अज्ञेयवाद – एक पळवाट

ईश्वराच्या अस्तित्वाचे कसलेही प्रमाण सापडत नाही. त्याच्या अस्तित्वाच्या सिद्धयर्थ केले गेलेले सर्व युक्तिवाद सदोष असून अनिर्णायक आहेत, असे दाखवून दिल्यावर ईश्वरवाद्यांचा पवित्रा असा असतो की, ईश्वर आहे हे जसे सिद्ध करता येत नाही, तसेच तो नाही हेही सिद्ध करता येत नाही आणि म्हणून आम्ही या प्रश्नाच्या बाबतीत अज्ञेयवादी आहोत. अज्ञेयवादी असणे ही प्रतिष्ठेची भूमिका आहे आणि ती स्वीकारणे तत्त्वज्ञाला शोभणारे असून विवेकाला धरून आहे, असे मानले जाते. म्हणून याबाबतीत खरी गोष्ट काय आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. या ठिकाणी आपल्याला असे दिसते की अज्ञेयवादाला श्रद्धा स्वीकरणीय असते, एवढेच नव्हे तर ती आवश्यक आहे असेही म्हणता येईल.

तत्त्वज्ञानाच्या इतिहासातील अज्ञेयवादाची दोन प्रसिद्ध उदाहरणे म्हणजे जर्मन तत्त्वज्ञ कांट आणि ब्रिटिश तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर यांची आहेत. या दोन्ही प्रकरणी तत्त्वज्ञांचे मत असे होते की, आपले इंद्रियगोचर जग केवळ आवभासिक (appearance) असून ते त्याच्यामागे असलेल्या एका पारमार्थिक जगाचा अवभास आहे. असे पारमार्थिक जग आहे हे त्यांना माहीत होते; निदान त्यांची तशी श्रद्धा होती. परंतु त्याचे स्वरूप काय आहे, याविषयी आपण पूर्ण अज्ञ आहोत, असे त्यांचे मत होते. म्हणजे पारमार्थिक अगाविषयी (noumena विषयी) ते अज्ञेयवादी होते. कांट तर स्पष्टपणे म्हणाला होता की, “I have denied knowleedg, in order to make room for faith. ‘ म्हणजे ‘ मी पारमार्थिक जगाचे ज्ञान शक्य नाही म्हणालो कारण मला श्रद्धेला जागा करायची होती.’  पारमार्थिक जग आहे अशी श्रद्धा बाळगल्याशिवाय त्याच्या स्वरूपाविषयी आपण पूर्ण अज्ञ आहोत असे म्हणता आले नसते. हर्बर्ट स्पेन्सरचीही गोष्ट अशीच आहे. परंतु विवेकवादाचा सर्व प्रकारच्या श्रद्धेला विरोध आहे. अमुक गोष्टीवर विश्वास ठेवायचा तर त्याकरिता साधक पुरावा उपलब्ध हवा, अशी त्याची मागणी आहे. म्हणून ईश्वर आहे अशी श्रद्धा न बाळगता त्याच्या अस्तित्वाविषयी अज्ञेयवादी राहता येईल काय, हा प्रश्न आहे. त्याकरिता एखादी वस्तू अस्तित्वात आहे की नाही हे ठरविण्याचे काय उपाय आहेत, ते पाहिले पाहिजेत. अस्तित्व आणि नास्तित्व सिद्ध करण्याचे उपाय एखादी वस्तू अस्तित्वात आहे हे कसे सिद्ध करता येईल? ह्या प्रश्नाचे उत्तर देण्या अगोदर ती म्हणजे कोणती वस्तू याची कल्पना असणे अवश्य आहे. ती वस्तू म्हणजे कोणत्या वर्णनाची वस्तू. उदा. हिवतापाचे कारण असणारी वस्तू. अशासारखे एखादे वर्णन जर आपल्या समोर नसेल, तर एखादी वस्तू अस्तित्वात आहे काय ? हा प्रश्न निरर्थक आहे. पिशाचांना अस्तित्व आहे काय ?  हा प्रश्न बरोबर आहे, कारण पिशाच म्हणजे आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना अगोचर असा पदार्थ असे आपण समजतो. याप्रमाणे ज्या वस्तूच्या अस्तित्वाविषयी आपण चर्चा करीत आहोत, तिचे स्वरूप काय आहे, हे जर आपल्याला माहीत असेल तरच त्या प्रश्नाला अर्थ आहे, असे म्हणता येईल. अमुक वर्णनाची वस्तू अस्तित्वात आहे, हे कसे सिद्ध करता येईल ? अर्थात तिच्या अस्तित्वाचे प्रमाण दाखवून. अस्तित्वाचे सर्वात सोपे प्रमाण म्हणजे त्या वस्तूचा आपल्याला कसला तरी अनुभव आला पाहिजे. इंद्रियानुभवाचे प्रमाण निर्णायक प्रमाण मानता येईल.
काही अप्रत्यक्ष प्रमाणेही असू शकतील. उदा. कोणीतरी ती वस्तू पाहिली असेल आणि दुसऱ्याने त्याच्याकडून ते ऐकले असेल. परंतु पहिल्याने ती वस्तू स्वतः डोळ्यांनी पाहिली असते. म्हणजे इंद्रियानुभवाचा पुरावा आपण अंतिम मानतो.
परंतु एखादी वस्तू खरोखर अस्तित्वात नाही, ती फक्त कल्पना आहे, हे कसे दाखविता येईल? जर तिच्या अस्तित्वाचा कसलाही पुरावा नसेल तर ती नाही, असे आपण मानतो. उदा. भुतेखेते नाहीत असे आपण आजकाल मानतो, कारण ती खरोखर कुणाच्याही दृष्टीस पडत नाहीत किंवा त्यांचा अन्य इंद्रियांचाही अनुभव नाही म्हणून. नाही म्हणायला अनेक लोकांनी भुते पाहिली असतात, त्यांचे आवाज ऐकले असतात; पण ते भ्रम असतात असे आपण ठरवतो. म्हणजे एखादी गोष्ट कोणाच्याही अनुभवाला न येणे हे सामान्यपणे तिच्या नास्तित्वाचे कारण आपण मानतो. विज्ञानातही ही विचारसरणी वापरतात. उदा. ज्योतिषशास्त्रात (astronomy) मध्यंतरी सूर्यमालेत असलेल्या ज्ञात ग्रहांखेरीज आणखी एक ग्रह असावा, अशी काही शास्त्रज्ञांची कल्पना होती. त्या अज्ञात ग्रहाला त्यांनी नावही दिले होते – पॉसिडॉन. पण पुष्कळ शोध करूनही त्याचे काही निरीक्ष्य प्रमाण न आढळल्यामुळे तो ग्रह नाही, असाच निष्कर्ष काढण्यात आला. ‘शक्य’चा तार्किक (logical) अर्थ या ठिकाणी logically possible (तर्कतः शक्य) आणि physically possible (भौतिकदृष्ट्या शक्य) असा भेद तत्त्वज्ञ करतात, त्यासंबंधी दोन शब्द सांगणे अवश्य आहे. Logically possible कल्पना म्हणजे ज्या कल्पनेत कसलाही व्याघात नाही अशी कल्पना. व्याघात म्हणजे एकाच वस्तूत एक गुण आहेही आणि नाहीही असे म्हणणे. अशी गोष्ट सर्वथा अशक्य आहे. उदा. ‘वंध्यापुत्र’.  ही कल्पना आत्मव्याघाती आहे. एखाद्या स्त्रीला मूल नाही आणि मूल आहेही, अशी ही कल्पना आहे, म्हणून ती अशक्य आहे. Logically अशक्य म्हणजे आत्मव्याघाती अशीच ‘अशक्य’ शब्दाची व्याख्या आहे.
याअर्थी ज्या कल्पनेत व्याघात नाहीत अशी कोणतीही कल्पना तर्कतः शक्य आहे, असे म्हणतात. सहस्रार्जुन, जरासंध किंवा नृसिंह या सर्व तर्कतः (logically) शक्य गोष्टी आहेत.
परंतु एखादी गोष्ट तर्कतः शक्य आहे म्हणून भौतिक दृष्ट्याही शक्य आहे, असे म्हणता येत नाही. निसर्गाचे काही नियम आहेत आणि त्यामुळे अनेक तर्कतः शक्य गोष्टी भौतिकदृष्ट्या अशक्य होतात. उदा. वर दिलेली तार्किक शक्यतेची सहस्रार्जुन, जरासंध किंवा नृसिंह ही उदाहरणे भौतिकदृष्ट्या अशक्य होतील. मनुष्याला हजार हात आहेत किंवा एकच व्यक्ती अर्ध मनुष्य आणि अर्ध सिंह आहे किंवा उभे चिरलेले शरीर कोणी जोडू शकेल ह्या गोष्टी निसर्गनियमानुसार अशक्य आहेत.
तार्किक शक्यता आणि भौतिक शक्यता यांतील भेद येथे सांगण्याचे कारण असे आहे की, ईश्वरवादी जेव्हा म्हणतो की, ईश्वर नाही असे सिद्ध करता येत नाही, तेव्हा ईश्वर असू शकेल असा त्याचा अभिप्राय असतो. ईश्वरकल्पनेत कोणताही व्याघात नसल्यामुळे तो शक्य आहे असे तो मानतो. परंतु ईश्वराच्या कल्पनेत व्याघात नसेल तर तो तार्किकदृष्ट्या अस्तित्वात असू शकतो, हे खरे असले, तरी तो आहे याचे ते प्रमाण होऊ शकत नाही. त्याच्या कल्पनेत व्याघात नाहीत याचा अर्थ तो अस्तित्वात असण्यास तार्किक आडकाठी नाही. पण तो आहे हे मानण्याकरिता पुरावा द्यावाच लागेल. ज्यांच्या कल्पनेत व्याघात नाही अशा लक्षावधि, कोट्यवधि, खरे म्हणजे अक्षरशः असंख्य वस्तू आहेत. पण त्यांना प्रत्यक्ष अस्तित्व आहे असे आपण समजत नाही. एखादी वस्तू नाही असे म्हणण्याकरिता तिच्या कल्पनेत व्याघात आहे, असे दाखविणे पुरे आहे, हे आपण पाहिले. आणखी एक उपाय म्हणजे ती अस्तित्वात असलेल्या कशाच्या तरी व्याघाती आहे असे दाखविणे. कारण निसर्गात दोन परस्परव्याघाती वस्तू राहू शकत नाहीत. त्यांपैकी एक जर वास्तव असेल तर दुसरी नसली पाहिजे. उदा. ईश्वराची एक कल्पना अशी आहे की तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वथा साधु आहे. हे ईश्वराचे तीन गुण परस्परव्याघाती नाहीत. पण त्यांचा प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या एका गोष्टीशी विरोध आहे. ती गोष्ट म्हणजे विद्यमान जगात फार मोठ्या प्रमाणात असलेले अशिव (evil). आपल्या जगात अतोनात दुःख आहे. निष्पाप बालके, निरपराध माणसे, पशुपक्षी यांना अतोनात दुःख भोगावे लागते. ईश्वर जर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान आणि सर्वथा साधु असता तर हे दुःख कदापी राहिले नसते. तेव्हा वरील तीन गुणापैकी निदान एक गुण ईश्वराच्या ठिकाणी नसला पाहिजे. किंवा वरील तीन गुण असलेला ईश्वर अशक्य आहे. पण वरील तीन गुण अंगी असलेला ईश्वर असू शकत नसेल तरी अन्य वर्णनांचा ईश्वर असू शकेल. उदा. जगाचा निर्माता किंवा प्रार्थनेला, भक्तीला पावणारा ईश्वर असू शकेल. असू शकेल म्हणजे त्या वर्णनात व्याघात नाही. तर अशा प्रसंगी आपण ईश्वराविषयी अज्ञेयवादी आहोत, म्हणजे तो आहे हेही माहीत नाही आणि तो नाही हेही माहीत नाही, अशी स्थिती शक्य आहे काय? या बाबतीत वर सांगितेला एखादी वस्तू नाही असे म्हणण्याकरिता पुरेसा वाटणारा पुरावा म्हणजे अनुकूल पुराव्याचा पूर्ण अभाव हे कारण ईश्वराच्या बाबतीत का लागू करू नये ? ह्या प्रश्नाला उत्तर नाही. केवळ तार्किकदृष्ट्या शक्य आहे, एवढ्याच कारणाकरिता कोणत्याही साधक पुराव्याच्या अभावी एखाद्या वस्तूविषयी आपण अज्ञेयवादी आहोत अशी भूमिका घेणे रूढ संकेतांच्या विरुद्ध आहे. ती समंजसपणाची नाही असे म्हणणे भाग आहे. आपण ईश्वराच्या बाबतीत अज्ञेयवादी आहोत असे म्हणणे म्हणजे ईश्वर आहे याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही आणि तो कधी सापडेल अशी आशाही नाही, अशी कबुली देणेच होय. ईश्वर आहे अशी माझी श्रद्धा आहे, असे म्हणण्याचा तो एक प्रतिष्ठित प्रकार आहे.
सारांश ती एक श्रद्धावाद्यांची पळवाट आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.