आठवे वर्ष

हा आठव्या वर्षाचा पहिला अंक. तो वाचकांकडे रवाना करताना आम्हाला बरेच समाधान वाटत आहे. सात वर्षांपूर्वी आम्ही ज्या गोष्टी करण्याचे जाहीर केले त्यांपैकी काही थोड्याबहुत प्रमाणात आम्ही साध्य केल्या आहेत अशी आमची समजूत आहे.
आजचा सुधारक हे महाराष्ट्रातील एकमेव विवेकवादी मासिक तेव्हा होते आणि आजही ते एकटेच पाय रोवून उभे आहे. कोठल्याही प्रकारच्या तडजोडी न करता विवेकवादाचे निशाण फडकत ठेवावयाचे ही आमची प्रतिज्ञा आम्ही बर्या्चप्रमाणात निभावली असे आम्हाला वाटते. वाचकांचीही आम्हाला बर्यानपैकी साथ मिळाली आहे. एकूण वर्गणीदारांची संख्या साडेसहाशेच्या घरात गेली ही गोष्ट फारशी उत्साहवर्धक नाही हे खरे; पण ती संख्या हळूहळू का होईना वाढत आहे, कमी होत नाही. मधूनच एखादा वाचक निषेध म्हणून मासिक सोडतो, पण त्याचबरोबर एकदोन नवे वर्गणीदार मिळतात. आजीव वर्गणीदारांची संख्या सध्या २१० पर्यंत गेली आहे ही गोष्ट मात्र आम्ही उत्साहवर्धक मानतो.
ह्याच अंकात आमचे मित्र डॉ. के. रा. जोशी यांचे दीर्घ पत्र छापले आहे. त्याचा मथितार्थ हा की आजचा सुधारकने सात वर्षांत प्रशंसनीय असे काहीच कार्य केले नाही. उलट त्याने जे कार्य केले ते अतिशय हानिकारक, वाट चुकलेले आणि एकूणच अनर्थावह आहे. डॉक्टरसाहेबांना आम्ही चांगले ओळखत असल्यामुळे त्या पत्राने आम्हास आश्चर्य वाटले नाही. उलट ते इतका दीर्घकाळ स्वस्थ कसे बसले याचेच आश्चर्य वाटले. त्यांच्या टीकेला ह्याच अंकात एक समर्पक उत्तर श्री. नंदा खरे ह्यांनी दिले आहे. आणखीही उत्तरे देण्यासारखी आहेत. येणार आहेत. श्री. खन्यांच्या उत्तराने डॉ. के. रा. जोशी ह्यांचे प्रबोधन म्हणा किंवा समाधान म्हणा होणार नाही, हे आम्ही जाणून आहोत. कारण त्यांनी जे मुद्दे नवीन म्हणून मांडले आहेत त्यांवर आम्ही उत्तरे पूर्वी देऊन चुकलो आहोत. कदाचित म्हणूनच त्यांनी ह्या पत्रात त्यांच्या तूणीरातले युक्तिवादाचे शर संपुष्टात आल्यामुळे आम्हाला हट्टाग्रही, व्रणशोधक, अप्रगल्भ अशा शेलक्या विशेषणांनी गौरविले आहे. तेव्हा आता आम्ही त्यांच्या विधानांचा सावकाश समाचार घेऊ. पुन्हा त्यांना काही गोष्टी समजावून देऊ. आपल्या सनातन संस्कृतीचे रक्षण करण्याचे कंकण बांधलेल्या व्यक्तीची बुद्धी बंदिस्त झाली की तिला अन्य काही दिसेनासे होते. अभिमानी माणसाला त्या अभिमानापोटी दुसरी बाजू समजण्याची पात्रता राहत नसल्यामुळेच कोठल्याही विवादात लवाद अथवा न्यायाधीश नेमावे लागतात. आम्ही आमच्या अन्य वाचकांना आमचे लवाद मानतो, व सत्य कोणत्या बाजूने आहे त्याचा त्यांनी निर्णय करावा अशी त्यांना विनंती करतो. ह्या विवादाला पिष्टपेषणाचे वा चर्वितचर्वणाचे स्वरूप येऊ द्यावयाचे नसल्यामुळे आणि व्यक्ती म्हणून कोणाला ह्यात ओढावयाची आमची इच्छा नसल्यामुळे कोणी जर कोणत्याही व्यक्तीला उद्देशून निंदास्पद विशेषणे अथवा दूषणेवापरली तर तेवढ्या भागाला संपादकीय कात्री लावण्याचा वा असे लेखन प्रसिद्ध न करण्याचा अधिकार अर्थातच संपादकांकडे राहील. आपल्याला चर्चा हवी आहे आणि ती तात्त्विक, त्याचप्रमाणे सभोचित भाषेतली हवी आहे. तशी कात्री लावण्याची पाळी संपादकांवर आणूनये अशीआमच्या लेखकांना प्रार्थना आहे.
सामान्यतः आम्ही आम्हाला आलेली प्रशंसापर पत्रे प्रसिद्ध करीत नसतो. पण ह्या अंकात आमची निंदा करणारे पत्र जसे आम्ही छापले आहे तशी ह्या खेपेस अपवाद करून आमची उत्स्फूर्तपणे तारीफ करणारी दोन पत्रेही छापली आहेत. पण हा विषय आता येथे पुरे.
ह्या वर्षीही एक दोन विशेषांक प्रकाशित करण्याची कल्पना आहे. पण त्याशिवाय एक नवीन उपक्रम करावासा वाटतो. ‘मी आस्तिक/नास्तिक का आहे?’ह्या विषयावर आमच्या सगळ्या वाचकांनी किंवा अन्य कोणीही आपले विचार सहासातशे शब्दांपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त दोन पाने भरतील असे लिहून पाठवावे. त्यापैकी निवडक दर अंकात दोन असे सातत्याने द्यावेत अशी इच्छा आहे. या निमित्ताने आस्तिक/नास्तिक या विषयाच्या अनेक बाजूंवर प्रकाश पडण्याचा संभवआहे. तरी ह्या आमच्या आवाहनाला वाचकांनी प्रतिसाद द्यावा अशी त्यांना विनंती आहे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published. Required fields are marked *