फिरून एकदा स्त्रीमुक्ती

गेली कमीत कमी दहा वर्षे स्त्रीमुक्तीची चळवळ आपल्या देशात चालू आहे. पण स्त्रीमुक्तीविषयी, किंवा असे म्हणू या की त्या विषयाच्या व्याप्तीविषयी, आपणा बहुतेकांच्या मनांत संदिग्धता आहे. आपल्या स्त्रीमुक्तिविषयीच्या कल्पना अद्याप धूसर किंवा अस्पष्ट आहेत. बहुतेक सर्वांच्याच कल्पनेची धाव स्त्रीमुक्ती म्हणजे पुरुषांनी स्त्रियांना घरकामात मदत करून त्यांची ढोरमेहनत कमी करावी आणि त्यांना आजच्यापेक्षा जास्त मानाने वागवावे ह्यापलिकडे जात नाही. (वरच्या समजाला मदत म्हणून काही ज्येष्ठ समंजस स्त्रिया स्त्रीपुरुषसंबंधामध्ये पुरुष बेजबाबदारीने वागतात, पण त्यांची बरोबरी करावयाची म्हणून स्त्रियांनी पुरुषांसारखे बेजबाबदारीने वागू नये; आपले शील सांभाळावे असे सांगतात.) पण एवढ्याने खरोखर स्त्री मुक्त होईल?

स्त्रियांची मुक्तता म्हणजे त्यांची कौटुंबिक किंवा वैवाहिक बंधनातून मुक्तता नव्हे, तर त्यांना मिळणाच्या दुय्यम दर्जाच्या वागणुकीपासून मुक्तता.
स्त्रियांची मुक्तता म्हणजे त्यांची घरकामापासून मुक्तता नव्हे, तर पुरुषांच्या, पुरुषजातीच्या अंकित राहण्यापासून मुक्तता. स्त्रियांची मुक्तता म्हणजे त्यांची जी घुसमट होते, त्यांचा जो मनांतल्या मनांत इतरांशी मूक संवाद चालतो त्यापासून मुक्तता. आणि स्त्रियांची मुक्तता म्हणजे त्यांची भयापासून मुक्तता. भय पुरुषांच्या बलात्काराचे; भय बापाला आपल्या लग्नात त्याच्या ऐपतीबाहेर मोठा हुंडा द्यावा लागेल ह्याचे; भय सासरची मंडळी आपला छळ करतील ह्याचे, त्यांच्या छळाची मजल आपल्याला जाळून मारून टाकण्यापर्यंत जाईल ह्याचे; भय उपासमारीचे; भय नवरा टाकून देईल ह्याचे; भय नवरा आपल्या चारित्र्याबद्दल संशय घेईल, त्याच्यावर केव्हाही शिंतोडे उडवील त्याचे; आपल्यावर खोटेच आळ घेऊन कोणी तिऱ्हाईत कुटिलपुरुष आपल्याला आयुष्यातून उठवील ह्याचे, भय नवरा आपला पदोपदी अपमान करील ह्याचे; तो आपल्या उरावर सवत आणील ह्याचे; भय नोकरीमध्ये ‘बॉस’ नको त्या मागण्या करील ह्याचे; आणि सगळ्यांत मोठे भय आपल्या अत्यन्त स्वाभाविक अश्या भावना आणि अगदी नैसर्गिक अशा प्रेरणा, ज्यांना सहजप्रेरणा म्हणतात, ज्या सर्व प्राण्यांच्या ठिकाणी असतात असे सांगतात, त्या कधी चुकून, आपल्या नकळत प्रकट होतील ह्याचे.

ह्या शेवटच्या भीतीपोटी सुसंस्कृत स्त्रीला अखंड सावधानता बाळगावी लागते. त्या भीतीमुळे ती अकाली प्रौढ होऊन जाते. हसतमुख स्त्री फार क्वचित् आढळते. सभासंमेलनांत अशी स्त्री जेव्हा हसते तेव्हा ते हास्य बहुधा कृत्रिम असते, कृतक असते, अभिनीत असते. मानवप्राण्याचे व्यवच्छेदक लक्षण असलेले जे हास्य, तेच ती गमावून बसली आहे. ह्या अनेकविध भयांतून भारतातल्या कोणत्याही धर्माच्या सुसंस्कृत स्त्रीची सुटका झालेली नाही.

स्त्रियांच्या ठिकाणी फक्त एकच सहजप्रेरणा असावी अशी आमच्या समाजधुरीणांची अपेक्षा आहे. ती आहे भीतीची. आदर्श स्त्री कशी असावी- आधी ती भीरु असावी. ती नम्र असावी, तिच्या ठिकाणी अमर्याद तितिक्षा असावी, म्हणजे तिने आपल्या शरीरधारणेसाठी आवश्यक असलेल्या क्षुधातृषेसारख्या सहजप्रेरणादेखील मारून टाकलेल्या असाव्या अशी जेथे अपेक्षा आहे तेथे कामप्रेरणेचा तर तिला वाराही लागू नये असे आमच्या समाजधुरीणांना वाटत असणे अगदी स्वाभाविक आहे.

स्त्रीच्या ठिकाणी, त्यातून पतिव्रता आर्य स्त्रीच्या ठिकाणी, भारतीय कुलीन कुमारिकेच्या ठिकाणी कामप्रेरणा! अब्रह्मण्यम्! असे ‘विषय’ उच्चकुलीन स्त्रीपुरुषांच्या अधःपाताला कारणीभूत होतात हे काय मोहनीला माहीत नाही? एकान्तात, त्या वैध आणि पूर्णपणे आश्वस्त अशा वातावरणातल्या एकांतातसुद्धा, सुसंस्कृत म्हणजे घरंदाज, खानदानी स्त्रीने आपला विनय न गमावणे, आपल्या सहजप्रेरणा दाबून टाकणे आणि ‘आलिया भोगासी असावे सादर’ अशी निरिच्छ आणि उदासीन वृत्ती धारण करून आपला देह पुरुषाच्या अधीन करणे हेच तिचे परमकर्तव्य आहे हे दिवाकर मोहनीला माहीत नाही काय?

मुळात स्त्रीच्या ठिकाणी बुद्धीच कमी, किंवा आहे ती प्रलयंकरा. त्यामुळे तिने एकांतात वागावे तसेच ती सर्वलोकांसमक्ष वागली तर केवढी आपत्ती ओढवेल! कोणत्याही स्त्रीला काळवेळाचे भान राहणे शक्य नाही. त्याकरिता तिने उदासीन, सर्वतोपरी विरक्त अशी वृत्ती सदासर्वकाळ धारण करावी हे बरे.’ थोडक्यात, तिने सजीव यन्त्रासारखी, एखाद्या बोलक्या बाहुलीसारखी वागणूक ठेवली पाहिजे. किंवा तहानभूक नसलेल्या निर्जीव यन्त्रमानवासारखे सतत कार्यतत्पर असले पाहिजे. नवऱ्याने कितीही छळ केला तरी तो सोसला पाहिजे. ही त्यांनी निमूटपणे सोसण्याची अपेक्षा नवीन नाही. कविकुलगुरु कालिदासांच्या शाकुन्तलात जो उपदेशपर श्लोक आहे – ‘शुश्रूषस्व गुरून् कुरु प्रियसखीवृत्तिं सपत्नीजने व त्यापुढे ‘भर्तुर्विप्रकृतापि रोषणतया मा स्म प्रतीपं गमः’ वगैरे, त्यामधून त्या अपेक्षेचे प्रतिबिंब उमटले आहे आणि तत्कालीन समाजामधले उच्चवर्णीय स्त्रियांचे स्थान त्यांच्या आजच्या स्थानाहून वेगळे नव्हते हे स्पष्ट आहे.

स्त्रिया ह्या आदर्शापासून स्वतःहून जोपर्यंत विचलित होत नाहीत – ढळत नाहीत – तोपर्यंत त्या स्वतः आपल्याकडे पुरुषांची उपभोग्य वस्तू म्हणून पाहतात असे म्हणणे भाग आहे. आणि म्हणून पुरुषांनी त्यांच्याकडे केवळ उपभोग्य वस्तू म्हणून पाहू नये असे म्हणणे म्हणजे आम्ही स्वतः पुरुषांच्या उपभोगासाठीच आहोत, पण पुरुषांनी मात्र आम्हाला तसे वागवू नये असे म्हटल्यासारखे आहे व त्यामुळे व्यर्थ आहे.

स्त्रीपुरुषांनी एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याच्या आणाभाका जोपर्यंत घेतलेल्या नाहीत तोपर्यंत त्यांना कोणी जाब विचारू नये हे स्वाभाविक नाही काय? पण सध्या काय परिस्थिती आहे? एखाद्या मुलीला पसंत करणारा पुरुष जर आयुष्यभर भेटला नाही तर तिला आपल्या . इच्छा कायमच्या मारून टाकाव्या लागतात. कोणत्या तरी अनाम पुरुषाच्या नावाने आपले शीलसांभाळण्यासाठी जन्मभर झुरत राहावे लागते. ही त्यांची स्थिती त्यांचा आपल्या समाजातला दर्जा दाखविते. त्या जणू ज्यांच्यावर ‘do not use if seal is broken’ असे लिहिलेले आहे अशा दुकानांत मांडलेल्या मोहोरबंद बाटल्या आहेत! हे त्यांचे बाटलीपण आमच्या भारतीय समाजाला संमानास्पद आहे की अपमानास्पद आहे? पण आमचा पुरुषप्रधान संवेदनशून्य परंपराभिमानी समाज आपल्या श्रेष्ठ संस्कृतीच्या अभिमानापोटी त्यांचे तसेच असणे योग्य आहे असे समर्थन करतो, आणि आमच्या मूढ व त्याचबरोबर अनन्यगतिक असलेल्या स्त्रिया त्यांच्या अशा स्थितीला आपला ललाटलेख मानून चालतात! ह्या विसाव्या शतकाच्या शेवटी सुशिक्षित स्त्रियांचे असे करणे कितपत योग्य आहे हे त्यांनीच ठरवावे. मागच्या शतकामध्ये उच्चवर्णीय विधवांची घोर विटंबना होत असे. त्यावेळी त्या त्यांच्या पूर्वजन्मीच्या पातकामुळे हे असे घडत आहे असे मानून स्वतःला भगवत्कोपभाजन आणि दैवहत समजत होत्या. आज दुरून, तटस्थपणे त्या घटनांकडे पाहून आपणाला, आणि मुख्यतः तरुण स्त्रियांना हे समजावयाला हवे की त्या विधवांवर दैवाचा कोप झालेला नव्हता, तर त्या काळाच्या समाजधुरीणांच्या स्त्रियांच्या पावित्र्याविषयी ज्या कल्पना होत्या- मानवी समजुती होत्या – त्यांच्या त्या बळी होत्या.

मुळात आदर्श भारतीय स्त्री हा मानवप्राणी नाहीच. तो अतिमानुष योनीतला प्राणी आहे. अशा अतिमानुष व्यक्तींना स्वतःच्या इच्छा नसतात. त्या फक्त पुरुषांच्या इच्छा तृप्त करण्यासाठी ह्या भूतलावर अवतरलेल्या असतात. तेवढ्यासाठीच स्त्रियांची देहधारणा असते. त्यामुळे अशी स्त्री स्वतःमधल्या मानवी मर्यादांचा आढळ इतरांना सहसा होऊ देत नाही. तिच्यामध्ये मानवी सद्गुणांचा अतिरेक कसा आहे हे तिला सतत दाखवावे लागते. ते तिने नेहमीच दाखवीत राहावे ह्यासाठी आमच्या भारतीय संस्कृतीला तिच्यामधल्या माया, ममता, निरलसता, सहिष्णुता, निष्ठा, अहिंसा, त्याग अशा गुणांचा सतत उदोउदो करावा लागतो.

स्त्रियांचा एकीकडे देवी म्हणून गौरव करावयाचा, त्यांतल्या काहींना ब्रह्मवादिनी म्हणून आत्मगौरवाची अफू पाजावयाची, तर दुसरीकडे पुरुषांच्या मानाने त्यांचे स्थान नीच कसे आहे ते त्यांच्या मनावर बिंबविण्यासाठी त्यांच्या आर्तवकाळी त्यांना अस्पृश्य मानावयाचे असा दुटप्पीपणा आमच्या परंपरांच्या नावाखाली चालतो. सोवळ्यात असलेल्यांना त्यांच्या शब्दाचासुद्धा विटाळ होतो. आजसुद्धा काही धर्मनिष्ठ, संस्कृत्यभिमानी समाजधुरीणांच्या घरी हा प्रघात टिकून असेल.

योनिशुचिता किंवा योनिपावित्र्य ह्या विषयाने आमच्या भाषेवरसुद्धा खोल ठसा उमटवून ठेवला आहे. तो फक्त शिव्या म्हणून वापरल्या जाणार्यास शब्दांतूनच व्यक्त होत नाही. कोणत्याही स्त्रीचा उल्लेख करताना तिच्या नावामागे सुश्री, कुमारी, सौभाग्यकांक्षिणी, सौभाग्यवती, गंगाभागीरथी अशी उपपदे लावताना तिच्या योनीची स्थिती वा त्या स्त्रीचे पुरुषसापेक्ष स्थानच आम्ही स्पष्ट शब्दांत एकमेकांना सांगत असतो. हा आमचा प्रघात तिला स्वतःला कोणत्याही आकांक्षा कश्या नाहीत हे आणि ती पुरुषांच्या नजरेला कशी दिसते तेच प्रकटपणे सांगतो. एखादी स्त्री कुमारी म्हणजे अक्षतयोनी आहे की नाही ह्याची उठाठेव पुरुषांनी का करावी? स्त्रियांनी आणि मुलींनी आपणा स्वतःचा उल्लेख तसा करणे म्हणजे आपण स्वतः पुरुषांच्या उपभोग्य वस्तू आहोतअसा कबुलीजबाब देण्यासारखे आहे हे ज्या दिवशी त्यांना उमजेल तो सुदिन.

आपल्या स्त्रियांचे नखसुद्धा परपुरुषाच्या दृष्टीस पडू नये ह्यासाठी मुसलमान लोक त्यांना कापडी बुरखा पांघरावयाला लावतात. आणि सुसंस्कृत हिंदु – ते आपल्या स्त्रियांना कापडी बुरख्यात गुंडाळत नाहीत. ते त्यांना लपवीत नाहीत. ते आपल्या मुलींची इच्छा असो वा नसो, त्यांना विरक्तीचा बुरखा पांघरण्याची सक्ती करतात. हा वैराग्याचा अदृश्य बुरखा अतिशय तंग असतो व तो काढून ठेवण्याची सोय नसते. त्यामुळे तो आमच्या स्त्रियांच्या शरीराशी एकजीव होतो. त्यांच्या रोमरोमांत तो मिनून जातो. ह्या जुलमाच्या वैराग्यामुळे त्यांच्या ठिकाणची इच्छाशक्ती खच्ची करणे, त्यांच्या निरुपद्रवी, सालस गाई बनविणे किंवा त्यांचे work porses बनविणे, त्यांना गुलाम बनविणे अगदी सोपे होते. तसे करता यावे ह्यासाठी काही धर्मांनी त्यांना पापाची खाण मानले तर काहींनी विकारांची जननी!

तर स्त्रीमुक्ति म्हणजे स्त्रियांची विविध भयांतून मुक्तता. त्यांची खोट्या गौरवातून त्याचप्रमाणे जुलमाच्या वैराग्यातून मुक्तता. ह्याचा अर्थ असा नव्हे की त्यांना बेजबाबदार स्वैराचारी व्हावयाचे आहे. नव्हे. त्यांना सगळ्या जवाबदार्यां पेलावयाच्या आहेत, पण त्या जबाबदार्यात उभय स्त्रीपुरुषांच्या राहणार आहेत; त्या सामूहिक असणार आहेत. सगळ्या क्रीडा करावयाच्या आहेत आणि त्या क्रीडाही उभय स्त्रीपुरुषांच्या राहणार आहेत. स्त्रिया पुरुषांच्या हातातले खेळणे राहणार नाहीत. एका खेळण्याचा कंटाळा आला की ते टाकून द्यावयाचे व दुसरे घ्यावयाचे असे यापुढे पुरुषांना करता यावयाचे नाही. कोणाच्याही गरजा तुच्छ न लेखता स्त्रीपुरुषांनी परस्परांच्या गरजा समजून घ्यावयाच्या आहेत. पुरुषांना विधुरत्वाचा डाग लागत नाही. स्त्रियांना वैधव्याचा लागतो. तो डाग पुसावयाचा आहे.

हे सारे काम एका रात्रीतून होण्यासारखे नाही. म्हणून ते सावकाश, नेटाने, धीर न सोडता आणि समाजप्रबोधनाच्या अहिंसक आणि रचनात्मक मार्गाने करावे लागणार आहे. ह्या बाबतीतली उतावीळ अंगाशी येईल हे जाणून ते अत्यन्त सावधपणे करावे लागणार आहे. आणि हे सर्व करीत असताना कुटुंबाचा पाया मजबूत ठेवावयाचा आहे. त्यासाठी स्त्रीपुरुषांनी आपल्या प्रेमाच्या कक्षा संद करावयाच्या आहेत. (आणि मुख्यतः पुरुषांनी आपली सहिष्णुता वाढवावयाची आहे.) कारण प्रेमाचा संकोच व असहिष्णुता ही दुसन्या पक्षाला बहुधा अन्यायकारक व सर्वांना दुःखकारक होत असतात.
एक मुद्दा मांडावयाचा राहिला. त्यांचा नकाराधिकार पुरुषांनी मान्य करावा असे स्त्रियांना वाटत असेल तर स्त्रियांना आपली इच्छा व्यक्त करावीच लागेल. कारण त्यांना स्वतःच्या इच्छा आहेत हे पुरुषांना अजून माहीतच नाही. आजवर त्या क्वचित् काही समंजस पुरुषांवजळ आपली अनिच्छा व्यक्त करू शकत होत्या. पण इच्छा व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य उच्चवर्णीय स्त्रियांनी अनेकानेक पिढ्यांपासून उपभोगलेलेच नाही. त्यामुळे पुरुषांसमोर त्यांची प्रतिमा एखाद्या बाहुल्यासारखी किंवा खेळण्यासारखी आहे. त्याकरिता आता समस्त पुरुषजातीला स्त्रियांना इच्छा आहेत व वैराग्य आणि अनिच्छा ह्यांत फरक आहे हे जाणवून द्यावे लागेल. हे कार्य अतिशय कुशलतेने करावे लागेल. आम्हा स्त्रीमुक्तिवाद्यांची खरी कसोटी येथेच लागणार आहे.
* * * *
डॉ. के. रा. जोशी ह्यांनी आपल्या आजचा सुधारकची सात वर्षे’ ह्या लेखात जानेवारी व फेब्रुवारी १९९७ मध्ये प्रकाशित झालेल्या समान नागरी कायद्याच्या मसुद्याची चिकित्सा करणाऱ्या माझ्या लेखाची टिंगल केली आहे.

आजचा सुधारक दरवर्षी ३८४ पाने देतो. गेल्या वर्षी मी त्याची एकूण साडेचौदा पाने व्यापली आहेत, स्त्रीमुक्तीच्या विषयाला त्या साडेचौदापैकी सात पाने दिली आहेत. म्हणजे २ टक्क्यांपेक्षा कमी पाने दिली गेली आहेत.

अशी परिस्थिती असूनसुद्धा आमच्या मासिकाच्या गेल्या सात वर्षांचा आढावा घेताना डॉ. के. रा. जोशींनी दिवाकर मोहनी आणि दि. य. देशपांडे ह्या दोघांवरच त्यांच्या टीकेची धार धरली आहे. त्यांनी अवश्य टीका करावी. तर्कशुद्ध टीकेचे नेहमीच स्वागत आहे. त्यातून नैयायिकांच्या टीकेचे अधिक स्वागत आहे.

स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य देणारा मी नाही. ते असावे अशी कामना करणारा एक सामान्य पुरुष आहे. ते का असावे त्याची कारणे मी माझ्या वरच्या लेखात निराळ्या शब्दांत पुन्हा मांडली आहेत. त्या कारणांची साधकबाधक आणि सर्वांगीण चर्चा करण्याचे कार्य त्यांनी अजून अंगीकारावे.

जर काही स्त्रियांपर्यंत मी त्यांच्या लैंगिक स्वायत्ततेचा विचार कधी पोचवू शकलो तर त्यासोबतच किंवा त्या आधी मी अपरिचित पुरुषाला आलिंगन म्हणजे साक्षात् मृत्यूला आलिंगन हा विचार पोचवीन, तहान कितीही जोराची असली तरी ती भागविण्यासाठी कोणतेही पाणी पिऊ नये, त्यात घाण पडलेली नाही, ते गटारातले नाही ही खात्री करून घ्यावी हा विवेक त्यांना शिकविणे फार कठीण जाणार नाही असा माझा विश्वास आहे. फक्त स्त्री माणूसच आहे, तिला तहान लागू शकते ह्याचा समाजाला विसर पडला आहे, म्हणून त्याची जाणीव करून देण्याचे कार्य मी माझ्या परीने करीत आहे. आज तिला पाणी मागण्याचा अधिकार नाही. तिला नवरा असला आणि त्याने आपणहून पाणी वाढले तरच तिची तहान भागणार अशी मला आज तिची स्थिती दिसते. अशी ही मुख्यतः स्त्रियांची स्थिती समतेला पोषक तर नाहीच, उलट त्यांना अन्यायकारक आहे एवढेच मी सांगत आहे. ही अन्याय्य परिस्थिती टिकवून धरण्याऐवजी ती बदलण्यासाठी खटपट करणे आवश्यक आहे. पूर्वी आपल्या समाजात अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना पिण्याचे पाणी (वाच्याथन) स्पृश्यांची गयावया करून मागावे लागे. आमच्या असमंजस पूर्वजांना त्यात ते कोणावर अन्याय करीत होते हेच समजत नव्हते. आमचे आजचे परंपराभिमानी लोकही सद्यःपरिस्थिती स्त्रियांना अन्यायकारक आहे हे समजून घ्यावयाला तयार नाहीत. मी कोणत्या तर्हे ने सांगितल्यानंतर त्यांना ते कळेल हे मला कळत नाही. मी म्हणतो त्यावर लगेच अंमल करावा असा आज माझा आग्रह नाही, तर स्त्रियांवरील अन्याय दूर करण्याच्या दृष्टीने त्यावर विचार करावा व सर्वमान्य असा कार्यक्रम त्याच्या चर्चेतून निघतो काय हे आपणाला पाहायचे आहे. तसे काही न करता जणू आजच आकाश कोसळून पडणार आहे असा कांगावा करून हाहाकार माजवावयाचा आणि एड्ससारख्या आजाराचे बुजगावणे दाखवावयाचे असा प्रकार चालू आहे. जे खोलवर विचार करीत नाहीत व रूढिप्रिय आहेत, ते त्या बुजगावण्याला घाबरतात व त्यामुळे माझ्या म्हणण्यातले तथ्य त्यांच्यापर्यंतही पोचत नाही. म्हणून मला ते शांतपणे, सावकाश आणि वारंवार सांगावे लागते. डॉ.के. रा. जोशींनी आम्हाला निरुत्तर केले असे त्यांना व इतरांना वाटू नये ह्यासाठी आजचा सुधारक ची पाने अडविणे भाग पडते. सर्व क्षेत्रांत समता आणणे हे आजचा सुधारकचे व्रत असल्यामुळे आणि ह्या विषयावर दुसरे कोणी लिहीत नसल्यामुळे माझे लिखाण तो छापतो. तेव्हा डॉ. के. रा. जोशी ह्यांनी आपला परंपराभिमान थोडा वेळ बाजूला ठेवावा इतकीच त्यांना नम्र विनंती आहे. माझे त्यांच्या व अन्य सर्व वाचकांच्या न्यायबुद्धीला आवाहन आहे.

विवाहबंधन आणि विवाहविधी किंवा विवाहसंस्कार ह्या दोन वेगळ्या वस्तू आहेत. स्त्रीपुरुषांनी एकमेकांबरोबर पूर्ण आयुष्य घालवावयाचे, आपली व दुसन्याची म्हणजे सख्खी व सावत्र मुले व गरजेप्रमाणे भाचे, भाच्या, पुतणे, पुतण्या ह्यांचा प्रेमाने प्रतिपाळ करावयाचा, घरातल्या सर्व लहानथोरांची, पै पाहुण्यांची नीट काळजी घ्यावयाची हे ते ‘बंधन’ आहे. हे गृहस्थाश्रमाचे बंधन आहे. हे बंधन पाळण्यासाठी आणि गृहस्थाश्रम चालविण्यासाठी विवाहविधीची व त्याची आपण ज्याच्याशी सांगड घातली आहे त्या नैष्ठिक एकपतिपत्नीकत्वाची गरज नाही. कोणत्याही धार्मिक किंवा कायदेशीर विधीशिवाय स्त्रीपुरुष सुखी कुटुंब निर्माण करू शकतात. ते त्यांनी अवश्य करावे. किंबहुना तेच करावे. आणि असे कुटुंब आपण समाजमान्य करावे इतकेच माझे म्हणणे आहे. ‘देवाब्राह्मणांच्या साक्षीने झालेल्या त्या विधी चे अवडंबर माजविल्यामुळे जर बहुसंख्य किंवा सगळ्याच स्त्रियांवर व क्वचित् काही पुरुषांवर सतत अन्याय होत असेल तर त्या विधीचे आपल्या मनांतील माहात्म्य कमी कसे करता येईल ते पाहावे ही माझी मागणी खरोखरच इतकी हास्यास्पद आहे?

आमचा समाज इतका गतानुगतिक आहे की माझ्या दुबळ्या प्रयत्नांना माझ्या आयुष्यात काही यश होईल अशी मला मुळीच आशा नव्हती. पण डॉ. के. रा. जोशी माझ्यावर इतके तुटून पडतात की त्यामुळे माझ्या लेखनात काही सामर्थ्य आहे असा मला आता भास होऊ लागला आहे. ते म्हणतात त्याप्रमाणे मी जर आधुनिक श्वेतकेतु झालो तर ती मी माझ्या गौरवाचीच बाब समजेन.

स्त्रियांच्या ज्या समस्यांचा मी उल्लेख करीत असतो त्या माझ्या समजुतीप्रमाणे केवळ उच्चभ्रू आणि जातिब्राह्मण असणार्याा समाजाच्या नाहीत हे माझ्या सगळ्या वाचकांना समजेल असे मला वाटत होते. पण ते एका वाचकाला समजले नाहीच. तेव्हा मी पुन्हा सांगतो की ते सर्व धर्माच्या व जातींच्या स्त्रियांबद्दल मला म्हणावयाचे आहे.

आता एड्सविषयी:
डॉ. के. रा. जोशी ह्यांना मला एक प्रश्न विचारावयाचा आहे. एड्स्चे भय नसते तर त्यांना असे बहुपतिपत्नीक कुटुंब मान्य झाले असते काय? मीच त्यांच्या वतीने उत्तर देतो की ते झाले नसते. म्हणून येथे त्यांनी केलेला एड्सचा उल्लेख उपरा आहे. तरी आपण त्याचा वेगळा विचार करू.

ज्याला ‘एड्स’ (AIDS) म्हणतात तो लक्षणसमूह मुळात स्त्रीपुरुषसंबधातून निर्माण झालेला नाही. तो एका विषाणूच्या मानवी शरीरामधल्या प्रादुर्भावामुळे झाला. तो केवळ स्त्रीपुरुषसंबंधांमधून वाढतो असेही नाही. त्याला कोणतेही निमित्तकारण पुरते. हा विषाणु मानवी शरीराच्या बाहेर वा मानवी पेशींच्या आधाराशिवाय जिवंत राहिला तर तो तेव्हा कार्यक्षम नसतो.मानवी पेशींच्या साहाय्याने एका रोगी शरीरातून दुसर्याा निरोगी शरीरात तो प्रवेश करतो. शरीराची त्वचा कोठेहि फाटलेली असली व तेथे कोणत्याही निमित्ताने जंतुसंसर्ग किंवा विषाणुसंसर्ग झाला तर त्यामुळे जसे काही आजार होतात तसाच हाही आजार किंवा लक्षणसमूह कालान्तराने दृग्गोचर होतो. जंतुसंसर्ग किंवा विषाणुसंसर्ग होण्यासाठी अगदी सूक्ष्म जखमा पुरतात. इंजेक्शनच्या सुईने किंवा न्हाव्याच्या वस्तऱ्यामुळे होणाऱ्या किंवा समागमाच्या वेळी नाजुक कातडीला होणाऱ्या अतिशय बारीक जखमा ह्या विषाणुसंसर्गासाठी पुरतात; आणि निरोधसारखी साधने वापरून ह्या जखमा बर्या‍च प्रमाणात टाळता येतात.

वास्तविक एड्सला आजार म्हणता येणार नाही. ह्या विषाणूच्या संसर्गानंतर माणसाची प्रतिकारशक्ती कायमची नष्ट होते, व त्या संसर्गानंतर कोणत्याही आजारासाठी केलेला इलाज निष्फल ठरतो. ह्या विषाणूवर अजून उपाय सापडला नाही. विसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत अनेक साथीच्या रोगांवर उपाय सापडले नव्हते. ज्यांना प्रतिजैविके म्हणतात ती उपलब्ध होईपर्यंत पुष्कळ रोग असाध्य होते. पण ते काही असो, एडस् हा लक्षणसमूह नेहमीसाठी असाध्य राहील असे गृहीत धरून आपण त्याला प्रतिबंध कसा करता येईल ते पाहू या.

आजवर हा आजार पुरुषांमुळेच पसरला आहे व पुढेही बहुधा त्यांच्यामुळेच पसरेल. तो सुरुवातीला पुरुषांनी पुरुषांना दिला आणि मग पुरुषांनी स्त्रियांना दिला. म्हणजे तो पुरुषांच्या गुदमैथुनामधून अधिक पसरला आहे, हे आपण जाणून घेणे आवश्यक आहे. मनूला काही म्हणू दे, गेली अनेक शतके स्त्रिया सामान्यतः एकपतिक राहिल्या आहेत. पुरुष मात्र बहुशः वैचित्र्याची आवड असलेला दिसून येतो. त्यामुळेच वेश्याव्यवसाय हा सर्वांत पुरातन व्यवसाय आहे असा एक समज प्रचलित आहे. पण ते असो.

विवाह पुढेही चालू राहणार हे मी गृहीत धरीत आहे. कारण माझ्या लिखाणाचा प्रभाव कोठेही पडलेला नाही. एड्स हा लक्षणसमूह पुरुषांच्या समलिंगी संबंधांतून मुख्यतः पसरतो हे माहीत असल्यामुळे प्रत्येक पुरुषाने विवाहाच्या आधी किंवा विवाहाचा प्रस्ताव करताना आपण HIV – ve असल्याचे प्रमाणपत्र आपल्या होऊ घातलेल्या सासर्यााला सादर केले पाहिजे. ते प्रमाणपत्र पाहिल्याशिवाय उपवर कन्येच्या बापाने त्या विवाहाला संमती देऊ नये. एकवेळ मुलाची पत्रिका पाहू नये; पण हे प्रमाणपत्र पाहावे अशी गरज निर्माण झाली आहे. ब्रह्मचर्याच्या फाजील कल्पना आणि विवाहाला होत जाणारा विलंब ह्यामुळे तरुण मुलांना समलिंगी संभोगाचे आकर्षण वाटू शकते हे सांगावयाला फार गहन अध्ययनाची गरज नाही. पुन्हा सांगतो, सर्व मुले ब्राह्मणांचे संस्कार घेऊन वयात येत नसतात.

ज्या स्त्रियांच्या रोगग्रस्ततेबद्दल पुरुषांना शंका असेल त्यांचा संसर्ग पुरुषांनी टाळावा. अश्या स्त्रियांशी कोणी लग्न करू नयेत, वा जाणूनबुजून केल्यास योग्य ती काळजी घ्यावी. सगळ्या समाजाला निरोगी ठेवण्याची जबाबदारी एकट्या स्त्रिया पार पाडू शकणार नाहीत. त्या कितीही ‘शुद्ध’ राहिल्या तरी त्यांच्या लग्नाच्या नव-यांकडून एड्स् त्यांच्यापर्यंत पोचू शकतो हे डॉ. जोशी का लक्षात घेत नाहीत? त्यामुळे त्या बाबतीत स्त्रियांना आवरण्यापेक्षा पुरुषांना आवरणेच आवश्यक आहे. एकाहून अधिक निरोगी स्त्रीपुरुषांच्या समागमामुळे हा आजार होत नाही हे डॉ. जोशी ह्यांनीलक्षात घ्यावे इतकी त्यांना विनंती आहे.

सगळ्याच पुरुषांनी मनोनिग्रह केला तर स्त्रियांना आपले स्वातंत्र्य’ कसे उपभोगता येईल असा प्रश्न डॉ. के.रा. जोशी ह्यांना पडला आहे. त्यामध्ये त्यांची स्वातंत्र्य ह्या शब्दाच्या आम्हाला अभिप्रेत असलेल्या अर्थाविषयीची गैरसमजूतच दिसून येते. स्त्रियांना जसे नकार देण्याचे स्वातंत्र्य हवे तसे ते पुरुषांनाही हवेच. सगळ्या पुरुषांना आजन्म ब्रह्मचर्यपालनाचे स्वातंत्र्य आजवर होते ते पुढेही राहील. ते अबाधित आहे. स्त्रीपुरुषसंबंध हा उभयतांच्या आनंदासाठी आहे. ती केवळ स्त्रियांची किंवा फक्त पुरुषांची क्रीडाच नाही. स्त्रियांना पुरुषांवर जबरदस्ती करावयाची नाही.

डॉ. के. रा. जोशी ह्यांना पुरुष स्त्रियांना वश होणार नाहीत असे वाटते की काय? एक शुकाचार्य सोडले तर भारतीय पुराणात एकाही ब्रह्मचान्याचा दाखला नाही. म्हणून स्त्रियांनी त्यांची ठेवणीतली वशीकरणयन्त्रे काढावयाचा अवकाश, ह्या भूलोकावरच्या त्यांच्या आवडीच्या पुरुषांची कवचे त्यांच्यापुढे निष्प्रभ होतील इतकेच नव्हे तर त्या कुंतीप्रमाणे पुरुषाला आधीच पारखून घेऊ शकतील.

लहान तोंडी मोठा घांस घेऊन डॉ. के. रा. ह्यांना मला शेवटी एकच गोष्ट सांगावयाची आहे. प्रकृतीपासून आपण ढळलो तर आपण एकतर विकृतीच्या दिशेला जाऊ, नाहीतर संस्कृतीच्या दिशेला जाऊ. विकृतीच्या दिशेला आपले जाणे जसे सर्वांना दुःखदायक होते, तसेच संस्कृतीच्या दिशेला जाणे मानवाच्या दुःखालाच कारणीभूत होते. शिवाय त्यामुळे समाजातला दंभ वाढतो व संस्कृतीच्या गैरवाजवी अभिमानामुळे प्रकृतीलाच विकृती समजण्याचा प्रमाद घडतो. अशा प्रमादापासून आपण सर्वांनीच स्वतःला वाचविणे इष्ट ठरेल.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.