आस्तिकता आणि विज्ञान

याच अंकात पत्रव्यवहारात वरील विषयावर तीन पत्रे आली आहेत. पत्रलेखकांपैकी एक तर चक्क वैज्ञानिक आहेत असे ते स्वतःचसांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या मताला विशेष महत्त्व असणार!
डॉ. हेमंत आडारकर हे ते पत्रलेखक. विज्ञानक्षेत्रातील संशोधनाचा दहा वर्षांचा अनुभव . त्यांच्या गाठीशी आहे. टाटा मूलभूत संशोधनसंस्थेत त्यांनी दहा वर्षे भौतिकीत संशोधन केले आहे. तेव्हा बघू या ते काय म्हणतात ते.
ते म्हणतात ‘आस्तिकता आणि विज्ञान परस्परविरोधी गोष्टी आहेत असे गृहीत धरणे बरोबर नाही. उलट ‘वैज्ञानिक आणि आस्तिकता यांचा घनिष्ठ संबंध आहे. या मताच्या पुष्ट्यर्थ ते काय पुरावा देतात?ते म्हणतात, वैज्ञानिक बहुतांशी आस्तिक, धार्मिक, अंधश्रद्ध देखील असतात. आता हा काय विज्ञान आणि आस्तिकता यांत विरोध नसल्याचा पुरावा झाला?त्याने फार तर वैज्ञानिक आणि आस्तिकता यांत विरोध नाही असे म्हणता येईल. पण विज्ञान म्हणजे वैज्ञानिक नव्हे. मोठमोठे वैज्ञानिक, अति थोर वैज्ञानिकही, आस्तिक होते हे तर सर्वज्ञात आहे. पण वैज्ञानिक मोठ्या संख्येने आस्तिक असले तरी विज्ञान मात्र आस्तिक नाही असे माझे प्रतिपादनआहे. याचे कारण अनेक वेळा दिले गेले असल्यामुळे त्याचा मी उल्लेख केला नव्हता. पण ते फिरून दिल्याशिवाय चालणार नाही असे दिसते. आस्तिक्य म्हणजे ईश्वर आहे असा दृढविश्वास. ईश्वराच्या अनेक कल्पना आहेत, पण सामान्यपणे ईश्वर म्हणजे सर्वशक्तिमान, सर्वज्ञ आणि असीम साधु अशी शक्ती आहे असे समजतात. त्या शक्तीचे अस्तित्व मानण्याला पुरेसे कारण तीन हजार वर्षांत मी मी म्हणणाच्या अत्यंत बुद्धिमान धार्मिकांनाही सापडलेले नाही. अर्थात् आस्तिक्य ही श्रद्धा आहे, म्हणजे ज्याचे काहीही निर्णायक प्रमाण नाही अशा गोष्टीवरील विश्वास.
आता विज्ञान किंवा वैज्ञानिक रीत काय आहे? विज्ञानाचे कार्य निसर्गाचे नियम शोधून ते नेमकेपणाने ग्रथित करणे. हे करण्याकरिता वैज्ञानिकावर काही बंधने असतात की नाही? निसर्गाचे नियम काही मोठ्या अक्षरांत निसर्गात लिहिलेले नसतात. ते शोधून काढणे अतिशय जिकिरीचे काम असते. त्याकरिता कल्पनाशक्ती वापरावी लागते. निसर्गात काय नियम असतील याची कल्पना करावी लागते. पण त्या कल्पनेवर अनेक निबंध असतात. तिने नैसर्गिक घटनांचा उलगडा झाला पाहिजे; संशोधनक्षेत्रातील सर्व घटनांचा उलगडा झाला पाहिजे; आणि अन्य कुठल्याही कल्पनेपेक्षा अधिक पूर्णपणे झाला पाहिजे. निसर्गाच्या एखाद्या विभागातील घटनांचा नियम काय असेल त्याच्या कल्पनेला hypothesis (उपन्यास) म्हणतात. हा उपन्यास प्रत्यक्षघटनांना लागू पडणारा असला पाहिजे. म्हणजे उपन्यासाचे परीक्षण आले. त्याचे verification आले. म्हणून एखाद्या घटनेचे कारण ईश्वर आहे, किंवा पिशाच आहे, असा उपन्यास वर्म्य असतो; कारण ईश्वर किंवा पिशाच यांची परीक्षा करता येत नाही. त्या परीक्षेत उपन्यास उतरला तर तो निसर्गाचा नियम म्हणून स्वीकृत होईल. पण तोही सदाकरिता नव्हे. कारण त्याच क्षेत्रातील घटनांचा उलगडा अधिक चांगल्या रीतीने करणारा उपन्यास कालांतराने सुचू शकतो. असे झाले तर आधीचा नियम रद्द होतो, आणि नवीन नियम प्रस्थापित होतो.
हे झाले विज्ञानाचे स्थूल स्वरूप. त्याच्या तुलनेत आस्तिक्याची स्थिती काय आहे?ईश्वर हा उपन्यास आहे काय?ईश्वर म्हणजे काय?ती एक शक्ती आहे की व्यक्ती आहे?ती भौतिक आहे की भौतिक-चेतन आहे, की आणखी तिसर्याईच प्रकारची आहे. जगाचे कारण ईश्वर आहे असे म्हणणे सोपे आहे. पण भौतिक जग त्याने कसे निर्मिले अशी आपली कल्पना आहे?खरे म्हणजे ईश्वराने जग निर्मिले असे म्हणणे आणि ते निर्माण झाले किंवा ते निर्माण झाले काय हे मला माहीत नाही असे म्हणणे एकच आहे. त्यात दुसरे निदान प्रामाणिक आहे, पहिल्यात केवळ आत्मवंचनाआहे.
पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट स्वीकारू नका हा विज्ञानाचा पहिला धडा आहे. पुराव्याशिवाय श्रद्धा ठेवणारी आस्तिकता आणि विज्ञान यांत विरोध नाही कसा?
अनेक वैज्ञानिक धार्मिक असतात हे खरे आहे, पण त्यांची धार्मिकता त्याच्या विज्ञानाला बाधक होत नाही; कोपर्निकस सूर्यपूजक असल्यामुळे त्याला सूर्यकेंद्रिक उपपत्ती सुचली असेल, किंवा पटलीही असेल; पण तिचा ज्योतिःशास्त्रात स्वीकार होण्याशी या गोष्टीचा काही संबंध नव्हता. ती कल्पना प्रत्यक्ष सूर्यमालेला लावून, ती टॉलेमीच्या व्यवस्थेपेक्षा सरस आहे हे दाखवावे लागले, आणि त्यामुळे तिचा स्वीकार झाला. तसेच रामानुजम्ला देवीने दृष्टान्त दिला आणि स्वप्नात काही सूत्रे सांगितली हे खरे असेल; पण ती सूत्रे सत्य होती याच्याशी त्या दृष्टान्ताचा संबंध नव्हता. ती सूत्रे खरी आहेत हे गणित्यांना स्वतंत्रपणे पटावे लागले. वैज्ञानिक संशोधनातील उपन्यास सुचणे ही गोष्ट वैज्ञानिकाच्या हातात नसते. कोणाला काय कल्पना सुचेल याचा नेम नसतो. न्यूटनला फळ पडताना पाहून गुरुत्वाकर्षणाची कल्पना सुचली. खुद्द रामानुजमुला देवीच्या दृष्टान्ताशिवायही सत्य समीकरणे सुचत होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीच्या दृष्टान्तामुळे समीकरणे सत्य ठरली नाहीत; ती खरी ठरली गणिताच्या नियमांनुसार ती होती म्हणून, देवीने सांगितली म्हणून ती कोणी मानली नाहीत.
आडारकर म्हणतात की विज्ञान अनेक गृहीतांवर आधारित आहे, आणि त्या गृहीतांची सत्यासत्यता पडताळणे नेहमीच शक्य नसते. १९ व्या शतकापर्यंत जी गृहीते होती त्यांच्याहून क्वाँटम मेकॅनिक्सची गृहीते वेगळी आहेत, आणि जुन्या आणि नव्या गृहीतांबद्दल पराकोटीचे संघर्ष चालू आहेत. अशा वेळेला वैज्ञानिकांना देव आठवतो असे आडारकर म्हणतात. पण देव आठवतो म्हणजे काय होते?देवकल्पनेच्या साह्याने त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. खरे म्हणजे थोर वैज्ञानिकांचे देवाविषयीचे उद्गार अक्षरशः सत्य विधाने म्हणून घेऊ नयेत. काहीसे साहित्यिक, काहीसे lighthearted, काहीसे चतुर उद्गार म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागते. गंभीरपणे घेतल्यास त्यांनी कोठल्याही प्रश्नाचा निकाल लावता येत नाही हे खरे आहे.
विज्ञान सर्व गोष्टींचेरहस्य उलगडेल हा आशावादी दृष्टिकोन आहे असे आडारकर म्हणतात. तो चुकीचाही आहे, आणि कोणीही शहाणा माणूस तो स्वीकारीत नाही. बरोबर दृष्टिकोन असा आहे की निसर्गाची रहस्ये सुटणार असतील तर ती वैज्ञानिक रीतीनेच सुटतील.
आडारकर म्हणतात की ‘मी अधार्मिक आहे पण नास्तिक नाही. मला विज्ञान आणि साम्यवाद यांच्या अध्ययनाने अधार्मिक बनविले. पण धर्मावरील श्रद्धा जाण्यास विज्ञान आणि साम्यवाद यांतील नेमक्या कोणत्या गोष्टी कारण झाल्या हे त्यांनी सांगितले नाही. त्याच विज्ञानाच्या अभ्यासाने त्यांचे आस्तिक्याचे आकर्षणही नाहीसे व्हावे. धर्म ईश्वरावाचून शक्य नाही. त्यामुळे आडारकर धार्मिक नाहीत, पण आस्तिक आहेत हे बुचकळ्यात पाडणारे वाटते.
ईश्वराचे अस्तित्व आणि नास्तित्व दोन्ही गोष्टी falsifiable नाहीत हे मला बरोबर वाटत नाही. ईश्वरकल्पना जर निश्चित केली तर तिचे खंडन कशाने होईल हे सांगता येते असे मला वाटते. उदा. सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, आणि सर्वसाधु हे जर ईश्वराचे स्वरूप अभिप्रेत असेल तर जगातील प्रचंड दुःखाचे अस्तित्व ईश्वराचे खंडन करण्यास पुरेसे आहे. तो आदिकारण आहे हे मत चुकीचे आहे, कारण आदिकारणाची कल्पना व्याघातयुक्त आहे. ज्या नियमाने आपण आदिकारणापर्यंत जातो (म्हणजे प्रत्येक घटनेला कारण आहे या नियमाने) त्याच नियमाने तथाकथित आदिकारणाचेही कारण असले पाहिजे. ईश्वराचे स्वरूप प्रार्थनेला पावणारा असे असेल तर त्याचे खंडन सहज करता येईल.
आडारकर म्हणतात : ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अणुकेंद्रावर व जड वस्तुमान असलेल्या तत्त्वांच्या गाभ्यावर संशोधन करताना मला असे काही अनुभव आले की विश्वाच्या उत्पत्तीत किंवा संरचनेत कोण्या सूत्रधाराचा हात नाही असे ठामपणे सांगता येत नाही. पण ते अनुभव कोणत्या प्रकारचे होते ते ते सांगत नाहीत. असेच अनुभव प्रा. एकल्सनाही मज्जाशास्त्रातील संशोधन करताना आले होते असे प्रा. बा. वि. ठोसर म्हणतात. ते नेमके काय होते ते कळेपर्यंत त्यांचे महत्त्व निश्चित करणे अशक्य आहे.
श्रद्धा, ईश्वर, धार्मिकता वा आस्तिकता ह्या कल्पना अशास्त्रीय नाहीत, अतिशास्त्रीय आहेत असे आडारकर म्हणतात. अतिशास्त्रीय म्हटल्याने त्यांना कोणतेतरी प्रामाण्य दिले जाते. पण ते कोणते ते कळत नाही. अतिशास्त्रीय’ हा शब्द non-scientific चा पर्याय म्हणून ते वापरतात, पण इंग्रजी शब्दात प्रामाण्य असल्याची सूचना नाही.
डॉ. श्रीनिवास खांदेवाले
दुसरे पत्रलेखक आहेत डॉ. श्रीनिवास खांदेवाले. त्यांनी तीन प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांना यथाशक्ति उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
ते म्हणतात की ‘दि. य. देशपांडे यांनी केलेल्या चर्चेत ईश्वर आहे की नाही हा प्रश्न फक्तविश्व निर्माण झाल्यानंतर आणि माणसाला सध्याचे रूप प्राप्त झाल्यानंतरच उद्भवतो असे दिसते.या वाक्याचा अर्थ मला नीट लागला नाही. ईश्वर आहे की नाही हा प्रश्न फक्त माणसेच विचारतात; अन्य कोणी विचारत असल्यास आपल्याला माहीत नाही. आणि माणसे निर्माण झाल्यावर आणि हा प्रश्न विचारण्याइतकी त्यांची बुद्धी प्रगल्भ झाल्याशिवाय ते हा प्रश्न विचारू शकणार नाहीत हे उघड आहे. असो.
ते म्हणतात की विश्व जर सत्य घटना असेल तर त्या घटनेचे विवेकावर आधारलेले उत्तर असले पाहिजे. ते उत्तर कोणते?असे ते विचारतात. ते उघडच गृहीत धरत आहेत की मनुष्य कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. मानवाच्या बुद्धीला मर्यादा असू शकतील, आणि काही प्रश्नांची उत्तरे तिच्या आटोक्याबाहेर असू शकतील. विश्वाच्या उत्पत्तीचा प्रश्न तसा दिसतो. कदाचित् विश्वाची उत्पत्तीच झाली नसेल, म्हणजे ते अनादि असेल. पण त्यापैकी कोणतेही उत्तर देण्याचेसामर्थ्य निदान आज तिच्या जवळ नाही. उद्याचे सांगता येत नाही.
(२) शास्त्रीय संशोधन आणि आस्तिकता या दोन गोष्टी परस्परांशी असंबद्ध अशा दोन हवाबंद कप्प्यात ठेवता येत नाहीत असे मला वाटते….प्रत्यक्षात वैज्ञानिक त्यांची सांगड कशी घालतात हे गूढ आहे,’ असे मी माझ्या लेखात म्हटले होते. त्याचा अर्थ असा की जे त्या दोन गोष्टी अविरोधी मानतात त्यांच्या विचारात विसंगति, व्याघात असतो. नंतर मी म्हणालो की श्रद्धावादी माणसाला कोणत्याही विषयाचा अभ्यास केला तरी आपल्या श्रद्धेला पोषक पुरावे मिळतात. म्हणजे अर्थात् विवेकावर आधारित पुरावे नव्हेत, तर कृतक पुरावे. त्यामुळे त्या दोन विधानांमध्ये विसंगती नाही.
(३) खांदेवाले म्हणतात, “संशोधक फावल्या वेळात श्रद्धेला खतपाणी घालत असतील, पण प्रयोगशाळेत विवेकाची बंधने काटेकोर पाळत असतील, तर विवेक आणि श्रद्धा याचे दोन कप्पे स्वतः देशपांडेच सुचवीत नाहीत काय?’
असे दोन स्वतंत्र कप्पे आस्तिक वैज्ञानिकांच्या विचारात असतात हे खरेच आहे. पण असे करणे सुसंगत, व्याघातमुक्त नसते. विवेकाची बंधने वैज्ञानिक संशोधनात पाळणारा मनुष्य विज्ञानाबाहेर ती कशी विसरतो हे गूढ आहे असे मी म्हणालो होतो. तार्किक सुसंगतीच्या दृष्टीने हे विसंगत आहे असे मला म्हणायचे आहे.
वैज्ञानिकांच्या संशोधनावर जगातल्या सर्व वैज्ञानिकांचा पहारा असतो असे मी म्हणालो आहे. यावर खांदेवाले विचारतात की आस्तिक असलेले वैज्ञानिक एकमेकांच्या संशोधनावर पहारा कसा ठेवणार?
हे सोपे आहे. वैज्ञानिक संशोधन ही लपविण्याची गोष्ट नाही, ती जाहीर व्हावी लागते. जगातल्या संशोधनपत्रिकांत ती प्रसिद्ध व्हावी लागतात. मगच त्यांना संशोधन म्हणून मान्यता मिळू शकते. आता मी वरच म्हणालो आहे की जर विज्ञानाची पथ्ये कोणी पाळली नाहीत तर त्याला वैज्ञानिक म्हणून कोणी ओळखणार नाही, आणि त्याचे संशोधन मान्यही होणार नाही. म्हणजे संशोधनात विवेकाची बंधने पाळली गेली असणे हे अत्यावश्यक असते. आस्तिक वैज्ञानिकालाहीही बंधने माहीत आणि मान्य असतात. त्यामुळे कोणाच्याही संशोधनावर जगभरच्या वैज्ञानिकांचा पहारा असतो असे मी म्हटले.
श्री. गं. र. जोशी
श्री. जोशी यांनी एकच प्रश्न विचारला आहे. तो असा – ‘मानवाच्या पराधीन पुत्राची ईश्वर’ हीच भावनिक किंवा आंतरिक गरज आहे हेही न मानण्यात निखळ विवेकवादातील एक त्रुटि तर नसेल ना!’
मानवाचा पराधीन पुत्र म्हणजे कोण?पण ते जाऊ द्या.
येथे भावनिक गरज आणि आंतरिक गरज म्हणजे काय असा प्रश्न उद्भवतो. सगळ्याच गरजा शेवटी भावनिक असतात. पण ‘आंतरिक’ गरज म्हणजे काय?जी गरज पुरी होऊ शकत नाही ती जरी आपल्याला महत्त्वाची वाटली तरी ती बाळगणे व्यर्थ आहे आणि ती विसरण्याचा प्रयत्न करणे हे समंजसपणाचे नाही काय?नेमक्या याच कारणासाटी कांट या थोर तत्त्वज्ञाने आत्म्याचे अमरत्व आणि ईश्वराचे अस्तित्व मानले होते. तो म्हणतो की आपल्या सद्गुणानुसार सुख मिळणे ही आपली रास्त अपेक्षा असते. पण इहलोकात ती पुरी होत नाही. म्हणून मरणोत्तर अस्तित्व असले पाहिजे, कारण कालांतराने अर्हतेनुसार सुखप्राप्ती आपल्याला मिळू शकेल. आणि अशी योजना करणारा ईश्वरही असला पाहिजे. कारण त्याशिवाय ही योजना प्रत्यक्षात उतरणार नाही. पण आपल्या गरजा पुरवायला निसर्ग बांधलेला नाही. सदाचरणी लोकांना सुख मिळावे ही गरज नैतिक असेल, ती निसर्गावर बंधनकारक नाही. अतिशय तीव्र उत्कट ‘आंतरिक इच्छाही पुरी होईल याची शक्यता नाही.
मध्ययुगात सगळेच ईश्वरवादी होते. पुनरुज्जीवना – (renaissance) नंतरच्या काळात तुरळक निरीश्वरवादी निघाले. आता कालच्यापेक्षा निरीश्वरवादी अधिक आहेत. ही संख्या सतत वाढत जाणार आहे असे मानायला हरकत नाही.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.