माहितीचा महापूर आणि संगणकाची दादागिरी

सध्याचे युग हे माहितीचे युग आहे – This is an age of information असे म्हटले जाते. आणि माहिती म्हणजे सामर्थ्य आणि सामर्थ्य म्हणजे सत्ता असे आहे. एक प्रसंग आठवतो. दहाबारा वर्षे झाली असतील. एका अमेरिकन माणसाला मी विचारत होतो, “तुम्हाला काळजी नाही वाटत आमच्या औद्योगिकीकरणाची? एकदा आम्ही पूर्णपणे ह्यात आलो की तुमचा माल कोण घेणार?तुमची श्रीमंती मग कोठे राहील?” तो हसला. म्हणाला, “ आम्ही मुळी माल विकणारच नाही. आम्ही विकू माहिती. आम्ही विकू आमची तज्ज्ञता. आमच्या आजच्या बाजारपेठांपेक्षाही ती मोठी बाजारपेठ असेल. आणि तुम्हाला म्हणून सांगतो. त्यामुळे आमची निसर्गसंपत्ती ही आमच्या देशातच राहील. देशाबाहेर जाणार नाही.’ असा हा माहितीचा महिमा
आहे.
किती बाजूंनी आज माहिती आपल्या अंगावर येत आहे. ९३ कोटी लोकसंख्या असलेल्या
आपल्या देशातील जनगणनेद्वारा मिळविलेली माहिती व्यवस्थित लावावयालाच चारपाच वर्षे लागतात. सबंध देशातल्या जमिनीच्या नोंदी! सरकारी व खाजगी कार्यालयांच्या फायली (काही वर्षांपूर्वी केंद्रसरकारच्या फायली ठेवावयाला सहा मजल्यांच्या दोन इमारती बांधण्याचा प्रस्ताव होता), आयकर खाते, आयुर्विमा खाते ह्यांची दफ्तरे, कोटें, वकील, डॉक्टर्स, अभियंते, हिशेबनीस या सा-यांची दफ्तरे -अशी सगळीकडे माहिती ओसंडून वाहात आहे. शाळा, कॉलेजे व इतर शिक्षणसंस्था आहेतच. रेल्वे, विमान कंपन्याही आहेत.
हे सर्व कमी पडत आहे म्हणून की काय वर्तमानपत्रे, मासिके, चर्चासत्रे, व्याख्याने, आकाशवाणी, दूरदर्शन ही सारी माध्यमे दिवसरात्र आपल्यावर माहितीचा भडिमार करीत असतात. जाहिरातदारांविषयी तर बोलावयालाच नको.
या सर्वांपासून आपला बचाव तरी कसा करावयाचा?विचार करता करता असे लक्षात यावयाला लागते की नोंदी (data), माहिती (information), ज्ञान (knowledge) या सगळ्या संकल्पना नीट तपासून घ्यावयाला हव्या. सत्त्व काय, भरताड काय हे समजून घ्यावयाला हवे. नीरक्षीरविवेक शिकावयाला हवा, आणि हे सारे अमानवी अशा संगणकाच्या पूर्णपणे हाती जाण्याआधी व्हावयाला हवे. त्या दृष्टीने जे थोडेबहुत वाचन केले, विचार केला, मनन केले त्याची निष्पत्ती सोबतच्या तक्त्यात आराखड्याच्या स्वरूपात देत आहे. मी काही तत्त्वज्ञानाचा अभ्यासक नाही. अध्यात्म हाही माझा अभ्यासविषय नव्हे. Theory of knowledge असाही एक अभ्यासविषय आहे म्हणे. तेव्हा या सर्व तज्ज्ञांनी या तक्त्याकडे जरा समजुतीने पाहावे ही विनंती.
पहिली गोष्ट लक्षात आली ती ही की नोंदी, जंत्र्या, आकडेवारी आणि माहिती यांत फरक आहे. या सर्व भरताडाला काही शिस्त लावल्याशिवाय त्याची माहिती होत नाही. एकदोन उदाहरणे घेऊन कसे ते आपण पाहू. नेहमीची टेलिफोन डिरेक्टरी घ्या. टेलिफोनधारकांची नावे आणि नंबर म्हणजे नुसत्या नोंदी झाल्या. त्या नीट अकारविल्हे लावल्या, त्यांच्यात शिस्त आणली की मग त्यांची माहिती होते. आता दुसरे एक उदाहरण घेऊ, दगड, विटा, सिमेंट, लाकूड, सळया हे सारे झाले भरताड. पण त्याची एका शिस्तीत आराखड्यानुसार मांडणी केली की इमारत तयार होते.
आता आणखी एक पाऊल पुढे जाऊ. माहिती म्हणजे काही ज्ञान नाही. त्या माहितीवर संस्करण व्हावे लागते. ती निरीक्षण, परीक्षण आणि विश्लेषण यांतून जावी लागते. कार्यकारणसंबंध समजून घ्यावे लागतात, नियम बसवावे लागतात, अनुमाने बांधावी लागतात. तेव्हा कोठे त्या माहितीचे ज्ञानात रूपांतर होते. वरचेच उदाहरण घ्यावयाचे तर डिरेक्टरीत शहा-पटेल किती, जोशी-देशपांडे किती, शहा-पटेलांची संख्या जोशी-देशपांड्यापेक्षा जास्त का? डॉक्टर्स किती, अभियंते किती असे सुरू झाले की डिरेक्टरी बोलावयास लागते. आपले ज्ञान वाढावयाला लागते. दुर्दैवाने बन्याच वेळा माहितीलाच ज्ञान समजण्याची प्रथा पडू लागली आहे. विश्वकोश म्हणजे ज्ञान नव्हे आणि शब्दकोश म्हणजे साहित्य नव्हे. माहिती देता येते पण ज्ञान मात्र मिळवावे लागते.
येथे फाइनमनच्या लहानपणची एक आठवण देण्यासारखी आहे. एकदा फाइनमन आपल्या वर्गमित्रांबरोबर सहलीला गेला होता. तेथे त्याचे मित्र बघितलेल्या पक्ष्यांची नावे भराभर सांगूलागले. फाइनमन बावळट ठरला. घरी आल्यावर त्याने वडिलांना दोष देण्यास सुरुवात केली. तेव्हा मग त्याचे वडील त्याला घेऊन समुद्रकाठी गेले. तेथे एक पक्षी पाण्यातून बाहेर येऊन आपली पिसे साफ करीत होता. वडिलांनी फाइनमनला विचारले, “तो काय करीत आहे?’ फाइनमन म्हणाला, ‘पिसे साफ करतोय, पाणी पुसतोय.’ वडील म्हणाले, चूक. अशी आणखी काही प्रश्नोत्तरे झाली. शेवटी पक्षी अगदी जवळ जाऊनही पाहिला आणि फाइनमनला कळले की पक्षी त्याच्या पंखात अडकलेले अगदी लहानलहान किडे, – कोंडाच जवळ जवळ – काढतोय. त्यांचे अंग फार खाजत आहे. वडील म्हणाले, “तुला हा पक्षी थोडाफार कळला, त्याचे नाव ठाऊक नाही तरीही तुझ्या मित्रांची पक्षीविषयक भाषा तुझ्यापेक्षा समृद्ध आहे, पण पक्ष्यांचे ज्ञान तुला जास्त आहे.’
वरील चर्चा ही आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत मेंदूमार्फत मिळणाच्या माहितीविषयक झाली. कितीतरी माहिती ही आपण विचारांच्या द्वारे, सूक्ष्मदृष्टीतून, तर्काद्वारे, गणिताद्वारे (mathematical logic and modeling) मिळवत असतो. किंबहुना no idea, no hypothesis, no observation, no data असे म्हणतात.
या पार्श्वभूमीवर आता आपण संगणकाचे स्वागत करू. अगदी सुरुवातीला संगणक हा फक्त आकडेमोड करणारा होता. आपणच केलेली आकडेमोड वापरून त्यावरून तो पुढचे काम करू शकतो. आणि येथेच त्याची माणसाच्या मेंदूशी तुलना व्हावयाला लागली. शिवाय संगणकामध्ये हे कार्य मेंदूच्या दहा लाखपटींनी जलद होऊ लागले. त्यामुळे ज्या जनगणनेचे विश्लेषण करावयाला पुढच्या जनगणनेपर्यंतचा काळही पुरा पडत नसे ते कार्य आता तीनचार महिन्यांतच पार पडावयाला लागले. युद्धकाळात ज्या क्षेपणास्त्रांचे मार्ग नेमके ठरवावयाला दिवसचे दिवस खर्ची पडत ते काम आता काही मिनिटांत होऊ लागले. शिवाय बिनचूकपणातही माणसांपेक्षा वरचढ! त्यामुळे data processing साठी संगणकाचा उपयोग अपरिहार्य ठरला. संगणक (computer) हे नाव मागे पडून ‘artificial intelligence’ हे नाव पुढे आले.
आता येथे एका गोष्टीचा खुलासा करणे आवश्यक वाटते. आपली व्यवहारातली भाषा ही। विचारांशी, कल्पनांशी निगडित असते. संगणकाची भाषा ही आकड्यांच्या हो-नाही, 0-1 अशा स्पंदनाशी निगडित असते. त्यामुळे व्यवहारात आपण ज्याला नोंदी, माहिती असे म्हणतो त्यांचा संगणकाच्या भाषेशी काही संबंध नाही. संगणक फक्त electrical impulses पाठवीत असतो. तो त्याच्या सांकेतिक भाषेत संदेश पाठवीत असतो, अथवा स्वीकारीत असतो. महात्मा गांधी,?, ।, १,४,७, हिरवा रंग, भूक हे सर्व त्याच्या दृष्टीने सारखेच. अशा तर्हेtने शब्द, संदेश हे एका अर्थाने तेथे अर्थहीन होतात. आपली नेहमीची भाषाच नष्ट होते. तेव्हा संगणकाच्या पोटात काय चालते कोण जाणे, आपला संबंध फक्त एकदा नोंदी, माहिती त्याच्यात भरण्यासाठी आणि नंतर त्याने काढलेल्या उत्तरांचे आपल्या भाषेत रूपान्तर करण्यापुरताच उरतो.
Intellect- बुद्धी याचा व्यावहारिक भाषेतील अर्थ आणि artificial intelligence (AI) मधल्या intellect चा अर्थ यांतही फरक आहे. संगणकाच्या दृष्टीने जे सर्व algorithm मध्ये उतरविता येते, ज्याच्या पद्धतशीर आज्ञावली लिहिता येतात, ज्याला काहीएक तर्कशुद्धरचनाक्रम आहे, क्रमबद्धमालिका आहे ते सर्व विचार करण्याच्या प्रक्रियेत बसते. तेच काम मेंदूचे असते बाकी सगळे “ठोकून देतो ऐसाजे’ या वर्गातील असते. आइनस्टाइन तर म्हणतो की ज्याला आपण व्यवहार-ज्ञानcommon sense म्हणतो ते म्हणजे अठराव्या वर्षापर्यंत जमा झालेले निव्वळ पूर्वग्रह आहेत.
संगणकाच्या बाबतीत आपण स्मरणशक्ती हा शब्द वापरतो. पण माणसाची स्मरणशक्ती ही निवडक, पूर्वग्रहदूषित, गाळून घेणारी असते. संगणकाच्या बाबतीत तेथे मूल्यविचार, मूल्यव्यवस्था यांचा पूर्ण अभाव असल्यामुळे स्मरणशक्ती म्हणजे garbage in – garbage out!
अशा या गुणविशेषांनी भरलेल्या संगणकाने माणसाच्या आयुष्यात फार जोराने मुसंडी मारून प्रवेश केला आहे. गेल्या पन्नास वर्षांतील त्याची ही घुसखोरी थक्क करणारी आहे. केवळ data processor म्हणून प्रवेश केलेल्या संगणकाने आता सर्व मानवी व्यवहारांत अग्रस्थान प्राप्त केले आहे. तो आता कविता करतो, बुद्धिबळे खेळतो, आणि लवकरच कांदबया लिहिणार आहे. तो super intelligent असा दावा करून माणसावर हुकूमत गाजविण्याची उमेद बाळगून आहे. त्याचा येथे थोडक्यात परिचय करून घेऊ.
यंत्राचा शोध लागला आणि उत्पादनव्यवस्थेतून कुशल कारागिरांचे उच्चाटन झाले. त्यानंतर स्वयंचलित यंत्रे आली आणि तंत्रज्ञ कामगारही (white-collared technicians) बाजूला पडले. आता संगणक आल्यावर नोकरशाहीचीही सुट्टी होणार आहे. Filing, recording, पत्रव्यवहार आणि अनेक गोष्टी संगणक आपल्यापेक्षा जास्त व्यवस्थित आणि कार्यक्षमतेने करतात. माणसाच्या हातापायांचे काम यंत्रे करतात; जास्त बिनचूकपणे करतात. ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियांच्या कक्षा त्यांनी अनेकपट वाढविल्या आहेत. पण हे सर्व होत असताना माणसांना कोठलाही न्यूनगंड आला नाही. उलट आपल्या बुद्धीचा अभिमानच वाटला. पण आता संगणक माणसाच्याच बुद्धीला
आह्वान देऊ लागल्यावर त्याच्याविषयी एक मानसिक दडपण येऊ लागले आहे. भले भले अभियन्ते ‘संगणकातून उत्तर आले आहे, ते चूक कसे असेल?’ असे प्रश्न विचारतात असा माझा अनुभव आहे. भले मग ते उत्तर कितीही अयुक्तिक असेना. रॉजर पेनरोजनी एक छान तुलना केली आहे.
मानवी निर्णय संगणकीय निर्णय
१. जाणीव, बुद्धी, अहंकार लागतो – हे काहीही लागत नाही.
२. योग्यायोग्यतेचा विचार व्यावहारिकविचार होतो – साचेबद्ध काम होते.
३. सत्याची जाणीव असते, न्यायान्याय – एकदा ठरवून दिलेल्या चाकोरीतून
पाहिला जातो, नैतिक मूल्ये नियमांच्याकाटेकोरपणाने
जोपासली जातात. काम चालू राहते.
४. समजून उमजून काम केले जाते – फक्त आज्ञावलीप्रमाणे काम होते.
५. अंगभूत सौंदर्याच्या अनुभूतीवर विचारांची, तर्काची एक दिशा
आधारित कार्य होत असते. ठरविली असते त्याप्रमाणे काम होत बटबटीत, दुष्टहेतुपूर्वक, राहते.
हेंगाड़ी कामे होत नाहीत.
मनात असा विचार आला की इंग्रजांनी आपल्यावर जे राज्य केले, ते त्यांच्या दृष्टीने चोखपणे, पण संगणकछाप नोकरशाहीच्या माध्यमातूनच ना?यंत्रे ही माणसांपेक्षा कित्येक पटींनी कार्यक्षम असतात हा अनुभव जमेस धरता संगणकच जेव्हा संपूर्ण नोकरशाहीचे काम करू लागेल तेव्हा काय होईल याच्या विचाराने बेचैन व्हावयाला लागते. तुलनेने काहीच नाही अशी नोकरशाहीच किती त्रासदायक आणि भयंकर असते ते आपण अनुभवतच आहोत.
संगणक आता शिक्षणक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रवेश करीत आहे. Personal computers आल्यामुळे हे सहजशक्य झाले आहे. पाश्चात्त्य जगात आज ज्या गोष्टीला बाजारपेठ नाही तिला काहीही महत्त्व दिले जात नाही. नटनट्या आणि खेळाडू तर विकले जातातच, पण विद्वानही विकले जातात. या संस्कृतीची नक्कल करताना आपणही नाही का आपले देवसुद्धा विकावयाला काढले आहेत? ते असो, पण एकट्या अमेरिकेत संगणक Hardware + Software कारखानदारांची वार्षिक उलाढाल रु. १,७५,००० कोटी इतकी आहे! एका पाठोपाठ एक संगणकाच्या उत्पादकांनी ‘शिक्षणात आता संगणकाला पर्यायच नाही’ असा जोरदार डांगोरा पिटावयाला सुरुवात केली. प्रत्येकाला ‘संगणक-साक्षरता असावयालाच हवी ही घोषणा दिली. आपल्या मालाची मागणी वाढविण्यासाठी शाळाकॉलेजातून संगणक फुकट वाटले. नेटवर्किंग, ई-मेल यांना उचलून धरले; त्यांच्या सुविधांची वर्णन-कीर्तने लावली. विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी ‘Learn what you want, learn when you want; learn only as much as you want and test yourself your own knowledge’ – असे सांगावयाला सुरुवात केली. २००० सालापर्यंत पाश्चात्त्य राष्ट्रांत दर दहा विद्यार्थ्यांमागे एक संगणक असेल. आपल्याला हे सगळे परवडणार आहे?याला लागणारा नुसता कागदच किती कोटी हेक्टेरवरील जंगले तोडावयाला लावील.
निव्वळ शिक्षणाच्या दृष्टिकोनातून बघितले तरी संगणक-साक्षरता म्हणजे नेमके काय?आयते software वापरावयाला शिकणे की software तयार करावयाला शिकणे?शिक्षकांनी संगणकाचा वापर करून शिकवावयाचे की संगणकाविषयी मुलांना शिकवावयाचे की विद्यार्थ्यांनी शिक्षकांऐवजी संगणकाकडून शिकावयाचे? हे प्रश्न शिक्षणतज्ज्ञांचे आहेत. संगणक विक्रेत्यांचे किंवा त्यासाठी software तयार करून ते विकणान्यांचे नाहीत. शिक्षणात शिकविणारा आणि शिकणारा यांत काही मानसिक दुवा असावयाला हवा की नको?शिक्षण परस्परसंवादातून उभे राहते. ते interactive असते. प्रत्येक विद्यार्थ्यांची गरज, समज वेगळी असते.शालेय स्तरावर तर मुले अत्यंत संवेदनाक्षम असतात. या सर्वांचा विचार नको व्हावयाला?की एका बाजूला कारखान्यातून बाहेर पडलेले संगणकशिक्षक आणि दुसर्याे बाजूला शाळा नावाच्या कारखान्यातून बाहेर पडणारे एका मॉडेलचे एकसारखे विद्यार्थी यांचे उत्पादन करीत राहावयाचे!
अत्यंत केन्द्रीभूत व्यवस्था आपण निर्माण करीत आहोत. चार ठिकाणचे संगणक बिघडले की रेल्वे-विमान बुकिंग बंद, चार पाच तास वीजपुरवठा खंडित झाला तर दोनशेतीनशे कोटी रुपयांचे नुकसान होते. संगणकात विषाणु शिरला तर कित्येक महत्त्वाच्या जमिनीच्या किंवा इतर नोंदी नष्ट होऊ शकतील. प्रत्येक नागरिकाचा व्यक्तिगत बायोडेटा सरकारकडे महासंगणकांवर जमाझाला तर व्यक्तीचे खाजगी जीवनच संपुष्टात येईल. संगणकासंबंधी अशा अनेक दृष्टिकोनांचा विचार, करता येईल, नव्हे करावयाला हवा आहे. संगणक माहितीचे प्रचंड ढिगारे उपसू शकतो आणि त्यांतून तुम्हाला हवे ते चुटकीसरशी देऊ शकतो. पण इतकी माहिती मुळात गोळा करण्याची गरजआहे का असे प्रश्न आपण विचारावयाला हवेत.
पण सामान्य माणसेच काय, आजचे नेतृत्वही असे आहे की आपल्या स्वतःच्या शासकीय जबाबदार्याच ते नोकरशाहीवर टाकावयाला, राजकीय-सामाजिक जबाबदाच्या न्यायव्यवस्थेवर सोपवावयाला, आर्थिक प्रश्न जागतिक बँकेकडे द्यावयाला आणि आता शिक्षण संगणकाकडे सुपूर्द करावयाला उत्सुक आहे.
अल्लाउद्दीनच्या दिव्यातला राक्षस अल्लाउद्दीनला सुद्धा जमत नाहीत अशा कित्येक गोष्टी त्याच्यासाठी क्षणात उरकतो. पण काय हवे, काय करावयाचे ते अल्लाउद्दीनच ठरवितो. आणि राक्षसही अमुक गोष्ट माझ्या पलीकडची आहे असे वेळोवेळी स्पष्टपणे सांगतो. यातले इंगित कळले काय?वर मागायलादेखील शहाणपण लागते.
संगणक हा माणसाच्या विचारशक्तीला संकल्पशक्तीला पर्याय होऊ शकत नाही. दुर्दैवाने तो तसा स्वीकारला जाण्याची शक्यता आज निर्माण झाली आहे. बौद्धिक आलस्य असणारे अनेक गुलाम आनंदाने आपला भार संगणकावर टाकतीलही. सुदैवाने अजूनही अशी माणसे शिल्लक आहेत की ज्यांना आपल्या डोक्याला त्रास द्यावयाला आवडतो. ती आपले स्वातंत्र्य सहजी गमावत नाहीत. हिटलर-स्टालिन हरतात. साम्यवाद माघार घेतो. सार्वभौम बाजारपेठांचे ठेकेदारही हरतील; अगदी संगणक त्यांच्या हातात असला तरीही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.