परंपरा, प्रगती, आधुनिकता वगैरे …

आपले पूर्वज फार थोर होते, ज्ञानी होते, असे समजणारा समाज परंपरापूजक असतो. धर्माच्या नावाखाली जे चालत आले आहे त्याला चिकटून राहावे; स्वतंत्रबुद्धी चालवू नये, ही सामान्य माणसाची मनोवृत्ती. शिवाय आणखी एका कारणाने भारतीय माणूस पारंपरिक बनतो. चाणक्य इष्ट गोष्टी धर्माच्या नावाने प्रसृत कराव्यात असा सल्ला देतो. तो म्हणतो, कन्येला चांगल्या कुळात, पुत्राला विद्येत, शत्रूला संकटात आणि इष्ट गोष्टींना धर्माच्या आवरणात बसवावे. चालत आलेली रीत, परंपरा निरर्थक वाटली तरी हा ती पुढे चालवतो. कोणी सांगावे, पूर्वजांनी कोणत्या हेतूने अमुक धर्म सांगितला असेल?म्हणून, ‘उपासनेला दृढ चालवावें, भूदेव संतांसि सदा नमावें।’ ही शिकवण तो निमूटपणे चालवत आला आहे.
ब्राह्मण हे भूतलावरचे देवच. त्यांच्याकडे जन्मजात नेतृत्व. पण त्यांची मने परंपरेला बांधलेली. प्राचीन ऋषिमुनींबद्दल श्रद्धा इतकी की, त्यांच्या शब्दांमागे सत्य धावते’ अशी धारणा. एवढे न्यायशास्त्र प्रमाणशास्त्र म्हणून विख्यात. पण चालत आलेले एखादे पूर्वमत जर स्वतन्त्रबुद्धीच्या आद्यऋषीचे असेल तर कितीही चूक वाटले तरी त्याची चिकित्सा-आलोचना करू नये असा त्यांचा दंडक.
पारंपरिक आणि आधुनिक हा भेद नुसता काळाचा नाही. तो वृत्तीचा आहे. त्यात मूल्यसंघर्ष आहे. ‘श्रुतिस्मृति पुराणोक्त’ आणि ‘अद्ययावत्-अप टु डेट’ या दोन शब्दांत दोन संस्कृती व्यक्त होतात. हे जीवनविषयक दोन भिन्न दृष्टिकोण आहेत. पहिल्यात परंपराशरणता आहे. डोक्याला ताप नाही. विचार करायचे कष्ट नाहीत. स्वतःवर जबाबदारी नाही. परप्रत्ययनेयबुद्धीआहे. पण त्यात मूढता आहे याची आपल्याला जाणीवही नसते.
आधुनिकता ही धूसर संकल्पना आहे. धार्मिक आणि सामाजिक परंपरांच्या संदर्भात आधुनिकतेला नेमका अर्थ देता येईल. उदाहरणार्थ धार्मिक क्षेत्रात गांधीविचारांना आधुनिकता म्हणता येईल. संघनेत्यांनी हिंदुत्वाला जो नवा आयाम-आशय – दिला आहे ही आधुनिकता म्हणता येईल.
सामाजिक क्षेत्रात परंपरेचा संघर्षसुधारणेशी असतो.मनाला पटलेल्या सुधारणाशास्त्रसंमत आहेत हे दाखवायची धडपड कुठेतरी सोडावी लागते. शास्त्रसंमती, पंरपरा, रूढी यांची जागा आधुनिकता घेते. प्रगती चालू राहते. आपल्या प्राचीन देशात कितीतरी परंपरा मोडल्या गेल्या
आहेत. म्हणून परंपरागत मूल्यांची फेरतपासणी करताना आपण बिचकायला नको.
*१. सुकुले योजयेत् कन्यां, पुत्रं विद्यासु योजयेत्।।
व्यसनेषु योजयेच्छत्रु, इष्टं धर्मेण योजयेत् ॥ चाणक्य नीतिसार ३.३
*२. ऋषीणां पुनराद्यानां वाचं अर्थोऽनुधावति। उत्तररामचरित
*३. स्वतन्त्रेच्छस्य मुनेः नियोग पर्यनुयोग अनर्हत्वात्।
वैदिक संस्कृती यज्ञसंस्कृती होती. जीवनातले प्रेय आणि श्रेयही यज्ञाने मिळते ही वैदिक आर्यांची श्रद्धा होती. पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ, स्वर्गप्राप्तीसाठी यज्ञ, इतकेच काय पर्जन्यप्राप्तीसाठीही यज्ञ असे यज्ञाचे स्तोम आमच्याकडे होते. कोणाही जीवाची हिंसा करू नकोस, ‘मा हिंस्यात् सर्वभूतानि’ असा धर्म असला तरी यज्ञीय हिंसा त्याला अपवाद होती. काळाच्या ओघात कोणी एक विचारवंत निघाला. त्याने सवाल टाकला,
वृक्ष तोडून, पशुहत्या करून, रक्तमांसाचा चिखल करून (यज्ञाने) स्वर्ग लाभत असेल तर मग नरक कशाने मिळतो?
त्याच्या या खड्या बोलांनी परंपरावादी निरुत्तर झाले असणार. यज्ञीय हिंसा थांबली. हळूहळू यज्ञाचे स्तोमही कमी झाले.
श्वेतकेतु नामक वैदिक ऋषीने विवाहसंस्था रुजवली. त्याआधी ज्याच्या मनगटात बळ त्याने कोणाच्याही स्त्रीचे हरण करावे, पाणिग्रहण करावे अशी रीत होती.
श्वेतकेतूच्या काळी व्रतबंध होताच १२ वर्षे गुरुगृही जाऊन विद्याग्रहण करावी अशी परंपरा होती. तसे न करता ‘ब्रह्मबंधु-पाखंडी’ राहिलेला आपल्या कुळात कोणी झाला नाही असे त्याचा पिता म्हणतो. मौजी-बंधन द्विजत्वाचे गमक होते. ही परंपरा आता नाममात्र शिल्लक आहे. दररोज ब्राह्मणाने संध्या केलीच पाहिजे, तो त्याचा निष्कारण-धर्म (कर्तव्य) आहे – अहरहः सन्ध्यां उपासीत। हा धर्म आज लोपला पण त्यामुळे आपण ब्राह्मण राहिलो नाही असे कोण्याच ब्राह्मणाला वाटत नाही.
एकूण काय तर परंपरा मोडत असतात. गतार्थ होतात. हे समजण्यासारखे आहे. वाञ्छितफल देण्याचे सामर्थ्य यज्ञात आहे ही समजूत दूर झाली. यज्ञात पशू बळी दिल्याने देवता संतुष्ट होतात हे अज्ञान दूर झाले. एक दुष्ट परंपरा नष्ट झाली.
सत्याचे ज्ञान झाले की भोळ्या समजुती कशा नाहीशा होतात याचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे. गृह्यसूत्रात पाणिग्रहण संस्कारापूर्वी वधूपरीक्षा कशी करावी ते सांगितले आहे. गाय-गोठ्यातल्या मातीचा एक, माळरानातल्या उजाड जागच्या मातीचा एक आणि स्मशानातल्या मातीचा एक असे तीन मृत्पिंड मुलीपुढे ठेवावे. ती जो पिंड उचलेल त्यावरून तिच्या पायाने घरात समृद्धी येईल की दारिद्रय येईल की विनाश हे ठरविण्याचा आपल्या पूर्वजांचा रिवाज त्याचे वैफल्य दिसून येताच त्यागला गेला हे उघड आहे.
निष्कर्ष हा की, विश्वाविषयीचे सीमित ज्ञान हे आपल्या अनेक समजुतींचे, परंपरांचे, कारण असते. त्याच्यात जसजशी भर पडते तसतसे बदल आपल्या आचारविचारांत होत जातात,
असे दिसून येते की विवाह, अपत्यजन्म, अन्त्यविधी या गोष्टींशी निगडित प्रथा, परंपरा फार चिवटपणे टिकून राहिल्या आहेत.
*४. वृक्षान् छित्वा पशून् हत्वा कृत्वा रुधिरकर्दमम्।।
यदि वा गम्यते स्वर्ग नरकं केन गम्यते?॥
जीवन समृद्ध व्हावे, सुखकारक व्हावे, त्याचा अंत व्हायचाच असेल तर तो सुसह्य व्हावा यासाठी माणसाची धडपड आहे. अनादि काळापासून. त्यातून तत्त्वज्ञान आले, धर्म आला, समाजकारण-राजकारण आले. सारी संस्कृती आली. सृष्टिविषयक त्याची ज्ञानसामग्री वाढत गेली तसतसे माणसाचे आचाराचे आदर्श बनत गेले, बदलत गेले. त्याने परंपरा उत्पन्न केल्या. त्या शास्त्ररूपाने ग्रथित केल्या. संस्काररूपाने रूढी उत्पन्न केल्या. शास्त्रप्रामाण्य, शब्दप्रामाण्य यांचे माहात्म्य उत्पन्न केले, वाढवले.
* * * * *
सत्य जाणण्याचा म्हणजे ज्ञानाचा प्रत्येक मनुष्यमात्राचा हक्क हे आधुनिक मूल्य आहे. पाश्चात्त्य जगात धर्मगुरू, धर्मपीठे आणि आपल्या देशात ब्राह्मण आणि धर्ममठ यांच्यातच हा अधिकार पूर्वी बंदिस्त होता.
बायबलसारखे धर्मग्रंथ आणि श्रुति-स्मृति यांची वचने म्हणजे शब्दप्रामाण्य यांचे स्तोम नाकारणे हे आधुनिकतेचे वैशिष्ट्य आहे. सत्यज्ञान धर्मग्रंथांच्या बाहेर मनुष्याला आपल्या विवेकानेआणि प्रज्ञेने होऊ शकते हा आधुनिकतेचा साक्षात्कार आहे.
व्यक्ति-स्वातंत्र्य किंवा मनुष्या-मनुष्यामधील स्वायत्तता हे आधुनिकतेचे गमक आहे. जन्माने कोणी उच्च आणि कोणी नीच नाही. कोणा एकाच्या जन्मजात स्वामित्वासाठी कोणी दुसरा जन्मजात साधनमात्र असत नाही. समता, नैसर्गिक न्याय ही आधुनिकतेची मूल्ये आहेत. विषमता, जन्मजात उच्चनीचता, ही पारंपरिक मूल्ये होती. ती आपोआप गेली नाहीत. त्यासाठी जो लढा लढला गेला तो युरपमध्ये. त्याचा धावता आढावा घेतला तरी आधुनिकतेची मूल्ये कशी अवतरली हे स्पष्ट होईल.
इसवी सनाच्या सतराव्या शतकापर्यंत युरोपात बायबलचा शब्द अखेरचा असे. कोपर्निकस (१४७३-१५४३) हा धर्मगुरूच होता. सूर्य स्थिर असून पृथ्वी त्याच्या भोवती फिरते हा सूर्यकेंद्री सिद्धान्त त्याने भीतभीतच मांडला. भीतभीत अशासाठी की, बायबलमध्ये पृथ्वी सृष्टीचे केंद्र मानून मनुष्य ईश्वराची सर्वश्रेष्ठ कृती आहे असे म्हटले आहे. कोपर्निकसचे म्हणणे खरे असले तर सूर्य मोठा आणि पृथ्वी एक गौण ग्रह म्हणण्यात बायबलचा अधिक्षेप होतो, ते खोटे ठरते. म्हणून कोपर्निकसची भीती अनाठायी नव्हती. ब्रूनो (१५४८-१६००) हा कोपर्निकसच्या सिद्धान्ताचा जरा जादा उत्साही पुरस्कर्ता. तोही लहानसा धर्मोपदेशकच होता. त्याच्या धाष्ट्र्याबद्दल त्याला वधस्तंभाला बांधून जिवंत जाळण्यात आले. गॅलिलिओ (१५६४-१६४२) ने पुन्हा कोपर्निकसच्या सिद्धान्ताचा उघडउघड स्वीकार केला म्हणून धर्मरक्षकांच्या न्यायालयासमोर त्याला चौकशीला सामोरे जावे लागले. परंतु चूक कबूल करून त्याने क्षमा मागितली म्हणून जीव वाचला तरी कैद चुकली नाही आणि त्याच अपमानास्पद स्थितीत त्याचा अंत झाला.
धर्मगुरूंच्या अधिकारशाहीविरुद्ध बंड तसे आधीच सुरू झाले होते. पण त्यात बायबलची प्रतिष्ठा अबाधित राहिली होती. मार्टिन ल्यूथर (१४८३-१५४६) या जर्मन धर्मगुरूने बंड पुकारले होते. ईश्वरदत्त सत्य बायबलमध्ये आहे आणि त्याचा अर्थ लावण्याचा अधिकार धर्मपीठाला आहे.यातली पहिली गोष्ट ल्यूथरने मान्य केली पण धर्मगुरूंच्या मध्यस्थीला आव्हान दिले. सामान्य मनुष्याला आपल्या अंतःकरणाच्या प्रकाशात बायबलमधील सत्य आकळू शकेल या आग्रहातूनच प्रॉटेस्टंट पंथ जन्मला. ल्यूथरने धर्माच्या ठेकेदारांच्या हातून सत्य मुक्त केले पण ते अद्यापि बायबलमध्ये बंदिस्त राहिले होते. तेथून ते ज्याने बाहेर काढले तो एक फ्रेंच तत्त्वज्ञ होता. त्याचे नाव रेने देकार्त (१५९६-१६५०). तो गॅलिलिओचा समकालीन होता. स्वतः वैज्ञानिक आणि अव्वल दर्जाचा गणिती होता. विज्ञानात सत्यशोधनाची एक कसोटी मान्यता पावली होती. कोणतेही सार्वत्रिक सत्याचा दावा करणारे विधान घ्या. एका लहानशा विरोधी विधानाच्या सत्यतेने त्याला छेद जातो. या धर्तीवर त्याने संशयाची पद्धती अवलंबिली. ज्याच्या सत्यतेबद्दल संशय घेता येणारच नाही ते विधान सत्य. आणि मनुष्यास ते स्पष्ट आणि परिच्छिन्न स्वरूपात (distinctly) जाणवते. सत्यज्ञानाची कसोटी आणि सामान्य माणसाला धर्मग्रंथाच्या बाहेरही ते ज्ञान होऊ शकते या दोन गोष्टी देकार्तने मोठ्या सावधपणे विद्वन्मान्य करून घेतल्या.
शब्दप्रामाण्याचा अव्हेर, धर्मगुरूची अनावश्यकता, सामान्य मनुष्याची पात्रता या गोष्टी मान्य झाल्या तरी आधुनिकतेचा जो मुख्य आधार व्यक्तिवाद स्वायत्तता–समता त्याचा जोरदार पुरस्कार कांट (१७२४-१८०४) या जर्मन तत्त्वज्ञाने केला. त्याने बायबलमधीलच एक वचन आधाराला घेऊन आपला युक्तिवाद सिद्ध केला. ‘मनुष्य विश्वातला असला तरी विश्वाचा नाही’या बायबलमधील वचनाचा अर्थ असा की दृश्यविश्वाबाहेर—अतीत, एक दिव्य तत्त्व आहे आणि ते सर्वमनुष्यांमध्ये सारखेच आविष्कृत आहे. भौतिक सृष्टीपासून माणसाचे वेगळेपण या गोष्टीत आहे. अर्थात मनुष्य म्हणून सर्व मानव समान आहेत. कोणी कोणाचा दास म्हणून जन्मला नाही. एका मानवाने दुसन्या मानवाला आपल्या सुखाचे केवळ साधन मानू नये. मानवी समानता हा आधुनिकतेचा, पुढील सगळ्या नीतिशास्त्राचा पाया आहे.
आपल्या देशात पोथीनिष्ठा झुगारणारा देकार्त झाला असता तर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अस्पृश्यतानिर्मूलन शास्त्रप्रामाण्यासाठी खोळंबून राहिले नसते. स्त्रिया पुरुषांच्या मालकीच्या वस्तू आहेत, त्यांना स्वतंत्र व्यक्तित्व नाही असे मानणारे कायदे प्रचलित राहिले नसते.शूद्र उच्चवर्णीयांच्या सेवेसाठी साधने आहेत अशा परंपरा टिकून राहिल्या नसत्या.
ज्ञानसामग्रीत भर पडल्यामुळे पोथीनिष्ठेला कसा हादरा बसतो याचे आणखी एक उदाहरण सांगण्यासारखे आहे. ख्रिस्ती धर्ममतानुसार मानवजात पापातून जन्माला आली आहे. ईश्वराज्ञाभंगाचे पाप! नंदनवनात विहरणार्यान अॅडम आणि ईव्ह यांनी ईश्वरी आज्ञा मोडून ज्ञानवृक्षाचे फळ खाल्ले. या पापामुळे त्यांचे पतन होऊन ते भूलोकी आले. अॅडम आणि ईव्ह यांना एकमेकांच्या लैंगिक भेदांची जाणीव झाली आणि मानव जन्माला आला. ही पापातून जन्मलेली प्रजा स्वर्गाला कायमची अंतरली असती, पण येशू या ईश्वरपुत्राने स्वतःच्या बलिदानाने मानवाचे पाप धुऊन काढले. त्याला मानणाराचे पाप त्याने धुऊन काढले. म्हणून ख्रिस्ती धर्मातच मनुष्याला तारण आहे आणि येशू त्याचा त्राता आहे. हे दोन ख्रिस्ती सिद्धान्त जीवशास्त्रातल्या एका शोधाने धोक्यात आले. चार्लस डार्विन (१८०९ ते १८८२) या इंग्लिश जीवशास्त्रज्ञाने उत्क्रान्तिवाद नामकशोध लावला. १८५९ साली ऑरिजन ऑफ द स्पिशीज या ग्रंथात त्याने सप्रमाण हे दाखवून दिले की, जलचरांपासून हळूहळू विकास होत होत वानरयोनी आणि पुढे नरयोनी उत्क्रान्त झाली. जगभरच्या ख्रिस्ती धर्मपंडितांनी गहजब केला तरीही हा सिद्धान्त जवळ-जवळ जगन्मान्य झाला. मनुष्यजात जर पापातून जन्मली नसेल तर पापमार्जनासाठी ख्रिस्ताला शरण जाण्याची गरज राहिली नाही असा अर्थ निघतो. म्हणजे उत्क्रान्तिवाद मान्य करून ख्रिस्ती धार्मिक श्रद्धा नाकारणे शक्य झाले.‘जेनेसिस’ चा बायबलमधील वृत्तान्त अक्षरशः खरा मानणे वेडगळपणाचे ठरले.
आपल्या देशातल्या विषमता जपणाच्या परंपरा स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत धर्माच्या नावावर चालू होत्या. जातीपातीमधील अपरिवर्तनीयता आणि उच्चनीचता रूढी-परंपरेच्या आधारानेच टिकून होत्या. स्त्रीपुरुषांमधील अधिकारभेद शास्त्राच्या आधारेच जपले जात होते. स्त्रीला पित्याच्या संपत्तीत वाटा नाही, का म्हणून, तर उत्तर होते, पिण्ड द्या अन् धन घ्या (पिण्डं दत्वा धनं हरेत्।) असे शास्त्रवचन आहे. आणि पिंड देण्याचा अधिकार पुत्रालाच का तर उत्तर पुन्हा शास्त्रवचन’ हेच – तोंडी तलाक किंवा पोटगीला नकार हे अमानवीय रिवाज कुठल्यातरी पोथीच्या आधारावर सांगणे ही परंपरानिष्ठा आहे. समता, न्याय, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य ही आधुनिकतेची लक्षणे आहेत; इथून पुढील सामाजिक परिवर्तनाचे आधार आहेत. केवळ परंपरागत म्हणून ग्राह्य ही विचारसरणी न पटणारी आहे. परंपरा हे स्वतंत्र मूल्य नाही. केवळ नवीनच हेही नाही. विवेकनिष्ठ मानवता हे आधुनिकतेचे बीज आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.