सोवियत यूनियनमधील धर्मस्वातंत्र्य (प्रा. सत्यरंजन साठे यांचे पूर्वग्रहदूषित विधान)

जुलै-ऑगस्ट १९९६ च्या आजचा सुधारकच्या अंकात प्रा. सत्यरंजन साठे यांचा ‘धर्मनिरपेक्षता आणि सर्वोच्च न्यायालय’ असे शीर्षक असलेला एक चांगला लेख प्रसिद्ध झाला
आहे. परंतु त्यामध्ये रशियामध्ये व्यक्तीला धर्माबाबतचे स्वातंत्र्यचनाकारले गेले’, असे एक विधान पान १४२ वर करण्यात आले आहे. उजव्या विचारसरणीच्या नियतकालिकांमधून अथवा ग्रंथांमधून करण्यात आलेला पूर्वग्रहदूषित अपप्रचार जर बाजूला ठेवला तर काय आढळते?
(१)१९८८ सालच्या आकडेवारीनुसार खालील विविध धर्म व धर्मपंथीयांची मिळून वीस हजार प्रार्थना अथवा उपासना मंदिरे सो. यूनियनमध्ये अस्तित्वात होती : रशियन ऑर्थोडॉक्स, रोमन कॅथलिक, लुथेरन, ओल्ड बिलीव्हर्स, बॅप्टिस्टस्, सेव्हन्थ डे अॅडव्हेन्टिस्टस्, मोलोकन्स, सिनेगॉगस्, मशिदी, बौद्ध देवालये.
(२)वरीलपैकी रशियन ऑर्थोडॉक्स चर्च हा पंथ सर्वात अधिक सनातनी. परंतु या पंथाचे सुद्धा १६०० विद्यार्थी त्या वर्षी अस्तित्वात होते. तसेच या पंथाचे आध्यात्मिक दर्शन घडविणारी मासिके व वार्षिकही पूर्वीपासून अस्तित्वात होती. इतर धर्मपंथीयांना हेच स्वातंत्र्य उपलब्ध होते. धर्माच्या नावाखाली अघोरी अनाचार व आर्थिक शोषण करण्याला मात्र बंदी होती.
(३) लिथुएनिया या परगण्यातील एका शहरात चर्चमधील घंटानादाने गोंगाट होतो ही सबब पुढे करून तेथील स्थानिक सत्ताधार्यांीनी या घंटानादावर बंदी घातली. दुसर्याव एका जिल्ह्यात एका रुग्णालयात मृत्युशय्येवर असलेल्या एका रुग्णाला आपल्या धर्मगुरूला (प्रीस्टला) बोलावून ख्रिश्चन परंपरेनुसार (पापक्षालनासाठी) अखेरचा कबुलीजबाब (कन्फेशन्) देण्याची इच्छा होती. रुग्णालयाच्या अधिकार्यांतनी याला हरकत घेतली. ही दोनही प्रकरणे न्यायालयात दाखल झाली तेव्हा भाविकांना घंटानादाचा अधिकार बहाल करण्यात आला. तसेच ‘कबुलीजबाब’ देण्याचा आणि तो स्वीकारण्याचा अधिकार मान्य करण्यात आला, आणि धर्माचरणाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाच्या अधिकार्यांतना नियमानुसार शिक्षा देण्यात आली.
(४)कोणाही व्यक्तीस स्वतःच्या गुणवत्तेनुसार उच्च पदावर पोहोचण्याकरिता त्याचे धर्माचरण आड येत नसे. एकच उदाहरण घ्यावयाचे झाले तर व्हॅलेन्टिन्व्हॉयनो यासेनेट्स्की (१८७७-१९६१) याचे घेता येईल. हा एक सो. यूनियनमधील नामवंत सर्जन होता. एका मोठ्या रुग्णालयाचा तो सर्वश्रेष्ठ अधिकारी होता आणि त्याच्या कर्तबगारीबद्दल त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते. परंतु स्वदेशातील क्रीमिया या प्रदेशाचा आर्चबिशप या नात्याने धर्माचरण करण्याचे त्याचे स्वातंत्र्य अबाधित राहिले होते.
(५) आपापल्या धर्मपंथानुसार उपक्रम-उत्सव करण्याकरिता, तसेच प्रार्थना-मंदिरांचा खर्च चालविण्याकरिता, धर्मानुयायांकडून देणग्या गोळा करण्याचे स्वातंत्र्य त्या त्या धर्मपीठांना होते एवढेच नव्हे तर या देणगीरूपाने जमा करण्यात आलेल्या रकमांवर सोवियत सरकार कर बसवीत नसे.
(६)विवाहबद्ध होण्याकरिता युवक-युवतींना नियोजित खात्याकडे अर्ज करून विवाहाची नोंदणी करावी लागत असे, आणि हे नोंदणी केलेले विवाहच कायदेशीर मानले जात असत. परंतु या विवाहांना धार्मिक अधिष्ठान मिळविण्याकरिता चर्चमध्ये जाऊन धर्मगुरूच्या साक्षीने विवाहबद्धहोण्याची मुभा होती. दर वर्षी फार मोठ्या संख्येने (काही वर्षी तर बहुसंख्य) विवाह चर्चमध्ये जाऊन नोंदविले जात असत. व्यक्तिगत पातळीवर धर्माचरणाचे स्वातंत्र्य असल्याखेरीज हे घडणे शक्यआहे काय?
(७)ज्यू धर्मपरंपरेप्रमाणे प्रार्थना मंदिरामध्ये (सिनॅगॉगमध्ये) स्त्री व पुरुषांना एकाच ठिकाणी एकत्रितपणे प्रार्थना करण्यास अथवा प्रवचन ऐकण्यास मज्जाव आहे. भेदभाव सुस्पष्टपणे व्यक्त करणारे वेगळे स्थान स्त्रियांसाठी राखून ठेवलेले असते. विषमताधिष्ठित स्त्री-पुरुष भेद सार्वजनिक जीवनातून निपटून काढण्याकरिता व स्त्रियांचे विशिष्ट स्थान लक्षात घेऊन, त्यांना काही रास्त सोयी व सुविधा पुरविण्याकरिता सो. यूनियनमध्ये कायदे करण्यात आले व प्रथा पाडण्यात आल्या. त्यामुळेच देशातील एकूण शास्त्रज्ञापैकी ४० टक्के, एकूण औद्योगिक तंत्रज्ञापैकी (इंडस्ट्रिअल इंजिनिअर्सपैकी) ५० टक्केआणि शिक्षक व डॉक्टर्सपैकी बहुसंख्य या स्त्रिया होत्या हे लक्षात घेण्यासारखे आहे. परंतु सिनॅगॉगमध्ये असणारा भेदभाव कायद्याने रद्द करण्यात आला नाही. तो धर्मांतर्गत सुधारणा घडवूनआणण्याचा धर्मानुयायांचा प्रश्न मानण्यात आला.
(८) विश्वशांतीचा पुरस्कार व त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे हे धर्माचे एक उज्ज्वल ध्येय मानण्यात येते. आंतरराष्ट्रीय पातळीवरील धर्मपरिषदांच्यावतीने जागतिक शांतता या ध्येयाचा प्रसार करण्यासाठी, अणुशक्तीचा विध्वंसक उपयोग करण्याला विरोध करण्यासाठी सो. यूनियनच्या प्रशासनाने धर्मपरिषदांच्या कार्याला भरघोस उत्तेजन दिले. या ध्येयासाठी आवश्यक ते राजकीय पातळीवरील प्रयत्न वेगळ्या व्यासपीठांवर चालू ठेवण्यात आले.
(९) दुसर्याच महायुद्धाच्या काळात हरएक कुटुंबाला रोज आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या अथवा स्नेह्यांच्या मृत्यूच्या, जबर जखमी झाल्याच्या, अथवा बेपत्ता झाल्याच्या बातम्या ऐकाव्या लागत असत. दु:खाने विव्हळ झालेल्या मनांना ईश्वरावरील श्रद्धेने दिलासा मिळत असे. जनतेच्या पराक्रमाने शत्रूचे निर्दालन होईल आणि परमेश्वर- कृपेने चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन, असे दारुण दुःख आपल्या वाट्याला पुन्हा कधी येणार नाही अशी आशा अनेकांना वाटत असे. प्रार्थना मंदिरात जाऊन ईश्वराची प्रार्थना करण्याची ओढ हजारो लोकांच्या मनांत उत्पन्न झाली. जडवाद व निरीश्वरवादावर कणखर निष्ठा असणान्या स्टॅलिनने, लोकांची मानसिक स्थिती लक्षात घेऊन, अनेक नवीन चर्चेस बांधण्यास त्या कालखंडांत अनुकूलता दाखविली.
वस्तुस्थितीचे दर्शन घडविणारी वरील सर्व उदाहरणे सो. यूनियनमध्ये व्यक्तीला धर्मस्वातंत्र्य नव्हते या विधानाला पोषक ठरत नाहीत. सो. यूनियनमधील क्रांतीचा आणि त्यानंतरच्या कालखंडाचा अनेक लेखकांनी लिहिलेला इतिहास थोडा काळजीपूर्वक वाचला तर त्या देशातील धर्मासंबंधीची भूमिका अधिक सम्यक्पणे समजू शकेल.
१९१७ ते सुमारे १९२५ पर्यंतचा कालखंड हा सो. यूनियनमध्ये घडलेल्या क्रांतीचा आणि त्यानंतर हातात घेण्यात आलेल्या आर्थिक पुनर्रचनेच्या प्रारंभाचा कालखंड होता. समाजसत्तावादीसमाजरचनेचे ध्येय उद्घोषित करणार्या क्रांतीला, आणि तदनंतरच्या आर्थिक पुनर्रचनेच्या कार्यक्रमाला, रशियन ऑर्थोडॉक्स चर्च व इस्लामधर्मीय मौलवी यांनी कसून विरोध केला होता. सरंजामशाहीवर आघात करण्याकरिता क्रांतीनंतर स्थापन झालेल्या सरकारने अनेक सरंजामदारांच्या खासगी जमिनी जशा जप्त केल्या तशाच वरील धर्मसंस्थांच्या व त्यांच्या पदाधिकार्यांरच्या जमिनीही जप्त केल्या. त्यामुळे वरील धर्माच्या पदाधिकार्यांवनी धर्माच्या नव्हे तर आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्याकरिता क्रांतीला केवळ विरोध केला नाही, तर प्रतिक्रांतिकारकांशी संगनमत करून सो. क्रांतीचा पराभव करण्यासाठी करण्यात आलेल्या कारवायांमध्येही सक्रिय भाग घेतला.
धर्ममार्तण्डांच्या कुटिल कारस्थानांना प्रतिक्रिया म्हणून काही क्रांतिकारकांच्या मनात धर्मविरोधी तीव्र भावना निर्माण झाली आणि त्या झपाटलेल्या मनस्थितीत काही धर्ममंदिरे जमीनदोस्त केली गेली आणि काही धर्मगुरूंचा निःपात करण्यात आला. प्रतिक्रांतिकारकांचा पाडाव करण्यात क्रांतिकारकांना यश आले आहे हे दिसल्यानंतर वर्चस्व स्थापन करण्याची आपली स्वप्ने इतिहासजमा झाली आहेत हे अनेक धर्मगुरूंच्या लक्षात आले आणि त्यानंतर सोवियत सरकारच्या प्रगतिकारक धोरणांना विरोध करण्याचा आडमुठेपणा त्यांनी सोडून दिला. त्याबरोबर स्थिरावलेल्या सोवियत शासनाने धर्मविरोधाचे धोरण ठेवले नाही. लोकांच्या जीवनातील असुरक्षितता जसजशी विलयाला जाईल तसतशी धर्माचा आधार घेण्याची गरज लोकांना भासणार नाही या तात्त्विक सिद्धांताचे भान अधिक जाणीवपूर्वक ठेवण्यात येऊ लागले. परंतु त्याचबरोबर लोकांच्यात नव्या जाणिवा निर्माण करण्याचीही (प्रबोधनाची) गरज होती. ती जबाबदारी क्रांतीनंतर प्रभावी झालेल्या कम्युनिस्ट पक्षावर सोपविण्यात आली.
कम्युनिस्ट पक्षाने वैज्ञानिक दृष्टी रुजविण्याची, जडवादाची आणि निरीश्वरवादाची वैचारिक मोहीम धूमधडाक्याने सुरू केली. धर्मसंस्थांची दुष्कृत्ये लोकांसमोर मांडली. धर्माच्या नावाखाली होणारी अघोरी कृत्ये बंद पाडली. मुसलमान समाजातील स्त्रियांना शिक्षण घेण्यास आणि चेहर्याावरील बुरखा काढण्यास प्रवृत्त करून, धर्माधिष्ठित अन्यायावर निर्भीडपणे प्रहार करण्यात आले. या सबंध प्रक्रियेत अधून-मधून अतिरेकही झाले. विचार-मोहिमेला कित्येकदा उथळ प्रचाराचे स्वरूपही आले. या झंझावाती जन-जागरणांतून लोकांच्या मनातील धर्मभावना क्षीण झाली. असे असूनही सान्या समाजाच्या मनांतून धर्मभावना पार विरून गेली असे झाले नाही.
संकटाच्या वेळी धर्माची (ईश्वराची) आठवण अद्यापही लोकांना होत असते. गेल्या काही वर्षांत येत्सिनच्या कारकीर्दीत पूर्वीच्या सो. यूनियनचा सर्वांगाने व्हास सुरू झाला आहे. आणि म्हणूनच एका बाजूने गुंडांच्या टोळ्या रस्त्यांत गस्त घालीत आहेत तर दुसर्याव बाजूने या अरिष्टातून नवी वाट काढण्यासाठी अनेक लोक धर्माचा आधार मिळेल अशी आशा बाळगीत आहेत.
सो. यूनियनमध्ये राजकीय हक्कांची अवाजवी, असमर्थनीय आणि म्हणूनच निषेधार्ह गळचेपी झाली हे एक कटु सत्य आहे. परंतु साम्राज्यवादी देशांनी क्रांती दडपून टाकण्यासाठी केलेली कटकारस्थाने व आक्रमणे, लेनिनवर १९१८ साली झालेला प्राणघातक हल्ला, देशातील जमीनदारांनी नियमानुसार सरकारला धान्याची लेव्ही देण्याचे ऐवजी कृत्रिम टंचाई निर्माण करून भाववाढ करण्याकरिता पिकलेल्या धान्याच्या जाळून टाकलेल्या राशीच्या राशी, स्टॅलिनचे आक्रमक व्यक्तिमत्त्व, अशा विविध घटकांचे समालोचन केल्याखेरीज राजकीय हक्कांच्या पायमल्लीचे विवेचन केल्यास, संपूर्ण वास्तवाचे आकलन पुरेशा प्रमाणात होणार नाही. असे विवेचन स्वतंत्रपणे जरूर करता येईल. परंतु धर्मस्वातंत्र्याबाबतच्या धोरणाशी, धर्मसंस्थांच्या अनैतिक कारभारावर घालण्यात आलेल्या बंधनांशी त्याची गल्लत करिता कामा नये.
सारांश सो. यूनियनमध्ये अंमलात आणल्या गेलेल्या धोरणांच्या गुण-दोषांची, यशापयशाची चर्चा सावधानतेने केल्याखेरीज तेथील संपूर्ण प्रक्रियेचे सम्यक् आकलन होणार नाही. विचारवंतांकडून तरी अशा साक्षेपी दृष्टीची अपेक्षा ठेवणे गैर ठरेल काय?

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.