हुसेनसाहेबांचे अश्लील चित्र

सुप्रसिद्ध चित्रकार हुसेन साहेब ह्यांनी आपल्या धर्मातील देवदेवतांची विटंबना करणारे अश्लील चित्र रंगविले आहे. त्या चित्राची अस्पष्ट प्रतिमा ‘इंडियन एक्सप्रेस’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेली आहे. ती कृष्ण धवल आहे. त्यातून रंग संगती, रंगाचा तरलपणा, सुस्पष्ट होत नाही. चित्र परंपरावादी शैलीचे (क्लासिकल) नसून नूतन चित्रकलेचा नमुना आहे. या चित्रात गणपती वाटावा अशी आकृती आहे.

शंकराचे नुसते तोंड दर्शविले असून जटेतून प्रवाह दाखविला आहे. त्या प्रवाहात अवगाहन करणारी एक नग्न वाटणारी देवता बाजूला आहे आणि शेवटी एक सटवी रोग लागल्यासारखा वाकडा तिकडा कृष्ण आहे. खाली काय दर्शविलेले आहे ते ओळखू न येण्यासारखे अस्पष्ट आणि गडद आहे. या चित्रावर वर्तमानपत्रात ज्या प्रतिक्रिया उमटल्या त्यावरून चित्रात सरस्वतीची विटंबना झालेली आहे असे लक्षात येते. ज्या चित्राविषयी हुसेन साहेबांना सामाजिक रोषाला बळी पडावे लागले ते हे चित्र नसेल तरीही आमचा लेख अर्थपूर्ण ठरावा.

तसा सामान्यजनांच्या दृष्टीने हा प्रश्न भावनिक ठरू शकतो. पण चित्रकलेत अभिरुची असूनही आमच्यापर्यंत हे चित्र आलेले नाही. तेही फक्त एका इंग्रजी वृत्तातील प्रतिमेवरूनच आम्हाला कळू शकले. बहुजनसमाजाला या चित्राचे अस्तित्व कळण्याचा तसा मार्ग नाही.

बहुजनसमाज श्रद्धेच्या वातावरणात इतका अंध असतो की त्याला डोळस करणे अशक्य असते. म्हणजे चित्राचा वाद हा हुसेनविरोधी अशा एखाद्या विशिष्ट छावणीतील फौजदाराने निर्माण केलाआहे हे स्पष्ट आहे. म्हणून त्याला राजकीय रंग आलेला आहे.

कलावंताला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असलेच पाहिजे यावर आक्षेप असण्याची गरज नाही.” कारण कोणतीच कला, व्याकरणबद्ध असू नये असे आमचे मत आहे. नियमाने बद्ध असणारी प्रत्येक अभिव्यक्ती शास्त्र’ झालेली असते. म्हणून कलावंताच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न चर्चेला येण्याची गरज नसते तो प्रत्येक कलावंताचा जन्मसिद्ध हक्क असतो. हुसेन साहेबांनी देव देवतांची चित्रे कशी रंगवावीत या संबंधी त्यांचेवर बंधन नाही. देव-देवतांच्या चित्रातून त्यांची नालस्ती करणे, किंवा देव-देवतांच्या पुराण कथांचे विकृत, अश्लील अर्थ लावणे हे आपल्या धर्मशास्त्रान्वये पाखंड ठरते. धर्मशास्त्रात पाखंडाविषयी कायदे नाहीत. ख्रिश्चन मुसलमानी धर्मात पाखंडाला कडक शिक्षा आहे. आपल्या धर्मात फक्त वाळीत टाकणे एवढीच शिक्षा सांगितली आहे. म्हणूनच हिंदु देव-देवता, पुराणे, प्राचीन कथा यांचे विकृत अर्थ सांगितल्यास जिवावर बेतत नाही याची जाणीव असल्यामुळे ही विटंबना करण्याचे स्वातंत्र्य घेतले जाते. हुसेन साहेबांना मुसलमानी किंवा ख्रिश्चन धर्मातील महापुरुषांची विटंबना करण्याचे धैर्य आहे काय?असा प्रश्न विचारला गेलाआहे. त्याचे उत्तर वर आलेले आहे.

सरस्वतीचे किंवा अन्य देवतांची चित्रे अश्लील आहेत म्हणून आम्ही विचलित झालो नाही. रंगविलेली चित्रे सुमार दर्जाची आहे. हुसेन साहेबांना चित्रकार म्हणावे अशी गुणविशेषता त्या चित्रातून प्रगट होत नाही. सामान्य दर्जाच्या चित्रकारालाही तशी चित्रे काढता येतात. मुख्य म्हणजे चित्राचा आशय स्पष्ट नाही. रेखाटनातील रेषांमध्ये वक्रता आणि जोम नाही. कृष्णाच्या त्रिभंगी चित्रात तर तोलही नाही. हुसेन साहेबांना ‘शरीररचनाशास्त्र’ आणि ‘परस्पेक्टिव्ह’ याचे ज्ञान असावे असे वाटत नाही. म्हणून तेसोयीसाठी नवचित्रकलेकडे वळले. यांत सुमार प्रतिभेचा चित्रकार दलालीमुळे आणि पाठीमागे फौज असल्यामुळे मान्यता पावतो. पिकासो नावाच्या चित्रकाराने जगाला मूर्ख बनविले, त्या नवचित्र-परंपरेतील आशयशून्य, प्रतिभाशून्य अशा चित्रकलावंतांच्या फौजेचे, हुसेन साहेब म्हातारपणामुळे सेनापती आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी नवचित्रकार, नवकवी, पाठीशी उभे राहणारच. तेही कलावंताच्या अभिव्यक्तिस्वांतत्र्याचा हक्क पुढे करून. हे स्वातंत्र्य मान्य करूनही रंगांचा पोरखेळ करणे, कोणतीही आकृती काढून तिला अमकीच वस्तू म्हणा असा आग्रह धरणे या स्वातंत्र्यात अभिप्रेत आहे काय?असा प्रश्न विचारता येतो. दहा + अकरा यांची बेरीज तीन हे सांगण्याचे स्वातंत्र्य आम्हाला आहे काय? (आम्ही ही बेरीज तीन कशी होते ते सांगू शकतो.) म्हणजे बेरजेसंबंधीचे स्वातंत्र्य रेखा मोजून, वा बोटे मोजून, वा मनातल्या मनात बेरीज करण्याचे आहे. उत्तर काय यावे याविषयी स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्यवाद्यांना उत्तराचेही स्वातंत्र्य मान्य आहे काय?हुसेन साहेबांनी चित्रे अश्लील काढली हा प्रश्न आमच्या दृष्टीने गौण आहे. हुसेन साहेबांना कलावंत का म्हणायचे हाच आमचा मूलभूत प्रश्न आहे. आणि हुसेन साहेब सामान्य दर्जाचे चित्रकार आहेत असे आमचे मत झाले आहे. त्याला ठोस कारणे आहेत. आणि चित्रात सत्याचा अपलाप आहे.

माधुरी दीक्षित नावाच्या नटीच्या आकर्षणाने ‘मदनशरदग्ध’ झालेले हुसेन साहेब अलिकडे लोकप्रसिद्ध झालेले आहेत. तत्पूर्वी ते गर्दीत हिंडत होते. जसे फते अलीखान नावाचा सुमार कवालीगायक ‘बैंडिट क्वीन’ चित्रपटामुळे एकदम प्रकाशात आला तसेच हुसेन साहेब माधुरी बेटीची सुमारचित्रे रंगवून प्रकाशात आले. मागे एकदा दिल्लीला प्रदर्शन भरले होते. हुसेन साहेब भितीवर मोठे हत्तीचे चित्र रंगवीत होते. त्यांच्या हातात एक केरसुणीसारखा, किंवा सफेदीच्या टेंभ्यासारखा ब्रश होता. कॅनव्हास विशाल असल्यामुळे आकृतिबंधाच्या रेषांचा अंदाज घेताना होत असणारी दमछाक, आणि आत्मविश्वासाचा अभाव चित्रवाणीवर स्पष्ट जाणवत होता. हत्तीचे रेखाचित्र प्रमाणबद्ध नव्हते. तशी अपेक्षा करणे अन्यायाचे होते. पण हत्तीच्या रेखाटनात अवयवातील जोम, त्याच्या देहाचे ‘कंटूर्स’, रेषांतील वक्रलय, यांचा पूर्ण अभाव होता. दुष्काळात वातडलेल्या हत्तीचे चित्र अवतीर्ण झाले असते. ते चित्रकार हुसेन होते असे आम्हाला सांगण्यात आले. आम्ही हुसेन यांना ओळखत नव्हतो. पण ज्या कुणा चित्रकाराला सन्मान देऊन केंद्र शासनाने सन्मानित केले तो चित्रकार सामान्य प्रतिभेचा असूनही सरकारमान्य होता.

पण हुसेनसाहेबांचा परिचय आम्हाला चित्रवाणीवर दाखविलेल्या एका कार्यक्रमातून झाला. सूर आणि रंग यांचा अन्योन्य संबंध दर्शविणारा तो एक अचाट कार्यक्रम होता. भीमसेन तोडी राग गात होते. आणि तोडीच्या स्वरांची अनुभूती हुसेन साहेब रंगाद्वारा प्रदर्शित करीत होते. भीमण्णांना इतकी वर्षे गाऊनही, बडेगुलामअलीखाँ साहेब, करीमखाँ साहेब, यांच्या रागप्रस्तुतीकरणातील आर्तता आणि सौंदर्य वेचून घेता आली नसती. तोडीच्या अनेक प्रकारातील तो ‘मल्लखांबी तोडीचा प्रकार असतो. त्यांत आर्तता नसते. आणि गाण्यातली किंचितही जाण नसलेले हुसेन साहेब रंगाचा खेळ खंडोबा करीत होते. दोघेही कलेची टवाळी करण्यात गुंतले हते. मंद्रसप्तकातील सुरांची घनता आणि तार सप्तकातील स्वरांचा गडदपणा, रंगाद्वारे व्यक्त करता आला असता, पण दोघांनाही आपण काय करीत आहोत याचे भान नव्हते. व्याकरणबद्ध तोडी आणि बेताल असे रंगाचे पट्टे याचा परिणाम शून्य होता त्याचवेळी हुसेन साहेब हे प्रतिभाशून्य सामान्य दर्जाचे कलावंतआहेत याची आम्हाला जाणीव झाली. तेव्हा या प्रतिभाशून्य कलावंताच्या चित्राच्याद्वारे त्यांना प्रसिद्धीला न आणता अनुल्लेखाने अंधारात ठेवणे हेच योग्य ठरले असते. आपल्या परंपरेला तशी सवय आहे. न पचणारा विचार अनुल्लेखाने मारला जातोच आणि परंपरावादी तो मारतातच.

कलावंताच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मान्य आहेच. म्हणून त्याच्या अभिव्यक्तीसाठी निवडलेल्या वस्तुविषयातील सत्याचा अपलाप करण्याचे स्वातंत्र्य आहे काय? ‘कुमारसंभवात’ (कालिदासाचे काव्य)शंकर पार्वतीचा रसरशीत शृंगार वर्णन केलेला आहे. पण तो शृंगार पतिपत्नीमधील आहे. तो शृंगार गंगेशी दाखविला तरी सत्याचा अपलाप होत नाही. अश्लील अभिव्यक्तीने अशा ठिकाणी संस्कृतीची बंधने झुगारून दिलेली असतात. आणि स्त्रीपुरुषांचे मूलभूत नैसर्गिक नाते रंगांद्वारे वा शब्दांद्वारे प्रदर्शित केले असते. हे स्वातंत्र्य प्रत्येक कलावंताला आहे. म्हणून शंकराचा रुक्मिणीचा शृंगार दाखविण्याचे स्वातंत्र्य आहे काय?हुसेन साहेबांनी हे स्वातंत्र्य घेतले आहे म्हणून त्यांना क्षमा नाही. हुसेन साहेबांच्या कलाकृतीतील श्लीलता वा अश्लीलता यावर चर्चा होण्यापेक्षा पुराणकथेला विकृत केले या निर्बुद्धपणावर विद्वानांनी आक्षेप घ्यावयास पाहिजेत. तसे अजून झाले नाही.

पुराणातील कथांनुसार जे दैवतशास्त्र आपल्याकडे उदयाला आले आहे त्यात प्रत्येक प्रतिमेला वस्त्रांनी आवृत्त दर्शविलेले आहेच, त्यातही ज्या देवता नैसर्गिकशक्तींचे मानुषीकरण होऊन मानवी। स्वरूपात स्वीकृत झालेल्या आहेत त्यांचे विषयी स्वातंत्र्य घेता येऊ शकते. कारण स्वरस्वती ही। नदी देवता आहे असे लक्षात घेतले म्हणजे ती ‘शुभ्रवस्त्रावृता’ आहे हे म्हणणे म्हणजे लोक रचणारा निर्बुद्ध होता असे म्हणावे लागते, कारण नदीला कसे काय वस्त्र नेसावयाचे?हुसेन साहेबांनी तर असे निरावृत, स्वैर, स्वच्छंदी उत्तान नग्न स्वरूप प्रदर्शित केले असले तर त्यावर आक्षेप घेण्याची गरज नाही. ती संगीत आणि साहित्याची देवता असल्यामुळे तिच्यावरची सांस्कृतिक वस्त्र उतरून ठेवणे हेच अधिक नैसर्गिक आहे. पण प्रसिद्ध झालेल्या चित्रात तिचा आणि शंकराचा जो संबंध दाखविला आहे हे मात्र हुसेन साहेबाच्या निर्बुद्धपणाचे प्रदर्शन आहे. कारण पुराणात ती प्रथम विष्णूची रखेल असते. पुढे तिच्या भांडखोर स्वभावामुळे विष्णू तिला ब्रह्मदेवाच्या स्वाधीन करतातआणि ब्रह्मदेवाच्या जीवनातही ती स्वच्छंदी वागते म्हणून यज्ञात ब्रह्मदेवाने कंटाळून सावित्रीची सोबत घेतली असते. तिच्या या एकूण जीवननिष्ठेचे दर्शन नदीसारखे अवखळ, स्वच्छंदी, वेश्येप्रमाणे आहे. त्यामुळे तिला चित्रातून अश्लील रूपात प्रगट केले याविषयी पुराण कथेनुसार आक्षेप घेता येत नाही. पण तिचा आणि शंकराचा संबंध कधीच नव्हता. आदिम काळात देखील गंगेचा प्रवाह सरस्वतीतून प्रवाहित झालेला नाही. कलावंताचे स्वातंत्र्य मान्य आहेच. म्हणून अभिमन्यूचे कलेवर मांडीवर घेऊन विलाप करणाऱ्या सुभद्रेला कोणालाही विवस्त्र आणि उत्तान स्वरूपात रंगविण्याचे स्वातंत्र्य नसावे. कलावंताच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मान्य आहे. पण त्यालाही अभिव्यक्तीसाठी मर्यादा असणे आवश्यक आहे. त्यातही नवचित्र म्हणून चित्रातील गणपतीचे चित्रण प्राथमिक स्वरूपाचे आहे. एकूण हुसेन साहेबांनी रंगविलेले जे चित्र आम्ही पाहिले तेच जर चित्र चर्चेचा विषय असेल तर ते चित्रकलेचे निकष लावून अश्लील आहे वा नाही हा मुद्दा गौण ठरतो. ते सामान्य प्रतीचे, आणि सामान्य प्रतिभेचे प्रदर्शन करणारे आहे. सरस्वतीच्या अश्लील चित्रीकरणातून हुसेन साहेबांच्या प्रतिभेचा स्तर ठरविणे आवश्यक आहे.

तसा हुसेनसाहेबांच्या चित्राचा मुद्दा गौण ठरावा. कलावंताच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला काही मर्यादा असाव्यात काय? हा प्रश्न मात्र विचारवंतांनी उद्बोधनासाठी अवश्य चर्चेला घ्यावा.

अश्लीलता भारतीय मानवाच्या नजरेला आणून द्यावी लागते. कारणशंकराची पिंडी ही स्त्रीपुरुष समागमाचे एक पाषाणशिल्प आहे हे प्रत्येकालाच कळते. ऋग्वेदातील अनेक ऋचांचे अर्थ अतिशय अश्लील निघतात (भारतीय विवाहसंस्था, वि. का. राजवाडे) सैंधवी संस्कृतीतील एका स्त्रीचे शील्प नको तेवढे नग्न आहे. याच संस्कृतीतील अनेक प्रतिमांवर स्त्री-देवतेच्या नग्न आकृती आहेत. काही मातृदेवतांच्या जननेंद्रियातून वनस्पतीची रोपटी बाहेर आल्यासारखी आहेत. पण या अश्लीलतेकडे कोणाचे लक्ष नसते.

एवढ्या सामान्य प्रतिभेच्या कलावंताला शासकीय सन्मान मिळतो कसा? कारण अशा कलावंताचे खास तंबू असतात. आणि प्रसिद्धी देणारी फौज असते. त्यामुळे हे शक्य होते. तसे नसते तर हिन्दू तत्त्वज्ञानाची सामान्य जाण असणारे डॉ. राधाकृष्णन् इंग्रजी शब्दांवर स्वार होऊनविद्वन्मान्य झाले नसते. साहित्यावर अत्यंत प्राथमिक स्वरूपाचे ग्रंथ लिहून न. चिं. केळकर ‘साहित्य सम्राट’ या पदवीला पोहचले नसते. अतिशय नीरस, व्याकरणी आणि माधुर्याचा अभाव असणारे ख्यालगायक रातरंजनकर शास्त्रीय संगीतात मूर्धन्य ठरले नसते. हुसेन साहेबांची चित्रे श्लिष्ट वा अश्लिष्ट हा मुद्दा आमच्या दृष्टीने गौण आहे. ती रद्दीत फेकण्यासारखी आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.