप केवळ संकलनात्मक न ठेवता विवेचनात्मक ठेवावयाचे’ असा त्यांचा पूर्वघोषित आग्रह आहे. या सगळ्यांचा परिणाम वाचकाच्या मनात दोन अपेक्षा उत्पन्न करण्यात होतो. एक अशी की, वर उल्लेखित पुस्तकांत आणि मासिकांच्या विशेषांकांमध्ये त्यांनी आजवर न सांगितलेले आगरकरचरित्र आता आपल्याला वाचायला मिळेल. आणि दुसरी अशी की, या माहितीचे स्वरूप केवळ संकलनात्मक न राहता आगरकरांचे असाधारण व्यक्तित्व आणि लोकोत्तर कर्तृत्व आपल्यापुढे आखीव रेखीव स्वरूपात कसे ठसठशीतपणे उभे राहील! याच अपेक्षा बाळगून मी हे चरित्र वाचले. ते वाचल्यावर जो ठसा मनावर उमटला तो वाचकांपुढे ठेवत आहे.
माझ्या मनात विचार असा आला की आगरकर काही आकाशातून टपकले नव्हते. त्यांची जडण घडण होण्यात त्यांच्या आधीच्या महाराष्ट्रातील किंवा बाहेरील विचारवंतांचा काही वाटा असणारच. त्यांच्या समकालीनांमधील जे ज्येष्ठ समानधर्मे होते त्यांच्यात व यांच्यात काही वैचारिक देवाण-घेवाण झालेली असणार. ती या चरित्रात कुठे दिसते का? ज्या सुधारणांसाठी त्यांनी एवढे जिवाचे रान केले त्या त्यांच्या आधी कोणीच का पुरस्कारल्या नाहीत?आणि असतील तर ‘सुधारक’ या पदवीवर आगरकरांची जितकी मुद्रा उमटलेली दिसते तितकीयांची का नाही?किंवा साध्या शब्दांत, आगरकरांचे इतर सुधारकांपासून वेगळेपण कशात आहे?अनन्यसाधारंण वैशिष्ट्य काय आहे?तसेच महाराष्ट्रभाषेत ज्यांनी सुधारणावादाचा कैवार घेऊन लिखाण केले अशा पूर्वसूरींची दखलआगरकरांनी घेतली की नाही आणि घेतली असेल तर कशी?य. दि. फं.च्या प्रस्तुत चरित्रात मला या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत.
२. कंसातील आकडे प्रस्तुत आगरकर-चरित्रातील पानांचे.
३. य. दि. फडके, व्यक्ती आणि विचार : श्रीविद्या १९७९, प्रास्ताविक.
माझा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट कराँतो. आगरकरांच्या स्वतंत्र कर्तृत्वाचा, ते बहरण्याचा काळ सात-आठ वर्षांचा. इ. स. १८८७ मध्ये त्यांनी केसरी सोडला आणि १८९५ मध्ये इलोक. या काळात त्यांच्या समकालीनांमध्ये दोन ज्येष्ठ सुधारक विद्यमान होते. लोकहितवादी १८९२ मध्ये आणि न्या. मू. रानडे १९०९ मध्ये वारले. आगरकरांनी पुरस्कारलेल्याजवळजवळ सगळ्या सुधारणालोकहितवादींनी आगरकरांच्या जन्माच्या आधी आठ वर्षे, १९४८ पासून शतपत्रांमधून मांडल्या. ते उच्चरवाने सांगत होते की, ‘शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धी चालवा’. आप्तवचनाचे प्रामाण्य नाकारणे हे सुधारणावादाचे पहिले गमक आहे. केवळ ऐहिकदृष्टी’ आणि आपल्या मनाची परिशुद्धी या दोन कसोट्यांत सुधारणावादाची परिसमाप्ती आहे. विवेकबुद्धीशी इमान राखून, ऐहिक दृष्टीने सामाजिक प्रश्नांची शहानिशा करावी ही लोकहितवादींची विवेचनपद्धती पूर्ण सुधारकी होती. मात्र ‘लग्नासारख्या स्वसत्तेतील कामात सरकारचा उपद्रव ठीक नाही … जे जबरीने चालू झाले त्याचा खचितपणा नाही’ अशी मवाळ सुधारकाची भूमिका ते वठवतात.
या लोकहितवादींची आगरकरांनी कशी दखल घेतली हे फडक्यांच्या आगरकरचरित्रात कुठे आढळले नाही. १८९२ साली लोकहितवादींचा मृत्यू झाला, त्या निमित्त आगरकरांनी सुधारकात एखादा मृत्युलेखही लिहिला असेल हे संभवते. यासंबंधी खरे काय ते फडकेच सांगू शकले असते. १९९२ ते ९५ या काळातील सुधारकच्या संचिका त्यांनी दिल्लीला तळ ठोकून पाहिल्याचे तेच सांगतात. मग हे मौन का?की त्यांना हा प्रश्नच पडला नाही?
बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतले पहिले पत्रकार (१८१०-४६), आणि महाराष्ट्रातले आद्यसुधारक. आगरकरांच्या जन्माआधी २४ वर्षे १८३२ मध्ये त्यांनी ‘दर्पण’ या आपल्या पाक्षिकातून लोकशिक्षणाला आरंभ केला. १८३९ इतक्या जुन्याकाळी त्यांनी स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, बालविवाहाची कुप्रथा या सामाजिक विषयांवर लिहिले.‘सामाजिक दोष नाहीसे करण्यासाठी जे विचार आचरणात आणावयाचे ते पूर्वेकडे आहेत की पश्चिमेकडून आले याला महत्त्व देण्याचे कारण नाही’. त्या विचारांचा उपयोग समाजास नवी दिशा देण्यासाठी व्हावा ही एकच कसोटी’ आहे असा दृष्टिकोन ठेवून ते लिहितात, ‘युरोपीय लोकांमध्ये सर्व स्त्रियांत विद्याभ्यास पुरुषांप्रमाणेच असतो. त्या कोणत्या बिघडल्या, हिंदुस्थानच्या कोणत्या परिशुद्ध आहेत?यास्तव (स्त्रियांनी)विद्याभ्यास जरूर करावा. तसेच समाजातील विचारवान लोकांनी पुनर्विवाहविधी चालविल्यावाचून (विधवांकडून होणारा) दुराचार मिटणार नाही’ असा स्पष्ट इशारा तेआपल्या सुबुद्ध वाचकांना देतात.
विष्णुबुवा ब्रह्मचारीही (१८२५-७१) सुधारणावादी होते. प्रभावी वक्ते आणि लेखक होते. ते पुनर्विवाह आणि घटस्फोट यांचे समर्थक आणि जातिभेद आणि अस्पृश्यता यांचे विरोधक होते. इतकेच नाही तर थेटसमाजवादी वाटावी अशी भाषा ते बोलत होते. ‘सर्वांचे राहणे एकत्र असावे, सर्वांचे जेवण एकत्र रांधले जावे, प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे काम करावे’ असा त्यांचा सुधारणावादी विचार असला तरी त्यांनी शास्त्राधार सोडला नव्हता. ‘वेदोक्त धर्मप्रकाश’ त्यांना हवा होता.
आगरकरांचे ज्येष्ठ समकालीन न्या.मू. रानडे आगरकरांप्रमाणे कायद्याच्या पक्षाचे होते. बालविवाह आणि असंमत वैधव्य ही कायद्याने बंद झाली पाहिजेत या मताचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या दहा आजीव सदस्यांमध्ये एकटे आगरकर, आणि बाहेर न्या. मू. रानडे असे दोघेच होते. वामनराव आपटे देखील त्यांच्यासोबत नव्हते. रानडे सुधारक खरे, पण त्यांना धर्माभिमान सोडवत नव्हता. डेक्कन कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या १८८५ च्या संमेलनात रानडे विरुद्ध टिळक-आगरकर असे जे वाग्युद्ध झाले त्याचा वृत्तान्त य. दि. फडके देतात (६६). “आमच्या दुर्दैवामुळे स्पेन्सर व मिल्ल प्रभृती तत्त्ववेत्त्यांची पुस्तकें आमच्या येथील अप्रबुद्ध तरुणांच्या हातीं पडून ती बिघडत चालली आहेत. धर्मबंधाची आवश्यकता नाहीं हे बोलणे शाळेतील किंवा कॉलेजांतील विद्यार्थ्यांपुढे खपते. कॉलेजांच्या आणि शाळांच्या द्वाराबाहेर अशा प्रकारची बडबड करणारास दगडांचा मारच खावा लागेल. मनुष्याने धर्म सोडला की तो पशू झालाच म्हणून समजावे. स्पेन्सरभक्तांनीं, मिल्लभक्तांनीं व सेल्बीभक्तांनीं डेक्कन कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्युसन कॉलेज हीं अगदी बिघडून टाकली आहेत. मिल्ल-स्पेन्सर वगैरे ग्रंथकारांचे विचार हिंदु समाजाला लागू पडतील अशी ज्यांची कल्पना असेल त्यांनी खुशाल सहाराच्या वाळवंटांत जावे आणि वरील ग्रंथकारांच्या मतांचा उदोउदो करावा.’
एरवी शांत आणि गंभीरवृत्तीचे रानडे किती भडकले होते हे या उतार्या वरून फडके दाखवतात. या वादात आगरकर म्हणाले होते, ‘धर्माच्या नावानं माणसाचं सामर्थ्य वाया जातं. धर्म हे संस्कृतीचं आवश्यक अंग नाही. धर्माला फाटा देऊनही संस्कृतीची भरभराट होऊ शकते.’ हे सांगून फडके लिहितात, ‘गोपाळरावांचा विचार योग्य असल्याचंबळवंतराव (टिळक) सांगत असलेले पाहून गोपाळरावांसकट सर्वांनाच आश्चर्य वाटलं’ (६६).
४. सेल्बी – डेक्कन कॉलेजचे प्राचार्य.
आता फडके सांगतात त्या अर्थी टिळक तसे बोलले असावेत यात शंका नको. फडक्यांनी ललितशैलीचा अवलंब केला असला तरी लिहिलेला वृत्तान्त खराच असला पाहिजे. पण वाचकाला शंका वाटते की टिळक असे कसे बोलले?काहीतरी खुलासा पुढे असेल. पण नाव नाही! ‘रानड्यांची टर उडवणारा’ अग्रलेख ९ जून १८८५ च्या केसरीत झळकला. त्याचे शीर्षक होते : आनरेबल रा. ब. रानडे बाटले’ (६७). या वाक्यांनी फडके हे प्रकरण संपवतात. टिळकांचे बोलणे हा गनिमी कावा होता की काय असा प्रश्न आपल्याला पडला तरी फडक्यांना पडत नाही. असता तर त्यांनी तो छेडला असता. उत्तर माहीत नसेल तर निदान स्वतःलाही आश्चर्य वाटते, असे ते म्हणू शकले असते; पण नाव नाही!
“विचारांची आयात हवी तेव्हां करता येते, पण समाजाचे पूर्वसंस्कार आणि त्या त्या काळाची गरज यांचे भान राखल्याखेरीज ते (नवे विचार) जनमानसांत रुजवतां येत नाहींत’ असे परंपराभिमानी रानड्यांना वाटत होते. धर्मनिरपेक्ष नीतीची कल्पना त्यांना फसवी, रूक्ष आणि हानिकारक वाटे. उपयुक्तता किंवा पुष्कळांचे पुष्कळ सुख या तत्त्वाला त्यांचा विरोध होता. व्यक्तिसुखापेक्षां व्यक्तिप्रतिष्ठा, व्यक्तीचा विकास हे उच्चतर मूल्य तेमानत.”
रानडे सुधारणापक्षाचे अध्वर्यु होते. तेव्हा आगरकर त्यांचा प्रतिवाद कसा करीत असतील, आपल्या उपयुक्ततावादी, विवेकवादी तत्त्वज्ञानाचे मंडन जोरकस शैलीत करून त्यांना निरुत्तर करीत किंवा कसे या प्रकारचे प्रश्न वाचकाला पडत असतील तर पडोत. फडक्यांना ते पडले नाहीत. मग त्याचे उत्तर ते देणार तरी कसे?
शास्त्रसंमतीची अपेक्षा धरणारे विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि तिच्यापुढे माघार घेणारे बाळशास्त्री आगरकरांच्या पसंतीला न उतरणे शक्य होते. आगरकर चिपळूणकरांच्या निबंधमालेतील ओजस्वी भाषेवर पोसलेले देशभक्त होते.‘क्रियाशून्य रावबहादुरे आणि खोडसाळ रेव्हरंडे’ यांबद्दल विष्णुशास्त्र्यांइतकाच त्यांनाही तिटकारा होता.’६ असेलही, त्यामुळे त्यांना लोकहितवादींची क्रियाहीन सत्त्वशून्यता भावली नसेल.
लोकांत नवीन विचारांचा प्रसार ज्याला करायचा असतो त्याला जुन्या विचारांचाविध्वंस केल्याशिवाय गत्यंतरच नसते, या जाणिवेने न्या. मू. रानडे यांचा मवाळपणाखपत नसेल.
५. गं. बा. सरदार : रानडेप्रणीत सामाजिक सुधारणेची मीमांसा, पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९७३, पृ., ६९
६. ग. त्र्यं. माडखोलकर : विष्णु कृष्ण चिपळूणकर, प्रका: रा. ज. देशमुख आणि कंपनी, १९५७,
असे विचार आपल्या मनात येतात. असेही वाटते की, आपल्या मतांचा पुरस्कार जर त्यांनी सौम्य भाषेत केला असतातर लोकांच्या विचारांना नवीन वळण लावण्याच्या कार्यात त्यांना कितीसे यश आले असते?’७ असे शास्त्रीबुवांबद्दल म्हणतात ते आगरकरांना पुरेपर लागू पडते.
शास्त्रीबुवांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘खरा लोककल्याणेच्छु व देशाभिमानी पुरुष म्ह्टला म्हणजे त्याचे ठायीं पराकोटीची निःस्पृहता वागत असली पाहिजे. तो वचनाचा धड असला पाहिजे … जीवितसंशयाचा जरी प्रसंग येऊन ठेपला तरी त्याने डगमगतां उपयोगी नाहीं.”
आगरकरांचे पूर्वसूरी काय किंवा समकालीन समानधर्मे काय, एक विष्णुबुवा ब्रह्मचारी सोडले तर कोणीच सुधारक या कसोट्यांना उतरत नव्हते. विष्णुबुवा निःस्पृह
आणि धैर्यशील असले तरी शास्त्रसंमतीच्या खोड्यात अडकलेले होते. एकटे आगरकर प्रखर विवेकवादी भूमिकेतून सुधारणावाद सांगत होते आणि त्याची पुरेपूर किंमत ते तपाचरणाने मोजत होते. आगरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे असाधारणत्व आणि कर्तृत्वाचे लोकोत्तरत्व फडक्यांच्या आगरकर चरित्रात सप्रमाण पाहायला मिळेल ही माझी अपेक्षा अपुरीच राहिली.
** *
आगरकर हे कुटुंबसुधारक जास्त आणि समाजसुधारक कमी होते असा एक आक्षेपपुरोगामी सत्यसंशोधकांकडून होतो. आणि तेही ब्राह्मणी कुटुंबसुधारक. फडकेकृत चरित्रात या आरोपातील तथ्यांची शहानिशा नाही. परंतु त्यात काय नाही हे पाहण्यापेक्षा काय आहे हे पाहावे व त्याचे मर्म ओळखावे असे म्हणता येईल. ते मान्य करून हे कबूल केले पाहिजे की फडके यांनी प्रदीर्घ परिश्रम करून अगणित तपशील गोळा केले आहेत. त्यांतून आगरकरांचे कोणते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते आता पाहू.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.