विवेकवादाविषयी पुन्हा थोडेसे

‘विवेक’ हा शब्द मराठीत आणि संस्कृतमध्ये ‘reason’ याच्या अर्थाहून काहीशा वेगळ्या अर्थाने रूढ आहे. उदा. ज्ञानेश्वरांनी गीतेच्या विषयाचे वर्णन ‘विवेकाची गोठी’, म्हणजे विवेकाची गोष्ट असे केले आहे. परंतु आपण तो शब्द reason या अर्थी वापरीत आहोत, कारण ‘rationalism’ या शब्दाला पर्याय म्हणून आगरकरांनी ‘विवेकवाद’ हा शब्द वापरला आणि आपण त्यांचे अनुसरण करीत आहोत. आता खुद्द इंग्रजीत ‘rationalism’ हा शब्द निदान दोन अर्थांनी रूढ आहे, आणि त्यापैकी एकच आपल्याला अभिप्रेत आहे. म्हणून ‘rationalism’ या शब्दाच्या कोणत्या अर्थी ‘विवेकवाद’ हा शब्द अभिप्रेत आहे असा प्रश्न पडतो. त्याचा उलगडा करून या विषयासंबंधी आणखी थोडे विवेचन करणे हा प्रस्तुत लेखाचा उद्देश आहे.
‘Rationalism’ हा शब्द लॅटिन भाषेतील ‘ratio’ या reason या अर्थाच्या शब्दावरून बनला
आहे. तोही अनेक अर्थानी वापरला गेला आहे. ते काय आहेत ते प्रथम थोडक्यात पाहू.
‘Reason’ चा अर्थ स्पष्ट करण्याचा एक सुलभ उपाय म्हणजे reason च्या विरुद्ध कोणत्या गोष्टी आहेत असे समजले गेले आहे ते पाहणे.
१. Reason’ च्या एका अर्थी तिचा विरोध sense ला, म्हणजे इंद्रियांना किंवा ज्ञानेंद्रियांना मानला गेला आहे. हा विरोध प्लेटोइतका म्हणजे इ. स. पू. चौथे शतक इतका जुना आहे. त्याचे पुनरुज्जीवन युरोपमध्ये जेव्हा सतराव्या शतकात अर्वाचीन तत्त्वज्ञानाचा आरंभ झाला तेव्हा झाले. प्लेटोच्या मते मनुष्याला ज्ञान देणारी साधने दोन आहेत, एक reason आणि दुसरे sense, किंवा ज्ञानेंद्रिये. परंतु त्यांच्या साह्याने होणार्याए ज्ञानात फरक असतो. इंद्रियांनी आपल्याला व्यक्तींचे म्हणजे एकेकट्या वस्तूंचे ज्ञान होते. उदा. हा मनुष्य, ती गाय, किंवा ते मांजर,परंतु reason ने आपल्याला जातीचे किंवा प्रकाराचे ज्ञान होते, उदा. मनुष्यत्व किंवा गोत्व, म्हणजे मनुष्य किंवा गाय ह्या प्रकारांचे. मनुष्यत्व म्हणजे प्रत्येक मनुष्यात हजर असणारे मनुष्य या प्रकाराचे सार किंवा तत्त्व, ज्यामुळे एखाद्या वस्तूला मनुष्यत्व प्राप्त होते ते. कोणत्याही वस्तुप्रकारात किंवा जातीत असंख्य व्यक्ती असतात. त्या सर्व परस्परांशी समान असतात, तशाच त्या सर्व परस्परांहून भिन्नही असतात. उदा. मानवी व्यक्तींमधून प्रत्येकीचे वैशिष्ट्य वजा केल्यास जे उरते ते मनुष्यत्व. त्याला सामान्य (universal) म्हणतात. व्यक्तींचे ज्ञान इंद्रियांना होते, आणि कोणत्याही प्रकारच्या व्यक्तींतून त्यांची जाति ओळखणे आणि सामान्य कल्पना तयार करणे हे reason चे काम. आता प्लेटोचे मत असेहोते की reason ला होणारे ज्ञान खरे, अस्सल ज्ञान; आणि इंद्रियांना होणारे ज्ञान म्हणजे छायांचे किंवा अवमासांचे (appearances) ज्ञान. व्यक्ती या सामान्यांच्या छाया होत. सामान्ये स्थलकालातीत आहेत, तर व्यक्ती या स्थलकालात आढळणाच्या त्यांच्या छाया आहेत. या मताचा सतराव्या शतकात अनुवाद करण्यात आला. वस्तूंचे इद्रियगम्य स्वरूप, म्हणजे त्यांचे शब्दस्पर्शादि गुण, भासमान आहेत, आणि त्यांचे प्रज्ञेला प्रतीत होणारे गुणच तेवढे खरे असे देकार्तने प्रतिपादले. उदा. वस्तूंचे डोळ्यांना दिसणारे आकारादि गुण reason ला जसे कळतात तसे डोळ्यांना कळत नाहीत; भूमितिशास्त्रज्ञ reasonच्या साह्याने ते बारकाईने आणि नेमकेपणाने निश्चित करतो. त्रिकोणाच्या कोनांची बेरीज नेमकी दोन काटकोन असते हे इंद्रियांनी कळू शकत नाही; पण यूक्लिडने ते सिद्ध केले आहे, म्हणजे reason ने निश्चित केले आहे.
या अर्थी ‘reason’ ला ‘प्रज्ञा’ हा शब्द पर्याय म्हणून वापरावा असे मी सुचवितो. म्हणजे या ‘rationalism’ ला प्रज्ञावाद म्हणता येईल.
परंतु आपल्याला अभिप्रेत rationalism हा नव्हे.
२. Reason चा दुसरा विरोध श्रद्धेला आहे. श्रद्धा म्हणजे दृढविश्वास, जे सत्य असण्याचा कसलाही पुरावा नाही त्यावर अढळ विश्वास. श्रद्धावादी टेनिसन कवीप्रमाणे म्हणतात की आपल्याला जे सिद्ध करता येत नाही त्यावर आम्ही विश्वास ठेवतोः ‘Believing what we cannot prove’. हे म्हणणे उघड उघड विपर्यस्त दिसते; पण ते अगदी निःसंकोचपणे सत्य म्हणून प्रतिपादले जाते. जे सिद्ध करता येते त्यावर विश्वास ठेवा हे म्हणणे शहाणपणाचे आहे; पण जे सिद्ध करता येत नाही त्यावर आम्ही विश्वास ठेवतो याचा अर्थ काय?अमुक वचनावर विश्वास ठेवा याचा अर्थ ते खरे माना याहून अन्य काय असू शकेल?पण जे सिद्ध करता येत नाही त्यावर आम्ही विश्वास ठेवतो म्हणणे म्हणजे जे सत्य असण्याचा काडीचाही पुरावा नाही ते आम्ही खरे मानतो असे म्हणणे आहे. असे म्हणणे बुद्धीची, समंजसपणाची, शहाणपणाची रजा घेणे झाले. खरे म्हणजे ज्याला काही पुरावा नाही त्यावर विश्वास ठेवू नका हे म्हणणे समंजसपणाचे, सयुक्तिक आहे. पण लोक बिनदिक्कत म्हणतात की ‘आमची अशी श्रद्धा आहे. त्यांना वाटते की श्रद्धा ही गोष्ट विवेकाच्या बंधनातून मुक्त आहे. श्रद्धा म्हटली की कोणत्याही विश्वासाचे समर्थन होते असे ते मानतात. पण ही गोष्ट पूर्ण चुकीची आहे. ज्या रीतीने लुच्चे लोक भाबड्या लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेतात त्यावरून हे सिद्ध होते.
श्रद्धेचा धिक्कार करणारी असे reason चे स्वरूप आहे. या reason चा पुरस्कार अठराव्या शतकात फ्रेंच विश्वकोशकार म्हणून जो तत्त्वज्ञांचा गट फ्रेंच राज्यक्रांतीपूर्वी होऊन गेला त्याने केला. आपल्याला अभिप्रेत असलेला rationalism हा आहे. विज्ञानाचा उदय झाल्यावर युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचे जोखड फेकून देऊन मानवबुद्धी मुक्त झाली तिचा तो आविष्कार आहे. आगरकरांना अभिप्रेत विवेकवाद हा होता. त्याचे स्वरूप संक्षेपाने असे आहे.
विज्ञानाला अभिप्रेत reason इंद्रियानुभवावर आधारलेली असते. Reason चे काम एकाशब्दात ‘तर्क’ असे सांगता येईल. त्यात अनुमाने करणे, उपन्यास (hypothesis) कल्पून त्यांचे परीक्षण करणे आणि ते सत्य किंवा असत्य आहेत याचा निश्चय करणे, इत्यादि क्रियांचा अंतर्भाव होते. पण कुठल्याही अतर्कित साधकाशिवाय (premise) तर्क एक पाऊलही पुढे टाकू शकत नाही. हा अतर्कित आधार इंद्रियांनी पुरविलेला असतो. विज्ञानाच्या उपपत्ती प्रत्यक्ष अनुभवापासून कितीही दूर गेल्या असे वाटले तरी त्यांची सत्यासत्यता इंद्रियानुभवानेच ठरावी लागते. तो इंद्रियानुभव वैज्ञानिक उपकरणातील आकडे (readings), पाण्याची उंची, सूचिकांचे स्थान इत्यादीच असला तरी तो इंद्रियांनीच तपासावा लागतो. याप्रमाणे पहिल्या rationalism प्रमाणे इंद्रियांना तुच्छ न मानता त्यांना अंतिम निकष म्हणून स्वीकारणे आणि त्यांना उपकरणांची जोड देऊन त्यांची ताकद सहस्रावधि पटींनी वाढविणे आणि त्यावर तर्क आधारणे असे वैज्ञानिक तर्काचे स्वरूप आहे.
वैज्ञानिक reason चा विरोध श्रद्धेला असतो हे आपण वर पाहिले. श्रद्धा म्हणजे पुराव्यावाचून ठेवलेला विश्वास. पुराव्याचे सामर्थ्य जोखणे हे काम विवेकाला करावे लागते. त्याविषयी दोन शब्द.
एखाद्या विधानाला असलेला पुरावा पुरेसा किंवा निर्णायक असू शकेल, तो अपुरा असेल, किंवा मुळीच नसेल. विवेकवादाचे म्हणणे असे आहे की कोणत्याही विधानाचा स्वीकार त्याला असलेल्या पुराव्याच्या प्रमाणात करावा. पुरावा विधान सिद्ध करण्यास पुरेसा असेल तर त्याचा पूर्ण स्वीकार करावा, अपुरा असेल तर त्या प्रमाणात, म्हणजे साशंकपणे स्वीकार करावा, आणि मुळीच नसेल तर मुळीच करू नये. पुरावा यांपैकी कोणत्या प्रकारचा आहे याचा निर्णय विवेकाला करावा लागतो. तर्कशास्त्रात अनुमानांचे दोन प्रकार मानले आहेत, demonstrative किंवा सिद्धिक्षम आणि non-demonstrative किंवा सिद्धयक्षम (सिद्धि+अक्षम). सिद्धिक्षम किंवा सिद्धिसाधक अनुमानात पुरावा निर्णायक असतो. परंतु सिद्धयक्षम अनुमानात तो थोडाबहुत अपुरा असतो. म्हणून ज्या विधानाचे समर्थन सिद्धिसाधक अनुमानाने होत असेल तर ते पूर्ण समजावे, परंतु ज्याचे समर्थन सिद्धयक्षम अनुमानाने होत असेल ते कमीअधिक संभाव्य (probable) समजावे, असे म्हणतात. उदा.‘त्या पर्वतावर अग्नि असला पाहिजे, कारण त्यावर धूर आहे, आणि जिथे धूर तिथे अग्नि’, हे अनुमान पूर्ण निर्णायक आहे. त्याची साधके (premises), म्हणजे ‘पर्वतावर धूर आहे’ आणि जिथे धूर तिथे अग्नि’ ही, खरी असतील तर त्याचा निष्कर्ष असत्य असू शकत नाही, म्हणजे निष्कर्ष सिद्ध करण्यास साधके पूर्ण समर्थ आहेत. पण पुढील अनुमानात पुरावा पुरेसा नाही: ‘आपल्या उत्पन्नगटात माणसे सरासरी ६० वर्षे जगतात. म्हणून तूही साठ वर्षे जगशील’ हे अनुमान निर्णायक नाही, कारण त्यातील साधके खरी असूनही निष्कर्ष असत्य असू शकतो. म्हणून त्याचा निष्कर्ष विश्वास ठेवण्यास पूर्ण पात्र नाही. त्याचा स्वीकार निःशंकपणे नव्हे, भीत भीतच करावा. संभाव्यतेच्या अनेक मात्रा असू शकतील, ०% पासून १००% पर्यंत. त्या संभाव्यतेनुसार आपली संमती देणे विवेकी आहे.
३. Reason चा विरोध feeling किंवा भावना यांना आहे असे अनेकदा म्हटले जाते.विवेकवादी जीवन हे पूर्णपणे शुष्क, नीरस असणार असे विवेकवादाचे विरोधक म्हणतात. पण हा गैरसमज आहे. मानवी जीवनात भावनांचे महत्त्व फार आहे हे reason नाकारीत नाही. ती फक्त एवढेच म्हणते की भावना हे आचार-विचारांचे नियामक तत्त्व होऊ शकत नाही. विवेक आणि भावना यांचा संबंध शासक आणि शासित असा आहे. भावना हे विवेकाच्या बरोबरीचे नियामक तत्त्व नाही. भावनांना आपल्या जीवनाचे स्वामित्व देणे अनर्थावह होते. भावनेने बेभान होऊन वागणे किंचित्काल सुखावह झाले तरी दीर्घकाल अनर्थाला कारणीभूत होते. क्रोध, भय, प्रेम इत्यादि भावनांना आवरणारी शक्ती म्हणजे विवेक. केव्हा कोणत्या भावनेला वाव द्यायचा ह्याचा विवेक करावा लागतो, नाहीतर पुढे पश्चाताप करण्याची पाळी येते हा नित्याचा अनुभव आहे. तेव्हा विवेकाचा भावनांना विरोधआहे हे म्हणणे चूक आहे. विरोध आहे तो भावनांना जीवनाचे नियामक तत्त्व मानण्याला.
४. `Rational’ चा जवळपास समानार्थी, पण काहीसा सौम्य शब्द म्हणजे ‘reasonable’.त्याला मराठीत समंजस हा शब्द आहे. अनेक ठिकाणी जिथे ‘rational’ हा शब्द आपण वापरणार नाही, तिथे ‘reasonable’ हा शब्द वापरणे आपण योग्य समजतो. उदा. नैतिक अवधारणे (judgements) विधींच्या स्वरूपाची असल्यामुळे त्यांना सत्य किवा असत्य ही विशेषणे आपण लावू शकत नाही; विधींच्या बाबतीत पुरावा काय आहे हा प्रश्न निरर्थक आहे. पण ‘समंजस’-‘असमंजस ही विशेषणे आपण त्यांना लावू शकतो असे म्हणता येईल. नीतिशास्त्रातील एखादे मते खरे की खोटे याला उत्तर नाही, पण ते समंजस किंवा असमंजस असू शकेल. उदा. ‘प्रत्येक मनुष्याला सुख हवे असते, म्हणून जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त सुख ज्याने होईल असे कर्म आपण करावे’ हे म्हणणे समंजस आहे असे म्हणता येईल; किंवा कोणाही मनुष्याला बंधने आवडत नाहीत, म्हणून बंधने जितकी कमी करता येतील तितकी करावीत हे इष्ट आहे’ असे म्हणणे समंजस आहे असे आपण सामान्यपणे म्हणू.
विवेकवादानुसार समंजस आचरणही विवेकी आहे असे म्हणता येईल.