कार्ल पॉपर आणि जॉन एकल्स यांमधील एक महत्त्वाचा मतभेद – आस्तिकतेविषयी

माझे विज्ञानविषयक तत्त्वज्ञानाचे आकर्षण हे मुख्यतः The Self and Its Brain या कार्ल पॉपर व जॉन एकल्स या उच्च दर्जाच्या दोन विद्वान तज्ज्ञांनी एकत्र मिळून लिहिलेल्या ग्रंथापासून सुरू झाले.

कार्ल पॉपर हे अर्वाचीन तत्त्वज्ञान्यांत, विशेषत: विज्ञानविषयक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात, आघाडीवरचे तत्त्वचिंतक म्हणून आता सर्वमान्य झाले आहेत. The Logic of ScientificDiscovery या उद्बोधक ग्रंथाचे ते लेखक आहेत. जॉन एकल्स (Eccles) हे नोबेल पारितोषिक विजेते, प्राणिशास्त्र (Biology), वैद्यकशास्त्र, आणि मानवाच्या शरीरातील अत्यंत उन्नत भाग म्हणजे मेंद यांवर प्रायोगिक स्वरूपाचे संशोधन करणारे श्रेष्ठ दर्जाचे वैज्ञानिक आहेत. मेंदूतील भौतिक, रासायनिक व विशेषत: मज्जातंतुविषयक (neurological) क्रिया-प्रक्रियांचा, मानवाच्या सर्व तर्हेगच्या शारीरिक व्यवहाराशी निकटचा संबंध आहे. एवढेच नव्हे तर सर्व तव्हेचे मानवी मनोव्यापार आणि क्रियाशीलता यांचा उगम व व्यवहार मेंदूतील मज्जातंतूंवरच होतो हा महत्त्वाचा विचार एकल्स यांनी मांडला आहे. १९७७-७८ या वर्षात एडिंबरो विद्यापीठात एकल्स यांनी या विषयांवर व्यख्याने दिली. Gifford Lectures म्हणून दिलेल्या या व्याख्यानांवर आधारित एक अतिशय वाचनीय असा The Human Mystery हा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे.

वर उल्लेख केलेल्या The Self and Its Brain या ग्रंथाच्या प्रस्तावनेतच या दोन्ही लेखकांनी हे स्पष्ट केले आहे की कार्ल पॉपर हे non-believer (नास्तिक) आहेत, तर जॉन एकल्स हे आस्तिक आहेत. कार्ल पॉपर, एक प्रस्थापित तत्त्वज्ञानी, यांचा ईश्वर किंवा तशाच विश्वातील (supermatural) शक्तीवर विश्वास नाही; पण जॉन एकल्स एक नामांकित, मेंदू व मज्जातंतुविषयक विज्ञानाच्या क्षेत्रातले शास्त्रज्ञ (neuro – biologist) यांचा super-natural, विश्वातीत शक्तीच्या अस्तित्वावर विश्वास आहे. हा एक विरोधाभास (paradox) आहे असे म्हणावे लागेल. कारण, साधारणपणे तत्त्वज्ञान्यांपेक्षा प्रायोगिक संशोधन करणारा शास्त्रज्ञनास्तिक असण्याचा संभव जास्त असावा असे वाटणे साहजिक आहे. पण वस्तुस्थिती त्यांनी स्वत:च केलेल्या विधानावरून याच्या नेमकी उलट आहे. असे का व्हावे याचा शोध घेणे आवश्यक आहे असे वाटल्यावर हे टिपण लिहिण्यास घेतले.

चालू काळात सर्वसामान्य माणूस तू आस्तिक की नास्तिक? असा प्रश्न विचारल्यास त्याचे स्पष्ट, निर्णायक स्वरूपाचे उत्तर देऊ शकत नाही. हा माझा खासगी स्वरूपाचा प्रश्न आहे’ असेच तो म्हणेल. विशेषेकरून वैज्ञानिक म्हणेल की ‘‘माझे शास्त्रीय संशोधन व आस्तिकता याचा काही संबंध नाही. माझी :आस्तिकता हा माझा खासगी धर्म स्वभावानुसार असू शकतो, त्याचा माझ्या शास्त्रीय संशोधनाशी कसलाच संबंध असण्याची गरज नाही. आणि हे योग्यच आहे. या देशाचा सांस्कृतिक वारसा (cultural heritage) प्राचीन काळापासूनच धर्मकल्पनेवर (religion) आधारित आहे आणि त्याला अनुसरूनच सामान्य माणसाची विचारसरणी असते.

पण कार्ल पॉपर हे असामान्य व्यक्तिमत्त्व असणारे सूक्ष्म विचारवंत व तत्त्वज्ञानी होते. त्यांनी दुसऱ्या एका संदर्भात मान्य केले होते की, ‘ईश्वर आहे’ हे विधान सार्थ आहे आणि कदाचित खरेही असू शकेल; पण हे विधान विज्ञानाच्या चौकटीत बसू शकत नाही, कारण ते खोटे आहे असे सिद्ध करण्याचा कोणताही मार्ग नाही. Falsifiability हा निकष ते वैज्ञानिकतेला लावीत असत.Deduction, not Induction. कार्ल पॉपर हे आयुष्यभर London School of Economics या सुप्रसिद्ध संस्थेत, मानव्य (Humanities) विभागात प्राध्यापक आणि विभागप्रमुख होते. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राजकारणशास्त्र इ. यांच्याशी संबंधित कित्येक पिढ्या त्यांच्या तात्त्विक विचारधारेने प्रभावित झाल्या असणार, Marxism and Dictatorship यांवर त्यांनी कडाडून हल्ला केला होता हे सर्वश्रुत आहे. आणि अनेक दशकानंतर का होईना पण सोवियट राज्यतंत्र कोलमडून पडल्यावर त्यांनी Marxism च्या विरुद्ध केलेले भाकित प्रत्यक्षात खरे ठरले.

मानव्य विद्याशाखेच्या क्षेत्रात कार्य करणारे विचारवंत हे आस्तिक किंवा नास्तिक असणे हे त्यांच्या नैसर्गिक स्वभावावर व त्यानंतर आलेल्या स्वानुभवावर अवलंबून असणार. एकंदरीत पाहता, विवेकवादाकडे त्यांची विचारधारा वळलेली असणार असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

आता मुख्य प्रश्न हा आहे की प्रा. एकल्स, एक नामांकित श्रेष्ठ दर्जाचे शास्त्रज्ञ, आस्तिकतेकडे का वळले? त्यांनी एडिंबरो विद्यापीठात दिलेल्या गिफर्ड व्याख्यानमालेवर आधारितलिहिलेल्या The Human Mystery या पुस्तकातच या प्रश्नाचे उत्तर व स्पष्टीकरण मिळू शकते असे मला वाटते.

या ग्रंथातला पहिली तीन प्रकरणे (chapters) ही या प्रचंड विश्वाविषयी आहेत- आपला ग्रह, पृथ्वी, सूर्यमालेतील इतर ग्रह, त्यानंतर अत्यंत दूर असलेले तारे, आकाशगंगेसारख्या अनेक galaxies, विश्वातील अवकाश (space) आणि काळ (time) यांचा विश्वातील फार मोठ्या प्रमाणावरचा पसारा आणि त्यातील नियमानुसार होणाऱ्या घटना. या घटनांचे खगोलशास्त्रज्ञांना अचूकपणे भविष्य सांगता येते याचा प्रभाव मानवी मनावर होणे साहजिकच आहे. ग्रंथाच्या पुढील भागात एकल्स हे त्यांच्या स्वत:च्या विज्ञानक्षेत्राविषयी म्हणजे मानवी मनोव्यापार व मेंदू यांतील परस्पर संबंधविषयी माहिती देतात. माणसाचा सर्वात उन्नत भाग म्हणजे त्याच्या शरीरांतील मेंदू व त्यांतही मज्जातंतूंचे अत्यंत गुंतागुंतीचे (complex) जाळे हाच त्यांच्या स्वत:च्या संशोधनाचा विषय. मानव व इतर प्राणी यांमधील मुख्य भेद हा की, मानवाजवळ स्वसंवेद्य मन (selfawarencess) आहे. उत्क्रांतीच्या ओघात, जीवोत्पत्ती, त्यानंतर मानवतेच्या टप्प्यापर्यंत येईपर्यंत फार मोठा काळ लोटला असला पाहिजे. आपल्या एडिंबरो विद्यापीठात दिलेल्या व्याख्यानांत ते मानवाचे स्वसंवेद्य मन (self-awarenes) किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट करतात. मेंदू व मानवी मन यांबद्दल अजून पुरेशी शास्त्रीय माहिती उपलब्ध नाही अशी कबुली देऊन, नवीन तांत्रिक स्वरूपाची साधने उपलब्ध होऊन, भविष्यकाळात या प्रश्नावर प्रकाश पडेल व Matter – Mind या द्वैताचे उत्क्रांतीच्या ओघात खरे स्वरूप समजू शकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

पुस्तकाच्या सारांशरूपी शेवटच्या भागात ते म्हणतात की, “मेंदू-मन’ (Brain-Mind) हा सर्वात कठीण प्रश्न आज आपल्यापुढे आहे. मी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. पण हे उत्तर कसे मिळेल याची दिशा दाखविली आहे. काही गुढ प्रक्रियेमुळे मानवी मेंदूची उत्क्रांती निसर्गातील इतर कोणत्याही वस्तूपेक्षा वेगळ्या व उच्चस्तरावर झाली. माझ्या मते याचे मुख्य कारण, मानवाची उत्पादक प्रतिभा (creative imagination) ही आहे. त्यातूनच स्वसंवेद्यते (self-awareness) ची उत्पत्ती झाली. हा माझ्या निवेदनाचा-मानवाचे गूढ (Human Mystery) – या विषयाचा कळस (climax) आहे. आणि येथेच हे गुढ आपल्या विचारशक्तीच्या फार पलीकडे आहे.’ (This is the climax of my story on The Human Mystery and here the mystery is furthest from comprehension).
पण प्रा. एकल्स हे नुसतेच आस्तिकतेपर्यंत येऊन थांबत नाहीत. पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागातच ते म्हणतात. “But these lectures will reveal in case after case that there is an important residue, not explained by Science and which will remain beyond any future explanation by Science.” या व्याख्यानमालेवरून दिसून येईल की, अनेक बाबतीत विज्ञानाने न सुटणारे अशी काहीतरी शिल्लक वाकी (residue) उरते. “This leads on to the theme of Natural Theology with the idea of a Supernatural beyond the explanatory power of Science”.

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती ही की एडिंबरो विद्यापीठात ‘भौतिक शाखे’ (Physics) च्या विभागाला Dept. of Natural Philosophy असे नाव आहे – निदान माझा या विभागाशी प्रत्यक्ष संबंध येइपर्यंत ते तसे होते. आणि Gifford Lectures चा हेतू विज्ञानविषयक तत्त्वज्ञान विशद करण्याचाच आहे. (मला वाटते Physics Department ला Natural Philosophy असे नाव इंग्लंडमध्येच काय, जगात दुसऱ्या कोणत्याही विद्यापीठात नसावे.)

या व्याख्यानमालेवर आधारित The Human Mystery या पुस्तकाच्या उपसंहार (Epilogue) रूपी शेवटच्या भागात, प्रा. एकल्स म्हणतात, “It is my thesis that we have to recognize the unique self-hood as being the result of a super-human creation of what in the religious sense is called a soul.”

त्यांनी मांडलेला सर्वांत महत्त्वाचा विचार, “I believe that there is a Divine Providence operating over and above the materialist happenings of biological evolution.” (माझी अशी श्रद्धा आहे की मानवी उत्क्रांतीच्या प्रवाहात होणाऱ्या वास्तविक घटनांवर प्रभाव पाडणारी दैवी प्रेरणा असली पाहिजे.)

आता असा विचार मनात येतो की, प्रा. एकल्स हे प्रथमपासूनच धार्मिक प्रवृत्तीचे असले पाहिजेत. त्यांत अत्यंत उच्च दर्जाच्या वैज्ञानिकतेची भर पडली. एका बाजूला अवकाश व काळ (Space and time) यांत अचूकपणे गणिती नियमानुसार या प्रचंड विश्वाचा चाललेला कारभार व त्यातील व्यवस्था, आणि दुसऱ्या टोकाला जीवोत्पत्तीनंतर मानवजातीपर्यंत उत्क्रांती झाल्यावर, त्याच्या मेंदूतील सूक्ष्म मज्जातंतूच्या क्रिया-प्रक्रियांशी, त्यांच्या स्वत:च्याच संशोधनामुळे त्यांचा आलेला निकटचा संबंध व अनुभव यामुळे त्यांची स्वाभाविक आस्तिकता अधिकच दृढ झाली.

माणसाचा मेंदू व मनोव्यापार यांचा अभ्यास व संशोधन करणारे तज्ज्ञ सांगतात की, आपले दीर्घ आयुष्य सतत क्रियाशील राहून व्यतीत करणारा माणूस स्वत:च्या मेंदूचा ३०-४० टक्के एवढाच भाग वापरतो. निसर्गानि मेंदूचा बाकीचा भाग पुढे होणाऱ्या उत्क्रांतीसाठी, उन्नतीसाठी राखून ठेवला आहे. अशी व्यवस्था, संवेदनशील मनात विनम्रतेची व शालीनतेची (humility) भावना निर्माण करणे साहजिक आहे.

प्रा. एकल्स आपल्या The Human Mystery या ग्रंथात म्हणतात, “In these Lectures, I will endeavour to create an atmosphere of wonder and humility before the grandeur and immensity of the great cosmos that we can now contemplate in the light of modem cosmology” (page 8).

त्यांच्याच विज्ञानक्षेत्रात संशोधन करणारे इतर सर्व शास्त्रज्ञ प्रा. एकल्स यांच्या विचारांशी सहमत होतील अशी अपेक्षा करणे अर्थातच बरोबर होणार नाही. कोणत्याही विषयात संपूर्ण एकमत होणे शक्यच नसते. विशेषत: आस्तिकतेसारख्या विषयात.

हा लेख लिहीत असतानाच, आजचा सुधारकच्या जानेवारी १९९५ च्या अंकात आलेल्या दोन लेखांची आठवण झाली. प्रा. मे.पुं. रेगे यांचा “मी आस्तिक का आहे?’ हा व प्रा. दि.य. देशपांडे यांचा “मी आस्तिक का नाही?” हा. प्रा. देशपांडे यांनी यात विवेकवादाच्या भक्कम आधारावरून प्रा. रेग्यांना समर्पक प्रश्न विचारले आहेत व काही वैचारिक दोषही दाखविले आहेत. या लेखाचा विषयही आस्तिकता हाच आहे. प्रा. जॉन एकल्स यांनासुद्धा त्यांच्याच विषयातले इतर तज्ज्ञ व संशोधक असेच प्रश्न विचारणार व आक्षेप घेणार हे निश्चित.
या लेखाचा उद्देश, आजचा सुधारकच्या वाचकांचे लक्ष प्रा. एकल्स यांच्या The Human Mystery या व्याख्यानमालेतील विचारसरणीकडे ओढण्याचा होता. विवेकवादाच्या पातळीवरून पॉपर व एकल्स यांमधील आस्तिकतेविषयाच्या मतभेदावर काही चर्चा व विचार केला जावा अशी माझी अपेक्षा आहे. हा लेख पूर्ण केल्यावर, आजच्या सुधारकच्या जानेवारी १९९७ च्या अंकातील प्रा. देशपांडे यांचा ‘अज्ञेयवाद – एक पळवाट’ हा लेख हाती आला. पण त्याचा परिणाम या लेखावर होऊ नये. कारण, पॉपर व एकल्स हे माझ्या समजुतीप्रमाणे अज्ञेयवादी नव्हते.

संदर्भ :
1. K. Popper and J. Eccles : The Self and its Brain (1977). Springer International.
2. K. Popper : Logic of Scientific Discovery (1959) London, Hutchinson.
3. J. Eccles : The Human Mystery (1979) Springer International.
६-२/१३ टेरेस व्यू, जीवन बीमा नगर, बोरिवली (प.) मुंबई ४०० १०३

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.