मुलांची नैतिक बुद्धिमत्ता

रॉबर्ट कोल्ज (Robert Coles) या हार्वर्डच्या मानसशास्त्रज्ञाचा विषय आहे ‘मुले’. त्याने या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत, व त्यापैकी एका पुस्तकाला पुलित्झर पारितोषिकही मिळाले आहे. त्याच्या मुलांची ‘नैतिक बुद्धिमत्ता’ (The Moral Intelligence of Children) या नव्या पुस्तकातील काही उतारे २० जाने. च्या ‘टाइम’ मासिकात उद्धृत केले आहेत. त्यातील काही कहाण्या –

(क) माझ्या नऊ वर्षांच्या मुलाला मी आणि माझ्या पत्नीने सुतारकामाच्या हत्यारांशी ‘खेळायला’ मना केले होते, तरी तो हत्यारांशी खेळला आणि त्याच्या हाताला जखम झाली. टाके पडणार यामुळे तर व्यथित होतोच, पण त्याने आम्ही घालून दिलेला नियमही मोडला होता. मी त्याला गाडीत घालून वेगाने इस्पितळाकडे नेत होतो. आजूबाजूच्या पादचाऱ्यांवर चिखल उडत होता व मी एक ‘पिवळा’ व एक ‘लाल’ दिवाही ‘तोडला’. या धावपळीत मुलगा मला म्हणाला, “बाबा, आपण जर सांभाळून वागलो नाही तर एक त्रास टाळता टाळता जास्त त्रास उपजतील.” तो स्वत:च्या बाहेर पडून इतरांचा विचार करत होता. यात स्वत:ची नेहमीपेक्षा जास्त काळजी करायची स्थितीही आडवी येत नव्हती.

(ख) एका चर्चासत्रात एक आई म्हणाली, “मला वाटते की आपण पहिल्या दिवसापासून आपल्या मुलांना ‘सूचना’ द्यायला लागतो. माझ्या बहिणीच्या मुलाला लहानपणापासूनच भरपूर भूक लागायची. तो सहासात महिन्यांचा झाला, आणि पाळण्यात बसायला लागला. दूध पिऊन झाले की तो बाटली फेकून द्यायचा. एका शेजात्याने माझ्या बहिणीला सांगितले की तो स्नायू वापरायला शिकतो आहे, तरी तसे करू दे, ते चांगलेच असते. पण माझ्या बहिणीला हे पटले नाही, की आपले काम झाल्यावर मुलाने वस्तु फेकाव्या आणि इतरांनी तो गोंधळ निस्तरावा. मुलाचे दूध संपायच्या सुमाराला ती जाऊन बाटली काढून घेऊ लागली. हळूहळू मुलाचा फेकाफेकी करण्यातला रस कमी झाला, आणि आई जवळ नसली तरी तो बाटली फेकेनासा झाला.”

या बाईने ‘आज’च्या मुलात ‘उद्या’चे मूल पाहिले, आईवडील व इतर शास्त्यांना चिडवणारे. पालकांना एक वर्षाखालील मुलांनाही शिकवता येते. इच्छा-आकांक्षा, अपेक्षाभंग वगैरे कसे हाताळावे याच्या समजुतीतून जीवनाबद्दलचे प्रेमवाढते. काही मुलांवर प्रेम करणारे पण ‘गुलाम’ न होणारे आई-बाप मिळतात. इतर आत्मविश्वास नसलेल्या पालकांच्या हाती प्रेम आणि काळजीची जागा ‘लाड’ घेतो.

(ग) मी एका सहा वर्षांच्या मुलाशी त्याच्या लाडक्या दुर्बिणीबद्दल बोलत होतो. तो म्हणाला, “यातून पाहताना एका लांबच्या सफरीवर गेल्यासारखे वाटते. आणि मग त्याने मला त्याच्या मनात आणि विचारांत एक ‘सफर’ करू दिली. “हे तारे इंचभर हलताना दिसत नाहीत, पण खरे ते फार वेगाने हलत असतात. माझा एक मित्र सांगतो की देव या ताऱ्यांच्या टकरा होऊ देत नाही, पण मी त्याला सांगतो की नाही, देव असे करत नाही. देवाने सारे घडवले, पण मग मात्र त्यात ढवळाढवळ करत नाही तो. आपल्याबद्दलही असेच असते. आम्हाला ‘संडे स्कूल’ मध्ये सांगतात की आपण चांगले-वाईट असणे आपल्याच हातात असते, आणि ताऱ्यांचेही तसेच आहे. पण ताऱ्यांच्या टकरा, हे अपघात असतात. असे नसते की देव झोपला किंवा देव रागावला. त्याने आपले म्हणणे पूर्ण केले, “इथे असे नाही. इथे माणसेही आहेत. आपण ताऱ्यावरची माणसे आहोत. ताऱ्यांची टक्कर झाली तर त्यांचे नशीब वाईट. पण आपण या ताऱ्यांचे वाईट करू शकतो – टकरीपेक्षा वाईट.”

प्राथमिक शाळेतले मूल अत्यंत नैतिक असते, जगाची रचना, वागणुकीचे नियम वगैरे साऱ्यांबद्दल अपार कुतूहल असलेले. या काळात नवे ज्ञान अनेक वाटांनी मुलांच्या मनात ओतले जात असते, आणि मुले त्याची सुसंगत मांडणी करायला तीव्रतेने झगडत असतात. कधीकधी पालकांना आणि शिक्षकांना या साच्या शोधाचा वेग झेपत नाही.

(घ) मी एका पंधरा वर्षांच्या तरुणाशी बोलत होतो. त्याने शाळेत जाणे बंद केले होते. तो तासन् तास स्वत:च्या खोलीत ‘पॉट’ ओढत व रॉक संगीत ऐकत बसायचा. इतर विषयांवर थट्टामस्करी करत बोलायचा, पण त्याचा विषय निघाला की नकारार्थी मान हलवत गप्प व्हायचा. मी माझ्या मनात त्याला अनेक मनोवैज्ञानिक नावे ठेवली, ‘विथड्रॉन’, ‘डिप्रेस्ड’, ‘बहुतेक सायकॉटिक’. मग एकदा मी त्याला विचारले, की तु नकारार्थी मान कोणाला उद्देशून हलवतोस.कुणालाच नाही’, असे तो म्हणाला. मी संधी साधून म्हटले, “स्वत:ला उद्देशून नाही?” त्याने माझ्याकडे रोखून पाहात विचारले, “असे का म्हणता?”

मानसोपचाराचे तंत्र मला सांगत होते की मी त्याला त्याच्या मनाच्या स्थितीबद्दलचे अंदाज सांगावे, तिथे काय घडते आहे ते सांगावे. पण सारे तंत्र विसरून जरा अस्वस्थपणे मी म्हणालो, “मी भोगले आहे ते. मला आठवते आहे, जेव्हा मला कुणाशीच एक शब्दही बोलायची क्षमता जाणवत नसे”. मला आठवते की मी तंत्र सोडायला नको होते असे वाटले. पण त्याने रुमाल काढून डोळे पुसले. त्यानंतर हळूहळू, टप्प्याटप्प्याने आम्ही ‘वर’ चढायला लागलो. अॅना फ्रॉईड मला म्हणाली तसे, “आपण चमत्कार करत नाही, की काहीतरी म्हटले आणि – घ्या – एका आयुष्यातला त्रास मिटला. पण मी पाहिले आहे की कुमारवयातल्यांना समजून घ्यायचा जरा प्रयत्न केला तर खूप मदत होते.

(च) माझी एक विद्यार्थिनी, मेरियन, ‘मिडवेस्ट’मधून हार्वर्डला आली होती, आणि कामे करून खर्च भागवत होती, इतर विद्यार्थ्यांच्या खोल्यांची झाडलोट करून. तिला सारखे जाणवायचे की भरपूर गुण मिळवणाऱ्यांमध्येही ‘प्लीज’ आणि ‘थँक यू’ हे शब्द विसरलेले खूप जण असतात. एकदा एका खूप हुशार मुलाने ढोबळ रूपात तिच्यापुढे एक ‘लैंगिक प्रस्ताव’ ठेवला. तिने संतापून ती नोकरी सोडली आणि शिक्षणही सोडायचा विचार तिच्या मनात आला. खूप काळजीत आणि संतापात ती माझ्याकडे आली. माझ्याशी बोलताना ती म्हणाली, “मी तत्त्वज्ञान शिकते आहे. आम्ही काय सत्य आहे, काय महत्त्वाचे आहे, काय ‘शिव’ आहे यावर खूप बोलतो. लोकांनी ‘चांगले’ व्हावे हे त्यांना कसे शिकवावे?”

सामाजिक कामे करणे, हे एक उघड उत्तर आहे. मेरियनचा अविश्वास लक्षात घेऊनही पुस्तके, वर्गातल्या चर्चा वगैरेंचाही चांगले होणे’ शिकण्यात उपयोग होतोच. पण शेवटी हेन्री जेम्सचा सल्लाच खरा: “मानवी आयुष्यात तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे सहृदय असणे, दुसरी म्हणजे सहृदय असणे आणि तिसरी म्हणजे सहदय असणे’. (Kind या इंग्रजी शब्दाला ‘दयाळू’, ‘सहृदय’ आणि ‘विचारी’ (!) असे तीन प्रतिशब्द शब्दकोशात सापडतात.) पुन्हापुन्हा झगड्यात पडणे, प्रयत्न करीत राहणे, स्वेच्छेने हे करणे, ज्यांना आपण मदत करतो

त्यांची मदत घेत हे करणे, इतरांतर्फे आपल्या मनात असणाऱ्या नैतिक आसेला वाळ पुसत, वादळवाटा न टाळणाऱ्यांपाशी बांधिलकी राखत हे करणे – मग ती बांधिलकी हाच प्रवासाचा गाभा होईल.

(कुणाला या कहाण्या भोळसट, अतिसुलभीकरणकरणाच्या वाटतील. पण ‘सुधारणां’ची तत्त्वचर्चा सोडून जेव्हा प्रत्यक्ष सुधारक व्हायचे असते तेव्हा चिखलात हात बुडवावेच लागतात, प्रत्यक्ष माणसांच्या प्रश्नांना व्यवहारी उत्तरे शोधावीच लागतात आणि त्यातून अशा कहाण्या घडतात. तत्त्वे घडवायला लागणारा हा ‘कच्चा माल’ आहे.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.