के. रा. जोशींच्या लेखातील काही मुद्द्यांविषयी

(१) श्री. मोहनींच्या प्रतिपादनाने श्वेतकेतूचा दंडक उलथवला जातो. असे केल्याने समाज श्वेतकेतूच्या आधीच्या (प्रागैतिहासिक) पद्धतींकडे ढकलला जाईल. सोबतच स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य स्वैर कामाचाराकडे नेईल, व एडजचा धोका वाढेल. (इति के. रा. जो.)
मानवांच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगतो की गर्भारपण व त्यानंतर अपत्ये ‘सुटी’ होणे यासाठी माणसांना जेवढा दीर्घ काळ लागतो तेवढा इतर कोणत्याच प्राण्याला लागत नाही. या सर्व काळात स्त्री असहाय असते. जर या दीर्घकाळच्या असहायतेसोबतच साहाय्य देणारी यंत्रणाही उत्क्रांत झाली नसती, तर मानववंश घडलाच नसता. असहायतेच्या काळात स्त्रीला पुरुषाने मदत करावी व संरक्षण द्यावे यासाठी पुरुषाला अमुक स्त्री ही आपल्या अपत्याची आई आहे, व आपली’ आहे, याची जाणीव असायला हवी. मानवसदृश प्राण्यांमध्ये ही जाणीव क्षीण असते. मानवांमध्ये मात्र केस नसलेल्या शरीरांमुळे ओळख पटणे सोपे असते. विशिष्ट काळातच कामव्यवहार न होता ते नेहमी होणे हे सुद्धा असे स्त्री-पुरुष बंधनाला पूरक आहे, व हेही माणसांचे वैशिष्ट्य आहे. म्हणजे स्त्री व पुरुष यांनी एकमेकांना ‘धरून’ असणे हा मानवांना उत्क्रांतीतून मिळालेला जाति-सातत्य टिकवणारा गुण आहे, कोण्या श्वेतकेतूचा दंडक नव्हे. फारतर या गुणाला ‘विवाह’ हे संस्थात्मकरूप देणे याचेच श्रेय ठिकठिकाणचे ‘लोकल’ श्वेतकेतू घेऊ शकतील.
मोहनींच्या लेखनात जाणवणारे ‘ध्रुवपद’ असे, की आज विवाहापेक्षा व्यापक अशी समाज ही संस्था घडली आहे. स्त्रीच्या असहायतेच्या काळाची जबाबदारी तिच्यात ‘बीजारोपण’ करणाच्या पुरुषाचीच उरलेली नाही. उलट विवाहसंस्था कांही अंगांनी अस्थीभूत (ossified) व विकृत झालीआहे. जर या संस्थेचा स्त्रिया व पुरुष यांनी जास्त विचार केला, व त्यामागची ‘दंडक’ ही भावना टाळून त्याऐवजी ‘मनाला-बुद्धीला पटणारे वर्तन’ अशी भावना उत्पन्न झाली, तर बरे होईल.
आणि असे करताना आज पुरुषांना अध्याहृतपणे असणारे स्वातंत्र्य स्त्रियांनाही द्यावेच लागेल. ‘स्वातंत्र्य’याचा अर्थ डॉ. जोशी केवळ होकाराचे स्वातंत्र्य असे मानताना दिसतात. पण स्वातंत्र्यात नकार देण्याचे स्वातंत्र्यही आहेच.
ज्या समाजांमध्ये अशी स्त्रियांची स्वातंत्र्ये’ मान्य केली जातात, तेथे समंजस कामव्यवहार वाढलेला दिसतो, व एड्ज्ची पीछेहाट होताना किंवा वाढीचा जोर ओसरताना दिसतो. उलट ज्या समाजात वेश्यांना ‘धंदा’ म्हणून आणि बायकोला ‘धर्मपत्नी’ म्हणून नकारस्वातंत्र्य नाही, त्या आपल्यासारख्या समाजात एइज् दिवसा दुप्पट, रात्री चौपट असा वाढत आहे.
पुराणातील रूपककथांऐवजी शास्त्रीय संशोधन व आकडेवारी यांना आधार मानलेले बरे. दुसरे, स्वतःवरून समाजस्थितीचा अंदाज घेणे फार सांभाळून करायला हवे, नाही तर मोहनींवर ‘उच्चभ्रू, जातिब्राह्मणांचाच विचार करण्याचा आरोप करताना डॉ. जोशी मात्र फक्त ‘आरसाच’
पाहतात, असे चित्र दिसते!
(२) मनुस्मृती गतार्थ झाली आहे, असे डॉ. जोशी लिहितात, व नंतर असेही सुचवतात की मनुस्मृतीतील स्त्रीविषयक विचार संदर्भ न पाहता, अन्याय्य रूपात मांडले जातात ही जाणीव श्री. दि. य. देशपांड्यांना ‘झाल्यासारखे वाटत होते!
माझ्या आठवणीप्रमाणे मनुस्मृतीची मते संदर्भ न पाहता मांडली जातात, असा लेख डॉ. जोशींनी लिहिला होता, व त्यावर अर्धा डझन लेखकांच्या प्रतिक्रिया आल्या, ज्यांचे ‘सार’ होते, की डॉ. जोशी सोईस्कर तेवढेच संदर्भ देतात व गैरसोईचे ते झाकून ठेवतात. डॉ. जोशींचा लेख छापला, या एका कारणावरून जर दि.य. दें.ना मनुस्मृतीवर अन्याय झाल्याची जाणीव झाली असा निष्कर्ष डॉ. जोशी काढत असतील तर तो त्यांचा भ्रम ठरेल.
एका दृष्टीने पाहता एखाद्या नियतकालिकाच्या सर्वज्ञात संपादकीय धोरणाच्या थेट विरोधात लिखाण करणे सोईचे असते. जर लिखाण छापून आले तर “बघा! त्यांनाही जाणवले!” असे म्हणता येते. जर लिखाण नाकारले गेले, तर ती नियतकालिकाच्या संपादकाची पूर्वग्रह-दूषित, दुसरी बाजू ऐकूनच न घेण्याची वृत्ती म्हणून सांगता येते. असे करणे अन्याय्य नव्हे काय, डॉ. जोशींनीच विचार करून सांगावे.
(३)शास्त्रवचने प्रमाण म्हणून मानावीत की नाहीत यावर दि.य.देंची मते तपासून घेणे आवश्यक आहे, असे डॉ. जोशी नोंदतात. हे मान्यच आहे, कारण विवेकवाद्यांना वारंवार स्वतःची मते तपासणे आवश्यक वाटते. हाच प्रयोग डॉ. जोशींनी ‘भारतीय श्रद्धा’ (शब्दप्रयोग त्यांचा-आपला तो बाळासाहेब, दुसन्याचा तो बाळ्या!) याबाबतीत करावा, ही विनंती आहे.
प्रत्यक्ष व अनुमान ही प्रमाणे ज्या क्षेत्रात लागू पडत नाहीत तेथेच शास्त्र-गुरुवचन हे प्रमाण वापरावे, असे डॉ. जोशी सांगतात. पुढे असेही सांगतात की तत्त्वज्ञान म्हणजे कोरडा कल्पनाविलास नव्हे. आता जेथे पुनर्जन्माला पूरक असा एकही निर्विवाद पुरावा नाही तेथे कर्मसिद्धान्त हो कल्पनाविलासच ठरत नाही काय?की तो पुरेसा कोरडा नाही, व म्हणून सुसह्य आहे?
शास्त्र-गुरुवचने प्रमाण मानावीत याच्या प्रतिपादनात डॉ. जोशी सांगतात-आत्मप्रतीती, शास्त्रप्रतीती आणि अशी अनुभूती घेण्यासाठी व्यक्तीची तयारी करवून घेणार्याज गुरूची अनुभूती, या एकरूप असतानाच अनुभव प्रमाण मानावा. पुढे या साच्या प्रकाराला ‘वैज्ञानिक डूब देण्यासाठी ‘प्रयोगशाळेत जाऊन विशिष्ट उपकरणांनी विधिवत् प्रयोग केल्यानंतरच ते प्रमाण मानावे असेही डॉ. जोशी सांगतात. याचा सूर असा, की आत्म-शास्त्र-गुरू या त्रयीतून घेतला जाणारा अनुभव वैज्ञानिक स्वरूपाचा आहे. जर कोणी म्हटले की वैज्ञानिक प्रयोग करायलाही ‘मार्गोपदेशक गुरू लागतो तर ते चुकीचे ठरेल. प्रयोगांमध्ये काय दिसत आहे किंवा प्रत्यक्ष काय आहे, निरीक्षणे तपासून त्यांचा अर्थ लावण्यासाठी अनुमानांची जी लांबच्या लांब शृंखला समजावून घ्यावी लागते त्याला जे ज्ञान लागते ते गुरूशिवायही मिळू शकते, कारण ते सर्वमान्य भाषेत लिहिता-बोलता येते,
डॉ. जोशी जी व्यक्तीची तयारी व ती करवून घेण्यात तज्ज्ञ अशा गुरूंची भाषा बोलतात, ती वैज्ञानिक नव्हे, केवळ सश्रद्ध आहे. आणि या बाबतीत दि. य. दे. आणि डॉ. जोशी यांच्यात ‘समझोता’ मला तरी शक्य दिसत नाही. जोपर्यंत शास्त्रवचनांना प्रमाण मानणे यात मुरलेलीव्यक्तिनिष्ठ ‘श्रद्धा’ आणि त्याऐवजी विवेकवाद वापरत असलेली प्रत्यक्ष-अनुमान यांवर आधारित प्रमाण पद्धत यांच्यातील मूलभूत, अलंघ्य फरक डॉ. जोशी मान्य करत नाहीत, तोवर त्यांचे लेखन विवेकवाद्यांना केवळ शब्दच्छलच भासणार.
विवेकवादात पुन्हापुन्हा स्वतःच्या धारणा तपासणे आहे आणि डॉ. जोशींनी कितीही शब्दांचा धुरळा उडवला तरी त्यांना ‘बाबा वाक्य’ प्रमाण म्हणून मान्य आहे. आमचे गुरू व पूर्वज किती थोर, मग त्यांचे दंडक कसे तोडायचे, ही भूमिकाच विवेकविरोधी आहे, आणि हे डॉ. जोशींनी नाकारणे मला तरी शक्य दिसत नाही.
(४) डॉ. जोशींच्या प्रत्येक अन् प्रत्येक मुद्दयाला आ. सु. च्या संपादक मंडळींकडून अनेकवार उत्तरे दिली गेली आहेत. ते मात्र मागे नोंदलेल्या अन्याय्य’ मागनि कोळसा उगाळीत बसले आहेत. यात नवा युक्तिवाद नाही, नवे मुद्दे नाहीत, दुसन्याचे मत आपल्या मतापेक्षा वेगळे
आहे ते केवळ त्याच्या हट्टापायी अशी अध्याहृत टीका आहे आणि आता तर व्यक्तींच्या नावांवर कोट्याही आहेत. प्रौढत्वी निज शैशवास ‘इतके’ जपू नये. त्याऐवजी नव्या ज्ञानाची, विचारप्रणालींची ओळख तरी करून घ्यावी.
– नाहीतर आहेच, मानववंशशास्त्राऐवजी श्वेतकेतूचे दाखले देणे.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.