वैषम्यनैघृण्यप्रसंगनिरास

प्राचीन भारतात पहिल्या दर्जाचे तत्त्वज्ञान निर्माण झाले होते, आणि त्याची प्रमुख नऊ दर्शनांच्या (म्हणजे न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा व वेदान्त ही आस्तिक दर्शन आणि जैन, बौद्ध आणि चार्वाक ही नास्तिक दर्शने यांच्या) शेकडो तत्त्वज्ञांकडून साधकबाधक चर्चा दीडदोन हजार वर्षे चालू होत्या. ती परंपरा गेल्या काही शतकांपूर्वी खंडित झाली असून सध्या जे उपलब्ध तत्त्वज्ञान आहे ते सामान्यपणे एकदीड हजार वर्षांपूर्वीचे आहे. इतक्या प्राचीन काळचा हा विचार असल्यामुळे त्यात आजच्या दृष्टीने काही उणीवा आहेत. पण एरवी त्यांची बलस्थानेहीआहेत.
या तत्त्वज्ञानाचे एक छोटेसे उदाहरण म्हणून शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्रभाष्यातील एक उतारा पुढे छापला आहे. त्याचा विषय तेव्हा जसा होता तसाच आजही ताजाच आहे. अशा प्रश्नांची चर्चा तत्त्वज्ञ कशी करीत याचे उत्तम उदाहरण म्हणून ते इथे दिले आहे. ते वाचकांना उद्बोधक वाटेल अशी आशा आहे.
(शंकराचार्यांच्या ब्रह्मसूत्र भाष्यातील एक उतारा, अध्याय २, पाद १, सूत्रे ३४-३६)
वैषम्यनैघृण्ये न, सापेक्षत्वात्, तथाहि दर्शयति।।३४।।
पुनश्च जन्मादिहेतुत्वं ईश्वरस्य आक्षिप्यते स्थूणानिखननन्यायेन प्रतिज्ञातस्य अर्थस्य दृढीकरणाय। कुतः? नेश्वरो जगत: कारणमुपपद्यते। कुतः? वैषम्यनैर्घेण्यप्रसंगात्। कांश्चित् अत्यंतसुखभाजः करोति देवादीन्, कांश्चित् अत्यंतदु:खभाज: पश्वादीन्, कांश्चित् मध्यमभोगभाजो मनुष्यादीन् इत्येवं विषमां सृष्टिं निर्मिमाणस्य ईश्वरस्य पृथग्जनस्येव रागद्वेषोपपत्तेः. श्रुतिस्मृत्यवधारितस्वच्छत्वादीश्वरस्वभावविलोप: प्रसज्येता तथा खलजनैरपि जुगुप्सितं निघृणत्वं अतिक्रूरत्वं दुःखयोगविधानात् सर्वप्रजोपसंहारात् च प्रसज्येत। तस्मात् वैषम्यनैघृण्यप्रसंगात्नेश्वरः कारणं इति।
भाषांतर
स्थूणानिखननन्यायाने (म्हणजे खुटा हलवून बळकट पुरतात त्याप्रमाणे) प्रतिपादलेला अर्थ आणखी बळकट करण्याकरिता ईश्वर जगताचे कारण आहे यावर आक्षेप घेतो. ईश्वर जगाचे कारण आहे हे सिद्ध होण्यासारखे वाटत नाही. कशावरून? विषमता आणि निर्दयता यांच्यामुळे. देवादि काहींना तो अत्यंत सुख देतो, पश्वादि काहींना अत्यंत दु:ख देतो, आणि मनुष्यादि काहींना मध्यमअवस्थेत ठेवतो. अशा प्रकारे विषमसृष्टि निर्माण करणार्यां ईश्वराच्या ठिकाणी सामान्य मनुष्याप्रमाणेरागद्वेष असतात असे होत असल्यामुळे. त्यामुळे श्रुतिस्मृतींनी सांगितलेला स्वच्छत्व इत्यादि ईश्वरस्वभाव लोप पावेल. त्याचप्रमाणे दुःखसंबंधाचे साधन आणि सर्व प्रजांचा संहार यामुळे दुर्जनांनी देखील निंदित निघृणत्व आणि अतिक्रूरत्व ही ईश्वराला लागू होतील. म्हणून विषमता आणि निर्दयता प्रसंगामुळे ईश्वर कारण नाही.
मूळ भाष्य
एवं प्राप्ते ब्रूमः। वैषम्यनैघृण्ये नईश्वरस्य प्रसज्येते। कस्मात्? सापेक्षत्वात्। यदि हि निरपेक्षः केवलः ईश्वरः विषमां सृष्टिं निर्मिमीते स्यातां एतौ दोषौ वैषम्यं नैघृण्यं च, न तु निरपेक्षस्य निर्मातृत्वं अस्ति, सापेक्षो हि ईश्वरो विषमां सृष्टिं निर्मिमीते। किमपेक्षतः इति चेत् धर्माधर्मावपेक्षत: इति वदामः। अत: सृज्यमानप्राणिधर्माधमपक्षा विषमा सृष्टिः इति नायं ईश्वरस्य अपराधः। ईश्वरस्तु पर्जन्यवत् द्रष्टव्यः। यथा हि पर्जन्यो ब्रीहियवादिसृष्टौ साधारणं कारणं भवति, व्रीहियवादिवैषम्ये तु तत्तद्वीजगतानि एव असाधारणानि सामथ्र्थानि कारणानि भवन्ति, एवं ईश्वरो देवमनुष्यादिसृष्टौ साधारणं कारणं भवति, देवमनुष्यादिवैषम्ये तु तत्तज्जीवगतान्येव असाधारणानि कर्माणि कारणानि भवन्ति एवं ईश्वर: सापेक्षत्वात् न वैषम्यनैघृण्याभ्यां दुष्यति। कथं पुनरवगम्यते सापेक्ष: ईश्वरः नीचमध्यमोत्तमं संसारं निर्मिमीते इति। तथा दर्शयति श्रुतिः ‘एष हि एव साधु कर्म कारयति तं यं एभ्यो लोकेभ्य: उन्निनीषते एष उ एव असाधु कर्म कारयति तं यमधो निनीषते’ (कौशीतकी ब्राह्मण ३/८) इति। ‘पुण्यो वै पुण्येन कर्मणा भवति पाप: पापेन’ (बृहदारण्यक ३/२/१३) इति च। स्मृतिरपि प्राणिकर्मविशेषापेक्षं एव ईश्वरस्य अनुगृहीतृत्वं निग्रहीतृत्वं च इति दर्शयति। – ‘ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्’ (भगवद्गीता ४/११) इति एवं जातीयकाः।
भाषांतर
याप्रमाणे प्राप्त झाल्यावर आम्ही म्हणतो की विषमता व निर्दयता हे दोष ईश्वराला लागू होत नाहीत. कशावरून? सापेक्षतेमुळे, जर निरपेक्ष ईश्वराने विषम सृष्टि निर्माण केली तर त्याला हे दोष लागू पडतील. पण ईश्वराचे निर्मातृत्व निरपेक्ष नाही. ही विषमसृष्टि सापेक्ष ईश्वराने निर्माण केली आहे. कशाच्या अपेक्षेने असे विचारल्यास तो प्राण्यांचा धर्म आणि अधर्म यांच्यानुसार वागतो असे आम्ही म्हणतो. म्हणून जे निर्माण करायचे आहेत त्या प्राण्यांच्या धर्माधर्माप्रमाणे सृष्टि केल्यामुळे ती विषम झाली हा ईश्वराचा दोष नाही. ईश्वर पर्जन्यासारखा आहे असे समजावे. ज्याप्रमाणे पर्जन्य व्रीहि, यव इत्यादींच्या निर्मितीत साधारण कारण असतो, परंतु व्रीहि, यव इत्यादींच्या विषमतेत त्या त्या बीजात असलेली असाधारण सामर्थ्य कारणे होतात, त्याचप्रमाणे ईश्वर देवमनुष्यादि यांच्या निर्मितीत साधारण कारण असतो. देवमनुष्यादींच्या वैषम्याचे कारण त्या त्या जीवाची असाधारण कर्मे कारण होतात. म्हणून ईश्वराला सापेक्षतेमुळे वैषम्य आणि नैघृण्य हे दोष लागत नाहीत. परंतु सापेक्ष ईश्वर नीच, मध्यम आणि उत्तम संसार निर्माण करतो हे आपल्याला कसे कळते? श्रुतीच हे दाखविते. ज्याला या लोकांच्यावर न्यायचे असते त्याच्याकडूनचांगली कर्मे करवून घेतो, आणि ज्यांना खाली आणायचे असते त्यांच्याकडून वाईट कर्मे करवून घेतो’ (कौशीतकी ब्राह्मण ३/८). ‘पुण्यकमनी मनुष्य पुण्यात्मा होतो, आणि पापांनी पापात्मा’ (बृहदारण्य ३/२/१३).स्मृतीदेखील प्राण्यांच्या कर्माच्या अपेक्षेने ईश्वर कृपा आणि शिक्षा करतो असे म्हणते ‘ये यथा मां प्रपद्यते तांस्तथैव भजाम्यहं’ (भगवद्गीता, ४/११०)- मला जसे लोक शरण येतात तशी कृपा मी करतो, इत्यादि.
मूळ भाष्य
न कर्माविभागात् इति चेत् न, नानादित्वात् ॥ ३५ ॥ ‘सदेव सोम्य इदमग्रे आसीत् एकमेव अद्वितीयम्’ (छांदोग्य, ६/२/१) इति. प्राक्सृष्टेः अविभागावधारणात्नास्ति कर्म यदपेक्ष्यविषमासृष्टिस्यात्।सृष्ट्युत्तरकालं हि शरीरादिविभागापेक्ष कर्म, कमपिक्षश्च शरीरादिविभाग: इति इतरेतराश्रयत्वं प्रसज्येत। अतो विभागात् ऊर्ध्वं कमपिक्षः ईश्वरः प्रवर्ततां नाम, प्राविभागात् वैचित्र्यनिमित्तस्य कर्मण: अभावात् तुल्या एव आद्या सृष्टिः प्राप्तोति इति चेत्?
नैष दौषः। अनादित्वात् संसारस्य। भवेदेषः दोषो यदि आदिमान् संसार: स्यात्। अनादौ तु संसारे बीजांकुरवत् हेतुहेतुमद्भावेन कर्मण: सर्गवैषम्यस्य च प्रवृत्तिः न विरुध्यते।
भाषांतर
हे सोम्या, हा संसार सृष्टीच्या आरंभकाळी सत् स्वरूप एक द्वैतरहित होता. याप्रमाणे सृष्टीपूर्वी विभाग नव्हते असे असल्यामुळे ज्याच्या अपेक्षेने सृष्टि विषम होईल असे कर्मच नव्हते. कर्म सृष्टि निर्माण झाल्यानंतर शरीरादींच्या विभागांच्या अपेक्षेने कर्मे होतात आणि कर्माच्या अपेक्षेने शरीरादींचे विभाग होतात असे इतरेतराश्रयत्व प्राप्त होईल. विभागानंतर कर्माच्या अपेक्षेने ईश्वर भलेही चालो; विभागापूर्वी कर्माच्या विविधतेच्या अभावामुळे आद्य सृष्टी एकसारखीच असली पाहिजे असे दिसते. पण हा दोष नाही, कारण संसार अनादि आहे. जर संसार आदिमान असता तर हा दोष होईल. पण संसार अनादि असल्यामुळे बी आणि अंकुर यांच्याप्रमाणे कारणकार्यभावामुळे कर्म आणि विषम सृष्टीची प्रवृत्ति यांत विरोध नाही. पण संसार अनादि आहे हे तरी कसे कळते? त्याचे उत्तर असे आहे.
मूळ भाष्य
उपपद्यतेच उपलभ्यतेच।। ३६।।
उपपद्यते च संसारस्य अनादित्वम्। आदिमत्त्वे हि संसारस्य अकस्मादुद्भुतेः मुक्तानामपि पुनः संसारोद्भूतिप्रसंगः अकृताभ्यागमप्रसंगश्च, सुखदुःखादि वैषम्यस्य निर्निमित्तत्वात्। नच ईश्वरो वैषम्यहेतुः इति उक्तम्। न च अविद्या केवला वैषम्यस्य कारणम्, एकरूपत्वात्। रागादिक्लेशवासनाक्षिप्तकमपिक्षा तु अविद्या वैषम्यकरी स्यात्। न च कर्मातरेण शरीरं संभवति, न च शरीरमंतरेण कर्म संभवति इति इतरेतराश्रयत्वप्रसंगः। अनादित्वे तु बीजांकुरन्यायेन उपपत्तेः नकश्चित् दोषो भवति। उपलभ्यते च संसारस्य अनादित्वं श्रुतिस्मृत्योः। श्रुतौ तावत् ‘अनेन जीवेन आत्मना’ (छांदोग्य ६/३/२) इति सर्गप्रमुखे शारीरं आत्मानं जीवशब्देन प्राणधारणनिमित्तेन अभिलपन् अनादिः संसारः इति दर्शयति। आदिमत्त्वे तु प्रागनवधारितप्राणः सन् कथं प्राणधारणनिमित्तेन जीवशब्देन सर्गप्रमुखे अभिलप्येत। नच धारथिष्यति इत्यतो अभिलप्येत, अनागतात् हि संबंधात् अतीतः संबंधः बलवान् भवति, अभिनिष्पन्नत्वात्। ‘सूर्याचद्रमसौ धाता यथापूर्वं अकल्पयत्’ (ऋग्वेदसंहिता १०/१९०/३) इतिच मंत्रवर्णः पूर्वकल्पसद्भावं दर्शयति।स्मृतौ अपि अनादित्वं संसारस्य उपलभ्यते – ‘न रूपस्येह तथोपलभ्यते नांतो च नादिर्नच संप्रतिष्ठा’ (गी. १५/३) इति। पुराणे च अतीतानां अनागतानां च कल्पानां न परिमाणं अस्ति इतिस्थापितम्।
भाषांतर
संसार अनादि आहे हे सयुक्तिक आहे. संसार आदिमान असेल तर मुक्त मानवांची देखील पुन्हा उत्पत्ति होईल. तसेच न केलेल्या कर्माचे फळ भोगण्याचाही प्रसंग उद्भवेल, कारण सुखदु:खादींचे वैषम्य कारणाशिवाय होईल. ईश्वर वैषम्याचे कारण नाही हे सांगितलेच आहे. तसेच केवळ अविद्याही वैषम्याचे कारण नाही, कारण ती एकरूप आहे. परंतु राग, मोह इत्यादि क्लेशवासनांमुळे प्राप्त धर्माधर्मादींच्या अनुसार चालणारी अविद्या वैषम्य निर्माण करील. सृष्टिसादि असेल तर कर्माशिवाय शरीर नाही आणि शरीराशिवाय कर्म नाही असा इतरेतराश्रयप्रसंग उद्भवेल. पण जर संसार अनादि असेल तर बीजांकुरन्यायाने कर्म आणि शरीर दोन्हीच्या उत्पत्तीत कोणताच दोष नाही. तसेच संसाराचे अनादित्व श्रुतिस्मृतीपासून प्राप्त होते. श्रुतीतील ‘अनेन जीवेन आत्मना’ (छांदोग्य ६/३/२) असे सृष्टीच्या आरंभी शारीर आत्म्याचा जीव या प्राणधारणवाचक शब्दाने उल्लेख करून संसार अनादि आहे असे दाखवते. संसार जर आदिमान असता तर आधी अनवधारित प्राण असलेल्याचा प्राणधारणवाचक जीव शब्दाने उल्लेख कसा होऊ शकेल? प्राणधारण करणार आहे म्हणून, असे म्हणता येत नाही, कारण अनागतसंबंधापेक्षा अतीत संबंध बलवत्तर असतो.‘सूर्याचंद्रमसौ धाता यथापूर्वं अकल्पयत्'(ऋग्वेदसंहिता १०/१९०/३१) हा मंत्रवर्ण पूर्वकालातीत कल्पांचा सद्भाव दाखवितो. स्मृतीतदेखील संसाराचे अनादित्व सापडते‘न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो च नादिर्नत्वच संप्रतिष्ठा’ (गीता १५/३). पुराणांत देखीलअतीत आणि अनागत काळांचे परिमाण नाही असे स्थापित केले आहे.
* * *
हा उतारा वाचल्यावर प्रथम जी गोष्ट मनात भरते ती म्हणजे आचार्यांची भाषा आणि वादपद्धति. त्यांची भाषा अतिशय प्रासादिक आणि स्पष्ट आहे. त्यांची पूर्वपक्षाची मांडणी करण्याची आणि त्याला उत्तर देण्याची शैली अत्यंत प्रभावी आहे. तिच्यात लाघव आणि प्रसाद हे गुण मोठ्या प्रमाणात हजर आहेत. आचार्यांचे वाद-कौशल्य मन मोहून टाकणारे आहे यात शंका नाही.
या बलस्थानांचा उल्लेख केल्यानंतर एका दौर्बल्याचाही उल्लेख करणे अयोग्य होणार नाही. ते दौर्बल्य म्हणजे त्यांनी केलेल्या बौद्धिक युक्तिवादाखेरीज श्रुतिस्मृतींचा मुक्त उपयोग. भारतीय आस्तिक दर्शनांचा हा समान दोष आहे की ती वेदांचा तत्त्वज्ञान देण्याचा अधिकार मानतात. बहुतेक दर्शने शब्दप्रमाण म्हणून मान्य करतात, आणि त्याचा अभिप्राय वेदांचे प्रामाण्य मान्य आहे हे सांगण्याचाच असतो. अन्य प्रमाणे स्थूलमानाने फक्त ऐहिक गोष्टीविषयी माहिती देतात, पण तत्त्वज्ञान फक्त वेदच देऊ शकतात अशी सर्व आस्तिक दर्शनांची श्रद्धा आहे. श्रद्धेविना तत्त्वज्ञान नाही अशी भारतीयांची खात्री आहे. श्रद्धेवर इतका भर देण्याचे कारण उघडच असे आहे की एरवी श्रुतिवचनांवर विश्वास ठेवणे अशक्य झाले असते. श्रुतिवचनांचे युक्तिवादाने समर्थन करणे अशक्य असल्यामुळे त्यांच्याबद्दल श्रद्धा बाळगणे हा एकमेव मार्ग उपलब्ध होता. म्हणून कठोर युक्तिवाद करीत असताना श्रुतींचा दाखला बिनदिक्कत देण्यात येतो. केवळ श्रद्धेने एखादे वचन सत्य आहे असे म्हणण्यातील असमंजसपणा त्यांच्या लक्षात येत नाही. उदा. आचार्यानी जगाचे कारण ईश्वर आहे असे मानले कारण श्रुतींचे तसे सांगणे आहे. ईश्वरावरील पक्षपातीपणाचा आणि निर्दयपणाचा आरोप परतविण्याकरिता ते जीवांच्या धर्माधर्माचा उपयोग करतात. धर्माधर्म म्हणजे पाप आणि पुण्य. आपली कर्मे पापकारक किंवा पुण्यकारक असतात हे कशावरून? त्याचेही कारण श्रुतिवचनच, सत्कर्माना मधुर फळे येतात आणि दुष्कर्माना कटु फळे येतात ही देखील श्रद्धाच, कारण पाप आणि पुण्य ही परीक्षा करण्यासारखी गोष्ट नाही. कर्मसिद्धान्त असे मानतो की सर्व विश्वाचे शासन नैतिक आहे. पण हीही श्रद्धाच. विशेषत: भक्कम विरोधी पुरावा असताना सुद्धा, म्हणजे सत्कर्मे करणारा पुष्कळदा दुःखीच राहतो, आणि अनेक दुर्जन सुखात लोळत असतात, असे असून सुद्धा सत्कर्म कधी वाया जात नाही आणि दुष्कर्म कधी अदंडित राहात नाही असे मानणे ही तर भाबडेपणाची परमावधी झाली. पण तिचेही समर्थन करणारे युक्तिवाद करण्यात येतात. उदाहरणार्थ, आपली कर्मे योग्य फळे आल्याशिवाय राहात नाहीत याचे समर्थन असे करतात की अनेक मानवांवर उपजत आपत्ती येतात ह्याची संगति लावण्याकरिता पूर्वजन्मीची पापे मानल्याशिवाये चालत नाही. तसेच कर्माची मधुर किंवा कटु फळे येण्यापूर्वीच माणसे मृत्युमुखी पडतात, याचा अर्थ त्यांना पुनर्जन्म असतो असे मानण्यानेच लागतो. वास्तविक हे प्रश्न मुळात विश्वाचे शासन नैतिक आहे या गृहीतातून उद्भवतात. ते गृहीत स्वीकारण्याचे काही कारण नाही. ते आपण स्वीकारतो कारण आपण दुबळे आहोत, आपल्या सत्कमांना चांगली फळे येतात असे दिसत नसले तरी पुनर्जन्मात ती येत असली पाहिजेत अशी आशाळभूतपणाची कल्पना करतो. हे सारे प्रश्न कर्मसिद्धान्त मानल्यामुळे निर्माण होतात. तो बिनबुडाचा, निराधार आहे हे ओळखण्याचे धैर्य असले तर ते सर्व विरून जातात. वादांत वारंवार श्रुतीचा हवाला देणे अवश्य व समंजसपणाचे समजले जाते. त्यामुळे एखादे विधान सिद्ध करताना ‘उपपद्यते’ (म्हणजे त्याची उपपत्ती लागते) च्या जोडीला ‘उपलभ्यते’ (म्हणजे त्याला पोषक श्रुति स्मृतिवचने सापडतात) हाप्रमाण युक्तिवादाचा प्रकार मानण्यात येतो.
याप्रमाणे प्राचीन भारतीयांची श्रुतिस्मृतीवरील श्रद्धा हे त्यांचे मोठे दौर्बल्य आहे. मात्र
प्राचीन काळी बहुतेक समाजात हे दौर्बल्य होते हे मान्य केले पाहिजे. उदा. ख्रिस्ती धार्मिक तत्त्वज्ञान पूर्णत: बायबलवर आधारले होते आणि आहे. यहुदी तत्त्वज्ञान यहुदी धर्मपुस्तकांचा सतत आधार घेते. परंतु युरोपमध्ये अलीकडच्या काळात तत्त्वज्ञानात धर्माला आवाहन करणे हे वैगुण्य मानतात. बायबलमधील वचनांचा उपयोग करणारा शेवटचा थोर तत्त्वज्ञ म्हणजे बार्ली (१६८५१७५३). पण त्यानंतर ही पद्धत हळूहळू बंद झाली. युक्तिवादांना श्रुतींचा आधार देणे आता अनुज्ञेय मानीत नाहीत. भारतात मात्र ही वेळ कधी आलेली दिसत नाही. तत्त्वज्ञ अजून उघड उघड श्रुतिवचनांचा आधार घेतात. त्यात आपल्या हातून अतिशय मोठा दोष घडतो याची जाणीव त्यांना अजून आलेली नाही. ही जाणीव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्या तत्त्वज्ञानाचा गाडा चिखलातून बाहेर येऊन प्रगतीचा मार्ग आक्रमू लागेल हे अशक्य दिसते.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.