परंपरा आणि आधुनिकता

प्रसिद्ध फ्रेंच विचारवंत व्होल्टेअर म्हणत असे, `If you want to talk with me, please define yourself.’ शब्दांच्या व्याख्या करून बोलले पाहिजे. हेमचन्द्राच्या कोशात ‘अविच्छिन्नधारायां परंपरा’ अशी परंपरेची व्याख्या आहे. परंपरा हा एक प्रवाह आहे. ती वाहती धारा आहे. नदीच्या प्रवाहाप्रमाणे ती बदलती आहे. मनुष्यजीवनाइतकी गतिशील आहे. तिचा प्राचीनतेशी संबंध आहे. ती वर्तमानात आहेच आणि तिचे दुसरे टोक भविष्यात आहे. रूढी हे साचलेले पाणी आहे. डबके आहे. आधुनिकतेचा विरोध रूढीशी राहू शकतो, परंपरेशी नाही. जी केवळ वर्तमानातच असते, जिला भूतकाळ नसतो ती फॅशन. ती पुढे राहील याची खात्री देता येत नाही. जी खात्रीने पुढे राहील अशी असते ती परंपरेचा भाग बनून जाते. तिचे परंपरेशी सात्म्य होऊन जाते. तिचा भाग बनून ती परंपरेला विकसित करते, सामर्थ्य देते. लोहभस्माचे शरीराशी सात्म्य होते म्हणून ते रक्तवृद्धी करू शकते. लोह शरीराला उपयुक्त धातू आहे म्हणून लोखंडी खिळे खाता येणार नाहीत. शरीराला पचेल असे रूप त्याला दिले तरच सात्म्य होईल.
परंपरा नव्या गोष्टी आत्मसात् करीत पुढे जाते. जे इष्ट असेल ते धर्माशी जुळते करून घ्यावेलागते. इष्ट म्हणजे ‘जे मला आवडते ते’ असा अर्थ नाही. जे माझे ईप्सित आहे ते धर्माशी संबद्ध असावे लागते. धर्म म्हणजे राइचसनेस (righteousness), द प्रिन्सिपल ऑफ युनिव्हर्सल हार्मनी. रिलिजन धर्माचा भाग आहे, त्याचा इक्विव्हॅलंट नाही. मला एखादी मुलगी आवडली तर ते माझे इष्ट. त्याच्या पूर्तीसाठी मी धर्माला अनुरूप वागेन, वागावे हा ‘इष्टं धर्मेण योजयेत्’ या वचनाचाअर्थ आहे.
मल्लीनाथ ‘नामूलं लिख्यते किंचित्’ असे म्हणतो त्याचा अर्थ तो निराधार बोलत नाही. जे अपेक्षित नाही ते मी सांगणार नाही असेही तो म्हणतो. त्यात पुराणप्रियता नाही. समर्पकताआहे.
आपला आधुनिकतेचा दंभ व्यर्थ आहे. आज आधुनिक वाटते ते ५० वर्षांनीही तसेच वाटेल असा दंभ कोणी बाळगू नये. आणि दृष्टीला आज असह्य होणार्यात गोष्टी २५ वर्षांनी सुसह्य होतात असाही अनुभव आहे. बाह्य आविष्करणावरून आधुनिकता मोजावी हे मला मान्य नाही. मॉडर्निटी म्हणजे वेस्टर्नायझेशन नाही. नटनट्या अत्याधुनिक वेषभूषा करतात, पण हातांत ग्रहांच्या आंगठ्या घालतात. याला आधुनिकता म्हणणे कठीण आहे.
परंपरा हा प्रवाह आहे. तिचा संबंध भूतकाळाशी आहे. तसा तो असल्याशिवाय समाज निर्माण होत नाही, राष्ट्रही नाही. जे आपला भूतकाळ विसरतात ते आपली जुनी जीवनमूल्येही विसरतात. आपला चांगला इतिहास आणि त्याविषयीचा अभिमान असल्याशिवाय राष्ट्र निर्माण होत नाही. स्पार्टन लोकांचे गाणे संक्षिप्तपणे प्रत्येक राष्ट्राचे राष्ट्रगीत होऊ शकते. आमचे पूर्वज होते तसे आम्ही आहोत आणि आम्ही आहोत तशी आमची मुले होतील, असे त्यांचे गीत होते. पूर्वजांचा अभिमान असणे किंवा भूतकाळाशी संबंध जोडणे म्हणजे भूतकाळामध्ये जाणे असे नाही. भगिनी निवेदिता म्हणत, हिंदुस्थानच्या कोणत्याही समस्येचा विचार by the past, through the present, to the future’ 37T RIOT ANAI. By the past FEUTCT towards the past 37 नाही. भूतकाळाकडे पाहात कोणीच पुढे जाऊ शकत नाही. याचा अर्थ भूतकाळ विसरता येतो असे नाही. वारसा विसरता येत नाही. विल ड्यूरंटचे Lessons of History या पुस्तकातले हेरिटेजसंबंधी एक वाक्य वाचून दाखवतो. “If progress is real, it is not because we are born any healthier, better or wiser than infants were in the past, but because we are born to a richer heritage, bom on a higher level of that pedestal which the accumulation of knowledge and art raises as the ground and support of our being. The heritage rises and man rises in proportion as he receives it.”
प्रत्येक पिढीचा वारसा उंच होत जातो, आणि त्या उंचीवर उभे राहून आम्ही तो वारसा जपत असतो. आणि त्याचे त्या त्या काळामध्ये आम्ही त्या त्या प्रकारचे आविष्करण करीत असतो. म्हणून डोक्यावर केस की शेंडी, जेवताना सोवळे की गंध हे सारे बदलणारे आविष्कार आहेत. जेवताना स्वच्छ असणे हे बदलणारे नाही. पवित्रस्थानी स्वच्छ होऊनच गेले पाहिजे हे बदलणारे नाही. सिनेमा थिएटरातल्या गर्दीतले कपडे, खेळाच्या मैदानावरचे किंवा रस्त्याच्या धुळीतले कपडे अंगावर ठेवून अन्न ग्रहण करू नये हा आमचा संकेत आहे. पाश्चात्त्य लोक तेच कपडेवापरत असतील तर ती परिस्थिती वेगळी आहे. मी हिमाचल प्रदेशात प्रवासात गार पाण्याने आंघोळ करत नाही. नागपुरात वर्षप्रतिपदेपासून करतो. परिस्थितीप्रमाणे आविष्करणे अशी बदलतात.
विवाहसंस्थेचे पावित्र्य कायम राहावे यासंबंधीचा आग्रह बदलेल का?आपल्या परंपरेमध्ये ‘कुटुंब’ आहे. हा परंपरेचा भाग आहे. पण विवाह कसा व्हावा, स्त्रीपुरुष-संबंध कसे असावे, हुंडा घ्यावा की घेऊ नये हा रूढीचा भाग आहे. जेथे मुलीकडून हुंडा घेतात तेथे मुलीला कमी प्रतीचे लेखले जाते. ही गोष्ट (हुंडा) परंपरेतून आलेली नाही. रूढी कालबाह्य होतात. त्यांचा परंपरेशी काही संबंध असत नाही. समाजाचे प्रबोधन झाले, कायद्याचे पाठबळ मिळाले, समाजमन बदलले की रूढी बदलते. ही सारी आविष्करणे आहेत. मूल्ये परंपरा आहेत. (अर्थात्) परंपरा हे मूल्य आहे. विद्याध्ययनासाठी १२ वर्षे गुरुगृही राहणे पूर्वी शक्य असेल. आता नसेल. पण ज्ञान मिळवणे, ते श्रेष्ठ व्यक्तीजवळ जाऊन मिळवणे हे कसे बदलेल?त्याची आविष्करणे (manifestations) बदलतील. म्हणून मी भा. ल. भोळ्यांशी सहमत आहे की, परंपरा आणि आधुनिकता यांमध्ये द्वंद्र नाही, द्वैत नाही, विरोध नाही, त्या contradictory नाहीत. कारण प्रत्येक परंपरा त्या त्या काळामध्ये आधुनिक बनण्याचा प्रयत्न करते. आणि ती जर आधुनिक बनणार नाही तर ती रूढी होऊन जाईल.
यज्ञाची गोष्ट घ्या. यज्ञीय हिंसा अधर्मसाधन नाही असे सांगितले गेले आहे. तरी ती गेली. गीतेत किती यज्ञसांगितले आहेत! द्रव्ययज्ञ, जपयज्ञ, ज्ञानयज्ञ अशी यज्ञाची परिभाषा चालतराहिली आहे. स्वातंत्र्याच्या स्थंडिलावर आहुती, बलिदान’ इ. यज्ञीय परिभाषा आहे. आपण परिभाषा घेतली, आशय घेतला, पण आविष्करण सोडले. यज्ञाचा आशय आहे ‘इदं न मम’. हे जे काही आहे ते सर्व माझ्याकरिता नाही. ‘हे’मी अग्नीच्या स्वाधीन करतो. अग्नये स्वाहा.‘हे’ दुसन्यांच्या करिताआहे. समूहाकरिता आहे, अग्नये इदंर्हे अग्नीचे झाले. अशी (परिभाषा आहे.इतक्या निरपेक्षतेने, निर्ममतेने, ममत्वशून्यतेने माणसाला काही देता आले पाहिजे. माणसाला असे काही करता आले पाहिजे की ज्याच्या आधारावर समाज चालतो. ती परंपरा आहे. तिची आविष्करणे वेगवेगळी असतील. त्याकाळी यज्ञाचेस्वरूप होते. आता वेगळेअसेल.कोणी गुप्तदान देतो. अनामिकगुप्तदान. ‘न मम’ म्हणून असे देता आले पाहिजे. ही मूल्ये टिकविली पाहिजे.
बहुसंख्य समाज साधारणतः आहे त्याला चिकटून राहणारा असतो. कॉन्झटिव्ह असतो. बदल त्याला सहन होत नाही. कोणीतरी पुढे होऊन (बदल) करतो का हे तो बघतो. सातआठ वर्षांपूर्वी १० एकरांचा सीडफार्म तयार होऊ न शकणाच्या आमच्या खेड्यात आता दीड हजार एकर सोयाबीनचा पेरा होत आहे. जो कोणी पुढे होतो त्याला धोका पत्करावा लागतो. जगात सर्वत्र असाच समाज आहे. डार्विनचा सिद्धान्त शिकवल्याबद्दल अमेरिकेत एका शिक्षकाला दंड झाला, कैद झाली. ही १९२५ सालची गोष्ट आहे. ‘The case that rocked the world’ या शीर्षकाने Reader’s Digest मध्ये प्रसिद्ध झाली आहे. हा फंडामेंटालिझम आहे. ही पोथीनिष्ठा अमेरिकेत उत्पन्न झाली आहे. खोमेनीच्या इराणमध्ये नाही. पोथीनिष्ठांची पुढे पर्वा होत नाही. इतिहासाच्या, काळाच्या ओघात जीवनमान समाजात विचाराची प्रक्रिया चालू असते. तेथे काही ना काही थोड्या लोकांनाहिंमत असते, आणि आज लोकांना आवडत नसले तरी अप्रिय पण हितकारक असते हे सांगण्याची हिंमत असते.
या समाजावर माझे प्रेम आहे. आपले सगळ्यांचे प्रेम आहे. याचा सगळा इतिहास मी पाहिला तर त्यात नेहमी असे चिंतन झालेले आहे असे दिसते. परिवर्तनासाठी चिंतन झालेले आहे. संघर्ष झालेला आहे. विचारांच्या प्रक्रिया झालेल्या आहेत. आणि कुठेही इथल्या गॅलिलिओला, इथल्या कोपर्निकसला सुळावर चढावे लागलेले नाही. तुरुंगात राहावे लागले नाही. त्याला आपले विचार सांगता येतात. अगदी वेदांना धूर्त, भांड, निशाचर असे म्हणणार्याहलाही तसे बोलता येते. ते कोणी ऐकले नाही हे खरे. हे (विचार) स्वातंत्र्य इंग्रजांपासून आलेले नाही. त्यांच्यापूर्वी दयानंद सरस्वतींनी मूर्तिपूजेविरुद्ध बंड केले. ते जातपातीविरुद्ध उठले. आर्यसमाजी रामकृष्णांना देव मानत नाहीत. पुराणांना मानत नाहीत. वेद फक्त मानतात. दयानंद काशीला गेले तेव्हा त्यांना मारपीट करणाच्या पंडितांना म्हणाले, शास्त्रार्थ करो, शस्त्रार्थ मत करो. ही इथली परंपरा आहे. ती बदलत गेली आहे.
बौद्ध धर्मात दर १०० वर्षांनी समिती बसत असे. मागचे आचारविचार, रूढी यांची चिकित्सा करून जे त्याज्य आहे ते सोडत असत. आपल्याकडे (धर्मात) असा औपचारिक प्रयत्न झालेला नाही. पण प्रत्येक शतकामध्ये, प्रत्येक काळामध्ये असे समाजसुधारक उत्पन्न झाले आहेत. मधल्या ७-८ शे वर्षात हे झाले नाही. संपूर्ण देश एका विदेशी आक्रमणाशी लढत होता. स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने काही कवच-चिलखते घातली होती. जातीचे कवच असेच होते. त्याचा उपयोग झाला. आता लढाई संपल्यानंतर ते कवच काढले पाहिजे. नाहीतर त्याचे फोड होतात. समाजाची ही गतिशीलता आहे. तो गतिशील असल्यामुळे परंपरावादी राहणारच. तो परंपरेला मानणारा असला पाहिजे. याचा अर्थ तो केवळ अतीताचा आदर बाळगणारा नाही. पण त्याचा अतीताशी संबंध असला पाहिजे. तुम्ही आपला भूतकाळ विसरू शकणार नाही. आणि भूतकाळाचा मागोवा घेणे याचा अर्थ वर्तमान विसरणे नाही. परंतु जो गतिशील समाज आहे तो वर्तमानाच्या जंजाळातही गुंतून राहात नाही. त्याची दृष्टी भविष्याकडे असली पाहिजे; आणि आज मी ज्या उंचीवर उभा आहे त्यापेक्षा अधिक उंचीवर माझी पुढची पिढी उत्पन्न झाली पाहिजे. ज्या समाजात असे विचारवंत, विद्वान, प्राध्यापक आणि शिक्षक होतील, समाजातले वातावरण असे राहील, तो समाज पुढे जाईल. आधुनिकता आणि परंपरा यांचा हा संबंध आहे.
(२९ जानेवारी रोजी International Centre for Cultural Studiesच्या वतीने ‘परंपरा आणि आधुनिकता’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून केलेले भाषण ध्वनिफितीवरून शब्दांकित, संपादित आणि आयोजकांच्या सौजन्याने प्रकाशित.)

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.