आगरकर : एक आगळे चरित्र (भाग २)

आगरकर ले. य. दि. फडके, मौज प्रकाशन, १९९६. किंमत रु. १७५/
आगरकर उंच होते. अंगकाठी मूळची थोराड व काटक होती(११६)*, डोळे पाणीदार (९). राहणी-वेश पारंपरिक, शेंडी मोठी पण घेरा लहान, (११६). मात्र ते जानवे घालत नसत आणि संध्याही करत नसत (२४२) .त्यांचे किंचित पुढे आलेले दात झुपकेदार मिशांनी झाकले जात (११६). बुद्धी चपळ आणि वृत्ती मनमिळाऊ असलेले (९) गोपाळराव डेक्कन कॉलेजातल्या शिक्षकांना आठवतात ते ‘सर्वांत मोठा विद्यार्थी, धिप्पाड व बलवान’ असे या रूपात (२५२). आगरकरांचे हे चित्र, चरित्रग्रंथात विखुरलेले उल्लेख एकत्र करून जुळवता येते.
या ग्रंथात आगरकरांच्या कौटुम्बिक आणि सार्वजनिक जीवनातील अनेक करुणोदात्त प्रसंग वर्णिले आहेत. या घटनांकडे पाहताना, महापुरुषही शेवटी माणसे असतात हे लेखकाने विसरू नये, ही फडक्यांची भूमिका आहे आणि ती स्तुत्य आहे. मात्र ‘गोपाळरावांचे चरित्रकार प्रायः सुधारणांची री ओढणारे असतात’ हा टिळकांचा आक्षेप ते आनंदाने कबूल करतात.
फडकेकृत चरित्रग्रंथातले काही अल्पप्रसिद्ध प्रसंग जसे वाचनीय आहेत तसेच उद्बोधकही. त्यातले काही असे :
गोपाळरावांचे वडील एक साधेभोळे गृहस्थ होते. पुराणे सांगून ते कशीबशी गुजराण करीत. मुलगा बी. ए. ला गेला, आता त्याचे लग्न उरकलेच पाहिजे, या विचाराने त्यांनी ते ठरवले. मुलीची पसंती झाली. दीडशे रुपये हुंडा मिळणार म्हणून ते खुश होते. तिथि निश्चय केला. कापडचोपड खरेदी झाली, आणि लक्षात आले की पत्रिका पाहायची राहूनच गेली. ती पाहिली तर न जुळती आढळली. ठरलेले लग्न मोडले. चूक लगोलग दुरुस्त करून ज्या दुसर्याी मुलीशी लग्न लावले त्या यशोदाबाई आगरकर. त्यांनी पतीच्या स्वयंस्वीकृत दारिद्रयात आजन्म सोबत केली. पतिनिधनानंतर ४३ वर्षांनी, १९३८ साली, स्त्री मासिकात त्यांनी आठवणी सांगितल्या आहेत. त्या म्हणतात, “होळकरांचा यांच्यावर फार लोभ असे. म्हणून त्यांनी इंदूरला येण्याबद्दल परोपरीने विनविले. नऊशे रुपये पगार देऊ अशी त्यांची एकदा तारही आली होती. नंतर पंधराशे रुपये देऊ केल्याबद्दलचा निरोप घेऊनत्यांचा मेहुणा आला होता’ (१०७). स्वतः आगरकरांनी आपण होळकरांनी देऊ केलेली द. म. ५०० रु. पगाराची नोकरी नाकारली असे, ‘महाराष्ट्रीयांस अनावृत पत्र’ या प्रसिद्ध लेखात म्हटले आहे. तुकारामांनी शिवाजीराजांचा अहेर आणि आमंत्रण अव्हेरले होते त्याची आठवण येण्यासारखी ही घटना! फर्गसन कॉलेजच्या प्राचार्यपदी विराजमान असताना ते कोण ऐश्वर्यात राहात होते हे त्यांच्याच एका पत्रातून कळते. हे पत्र त्यांनी आपल्या मामाला लिहिले आहे. या मामांची विधवा कन्या वेणूताई नामजोशी आगरकरांच्याच आग्रहामुळे पुण्याला पंडिता रमाबाईंच्या शारदासदनात शिकत होती. ते लिहितात, ‘तिचे चांगले चालले आहे. तिने अंथरूण-पांघरूण आणि शाल पाठवून देण्याविषयी तुम्हाला पत्र पाठवले असेलच. मी तिला तात्पुरते दिलेले अंथरूण पाहुणे आले की मला मागवून घ्यावे लागते; आणि माझी बायको घराबाहेर पडते तेव्हा तिला अंगावर तीच शाल घ्यावी लागते. मी काही श्रीमंत माणूस नाही. दोन जादा अंथरुणे, तसेच शालीही माझ्या घरात नाहीत. पण माझ्या गरिबीतच मी समाधानी आहे’ (१८९).
* कंसातील आकडे य. दि. फडकेकृत ‘आगरकर’ चरित्रातील पानांचे.
आपल्या आई-वडिलांना एकदा काशीयात्रा घडवण्याची साधी इच्छाही ते पूर्ण करू शकले नाहीत हे सर्वविदित आहे. आई वारल्यानंतर तीन आठवड्यांनी मामाला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ‘ती गेल्यामुळे माझ्यावर सहज मायेचा वर्षाव करणारा एकुलता एक मित्रच मी गमावलाआहे. फक्त आईचे प्रेम हे सहजस्फूर्त आणि निरपेक्ष असते. दुसर्याा कोणत्याही मित्राच्या किंवा नातेवाईकाच्या स्नेहाला मातेच्या मायेची सर येणे शक्य नाही’ (१३५). शोकप्रदर्शनाच्या पारंपरिक बाह्य उपचारांवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी क्षौर केले नव्हते. पुढे ‘महाराष्ट्रीयांस अनावृत पत्रा’त अति हळवे होत त्यांनी लिहिले, ‘रूढ़ धर्माचारातीलआणि लोकाचारातील व्यंगांचे निर्भयपणे आविष्करण करण्याचे भयंकर पाप हातून घडत असल्यामुळे देशाभिमानी व धर्माभिमानी म्हणविणाच्या पत्रांकडून होत असलेला शिव्यांचा व शापांचा प्रचंड भडिमार ज्याला व ज्याच्या निरपराधी स्त्रीला एकसारखा सोसावा लागत आहे; स्वमताचे मंडन व तदनुसार होईल तेवढे वर्तन करण्यासाठी, आपल्या फार दिवसांच्या मित्रांचाचसा काय, तर रात्रंदिवस काळजी वाहून आणि कडेवर, खांद्यावर खेळवून, ज्यांनी लहानाचे थोर केले अशा अत्यंत ममताळू व पूज्यआप्तांचाही दीर्घ रोष ज्याने आपणावर करून घेतला आहे, अशा मनुष्याच्या लेखात कितीही प्रमाद होत असले व केवढीही कटुता असली तरी ते समंजस मनुष्याच्या स्वल्प आदरास, निदान थोड्याशा अनुकंपेस तरी पात्र झाले पाहिजेत.’२
आणखी एक प्रसंग शेवटचा. आगरकर वारल्यावर पाचसहा दिवसांची गोष्ट. त्यांचा धाकटा भाऊ दामूयाने यशोदाबाईंना व मुलांना भागवत मामांकडे अकोल्याला पोचवले. क्रियाकर्म न आटोपताअसे एकदम काय आलात या मामांच्या पृच्छेवर दामू उत्तरला, “वहिनींना क्रियाकर्म करणे पसंत नाही’. पण हे खरे नव्हते. यशोदाबाईंनी रहस्यभेद केला की, पुण्याहून निघताना ‘नाशकाला उतरून क्रियाकर्म करू’ असे तो म्हणाला होता. पण पदरमोड करणे जिवावर आले म्हणून ही थाप. हा शेवटचाखर्चही त्याला परस्पर मामांकडून व्हायला हवा होता.
वास्तविक या भावाचे शिक्षण आगरकरांनीच केलेले होते. त्याची बुद्धी बेताची म्हणून अनेक प्रयत्नांनी तो मॅट्रिक झाला. नंतर मुंबईस रेल्वेत त्यांना नोकरी लावून दिली होती. तिथली हवा मानवत नाही म्हणून त्याची बदली बाहेर होण्यासाठी त्यांनी खटपट केलेली होती. स्वजनाच्या हितासाठी फकिरी घेतलेल्या एका बुद्धिनिष्ठ सुधारणावाद्याची ही शोकांतिका!
आगरकरांच्या संपादकीय जीवनातील एका स्थित्यंतराकडेही फडक्यांनी आपले लक्ष वेधले आहे, ते मार्मिक आहे. केसरीचे संपादक असताना त्यांचे धोरण चारचौघांना धरून चालण्याचे असे. त्यामुळे त्यांच्या लेखनात सामूहिक मताचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. पंडिता रमाबाईंना उद्देशून, ‘स्त्रीबुद्धिः प्रलयं गतः (४७), (स्त्रियांच्या तंत्राने वागणारा रसातळाला गेलाच.) अशी किंवा ‘स्त्रीपुरुषांमध्ये जे स्वाभाविक अंतर आहे त्यामुळे काही केले तरी पुरुषांइतक्या सर्व स्त्रिया कधीच ज्ञानवती होणार नाहीत’ (६१) अशी भाषा बोलणारे आगरकर पुढे १८८८ साली ‘सुधारक काढल्यावर बंधमुक्त होऊन लिहिताना दिसतात. पंडिताबाई धर्मातरास प्रोत्साहन देतात असा आरोप शारदासदनावर होत होता. त्या वादळात पंडिताबाईंची बाजू त्यांनी पुष्कळ दिवस सांभाळली आणि सर्वांत शेवटी निरुपायाने त्यांचा पक्ष सोडला. आधी ‘आनरेबल रानडे बाटले असे लिहिणारे आगरकर पुढे त्यांची बाजू घेऊन टिळकांशी निकराची लढाई लढतात. मुंबईला हिंदुमुस्लिम दंगे झाले, तेव्हा हिंदूंना संघटित करण्याच्या उद्देशाने गोरक्षणाची चळवळ उभी राहिली. सरकार पक्षपातीपणाने हिंदूंना, हिंदू नेत्यांना, दोष देऊ लागले. त्याविरुद्ध जनमत जागृत करण्यासाठी टिळकांनी पुण्याला एक प्रचंड सभा बोलावली. फिरोजशहा मेथा ह्या
१. सुधारक : २३ फेब्रुवारी १८९१.
२. आगरकर वाङ्मय : खंड १, पृ. ४३४, संपा. म. गं. नातू/दि. य. देशपांडे (१९८४)
मुंबईच्या आणि रा. ब. रानडे या पुण्याच्या वजनदार मवाळ नेत्यांना डावलूनच नव्हे तर त्यांच्या तात्त्विक विरोधाची क्षिती न बाळगता टिळकांनी ही सभा घेतलीच. आगरकरांना हा ‘उद्धटपणा’ असह्य झाला. त्यांनी ‘सुधारकात टिळकांना उद्देशून ‘ग्रामसिंहाप्रमाणे शेपट्या खाली घालणारे’ आणि ‘ज्यांचा संसर्ग लोकांस महारोग्यांच्या संसर्गाप्रमाणे वाटू लागला आहे’ अशा बोचण्या शब्दांचा मारा केला. त्यांना, ‘शाळेतली पोरेसोरे, तेलीतांबोळी, उदमीव्यापारी, भटे भिक्षुके’ यांचे पुढारी ठरविले (२३०). आगरकरांना क्रोध इतका अनावर झाला की, ‘लोकमान्यता मिळविण्याची अक्कल अंगी नसून ती मिळविण्यासाठी उतावीळ झालेले इसम’ (२३१) अशी त्यांनी टिळकांची संभावना केली. टिळकांनीही त्याच शब्दांत हा अहेर परत केला. टिळकच काय ते आवेशी होते हा प्रचलित गैरसमज दूर करून या घटनांचे पौर्वापर्य फडक्यांनी तथातथ्य कथन केले आहे.
या मुक्त ‘सुधारक’पर्वातच आगरकरांनी अस्पृश्यांना खिस्ती होण्याचा सल्ला दिलेला होता.नंतर खुलाशादाखल ते लिहितात, ‘आमच्या लोकांनी ख्रिस्ती व्हावे अशी आमची मुळीच इच्छा नाही…. परंतु आमच्या इच्छेपेक्षा या लोकांची स्थिती अधिक महत्त्वाची असल्यामुळे आम्ही मोठ्या नाखुषीने हाच खरा उपाय हे कबूल केले आहे’ (२१३).
टिळकांवर तुटून पडताना अतिरेक झाला असे मामांचे पत्र आले. तेव्हा प्रांजळ आगरकर चूक कबूल करतात की, ‘तुमच्या पत्रात तुम्ही मला दूषण दिले आहे, ते योग्यच आहे…. माझ्या मूर्खपणाबद्दल कुणीतरी मला निर्भयपणे अधूनमधून समज द्यायलाच हवी’ (२३२).
याप्रमाणे आगरकरांच्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्यातील अनेक तपशील, अस्सल कागदपत्रांचे ढीग तपासून संशोधकी बाण्याने पारखून फडक्यांनी ग्रथित केले आहेत आणि त्याबद्दल ते प्रशंसेला पात्र आहेत हे कोणीही कबूल करील.
आगरकरचरित्रविषयक साधनांचा खजिना उघडा करून ठेवल्याबद्दल, संशोधक फडक्यांचे कार्य प्रशंसनीय ठरवतानाच आगरकर-चरित्र-लेखक फडक्यांच्या शैलीला अप्रशंसनीय म्हणणे मात्र भाग पडते. कारण शास्त्रीय शिस्तीने काटेकोरपणे लिहिलेला प्रमाणग्रंथ म्हणून या चरित्रग्रंथाची योग्यता बरीचशी या शैलीने बाधित होते असे माझे मत झाले आहे. आगरकरचरित्रकथा मुळातच इतकी करुणगंभीर आहे की स्वबळानेच ती वाचकाच्या हृदयाचा ठाव घेते. असे असताना ‘कल्पित संवाद आणि ललितसाहित्य- कृतीचा भास मधून मधून उत्पन्न करण्यासाठी फडक्यांनी केलेला ‘प्रयास यांमुळे जे बरेच घोटाळे होतात त्यांची काही उदाहरणे :
पहिल्याच प्रकरणात टिळक-आगरकरांचा संवाद आहे.
(१) आगरकर म्हणतात, माझे वडील आहेत कफल्लक….. एक दमा सोडला तर आईवडिलांकडून दुसरं काही मला मिळालेलं नाही’ (४).
(२) जेसुईट मिशनच्यांप्रमाणं पोटापुरतं वेतन घेऊन राहायचं असा निश्चय आपण केला आहे’ (४).
हा संवाद खरा की काल्पनिक?
खरा असेल तर आधार काय?काल्पनिक म्हणावा तर पटत नाही. आई-वडिलांबद्दल असे बोलायची रीत सामान्यपणे आपल्याकडे नाही. त्याकाळी ती आणखीच नसावी. शिवाय टिळकआगरकर हे सामान्य तरुण नव्हते. हतभाग्य मातृभूमीसाठी आयुष्ये झोकून द्यायला निघालेले मातृभक्त-देशभक्त तरुण होते ते. आईने वारंवार आपण मुलाला दमा तेवढा दिला हे म्हणणे निराळे आणि मुलाने ते म्हणणे निराळे. अशा काल्पनिक संवादाने चरित्रनायकाचे कोणते व्यक्तिचित्र फडके ग्रंथारंभीच उभे करू इच्छितात?खरेतरं वडिलांनी स्वतःच ठरवलेले लग्न ज्या कारणाकरता मोडले ते कारण विशीतल्या, बंडखोर विचारांच्या आगरकरांना मान्य असणे शक्य नाही. पण त्याबद्दल खंत-खेद वाटल्याचे चरित्रकार कुठे नोंदवत नाहीत. नीतिशास्त्र शिकणारे आगरकर स्वाधीन कृत्याऐवजी पराधीन आनुवंशिक गोष्टींबद्दल आईवडिलांना बोल लावतील हे पटत नाही.
जेसुइटांच्या आदर्शाबद्दल स्तोम माजवण्याचा आक्षेप तर प्रायः टिळकांवर होतो. फाटकांनी तर ‘मानवी संस्कृतीच्या विकासाला जेसुइटांनी हातभार लावला असे आगरकरांचे मत नव्हते’३ असे म्हणून आगरकरांच्या वतीने त्यांचे उपरणे झटकले आहे. आता संवादांचा काही भाग काल्पनिक असेल तर तो आगरकरांच्या व्यक्तित्वाशी संवादी होणार नाही असे वाटत राहते.
आगरकरांनी आईला लिहिलेले प्रसिद्ध पत्र, पोटापुरत्या पैशावर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार ह्या भीष्मप्रतिज्ञेबाबतचे. त्याचा उल्लेख याच प्रकरणात आहे. त्याचाही
आधार फडक्यांकडून मिळाला तर हवा होता.
तात्यामामा भागवत पृ.४वर आणि पृ.९ वर अकोल्याला आहेत. पुढे वारंवार ते यवतमाळला आढळतात. कसे गेले, कधी गेले कळत नाही. भागवत मंडळी पुस्तकभर विखुरलेली आहेत. आगरकर-जीवनात त्यांचे स्थानच तसे आहे. पण पुस्तक वाचताना काही ताळमेळ लागत नाही. पुस्तकाची नामसूची (२६९) घेऊन कागदावर वंशावळ मांडली तेव्हा त्यांचा ठावठिकाणा लागला. ही शैली ललित की अललित द्राविडी प्राणायाम करायला
लावणारी?
फडके खुशाल म्हणोत की, हे चरित्र ललितकृती वाटावे यासाठी अशा निवेदनशैलीचा अवलंब मी जाणून बुजून केला आहे’ (सोळा). पण त्यांच्यातल्या इतिहासकाराने चरित्रकारावर केव्हाच मात केली आहे. उगीचच का पानोपानी दिनावळ्या, नामावळ्या आणि लांबलांब अवतरणे आली असती? पण तपशील सांगत बसण्याच्या नादात कधी महत्त्वाचे तपशील सुटले आहेत. त्यामुळे वाचकाची वाजवी जिज्ञासा अतृप्त राहाते. काही उदाहरणे सांगतो.
१. आगरकर न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत पहिल्यापासून होते. पण एक वर्ष उशिराने ते शाळेच्या कामात सहभागी झाले. कारण १८७९ साली ते एम्. ए. ला नापास झाले होते. एम्. ए. व्हायचेच अशी तर त्यांची प्रतिज्ञा होती. म्हणून १८८० साली पास होऊन ते ‘८१ साली शाळेतआले.
प्रश्न : कोणत्या विषयात ते एम्. ए. झाले?
२. टिळक दोनदा गणितात एम्. ए. ला बसून नापास झाले?
जिज्ञासाः त्या काळच्या परीक्षा, अभ्यासक्रम, परीक्षक, निकालांचे स्वरूप असे काय होते की हे भले भले धीमान नापास व्हावेत?
३. ‘केसरी-मराठा’ प्रकरणात तर कितीतरी गोष्टी यायला हव्या होत्या. मराठा (इंग्लिश) साप्ताहिक २ जानेवारी ‘८१ रोजी निघाले. केसरी (मराठी) साप्ताहिक ४ जानेवारीला जन्माला आले. मराठ्याच्या ८५० प्रती निघत तर केसरीच्या दोनशे. पहिले दहा महिने निपचित पडलेल्या केसरीने अकराव्या महिन्यात एकदम दीडहजारावर हनुमान-उडी मारली. आणखी एका वर्षानि नोव्हेंबर’८२” मध्ये त्याने चार हजारांवर हद्द ओलांडली. देशी भाषेत सर्वांत खपणारे पत्र हा नोव्हेंबर ‘८१ पासूनच मिळवलेला बहुमान त्याने कायम केला.
इथे अनेक गोष्टींचे कुतूहल जागृत होते. त्यावेळी महाराष्ट्रभाषिक देशी वृत्तपत्रांची स्थिती ३.कशी होती?‘नेटिव ओपिनियन’ नावाच्या ज्या पत्रात केसरीच्या प्रकाशनाची घोषणा केली होती हे फडके सांगतात ते पत्र नावावरून तरी इंग्लिश वाटते. ते कुठे होते, कोणाचे, कोणत्या मताचे होते?त्याची ओळख पहिल्या उल्लेखात यायला हवी होती. तीच गत ‘महाराष्ट्र-मित्र’ ‘पुणे-वैभव’, ‘अरुणोदय’, ‘जगद्धितेच्छु’ आदि पत्रांची आहे. अपवाद फक्त ‘इंदुप्रकाश’चा केला आहे. ‘केसरी-मराठा’च्या जन्मकाळची, वृत्तपत्रसृष्टीची स्थिती पार्श्वभूमी म्हणून संक्षेपाने सांगितली असती तर हे प्रश्न पडले नसते. उलट ती वाचकाला उपकारक झाली असती.
या बाबतीत खुद्द लोकमान्य टिळकांनी जे लिहिले आहे त्यावरून आगरकरांची केसरीतील कामगिरी विशेषच खुलून दिसते. केसरीच्या जन्मकाळी बहुतेक देशी वृत्तपत्रे अँग्लो-मराठी अशी उभयपदी असत. त्यामुळे निखळ मराठी किंवा निखळ इंग्रजी असे पत्र काढणे धाडसाचे होते. चिपळूणकर आणि त्यांच्या चेल्यांनी हा धाडसी प्रयोग केला होता. त्यावेळच्या सुशिक्षितांमध्ये इंग्रजीचे माहात्म्य फार होते. टिळक सांगतात, कै. विष्णुशास्त्री यांनी आपल्या विशिष्ट भाषासरणीने व विचारप्रागल्भ्याने मराठी मासिक पुस्तकास तेव्हा एक प्रकारचे विलक्षण स्वरूप आणले होते; परंतु निवळ मराठी वर्तमानपत्रास तशा प्रकारचे स्वरूप येईल की नाही याबद्दल त्यावेळी कोणासही खात्री वाटत नव्हती. ‘इंदुप्रकाश’, ‘नेटिव ओपिनियन’ वगैरे मुंबईच्या पत्रांचे स्वरूप त्यावेळी अर्धे मराठी व अर्धे इंग्रजी असून मराठी भागाचे महत्त्व इंग्रजी भागापेक्षा कमी समजले जात असे.४ टिळक मनमोकळी कबुली देतात की, ‘कै. आगरकर हे या पत्राचे (केसरीचे) काही वर्षे प्रमुख चालकच होते.’ आगरकरांवरील मृत्युलेखात (१८ जून ‘९५) टिळक लिहितात, ‘केसरीस सध्याची स्थिती येण्यास गोपाळराव पुष्कळ अंशी कारणीभूत झाले होते….देशी वर्तमानपत्रांस हल्ली जर काही महत्त्व आले असले, तर ते बर्यााच अंशी रा. रा. आगरकर यांच्या बुद्धिमत्तेचे व मार्मिक लेखांचे फळ होय असे कोणीही कबूल करील.’ आणि आगरकरांच्या ‘सुधारका’ने १८९१ साली तिसर्याखच वर्षात तीन हजारांचा पल्ला गाठला होता. केसरी व जगद्धितेच्छु यावेळी ४ हजारांहून थोडा जास्त खप असलेली पत्रे होती. केसरीच्या खपात अर्थात वर्गणीचाही वाटा होताच. ‘नेटिव ओपिनियन’ची वार्षिक वर्गणी १२ रु. होती, तर केसरीची १ रु. १३ आणे. यातले १३ आणे (सुमारे ८० पैसे) टपालखर्चाचे असत. म्हणजे निव्वळ वर्गणी १ रुपयाच होती. सुधारक निघाला तेव्हा त्याची वर्गणी केसरीच्या दुप्पट असे. पण जाने’९० पासून पुणेकरांस १२ आणे (म्ह. ७५ पैसे), मुंबईकरांस १ रु. आणि इतर ठिकाणी दीड रुपया केली होती.
*३ न. र. फाटक : ‘लोकमान्य’, मौज प्रकाशन, १९७२, पृ. ७०.
*४. केसरी – ११ फेब्रुवारी १९०२.
४. ग्रंथात अनेक व्यक्तिनामे येतात. त्यांची ओळख न देता नुसते उल्लेख होतात ते काय कामाचे?
उदाहरणे- वेडरबर्न, ऑक्झनहॅम, वर्डस्वर्थ, सेल्बी. ज्या दाजी आबाजी खरे यांच्याकडे आपली बदनामी करणारे अहवाल टिळक पाठवतात अशी आगरकरांची तक्रार होती (१०२-३) ते सुधारक होते हे कळते (१४६), पण पुढे, नंतर कळते की टिळक मुंबईला त्यांच्याकडे मुक्काम करीत (२३९).
याप्रमाणे तपशिलात हरवून बसणारे फडके वाचकाला मधून मधून वार्या वर सोडतात असे वाटत राहते आणि हा त्यांच्या ललित कथनशैलीचा जाच निमूटपणे वाचकाला सोसावा लागतो.
इ. स. १८८७ साली आगरकरांना केसरी सोडावा लागला. ती त्यांची माघार होती, पण टिळकांचा विजय नव्हता. मात्र १८९० साली टिळकांनाडेक्कन एज्युकेशन सोसायटी, शाळा, फर्गसन कॉलेज सोडावे लागले तो टिळकांचा पराभव होता आणि आगरकरांचा विजय.
तटस्थ लेखकाने कोणत्याच बाजूचे समर्थन करू नये, मात्र घटितांचे स्पष्टीकरण अवश्य द्यावे, यात कार्यकारणभाव सांगणे नसते, असा पाठ फडक्यांनी प्रस्तावनेत दिलेला आहे. वाचक तो कार्यकारणभाव जाणून घेण्यास उत्सुक असतो, तर त्याच्यापुढे येतात डे. ए. सोसायटीच्या आजीव सेवकांच्या बैठकींची कार्यवृत्ते, बैठकींच्या तारखा, तहकूब बैठकी, कोण हजर होते, कोण नव्हते, सभेचे अध्यक्ष कोण होते, सभेपुढील प्रस्ताव, उपसूचना, प्रतिउपसूचना, मतदान कोणी, अनुकूलप्रतिकूल-तटस्थ, कसे केले त्याचे तपशीलवार वृत्तान्त. हे सर्व आपण फडक्यांच्या आधीच्या लेखांत, ग्रंथांत वाचलेले आहेत असे वाचकाला सतत वाटत राहते. म्हणजे हे नवे संशोधन असत नाही. ‘कोऽन्योऽस्ति सदृशो मया’हा आधीच्या प्रत्येक लेखात, ग्रंथात आढळलेला सूर याही चरित्रग्रंथाच्या प्रस्तावनेत फडक्यांनी आळवला आहे. पण प्रत्यक्षात वाढलेल्या अपेक्षांचा विरस होतो.
आगरकरांना केसरी का सोडावा लागला आणि टिळकांना डे. ए. सोसायटी सोडणे त्यांनी भाग का पाडले? हे कळीचे प्रश्न आहेत. आगरकरचरित्रात यांची उत्तरे मिळावीत, तीही फडक्यांसारख्या नावाजलेल्या संशोधकाच्या ग्रंथातून, ही रास्त अपेक्षा आहे. न. र. फाटकांनी यांचे उत्तर ‘पैसा’ आणि ‘कीर्ती’ असे टिळकचरित्रात दिले आहे. ते फडक्यांना पटत नसणे शक्य आहे. फक्त ५ रु.ची मासिक पगारवाढीची मागणीही टिळकांना मंजूर नव्हती. ते ऊठसूठ जेसुइट मिशनन्यांचा दाखला देऊन अडवणूक करीत होते. आजीव सदस्य दहा होते. आगरकरांनी आपले बहुमत प्रस्थापित केले. टिळकांच्या निष्कृतीनंतर पगारवाढ आणि वाजवी आर्थिक लाभ उरलेल्या सदस्यांनी निर्विघ्नपणे पदरात पाडून घेतले. हा घटनाक्रम, तसेच हजार दोन हजारांच्या बोजासकट केसरी सांभाळणे निर्धन आगरकरांच्या शक्तीबाहेर होते हे फडकेही सांगतात. पण फाटकांच्या निष्कर्षाशी सहमतही होत नाहीतकी मतभेद दाखवत नाहीत. संशोधकाला निष्कर्षांचे वावडे असले पाहिजे की काय?गोळा केलेल्या अस्सल पुराव्यांच्या आधारे सयुक्तिक कारणमीमांसा करणे यात तटस्थता कशी काय भंग पावते? मला स्वतःला फाटकांचा निष्कर्ष पटत नाही. टिळक-आगरकर यांच्यातील विग्रहाचे कारण, आपल्या आवडत्या कल्पना दुसर्याषच्या गळी उतरवण्याचा उभयतांचा अट्टहास आहे असे वाटते. आपण म्हणू तसेच दुसर्यााने चालले पाहिजे असा दोघांचाही अत्याग्रह आहे.६ टिळकांना जेसुइट आदर्श होते. एकदा ठरलेल्या अल्पवेतनात काही झाले तरी बदल करणे वय होते. अंगीकृत कार्यासाठी (शिक्षणसंस्थेसाठी) ते वृतपत्र सोडून द्यायला तयार होते. आगरकर या दोन्ही गोष्टींना तयार नव्हते.‘सुधारक’ त्यांना जीव की प्राण होता. आणि थोडाफार आर्थिक लाभ घेतल्याने त्यांना त्यागाचे तत्त्व डागळले असे वाटत नव्हते. या उलट केसरीचे नवे मालक (टिळक) मनास शुद्ध वाटेल तसे लिहू देत नाहीत. ज्या केसरीला आपल्या लेखणीने प्रतिष्ठा मिळवून दिली तो सोडावा लागला हे सत्य स्वीकारणे आगरकरांना जड गेले. वेळ पडली तर ते संस्था सोडायला (संस्थेच्या हितासाठीच) तयार होते, पण ‘सुधारक’ नाही.
* ५. न. र. फाटक : ‘लोकमान्य’, मौज (१९७२), पृ. ६७.
हा चरित्रग्रंथ प्रमाण संदर्भग्रंथ होण्यात आणखी एक मोठी अडचण आहे. टिळक-आगरकरगोखले यांची सोसायटीच्या सचिवांना किंवा परस्परांना लिहिलेली पत्रे इंग्लिशमध्ये आहेत. ती आणि टिळकांचे राजीनामापत्र हे ऐतिहासिक घटनांबद्दलचे अस्सल पुरावे आहेत. ते या ग्रंथात त्या त्या प्रकरणाच्या शेवटी किंवा परिशिष्टात मूळ स्वरूपात यायला हवे होते. ज्या घडामोडींचा ऊहापोह त्यांत आहे त्यांचे लेखकाने संक्षेपाने स्वशब्दांत निरूपण करून अस्सल पत्रे, दस्तऐवज जसेच्या तसे देणे आवश्यक होते. त्यांचे भाषांतर पुरेसे होत नाही.‘यदि सारखे अफाट वाचन असणारा कसलेला विद्वान भाषांतरात सहसा त्रुटी राहू देणार नाही तरी माझे वरील मत कायम आहे. टिळक-आगरकरगोखले परस्परांना ‘खोटारडे’, ‘सर्वांत अधम’, ‘पाजी’, ‘नीच’, ‘बकवास करणारे’ अशा शेलक्या शिव्यांचा वर्षाव करणारी पत्रे (उदा. पृ. १०४, १२४) लिहीत होते, ती पत्रे मूळ शब्दांसाठीच नाहीतर प्रसंगाचे यथातथ्य आकलन होण्यासाठी मुळाबरहुकूम देणे आवश्यक होते. त्यांचे प्रकाशित, अप्रकाशित मूळस्रोत तळटीपेत देणे बंधनकारक होते. आणि फडक्यांचे भाषांतर सदैव पारदर्शी, निःसंदिग्ध असतेच असे नाही. पुढील उदाहरणे पाहावीत.
आगरकरांनी एका आजारपणात मनाच्या अत्यंत भावव्याकुळ अवस्थेत आपल्या निकटच्या नातेवाइकांसाठी आणि स्नेह्यांसाठी एक मार्गदर्शनपर टिपण तयार केले होते (जून १८९३). त्यात (१) ब्रिटिश सरकारशी आपण स्वतःचा मान राखून पूर्णपणे एकनिष्ठ राहायला हवे, असे म्हणून पंतप्रधान ग्लॅडस्टनला दीर्घायुष्य लाभो असे शुभचिंतन आहे; (२) पुढील जन्मी जे. एस्. मिलच्या पायाशी बसून शिकता आले तर समाधान लाभेल, अशी जणू अंतिम इच्छा व्यक्त केली आहे. पुन्हापुढील जन्मी डे. ए. सोसायटीतच काम करायला आवडेल असे जणू मागणे मागितले आहे. नेमकी तारीख न आठवण्याइतका ज्वर त्यांना चढला आहे.
काल्पनिक नसेल तर हे टिपण उघडच इंग्रजीत आहे. त्यात मिल्ला उद्देशून लिहिलेल्या वाक्याचे भाषांतर फडके असे करतात.
(१) जर आपणांस माझे सर्वांत प्रिय व आदरणीय गुरू होणे शक्य झाले आणि मलाही आपला सर्वांत नम्र आणि अज्ञान शिष्य होणे जमले तरच हे सुख मला लाभेल’ (२१४).
हे पाद्री छापाचे भाषांतर आहे. आगरकरांचे सर्वांत प्रिय व आदरणीय गुरू होण्याचा प्रयत्न मिल्ने करायचा आहे. तो त्याला शक्य होणे आणि यांना शिष्य होणे जमले तर सुख लाभेल असा अर्थ होतो. त्याऐवजी ‘आपण माझे … गुरू आणि मी आपला …. शिष्य होणे शक्य झाले तर … लाभेल’ अशी रचना सरळ झाली असती.
आणखी एक उदाहरण होळकर देणगी प्रकरणात आगरकर टिळकांना लिहितात,
(२) “तुम्ही कोणत्या कारणासाठी कोण जाणे जे पत्र आता आपल्याकडे ठेवून घेतले आहे ते मला संध्याकाळी मिळाले’ (१०१).
‘तुम्ही आता आपल्याकडे ठेवून घेतले आहे आणि मला संध्याकाळी मिळाले हे दोन्ही
कसे शक्य आहे?‘मिळाले’ ऐवजी ‘मिळाले होते’ असे म्हणणे निःसंदिग्ध झाले असते.
मुद्दा आहे : भाषांतरात सर्वथा निःसंदिग्धता साधतेच असे नाही. मग आधी उल्लेखिलेले इतके स्फोटक दस्तऐवज मूळ स्वरूपात देण्याने ग्रंथाचे प्रामाण्य आणि विश्वसनीयता वाढली नसती का?
शिवाय आगरकरांच्या या टिपणावर भाष्य अवश्य होते. अंतकाळाची चाहूल लागली असता माणूस खरे, मनातले बोलतो; त्यामुळे पुनर्जन्मावर त्यांचा मनातला विश्वास कायम होता असा समजे, भाष्याच्या अभावी वाचकाचा होऊ शकतो.
६. पहा प्रस्तुत चरित्रग्रंथातील पृ. ७४-७५ वरील आगरकरांचे सोसायटीच्या सचिवास लिहिलेले पत्र.
आणखी एक उदाहरण.‘स्पष्टच सांगायचे तर दुसन्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करण्याचे सामर्थ्य माझ्या अंगी नाही’ (२४७).
हे आगरकरांच्या ‘दिसो लागे मृत्यू’ या अवस्थेत मामाला लिहिलेल्या पत्रातले वाक्यही भाष्याच्या अभावी गैरसमज उत्पन्न करू शकते.
‘शारदासदन’ हे नाव पंडिता रमाबाईंनी आपल्या शाळेला दिले ते शारदा गद्रे या पहिल्या विद्यार्थिनीमुळे असे स्पष्टीकरण दिले आहे (२१७). त्याचा आधार दिला नाही. खुद्द पंडिताबाईंनी सिस्टर जेराल्डिन या आपल्या इंग्लंडातील धर्ममातेला पत्रात लिहिले ते असे की, ‘शारदा ही विद्येची देवी. मला इथे घर (सदन) व संस्कृती यांचा संगम साधायचा आहे म्हणून मी हे नाव ठेवले’७ हाप्रथम पुरुषी पुरावा फडक्यांनी विचारात का घेतला नाही?
७. पंडिता रमाबाई. चरित्र मृणालीनी जोगळेकर, पृ. ८०. मूळ लेंटर्स अँड कॉरस्पाँडन्स, ११ एप्रिल१८८९.
आता सर्वांत महत्त्वाच्या अपेक्षाभंगाविषयी.‘सुधारक’ या आगरकरांच्या कर्तृत्वाचे तात्त्विक विवेचन या चरित्रात येणे अवश्य होते. त्यामुळे ते समाज-सुधारक नव्हते, केवळ ब्राह्मणी सुधारकआणि तेही कुटुंबसुधारक होते’ या आक्षेपाचे निरसन आपोआप झाले असते. आगरकर मिल्चे उपयोगितावादी तत्त्वज्ञान पूर्णपणे आत्मसात केलेले तत्त्वज्ञ होते. ते तत्त्वज्ञान आपल्या समाजाला लावून दाखवीत होते. त्यात त्यांचे मोठेपण होते. आगरकर इहवादी होते. आप्तप्रामाण्य नाकारत होते. उपयोगितावादी विचारसरणीनुसार व्यक्तीच खरी. तीच अनुभवाला येते.“समाज’ त्या मानाने काल्पनिक संकल्पना आहे. व्यक्तीचे सुख हेच तिचे साध्य. एका व्यक्तीने दुसरीला आपल्या सुखासाठी केवळ साधन न समजले म्हणजे झाले. कारण सर्व व्यक्ती समान आहेत. प्रत्येकाला सुखी होण्याचा सारखाच हक्क आहे.‘समाजहितासाठी व्यक्तिहिताचा बळी’ ही भाषा फसवी. व्यक्तिहितातच समाजहित समावले आहे ही त्यांची तात्त्विक भूमिका होती. सर्वांचा दर्जा सारखा मानल्यावर पुरुषांसाठी स्त्रियांच्या किंवा उच्चवर्णीयांसाठी शूद्रातिशूद्राच्या सुखाचा बळी देणारी समाज-व्यवस्थाच त्यांना बदलायची होती. त्यांची सुधारणा सर्वसमावेशक होती. तिच्यात व्यक्तीची स्वायत्तता सर्वोच्च , होती. जनसामान्यांची सुखे हीन, उपेक्षणीय आहेत ह्या विचारसरणीचा ते विरोध करीत होते. व्यक्तिवादी, लोकशाहीवादी, इहवादी विचारसरणीशी विरोधी होणारे वर्तन शासनाने कायद्याने मोडून काढले पाहिजे. त्यात व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत नाही: उदा. सती, नरबळी, बाला-जरठविवाह अशा गोष्टी धर्माच्या, पारलौकिक कल्याणाच्या नावावर कोणी करीन म्हटले तर सरकारने कायदा करून त्या सक्तीने बंद पाडल्या पाहिजेत हे त्यांचे तत्त्वज्ञान होते. संख्येशी अकलेचा मेळ नसतो (२३०) हे आगरकरमत या अर्थाने घ्यायचे. तसेच अल्पसंख्य ‘विद्वान लोकांना तरी अविद्वान किंवा (बहुसंख्य) अडाणी लोकांवर (कायद्याने) जुलूम करण्याचा काय हक्क आहे?’ (६५) या टिळकांच्या वरवरच्या उपयोगितावादी युक्तिवादावर त्यांचे हे उत्तर होते. पण फडक्यांना त्याचे काय?ते सतत तारखांत दंग आहेत. विश्वसनीय तरी वाचनीय चरित्रग्रंथाबद्दलची त्यांची कल्पनाच वेगळी दिसते हेच खरे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.